श्यामचीं पत्रें
पांडुरंग सदाशिव साने
पत्र बारावे
विचारमंथन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.मागील पत्रांतून तुला यंत्रवाद, गांधीवाद, समाजवाद, साम्राज्यवाद, फॅसिझम वगैरेंविषयी थोडें थोडें लिहिलें होतें. गांधीवाद व समाजवाद यांतील साम्य व विरोध मी दाखवीत होतों. गांधीवादी लोकांची जीं तीन तत्वें तीं समाजवादानेंहि कशीं साधलीं जातात तें मी मांडले होतें.
गांधीवादी यावर म्हणतात कीं आमचें तुमच्या म्हणण्यानें समाधान होत नाही. यंत्रवादावर आमचा मुख्य आरोंप असा आहे की यंत्रानें मनुष्य केवळ यंत्र बनतो ! यांत्रिक निर्मितीत माणसाला आनंद नाही. मोठमोठया प्रचंड कारखान्यांत निरनिराळे भाग निरनिराळया ठिकाणीं बनत असतात. कोणा कामगाराला मरेपर्यंत चाकेंच करावीं लागतील. कोणाला टांचण्यांची डोंकीच करीत बसावें लागेल. त्याच त्या ठराविक बारीक बारीक वस्तु यंत्रामध्यें वर्षानुवर्षे करती राहावें लागतें. कामगार यंत्रासमोर आपला यंत्राप्रमाणें उभा असतो ! आणि त्या वस्तु भराभरा उत्पन्न होत असतात. त्या कामगाराला त्या निर्मितीत आनंद नाही. ' हें मी केलें, माझ्या बोटांनीं केलें, माझी बुध्दि मी हयांत ओतली, माझी कला ओतली ' असें त्याला म्हणतां येईल का? कामगाराचें जीवन यंत्रामुळें कंटाळवाणे होतें. तुम्ही कामाचे तास कमी कराल व कारखान्यांत जो आनंद मिळत नाही, तो घेण्यासाठी त्याला उरलेला वेळ द्याल. परंतु ग्रामोद्योगांत कामातच आनंद वाटतो. तें काम कंटाळवाणे वाटत नाही. आनंद निराळा शोधावाच लागल नाहीं. समजा मी चरक्यावर सूत कातीत आहे. तें सूत जाड येतें कीं बारीक येतें तें मी पाहतों. त्यांत माझे कौशल्य असतें. तें सुंदर दुधाच्या धारेसारखें सूत निघतांना पाहून मला आनंद होतो. हें माझ्या हातचें सूत असें मी अभिमानानें सांगतो. माझी कला त्या कृतींत असतें. मी तेथें बुध्दि वापरतों. यंत्रानेंच जेथें सारें होते तेथें कलानिर्मितीचा आनंद कोठें आहे? यंत्रनेंच जेथें सारें होते तेथें कलानिर्मितीचा आनंद कोठें आहे? त्यामुळें मग मला आनंद अन्यत्र शोधावा लागतो. पण श्रमच आनंदरूप होणं यांतील गोडी कांही और आहे. आपल्या मागावर लहानशा झोपडींत विणकर मलमल विणतो ! किती हलक्या हातानें तो धोटा फेंकतो, कसा जपतो, कसें बघतो ! त्याचे कलात्मक डोळे, त्याची कलात्मक बोटें, पहा तरीं. तो आपल्या कामांत मग्न असतो. तल्लीन असतो.
