Shyamachi Patre - 11 in Marathi Letter by Sane Guruji books and stories PDF | श्यामचीं पत्रें - 11

Featured Books
Categories
Share

श्यामचीं पत्रें - 11

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र अकरावे

विषमतेचें उच्चाटन हें मानवाचें ध्येय

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.माझीं पत्रें तुला व तुझ्या सेवा दलांतील मित्रांना आवडतात. हें वाचून मला बरें वाटलें. मला माझी मर्यादा माहीत आहे. सांगोपांग ज्ञान मला नाहीं. परंतु समर्थांनी सांगितलें आहे कीं, जें जें आपणांस माहीत असेल तें तें द्यावें. काजव्यानें आपल्या शक्तींनें चमकावें. तारे आपल्यापरी चमकतील. चंद्रसूर्य त्यांच्या शक्तीप्रमाणें प्रकाश देतील. माझ्यानें राहवत नाही. भारतीय तरुणांकडे माझें मन धांवतें. त्यांना मिठी मारावी व भारताच्या ध्येयाकडे त्यांना न्यावें असें वाटतें, परंतु मी कोण, माझी शक्ति ती किती ! राहवत नाहीं म्हणून करायचें. माझीं पत्रें वाचावयास इतर मुलें मागतात असें तूं लिहिलेंस. एखादे वेळेस वाटतें कीं, हीं पत्रें प्रसिध्द करावीं. मुलांना वाचायला होतील. या पत्रांवर टीकेची झोड उठेल, मला माहीत आहे. माझ्या पत्रांना उत्तरें देण्यासाठीं म्हणूनहि संघांतील कांहीं मुलें तीं पत्रें मागत असतील. परंतु आपला लपंडाव थोडाच आहे. आपला सारा खुला कारभार. जें ज्ञान मोकळेपणें चारचौघांत देण्यास भय वाटतें, तें माणुसकीस धरुन नसेल असें समजावें !तूं तुझ्या पत्रांत इतर कांही गोष्टीविषयीं थोडक्यांत माहिती मागितली आहेस. गांधीवाद व समाजवाद यांत साम्य काय, विरोध काय असें तूं विचारलें आहेस. वसंता, मी तुला थोडक्यांत कितीसें सांगणार? परंतु तुम्हांला थोडीशी कल्पना यावी म्हणून कांही गोष्टी सांगतो. तुम्ही मोठे झालांत म्हणजे मोठीं पुस्तकें वाचा, अधिक विचार करा व काय तें ठरवा.आज जगांत सर्वत्र विषमता भरली आहे. ती आजच आहे असे नाहीं. प्राचीन काळीहि असेल. परंतु आजच्या प्रमाणेंच ती भयंकर होती कीं काय याची शंका आहे. आज यांत्रिक उत्पादन झालें आहे. त्यामुळें थोडयाशा मजुरीवर हजारों कामगार कामाला लावतां येतात. कामगार १० रु. चे काम करतो; पण त्याला मजुरी चारसहा आणेच मिळते. ज्यांच्या ताब्यांत कारखाना असतो त्यांना असा अपरंपार फायदा मिळत असतो. परंतु कामगारांची दुर्दशाच असते. भांडवलवाला या फायद्यांतून, हातांत जमा होत जाणा-या भांडवलांतून आणखी कारखाने काढतो. जगांत माल अपरंपार निर्माण होतो. परंतु कामगारांस पगार कमी मिळत असल्यानें या मालाचा उठाव होत नाहीं. तुमचा माल विकत घेणार कोण? जगांत अन्न पुष्कळ आहे, वस्त्र पुष्कळ आहे. परंतु तें घेण्याला बहुजन समाजाजवळ पैसा नाहीं. सुकाळांत दुष्काळ आहे ! बरें कामगारांची मजुरी वाढवावी, तर माल महाग होतो. जगाच्या स्पर्धेत तो टिकत नाहीं. कामगारांची मजुरी इतकी कमी असते कीं, जगांतील सुखसोयी त्यांना घेतां येत नाहींत. पुष्कळ वेळां जगांतील भांडवलवाले मालाचा नाश करतात ! गव्हाचें पीक जाळतात !! कपाशीला आगी लावतात !! असे प्रकार भांडवलशाहीला करावे लागतात.

