सखाराम : तुम्ही हादी बोल्ला हस्तानं तर येक चांगला कट्टा व्हता म्हायतीत..
सुशांत आणि केतन : (एकदम) कट्टा…
सखाराम : अवं म्हंजी.. बदाम.. बदाम..
सुशांत आणि केतन : (पुन्हा एकदमच) बदाम?
सखाराम : अवं कसलं तुमी शिकलेलं येव्हढं येक अमेरीकेला जाऊन आलं,. दुसरं जानार.. आन ह्ये शब्द तुमास्नी म्हाईत न्हायं? अवं बदाम म्हंजी येक चांगली पोरगी व्हं.. कमळा नाव त्यीचं..
केतन : अस्स्.. अस्सं.. मग काय झालं तिचं…
सखाराम : ठरलं न्हवं लगीन तिचं…
केतन आणि सुशांत स्वतःच हासु दाबत, हातावर हात आपटत.. डॅम इट.. चांगली संधी गेली सख्या…न्हायतर कमळाशी जमलंच असतं बघ..
सखाराम : व्हय जी..पन तुम्ही म्हणत असाल तर पुष्पी ला घेऊन येऊ हिकडं..?
केतन : नको.. नको.. इतक्यात नको.. आधी सुशांतदाच्या लग्नाची गडबड संपु देत, मग बघु… जा तु.. बॅगा न्हेऊन ठेव आतमध्ये…
सखाराम : व्हयं जी.. ठ्येवत्यो.. (असं म्हणुन तिथेच घुटमळत उभा रहातो)
केतन आणि सुशांत बोलण्यासाठी एकमेकांकडे वळतात, पण सखाराम तेथेच थांबल्याचे लक्षात येताच पुन्हा मागे वळतात..
सुशांत : आता काय?
सखाराम : सुशांतदादा.. आता केतन दादा भी आले हाईत.. मंग..
सुशांत : हो.. मग?
सखाराम : म्हंजी.. आता ती लगीनाआधी कसलीशी पार्टी असतीय नव्हं का.. बैंच पार्टी..
केतन ; यु मीन.. बॅचलर पार्टी…
सखाराम : व्हयं.. व्हयं.. त्येच.. ती करणार असाल न्हव्हं.. तर म्या काय म्हंतो..
सुशांत : बोला.. काय म्हणताय..
सखाराम : म्हंजी.. हिथं बाई मानुसं असनारच. त्या पेक्षा आपनं सगलं पोरं हिथं गेलो तर? (असं म्हणुन खिश्यातुन एक चुरगळलेला पेपर काढतो आणि त्यातील एका जाहीरातीकडे बोट दाखवत सुशांतकडे देतो.)
सुशांत : तो पेपर सरळ करुन त्यातील जाहीरात अडखळत वाचु लागतो. “मदभर्या नजरबंदीने लावणी रसिकांना जायबंदी करुन टाकणारी, लावणी नृत्याची जास्वंदी.. लावणी नृत्याचा सदाबहार कार्यक्रम.. (परत पेपर सखारामकडे देतो…) बघु आपण नंतर हा.. ठरवु नंतर जा तु बॅगा घेउन..
सखाराम : अवं सुशांत दा असं काय करताय.. म्हाराष्ट्राचं लोकनृत्य हाय न्हवं त्ये.. अवं केतनदादा पण खुश होतील न्हवं..
सुशांत : (शक्य तेव्हढा कंट्रोल ठेवत, समजावणीच्या सुरात), बरोबर आहे तुझं.. आज नको.. आजच केतन आलाय ना, दमला असेल तो.. वेळ आहे लग्नाला आजुन.. ठरवु आपण.. जा तु आता बॅगा घेउन आत…
सखाराम दोन क्षण तेथेच घुटमळतो आणि शेवटी निराश होऊन बॅगा उचलायला जातो.
सखाराम (सगळ्या बॅगा एकदम उचलत) : जिसमै है दम तो फक्त बाजीराव सिंघम..
सखाराम बॅगा घेउन आत जातो… स्टेजवर फक्त केतन आणि सुशांतच उरतात.
केतन : आता माझी सटकली रे……..
केतन आणि सुशांत हसत हसत एकमेकांना टाळ्या देतात.
सुशांत : बरं ते जाऊ देत.. चेष्टा पुरे.. पण खरं सांग ना.. कुणी भेटली की नाही तुझ्या मनासारखी..
केतन (वैतागुन) : ‘काय रे..? कश्याला माझ्या लग्नाचा विषय काढताय? माझं ठरलं की मी सांगीनच ना तुम्हाला. आणि खरं सांगु का? ते ब्लॉंड, अमेरीकन वगैरे जाऊ देत, विसरुन जा ते सगळं’..
सुशांत (भुवया उडवत आणि कोपरखळ्या मारत) : “का रे बाबा? प्रेम-भंग वगैरे केला का कुठल्या अमेरीकन मुलीने तुझा? का कुठली भारतीय आवडली? का अचानक असा अध्यात्मीक साक्षात्कार होतात तसंलं काही झालं?”