ग्रामोद्योगांत, स्वत: निर्माण केलेल्या वस्तूंत, असा हा निर्मितीचा आनंद आहे. हा सात्विक आनंद यंत्रानें नष्ट केला आहे. दुसरी गोष्ट अशी कीं तुम्ही कामाचे तास कमी करणार व त्या वेळांत मनुष्य आपला जीवनाचा विकास करून घेईल, निरनिराळे आनंद, कलात्मक वा बौध्दिक अनुभवील असें म्हणतां. परंतु हे बोलायला ठीक आहे. कारण मनुष्य फुरसतीचा वेळ सार्थकीच लावील याची काय खात्री? मनुष्य प्राणी अद्याप इतका विकसित झालेला नाहीं. पूर्णत्वाच्या गोष्टी आजच बोलण्यांत अर्थ नाहीं. ' रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी. ' ही म्हण खोटी नाही. उद्योगहीन माणसें भांडत बसतात, अध:पतित होतात. '' Satan tends idle hands to do mischief. कर्मशून्य हातांकडून सैतान आपले खेळ करवून घेत असतो ! '' म्हणून मनुष्याला जास्तीत जास्त वेळ, परंतु तो अगदी थकून जाईल इतका वेळ नव्हे, निदान सहा सात तास कामात गुंतवून ठेवणें बरें. त्याच्या आवडीचे उद्योग त्यास द्यावा. म्हणजे त्या कामाचात्याला कंटाळा येणार नाही. आवडींचे काम करण्यांत परमसुख आहे. तें काम करून थकवा वाटत नाहीं. बुध्दि व हृदय यांनाहि त्या हस्तकार्यात वाव असतोच. तुम्ही त्याला निराळा आनंद देऊं म्हणतां, त्याची आमच्य हस्तोद्योगांत जरूरी नाहीं. कारण यंत्राप्रमाणें येथें कंटाळवाणें काम नाहीं.
आणखी एक मुद्दा असा कीं मनुष्याची बुध्दीसुध्दां तो सहासात तास शारीरिक श्रम करील तर अधिक तेजस्वी राहील. जितकें शारीरिक काम कमी तितकी बुध्दि कमी तल्लख. थोरो म्हणत असे, अरे लेखका, जरा हातांत कुदळ घे. अंगातून घाम निघू दें. शरीरांतील मळ बाहेर पडूं दें. अंगाला ऊन लागूं दे. प्रकाश मिळूं दे. म्हणजे तुझ्या लिहिण्यांतहि प्रकाश येईल. तुझ्या लिहिण्यांतील पोटदुखी व निराशा जाईल. खोलींत बसून लिहितोस म्हणून पोटांत मुरडामारतो व लिहिण्यातहि सुतकीपणा येतो ! '' थोरोंच्या या म्हणण्यांत अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की शरीरश्रम न करणारेहि बुध्दिमान झाले. आमचें म्हणणें असे कीं त्यांनीं शरीरश्रम केले असते तर ते अधिकच सतेज बुध्दीचे झाले असते.
तसेंच तुम्ही जें म्हणतां की हुकुमशाही ही संक्रमणावस्थपुरतीच आहे. परंतु ही संक्रमाणावस्था किती काळ चालणार? आजूबाजूची सर्व दूनिया समाजवादी होईपर्यात तुम्हाला धोका राहणार ! म्हणजे सारें जग समाजवादी होईपर्यंत तुम्हाला हुकुमशाही ठेवावी लागणार !! याकाळाला कांहीं मर्यादाच नाहीं. तसेंच तुमच्या प्रयोगक्षेत्रांतील सारे लोक तुमचा प्रयोग पचवीपर्यंतहि तुमची हुकुमशाही राहणार. तेव्हां संक्रमणकाल अनंत आहे. सारें जग समाजवादी होईपर्यंत तुमचा प्रयोग वाढत जाणार. तोंपर्यंत लढाया राहणार. कट होणार. म्हणून हुकुमशाही राहणार !