मग राष्ट्रीय भांडवलशाही जगांत स्वत:ची साम्राज्यें स्थापूं पाहतें. स्वत:च्या देशांतील जादा भांडवल दुस-या देशांत ते नेऊन ओततात. स्वत:चा माल खपविण्यासाठी त्यांना वसाहती लागत असतात. सर्वांचीं स्पर्धा सुरूं होते. मग या भांडवलशाह्या आपापसांत लढूं लागतात. स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून कांही भांडवलवाल्या राष्ट्रांना आपापल्या राष्ट्रांतील लोकशाही संपुष्ठांत आणवी लागते. आज जर्मनींत हिटलरचा नाझी पंथ आहे. इटलीत फॅसिझम आहे. दोघांचें स्वरूप एकच आहे. भांडवलशाहीची जगण्यासाठी चाललेली शेवटचीं धडपड म्हणजे नाझी पंथ किंवा फॅसिझम ! जर्मनीतील हिटलर व त्याची नाझी संघटना यांना कोणी पैशाची मदत केली? जर्मनींतील क्रप वगैरे जे अब्जाधीश कारखानदार त्यांनीं कोटयवधि रुपये हिटलरला संघटनेसाठी दिले ! नाझी संघटना ही पांढरपेशांची संघटना आहे. तिच्यांत शेतकरी-कामकरी नाहींत. आपली संस्कृति, आपला वंश, आपली भाषा वगैरेंची या वरच्या वर्गांतील तरुणांस ऐट असते. या बेकार पांढरपेशा तरुणांस हिटलरनें हाताशीं धरले. आपलें जर्मन राष्ट्र मोठें करूं, जगांत सर्वत्र साम्राज्य स्थापूं असें तरुणांच्या मनांत त्यानें भरवलें. संघटना उभी राहिली. शेतकरी-कामकरी यांच्या संघटना नष्ट करण्यांत आल्या. शेतक-यांचा माल ठराविक किंमतील सरकारनेंच विकत घ्यायचा असें ठरविण्यांत आलें. कामगारांचीच अधिक भीति असते. परंतु जर्मनींत कामगारांना स्वातंत्र्य नाहीं. नाझी पंथ वा फॅसिस्ट पंथ कोणालाच स्वातंत्र्य देत नसतों. सरकार ठरवील तें ब्रह्मवाक्य ! कामगारांनी मिळेल तो पगार घेतला पाहिजे. जर्मनी किंवा इटली यांना जगांत वसाहती नाहींत. त्यांचा माल कसा व कोठें खपणार? जगांत तर स्पर्धा आहे. इंग्लडनें स्वत:च्या सर्व साम्राज्याचा एक संघ बनविला. साम्राज्यांतील घटकांनी एकमेकांचाच माल आधीं घ्यावा असें ठरविण्यांत आलें. दुनियेंतील माल स्वस्त असला तरी तो आधीं घ्यायचा नाहीं. जर्मनींतील इंजिनें स्वस्त असलीं हिंदुस्थाननें इंग्लंडमधूनच घेतलीं पाहिजेंत. अशी ही साम्राज्याची भिंत इतरांच्या व्यापाराच्या आड इंग्रजांनीं उभी केली. जकाती अधिक बसविणें सुरू झालें. अशा परिस्थितींत जर्मनी, इटली, जपान वगैरेंनी काय करावें? जपाननेंहि स्वत:च्या देशांत कामगार दडपून ठेवलें. त्यानें चीनशीं लढाई सुरू केली. जर्मनी व इटली आज युध्दांत पडलींच आहेत. आज अमेरिकेची इंग्लंडला सहानुभूति असली तरी लढाईपूर्वी या दोघांची चुरसच होती. आणि अमेरिका आजहि अद्याप साशंकतेनेंच जपून वागत आहे. जगाच्या स्पर्धेत आपला माल स्वस्त देतां यावा म्हणून कामगारांस कमी पगार द्यावा लागतो. कामगार असंतुष्ट होऊ नयेत किंवा भडकू नयेत म्हणून त्यांच्या संघटना बेकायदेशीर ठरविण्यांत येतात. सर्व सत्ता एका पक्षाच्या हातीं घ्यावी लागते. आणि शेवटीं युध्दाची तयारी करून वसाहती मिळविण्यासाठीं, आपलें मोठें साम्राज्य स्थापण्यांसाठी तयार राहावें लागतें. हिटलर व मुसोलिनी युध्द ही पवित्र वस्तु मानतात ! '' युध्दांतच मनुष्याची खरी कसोटी. त्यांच्या गुणांची खरी परीक्षा