A Heavy Prize - A Mr. Wagh Story - 2 in Marathi Fiction Stories by Suraj Gatade books and stories PDF | अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 2

Featured Books
Categories
Share

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 2

माऊसर फायर्ड्


  
                  बाबाराव देसाई यांची डेडबॉडी उद्यानात पडली होती. पोलिसांचा पंचनामा चालू होता. इतक्यात तिथे मिस्टर वाघ आला. नेहमी सारख्या त्याला आवडणाऱ्या पोशाखात. हायली डेलिगेटेड् केस असल्याने इन्वेस्टीगेशनच्या पहिल्याच टप्प्यात कमिशनरनी मिस्टर वाघला पाचारण केले होते. उद्यानाबाहेर भली मोठी गर्दी जमली होती. मिस्टर वाघ डेडबॉडीची पाहणी करू लागला...
"काल रात्री खूप मोठा आवाज इथल्या लोकांनी ऐकल्याचे सांगितलंय. पण कोणी लक्ष दिले नव्हते. सकाळी पार्कमध्ये फिरायला येणाऱ्या लोकांनी ही डेडबॉडी पहिली आणि आम्हाला कळवलं..." एरिया इंचार्ज मिस्टर वाघला सांगत होता.
मिस्टर वाघ मात्र त्याच्याकडे लक्ष न देता स्वतःच्याच कामात व्यग्र होता...
                बाबाराव यांच्या पाठीत कुणी तरी गोळी घातली होती. बरेच रक्त गेले होते आणि ते बऱ्यापैकी गोठलेले होते. साहजिक दिसत होते, की खून होऊन बराच वेळ झाला होता. 
"सकाळचे ७:१३ झालेत. रात्री ११ - ११:३० च्या दरम्यान खून झाला असावा. वेपेन सापडले?" मिस्टर वाघने रिस्ट वॉच पाहत तेथील इंचार्जला विचारले. 
"नाही. शोध चालू आहे. पण शक्यता कमी आहे." पोलिसाने माहिती पुरवली. 
"कशावरून?"
"डॉग स्कॉड २ तास झाले शोध घेताहेत, पण अजून यश नाही."
"ओके!" आणि वाघने गालातल्या गालात कोणाला कळू नये असे स्मित केले. 
"बॉडी हलवा!" तेथून निघून जात मिस्टर वाघने सर्वांना जवळ - जवळ ऑर्डरच दिली. 
                 झालं! बाबारावांची डेडबॉडी अटॉप्सीसाठी पाठवून देण्यात आली. मिस्टर वाघ आला काय आणि निघून गेला काय? सगळेच चक्रावून गेले होते. 

