सकाळपासून विजयची जरा धावपळच झाली. दिवाळी ला घरी जायचं प्लॅन केलं होतं आणि त्याआधी कॉलेज मधले सबमिशन पूर्ण करायचे होते. त्यामुळे विजय आणि राजा दोघे मिळेल त्यांच प्रॅक्टिकल बुक घेऊन राहिलेलं काम पूर्ण करत होते.
विजय आणि राजा दोघेही औरंगाबाद चे. पण त्यांची ओळख झाली नांदेड च्या नामांकित इंजिनीअरिंग(अभियांत्रिकी) महाविद्यालयात. दोघेही एकाच शाखेत होते आणि एकाच शहरातले म्हटल्यावर आपसूकच मैत्री झाली आणि 3 वर्षात ती अधिकच घट्ट झाली. हॉस्टेल ला एकाच रूम मध्ये राहण्यापासून तर अभ्यास, दंगामस्ती, जेवणं , टवाळखोरी सगळं एकत्रच होऊ लागलं. अर्थातच तेच कॉलेज जीवन असतं आणि हे दोघे त्याचा पुरेपूर फायदा घेत होते. आता दिवाळी ला त्यांना सुट्या होत्या आणि त्यानंतर लगेच सेमिस्टर चे अंतिम पेपर. त्यामुळे कॉलेज चे सर्व कामे आज ते पटापट पार पाडत होते. एरवी 11 किंवा 12 ला कॉलेज मध्ये उगवणारे हे सूर्य आज 8 वाजता पासून च कॉलेज मध्ये होते, त्याला कारण म्हणजे 10 वाजून 5 मिनिटांनी त्यांची ट्रेन होती. शेवटी मित्र मैत्रिणींमध्ये किती हि मजा असली तरी घरची ओढ हि असतेच. तीच ओढ आज ह्या दोघांना लागली होती.
घरी नेण्याचे सगळे सामान विजय आणि राजा नि कॉलेज मध्ये सोबतच आणलं होतं. कॉलेज मधूनच रेल्वे स्टेशन ला जायचं अस ठरलं होत. विजयने घड्याळ बघितल तसा तो ओरडला," राजा आवर पटकन.९:३० झालेत"
"हो हो झालंच" काम करतच राजा बोलला.
"सई जरा मदत कर ना" म्हणून विजय नि सई ला प्रॅक्टिकल च्या पानांना दोरी बांधायला सांगितली.
"ए, तू रडणार का मी जातोय तर??" एवढ्या घाईतही विजय ला सई ची मस्करी करायची लहर आली. आणि तिला चिडवत तो बोलला.
"अरे खरंच अश्रू आलेत तिच्या डोळ्यात विज्या" लगेच राजा नि होकार घेतला आणि सगळा ग्रुप मिळून सई ला चिडवू लागले. सतत कुणाची न कुणाची खोड काढत राहणे हे विजय आणि राजा चे आवडते काम, म्हणूनचं कि काय ते अगदी जिगरी दोस्त झाले होते.
"चल चल रडू नको येतो आम्ही लगेच!!" राजा सामान घेत सई ला बोलला.
" ए जा रे तुम्ही दोघे, नका येऊ परत..." कंटाळून सई बोलली.
हसत खेळत आणि सगळ्यांना दिवाळी च्या शुभेच्छा देत दोघे निघाले.एव्हाना ९:५० झाले होते. त्यांनी ऑटो पकडून रेल्वे स्टेशन गाठलं. धावत पळत प्लॅटफॉर्म वर आले..
गाडी ला सिग्नल मिळाला होता. दोघे हातातलं सामान सांभाळत धावत त्यांच्या हक्काच्या जनरल डब्यामध्ये शिरले. ४तास ४५ मिनिटे असा एकूण पाच तासांचा प्रवास त्यांना करायचा होता. गाडी मध्ये चढल्या चढल्या त्यांनी आपल्या पिशव्या तपासल्या. टॉवेल, बेडशीट, सगळे धुवायचे कपडे असा एकंदरीत बराच मोठा लवाजमा त्यांच्याकडे होता. शेवटी मुलांना कपडे धुण्याचा कंटाळा!त्यात घरी जायचं आहे म्हटल्यावर महिनाभर आधीपासूनच कपडे धुवायचं बंद करण्यात आलं होत, त्याचा हा परिणाम.
दिवाळी मुळे भरपूर गर्दी होती कारण दिवाळी अगदी चार दिवसावर येऊन ठेपली होती.
