श्यामचीं पत्रें
पांडुरंग सदाशिव साने
पत्र सहावे
विकासाचा आरंभ मंगलप्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.आज सायंकाळी आकाशांत बीजेची चंद्रकोर दिसत होती. लहानपणीं आम्ही द्वितीयेची ही चंद्रकोर पाहण्यासाठी धडपड करीत असूं. आणि दिसली कीं, ती एकमेकांस दाखवीत असूं. सुताचा धागा त्या चंद्राला वाहून जुनें घे, नवें दे, असें नमस्कार करुन म्हणत असूं. या चंद्रकोरेची इतकी कां बरें महति? कारण ती वर्धिष्णु आहे. विकासाचा तो आरंभ आहे. कोणताहि विकासाचा आरंभ मंगल आहे. श्री. शिवछत्रपतींची जी राजमुद्रा होती तींत ' प्रतिपच्चंद्ररेखेव ' असें तिला म्हटलें आहे. शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा शुक्ल पंक्षातील चंद्राप्रमाणें वर्धिष्णु आहे असें त्या श्लोकांत आहे.आकाशांतील चंद्र म्हणजे सृष्टीचें महाकाव्य आहे. परंतु वसंता, मध्यें मी कोंकणांत गेलों होतों. तेथें मला एक विचित्र अनुभव आला. माझ्या मनाला त्यामुळें मोठा धक्का बसला. मी माझ्या लहानपणाच्या एका मित्राला मोठया प्रेमानें भेटावयास गेलों होतों. त्याचा एक सात आठ वर्षाचा मुलगा होता. मोठा तरतरीत होता तो मुलगा. त्याचे डोळे तेजस्वी होते. माझा मित्र आपल्या मुलाला म्हणाला, '' बाळ हे पाहुणे आले आहेत; त्यांना चित्र काढून दाखव. ''त्या मुलाच्या बोटांत उपजतच जणुं चित्रकला होती. कांहीं तरी पाटीवर काढावें असा त्याला नाद होता. तो बाळ हातांत पाटी घेऊन गेला व थोडया वेळानें तो परत आला. त्या पाटीवर त्यानें चंद्र-सूर्य, फुलें वगैरेंचीं चित्रें काढली होती. माझ्या मित्रानें ती पाटी हातांत घेतली. परंतु त्या पाटीवर चंद्र काढलेला पाहून तो रागावला. '' अरे, हा मुसलमानांचा चंद्र कशाला काढलास? पुसून टाक तो ! '' असें संतापून म्हणाला. तो लहान मुलगा पहातच राहिला. मी तर चकितच झालों. मुसलमानांचें अर्धचंद्राचें निशाण आहे. म्हणून का हिंदु मुलानें पाटीवर चंद्रहि काढूं नये? त्या मुलाच्या मनावर केवढा हा आघात ! मी त्या माझ्या मित्राला म्हटलें, '' असे चंद्र हा सर्व विश्वाचा आहे. आपल्या बायका सकाळीं सडा घातल्यावर जी रांगोळी काढतात, तींत चंद्र-सूर्य काढतात. चंद्र-सूर्य आकाशांत नसून माझ्या अंगणात आहेत इतकें माझें अंगण भाग्यवान व पवित्र, असें जणुं त्या दाखवतात. स्वर्ग दूर नसून माझ्या दारीं आहे असा जणुं त्यांत भाव असतो. अरे, लहानपणी आईच्या कडेवर बसून ' चांदोबा, चांदोबा भागलास का? ' हें गाणें आपण शिकलों व म्हटलें. संकष्टी चतुर्थीला चंद्राचा केवढा महिमा. आपण चांद्रायण व्रतहि करतों. चंद्र का फक्त मुसलमानांचा? कां रे ऐवढा मुसमानांचा द्वेष? इतका द्वेष करुन काय मिळणार आहे.?