तेव्हांच होते. युध्द टाळणें योग्य नव्हें. युध्दांत विजयी होण्यासाठी सर्वांनीं पराकाष्ठेचा त्याग केला पाहिजे. सर्व राष्ट्रानें युध्दांच्या तयारींत सदैव असलें पाहिजे. नेहमीं पिस्तुलावर हात असला पाहिजें. '' असें या पंथाचें म्हणणें आहे. युध्द हा यांचा देव आहे. मनुष्यांतील सर्व बौध्दिक व हार्दिक उच्चभाव प्रकट होण्यासाठी युध्दाचीच का जरूर आहे? दलदली नाहींशा करणें, रोगराई दूर करणें, पृथ्वी अधिक आनंदमय होण्यासाठीं झटणें यांत का पुरुषार्थ नाहीं? महारोग्यांची शुश्रूषा करण्यांत का धैर्य नाहीं? पुरुषार्थ दाखवावयास रणांगणच पाहिजे असें नाहीं. आणि मनांतील कुरूक्षेत्र तर आहेच मोठें रणांगण ! मुसोलिनी व हिटलर जगाला जिंकतील, परंतु ते स्वत:ला जिंकतील तर अधिक वीरपुरूष होतील. संतहि लढतच असतात. तुकाराम महाराजांनीं म्हटलें आहे -----''रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग. अंतर्बाहय जन आणि मन''परंतु ही उच्चतेची लढायी यांना नको असते. त्यांना एकमेकांची हत्या करण्याची, आसुरी आनंदाची लढाई हवी असते. वाघाला हरीण मारून जसा आनंद होतो तसा या फॅसिस्टांना अ‍ॅबिसीनियावर विषारी वायु सोडून, लोकांना तडफडत मरतांना पाहून होतो !

हिटलर व मुसोलिनी यांना आज कामगारांच्या चळवळी दडपून ठेवाव्या लागल्या आहेत. इंग्लंडमध्यें तशी परिस्थिती नाहीं. परंतु कां नाही? इंग्लंडचें जगभर साम्राज्य आहे. त्यांना हिंदुस्थानासारखी चाळीस कोटी लोकांची परतंत्र वसाहत आहे. इंग्लंडचा माल साम्राज्यांत व दुनियेंत सर्वत्र जातो. त्यामुळें त्यांना स्वदेशांतील कामगारांना अधिक सवलती देता येतात. इंग्लंडमध्यें लोकशाहीचा डोलारा दिसावा यासाठीं हिंदुस्थाननें गुलाम राहिले पाहिजे !परंतु समजा हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर? चाळीस कोटी लोकांची पेठ त्यांच्या हातून गेली तर? इंग्लंडमधील भांडवलवाल्यांना चिंता वाटल. कामगारांना दिलेल्या सवलती त्यांना काढून घ्याव्या लागतील. म्हणजेच इंग्लंडलाहि फॅसिस्ट बनावें लागेल. आज ना उद्यां इंग्लंडमध्यें हीच स्थिति येणार आहे. इंग्लंडमध्यें मजुरांचे पुढारी म्हणून जे मिरवतात. ते निवडणुकींत स्वत:ला बहुमत मिळूं नये अशी म्हणे खटपट करतात ! मजूर मंत्रिमंडळ इंग्लंडमध्यें स्थापण्याची आपत्ती येऊं नये म्हणून हे मजूर पुढारी जपतात ! कारण या मजूर पुढा-यांना माहीत आहे कीं दिवसेंदिवस स्वत:च्या देशांतील माल दुनियेंत खपविणें कठीण जाईल. मग आपणांसच मजुरांच्या सवलती कमी करण्याचे कायदे करावे लागतील. मग मजूर काय म्हणतील? म्हणून हे मजूर पुढारी स्वत:ला बहुमत मिळूं नये अशी कारवाई करतात ! आणि मग कारखानदारांजवळ कारस्थानें करतात. कारखानदार जाहीर करतात २५ टक्के पगार-काट. कामगार संपावर जातात. हे पुढारी त्यांच्यापुढें जोर जोराची भाषणें करतात. कारखानदार या पुढा-यांना बोलावतात. शेवटीं तडजोड होते. १० टक्केच पगारकाट करण्याचें ठरतें. हे कामगार पुढारी मग कामगारांना सांगतात, '' आपला विजय आहे. मालक २५ टक्के पगार-काट करणार होता. आपण त्याला १० टक्कयांवर आणलें ! '' मालक व हे मजूर पुढारीं यांचें आधींच हें ठरलेलें असतें. त्यांनी २५ टक्के म्हणावयाचें, यांनीं संप करावयाचा व शेवटीं १० टक्क्यावंर तडजोड करावयाची. मालकांना १० टक्केच कमी करण्याची जरूर असते. आणि अशा रीतीनें क्रान्तीला भिणारे कामगार पुढारी कामगारांना फसवीत असतात.