Krushnbhakt in Marathi Magazine by Sadhana v. kaspate books and stories PDF | कृष्णभक्त

Featured Books
Categories
Share

कृष्णभक्त

कृष्णभक्त

शितल पुण्यात जाँब करणारी लातुरची एक सामान्य मुलगी. सायंकाळचे ७ वाजले होते , ती अजुनही आँफीस मध्येच होती.

रविवारी ट्रेक्रिंग ला जाण्याचा प्लँन बनवत होती. तेवढयात घरचा फोन आला. ' बेटा उद्या एक स्थळ येणार आहे. तु ९ च्या गाडीने निघ...' वडील बोलले. अचानक रिझर्वेशन मिळण अशक्य होतं. त्यामुळे महामंडळाच्या बसने ती निघाली. बसला प्रंचंड गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती . राञभर तिला उभं राहुन जावे लागले. बसमध्ये अनेक विचार तिच्या मनात पिंगा घालत होते. आजपर्यंत प्रत्येक स्थळाकडुन नकारच येत होता. कारण , ती खुप जाड आणि सावळी होती. वयही वाढल होतं. 28 वर्षाची झाली होती ती. यावेळी तरी जमावं अशी आशा ती मनातल्या मनात करत होती. शेवटी राञभर ञासदायक प्रवास सहन करुन ती सकाळी ५ ला घरी पोहचली. प्रचंड थकली होती. राञभर उभी असल्यामुळे पाय प्रचंड दुखत होते. दोन तासांची अपुर्ण झोप घेवुन ती उठली आणि आवरायला सुरुवात केली. ९ वाजले होते. पाहुणे अचानक न कळवता १ तास आधीच आले. तयारी अजुन बाकी होती. शितलच्या घरच्यांची एकच गडबड उडाली. तरीही त्यांनी सर्वांचे हसुन , मनापासुन स्वागत केले. पाहुण्यांमध्ये मुलगा , आई - वडिल , दोन बहीणी , मावशी , आत्या आणि मध्यस्थी एवढी माणस आली होती. शितल तयार होतच होती. तर मुलाची आई मुद्दाम घाई करु लागली. जशी आहे तशी दाखवा. मेकअप करु नका. खुप आग्रह केल्यामुळे शितल साडी घालून , मेकअप न करताच आली.