आणि मनुष्य-स्वभाव असा आहे कीं सत्तेची एकदां सवय लागली, चटक लागली कीं ती जात नाहीं. एकदां एखाद्या वर्गाला सत्ता मिळाली कीं तो ती सोडू इच्छित नाहीं. हुकुमशहा अमर्याद काळपर्यंत राहणार,सत्तेची एक परंपरा निर्माण होणार. जी कम्युनिस्ट पार्टी असेल ती सत्तेची मैत्रीण बनेल. आज रशियांत तोच प्रकार झाला आहे. या सत्तावाल्यांना हातची सत्ता सोडणें मग जिवावर येईल. महत्वकांक्षी लोक पुढे येतील. हुकुमशाहीच्या संक्रमणावस्थेंतून असे उत्पात निर्माण होण्याचासंभव आहे. कारण तुमची संक्रमणावस्था जवळ जवळ सारें जग समाजदवादी होईपर्यंत राहणार ! तुम्ही मोठमोठी प्रशस्त शहरें निर्मूं व प्रजा कशी तरी एकत्र राहतो असें दिसणार नाही म्हणून म्हटलेंत. परंतु प्रजा एकत्र न आणण्यांत आणखीहि आमची एक दृष्टि आहे. जगांत युध्दें आहेंत, महत्वाकांक्षा आहेत, तोपर्यंत धोकाहि आहे. जगांतील सारे धोके नाहीसे झाल्यावर तुम्ही तशीं शहरे निर्मिलीत तर ठीक, परंतु सारें जक निवैर कधीं होईल तें होवों. तोंपर्यंत काय? तोपर्यंत जनता खेडयापाडयांतून पांगलेलीच राहूं दे. ही विमानें पहा. एक लंडनवर आली कीं, लाखों लोकांचे प्राण संकटांत येतात. सात लाख खेडी हिंदुस्थानांत आहेत. एक प्रकारें तें संरक्षणहि आहे. परंतु या सात लाख खेडयांची सातशें शहरें केलीं म्हणजे शत्रुच्या विमानांचे काम सोपें झालें. मरणाचा मार्ग सोपा झाला !शिवाय आणखी किती तरी गोष्टी मनांत येतात. तुम्हांला कदाचित् त्या काव्यमय वाटतील. परंतु एका. उद्यां सारेंच यंत्रमय करावयाचें. दूध प्रयोगालयांत तयार होईल. नांगर वाफेचे असतील. कारण तुम्ही सारी शेती सामुदायिक करणार. असें झालें म्हणजे गायी-गुरांची जरूरच राहणार नाहीं. केवळ दुधांसाठी गाय ठेवायची म्हटलें तर बैलांचे काय करायचें? ते सारे मारून टाकावे लागतील. तुम्हांला त्याचें कांही नाहीं वाटणार. परंतु आम्हां भारतींयांस वाटतें. आम्ही मनुष्याचें कुटुंब मोठें केलें आहे. माणसाच्या शेजारीं घोडा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे. माणसाचा आवाज गुरें ओळखून हंबरत आहेत. घोडा पाठीवर धन्याचा हात फिरतांच फुरफुरतो आहे. यांत का आनंद नाहीं? पशूंनाहि माणसानें स्वकुटुंबांतील केलें आहे. तुम्ही दोन चित्रें चितारा. एका चित्रांत मनुष्याच्या सभोंतीं फटफटी, वाफेचा नांगर वगैरे वस्तु उभ्या करा. दुस-या चित्रांत माणसांभोवतीं गाय, घोडा, वांसरे रंगवा. कोणतें चित्र तुम्हांला आवडेल? घोटयाला थोपटलें तर तो फुरफरतो, हुंकार देतो. मनुष्याच्या प्रेमाला हे मुके पशु उत्तर देतात. त्यांना समजतें. गाव अंग चाटायला येते. परंतु त्या फटफटीवरुन हात फिरवला, त्या वाफेच्या नांगरावरुन हात फिरवला तर माझ्या प्रेमाला आहे का उत्तर? आपल्या प्रेमाला प्रत्युत्तर मिळालें तर अपार आनंद होतो. आपण मूलाचा मुका घेतों. मुल हंसते. परंतु कचकडयाच्या बाहुल्यांचा मुकाघेऊन आनंद होईल का? तेव्हां सारेंच उद्यां यांत्रिक करायचें ठरविलेंत तर गायी, बैल, घोडे सर्वांचीच हत्या करावी लागेल. तो एक निर्मळ आनंद नष्ट होईल.