यांत्रिक भांडवलशाहीचा कळस झाला कीं, दोन फांटे फुटतात. फॅसिझम तरी स्वीकारावा लागतो किंवा समाजवाद आणावा लागतों. प्रचंड उद्योगधंदे तयारच असतात. लहानलहान कारखानदारांना पोटांत घेत घेत एकेका धंद्याची प्रचंड सिंडिकेटस तयार झालेली असतात. तीं राष्ट्राच्या मालकीची कारणें एवढेंच काय तें उरतें. कामगार क्रान्ति करुन तें काम पुरें करतात.गांधीवाद सर्व उत्पादन यंत्रांनी करावें याविरुध्द आहे. गांधीवादी म्हणतात, '' यंत्रांनी बेकारी वाढते. सर्व बेकारांना काम देतां यावे व निर्माण झालेला माल खपावा म्हणून दुस-या देशास गुलाम ठेवावें लागतें. निरनिराळया यांत्रिक उत्पादन करणा-या देशांचीं स्पर्धा सुरू होते. युध्दें होतात. जीविताची व वित्ताची अपरंपार हानि होते. कामगारहि असंतुष्ट होतात. विषमात वाढतें. भांडवलवाले मोटारी उडवितात तर कामगार कसा तरी जगतो. या सर्व गोष्टी टाळायाच्या असतील तर यांत्रिक उत्पादन कमी करावें,'' गांधीवादी एकजात सर्वच यंत्रांना विरोध करतात असें कांही नाहीं. आपणांतील कांही नवमतवादी म्हणत असतात कीं, ''गांधीजी जगाला पुन्हां त्रेतायुगांत नेऊं पहात आहेत. आजच्या काळांत चरख्याचे गुं गुं सुरू करूं पाहात आहेत. गांधीजी प्रतिगामी आहेत !'' प्रतिगामी किंवा पुरोगामी यांची कसोटी यंत्र किंवा चरखाही नसून समाजांत जो कोणी स्वास्थ, समाधान, संतोष व समानता कमी रक्तपातानें आणील तो खरा पुरोगामी असें मानलें पाहिजे गांधीजी कांही शनिमाहात्म वाचा, कुंडली मांडा, ज्योतिष पहा, तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळें तूं असा झालास ... वगैरे गोष्टी सांगत नसतात. मला एक आश्चर्य वाटत असतें कीं आमचे पुरोगामी लोकहि आपल्या वर्तमानपत्रांतून व साप्ताहिकांतून भविष्यें देत असतात. बुध्दिवादाचा आग्रह धरणारे हे लोक लोकांच्या रूढीची पूजा करीत असतात !! गांधीजींनीं असले प्रकार कधीं केले नाहीत. गांधीजी बुध्दिवादी आहेत. शास्त्रीय बुध्दिवादी आहेत. मलेरियावर गांधीजी कोयनेल घ्यायला सांगतात म्हणून आमचे आयुर्वेदी गांधीजींवर रागवत असतात ! गांधीजी त्यांना म्हणतात, '' तुमची गुळवेल किंवा तुमचीं औषधें शास्त्रीयदृष्टया जगासमोर मांडा. मी आयुर्वेद मान्य करीन. '' गांधीजी विज्ञान मानतात. यंत्रानें सडलले पांढरे तांदुळ खाणारा उंदीर वजनांत घटला, परंतु न सडलेला तांदूळ खाणारा उंदीर वजनांत वाढला. म्हणून असडीक तांदूळ खा, निदान हातसडीचे खा, परंतु गिरणीचे पांढरे खाऊं नका, असें शास्त्रीय दृष्टीनेंच ते सांगतात. मुंबईच्या केमिकल अनलायझरकडे चिंच, घोळीची भाजी, कडुलिबांचा पाला वगैरे वस्तु गांधीजींनी पाठवून त्यांत कोणते गुणधर्म आहेत त्याचा चौकीशी केली. गुळ व साखर यांत अधिक गुण कशांत आहेत हे डॉक्टरांच्याकडून चर्चून घेतलें.

