TO VILAKSHAN PRAWAS in Marathi Short Stories by Vinayak Potdar books and stories PDF | तो विलक्षण प्रवास !

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

तो विलक्षण प्रवास !


त्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत होता. सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता. मी जेव्हा मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा तर पाऊस आणखी उग्र झाला होता. पण मला थांबून चालणार नव्हतं. मी ट्रेनच तिकीट ऑलरेडी काढलं होतं. काहीही करून मला १ तासात स्टेशनला पोहोचायला हवंच होतं. उद्या पासून पुन्हा ऑफिस सुरु होणार होतं. ५-६ दिवसांची रजा घेतल्यानंतर पुन्हा एक दिवस रजा मला मिळणारच नव्हती. मग पगारातून पैसे कट झाले असते. इच्छा नसतानादेखील मनाविरुद्ध घरच्यांचा निरोप घेऊन मी सिटी बस स्टॅण्डवर आलो होतो. नेमकं भरीस भर म्हणून सिटी बस चा पण त्या दिवशी संप! किती रिक्षावाल्यांना हात केला तरी एक रिक्षा थांबायचं नाव घेत नव्हती. शेवटी एक रिक्षा थाम्बली. डोंगराएवढे उपकार देवाचे मानत मी रिक्षात शिरलो.

रेल्वे स्टेशनवर पण फारशी गर्दी दिसत नव्हती. पावसामुळं बहुतेक लोकांनी त्यांची तिकीट रद्द केली असावीत. मी ट्रेन सुटायला अगदी जेमतेम १० मिनिट बाकी असताना पोहोचलो होतो. त्यामुळं आधी दिसेल त्या डब्यात शिरलो. मग तिथून पुढे माझ्या कोचचा नम्बर शोधत पुढे निघालो. एस-१० माझा कोच अगदी दुसऱ्या टोकाला होता. त्यामुळं संपूर्ण ट्रेन डब्यांची मुशाफिरी करत करत माझ्या कोच मध्ये पोहोचलो. बघतो तर संपूर्ण कोच रिकामा! हे आश्चर्यच होतं. कारण ट्रेनमध्ये डब्यात प्रवासी नाही असं कधीच होत नाही. एका दृष्टीनं हे मला सुखावणारं वाटलं. चला संपूर्ण डबा एकट्यानं बुक केल्याचं फील घेऊ. हवं तिथं बसू, हवं तिथं झोपू. पण आधी माझा सीट नम्बर मी शोधला. योगायोगानं किंवा नशिबानं मला साईड लोअर बर्थची सीट मिळाली होती. हे झकास झालं.

ट्रेन सुटायची शिट्टी वाजली. आणि ट्रेननं हळूहळू प्लॅटफॉर्म सोडायला सुरुवात केली. तेवढ्यात माझ्या डब्यात कुणीतरी शिरल्यासारखा भास झाला. पावलं माझ्या दिशेने झपझप येत होती.

“ हा एस-१० आहे ना ?” एक २०-२५ वर्षांची तरुणी माझ्या समोर धापा टाकत मला विचारत होती.

“ बरोबर . हा एस-१० च आहे “ मी तिला न्याहाळत म्हणालो. रंग गोरा, उंची माध्यम, बांधेसूद शरीर, सलवार-कुर्ता घातलेली ती नक्कीच सुंदर होती. ट्रेनमधील दिव्यांच्या प्रकाशात ती आणखीच सुंदर दिसत होती किंवा कदाचित बाहेरच्या पावसाळी वातावरणाचा परिणाम असेल त्या क्षणी मला ती खूपच आकर्षक वाटत होती.

“ संपूर्ण डबा रिकामा ? फक्त तुम्हीच आहात का ?” तिनं पुन्हा मला विचारलं.

“ हो. सध्या तरी असंच दिसतंय. तुम्हांला हवं तर तुम्ही टीसी ला सांगून कोच बदलून घेऊ शकता.” मी तिच्या मनातल्या भीतीचा विचार करून म्हटलं.

