Zero in Marathi Film Reviews by Anuja Kulkarni books and stories PDF | झिरो...

Featured Books
Categories
Share

झिरो...

झिरो...

बहुचर्चित झिरो ह्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते आणि २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'झिरो'विषयी प्रेक्षकांची उत्सुकता कायम कशी राहील याची काळजी शाहरुख खान घेताना दिसतोय. त्याची यात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात सलमाननं पाहुणा कलाकार म्हणून एक गाणं केलंय. या सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचं कळतं. ती दृश्यं करिष्मा कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत चित्रीत केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच हे चित्रीकरण झालं होतं. हा श्री देवींचा शेवटचा चित्रपट मनाला जातो यामुळे श्रीदेवीचे चाहते नक्कीच हा चित्रपट मिस करणार नाही. काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

'झिरो' मधला स्वत:चा पहिला लूक शाहरुखने काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित केला होता. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. शारीरिक व्यंगाकडे दुर्लक्ष करत आयुष्य एका वेगळ्या प्रकारे जगायला शिकवणारा हा चित्रपट असणार आहे. यात शाहरुख एका बुटक्या व्यक्तींची भूमिका साकारत आहे. वयाची ३० ओलांडली तरी बऊआचे लग्न होत नाही अखेर त्याला मनासारखी जोडीदार अनुष्काच्या रुपाने मिळते. पण नियतीला ते मंजूर नसते आणि अशाताच या बऊआची भेट सुपरस्टारशी म्हणजेच कतरिनाशी होते आणि त्याचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचते, या कथानकावर आधारित हा चित्रपट असणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर प्रदर्शित आणि या ट्रेलरला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळाल्याच दृश्य होत. या चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या ४ दिवसांत १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्ह्यूजमुळे 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान', 'रेस ३' आणि 'बाहुबली २' यांसारख्या चित्रपटांच्या ट्रेलरचे रेकॉर्ड तोडले आहेत. 'झिरो'च्या ट्रेलरला २४ तासांत ५.४ कोटी व्ह्यूज मिळाले होते. कथानक वेगळ आहे. किंग खान आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न करतांना दिसतो आणि झिरो ह्या चित्रपटात किंग खानचा अभिनय पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

काहीतरी वेगळ करण्याचा कलाकारांचा नेहमीच प्रयत्न असतो. शाहरुख खानचा वाढदिवस २ नोव्हेंबरला असतो. त्या दिवशी 'झिरो' च्या टीमने चित्रपटातील बऊआ सिंह या व्यक्तिरेखेचं सोशल मीडियावर अकाऊंट सुरू केलं आहे. शाहरुख 'झिरो'मध्ये बऊआची व्यक्तिरेखा साकारत आहे. १६ डिसेंबरपासूनच झिरो ह्या चित्रपटाच आगाऊ बुकिंग सुरू झाल. या सिनेमातील बऊआ सिंह या व्यक्तिरेखचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून शाहरुखने ही अॅडव्हान्स बुकिंग सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. ' न हम स्वीट है, न क्यूट है' हा डायलॉग ह्या चित्रपटाच खास आकर्षण आहे. आतापर्यंत कधी न पाहिलेल्या अंदाजात शाहरुख या चित्रपटात पाहायला मिळतो आहे. 'झिरो' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असून उंचीनं लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. आणि ह्या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. ह्याचबरोबर, दिग्दर्शक आनंद एल राय यांनी झिरो या चित्रपटाच्या शूटींगसाठी मुंबईत मेरठ शहर उभारले होते. त्यासाठी त्यांनी मेरठ शहरातून 300 कामगारांना मुंबईत आणले होते. या कामगारांनी तयार केलेला सेट हा अगदी खराखुरा वाटावा म्हणून राय यांनी स्वत: सेटच्या तयारीकडे लक्ष दिले होते. झिरोसाठी फिल्मसिटीत एक मोठा सेट उभारण्यात आला होता. त्यात मेरठमधील प्रसिद्ध घंटाघर, मेरठमधील वेगेवगळ्या वास्तू उभारण्यात आल्या होत्या.

चित्रपटाची कथा-

मेरठमध्ये राहणारा बऊआ सिंग म्हणजेच शाहरुख शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलाय. व्यंग म्हणजे त्याची उंची! पण याचं दु:ख करत बसणाऱ्यापैकी तो नाही. मित्रांसोबत टावाळक्या करणं, वडिलांच्या जीवावर मज्जा करणं आणि त्याची सर्वात आवडती अभिनेत्री बबिता कुमारी (कतरिना कैफ)सोबत रोमान्स करण्याची स्वप्न रंगवणं यात ३८ वर्षांचा बऊआचं आयुष्य छान जात असतं. सारं काही सुरळीत सुरू असताना चांगल्या मुलीशी लग्न करुन संसार थाटण्याचं भूतही ४ फूट २ इंच बऊआच्या डोक्यात थैमान घालू लागतं.