                 
                 दुसऱ्या दिवशी अटॉप्सीचा रिपोर्ट आला. वाघाला कमिशनरनी त्याच्या हेडकॉर्टरवरच बोलवून घेतले. तिथे अटॉप्सी ऑबजर्वर फिजिशियन, पॅथलॉजिस्ट ज्याने एक्च्युअली अटॉप्सी केली, व ही केस हँडल करणारे काही ऑफिसर्स उपस्थित होते. 
                वाघ केबिन मध्ये आला व कमिशनरने बसण्यास सांगण्याची वाट न पाहता त्याच्यासाठी रिकामी ठेवण्यात आलेल्या खुर्चीचा ताबा घेतला. 
"७.६३×२५ एमएमची माऊसर कार्टेज त्यांच्या स्पाईनल कॉर्डच्या लंबर व्हर्टिब्रेला छेदून गेली आहे." वाघ अटॉप्सी रिपोर्ट नजरेखालून घालत असताना कमिशनर त्याला सारांश सांगत होते.
"माऊसर! हं?!"
"हो. घावावरून लक्षात येते, की गोळी खूप जवळून मारली आहे. फ्रॉम झिरो डिस्टन्स. म्हणूनच शरीरात गोळी सापडली नाही. क्राईम सीनवर शोध चालू आहे. स्पाईनल कॉर्ड इज व्हेरी वाईटल बॉडी पार्ट. ब्रेन आणि स्पाईनल कॉर्ड मिळूनच तर सेंट्रल नर्व्हस सिस्टीम बनते. यामुळेच तर आपले बॉडी फंक्शन चालते. शंका नाही, की त्यांचा जागीच मृत्यू झाला असेल."
"माऊसर... इतकी जुनी पिस्टल आत्ता कोण वापरत असेल?" केसवर काम करणाऱ्या इन्वेस्टीगेशन टीम मधील एकाने प्रश्न केला?
      यावर वाघ नुसताच हसला. नकळतच. म्हणाला,
"लंबर व्हर्टिब्रे म्हणजे रिब केज व पेल्विसला जोडणारे पाच व्हर्टिब्रे होय ना?"
"होय." तिथे असणारा अटॉप्सीचा ऑबजर्वर फिजिशियन उत्तरला,
"लास्टच्या एल फाईव्ह म्हणजे पेल्विस जवळच्या व्हर्टिब्राला गोळी लागली आहे. व्हर्टिब्राचा इंटेरिअर, पोस्टेरीयर आणि रेक्टम खूपच डॅमेज झाले आहे. आतडीही फाटली आहेत." एक्सरेवर पॉईंट करून फिजिशियन म्हणाला.
"गोळीची रेंज काय" कमिशनरने प्रश्न केला.
"झिरो डिस्टन्स आहे म्हंटल्यावर सरळ रेषेतच असणार. नाही." मिस्टर वाघने रिपोर्ट मधून वर न बघताच बोलून टाकले.
"हो." फिजिशियननी दुजोरा दिला.
"यावरून एक गोष्ट तरी नक्की लक्षात येते, की कल्प्रिट बाबारावांपेक्षा पाच - सहा इंच तरी उंच असणार. शिवाय त्यांच्या ओळखीचा असण्याचीही शक्यताही आहे." वाघने आपला अंदाज वर्तवला.
"तो माणूस ओळखीचाच असेल असे काही जरुरीचे नाही. काहीतरी कारण काढून किंवा कशाची तरी भीती घालून, ब्लॅकमेल करून अशा बऱ्याचशा कारणांनी अनोळखी व्यक्ती भेटायला बोलवू शकतोच की. बाबाराव देसाई फ्रीडम फायटर आणि सक्रिय समाजसेवक होते. यामुळे त्यांचे खूप लोकांशी संबंधही यायचे. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही."
       नवखा ऑफिसर मध्येच बोलून गेला तसा मिस्टर वाघने त्याला एक जळजळीत कटाक्ष टाकला. मिस्टर वाघचे म्हणणे धुडकावण्याची हिंमत कोणी करत नाही, जरी ते कोणाला पटले नाही तरी. आणि हे या नवीन ऑफिसरला माहीत नव्हते. मिस्टर वाघचे त्याच्याकडे असे पाहणे कमिशनरच्या लक्षात आले आणि त्याने दटावून त्या ऑफिसरला गप्प केले.
"नवीन खाडे, जरा शांत बसा. मिस्टर विजय वाघ कधीच चुकत नाहीत." 
"पण सर मी फक्त त्यांच्या तर्कांतील कमजोर दुवा सांगितला. बाबाराव देसाई स्वातंत्र्य सेनानी व समाजसेवक जरी नसते, एक साधारण व्यक्ती असते, तरी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने भेटायला बोलावणे इतके काही अवघड नाही..."
"खाडे! विल यू शट अप?" कमिशनर त्याच्यावर ओरडले.
"नाही कमिशनर. त्याचे म्हणणे इतकेही चुकीचे नाही." 
"पण मिस्टर खाडे," वाघाने आपला मोर्चा नवीन खाडेकडे वळवला,
"एक लक्षात घ्या, खुन्याने बाबाराव देसाईंचा खून केलाय याचा अर्थ त्याचा यामागे काही तरी मोटिव्ह असणार. आणि जिथे मोटिव्ह आहे तिथे यांचा कधी न कधी संबंध आलाच असणार. नाही? रँडम्ली खुनी असा कोणालाही मारणार नाही ना! आणि तुम्ही म्हणताय तसा तो खुनी अनोळखी असेल, तर देसाई त्याच्याकडे पाठ करून का उभे राहतील. त्यांची ही क्रिया हे दर्शवते, की ते भेटायला गेलेल्या व्यक्तीसोबत त्यांचे अगदीच सहज व मोकळे ढाकळे संबंध होते. आणि एक, की अटॉप्सी रिपोर्टमध्ये त्यांची खुन्याशी हातापाई झाल्याची काहीच नोंद नाही. त्यांच्या शरीरावर इतर कोणतीही जखम नाही. ना त्यांना खाली पाडून गोळी घालण्यात आली आहे. इट प्रुव्हज् दॅट ते ओळखीच्याच माणसाला भेटले होते." मिस्टर वाघने एक्सप्लेन केले. 
"डिटेल्स?" मिस्टर वाघने कमिशनरला विचारले. 
