Pahile prem - 1 in Marathi Comedy stories by Swapnil Tikhe books and stories PDF | पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस...

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस...

आपला नाव गणपत, गल्लीत आपल्याला सगळे भाई नावानेच ओळखतात. दाराराच तसा आहे आपला, अगदी लहानपणापासूनच. त्यावेळीसुद्धा तालमीत गेल्यामुळे चार पाच पोरांना आपण एकटाच चोपत असू. समोरच्याशी चार हात करायला आपण कधी फार विचार करत नाही, डायरेक्ट भिडतो. उगा जास्त डोकं खाजवायची आपल्याला कधीच गरज भासली नाही, कारण एक घाव अन दोन तुकडे असा आपला स्वभाव आहे. तसे पाहता आपल्या घावा नंतर बऱ्याचदा दोन तुकड्या ऐवजी भूगाच होतो हे समजायला आपल्याला फार वेळ लागला नाही, पण त्याचा एक फायदा असा झाला की कोणीही आपल्याला विनाकारण नडला नाही, आणि जो नडला त्याचे काय झाले हे तुम्हाला गल्लीतली पोरंच अधिक चांगले सांगतील.

घाबरू नका, तुम्हाला काय करणार नाही. मी तुम्हाला आपली लव्ह स्टोरी सांगण्यासाठी बोलावलं आहे.

तसे बघितले तर लव्ह आणि आपला दूरपर्यंत काही संबंध नव्हता, पोरींपासून तर आपण चार नाय तर चांगले दहा बारा हात दूर असायचो. कारण आपण स्वतः डोळ्याने पहिले होते. ज्या ज्या पोराच्या आयुष्यात पोरगी आली त्याची तालीम काहीच दिवसात बंद झाली. उस्तादांना असल्या पोरांचा भारी राग येई, त्यांनीच आपल्याला पोरींपासून दूर रहा असे बजावले होते. आपणही त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नव्हता. आपल्या डोक्यात फिट भरला होता, पोरगी आली म्हणजे तालीम गेली. अन दोन्ही मधले एक निवडायचे असेल तर आजही आपण तालीमच निवडू. तसे आपल्याला बहिणींची कधीच कमी नव्हती, राखी पौर्णिमेला आपले दोन्ही हात राख्यांनी भरलेले असायचे, इतकि इज्जत होती म्हणजे अजूनही आहे आपल्याला. पण एकंदरीतच पोरींचे रडणे, लाजणे आपल्याला फारसे पटायचे नाही. त्यातून मित्रांच्या मैत्रिणीचे रुसवे फुगवे बघितले की आपण पहिला तालमीत पळायचो. आपल्याच्याने हे असले काही झेपणार नाही हे आपल्याला पक्के ठाऊक होते. त्यामुळे त्या मार्गाला कधीच जायचे नाही असेही आपण ठरवले होते.

पण सगळा गोंधळ त्या व्हॅलेंटाईन डे ला सुरु झाला. आपल्याला नुकतीच मिसरुड फुटू लागलेली, त्यात त्या दिवशी सकाळीच आपण तिला बघितले. तुम्हाला सांगतो, बघता क्षणीच फिदा झालो. कधी नव्हे ते तिचा पाठलाग केला. थोडा दुरूनच. पहिल्यांदाच आपल्याला मनात भीती वाटली होती. त्यामुळे अधिक जवळ गेलो नाही. मनभरून बघितल्यावर मात्र तालमीत जायला उशीर होतो आहे हे मला जाणवले, आणि आपल्या हातून किती घोर पाप घडते आहे हे आपल्याला समजले. आपण तडक तिथून निघालो आणि तालमीत पोचलो. पहिल्यांदाच आपण तालमीत उशिरा पोचलो होतो. उस्तादांना नजर द्यायची हिंमतच झाली नाही, आणि तेव्हाच आपण डोक्यात फिट केले असे पुन्हा करायचे नाही. पाच मिनिटाच्या उशिरासाठी पंधरा मिनिटे या हिशोबाने आपण त्या दिवशी थोडा जास्तच वेळ तालमीत काढला, तेव्हा कुठे उस्तादांचे पाय शिवायची हिंमत आपल्याला आली. उस्तादांनी पण आपली पाठ थोपटली तेव्हा कुठे मन थोडं शांत झाले आणि आपण आनंदाने तालमीतून बाहेर आलो. आता परत सगळे पहिल्यासारखे होते, आज जे झाले ते आपण विसरून जायचे आणि परत कधीच त्या मार्गाला जायचे नाही हे आपण सतत मनाला समजावू लागलो.