"काका थोडं सरका हो..." असं तस करून अमोरासमोर बसण्याजोगी जागा दोघांनीही मिळवली. आणि खूप मोठं बक्षीस मिळल्यासारखं दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि नजरेनेच शाबासी सुद्धा दिली.. शेवटी आता सगळं स्थिर झालं.....
आता सुरु झाला प्रवास.......
सर्वात आधी दोघांनी डब्यामध्ये नजर टाकली. प्रवाशांमध्ये वयस्कर, लहान तरुण अशी सगळी मंडळी होती, पण यांच्यासाठी चर्चेचा विषय म्हणजे तरुण मुली. अर्थातच जवळपास सगळ्या मुलांचा तो असतोच. दोघांची शोधमोहीम सुरु झाली.
"छे, काही मजा नाही आज" कंटाळून राजा बोलला. कारण सध्या तरी त्यांना छान आवडेल अशी मुलगी त्या डब्यात नव्हती.
" दम काढ कि राजा. आताच सुटली ट्रेन... असा धीर खचू नको मित्रा.. hope for the best"
अश्या काहीश्या फिल्मी पद्धतीने हातवारे करत तो राजाला बोलला. त्याच्या अश्या बोलण्याने राजा मनसोक्त हसला.
" हो भावा, आखिर उम्मीद पे दुनिया कायम है"
हातावर टाळी देत दोघे मस्त गप्पा करू लागले. आजू बाजूच्या लोकांकडे त्यांचं लक्षही नव्हतं. याला बघ त्याला बघ, ते माणूस बघ कसा झोपलाय, ती मुलगी बघ कशी उभी आहे, किती attitude आहे बघ, अशी सुरु झालेली हि चर्चा अगदी देशाच्या जडणघडण पर्यंत जाऊन पोहचली. आजूबाजूचे काही लोक यांना टवाळ समजत होते तर काही कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकत होते. असंच गहन चर्चा करत दीड तास उलटून गेला.
आता मात्र दोघांनाही कंटाळा आला होता. काहीतरी change पाहिजे अस तीव्रपणे वाटू लागलं. थोड्यावेळात ट्रेन मनवठ रोड ला थांबली. नेहमीप्रमाणे चढण्या उतरणाऱ्यांची घाई. विजय आणि राजा आशेने बघू लागले. आणि नशिबाने त्यांना यावेळी साथ दिली.
एक तरुणी डब्यात चढली. हिरवा रंगाचा सलवार, त्यावर गुलाबी रंगाचा टॉप, लांबसडक केसांची नीटनेटकी वेणी. गोरवर्णीय, काळे टपोरे डोळे, त्याच गुलाबी ड्रेस सारखे गुलाबी ओठ,सुडौल बांधा, गर्दीत कुणाचा धक्का लागू नये म्हणून तिची चाललेली धावपळ आणि त्यानुसार बदलणारे तिच्या चेहऱ्यावरचे भाव... अगदी विलोभनीय दृश्य... पापणीही न लवता विजय आणि राजा हे सगळं न्याहळत होते. खरं तर अत्यंत साधी राहणी होती तिची. पण तितकीच आकर्षक. इंजिनीअरिंग
च्या विद्यार्थ्यांमध्ये खरं तर फॅशन च ठार वेड आहे,आणि तसेच राहणारं मुलं मुली त्यांना आवडतात. नाहीतर ते लो स्टॅण्डर्ड समजलं जातं. पण हि मुलगी त्याला अपवाद ठरली.
एका हाताला घड्याळ न दुसऱ्या हातात नाजूकस कळं, गळ्यात चैन ....... चला म्हणजे अविवाहित आहे..... नकळत आनंदाची लहर दोघांच्या चेहऱ्यावर पसरली.. पण राजा पेक्षा जास्त ती विजय ला आवडली होती आणि राजा नि हे लगेच ओळखलं.
" काय मग??कशी आहे भावा वहिनी??"
राजाच्या चिडवण्यानी विजय भानावर आला.
हे मित्राचं खूप भारी असतं, मनातलं ओळखून लगेच साथ देतात. तुझ्यासाठी कधीपन,काहीपण हे मित्रांमध्येच होऊ शकत.
भरीस भर म्हणजे ती दोघांच्या समोरच्या बर्थ वरच बसली. विजय एकटक तिच्याकडे बघत होता. ती आपल्यापेक्षा मोठी किंवा लहान आहे आहे याचा सहसा फरक प्रवासात पडत नाही.ती हाताला लटकवलेली पर्स मांडीवर घेऊन सावरून बसली.