“ छे ! छे ! मी काही इतकी घाबरट नाही. आणि तुम्ही मला खाणार आहात थोडेच ?” ती हसत म्हणाली.

“ उलट तुम्हालाच माझ्या पासून जपून रहाव लागेल. हा हा हा.”

“ का ? तुम्ही काय हडळ, चेटकीण वैगेरे आहात काय ? मी तुम्हांला घाबरून जायला ? “ मी पण तितक्याच लाइटली तीच बोलणं घेत म्हणालो. इतक्या वेळात तिनं तिची सीट शोधली होती. नेमकी माझ्या बाजूला असलेल्या सीटवरच ती बसली. तिच्या जवळ एकच सुटकेस होती. ती तिनं लोअर बर्थच्या खाली ढकलली.

“ एक तर तुम्ही माझ्या समोर बसा किंवा मी तुमच्या समोरच्या सीटवर बसते. गप्पा मारताना असं सामोरासमोर बसलं की कसं कम्फरटेबल वाटतं.” ती खूपच बोलकी वाटत होती. चला म्हणजे प्रवास कंटाळवाणा होणार नव्हता. माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. तसं प्रत्येकाला असं वाटतं असतंच की एखाद्या सुंदर तरुणीचा सहवास प्रवासात लाभावा. पण खूप कमीजणांना असं भाग्य लाभतं. आज मी त्यापैकी एक ठरलो होतो. नशीब जरा जास्तच मेहेरबान असावं आज माझ्यावर बहुतेक!

“ काय हो ? कुठं हरवलात ?” ती माझ्या समोरच्या सीटवर बसत म्हणाली.

“ नाही. नाही . कुठं काय ? आहे ना इथंच ? “ मी ओशाळत म्हणालो.

“ अहो ते शरीरानं होतात. पण मनानं कुठंतरी भलतीकडेच होतात. बोला खरं की नाही ?” ती हसत हसत म्हणाली.

तिनं जणू माझं मन वाचलं होतं.

“ अं ? नाही म्हणजे घरी फोन करायचा राहून गेला होता तोच विचार करत होतो. “ उगाच काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून मी बोललो.

“ खोटं. साफ खोटं. “ ती म्हणाली. “ मला माहिताय तुम्ही काय विचार करत होतात.”

आता मात्र मला चोरी पकडली गेल्यावर जशी अवस्था होते तसं वाटायला लागलं.

मी काहीच बोलत नाही हे पाहून ती हसायला लागली. “ घाबरू नका. मी अशीच गंमत केली. म्हटलं बघू तुम्ही कसं रिएक्ट करता ते ? पण तुम्ही खरच विचारात पडलात. जणू मी तुमच्या मनातल सारं काही ओळखलं.”

खरं तर नेमकं असच घडलं होतं . तिनं अचूक माझ्या मनातलं ओळखलं होतं.

“ जाऊ द्या सोडा तो विषय. उगाच तुम्हांला उत्तर देणं जड जायचं. एक विचारू का ?”


“हो. विचारा “ मी म्हणालो.

“ मला सांगा तुमचा भुतं खेतं, दुसरं जग, अतींद्रिय शक्ती यावर विश्वास आहे ?”

“ अं ..... नाही पण हॉरर मुव्हीज पाहायला मला आवडतात. टाईमपास म्हणून मी अशा मुव्ही बघतो. बाकी मला प्रत्यक्षात असा अनुभव नाही आला कधी. त्यामुळं माझा विश्वास नाही. तुमचा आहे ?”

“ हो तर. मला अनुभव सुद्धा आलेत.” ट्रेननं वेग पकडला होता तसाच पावसानं देखील आता जोर पकडला होता. विजा देखील चमकायला लागल्या होत्या. ट्रेनच्या आवाजापेक्षाही त्यांचा आवाज मोठा होता. आणि वेळ रात्रीची. त्यात भरीस भर म्हणून ट्रेनच्या डब्यात फक्त दोघेच. वातावरण नाही म्हटलं तरी अस्वस्थ करणारं होतं. आणि आता ही भूत खेताच्या गोष्टी करतेय. छान ! आजची रात्र आणि प्रवास चांगलाच लक्षात राहणार असं दिसतंय.