वसंता, संघटनेच्या नांवाने इतका अपरंपार द्वेष आम्ही पसरवीत आहोंत. मला अत्यंत वाईट वाटलें. ही का संस्कृति? ही का माणुसकी? हा का धर्म? असें मनांत आलें. मागें एकदां जळगांव शहरांत खादीसंबंधी एका गृहस्थांजवळ बोलतांना ते गृहस्थ म्हणाले, '' आम्ही खादी नाहींच वापरणार. कारण खादीमुळें मुसलमानांसहि धंदा मिळतो ! मुसलमान बायका, मुसलमान पिंजारी वगैरेंस काम मिळतें. आम्हांला नको खादी. ' ' आपल्याजवळच्या मुसलमान आया-बहिणींस दोन घांस मिळतात म्हणून आर्यसंस्कृतीच्या या उपासकांचें पोट दुखूं लागलें. हीच जर आर्य-संस्कृति असेल तर मग आग लागो तिला. ज्याला ज्याला का देतां येईल, त्याला त्याला आम्ही देतों. खादीमध्यें हिंदु-मुसलमान सर्वांना काम मिळतें. खादी हिंदुमुसलमांचीं छकलें जोडीत आहें. कांही गरीब मुसलमानांची फार दैना असते. त्यांच्यांत पडदा आहे. घरांत दारिद्रय असलें तरी रुढीमुळें त्यांना बाहेर पडतां येत नाही. घरांत उपास पडतात. मागें भुसावळजवळ वरणगांव नांवाच्या खेडेगांवांत असे करुण अनुभव आले. तेथें माझ्या कांहीं मित्रांनी मजुरीनें सूत काढून घेण्याचें काम सुरूं केलें. मुसलमान आयांबायांस तें कळलें. त्यांनीं आपल्या मुलींना सूत कातणें शिकवण्यासाठी या मिंत्राकडे पाठविलें. आठ आठ तास न कंटाळता त्या मुली शिकत बसत.''तुम्ही कंटाळत नाहीं कां? माझ्या मित्रानें त्या मुलींना विचारलें.''कंटाळून काय करूं? आम्हाला लौकर शिकूं दे. मग आमच्या आयांना आम्ही शिकवूं. आम्हाला दोन पैसे मिळतील. पोटाला मिळेल.'' त्या मुली म्हणाल्या.''सध्यां तर तुमचे सणाचें दिवस ना?''''काय का सण? घरमें खानेकू तो नही. !''वरणगांवचे माझे एक थोर मित्र बनाभाऊ. मुसलमान मायबहिणींनी त्यांना भाऊ मानले. मुसलमानांत पडदा होता तरी बनाभाऊंस तो नडत नसे. ते खुशाल त्यांच्या घरीं जात. हा आपण अन्नदाता आहे असें त्यांना वाटें.
पारोळें येथें नेहमी हिंदुमूसलमानांचें दंगे. परंतु खादीनें तेथें मांगल्य निर्मिले आहे. मुसलमान मायबहिणींस दोन घास मिळतात त्या आपल्या भांडखोर नव-यांस म्हणतात. '' हुज्जत कशाला घालता? पोटाला खायला द्यायला हे काँग्रेसवालेच आहे. दुसरे कोण आले? '' एरंडोल येथील कागदाचा धंदा पुन्हां वाढला. काँग्रेसच्या मदतीमुळें अधिक कागद होऊ लागला. अधिक खपूं लागला. सात आठ हजारांचा कागद मागील वर्षी झाला ! त्या मुसलमांनातले कितीतरी काँग्रेसचे सभासद झाले. त्यांना काँग्रेसविषयीं आपलेपणा वाटला. सेवा हृदयांना जोडते. काँग्रेस हिंदी जनतेंचीं शकलें विधायक सेवेनें जोडीत आहे. पूज्य विनोबाजी सांगत असतात कीं, '' सुताचा धागा सर्व दारिद्र नारायणांशीं आपल्याला जोडीत आहे, असें सूत काततांना वाटतें. '' ते खरें आहे. परंतु खादी सर्वांना जोडीत आहे म्हणूनच ती कांहीना नको आहे. जळगांवच्या त्या मित्राचा तो मुस्लीम-द्वेष पाहून मी गारच झालों ! जणुं गिरणीमध्यें सारे हिंदूच कामगार आहेत. आगागाडीचे व मोटारीचे सारे ड्रायव्हर जणुं हिंदूच आहेत ! मुसलमानांचा ज्या ज्या धंद्याशी संबंध असेल त्या धंद्याशीं का तुम्ही संबंध तोडला आहे.? फोडणीला लागणारा हिंग तर काबूलहून येतो. सोडलात का तो? कांहीं तरी चावटपणानें बालावयाचें झाले. मागें नाशिकचे कांहीं हिंदु-महासभेचे तरुण ' गांधी टोपी जाळा' वैगरे गांधी जयंतीस ओरडले. अरे इंग्रज सरकारनें तेंच म्हटलें. इंग्रजांत व तुमच्यांत फरक काय? गांधी टोपी जाळा म्हणण्यांत ज्या गरिबांना खादींने घांस मिळतो त्यांच्या संसारास आग लावा असेंच जणुं तुम्ही म्हणत असता.