तिच्या त्या अवघड हालचाली बघून, बिचारी साधारण घरची आहे वाटतं, जास्त अनुभव नसेल जगाचा, बहुतेक आर्ट मध्ये शिकतेय. नाहीतर एवढं साधं आणि सांभाळून कोणत्या मुली राहतात आजकालच्या. आपल्या कॉलेज च्या मुली कसं, अगदी बिनधास्त , हवे तसे कपडे , वागणं.पण हि पण मस्त आहे. नैसर्गिक सौंदर्य काय जे असत ते हेच बहुतेक. असे अनेक विचार स्वतःच करत विजय तिच्याकडे बघत होता. तिलाही ते लगेच लक्षात आलं. तीने एक कटाक्ष त्याचाकडे टाकला तसं विजय भानावर आला.
राजा त्याला त्यांच्या सांकेतिक भाषेत चिडवत होता, एव्हाना १२ वाजून गेले होते. ट्रैनमध्ये लोकांची ये जा सुरूच होती, फेरीवाले ,चहा जेवण यांचीही रेंगळ होती. विजय नि राजा त्यांच्या गप्पांमध्ये रमले होते. अधून मधून विजय तिच्याकडे बघत होता. काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलावं असं विजय ला वाटू लागलं. थोड्यावेळाने एक वृद्ध माणूस जागा शोधत त्यांच्या सीट जवळ आला.
विजय ने स्वतःहून त्यांना जागा दिली. तसा राजा त्याच्याकडे चमकून पाहू लागला, कारण जागेसाठी विजय कधीच तडजोड करत नव्हता.राजा ला कारण कळलं आणि त्याने विजय कडे बघून डोळा मारला. आता विजय तिथेच उभा राहून रेंगाळू लागला आणि त्याच्या सुदैवाने पुढच्या स्टेशन वर त्या तरुणी शेजारची बाई उतरली आणि तिथे जागा खाली झाली. विजय ला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या पण तो आनंद चेहऱ्यावर न दाखवता तो तिच्या बाजूनी जाऊन बसला.बसल्यावर त्याने राजाकडे बघितलं.
"जिंकलस भावा" अश्या काहीश्या अविर्भावात राजा त्याच्याकडे बघत होता.
" तुम्ही कुठे उतरणार आहात?" शेवटी त्यांच्यातील मौन विजय नि तोडलं.
"जालना".
आता स्वतःहून पुढे काय बोलायचं याचा विचार विजय ला पडला.
"आणि तुम्ही?" तिच्या या प्रश्नावर विजय एकदम खुश झाला. एरव्ही कुठलेच प्रश्न न आवडणारा तिच्या प्रश्नांची वाट पाहत होता.
" मी औरंगाबाद. थर्ड इयर ला आहे न , नांदेड च्या इंजिनिअरिंग कॉलेज ला. दिवाळी ला जातोय, आता मस्त सुट्या एन्जॉय करणार.काय आहे न शेवटी दिवाळी ला घरीच मजा येते,माझ्या मते प्रत्येकानी दिवाळी ला वेळ काढून घरी जावंच. तुम्ही पण दिवाळी साठी जात आहात का?."
आपल्या 2 शब्दाच्या प्रश्नाचं एवढं मोठं उत्तर असू शकत हे बघून ती थोडी अचंबित झाली.त्याच्या अस एकाच वाक्यात बोलण्याचं तिला हसूही आलं, ते लपवत ती म्हणाली.
" मी माझ्या घरून रोज ये जा करते "
" हो का? कॉलेज साठी का?"
" कॉलेज झालंय माझं".
"हो का!! मग आता पुढे काय करताय?""
"मी डॉक्टर आहे." ती म्हणाली.
तिच्या अश्या बोलण्यावर नकळत विजयची एक भुवई वर गेली.
"डॉक्टर आणि ही!!!... मी स्वतःहून बोलतोय म्हणून काही पन सांगतंय आता. विजय स्वतःच विचार करू लागला. हि जर डॉक्टर असती तर जनरल डब्यात आली असती का? काय आहे हिच्याकडे डॉक्टर सारखं. साधा स्टेथोस्कोप तर नाही!! ....कश्या असतात न मुली.किती वाढवून सांगतात. "
कुठला विचार कुठे नेत विजय विचारात गुंतला होता.