“ समजा तुम्हांला मी दुसऱ्या दुनियेबद्दल सांगितलं तर ?” ती म्हणाली.

“ आधी तुमचं नाव सांगा. मला तर हे ही माहित नाही की मी कुणाशी बोलतोय.”

“ अरे ? मी अजून तुम्हांला नावच नाही सांगितलं ? मी वीणा लोटलीकर . मूळची गोव्याची. पण आता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कोल्हापूरला आले. आता चाललीय मी माझ्या बहिणीकडे नवी मुंबईला , वाशीला. माझी धाकटी बहीण, स्मिता. लग्नानंतर ती तिकडे स्थायिक झालीय. तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं ?”

“ मी निखिल राजवर्धन. तुम्ही लहानपणापासूनच इतकी बडबड करता ? “

“ हो. मला एक मिनिट पण बोलल्याशिवाय राहवत नाही. सारखी बडबड करत असते. अगदी कुणी नसेल तर मी स्वतःशीच गप्पा मारते. कधी कधी तर भूतांशी पण. “ ती हसत हसत म्हणाली.

“ चला. काहीतरीच काय ? सिनेमा, नाटक, कादंबऱ्या, गोष्टीमध्ये भुतं वैगेरे ठीकाय. पण हे प्रत्यक्ष भूतांशी गप्पा ? छे. मला नाही पटत. “ मी म्हणालो.

“ आणि समजा मी इथल्या इथं तुम्हाला एखाद्या भुताशी ओळख करून दिली, भेटवलं तर ?” आता मात्र ती सिरीयस वाटत होती.

मी हसायला लागलो. “ तुम्ही फॅन्टसी मध्ये जास्त राहता असं दिसतंय. असं घडणं शक्यच नाही.”

“ हे बघा. तुम्ही मला चॅलेंज देताय. मी सिद्ध केलं तर काय पैज ? बोला “ ती हे सारं खूपच सिरीयसली घेतेय असं वाटायला लागलं आता. सरळ सध्या गप्पांनी आता एकदम वेगळंच वळण घेतलं होतं. मी पण यात उतरायचं ठरवलं.

“ हे बघा मिस …. वीणा … तुम्ही म्हणताय तस एक तर घडणं शक्यच नाही. पण जरी असं घडलं तर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे.”

“ हं. बघा हं. नंतर माघार घ्यायची नाही. आताच विचार करा.”

“ केला विचार. मीच जिंकणार मला ठाऊक आहे. आणि जर मी जिंकलो तर ? तुम्ही काय करणार ?”

“ तुम्ही म्हणाल ते. अगदी काहीही. “ तिच्या आवाजात जोश आणि विश्वास दोन्ही दिसत होतं. इतकं विश्वासानं ही कशी बोलू शकते ? मला प्रश्न पडला. पण मग विचार केला. असतात काही हट्टी स्वभावाची माणसं. त्यातलीच ही एक. “ बोला कसं सिद्ध करणार आहात ? मी तयार आहे तुमच्या भूतांना भेटायला. बोलवा त्यांना. “ हे सांगताना मला हसू येत होतं.

“ बोलवायची गरज नाहीय. ती इथंच आहेत. “ ती अगदी शांतपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मी पुन्हा हसायला लागलो. “ अच्छा ? मग मला का दिसत नाहीयत ? की मुहूर्त शोधतायेत माझ्यासमोर प्रगट होण्यासाठी ?

“ त्यांना जेव्हा इच्छा असेल किंवा गरज वाटेल तेव्हाच ती समोर येतात. नाहीतर आपल्या आजूबाजूला लाखो भूतं वावरत असतात. पण आपल्याला कळतं का ? “ ती पुन्हा शांतपणे म्हणाली.

“ तुम्ही त्या वपु काळेंच्या “बदली” कथे सारखं बोलत्ताय . मला नाही पटत. इथं भूत आहेत ? केव्हापासून ? “ मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.