वसंता, आपल्या पूर्वजांची अशी द्वेषी दृष्टि नव्हती. मुसलमान शेजारी आहेत. त्यांना उपाशीं ठेवायचें? हे मुसलमान कधीं कधीं फार गरीब असत. कारण मुळांत गरीब व उपेक्षित असें हिंदुधर्मांतीलच ते होते ! त्यांना नसे शेतीभाती, नसे धंदा. आपण कांही धंदे मुद्दाम दिले. ते जगावेत हा हेतु. आपल्याकडे लग्नमुंज वगैरे समारंभ असला तर चौघडयाबरोबर मुसलमानांचा ताशाहि आपण बोलावित असूं. परंतु आज मुसलमांनावर बहिष्कार घालण्यांत येतो. केवळ मुसलमान म्हणून हा बहिष्कार असतो! आपण आपल्या ओळखीच्या, आपल्या जातीच्या दुकानदाराकडे सहजपणेंच जातों. त्यांत दोष नाहीं. पण जेव्हां जाणूबुजून द्वेषाच्या पायावर आपण या गोष्टी उभारूं लागतों, तेव्हां ते वाईट असतें. आपल्या बायकांच्या हातांत कांहीं मुसलमानाहि बांगडया भरण्याचा धंदा करतात. हिंदु स्त्रियांच्या हातांत लांडयांनीं काय म्हणून बांगडया भराव्या? जणुं एखादा हिंदु तरुण नव्यानं हिंदु स्त्रियांच्या हातांत बांगडया भंरूं लागला तर त्याचें मन अगदीं पवित्रच राहील ! उलट ज्याला वंशपरंपरा संवय झाली त्याच्या मनांतहि कांहीं येत नाही ! पुरुष हिंदु असो, मुसलमान असो, मनें दोघांचीहि विकारक्षम आहत. फार तर आपण असें म्हणूं या कीं बायकांनींच बायकांच्या हातांत बांगडया भराव्या. त्यांत कांही अर्थ आहे. असें हे द्वेष फैलावले जात आहेत. मुसलमान तेवढा वाईट, असें लहान मुलांना शिकवण्यांत येत आहे. द्वेषाच्या व धर्माच्या नांवावर संघटना करण्यांत येत आहेत. परंतु अशा संकुचित धर्माच्या नांवानें केलेली संघटना टिकणार नाही. एकाच धर्माचे लोकहि आपसांत लढतांना प्राचीन काळापासून दिसत आहेत. जपान व चीन यांचा धर्म एकच. दोघांचा बुध्दधर्म आहे. परंतु दोघांचे सारखें रणकंदन चालले आहे. युरोपखंडातील सर्वांचा एकच धर्म होता. एकच धर्म आहे. परंतु युरोपांतील राष्ट्रे सारख्या लढाया करीत आहेत. औरंगजेब मुसलमान होता, परंतु गोंवळकोंडा व विजापूर येथील राज्यें त्यानें नष्ट केलींच ! मराठे इतर प्रांतांतील हिंदूवर स्वा-या करीतच होते. मराठयांना हिंदुसाम्राज्य निर्मावयाचें नव्हतें, त्यांना मराठा साम्राज्य निर्मावयाचें होतें ! नानासाहेब पेशवे म्हैसूरकडचा सुपीक व समृध्द प्रदेश पाहून पंत्रात लिहितात, '' दक्षिणेकडची ही संपत्ती महाराष्ट्रांत नेली पाहिजे, पुण्यास नेली पाहिजे. '' ब्रिटिश साम्राज्यवाले हिंदी संपत्ती लंडनला नेतात. फरक तो काय? मराठयांचा रजपूत, जाट, शीख वगैरेंशी कोठें सहकार होता? पानिपतच्या लढाईच्या वेळेस रजपूत, जाट, वगैरे अलगच राहिलें. कारण हा मराठयांचा साम्राज्यवाद आहे हें त्यांना कळूं लागलें. मराठे जातील तेथें आपले सरदा - सुभेदार नेमतील हे जगजाहीर झालें होतें ! ज्यांचीं सुख:दुखें एक त्यांची संघटना होत असते. भगवद्गीतेनें स्वकीय व परकीय असे दोन भेंद नाहीं सांगितले. कौरव व पांडव एकाच कुलांतील होते. एकाच धर्माचे होते. परंतु ते लढाईला उभे राहिले . कारण काय? दिसायला