शिवाय अहिंसा हा आमचा मार्ग. जें कांही करावयाचें तें अहिंसेच्या मार्गानें. तुमच्या आमच्यांतील इतर भेद दूर गेले समजा. परंतु हा सार्वभौम भेद राहीलच. कांदे पेरले तर कांदेच उगवतात. आत्याचारानें कधींहि भलें होत नहीं. जे कांही भलें मागून झाल्यासारखें दिसतें ते अत्याचारामुळे नव्हे, आपण जें भलें करूं त्यानेंच भलें होतें. आई मुलांना मारते. परंतु मागून त्याला ती पोटाशीं घेतें. त्याची समजूत घालते. मुलाच्या मनांत आईबद्दल राग आला असला तर मागूनच्या त्या प्रेमानें तो जातो. पण म्हणजे आईच्या मारण्याचा तो परिणाम नव्हे. मुलगा आईजवळ बरा वागतो, तो आईच्या ब-या वागण्याचा परिणाम. हिंसा व अत्याचार समाजांत अनेक प्रकारें विष पेरतात. तीं विषें केव्हां कशीं बरे येतील तें कळतहि नाहीं. म्हणून अहिंसेचा उपाय हाच भला. हिंसेंनें जी सुधारणा लोकांच्या गळी मारावी लागेल ती सुधारणा न होतां शेवटीं शापरूपच ठरेल. म्हणून 'अहिंसेच्या मार्गानें एक पाऊल पुढें पडलें तरी पुरे' असें आमचें मत आहे. घिसाडघाई काय कामाची? मानवजातीचें जीवन सुधारणें म्हणजे माकडचेष्टा नाहीं. घेतलें कोलीत, लावली आग, असा तो प्रकार नाहीं. अहिंसेनें किती वर्षे लागतील, असें विचारण्यांतहि अर्थ नाही. जगाचे प्रयोग पाहतांना हजार वर्षे म्हणजे एक घटका मानावी लागेल. या विशाल विश्वरचनेंत तुम्ही आहांत. तुम्हांलाच कसें पटकन् झटपट रंगारी बनतां येणार आहे? जंतूंतून मनुष्य उत्क्रान्त व्हायला ५० लाख वर्षे लागली. मानवी जीवन सुखी व्हायला अनंत काळ लागेल. आणि तुमच्या विरोध विकासाच्या सिध्दान्ताप्रमाणें तर अशाला अंतच नाहीं. सारखी एका परिस्थितिच्या परिणतावस्थेंतून प्रसववेदना होऊन दुसरी परिस्थिती निर्माण होणार. मग तुम्हांला किती काळ लागणार याची भीति वाटायची जरूरच नाही. कारण अंत व समाप्ति कधींच नाही. गांधीवाद्यांच्या या सर्व गोष्टींना उत्तरें अशीं : यांत्रिक कामामुळें आनंद जातो व ग्रामोद्योगी कामांत आनंद असतो असें जें गांधीवाद्यांचे म्हणणें आहे त्याला समाजवादी उत्तर देतात की, आपल्या कामांतच आनंद मानणें हें काव्य आहे ! एखाद्या विनोबाजींना सूत कांततांना परमानंद होत असेल. त्यांना वाटेल कीं, या कापसाच्या पेळूंतील अव्यत्क परमात्मा सुत्र रूपानें व्यक्त होऊन जणुं बाहेर पडत आहे. त्यांना वाटेल कीं, हें सूत मला सर्व गरीबांशीं जोडीत आहे. त्यांना वाटेल कीं, हिंदुमुसलमानांचे ऐक्य या धाग्यांत आहे. त्यांना वाटेल कीं साधेपणा, सरळपणा, शुध्दपणा या सुतांत आहे. ते चरक्याचें गूं गूं त्यांना ॐ ॐ ची कल्पना देईल. अशा अनेक सहृदय भावनांनी रंगून ते कांततील. परंतु मजुरीनें आठ आठ घंटे कांतणारे आपले पेळू कधीं संपतात याचीच वाट पहात असतील ! शेतक-यांचें जीवन किती छान म्हणून वर्डस्वर्थ कवि नाचेल. ' आम्ही शेतकरी दैवाचें ' असें कवि म्हणोत. पंरतु तो शेतकरी राबत असतो. थंडीत कुडकुडतो. चिखलांतून जातो. पावसांत भिजतो. त्याला ऊन लागतें. पायांत कांटे जातात. कधीं साप भेटतो, कधीं वाघ दिसतो. कधीं पुरांतून त्याला जावें लागतें. कधीं पाऊस येत नाहीं. कधीं पिकलें तर भाव नाहीं. सावकार, सरकार तर आहेतच. कोठला त्याला आनंद? आपल्या महान् कार्यात आनंद मानतां यावा, परंतु या स्थितीस पोंचणा-या माणसाचा परम विकास झालेला असावा लागतो. सर्वसामान्य जनता कामाला कामच म्हणजे व काम केव्हा एकदां संपेल याचीच जनता वाट बघतें.
