क्रांती
खरतर मला या विषयावर लिहायचच नव्हतं. मी लिखाणाला सुरुवात केली तेव्हाच ठरवलेल काही विषय जाणुन बुजुन टाळायचे. कारण ; आपल्याला स्वातंत्र्य मिळुन आज एवढी वर्ष झाली, पण आपले मुलभुत प्रश्न जागा सोडायला तयार नाहीत. शाळेतील निबंधाचे विषयही कित्येक वर्षापासुन तेच आहेत... स्ञीभ्रुणहत्या, हुंडाबळी आणि बरच काही... ते ही १०-१० मार्काला ! किती प्रगती केलीय आपण ! जग कुठे जात आहे आणि आपण..... असो सत्य ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नसतो. आपण मांडलेल्या सत्यावर परखड टिका ही होवु शकते. लिहीणार्याच्या अकलेचे कांदे वगैरे काढले जावु शकतात. आपल्याला नुसत मत मांडल्याने देशद्रोही वगैरे वगैरे लेबल ही लावले जावु शकतात सो... मुद्द्याकडे वळते.
हुंड्याला , सासरच्या जाचाला कंटाळुन जिव देणाऱ्या / दिलेल्या प्रत्येक स्ञी ला आज विचारावस वाटतयं , की आज तु मेलीस... पण म्हणुन संपले का प्रश्न ? उत्तर मिळाले का ? मरण्यापुर्वी एकदा आई - वडिलांचा विचार करावासा वाटला नाही का ? तरुण पोरगी अशी मेल्यावर कुठल्या बापाला झोप लागेल का ? आज तुझा बाप रानावनात आसवं लपवत तुझ्या नावानं हाका मारत फिरत असेल.. काय करायच त्या हाकांचं ? त्या आकांतांच ? तु दिसणार आहेस का परत त्याला ? कसं जगायचं ? तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं असेल तुला आयुष्यभर...तुझ्या चितेला पाहुन.. कसला वणवा पेटला असेल त्याच्या काळजात ? विचार केलास का कधी ? का घेतलीस माघार...लढण्याआधीच ? आज तु माघार घेतलीस.. उद्या असंख्य जणी हेच करतील ! वेळ नाही लागणार .. स्ञी म्हणजे भिञी हे लेबल स्ञी जातीपुढे कायमचं चिटकायला.
तु गेल्याने काय झालं ? हुंडापद्धत थांबली का कायमची ? आणि हो अस समजु नको की तुझ्या जाण्याने आम्हाला जाग येईल . कारण जाग आम्हाला तेव्हाच येते जेव्हा कोणी जीव देतं किंवा जिव हेलावणारी एखादी घटना घडते. नाहीतर इतर वेळी आम्ही झोपेच सोंग घेवुन झोपलेले असतो. अशांनाच जागवण जास्त अवघड असतं. तुझ्या बलिदाना प्रित्यर्थ मोर्चे निघतील . संप निघतील. पण हुरळुन जावु नको कारण ; मोर्चे निर्भया च्या वेळे ही निघाले होते... पण त्यानंतरही बलात्कार झालेच ना गं ? तुझ्या जाण्याने न्युज वाल्यांचा टिआरपी भरगच्च वाढला. सोशल मिडीयावर पोस्टींच उधाण आलं... सार्या देशाची सिम्पथी मिळाली गं तुला . पण हेच वाईट आहे गं... सिम्पथी लगेच मिळते...पण बदल मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे झटावं लागतं. बदल घडवण्यासाठी मरावं लागतं. बास्स कर स्वतः ला संपवण. बदल ना स्वतः ला. किती दिवस तिथचं राहायचयं ? उडा ना गं बायांनो... उडा ना पंखात बळ घेऊन उडा. तोडा ती बंधंनं. नाही द्यायचा हुंडा... नाही म्हणजे नाही. ठाम रहा मतावर. कोण उचलुन मंडपात बसवणार नाही तुम्हाला. आणि बसवलचं तर वापरा ना कायद्याने दिलेले अधिकार. ओळखा ना स्वतःच्या क्षमता. कोणी येवुन सांगणार नाहीये तुम्हाला. स्वतः च जाग्या व्हा . उठा घडवा बदल. अस घुसमटुन मरण्यापेक्षा... भांडुन , लढुन , बदलाचा भाग होऊन मरा.
