१३. अष्टविनायक - भाग १
अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. अष्टविनायकांच दर्शन घेण्याची इच्छा बऱ्याच भक्तांची असते.
श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. महाराष्ट्रात असलेली अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.
श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे.
* अष्टविनायक दर्शन यात्रेचा शास्त्रोक्त क्रम -
१. मयुरेश्वर किंवा मोरेश्वर - मोरगाव, पुणे
२. चिंतामणी - थेऊर गाव, पुणे
३. सिद्धिविनायक - सिद्धटेक, कर्जत, अहमदनगर
४. महागणपती - रांजणगाव
५. विघ्नेश्वर - ओझर
६. गिरिजात्मज - लेण्याद्री, पुणे
७. वरदविनायक - महाड
८. बल्लाळेश्वर - पाली, जिल्हा रायगड
आणि यात्रा पूर्ण होण्यासाठी परत मोरेश्वरचे दर्शन घेतल जात.
या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -
१. मोरगाव-
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
मोरेश्वर मंदिराच्या चारही कोपऱ्यात स्तंभ आहेत आणि मोठ्या दगडांच्या भिंती आहेत. इथे चार दरवाजे आहेत. हे चार दरवाजे चारी युगं, म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीक आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी भगवान शिवाचे वाहन नंदीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. या नंदीच्या मूर्तीचे तोंड गणेश मूर्तीच्या दिशेला आहे. नंदीच्या मूर्तीशी संबंधित इथे असलेल्या दन्तकथांप्रमाणे फार वर्षांपूर्वी भगवान शंकर आणि नंदी या मंदिरात विश्रांतीसाठी थांबले होते, परंतु नंतर नंदीने इथून जाण्यास नकार दिला. तेव्हापासून नंदी इथेच वास्तव्यास आहे. नंदी आणि उंदीर, दोघेही मंदिराच्या रक्षकाच्या रुपात तैनात आहेत. या मंदिरात गणपती बैठ्या अवस्थेत विराजमान आहे. त्याची सोंड डाव्या हाताला वळलेली आहे, त्याच्या चार भूजा आहेत आणि तीन नेत्र आहेत.
२. श्री चिंतामणी
अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे चिंतामणी. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली इथे आहे. मंदिराच्या शेजारीच तीन नद्यांचा संगम आहे. या तीन नद्या आहेत भीमा, मुळा आणि मुठा. जर एखाद्या भक्ताचे मन अस्वस्थ असेल, चित्त विचलित असेल आणि आयुष्यात त्याला सारखा दुःखाचा सामना करावा लागत असेल, तर या मंदिरात आल्यावर सर्व समस्या निघून जातात. असं म्हटलं जातं की स्वतः भगवान ब्रम्हदेवाने स्वतःचे विचलित मन काबूत आणण्यासाठी याच स्थानावर तपश्चर्या केली होती.
थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.
महादेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.
मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे.
३. श्री सिद्धिविनायक-
श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा तिसरा गणपती. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
४. श्री महागणपती-
हे स्थान रांजणगाव इथे आहे. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की,त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.