आणि स्वत:च्या निर्मितीचा म्हणून जो आनंद वैयक्तिक हस्तकर्मांत आहे असें तुम्ही म्हणतां तो आनंद सामुदायिक निर्मितीत कां वाटणार नाही? एका जपानी कामगाराची गोष्ट आहे. तो लढाऊ जहाजें बांधण्याच्या कारखान्यांत काम करीत होता. काम करतां करतां तो वाचायला शिकत होता. कोणी तरी त्याला विचारलें, '' तूं आतां कशाला शिकतोस वाचायला? '' तो म्हणाला, '' हें पोलादी गलबत केव्हां तरी लढाईंत जाईल. शत्रूचा ते पराजय करील. या गलबताचें नांव वर्तमानपत्रांत येईल. ज्या गलबताच्या बांधणींत माझाहि हातभार होता तया गलबतानें जय मिळविला हें वाचून मला किती बरें आनंद होईल? ती आनंदाची वार्ता मला वाचतां यावी म्हणून या गलबतांत स्क्रू बसवतां बसवतां मी वाचायला शिकत आहें ! '' तो कामगार स्क्रू पिरगाळीत होता. तो कंटाळला नाहीं. हें जें आम्ही सर्व कामगार मिळून गलबत बांधींत आहोंत. त्यांत माझाहि भाग आहे, याचा त्याला आनंद होता. यांत्रिक निर्मितींतहि हा आमचा कारखाना. सा-या समाजासाठीं येथून आम्ही माल देत आहोंत. तयांत मीहि भर घातली आहे. एखाद्या स्क्रू तयार केला आहे. '' असा आनंद राहील. सामुदायिक व वैयक्तिक असा दोहों प्रकारचा आनंद यांत आहे. हा आनंद अधिकच उच्च आहे. केवळ वैयक्तिक आनंद कम दर्जाचा आहे. गंगा सागरांत मिळाली आहे, परंतु तिला स्वतंत्र, अलग असें अस्तित्वहि आहे. अर्थात् अशी सामुदायिक आनंदाची कल्पना घेण्यासहि मनुष्याचा अधिक विकास व्हायला हवा. परंतु तुमच्या वैयक्तिक कर्मांतील आनंद उपभोगावयासहि विकास झालेला असला पाहिजे.गायी-बैलाचें तुमचें काव्य नको. बैलाच्या नाकांत वेसण टोचतां. घोडयांना लगाम घालतां. बैलांना आर टोंचतां. घोडयाला फटके मारतां. गायी-गुरांना प्रेमानें वागविणारा एखादाच ! मुंबईस गोदींतून माल नेणा-या बैलगाडया पहा. हाकणारी चाबकावर चाबूक उडवीत असतात. टांगेवाले रागावले म्हणजे घोडयाला किती मारतील त्याचा नेम नाहीं. मोटेला बैल जुंपला म्हणजे त्याला काय वाटत असेल तें त्याच्या वंशीं जाऊं तेव्हां कळेल ! आम्हीं हिंसेचे भक्त नसलों तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ती आम्ही करू. आम्ही साधी माणसें. याच घटकेला सारे बदलूं दे असे आम्हांला वाटणार. बदलण्यासाठी आम्ही खटपट करणार. आजपर्यंत साधुसंतांनीं उपदेश केले. परंतु कोणी ऐकले? ख्रिस्ताने सांगितलें, '' सुईच्या नेढयांतून उंट जाईल; परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाणार नाही. '' कोणीं तें ऐकले? कुराण सांगतें, '' तूं एकटयानें खाऊं नकोस, व्याज घेऊं नकोस. '' परंतु कोण ऐकतो? पठाणहि आतां सावकार बनले ! '' श्रीमंतांनों, तुम्ही ट्रस्टी व्हा '' असे तुम्ही सांगतां. कोणता श्रीमंत हें ऐकत आहे? या श्रीमंताविरुध्द आम्ही अहिंसक सत्याग्रह करुन काय होणार? आमच्यावर गोळया घातल्या जाणार. आम्ही असें मरायला तयार नाही. उपासमारीनें मरण. गोळीबारानें मरण. आमचें रोज