“ अगदी तुम्ही आणि मी या डब्यात आल्यापासून! तुमचा विश्वास बसणार नाही असा. तुम्हांला डेमो दाखवावा लागेल होय ना ?” तुमचं नाव सोडलं तर बाकी काहीही तुम्ही मला सांगितलेलं नाही. करेक्ट ? “

“ होय. अगदी बरोबर. “ मी म्हणालो.

“ तुम्हांला दोन बहिणी आहेत. दोघींचं लग्न झालंय. आई गृहिणी तर बाबा सेवानिवृत्त. यापूर्वी तुम्ही एकदा मरणाच्या दाढेतून परत आला आहात. प्रेमभंगाच्या नैराश्याने तुम्ही स्वतःला संपवायचा प्रयत्न केला होतात. पण योग्य वेळी घरच्यांच्या निदर्शनास आलं आणि तुम्ही बचावलात. त्या नंतर तुम्ही मुंबई गाठली. मनासारखा जॉब मिळाला नाही म्हणून शेवटी तुम्ही मुंबईच्या रेस्टोरंटमध्ये सिंगिंग सुरु केलंत. पण तुमचं मन तुम्हांला खात होतं की बाहेर कुठं या कामाबद्दल सांगू शकत नाही. तुमचं मन क्रियात्मक लेखन आणि अभिनयाकडे धावत होत. आज तुमचं ते स्वप्न पूर्ण झालंय.” ती बोलता बोलता श्वास घ्यायला थांबली. इतक्या कमी वेळात तिनं माझी जणू कुंडलीच वाचून दाखवली होती. मला दरदरून घाम फुटला. तिनं सांगितलेलं अक्षर आणि अक्षर खरं होतं. पण तिला हे सारं कसं कळलं ?

हे जे तिनं सांगितलं ते केवळ आणि केवळ मलाच माहित होतं. मी कुठंही याची वाच्यता केली नव्हती. हे खरं होतं की जॉब न मिळाल्यामुळं मी काही काळ मुंबईच्या हॉटेल्समध्ये सिंगर म्हणून काम केलं होतं. पण हे सांगायची लाज वाटायची मला म्हणून मी कधीच ही गोष्ट कुणाजवळ बोललो नव्हतो.

आता मात्र माझा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. तरी देखील मी तस न दाखवता वरकरणी तिला म्हणालो,” हे … हे तर उत्तम ज्योतिषी पण सांगू शकतो. मी ऐकलंय फेस रिडींग करणार्यांबद्दल. तू पण त्यांच्यापैकी एक असू शकशील. याचा भुताखेतांशी काहीही संबंध दिसत नाही मला. “

“ ओके. अशी एक गोष्ट मी सांगेन जे ज्योतिषी पण सांगू शकत नाही. अगदी उत्तम ज्योतिषी देखील.” ती थोडा वेळ शांत राहिली. मग पुन्हा बोलायला लागली,” आता तुमच्या घरी एका व्यक्तीचा फोन आलाय. तुमचं कोल्हापूरचं घर जे तुम्ही गेले काही महिने विकायचा प्रयत्न करताय, ते घेण्यासाठी इच्छुक असलेली व्यक्ती तुमच्या बाबांशी बोलतेय. त्या व्यक्तीला तुमचं घर आवडलय. आणि १६ लाख किमतीला फायनल मागितलंय. तुम्ही ओएलएक्स वर त्या घराची किंमत १८ लाख सांगितली आहे.या बाबत तुमच्याशी बोलायला तुमचे बाबा तुम्हाला फोन करत आहेत. आता त्यांचा फोन येईल तुम्हांला. “

तिचं बोलणं संपत तोपर्यंत खरंच माझ्या फोनची रिंग वाजली. मी पाहिलं तर खरंच बाबांचा फोन होता. “ अरे गुड न्यूज. आपलं घर पसंत पडलय एका गिऱ्हाईकाला. १६ लाख फायनल म्हणतोय. मी त्याला लगेच होकार नाही दिला. मुलाला विचारून सांगतो असं म्हटलं. “