त्यांचा एक धर्म असला, तरी प्रत्यक्ष व्यवहार-धर्म दोघांचा निराळा होता. एक पक्ष असत्याचा पुजारी होता. दुसरा पक्ष सत्याला घेऊन उभा होता. चांगल्याची वाईटाविरुध्द संघटना हें आपण समजूं शकतो. मग जे जे चांगले असतील ते चांगल्या बाजूस उभे राहतील. चांगलें हिंदु, चांगले मुसलमान, चांगले शीख, चांगले पारशी, चांगले ख्रिश्चन. होऊं दे सत्पक्ष घेणा-यांची संघटना. परंतु जातीय संघटनेला काय अर्थ? गीतेच्या सोळाव्या अध्यांयात जगांत दोनच पक्ष आहेत असें सांगितले आहे. एक दैवी वृत्तीचा पक्ष व एक आसुरी वृत्तीचा पक्ष. '' मीच काय तो चांगला. मी फक्त श्रेष्ठ कुळांतला. मीच संपत्तिमान व बुध्दिमान. मलां हें घेऊं दे, ते जिंकूं दे. '' असें सदैव म्हणणा-यास गीतेनें आसुरी म्हटलें आहे. याच्या जें उलट तें दैवी. आसुरी वृत्तीच्या लोकांशी दैवी वृत्तीच्या माणसांचा सदैव झगडा चालला आहे. तुम्ही हिंदु संघटनवाले का मुस्लिम संघटनवाले असा प्रश्र न करतां तुम्ही सत्पक्षाची संघटना करणारे की असत् पक्षांतले, असा प्रश्र विचारला पाहिजे.
आज जगांत असेच हे दोन पक्ष आहेत. तरुणांनी आपली संघटना शास्त्रीय पायावर केली पाहिजे. भ्रामक कल्पनांच्या नादी त्यांनीं लागूं नये. आज कदाचित् धर्माच्या नांवानें लोक भुलतील, भाळतील. परंतु उद्यां वस्तुस्थिति दिसूं लागतांच या संघटना मोडतील. मुसलमानांचे अन्याय कांहीं रोज उठून प्रत्येक खेडयांत नाहींत. परंतु सावकारांचे व जमीनदारांचे अन्याय तर दररोज वर्षांनुवर्षें होत आहेत. ते सावकार गरिबांच्या घरांतील भांडी काढतात. लग्नाची पैठणी, तीहि काढून तिचा लिलांव करतात. सावकारांनीं शेतक-यांची विटंबना चालविली आहे. बेअब्रू चालविली आहे. ही बेअब्रू हिंदू संघटनवाले थांबविणार आहेत का? माझ्या दाराशी हिंदु सावकारांची जप्ती येते. पठाणहि येऊन बसतो. दोघे सावकारच. जात एकच. गरिबांना पिळण्यांची. शेतक-यांच्या ध्यांनात ही गोष्ट येईल. नुसतें हिंदु-हिंदु ओरडण्यांत काय अर्थ? श्रीमंत हिंदु, गरीब हिंदुंचे रोज रक्तशोषण करीत आहेत त्याचें काय? माझी गीता या दोघांना एका धर्माची म्हणणार नाही. रक्तशोषण करणा-याला ती आसुरी म्हणेल. आणि सावकाराविरुध्द शेतकरी झगडायला उभा राहील तर त्या शेतक-याला ती दैवी म्हणेल. राक्षसी व दैवी या पूर्वीच्या दोन नावांनाच आज आपण भांडवलवाले व श्रमणारे अशीं नांवें देऊं या. नांवें बदललीं तरी अर्थ एकच आहे.किती तरी कारखान्यांचे मालक हिंदु असतात. ते का हिंदु मजुराला अधिक मजुरी देतील? उद्यां मुसलमान कमी मजुरीवर मिळाला तर ते त्याला आधी कामाला ठेवतील. आमच्या अमळनेरच्या कामगारांत मिलच्या चालकांनीं खानदेशी कामगार व खानदेशच्या बाहेरचे कामगार अशी फूट पाडण्याचे प्रयत्न केले. इंग्रज आमच्यांत फूटी पाडून राज्य चालवितो. भांडवलवाले कामगारांत फुटी पाडून स्वत:ची लूट चालवितील. या गिरण्यांतून किती विटंबना असते ! स्त्री-कामगारांची तेथें किती करुण दशा असते ! परंतु कोणा हिंदु