मरणच आहे ! ज्याच्यामुळैं मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभें राहूं. हिंसा-अहिंसा आमच्यासमोर प्रश्न नाहीं. कोटयवधि गरिबांची हाय हाय होत आहे. ही जी श्रमणा-या लोकांची तिळतिळ हिंसा होत आहे. ती थांबविण्यासाठी मूठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ती आम्ही करूं. आम्ही रत्त्कासाठी तहानलेले नाहीं. परंतु अपरिहार्यच झालें तर रक्त सांडायलाहि आम्ही मागेंपुढें पाहणार नाहीं. हिंसेंतून हिंसा निर्माण होते, युध्दांतून युध्द निर्माण होतें असें तुम्ही म्हणतां. भांडवलशाही समाजरचना आहे, सम्राज्यवाद आहे तोपर्यंतच हें असें चालेल. कारण एक साम्राज्यशाही दुस-या साम्राज्यशाहीचा पराजय करते. ती पराभूत साम्राज्यशाही पुन्हां जोर करुन त्याचा सूड उगविते. जोंपर्यंत अशी ही समाजरचना आहे, तोपर्यंत युध्दें राहाणार. शेवटच्या हिंसेनें एकदां समाजवादी वर्गविहीन समाजरचना निर्माण झाली कीं स्पर्धा संपेल. साम्राज्यें अस्तंगत होतील. मग कोण कोणाशीं लढणार? मग हिंसा कोठून दिसेल? हिंसेनें हिंसाच निर्माण होईल ही गोष्ट शेवटपर्यंत सत्य नाहीं. समाजवादी समाजरचना हा आदर्श आहे. प्रयोग एकदम थोडाच यशस्वी होतो. पण उत्तरोत्तर तो आम जनतेला मान्य होत चालला आहे. रशियानें पोलंड घेतला, फिन्लंडवर स्वारी केली, बेसरबिया व्यापला. याबद्दल कोणी कांहीं म्हणो. त्याचा उत्कृष्ट इतिहास ' मस्ट द वॉर स्प्रेड? ' या पुस्तकांत आहे. रशियानें हें सारें स्वसंरक्षणार्थ केलें. ' स्वसरंक्षणर्थहि रशियानें दुस-यावर आक्रमण कां करावें? ' असा कोणी प्रश्र विचारील. प्रश्न विचारणें सोपें आहे. आपण एखादें कलम मोठया मिनतवारीनें लावावें, तें कलम खायला एखादी गाय येत आहे असें दिसलें तर आपण काठी घेऊन धांवतो व गोमातेच्या पाठींत ती हाणतों ! हा न्याय समजणा-यांनीं फिन्लंडवरील हल्ल्याबाबत कां नाक मुरडावें? ब्रिटिश साम्राज्यसत्तेला साम्राज्यसरक्षणार्थ सिंगापूर, एडन, सायप्रस हीं हवींत. मग रशियाला कां नकोत? निदान रशियांतील प्रयोग तरी बहुजनसमाजाच्या कल्याणाचा आहे. रशियाला पोलंडमध्यें स्वारी करतांना गोळी घालावी लागली नाहीं. तरवार उगारावी लागली नाहीं. तेथील जनतेनें रशियाच्या शेतक-या-कामक-यांच्या लाल सेनेचे स्वागत केलें ! असें आत्क्रमण दुनियेंत कोठें झालें असेल? येणा-या परसैन्याचा असा सत्कार कोणीं केला असेल? पोलंडमध्यें का स्वातंत्र्य होतें? बडया धनिकांचीच तेथे सत्ता होती. कामगार व शेतकरी चिपाडाप्रमाणें तेथें पिळलेच जात होते. या श्रमणा-या जनतेला लालसेना तरणारी वाटली आणि रशियानें तसेंच केलें. प्रदेश घेतल्याबरोबर तेथें सर्वत्र शेतक-या-कामक-यांना समित्या स्थापन केल्या. कारखान्यांतील म्हाता-या कामगारांस पेन्शनें देण्यांत आलीं. प्रत्येक शेतक-यांस पांच एकर जमीन व दोन गायी देण्यांत आल्या ! असें जगांत कोण जेत्यानें आजपर्यंत केलें होते का?