केतन : (लाजत आणि इकडे-तिकडे बघत हळु आवाजात) : “.. म्हणजे.. अगदीच तसे काही नाही.. पण एक भारतीय आवडली खरी…”
सुशांत: (आश्चर्याने) “काय?? अरे काय बोलतोयेस काय? अरे कधी? कुठे? केंव्हा? आणि हे तु आत्ता सांगतो आहेस..??
(जोरात ओरडत) अरे ऐका ऐका..ss चमत्कार चमत्कार….’
केतन पटकन सुशांतच्या तोंडावर हात ठेवुन त्याचा आवाज बंद करतो.
केतन : “अरे गप्प ना..अजुन कश्यात काही नाही.. कश्याला गाव-जेवण घालतो आहेस? मला फक्त तिचं नाव आणि ती आपल्याच गावची- मुंबईची आहे.. एवढेच माहीती आहे..”,
सुशांत : (केतनच्या तावडीतुन सोडवुन घेत) “बरं.. कशी आहे ती.. ते तर सांग..” (खुर्चीवर बसत)
केतन : काय सांगु तुला कशी आहे ती??? ती बघ ती तिथे उभी आहे..
सुशांत केतनने दाखवलेल्या दिशेकडे पहात रहातो.. पण तेथे कोणीच दिसत नाही.
( केतनचा भास ….)
केतन : (वैतागुन) अरे असे काय करतो आहेस.. ते बघ ना तिकडे.. (परत आपल्या तंद्रीत जात) ते बघ तिकडे दुरवर.. ते हिरवे गार गवत कसं झुलतं आहे. इतके दिवस उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं आहे. ति फुलं दिसत आहेत तुला? पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत आहे, वार्याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत आहेत..
वातावरणात बदल होतो. वार्याचा झोत रंगमंचावरील वस्तु हलवु लागतात. प्रखर दिवे मंद होतात.
पांढरा सफेद चुडीदार घातलेली अनु स्वतःभोवती गिरक्या घेत रंगमंचावर अवतरते.
सुशांत अजुनही तिला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.. पण ती फक्त केतनलाच दिसते आहे.
केतन : त्या डोंगराच्या काठावर बघ दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी आहे..
पावसाला सुरुवात होते. पावसाचा, मेघगर्जनेचा आवाज येऊ लागतो.
केतन : (उठुन उभा रहातो) . ते पहातो आहेस? तिच्या चेहर्यावर जमा झालेले पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब? मला इतका हेवा वाटतो आहे ना अरे त्या पावसाचा!.. तिच्या अंगाला बघ ना कसा घट्ट बिलगुन बसला आहे तो!
तिच्या चेहर्यावरील साठलेले पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नाहीयेत., स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो मेघराज, इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये कसा अडकुन बसला आहे.
मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत आहे.. पाहतो आहेस ना तु?
सुशांत डोकं खाजवत इकडे तिकडे पहात रहातो.
केतन : तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत करत आहे रे. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही स्पष्ट ऐकु येतो आहे मला.
वार्याचा एक जोराचा झोका येतो. अनुचे केस विस्कटुन तिच्या चेहर्यावर येउन विसावतात. अनु ते केस बाजुला घेण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.
केतन : वाटतं, वाटतं.. तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.
जणुकाही तिला आपल्या मिठीत घेतले आहे अश्या अविर्भावात केतन हाताची घट्ट मिठी मारुन डोळे मिटुन उभा रहातो.
पावसाचा वेग वाढलेला असतो. मेघगर्जना, वार्याचा, पावसाच्या थेंबांचा आवाज वाढत जातो.
केतन डोळे उघडतो तेंव्हा अनु त्याच्या समोर उभी असते. केतन दचकतो. बोलण्यासाठी तोंड उघडतो पण तोंडातुन शब्दच बाहेर पडत नाहीत.
अनु खुदकन हसते, त्याचा हात हातात धरते आणि त्याला घेउन रंगमंच्याच्या दुसर्या बाजुला जाउ लागते. केतन हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत जातो.
केतन : अरे.. मी वेडा झालोय, बेभान झालोय.. हे बघ.. हे बघ.. जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती पाती कशी मोहरुन जात आहेत.. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा वेडा प्रयत्न करत आहेत. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत आहेत.
मी कुठे वहावत चाललो आहे? माझं मलाच ठाऊक नाही. पण मला सांग ना.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं आहे मित्रा…
ते बघ ते समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव आहे… पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते,, नखशिखांत नटलेले डोंगर…
अनु केतनला घेउन एखाद्या बसक्या आसनावर बसते. केतन त्याची मान अनुच्या खांद्यावर टेकवतो.
ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येतो. पहील्यांदा वेगाने आणि मग हळु हळु कमी कमी होत नेहमीच्या वेगाने धडधडण्याच्या…
केतन डोळे उघडुन अनुकडे बघतो. दोघेही एकमेकांकडे पाहत रहातात. केतन आपल्या हात अनुच्या गालावरुन फिरवतो. अनु आवेगाने त्याला घट्ट मिठी मारते.
काही क्षण तसेच शांततेत जातात.
अनु सावकाशपणे त्याच्या मिठीतुन बाजुला होते आणि रंगमंचावरुन निघुन जाते.