वसंता, या गोष्टी ऐकून तूं हंसशील. मी हया गोष्टी अशांसाठी देत आहे कीं गांधींजी विज्ञान मानतात. त्यांना शोधबोध सारें हवें आहे. ते जुनाट बुध्दीचे, जडजरठ बुध्दीचे नाहींत. बंगलोरला पुष्कळ वर्षापूर्वी भाषण करतांना ते म्हणाले, '' मला विजेचे दिवे हवे आहेत. परंतु विजेनें चालणारी कापडाची गिरणी नको. विजेची शक्ति घरोघर पुरवितां आली व घरगुती धंदे त्यावर चालवितां आले तर मला तीहि हवी आहेत ! '' यंत्र म्हटलें कीं नाक मुरडावयाचें असे दुराग्रही गांधीजी नाहींत. ते म्हणतील, '' शिवण्याचें यंत्र मला पाहिजे. अंहिंसक इनॉक्युलेशन मला पाहिजे. क्लोरोफॉर्म मला पाहिजे. जे शोध, जी यंत्रे कोणाची पिळवणूक न करतां संसारांत सुख आणतील तीं मला हवीं आहेत ! '' गांधीजींना वनस्पतिसंशोधन पाहिजे आहे. खगोलविद्या हवी आहे. बौध्दिक आनंद का त्यांना नको आहे? चरखा हातीं घ्या एवढें म्हटल्यानें गांधीजी कांहीं जुनाट, पुरातन पुरूष होत नाहींत.यंत्रानें बेकारी वाढते व गुलामगिरी वाढते. भांडवलवाले व मजूर असे भेद वाढतात. युध्दें होतात. हिंसा वाढते. म्हणून गांधीजी म्हणतात कीं सा-याच वस्तु यंत्रानें नका निर्मू. आतां आगगाडया किंवा इतर गोष्टी खेडयांत किंवा एका माणसाला नाहीं निर्मिता येणार. आणि त्या नष्टहि नाहीं करतां येणार. परंतु अशा कांही गोष्टी आपण सोडून देऊं या. दृष्टि अशी ठेवूं या कीं खेडयांतील लोक तेथेंच घरबसल्या उद्योगधंदे करुन समाजाच्या आवश्यक गरजा पुरवीत राहतील. मग एकाच्या हातांत फारशी सत्ता व संपत्ति येणार नाहींत. ग्रामोद्योग असले म्हणजे आपोआपच संपत्तीचें विभाजन होईल. यंत्रांचें राक्षस उत्पन्न करा व मग क्रांति करा हें सांगितलें आहे कोणीं? गांधीवादाचीं तीन तत्त्वें सांगतां येतील. (१) संपत्ति एका हातीं न देंणें. (२) सत्ता एका हातीं न देणें. (३) लोकांची एकाच ठिकाणीं गर्दी होऊं न देणे. या तिन्हीं गोष्टींसाठी यांत्रिक उत्पादन दूर ठेवणें हाच धर्म ठरतों. यांत्रिक उत्पादन केलें नाहीं म्हणजे भांडवलवाला वर्ग निर्माण होणार नाही. भांडवलदार वर्गच जन्मला नाहीं म्हणजे मग पुढें त्यांतून निर्माण होणारी फॅसिस्ट-नाझी हुकुमशाही वा साम्यवादी हुकुमशाही याहि जन्मास येणार नाहींत. म्हणजे सत्ता एकाच्या हातांत एकवटणार नाहीं. आणि प्रजाहि लाखों गांवीं पसरलेली असेल. एके ठिकाणीं गदींने राहण्याची जरूरी भासणार नाहीं. खेडयांत मोकळी अशी जनता राहील.