पुष्कळदां म्हणण्यात येत असतें कीं, आमच्या देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला झाला. अरे, परंतु त्या देशांतील गरीबांना आहे का स्वातंत्र्य? स्वातंत्र्य याचा अर्थ तेथील सत्ताधारी वर्गाचें स्वातंत्र्य, बहुजनसमाजाला मिळण्याचें स्वातंत्र्य ! त्यांच्या सत्तेवर हल्ला होतो आणि ते ओरड करतात कीं, आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण झालें. परंतु तेथील बहुजनसमाज पायांखालीं घातलेला असतो. तो बहुजनसमाज त्या आक्रमणाचें स्वागत करतो, जर तें आक्रमण रशियासारखें असेल तर.समाजवादी अशी बाजू मांडत असतात व शेवटी सांगतात, ''समाजवादी रशियाच्या प्रयोगाकडे सहानुभूतीने पहा. वीसपंचवीस वर्षे तर प्रयोगाल झाली. एकंदरीनें रशिया सुधारला आहे कीं नाहीं ते पहा !''रवीन्द्रनाथ ठाकुर रशियांतील शिक्षणप्रयोग पहावयास गेले होते. त्यांना तेथील शैक्षणिक क्रान्ति पाहून आश्चर्य वाटलें. त्यांनीं एका रशियन शेतक-यास विचारलें, '' तुमच्या या नवीन प्रयोगांत कुटुंबपध्दति नष्ट नाहीं का होणार? '' तो शेतकरी म्हणाला, '' कुटुंब म्हणजे काय तें आतां आम्हांस समजूं लागलें. पूर्वी कसलें कुटुंब? मी उजाडत कारखान्यांत भोंगा वाजतांच कामावर जात असे. दिवसभर काम करावें. रात्रीं दमून घरीं यावें. भाकर खावी व मेल्यासारखें पडावें ! कामावर जातांना मुलें झोपलेलीं. कामावरुन परत येतों तों मुलें झोपलेलीं !! मुलांजवळ बोलतां येत नाहीं. हसतां खेळतां येत नाही. बायकोबरोबर कोठलें सुखाचें बोलणें? परंतु आतां कामाचे तास कमी होतील. बायकोबरोबर मी फिरावयास जाईन. हंसेन, बोलेन.आम्ही दोधें कामावर गेलों तर पाठीमागें मुलांची चितां नसले. बालसंगोपनगृहांत तीं खेळतात. संध्याकाळीं मुलें घरीं येतात. आम्ही भेटतों. मुलांना जवळ घेतों. आनंद आहे आतां. कुटुंब म्हणजे काय तें आतां कळूं लागलें. समाजवादी समाजरचनेंत वैयक्तिक व खासगी अशी मालमत्ता राहिली नाहीं. तरी पतिपत्नींचे प्रेमळ संबंध राहतील. मुलांचें प्रेम राहील. मुलांसाठीं इस्टेटी ठेवण्याची जरूरी वाटणार नाहीं. '' रवीन्द्रनाथांना त्या कामगारांचें तें बोलणें ऐकून आश्चर्य वाटलें. रवीन्द्रनाथांनी रशियांतून आल्यावर लेख लिहिला. चौदा पंधरा वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. त्या लेखांत रवीन्द्रनाथांनीं रशियानांची पाठ थोपटली. परंतु ते शेवटी म्हणतात, '' हें सारें अहिंसेनें करतां आलें असतें तर? ''गांधीजी अहिंसेवर भर देतात. महात्माजींचा सर्वोदयाचा प्रयोग आहे. श्रीमंतानीं विश्वस्त व्हावें व गरिबांसाठीं झिजावें. त्यांनाहि जगावें, आणि गरिबांनहि नीट जगूं द्यावें. श्रीमंत न ऐकतील तर गरिबानें अहिंसात्मक सत्याग्रही लढाकरावा. त्या श्रीमंताचा हृदयपालट आपल्या बलिदानानें करावा. असा हा गांधीजींचा मार्ग आहे. हरिजनमध्यें महादेवभाईंनी लिहिलें, '' निवडणुकी समजावादाच्या कार्यक्रमावर लढवून बहुमत मिळवून जर कोणी कायदे करूं लागला तर तें सनदशीर आहे. कारण बहुजनसमाजानें त्या कार्यक्रमांस मान्यता दिली आहे. '' परंतु उद्यां स्पेनमध्यें झालें तसें होईल. या देशांतील भांडवलवाले, सरंजामदार, मठवाले व देवस्थानवाले, संस्थानिक, जमीनदार, खोत सारे एक होतील. त्यांच्या पांढरपेशा स्वयंसेवक संघटना उभ्या आहेत. या संघांच्या लाठया समाजवादी कायदे करणा-यांवर पडतील. अशा वेळीं अहिंसेनें प्रतिकार करावयाचा कीं, सेना उभारायची, गरिबांची श्रमणा-यांची पलटण उभारायची? गांधीजी म्हणतील, '' अहिंसक शांतिसेना उभारूं, मुकाटयानें बसण्यासाठी नाहीं तर शांतपणें प्रतिकार करण्यासाठी. प्रतिकार करूं, परंतु तो अहिंसक. '' परंतु समाजवादी म्हणतील '' आम्हांला तर हिंसेचाच आश्रय करावा लागेल. '' स्पेनमध्यें शेतकरी-कामकरी पडले. कारणे सर्व बाजूंनी भांडवलवाल्या राष्ट्रांनीं घेरलें आणि मदत देणा-या रशियाचेंहि धोरण तऱ्हेवाईक व फसवें होतें. परंतु सर्वत्र काहीं असेंच होणार नाहीं.