१० पैकी १-२ मुलीचं काहीतरी वेगळ करतात. फक्त शिकुन फायनान्शियल इंडिपेंन्डन्ट होणं म्हणजे प्रगती नव्हे. सो काँल्ड मानसिकतेतुन कधी इंडिपेंन्डन्ट होणारं ? त्या १-२ मुली संघर्षाला घाबरत नाहीत. त्या लढतात परिस्थिती सोबत.. घरच्यांसोबत... समाजासोबत. आणि त्याच मुली इतिहास घडवतात. पण बाकीच्या ८ जणी का झोपल्यात , डोळ्यावर झापड घालुन ? कधी उघडणार त्या ? कशाला घाबरताय ? कुणाला घाबरताय ? मग तुम्हाला माहीतच नाहीये..तुमच्यात काय दडलयं ! जेव्हा कळेल ना.. तेव्हा वादळं उठतील . पेटव ना स्वतःच्या अंतरीच्या मशाली आणि जाळुन टाक त्या धुरा .. ज्या तुला समाजानं ठरवलेल्या सो काँल्ड मर्यादित शेताचा बांध ओलांडु देत नाहीत.
स्ञी म्हणजे कोण ? हे आधी स्वतः ला विचार . तुझ्यात जन्मतःच जे बळ ठासुन भरलयं ते वापरं. ओळख स्वतः ला. लहानपणापासून झाशीची राणी , अहिल्याबाई होळकर , जिजाऊ वाचत आलीयेस ना ? मग त्या वाचुन सोडण्यासाठी नव्हत्या गं बाई ! हो ना तु ही झाशीची राणी . पुकार ना बंड..चुकीच्या रुढी आणि परंपरेविरुद्ध . तोपर्यंत थांबु नको जोपर्यंत जिंकणार नाहीस. जोपर्यंत तु स्वतः हुन सुरुवात करणार नाहीस तोपर्यंत काही होणार नाही.
मुळात काही दोष आपल्या सिस्टिम मध्येच आहे. याचं एक खरखुर उदाहरण देते. मी गावाकडे एका मैञिणीच्या घरी गेले होते. तिची छोटी बहीण जेमतेम १० वर्षाची असेल, ती भांडे घासत होती. तिला जमेल तशी वेडी वाकडी घासत होती. दहा वर्षाच्या मुलीने कशी भांडे घासावीत याचं मोजमाप कस लावतात बघा . तिची आई जोरात किंचाळली , " ये दिदे... निट भांडे घास गं.. सासु टिकुरानं बडवाल्यावरं तुला कळलं चांगलं !" हे वाक्य ऐकुन तळपायाची आग मस्तकाला गेली होती. डोक्याला झिणझिण्या आल्या होत्या. काय हे ? काम सर्वाना यायला हवं यात दुमत नाही. पण इथे काम निट करण्यासाठी जे कारण त्या मुलीच्या मनावर बिंबवल जातयं ते चुकीच वाटतं मला. कारण अजुनही प्रत्येक आई - वडील मुलगी जन्माला आली की कर्तव्य आणि जबाबदारी , परक्याचं धन वगैरे मानुनच चालतात. तिच्या जन्मापासुन वडिल हुंडा आणि आई रुकवताच्या वस्तु जमवायला लागतात. महिन्याला थोडा खर्च खास तिच्या लग्नासाठी बाजुला काढतात. काही जण मुलीला शिकवतात.. पण त्यातील बर्याच जणांचा त्या मागचा हेतु तिला चांगल शिकलेल स्थळ मिळावं आणि तिच्या आयुष्याचं चांगलं व्हावं हा असतो. हे कुठतरी बदलायला हवं... खुप कमी आया असतील ज्या मुलीला लग्न , राजकुमारं , सासु सासरे , संसार याव्यतिरिक्त हे सांगत असतील , की यापेक्षा वेगळ विश्व ही आहे. तुझा जन्म या कामासाठी नाही झाला..! उचल ती लेखणी पेर तुझ्या शब्दांचे डोंगर. घे तो कुंचला रेखाट तुझ्या कल्पनेचे विश्व. घे ती काञी.. बनवं जगावेगळ डिझाईन. घे ही पुस्तक वाचं , उद्या चालुन तुला देश घडवायचायं. धुणं , भांडी , घरकामावरुन मुलींना अशे टोमणे मारणार्या आयांना सांगावस वाटतयं . की बाई मुलीचं आकाश तु सिमित करु नकोस. मुळात स्ञी काय असते आणि ती काय करु शकते हे तु आधी समजुन घे आणि मग मुलीला घडवं.