काही वेळ मला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. “ हॅलो … हॅलो अरे ऐकतोयेस ना ? “ बाबा तिकडून सारखे बोलत होते. “ अं ? हो हो अहो सांगून टाका त्याला बैठकीला या. व्यवहार करून टाकू. “

“ अरे तो पाच लाख आधी देतो आणि बाकी खरेदीपत्र करताना असं बोललाय. देवच पावला बघ. तू असतास तर बरं झालं असतं.” बाबा खूप आनंदात होते. कारणच तसं घडलं होतं. “ ओके बाबा. घर माझ्या नावावर नाही. त्यामुळे माझी गरज भासणार नाही तुम्हांला. तुम्ही व्यवहार करून टाका. मी सकाळी तुम्हाला कॉल करतो. आणि देवाला पेढे ठेवा नक्की. चला बाय.” मी फोन ठेवला. आणि वीणा कडे पहिल. ती गालातल्या गालात हसत होती. तिच्या हसण्यात विजयाचा उन्माद दिसत होता.

अजून मला खात्री नव्हती की यात भुताचा हात आहे म्हणून.

“ हे सगळं तू कस केलंस ?” मी वीणाला विचारलं.

“ मी नाही. माझ्या बाबांनी. “ ती म्हणाली.

“ तुझ्या बाबांनी ? पण ते कुठं आहेत इथं ?” मी विचारलं.

“ तुमच्या शेजारीच.”

मी चमकून माझ्या आजूबाजूला पाहिलं. तिथं कुणीच नव्हतं.

“ माझी फिरकी घेताय ? मी इतका मूर्ख वाटतो का ?”

“ आता इथून पुढे असं काही घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. एका वेगळ्या जगात मी तुम्हांला घेऊन जाईन. तुमची आहे तयारी ? की घाबरलाय ?” ती म्हणाली.

“ मी ? छे ! मी कशाला घाबरू ? उलट मी वाट पाहतोय तुम्ही काय करून दाखवणार आहात असं जगावेगळं ? ज्या मूळ माझा तुमच्या गोष्टींवर विश्वास बसणार आहे ?” मी तिची चेष्टा करण्याच्या सुरात म्हणालो.

तिनं माझा हात हातात घेतला. मी शहारलो. आजपर्यंत असं विचित्र फिलिंग कधी आलं नव्हतं. तिने डोळे मिटले आणि समाधिस्थ झाली. अचानक माझ्या आजूबाजूला जोराचं वारं सुटलं. असं वाटलं की मी कोणत्या तरी वाळवंटात उभा आहे आणि चहुबाजूनी वाळूचे लोट उठतायेत. मला आता ती पण दिसत नव्हती. कुणास ठाऊक अशा अवस्थेत मी किती वेळ होतो, पण हळूहळू सर्व काही शांत झालं. पण आता मी माझ्या कोचमध्ये नव्हतो. माझ्या आजूबाजूला गर्द हिरवी झाडी होती. आम्ही म्हणजे ती मी आणि …. आणखी एक व्यक्ती थोडी वयस्कर आमच्या बाजूलाच काही अंतरावर बसली होती. त्या व्यक्तीच्या अंगावरचा पोशाख राजेशाही थाटातला होता. भरजरी वस्त्र, गळ्यात मोत्यांचा कंठा. एकंदरीत भारदस्त वाटावं असं व्यक्तिमत्व! माझा हात अजूनही वीणाच्या हातात होता. तिने अजूनही डोळे मिटलेले होते. मला कळत नव्हतं की काही वेळापूर्वी ट्रेनच्या कोचमध्ये बसलेला मी आता या अनोळखी प्रदेशात कसा पोहोचलो होतो ?

तिने डोळे उघडले. अगदी सावकाश. आश्चर्य म्हणजे तिच्या अंगावरचा पोशाख देखील बदलला होता. एखादी राजकन्या शोभेल अशा प्रकारची वस्त्रं तिच्या अंगावर होती. खरच किती सुंदर दिसत होती ती! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या ही अंगावर एखाद्या पुरातन काळातील योध्याला शोभतील अशी वस्त्र होती. हे सगळंच माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.