वसंता, असे हे वाद आहेत. गांधीजींचा प्रयोग आज चालला आहे. काँग्रेस सर्वांना संयम राख असें सांगत आहे. परंतु वरिष्ठ वर्ग जर सुधारणारच नसतील तर पू. विनोबाजी धुळयास एकदां म्हणाले, '' हे गरीब लोक आज भोळया सांबाप्रमाणें जगाचें कल्याण करणारे शिव शंकर आहेत. स्वत: उपासमार, अज्ञान, अपमान याचें विष पिऊन जगाला अमृत देत आहेत. परंतु गरीबांच्या सहनशीलतेचा शेवट होईल आणि मग दरिद्र देव रुद्र होईल आणि पुंजीपतींना तो काकडीप्रमाणें खाऊन टाकील. म्हणून सावध रहा. '' जें जगांत इतरत्र झालें तेंच माझ्या देशांतहि व्हायचें असेल तर त्याला काय इलाज? बर्नार्ड शॉनें एके ठिकाणी इंग्रजांस बजावलें आहे कीं '' तुमच्या ताब्यांतील प्रदेशांस स्वातंत्र्य द्या. त्यामुळें भले संबंध राहतील. परंतु तुमच्या अन्यायाने ते पददलित परतंत्र लोक खवळले म्हणजे रक्तपात होईल, कायमची वैरें राहतील. परंतु तुम्हाला त्या रक्तपाताचेंच डोहाळे होत असले तर त्याला कोण काय करणार? तुमची ती इच्छा पूर्ण होईल -- '' Then you will have blood your own choice.''त्याप्रमाणें या देशांतील वरिष्ठ वर्गांना गांधीजींचा सर्वोदयाचा मार्ग रुचला नाही तर का दरिद्री जनता अनंत काळ वाट पाहणार आहे? गांधीजीच्या मताचे अहिंसक लोक लाट अडवूं पाहतील. परंतु गांधीजीसारखें विभूतिमतव कोणाजवळ असणार? गांधीजींसारख्या युगपुरुषानें हिंदुस्थानांत आज लाट थांबविली आहे. परंतु गांधीजी नेहमी म्हणतात, '' I see red ruin ahead -- पुढें मला रक्तपात दिसत आहे. '' त्या लाल रक्तमासांच्या चिखलांतून जायचें नसेंल तर वरिष्ठ वर्गानों सावध रहा. गरीबांना जगवा, त्यांचे संसार सुखी करा.परंतु महर्षि व्यास महाभारताच्या शेवटीं खेदानें व दु:खाने म्हणतात ---उर्ध्वबाहुविरौम्येष नच कश्रिच्छृणोति माम् !धर्मादर्थश्च कामश्च स धर्म: किं न सेव्यते !!सर्व समाजाचें नीट धारणपोषण होईल अशा रीतीनें अर्थकामांस नियंत्रित करा, असें व्यास सांगतात. आज महात्माजी तेंच सांगत आहेत. परंतु हें सांगणें वांयाच जाणार का? काळाला माहीत. आज तरी आपण सारे काँग्रेसच्या प्रयोगांत सामील होऊं या. पुढें व्हायचें तें होईल.
तुझाश्याम