समाजवादी लोक म्हणतात कीं गांधीजींना ज्या तीन गोष्टी हव्या आहेत त्याच आम्हीहि इच्छितो. आम्हांलाहि एकाच्या हातीं संपत्ति नको आहे. परंतु त्यासाठी ग्रामोद्योगांची कांस धरण्याची जरूरी नाहीं. 'यंत्रांनी बेकारी वाढते. आणि ही बेकारी दूर करण्यासाठीं म्हणून इतर देशांना गुलाम करावें लागतें व आपला माल तेथें खपवावा लागतो' असें गांधीवादी म्हणतात. परंतु हा यंत्राचा दोष नसून समाजरचनेचा दोष आहे. समाजवादी समाजरचनेंत हा दोष राहणार नाहीं. समजा एखाद्या देशाला समाजवादी व्हावयाचें आहे, तर तेथें काय करण्यांत येईल? यंत्रानें उत्पादन फार होतें. तें खपविण्यासाठी दुस-या बाजारपेठा धुंडाळाव्या लागतात. परंतु आम्ही इतकेंच उत्पादन करूं. कीं, जें देशाच्या गरजे पुरतें आहे. आणि ज्या कांहीं वस्तु देशांत होतच नाहींत त्या वस्तु परदेशांतून आणण्यासाठी जी किंमत द्यावी लागेल ती भरुन काढण्यासाठीं जेवढें अधिक उत्पादन करावें लागेल तेवढें करू. जगाच्या बाजारपेठा आम्हाला काबीज करण्याची गरज नाहीं. आम्ही कामाचे तास कमी करूं व अनेकांना काम देऊं आठ आठ, नऊ नऊ तास काम केल्यानतर मनुष्यामध्यें जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठीं शक्तिच राहात नाहीं. जीवनांतील इतर आनंद तो कधीं घेणार? त्याला बाग करतां येणार नाहीं. संगीत शिकतां येणार नाहीं; चित्रकला दूर ठेवावी लागेल, इतर शास्त्रें दूर ठेवावीं लागतील. आजच्या भांडवलशाही समाजरचनेंतील कामगार हा कामगार म्हणूनच जगतो व मरतो ! समाजवादी समजारचनेंतील कामगारहि शास्त्रज्ञ व संगीतज्ञ होईल आणि संगीतज्ञ व शास्त्रज्ञहि कामगार होतील. श्रमजीवी वर्ग व बुध्दिजीवी वर्ग यांची आज फारकत आहे. बुध्दीजवळ शरीरश्रम नाहींत व शरीरश्रमाजवळ बुध्दि नाहीं. मनुष्याचासंपूर्ण विकास भांडवलशाही समाजरचनेंत होऊंच शकत नाहीं. आणि उद्यांच्या समाजवादी रचनेंत कारखाना हा व्यक्तीच्या मालकीचा राहणार नसल्यामुळें एकाच्या हातीं संपत्ति जमण्याची भीति नाहीं. तेव्हां यंत्रावर जे तीन आक्षेप गांधीवादी मंडळींचे आहेत कीं, त्यानें बेकारी वाढते, इतरांना गुलाम करावें लागतें व भांडवलशाही निर्माण होते, ते वरील प्रमाणें नाहींसे होतात. यासाठीं यंत्र ठेवूनहि गांधीजींचा उद्देश सफल होईल व फार श्रम न करतां फुरसतीचा भरपूर वेळ जीवनाच्या इतर बौध्दिक विकासांत व निरामय, निर्मळ आनंदांत कामगारास दवडता येईल.