“ निरंजन … “ वीणा म्हणाली,” होय…. तुझं नाव .. निरंजन . मी वेदिका.”

मी खूपच भांबावून गेलो होतो. मला काय बोलावं सुचतच नव्हतं.

“ मला माहितीय तुमची काय अवस्था झालीय ते. कारण अजूनही तुमच्या स्मृतींमध्ये मानव योनीच्या आठवणी आहेत. तुमचा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. काळजी करू नका सर्व काही सांगते. हे आपल्या सोबत बसलेत ते माझे पिताश्री. ऋषिकुमार. अवंतिका राज्याच्या महाराज कपिलदत्त यांचे सर्वात विश्वासू प्रधान.आणि आपण देवनगरीचे सेनापती निरंजन. “

“ काय ? मी सेनापती ? अहो साधी तलवार डोळ्यांनी पण अजून पहिली नाही प्रत्यक्ष मी. हातात घेणं दूरची गोष्ट. आणि तुम्ही थेट मला सेनापती करून टाकलत.” मी म्हणालो.

“ ती गोष्ट मानव योनीची. तुम्ही आता मानव नाही राहिलात. तुम्ही आत्मा आहात. आपण तिघे ही इथे आत्मा म्हणून बोलतो आहोत. आणि मी सांगतेय ती गोष्ट प्राचीन काळातील आपल्या मागच्या जन्माची. “

“ होय निरंजन. “ आता तिच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली.

“ वेदिका म्हणतेय ते खरंय. तू देवनगरीचा शूर योद्धा होतास. एकदा अवंतिका आणि देवनगरीमध्ये खूप मोठं युद्ध झालं. दोन्ही बाजूंचे असंख्य सैनिक रोज मारले जात होते तेव्हा तू स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांच्या राजांची भेट घडवून आणलीस. आणि रोज विनाकारण अनेक सैनिक मारले जातायेत अनेक परिवार बेवारस होतायेत हे पटवून देऊन दोघाच्यात सामंजस्य करार घडवून आणलास. त्यामुळे होणारी पुढील जीवित हानी तू टाळलीस. आणि याच गोष्टीवर भाळून माझी कन्या वेदिका तुझ्यावर प्रेम करायला लागली. पण अवंतिका नगरीचा राजा कपिलदत्त यांच्या मनात तिचा विवाह त्यांच्या युवराजाशी घडवून आणायची इच्छा होती. त्यांनी ती माझ्याजवळ बोलूनही दाखवली होती. त्यामुळं माझा या प्रेम संबंधांस विरोध होता. वेदिका याबाबत माझं काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी तुम्ही दोघांनी पळून जाऊन गांधर्व विवाह करायचं ठरवलं. आणि वेदिका एक दिवस घरातून नाहीशी झाली. पण अशा गोष्टी लपून राहत नसतात. जेव्हा मला कळलं की तुम्ही महाकाली च्या दोन्ही राज्यांच्या सीमे बाहेर असलेल्या मंदिरात विवाह करणार आहात तेव्हा मी तिथं पोहोचलो. आणि वेदिकाला तुझ्यापासून जबरदस्तीनं वेगळं केलं . आणि सैनिकांकरवी तुझा वेदिकाच्या डोळ्यांदेखत शिरच्छेद केला. पण वेदिका हे सहन करू शकली नाही तिनं माझा खंजीर आपल्या उरात उतरवला आणि त्या जागीच प्राण त्याग केला. हे सर्व इतक्या वेगानं घडलं की मला परिस्थिती वर नियंत्रण मिळवता आलं नाही. स्वतःच्या मुलीचा मृत्यू मी पाहू शकलो नाही आणि मी देखील तोच खंजीर माझ्या छातीत उतरवला. त्या नंतर मी आणि वेदिका कधी ही पुन्हा मानव योनीत जन्म घेऊ शकलो नाही. तुझं पुण्य थोर म्हणून तू ईश्वर कृपेने पुन्हा मानव योनीत जन्म घेतलास. पण तुला आम्ही कित्येक जन्म शोधत होतो. कित्येक वर्षे गेली कित्येक पिढ्या गेल्या. पण तुझा थांग लागत नव्हता. आणि अचानक मग तुझा शोध लागला. पण आम्ही आत्मा ज्याला तुम्ही भूत,प्रेत म्हणता या रूपात तुझ्यासमोर आलो असतो तर तू घाबरला असतास. आम्हाला तुला न घाबरवता हे सारं सांगायचं होतं.”