"हो का छान!!" दोन मिनिटांनी त्याने तिच्या डॉक्टर असण्यावर उत्तर दिलं. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. थोडावेळानी हॉर्न वाजला. जालना स्टेशन येणार होत. ती सामान आवरू लागली. पाणी पिण्यासाठी तिने पर्स मधून बॉटल काढली आणि तीच आय-कार्ड खाली पडलं, विजय ते उचलून देण्यासाठी वाकला. त्याने सहज त्यावर नजर टाकली. अश्विनी कडू---"वैद्यकीय अधिकारी मनवठ" हि खरंच डॉक्टर आहे आणि नुसतं डॉक्टर नाही तर वैद्यकीय अधिकारी.
"तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहात??" आता मात्र तुम्ही या शब्दात आदर होता.
"हो, इथे मनवठ ला, म्हणून तर रोज येजा करते न.
चला बाय, आलं स्टेशन"
"बाय" यांत्रिपणे विजय बोलला. खरं तर त्याला थोडा धक्का बसला होता कारण त्याच्या मते चांगलं शिक्षण घेणाऱ्यांमध्ये attitude हवा. पण अश्विनी म्हणजे याला अपवाद होती.
साधी राहणी उच्च विचारसरणी.
तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला... सहज नेहमीचा प्रवास . अश्या प्रवासात कितीतरी मुलींना पाहतो, लाईन मारण्याचा प्रयत्न पण करतो. हा.. ती भाव देतेच अस नाही. सगळ्याच कुठे चांगल्या असतात. पण अश्विनी आवडली आपल्याला. डॉक्टर आहे यार!! मी इंजिनिअर!!""
असं विचारांची शृंखला एक एक मजला चढतच होती तस राजानी त्याच्या पाठीत मारली. "मग, काय म्हटली भावा वहिनी?" एवढा वेळ दोघांच्या मधात राजा एक शब्दही बोलला नव्हता. बहुतेक यालाच मित्रांचा समजूतदारपणा म्हणतात, पण आता त्याला सगळं ऐकायचं होत.
"डॉक्टर आहे यार! वैद्यकीय अधिकारी!""
"खरंच का ? वाटत नाही"
" अरे खरंच,आय कार्ड बघितलं मी"
"तिने दाखवलं तुला?"" अस म्हणत पुन्हा राजा त्याला चिडवू लागला. आणि तिच्या सोबतच्या गप्पा सांगत सांगत त्यांचं स्टेशन कधी आलं त्यांचं त्यांना कळलं नाही.
दोघे उतरले आणि त्यांनी घरी जाण्यासाठी वेगवेगळे ऑटो केले. जातांना "हैप्पी दिवाळी विज्या" "same to you राज्या"" म्हणत मिठी मारली.
ऑटो मध्ये विजय अश्विनी चाच विचार करत होता. दहा मिनिटांमध्ये घर आलं. विजय नि आनंदाने ऑटोतून उडी मारली आणि पैसे देऊन धावतच घरात गेला.
घरी दिवाळी ची जय्यत तयारी सुरु होती. आईने बनवलेल्या फराळाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता.आईला बिलगून घट्ट मिठी मारली आणि लहान बहीण भावा सोबत मस्ती करायला लागला. त्यांनतर फटाके, दिवाळी ची बाकी तयारी सजावट ,आकाशदिवा या सगळ्या कामांमध्ये अश्विनीवर पूर्ण विसर पडला.दिवाळी मस्त मजेत गेली. त्यानंतर असंच एक दिवस जेवण करून तो बसला होता तर अचानक त्याला अश्विनी ची आठवण आली, आणि त्याचबरोबर त्याने केलेले विचारही आठवले. आणि त्याला स्वतःचाच हसू आलं. 3 तास सोबत प्रवास केल्यावर आपण काय काय विचार केले होते. अश्या बऱ्याच अश्विनी बऱ्याच लोकांना अनेक प्रवासात कधी ना कधी भेटत असतात. त्यांना पाहतो, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रवासानंतर विसरूनही जातो. विजय सुद्धा असच विसरला होता पण नकळत ती एक शिकवण देऊन गेली होती
" कुणाच्या दिसण्यावरून कुणाच्या असण्याची परिक्षा कधीच करू नये."
दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि दोघे पुन्हा निघाले कॉलेज साठी त्याच ट्रेन मध्ये. कुणी वहिनी मिळते का बघत....