गांधीजींचा मुद्दा हा कीं, सत्ता एकाच्या हातांत नको. भांडवलशाही समाजपध्दतींत शेवटीं असा क्षण येतो कीं ज्या वेळेला फॅसिस्ट हुकुमशाही तरी निर्माण होते किंवा साम्यवादी हुकुमशाही निर्माण होते. भांडवलशाही समाजाच्या परिणतावस्थेंत संघटित कामगार क्रान्ति करून समाजवाद स्थापन करतो. त्या वेळेस कामगार-हुकुमशाही कांहीं दिवस असते खरी, परंतु ती आपोआप पुढें नष्ट होईल. कामगार हुकुमशाह ही तात्पुरती, संक्रमणावस्थेंतील होय. ती हुकुमशाही चिरजीव नसते. कांहीं संघटीत कामगार क्रांति करतात. परंतु सर्वच्या सर्व समाज नवीन प्रकारास तयार असतोच असें नाहीं. समाजवादी क्रांति कामगार करतो. तो क्रान्तीचा आघाडीचा शिपाई असतो. कामगारांस गमवायला काहींच नसते. त्याला ना घरदार ना जमीन. म्हणून तोच राष्ट्राच्या मालकींची उत्पादन-साधनें आपलीं व्हावींत यासाठी झगडायला उभा राहतो. परंतु शेतकरी जमिनीला चिकटलला असतो. तो सावकार किंवा जमीनदार यांच्या पाशांतून मुक्त होण्यापुरता क्रान्तीत सामील होतो. परंतु ' सर्व जमीन समाजाची ' असें म्हणावयास तो एकदम तयार होणार नाही ! सामुदायिक शेती करावयांस तो एकदम तयार होत नाहीं. त्याला हळुहळु सामुदायिक शेतीचे फायदे शिकवावे लागतात. प्रचार करावा लागतो. थोडी सत्त्कीहि करावी लागते. संपूर्णपणें समाजवादी प्रयोग होईपर्यत अशा अडचणी असतात. त्यासाठी कांही दिवस हुकुमशाही असते. तसेंच हा नवीन प्रयोग हाणून पाडण्यासाठी भांडवलवाले-लहान वा मोठे-प्रयत्न करीत असतात. ते असंतुष्ट झालेले असतात. त्यांची चैन नाहींशी होते. त्यांचा बडेजाव व रुबाब जातो. इतर भांडवलशाही राष्ट्रांशी ते संगनमत करतात. कट रचतात. या सर्व गोष्टीचा वेळींच प्रतिकार करता यावा यासाठीं संक्रमणावस्थेंत कामगार-हुकुमशाही निर्माण होणें अपरिहार्य असतें. जगांतील भांडवलवालेहि हा प्रयोग यशस्वी होऊं न देण्याची पराकाष्ठा करतात. कारण दुस-या एखाद्या देशांत शेतकरी-कामकरी सुखी झालेला दिसला तर आपल्या देशांतील शेतकरी -कामगारहि त्याच मार्गानें जाऊं पाहतील अशी त्यास भीति वाटते. म्हणून हा स्फूर्तीचा झरा नाहींसा करावा, ही ज्वाला विझवून टाकावी, हा आदर्श प्रयोग मातींत गाडावा म्हणून भांडवलवाले अट्टाहास करता. जोंपर्यंत आजूबाजूस भांडवलशाही आहे तोपर्यंत समाजवादी प्रयोग करणा-या राष्ट्रांस नेहमीं लढाईच्या पावित्र्यांत रहावें लागतें. आणि राष्ट्राला लढाईच्या तयारींत ठेवण्यासाठी हुकुमशाहींची जरूरी असते. लढाईच्या वेळीं एकाच्या हातीं सूत्रें द्यावीं लागतात. स्टॅलिन अशा अर्थाचें एकदां म्हणाला कीं '' रशियांत ऊन हुकुमशाही आहे. पण ती का आहे? आम्हांला सत्तेची स्पृहा नाहीं. अपरंपार किंमत देऊन जो हा प्रयोग आपण केला आहे तो मातींत जाऊं नये एवढयासाठी येथें हुकुमशाही आहे. आपण सुरक्षित आहोंत असें तुम्हांस वाटतें का? सांगा.