"वय ब्यान्नव वर्षे. उंची पाच फूट सात इंच. ब्रिटिश सरकार विरुद्ध वयाच्या सतरा - अठराव्या वर्षीच त्यांनी सशत्र लढा चालू केला होता. १९४१ मध्ये ब्रिटिश जनरल ऑगस्टस याचा त्यांनी एकट्यानेच खून केला होता. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि स्वातंत्र्यानंतरच त्यांना भारत सरकार कडून सन्मानाने मुक्त करण्यात आले. या पूर्वी पंधरा वर्षांचे असताना त्यांनी काही बंदुका स्वातंत्र्य सैनिकांना पोहोचवण्याचे काम करताना ते पकडले गेले होते आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण ज्यावेळी त्यांना अंदमानला नेले जात होते, त्यावेळी त्यांनी कसे बसे आपली सुटका करून घेतली व ते भूमिगत झाले. पुढे दोन वर्षांनी त्यांनी जनरल ऑगस्टसला ठार केले. तुम्हाला माहीत आहे त्यासाठी त्यांनी कोणते हत्यार वापरले असेल?"
          वाघने नकारार्थी मान हलवली. 
"ब्रूमहँडल. माऊसर सी नाइन्टी सिक्स! स्ट्रेंज! इज्नट इट?!"
"येस इट इज!" वाघने दुजोरा दिला.
"म्हणजे तशीच पिस्टल ज्याने त्यांचा खून झाला?" ऑफिसरने आश्चर्याने विचारले.
"हो!" फिजिशयनने पुष्टी केली. 
"आणि विशेष म्हणजे बाबारावांना अटक झाली, तरी त्यांनी ऑगस्टसला मारण्यासाठी वापरलेली माऊसर सापडली नव्हती." 
"पण एक गोष्ट अनाकलनीय आहे. बाबाराव देसाई यांचा गुन्हा इतका मोठा असून देखील ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी कशी दिली नाही." नवीनची उत्सुकता चाळवली होती. त्याने प्रश्न केला. 
"बाबाराव यांचे वडील श्यामसुंदर हे स्टीलचे मोठे व्यापारी होते. त्यांनी आपल्या मुलाच्या बदल्यात आपली सारी संपत्ती क्वीन एलिझाबेथच्या नांवे केली होती आणि शिवाय व्हाइस्राय अँगसला त्यातील काही हिस्सा देऊन क्वीनला समजवण्याबद्दल गळ घातली होती. दुसरे महायुद्ध चालू होते. हत्यारांसाठी मोठ्या प्रमाणात स्टील लागणारच होते. क्वीनने त्यांचे म्हणणे मान्य केले, पण बाबारावांना मुक्त न करता त्यांनी आजन्म कारावासात त्यांना टाकले. दुसरे महायुद्ध चालू असल्यामुळे बाबारावांना सोडून देणे ब्रिटिश सरकारला श्रेयस्कर नव्हते. ब्रिटिशांबद्दलची भीती लोकांमधून नष्ट होण्याची शक्यता होती. म्हणून कडक नजरकैदेत त्यांना बंद करण्यात आले. आपला मुलगा किमान जीवंत तरी आहे म्हणून मग श्यामसुंदरही तेवढ्यावरच समाधान मानून गप्प बसले. सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र झाल्यावर ते नजर कैदेतून मुक्त झाले." मिस्टर वाघने एक्सटेन्सिव्ह माहिती पुरवली. आणि उठून उभा राहिला,
"ओके. आय एम टेकिंग लिव्ह! बाय!" वाघ कमिशनरच्या केबिन मधून निघून गेला. 
          बाहेर तो एका ओळखीच्या ऑफिसर सोबत बोलत उभारला, पण त्याचे लक्ष आतील सगळ्यांवर होते. आवाज काही येत नव्हता. पण कमिशनरला बोलताना तो पाहू शकत होता. 
          कमिशनर नवख्या ऑफिसरला झापत होते, 
'मूर्खांसारखे मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. ही केस मुख्यमंत्री व गृहमंत्री सीबीआयकडे सोपवणार आहेत. होम मिनिस्ट्री व खुद्द पंतप्रधानही या केसवर लक्ष ठेऊन आहेत. याचा निकाल लागला नाही, तर त्याच्यां खुर्च्या धोक्यात येऊ शकतात. विरोधक टपून बसलेच आहेत. मीडिया पाठ सोडत नाही.  सगळे त्यांच्या अंगाशी आलंय आणि आपल्या गळ्याशी. आल्याला फक्त प्रायमरी इन्वेस्टीगेशन करायचे आहे. काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक समिती इन्वेस्टीगेशनसाठी स्थापन करण्यात येईल. तोपर्यंत आपण काही तरी करून वेळ मारून न्यायचा आहे. वाघला काय करायचे ते करू द्या! मला आपल्या डिपार्टमेंटवर नाकर्तेपणाचा शिक्का नको आहे! जो काही तपास करायचा तो वाघला करू दे. समजलं?'
'म्हणून आपण आपली जबाबदारी सोडून गप्प बसायचे का सर?' नवीनने कमिशनरलाच प्रश्न विचारण्याचे धाडस केले होते. ते पाहून वाघच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. त्याला नवीनची कर्तव्यनिष्ठा आणि त्याचा करारीपणा आवडला होता. 
"गेट आउट!" लालबुंद होऊन कमिशनर ओरडले. तो आवाज मात्र हेड कोर्टरभर घुमला. 
        ते ऐकून मिस्टर वाघ पुन्हा हसला. पण त्याच्या सोबतचा ऑफिसर मात्र मोठ्याने दचकला. 
"चल बाय!" म्हणत मिस्टर वाघने त्याचा निरोप घेतला. 
"बाय!" ऑफिसरही आपल्या कामाला पळाला.