पण आपण तालमीतून बाहेर पडून जेमतेम दहा पावले चाललो नसेल तर ती परत एकदा समोर आली, फार वेळ नाही पण नुसतीच समोरून निघून गेली. नकळतच माझे पाय तिच्या मागे चालू लागले. पण यावेळी तालमीतल्या पोरांनी आपल्याला आवाज दिला आणि आपण भानावर आलो. पोरांशी थोडा वेळ बोललो आणि तडक घर गाठले. खरा कहर तर त्या रात्री झाला, डोळे मिटले की ती समोर यायची आणि आपले मन तिच्या कल्पनेत रमू लागायचे. त्यामुळे मी त्या रात्री डोळे बंदच करायचे नाहीत असे ठरवून माझ्या खाटेवर बसून राहिलो, पहाटे पहाटे मात्र झोप अनावर झाली आणि नकळतच आपले डोळे मिटले.

त्यादिवशी आपल्या हातून दुसऱ्यांदा नियम मोडला गेला. तालिमीत गेल्यापासून प्रथमच आपण सूर्योदय झाला तरीही अंथरुणात पडून होतो, सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर घालायचे सूर्यनमस्कार त्या दिवशी मला काहीही केले तरी जमणार नव्हते कारण वेळ निघून गेली होती. हे जर उस्तादांना कळले तर आपले काही खरे नाही, कदाचित ते आपल्याला तालमीतून काढून पण टाकतील याची भीती आपल्याला वाटू लागली आणि त्यामुळेच आपण आजारी पडल्याचे सोंग करायचे मी ठरवले. पण माझ्या सारख्या पठ्ठयाला आजाराचे नाटक करणे किती अवघड आहे हे आपल्याला दोन तासातच समजले. आई सतत उशाशी बसून होती, आजी तिच्या अनुभवातून वेग वेगळी औषधे पाजत हाती. रोजचा खुराक सोडून पोटाला हलके जेवण जेवावे लागणार होते ते वेगळेच. त्यामुळे हे नाटक जर अजून चालू ठेवले तर आपण खरेच आजारी पडू कि काय अशी शंका येऊ लागली. पण तालीम सुटू नये म्हणून हे सगळे करणे भाग होते. मी कसाबसा तो दिवस रेटला.

पण रात्री पुन्हा तोच प्रकार सुरु झाला, माझेच डोळे बंद करायची मलाच भीती वाटू लागली. परत एकदा मी पहाटे पर्यंत जागलो. पण हे असे फार दिवस चालणार नाही हे आपल्याला समजले. आता यातून कसा मार्ग काढायचा हे ठरवण्यासाठीच मी माझ्या जिगरी दोस्ताला गाठले, त्या पठ्ठ्याने अजून तीन चार कार्टी बोलावली. मला जो काही त्रास होत होता तो मी सगळ्यांना सांगितला आणि मी चक्क प्रेमात पडलो आहे असा एकमुखाने निर्णय झाला. त्यावर आमची फारशी चर्चाही झाली नाही, एकंदरीतच हे प्रकरण आमच्या सगळ्यांच्याच हाता बाहेरचे होते. अशा बाबतीत आम्हाला कुणालाच फारसा अनुभव नव्हता, कुणाला नुसता दम भरायचा असता किंवा कुणाचा वचपा वैगेरे काढायचा असता तर माझ्या या मित्रांनी दहा उपाय दिले असते पण माझ्या या प्रोब्लेमवर कोणाचेच डोके चालत नव्हते. उस्तादांना भेटून काहीच उपयोग नव्हता, त्यामुळं मी खूप म्हणजे जवळ जवळ पाच मिनीटे विचार केला आणि या मित्रांचा या बाबतीत काहीच उपयोग नाही हा निष्कर्ष काढला. तेथून उठलो आणि तडक घरी पोचलो. आई आणि बापाला समोर बसवले, सगळा प्रकार सांगितला. मित्र काय बोलले ते पण सांगितले.