पाय दुखत असल्यामुळे , ती खुप हळुवार चालत आली. मुलाच्या आई - वडिलांना शंका आली. कसलाही विचार न करता ते म्हणाले , ' पायात काही प्राब्लेम आहे का ? ' शितल ला आणि तिच्या आई वडिलांना खुप वाईट वाटल आणि खटकलं ही. शितलच्या वडिलांनी , तिचे पाय दुखण्याच खर कारण सांगितल . तरी त्याँच्या मनातली शंका जात नव्हती. बरीच प्रश्नांची सरबत्ती झाली. मुलाची आई नाक वाकड करित , शितलच्या वडिलांना म्हणाली ,' मुलगी जरा जाडच आहे. रंग पण सावळा आहे. थोडे डाग पण आहेत चेहऱ्यावर , पायाचा पण डाऊट येतोय. एकदा ड्रेसवर दाखवा. ' कुठल्याही मुलीच्या बापाला वाईट वाटेल अशीच ही वाक्य होती. शितलच्या वडीलांनाही खुप वाईट वाटलं. शितलला खुप राग आला होता. पण तिने स्वतः चा राग आवरला. आणि परत ड्रेस घालून त्यांच्या समोर आली. मुलाच्या आईने बोलायला सुरुवात केली , ' आमचे कुटुंब कृष्ण भक्तीत तल्लीन आहे. आम्हाला खाल्लेल पिलेल ( मासांहार , दारु )चालत नाही. गळ्यात तुळशीची माळ घालावी लागेल. जेव्हा जेव्हा टाँयलेट ला जाल तेव्हा अंघोळ करावीच लागेल. मी स्वतः रोज ५ तास पुजा करण्यासाठी लावते. आम्ही जे काही बनवतो ते आधी कृष्णाला दाखवतो. आणि मग आम्ही खातो. लहान मुलांना सुद्धा देत नाही. रोज पुजा करावी लागेल. रविवारी इस्काँन टेँमपल ला जाव लागेल आणि बरच काही ... आणि हो लग्नापर्यंत तुला वजन कमी कराव लागेल. डागांसाठी ट्रिटमेँट घेवुन चेहरा क्लीन करावा लागेल. करशील ना ? त्यावर शितलने नजर मुलाकडे फिरवली. मुलगा तिच्यापेक्षा डबल जाड, काळा आणि दिसायला विद्रुप , पण रुबाब राजा सारखा. शितलने मुलाच्या आईकडे बघुन बोलायला सुरुवात केली. ' मी देव मुर्तीत नाही माणसात शोधते. ५ तास पुजा करण्यापेक्षा मी एखाद्या गरजुला ५ तासांची मदत करेल. त्यामुळे कमीत कमी त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडण्याची किंवा बदलण्याची मी खाञी देवु शकते. पण देवळात जावुन काही होणार नाही. वेळ वाया जाईल. आणि देवाला नैवेद्य दाखवण्याऐवजी एखाद्या भुकेल्याला मी पोटभर खावू घालेन. कारण त्यावेळी ती भुकेली व्यक्ती माझ्यासाठी कृष्णच असेल. ज्या व्यक्तीला मदत करेल ती सुद्धा कृष्णच असेल. किंवा मी कोणाकडुन मदत घेतली तर मदत करणारी ती व्यक्ती सुद्धा माझ्यासाठीच कृष्णच असेल. कारण सृष्टी च्या कणा कणात कृष्ण आहे.

आणि स्पष्ट च बोलते , मला नाही वाटत की तुम्ही खरे कृष्णभक्त आहात. कारण कृष्णाने गितेत सांगितलय , ' देह म्हणजे एक वस्ञ आहे. आत्मा अमर आहे.आत्मा एकच असतो . तो प्रत्येकवेळी शरीर/देह बदलतो. देहाला वस्ञाची उपमा दिली आहे. आणि तुम्ही माझ्या वस्ञासमान देहाला एवढी नाव ठेवताय. जाड आहे ... पिंपल्स आहेत, डाग आहेत. सावळी आहे...

कृष्ण स्वतः सावळा होता. त्याच्या सावळ्या रंगावर सार्या जगाने प्रेम केलं.. आणि तुम्ही मला सावळी म्हणत आहात. खर्या अर्थांने कृष्ण तुम्हाला समजलेलाच नाहीये . आणि हो स्वतःच्या मुलाकडे एकदा बघितल असत तर कदाचित मला नाव ठेवली नसतीत. लग्नापर्यंत वजन कमी कर. चेहरा चमकव म्हणजे तुम्हाला मी व्यक्ती म्हणुन महत्त्वाची वाटत नाही तर वस्तू म्हणुन शोभेकरीता फिरवायला हवी आहे , महत्त्वाची आहे. आणि जिथे मला शोभेची बाहुली बनवुन फिरवले जाईल.. तिथे जायला कधिच आवडणार नाही. जास्त बोलले असेल तर माफ करा... मी फक्त माझ मत मांडलय. ' एवढ बोलुन ती दुसऱ्या खोलीत नीघुन गेली. पाहुण्यांच्या माना शरमेने झुकलेल्या आणि रागाने चेहरे लाल झाले होते. आई वडील खुशही होते आणि दुखीही. मिञांनो तुम्हीच सांगा खरा कृष्णभक्त कोण ? कोणाला खरा कृष्ण समजला होता ?

( मी कृष्णभक्तांच्या विरोधात नाही. सत्यघटने वरुन प्रेरित होवून मी हा लेख लिहीला आहे.)