संघटनवाल्याचें तेथें लक्ष जाईल का? निदान तुझ्या हिंदु कामगारांना तर अधिक मजुरी दे, हिंदु कामगारांसाठी तरी नीट चाळी बांधून दे, असें हिंदुमहासभावाले एखाद्या श्रीमंत हिंदु कारखानदारांस सांगतील का? आणि तो कारखानदार तें ऐकेल का? काँग्रेसनें कर्जनिवारणबिल आणलें तर सारे हिंदुमुसलमान सावकार एकत्र जमून त्यांनीं आरडाओरडा केला. कुळकायदा येतांच सारे जमीनदार जातगोत न पाहतां उठले. खोती विरुध्द काँग्रेसचें मत दिसतांच सारे खोत एकत्र झाले. संघटना हिंदुमुसलमानांच्या वरवरच्या आहेत. खरी संघटना आर्थिक हितसंबध एक असणा-यांचीच होत आहेत, कोंकणात हिंदु खोत आहेत, मुसलमान खोत आहेत. हिंदु खोत व मुसलमान खोत का अलग राहिले? हिंदुमहासभेचें काम करणारे खोत, खोतमंडाळांतहि सेक्रेटरी होतात. आणि त्या खोतमंडळांत मुसलमानहि असतात. खोत तेवढे सारे एक होतात व कुळांना चिरडतात. कुळेंहि मग सारीं एक होतील.शहरांतील कामगारांना ही गोष्ट पटकन पटते. दुनियेंत गरीब व श्रीमंत, छळणारे व छळले जाणारे, पिळणारे व पिळले जाणारे हेंच काय ते खरे भेद आहेत हें त्यांना पटकन समजतें. मालक हिंदु असो, ज्यू असो, मुसलमान असो. सर्वत्र कामगार भरडलेच जात असतात कारण सर्व मिलवाल्यांचे आर्थिक हितसंबंध एक असतात. कानपूरला हिंदुमुसलमान कामगारांत कधीं फारसें भांडण होत नाही. ते एकत्र राहतात. उलट कानपुरांत होणारे हिंदुमुसलमानांचे दंगे मिटवण्यासाठी तेथले कामगार खटपट करतात. तेथे हिंदुमुसलमानांची भांडणें पुष्कळ वेळां सरकारी हस्तकहि तेथें लावीत असतात. हिंदु कामगार वा मुसलमान कामगार दोघे कारखान्यांतून मरत आहेत. हें कामगार ओळखतो.
बारिसाल म्हणून बंगालमध्यें प्रसिध्द जिल्हा आहे. एकदां त्या जिल्हयातील हिंदुमुसलमान शतकरी हजारोंच्या संख्येनें तगाई मागण्यासाठी सरकारकडे निघाले. वाटेंत मुस्लीम लीगचे लोक आले. ते मुसलमानांस म्हणाले, '' हिंदुबरोबर तुम्ही कां जाता? '' हिंदुमहासभेचे लोक आले व हिंदूंस म्हणाले, '' त्या मुसलमानांबरोबर तुम्ही कां जाता? '' परंतु ते हिंदुमुसलमान शेतकरी म्हणाले, '' आम्ही हिंदु नाहीं, आम्ही मुसलमान नाहीं, आम्ही श्रमजीव आहोंत. आणि हिंदु असो, मुसलमान असो; जमीनदार आम्हांला पिळून काढीत आहेत. '' जा तुम्ही. धर्माच्या नांवानें कांही दिवस जनता भुलेल, परंतु ती एक दिवस शहाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गुंड म्हणजे मुसलमानच असतात असें नाहीं. छळणारे सारे गुंडच. हिंसा नानाप्रकारे जगांत चालू आहे. कोणी तरवारीनें मान कापतो, कोणी लेखणींनें कापतो. कोणी एकदम गोळी घालतो, कोणी तीळतीळ मारतो. आपणांस प्रत्यक्ष सोटयाची, प्रत्यक्ष सु-या-खंजिरांची हिंसा दिसते. परंतु ती हिंसा इतर अप्रत्यक्ष हिंसेच्या मानानें अल्प आहे. कोटयवधि कुटुंबात सुख नाहीं, अन्न नाहीं, वस्त्र नाहीं, औषध नाहीं, ज्ञान नाही, अंथरूण नाहीं, पांघरूण नाहीं, घरदार नाहीं, हे विराट दु:ख का मुसलमान गुंडांनीं निर्माण केले आहे? श्रमणा-या जनतेची जगभर चालणारी विटंबना कोणी केली, कोणी चालविली? वसंता.... तूं ही जगभर चालणारी विटंबना पहा. हिंदुस्थानातील गरिबांची विटंबना जगतांत सर्वत्र चाललेल्या गरिबांच्या विटंबनेशीं जोडलेली आहे, हें ध्यानात धर.