माझे बोलणे झाल्यावर मात्र बाप माझ्याकडे एक टक रोखून पाहत होता. तसे एवढे सगळं बोलल्यावर कदाचित बाप आपल्याला बुकलून काढेल अशी मनाची तयारी मी आधीच केली होती, पण उलटेच झाले. तो माझ्याकडे टक लावून बघत होता. आता पुढे काय होणार या भीतीने माझे हृदय जरा जोरातच धडधडू लागले. बापानं हात उचलला असता तर परवडले असते असे मला वाटू लागले.

पण माझ्या बापाने मला माझे वय विचारले, मी बोललो पंधरा म्हणून. तेव्हा तो मला बोलला,

"पठ्ठ्या आपल्या देशात आठराच झाल्याशिवाय मत टाकता येत नाही अन तू पंधराचा असतानाच प्रेमात पडलास म्हणतोयस?"

मी आपली घाबरूनच मान हलवली.

त्या नंतर बापाने आईकडे नजर फिरवली, यात आपला काही दोष नाही इतकेच आई बापाला समजावू लागली. बापाने मात्र त्यांनंतर घरातल्या सगळ्यांचीच शाळा घेतली अन मला मात्र काही बोललेच नाही. मी शांतपणे बाजूला बसून सगळे बघत होतो, आपला नंबर लागेल तेव्हा आपले काही खरे नाही ही भीती मनात वाढतच चालली होती. माझ्या प्रेमावरून घरात असे महाभारत होईल असे मी केलेल्या पाच मिनिटाच्या विचारात कधीच आले नव्हते, त्यामुळे आता काय करावे हे मला सुचत नव्हते. त्यामुळं मी सगळ्यात सोपा मार्ग निवडला, उठलो आणि म्हणालो-

"मी तालमीत जाऊन येतो, तो पर्यंत तुमचे काय ते ठरवा."

माझ्या त्या वाक्याने बापाचा चेहरा लालबुंद झाला, त्याने तर घरात तांडव सुरु केले आणि मला माझी चूक समजली. मी जिथून उठलो होतो तिथेच परत जाऊन बसलो. घरातल्यांच्या प्रयत्नाने थोड्याच वेळात बाप शांत झाला.

"तीन वर्ष थांब. मग पुढचं पुढे बघू. तो पर्यंत तिचे नाव बी घ्यायचा नाही या घरात. जमत असेल तर आणखी एक करा, गल्लीत कुठे काही बोलू नका इतक्यात तिच्या विषयी. नाहीतर उगाच हसे व्हायचे सगळ्यांसमोर. सगळे तीन वर्षानंतर. तो पर्यंत तुझे प्रेम टिकले तर ती कोण हाय, कुठे राहते ते मला सांग." - इतके बोलून तो तेथून निघून गेला.

मी अख्ख्या दिवसाचा जमाहिशेब केला तेव्हा बापाची बोलणी, चुकलेले नमस्कार अन मनाची झालेली ओढाताण या पलीकडे हाती काही लागले नव्हते. एकंदरच हे प्रेम किती महाग असते याची पुरती कल्पना आपल्याला पहिल्या दिवशीच आली. त्यामुळे शक्य तर यातून सुटका करून घेणेच फायद्याचे आहे हे आपला मेंदू आपल्याला न चुकता सांगत होता पण मन मात्र भलतीकडेच धावत होते.

- क्रमशः