अमोल गोष्टी
पांडुरंग सदाशिव साने
११. खरा सुगंध
गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होता. त्याचे नाव रामचरण. रामचरणने आपला देश, घरदार, सर्व स्नेही यांस सोडून दिले होते. जे आपले बांधव हजारो मैलांवर आहेत, त्यांना ज्ञानदान करण्यासाठी तो गेला होता. त्या गरीब मजुरांच्या मनात सीता, सावित्री, रामकृष्ण यांची आठवण राहावी, हिंदु-संस्कृती त्यांच्या मनात जिवंत राहावी म्हणून तो गेला होता.आज गोविंद फिझी बेटात गेलेल्या आपल्या मित्रास काही वस्तू भेट म्हणून पाठविणार होता. गोविंदाच्या बहिणीने तयार केलेला एक रुमाल, एक खादीचा-सुताचा हार, श्रीरामाची भरलेली तसबीर, गीतेचे सुंदर पुस्तक वगैरे वस्तू तो बांधीत होता.इतक्यात खोलीत एकाएकी सर्वत्र सुगंध दरवळून राहिला. जणू जाई-जुईची, गुलाब मोग-याची फुलेच फुलली आहेत. कोठून बरे वास येत होता ! गोविंदास तर समजेना. इतक्यात त्याल खिडकीत असलेली अत्तराची बाटली उपडी झालेली दिसली. धांदलीत धक्का लागून वाटली पडली होती व तिच्यातील अत्तर त्या पाठविण्यात येणा-या वस्तूंवरही सांडले.ते सामान सर्व पॅक करून फिझी बेटात पाठविण्यात आले. रामचरणला ते पार्सल मिळाले. रामचरण दिवसा काम करून दमला भागला होता. ते पार्सल फोडावयास त्याला दिवसा वेळ मिळालाच नाही. रात्र झाली होती. नेहमीप्रमाणे रामचरणचे प्रवचन ऐकण्यास मजूर जमले होते. रामचरणने तो खोका फोडण्यास आरंभ केला होता; व जमलेले मजूर वाटोळे बसले होते.खोका फोडल्याबरोबर एकदम दिव्य सुगंध बाहेर पसरला. ते मजूर म्हणाले, ''दादा, किती गोड वास हा! अत्तर आहे यावर.''
रामचरण त्या वस्तू पाहून सद्गदित झाला होता. तो मजुरांस म्हणाला, ''होय, या आलेल्या सुंदर वस्तूंवर अत्तर सांडले आहे हे खरे; परंतु अत्तराच्या बाटलीपेक्षाही दुस-या एका बाटलीतील तेलाचा गंध या वस्तूंस येत आहे.'' ते मजूर म्हणाले, ''कोणते ते तेल !'' रामचरण म्हणाला, ''अंतःकरणातील प्रेम व सहानुभूती यांची जी भरलेली बाटली आहे ती उपडी झालेली आहे. या वस्तू प्रेमाने पाठविलेल्या आहेत. तशा नसल्या तर या बाहेरच्या अत्तराची मला काय किंमत होती ! गडयांनो, आपण नेहमी काही ना काही तरी देत असतो. कधी आनंदाने देतो तर कधी दिले पाहिजे म्हणून देतो. पण मी तुम्हांला सांगतो, कोणतीही लहानमोठी जी वस्तू द्याल, पै-पैसा द्याल त्यावर अंतःकरणातील प्रेमाच्या बाटलीतील दोन थेंब टाकीत जा; त्यामुळे दिलेल्या वस्तूस किती तरी सुंदर वास येईल ! आणि अंतःकरणातील प्रेमाची बाटली असे थेंब टाकल्याने रिकामी होत नाही. जो जो द्यावे तो तो ती बाटली भरभरून येते.''रामचरणचे त्या दिवशी हेच प्रवचन झाले. परंतु त्याच्या त्या चार शब्दांचा परिणाम मजुरांच्या मनावर केवढा झाला होता हे त्यांच्या डोळयात चमकणा-या अश्रुविंदूवरून दिसून येते होते.