कित्येक मुलींना नकार दिल्यानंतर बऊला एक मुलगी आवडते. ही मुलगी म्हणजे दिव्यांग पण अत्यंत हुशार संशोधक आफिया (अनुष्का). जेमतेम दहावीपर्यंतही न शिकलेल्या बऊआला आपला जीवनसाथी म्हणून निवडण्यात आफियाला काडीमात्र रस नसतो. पण अत्यंत फिल्मी स्टाईलनं बऊआ तिच्या हृदयात जागा मिळवण्यास यशस्वी होतो. कोणीतरी खोटी साहनभूती न दाखवता आपल्यावर खरंच प्रेम करतंय ही भावना हुशार आफियाला सुखावून जात असते आणि म्हणून ती बऊआशी लग्न करण्यास होकारही देते. तेव्हाच बऊआच्या जीवनात आणखी एक नाट्यमय घटना घडते. जिच्यासाठी बऊआ ठार वेडा असतो अशा बबिताचा बऊआच्या आयुष्यात प्रवेश होतो. आणि प्रेमाचा त्रिकोण चालू होतो. प्रेमभंगाच्या दु:खात बुडालेली अभिनेत्री बबिता मेरठमध्ये प्रमोशनसाठी येते, तिच्या गाडीचा बऊआ पाठलाग करतो. मागे येणाऱ्या बऊआला मद्यधुंद अवस्थेत असलेली बबिता पाहते, गाडी थांबवते आणि त्याचं चुंबनही घेते. अतिशय नाट्यमय अशी ही दृश्ये आहेत. बऊआसाठी या साऱ्या गोष्टी अकल्पनीयच असतात. लग्नाच्या एक दिवस आधी या साऱ्या गोष्टी घडतात. या घटनेनं आफियाशी लग्न करण्याचा त्याचा विचार क्षणार्धात बदलतो. ‘आपलं आयुष्य कोकिळेसारखं आहे, जिला फक्त स्वच्छंदी जगणं माहिती आहे. घरटं थाटण्याचं पिल्लांचं संगोपन करण्याचं स्वप्न तिचं नसतं तसंच काही आपलंही आहे’, असं आफियाला सांगत बऊआ लग्नमंडपातून पळून जातो. अशी ही पूर्वार्धातली कथा. यातला बऊआ आपल्या अभिनयानं मन जिंकायला यशस्वी होतो. किंग खान उत्तम अभिनेता आहे ह्यात कोणालाही शंका नाही. आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न करणारी आणि त्यासाठी विशेष मेहनत घेणारी अनुष्काही थेट हृदयाला भिडते. पण अचानक दिलेल्या वळणामुळे मात्र या सगळ्यात चित्रपटाचं कथानक मात्र पूर्णपणे हरवून जातं.

बऊआची गोष्ट घेऊन सुरू झालेला हा चित्रपट उत्तरार्ध सुरू होताच रटाळपणाची वाट धरतो. बऊआ मेरठहून बबिताची भेट घेण्यासाठी मुंबईत येतो. त्या एवढ्याश्या पण सर्वांहून वेगळ्या असलेल्या बऊआला मनोरंजनासाठी बबिता ठेवून घेते, मात्र बोट दिलं की हात पकडायला जाणाऱ्या बऊआची वृत्ती पाहून बबिता त्याला आपल्या आयुष्यातून हाकलवून देते आणि इथेच बऊआला जाणीव होते खऱ्या प्रेमाची. आफियावरच्या प्रेमाची. मग काय बऊआ मुंबईवरुन थेट अमेरिका गाठतो. तिथे आफिया मंगळ मोहिमेच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असते. बऊआ पुन्हा फिल्मी स्टाईलनं तिला पटवण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रेमभंगाची जखम ताजी असलेली आफिया त्याला उभंही करत नाही. तिथेच काही नवीन गोष्टी बऊआ ला समजतात आणि त्याच आयुष्य बदलत.. मग तिच्याच मंगळयान मोहिमेत स्वत:चं योगदान देण्याचं दहावीही न शिकलेला बऊआ ठरवतो. अत्यंत प्रतिष्ठित अंतराळ संस्थेत बऊआ जातो, तिथल्या सगळ्या चाचण्या यशस्वी पार पाडतो आणि मंगळावर जायलाही सज्ज होतो. प्रेमापासून सुरू झालेली बऊआची गोष्ट मंगळावर कधी जाऊनही पोहोचते हेच कळत नाही. काही गोष्टी पचनी पडत नाहीत पण चित्रपट मनोरंजासाठी असतात ही गोष्ट लक्षात ठेवण गरजेच असत. चित्रपटाच्या शेवटी आपण बुचकळ्यात पडू शकतो. कथा थोडी भरकटल्यासारखी वाटू शकते. पण उत्तम अभिनय ही चित्रपटातल्या कलाकारांची जमेची बाजू आहे. फक्त मनोरंजणासाठी हा चित्रपट बघायचा असेल तर चित्रपट पाहतांना कंटाळा नक्की येणार नाही. आणि तुम्ही किंग खानचे चाहते असाल तर हा चित्रपट पाहतांना नक्कीच मजा येईल. काही चाहत्यांचा हा चित्रपट पाहून हिरमोड देखील होऊ शकतो. पण एकूणच, उत्तम काम आणि उत्तम कलाकार हे पाहण महत्वाच असत.

ह्या चित्रपटाला संगीत अजय-अतुल ह्यांनी दिल आहे. आणि मनोरंजनासाठी हा चित्रपट एकदा पाहू शकतो. 'झिरो' या चित्रपटाकडून शाहरुखला मोठ्या अपेक्षा आहेत. अलीकडच्या काळात शाहरूखच्या चित्रपटांना फार यश मिळवता आले नाही. त्यामुळे झिरोद्वारे यशस्वी कमबॅक करण्याचा शाहरुखचा इरादा आहे. आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहन औत्सुक्याच ठरणार आहे.

सिनेमा : झिरो

दिग्दर्शक : आनंद एल.राय

निर्माते : गौरी खान

मुख्य भूमिका : शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ

संगीत दिग्दर्शन : अजय-अतुल, तनिष्क बागची