जर खरोखर तुम्हांस आपण सुरक्षित आहोंत, आपला प्रयोग आतां सुरक्षित आहे, असें वाटत असेल तर सांगा. आतां या क्षणी मी अधिकारसूत्रें खालीं ठेवतो ! परंतु सभोवत पहा. आपल्यावर हल्लें चढविण्यासाठीं सारे टपलेले आहेत. जें रोपटें आपण लावलें, ते उपटून टाकावयास भांडवलशाही जग अधीर आहे. अशा परिस्थितीत आपण नेहमीं सज्ज राहिलें पाहिजें. आपला प्राणप्रिय प्रयोग नष्ट न होऊं देण्यासाठी सर्व कष्ट सहन केले पाहिजेत.पण हुकुमशाही हें समाजवादाचें ध्येय नाहीं. हळूहळू सारी जनता तयार होईल. नवीन प्रयोग पचनीं पडेल. अंतर्गत विरोध नाहींसें होतील. सभोंतीचे शेजारी निवळतील. आणि मग हुकुमशाही आपोआप गळून पडेल. मार्क्सवादी ' सरकारहीन समाज ' हें ध्येय मानतात. सरकारच नाही ! सुरळित असें सहकारीं समाजयंत्र चाललें आहे. एक दिवस उजाडेल व मानव इतका विकसित झालेला दिसेल. म्हणून सत्ता एकाहातीं नसावी, हें गांधीवादींतील तत्व आम्हांसहि मान्य आहे. फक्त संक्रमणावस्थेंत, प्रयोगाच्या बाल्यावस्थेत आम्हांला हुकुमशाही ठेवणें जरूर पडते. परंतु ते शेवटच्या अराज्यवादी, सरकारहीन ध्येयाचें साधन आहे.

गांधीवादींचें तिसरें म्हणणें असें कीं, प्रजा फार एकत्र येऊ नये. लोकांची एकेका शहरांत फार गर्दी होऊं नये. समाजवादी म्हणतात कीं, आमच्या आदर्श समाजघटनेंत सत्तर सत्तर मजल्यांच्या इमारती बांधून कबुतरांसारखे लोक गर्दी करुन राहात आहेत असें दिसणार नाहीं ! आमचीं शहरेंच खूप विस्तृत, लांब - रुंद असतील. कामगारांच्या चाळी दूर दूर असतील. मधून सार्वजनिक बागा असतील. कारखाने एका बाजला असतील.कामगार दूर राहात असले तरी त्यांना ताबडतोब नेण्यासाठी ट्रामगाडया, आगगाडया व विमानें असतील. अशीं सुंदर ऐसपैस, मोकळी शहरें आम्ही निर्मू. म्हणजे गांधीवाद्याचा हा तिसरा आक्षेपहि उरत नाहीं.

वसंता, येथेंच हीं उत्तरें प्रत्युत्तरे संपलीं असे नाहीं. दोन्ही पक्षांचे आणखीहि पुष्कळच तात्विक विवेचन आहे. खंडन-मंडन आहे. तें पुढील पत्री लिहीन. हा विषय इतका गहन आहे कीं, वाचावें व एकावे तेवढें थोडेंच ! गांधीवादी विचार कळण्यासाठी आर्चाय कृपलानी यांचे ' गांधीयन वे ' हें वाच. ' गांधी-विचार-दोहन ' हें पुस्तकहि वाच. सर्वोदय मासिकाचे अंक वा आचार्य जावडेकरांचे ' आधुनिक भारत ' वाच. समाजवाद कळण्यासाठी मराठींतील ' समाजवादच कां? ' ' रशियांतील राज्यक्रान्ति, ' ' समाजवादाचा ओनामा, ' लेनिन मार्क्सची चरित्रें, वादविवेचन मालेचीं पुस्तकं चाव. आज पुरे.

सर्वांस प्रणाम.तुझाश्याम