अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन
खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो माझ्या घराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला.
ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर, रिंकल फ्री अँड स्टेन फ्री प्योर कॉटन व्हाईट शर्ट व डार्क ब्लू जीन्स असा त्याचा पोशाख होता. असो, तो आला आणि नेहमी प्रमाणे स्वतःच्याच हातांनी चहा करून घेतला. मीही नेहमी प्रमाणे काही लिहीत होतो, काय ते नाही सांगू शकणार. कारण ते मिस्टर वाघबद्दलचे सिक्रेट डॉक्युमेंटेशन आहे. त्याच्याही न कळत मी ते नोट डाऊन करतोय. कुणी सांगावे उद्या गरज पडेल...
तो आत आला तेव्हाच मी ते सगळे गुंडाळून ठेऊन दिले होते, पण माझी झालेली गडबड पाहून तो काही तरी समजल्यासारखा हसला होता. तरी तो आत चहा करण्यासाठी गेलेला तेव्हा मी एक अपूर्ण कथा लिहायला घेतली त्याला कळू नये म्हणून.
त्याने माझ्यासमोर चहाचा कप ठेवला.
"काळजी करू नको, या सगळ्याची तुला कधीच गरज पडणार नाही!" चहाचा घोट घेता घेता तो म्हणाला. कपाआडूनही त्याच्या ओठांवरचे स्मित मला दिसले.
'आता यापुढे कानाला खडा. आई नसल्यावर मिस्टर वाघविषयी काही घेऊन बसायचं नाही...'
"ते मी कथेसाठी..." मी अडखळत बोलून गेलो.
"सूरज!" त्याने मला हाक मारली. त्याच्या हाक मारण्यात नक्की कोणते भाव होते ते मला अजून ठरवता येत नाहीत...
"हं..." एवढंच माझ्या तोंडून निघाले.
"तुला माझी का भीती वाटते ते मला कळत नाही." असे म्हणून त्याने चहाचा कप खाली ठेवला आणि होलस्टर मधून एक पिस्टल बाहेर काढली. ती होलस्टरमध्ये कशी तरीच कोंबून ठेवली होती.
"हिच्यासाठी नवीन होलस्टर लवकरच बनवावे लागेल..." तो पुटपुटला.
'मी मिस्टर वाघला असे अनऑर्गनाईज्ड् कधीच पाहिले नाही.
मग तो आज असा का?
याचे मन विचलित तर नाही ना?
मिस्टर वाघ; आणि विचलित?
शक्यच नाही. तो खूपच संयमित आहे. आत्ताही वावरताना तो किती सहज वावरतोय... त्याच्यासारखाच! काहीच तर बदल नाही...'
"माऊसर सी नाइन्टी सिक्स, निकनेम ब्रूमहँडल..."
असे म्हणून त्याने एक खूपच विचित्र दिसणारी एक पिस्टल माझ्यासमोर ठेवली.
"इट्स ए हेवी प्राईझ् फॉर माय असायनमेंट टिल डेट..." तो म्हणाला.
याला ब्रूमहँडल का म्हणतात ते मला ती पिस्टल पाहूनच कळाले. तीचे हँडल झाडूच्या दांड्यासारखे लंबगोलाकार होते. तिला हँडल व बॅरेलला जोडणारा एक चौकोण होता. तो काय ते मात्र समजले नाही. पण या चौकोनी पेटीमुळेच त्याची ही विचित्र पिस्टल त्याच्या होलस्टरमध्ये नीट बसली नव्हती व ते खूप विचित्र दिसत होते एवढे मात्र खरे.
"द सी नाइन्टी सिक्स सेमी ऑटोमॅटिक पिस्टल. १८९६ ते १९३६ पर्यंत याचे मॅन्युफॅक्चरिंग जर्मनी मध्ये झाले. फिडलर ब्रदर्स फिडेल, जोसेफ व फ्रेडरिच आणि पॉल माऊसर यांचे डिझाईन व माऊसर व हाण्यांग अर्सनल यांचे मॅन्युफॅक्चरिंग. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा या पिस्टलचा उपयोग केला गेला आहे. ती चीन कडून इम्पोर्ट केली जायची. चीन व स्पेन या पिस्टलची नकल करायचे, पण ही १०० टक्के ओथेन्टीक आहे. अशा फक्त १० लाख पिस्टल्सच बनवल्या गेल्या होत्या. इतकी रेअर पिस्टल आत्ता माझ्या कलेक्शन मध्ये आली आहे. या पिस्टल्स कोण वापरायचे माहीत आहे?"