एखादा आडदांड मनुष्य रस्त्यांत जर जाणारा-येणा-यांस कोपरखळी मारूं लागला तर आपण त्याला गुंड म्हणतों. त्याला कदाचित् तुरुंगांतहि पाठवूं. मग पैशाच्या नांवावर, पैशावर आधारावर गरिबांना जे छळतात, त्यांना कां तुरुंगांत पाठवूं नये? शारीरिक शत्त्कीचादुरुपयोग करणारा ज्याप्रमाणे गुंड व पुंड ठरतो, त्याप्रमाणें आर्थिक सत्तेचा दुरुपयोग करणाराहि गुंड व पुंड समजला गेला पाहिजे. परंतु ही आर्थिक पुंडगिरी अद्याप जगाला, भोळया जनतेला कळायची आहे.हिंदुस्थानांत जे कांही मुसलमानांचे अत्याचार होत असतील, त्यापेक्षां हे सत्ता व मत्तावाल्यांचे अत्याचार सहस्त्रपटीनें सर्वत्र होत आहेत. काँग्रेस हळूहळूं का होईना, या अत्याचारांस आळा घालण्यासाठी झटत आहे. आणि म्हणूनच तिच्यावर सर्व श्रेष्ठांचा व वरिष्ठांचा राग आहे. मुस्लिम लीगचा व हिंदुमहासभावाल्यांचा दोघांचा राग काँग्रेसवर आहे. कारण ती हळूहळू परंतु निश्चितपणें सर्व गरिबांची बाजू घेऊन उठणार आहे. मग छत्रीचे नबाब व हिंदुनबाब दोघे तिच्याविरुध्द ओरडणार नाहींत तरच आश्चर्य. हिंदु रावराजे व मुस्लिम नबाबजादे सारे गरीबांची बाजू घेणा-या काँग्रेसवर उठतील.
पण हिंदुमहासभा किंवा मुस्लिम लीग यांचे पुढारी मी सोडूनच देतों. जातीयवादाचा फायदा घेऊन स्वत:चा वर्गीय स्वार्थ साधण्याकरतांच ते सिध्द झाले आहेत. पण आमच्या राष्टवाद्यांनाहि काँग्रेसवाल्यांनाहि या प्रश्राचे खरें स्वरुप समजलें नाहीं. पाया सोडून वरच्या रंगीत इमारतीकडें पाहून ते आपली अनुमानें बांधीत आहेत असें वाटतें. हिंदु-मुसलमानांची एकी ही सांस्कृतिक दृष्टया भिन्न असलेल्या जमातींचीं एकी आहे. केवळ दोन जमातींमधील साम्यविरोधांची तराजू जोखून हा प्रश्न सुटणार नाही. ह्या दोन जमातींची एकी व्हावयाची असेल तर जातीयवादाचा फायदा घेऊन वर्गहित साधणा-या पुढा-याचें स्थान समाजांतून नष्ट झालें पाहिजे. तें स्थान समाजवादी क्रांतीशिवाय नष्ट होणं शक्य नाही. एकजिनसी संस्कृति निर्माण व्हावयाची असेल तर एकजिनसी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. जळगांवच्या शेतकरी परिषदेला हजारो मुसलमान शेतकरी आले होते. हिंदु शेतक-यांबरोबर असलेलें त्यांचें आर्थिक एकजिनसी नातें त्यांना कळलें, पण काँग्रेसचा राष्ट्रवाद त्यांना कळत नाही. हयाचा अर्थ मुसलमान शेतकरी जातीयवादी आहेत असा का तूं करणार? पण काँग्रेसचा राष्ट्रवाद म्हणजे आपल्या आर्थिक झगडयांचें तत्वज्ञान आहे हें त्यांना कळत नाही. आणि नाहींहि कळणार कदाचित् कारण काँग्रेसहि बहुजनसमाजाच्या आर्थिक प्रश्राकडे इतक्या आत्मीयतनें अद्याप कोठें पहात आहे? परंतु अधिक पुढील पत्रीं. सर्वांस सप्रेम प्रणाम व आशीर्वाद.
तुझा श्याम