किती वेळ तो माणूस (?) की आत्मा बोल्ट होता.

मी हे सारं ऐकून सुन्न झालो होतो. यावर काय बोलावं मला कळतच नव्हतं. आणि हे सारं खरं असेल तर पुढं काय ? माझ्या मानव जन्मामध्ये मी काही नाती निर्माण केली होती. माझ्या पत्नीचं माझ्यावर खूप प्रेम होतं. माझी दोन मुलं माझे आईवडील . या साऱ्यांचं काय भविष्य ? मी पुन्हा मानव योनीत जाऊ शकणार होतो की नाही ?


“ निरंजन उर्फ निखिल, तुम्ही काय विचार करताय ते कळतंय मला. पण इतक्या जन्मानंतर आता मी तुम्हांला सोडून राहू शकत नाही. कित्येक जन्म मी तडफडतेय तुमच्या भेटीसाठी, मिलनासाठी. आता हा विरह सहन नाही होणार. “ ती म्हणाली.

“ पण वीणा …. सोर्री वेदिका … मी माझ्या वरील कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचं काय करू ? त्यांचा काय दोष आहे का या सर्वात ? मला मानव योनीत जावंच लागेल. माझं कर्तव्य मला पूर्ण करावंच लागेल. “

मी म्हणालो.

तिनं तिच्या वडिलांकडे पाहिलं. “ वा. निरंजन आज ही तू कर्तव्यला महत्व देतोस हे बघून आनंद झाला. घाबरू नकोस. यावर मी मार्ग शोधलाय. तू आणि वेदिका आता कायमचे एकत्र रहाल. मी आत्मा म्हणून आजपर्यंत जी काही चांगली कर्म केली आहेत त्याच फळ म्हणून काही दिव्य शक्ती मला प्राप्त झाल्या आहेत. त्याच वापरून मी वेदिकाला तुझ्या पत्नीच्या आत्म्याशी एकरूप करत आहे. यामुळं तू तुझ्या पत्नीवर प्रेम करत राहशील तेव्हाच ते प्रेम वेदिकाला देखील मिळत राहील. आणि तुझी कर्तव्य देखील पार पडताना तुला कसलाही त्रास होणार नाही. तू पुन्हा मानव जन्मात जाशील निरंजन. “

अगम्य, अद्भुत, विलक्षण असं काही घडत होतं आणि मी फक्त हे सर्व पाहू शकत होतो. वीणा उर्फ वेदिकानं पुन्हा माझा हात हातात घेतला पण यावेळी ती जवळ आली आणि मला काही काल्याच्या आत तिने मला घट्ट मिठी मारली. आवेगाने तिनं माझ्या चेहऱ्यावर असंख्य चुंबनांचा वर्षाव केला आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच जोराचं वारं सुटलं.

डोळे उघडले तेव्हा मी माझ्या ट्रेनमध्ये माझ्या जागी बसलो होतो. आणि माझ्या शेजारी किंवा आजूबाजूला कुणीही नव्हतं. जे घडलं ते खरं की मला स्वप्न पडलं होतं ? सकाळ झाली होती. स्टेशन आलं होत. मी मनातला विचार झटकून टाकला आणि पोचल्याचा फोन घरी करायला मोबाईल काढला. तेवढ्यात घरचाच फोन आला. फोन वर माझ्या पत्नीचा आवाज ऐकला.” हॅलो मी बोलतेय …. तुम्ही पोचलात ना सुखरूप ? मी पण पोचलेय तुमच्या पत्नीच्या शरीरात… मी वेदिका.. “


-----------------------------------------------समाप्त----------------------