लग्न म्हणजे काय ? जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने लग्न करण गरजेचच आहे का ? एखादा मुलगा किंवा मुलगी अविवाहीत राहु इच्छित असेल तर काय हरकत आहे ? पंरपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी तशाच पुढे चालु ठेवायलाच हव्यात का ? कोणी त्यापेक्षा वेगळी वाट निवडत असेल तर ती आपण हसत हसत स्विकारायला नको का ?? आधी आपण भारतीय शौचेसाठी बाहेर जायचो पण बदलत्या काळानुसार शौचालय वापरायला शिकलोच की ? आता तर अगदी फ्रेंच टाँयलेट ही वापरतो , कारण ते काही जणांना कम्फरटेबल वाटतं. ५ मिनीटाच्या क्रियेसाठी कम्फर्ट बघतो आपण , मग लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. तिथे चाँईस आणि मुभा असायला हवी. लँडलाईन न वापरणारे लोक आज दोन दोन स्मार्टफोन वापरतात. फेसबुक वाँट्सअप वापरतात. बदल ही काळाची गरज आहे. मग आपण आपल्या लग्नपद्धतीत थोडे बदल केले किंवा प्रत्येकाला त्याच स्वातंत्र्य दिलं तर काय वाईट? लग्न हा जरी सोहळा असला तरी त्याचं होणारं व्याप्तीकरणं बदलायला हवं. शेजार्याने मुलीला १५ लाख हुंडा दिला म्हणुन मी वरचढ २० लाख देणारं म्हणणारे महान बापही बघितले. कोणाच्या तरी पोरीला चमचा पासुन वाँशिंग मशिन पर्यत सगळ दिलं म्हणुन माझ्या पोरीला पण मी देणारं म्हणणार्या महान आया ही बघितल्या. एका दिवसाच्या लग्नासाठी ३० -३० हजाराचा शालु आणि शेरवानी घेऊन बापाचा जीव टांगणीला लावणारे पोरं पोरीही बघितले. लग्नात आत्याच्या नवर्याला अंगठी , मोठ्या जावयाला सफारी ,कोणाला तरी साडी मान पान मिळाला नाही म्हणुन रुसुन बसणारे पाहुणे ही पाहीलेत. काय हे ? चुक सर्वांचीच आहे. सर्वांनीच बदलायला हवं. पण प्रत्येक स्ञीला हेच सांगण आहे की आधी स्वतः बदला. साडी घालुन शोभेची वस्तु असल्याप्रमाणे उभ रहाता कांदे पोहे घेवुन . आवडली तर हो आणि नाही आवडली तर रिजेक्ट करतात ते. आणि तुम्ही नुसती मुंडी हलवायची नंदीबैलाप्रमाणे. एखाद्या मालाप्रमाणे ४ लाख , १० लाख किंमत होते तुमची बाजारात. वाईट नाही वाटतं ? ह्या प्रथा चुकीच्या नाही वाटतं का ? मग त्या बदलायच्या कोणी ? तुम्ही आम्ही आपणच ना ? मग वाट कशाची बघताय ? घडवा बदल. झटका धुळ.. एक लक्षात घ्या . "जेव्हा जेव्हा स्ञी उंबरठा ओलांडुन बाहेर पडलीय तेव्हा तेव्हा बदल घडलाय. तेव्हा तेव्हा इतिहासाची पानं फडफडली आहेत. " उठा जाग्या व्हा . एक वेळ होती, सिता मातेला तिचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरिक्षा द्यावी लागली होती. पण आता काळ बदललाय. परिक्षा देण तर दुरच राहीलं. तु आता हे विचारायला हवं की , " मी कोण आहे? काय आहे ? कशी आहे हे मला माहीत आहे..आणि ते जगासमोर सिद्ध करण्याची गरज मला वाटतं नाही. जे मला योग्य वाटतं नाही ते मी का करु ?" तुझ्याकडे बोट करणाऱ्या , रुढी परंपरा मध्ये "ती " ला गाढु पाहणाऱ्यांना , तु हा प्रतिप्रश्न विचारुन गार करायला हवस. कारण ; तु युगा आहेस .. क्रांती आहेस उद्याची....! तु बदलायलाच हवं .