मला नेहमी प्रमाणे बाऊन्सर्स चालले होते, तरी स्वातंत्र्य संग्रामात इंडियन रिवोल्युशनसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली ही पिस्टल पाहून मीही विचार करायला लागलो. पण मला उत्तर सुचण्यापूर्वीच मिस्टर वाघाने उत्तर देऊनही टाकले.
"भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, प्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान, सुखदेव थापर असे बरेच जण..." हे सांगताना त्याच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती. आणि ओठांवर विस्मयकारक हसू.
पण ही नांवे ऐकून एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली, की काही मोजकी नांवे सोडली, तर आपल्याला आपल्या फ्रीडम फायटर्स बद्दल किती माहीत आहे? शेवटची नांवे तर मी कधी ऐकलीही नाहीत. तेही एका अर्थी बरेच आहे म्हणा... एरवी माहीत असते, तरी केले काय असते? इतिहास अभ्यासायचा तो पूर्वी घडलेल्या चुका वर्तमानात व पर्यायाने भविष्यातही टाळता याव्यात म्हणून; पण आपण मात्र आत्ता आपल्या सोयीनुसार इतिहासाचे गठन करतो. शिवाय अशा महान पुरुषाचे भांडवल करतो. यांच्या जन्म व पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापलीकडे आणि त्यांच्या कार्याचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून आपले स्वार्थ साध्य करण्यापलीकडे आपण काय केलंय म्हणा. त्यांच्या तिथ्यांवरूनही वाद होतो तो वेगळाच! प्रयत्न न करता आयते स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्य सेनानींना नांवे ठेवणे आणि त्यांचा त्यावेळचा एखादा निर्णय कसा चुकीचा होता याचा उहापोह करण्यात सर्व शक्ती खर्ची घालणे आत्ता खूप सोपे आहे आणि असे करण्याला सध्या शहाणपणाचे लक्षण समजले जाते. आजची ही ट्रेण्डच झाली आहे, पण त्यावेळची परिस्थिती काय होती, कोणी कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घेतले हेही पाहिले पाहिजे. आम्ही किती ज्ञानी हे दाखवण्याच्या होड मध्ये त्या लोकांना नांवे ठेवणे कितपत योग्य हे आपणच विचारात घेतले पाहिजे... त्या काळी एक - एक स्वातंत्र्य सेनानी आपल्या भविष्यासाठी लढले म्हणून आज आपण हे सोकोल्ड फ्रीडम अनुभवतोय. फ्रीडम फायटर्स मध्ये मतभेद, मनभेद असतील, पण त्याचे ध्येय एक होते; आपला भारत! आपणही त्याच विचाराने चालायला नको का? मनभेद असू देत, विचार राष्ट्राचा झाला पाहिजे. पण आपण मात्र हे लोक वाटून घेतलेत, त्यांच्या विचारांचा चुकीचा किंवा हवा तसा अनव्यार्थ लावलाय आणि भांडत बसलोय...
असो, काही स्वातंत्र्य सेनानी माहीत नाहीत ते बरेच. नाही तर त्यांच्याही जाती, धर्म आपण शोधले असते. निदान ते तरी समाधानाने चीर शांत निद्रा घेताहेत...
माफ करा जरा भरकटलो...
मला विचारात गढलेला पाहून मिस्टर वाघ थोडा वेळ शांत झाला. एक मात्र होते, की ही नवी पिस्टल हाती आल्याने एका लहान मुलाला नवीन खेळणे मिळावे असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्याच्या फॅमिली मध्ये नवीन मेंबर जो एड झाला होता.
मी भानावर आल्यावर त्याने पुढे सांगितले,
"जर्मन, फिलिपीन, मेक्सिकन रिवोल्युशन मध्येही हिचा मोठा सहभाग आहे. वर्ल्ड वॉर १,२, चायनीज सिव्हिल वॉर, रशियन सिव्हिल वॉर, व्हिएतनाम वॉर, अशा खूपशा महत्त्वाच्या घटनांमध्ये सी नाइन्टी सिक्स खूप रिलाएबल ठरली आहे. तुला माहितीये, ७.६३×२५ एमएम माऊसर कार्टेज हे खूप मोठ्या प्रमाणात बनवले जाणारे कार्टेज होते. त्या काळच्या इतर कार्टेजेस् पेक्षा हे खूप खोलवर घाव करायचे. नो वंडर, की १९३५ मध्ये माझ्या आवडीची .३५७ मॅग्नम कार्टेज येण्याआधी ही खूप लोकप्रिय पिस्टल होती!"
बोलून त्याने एक स्टीलची पट्टी खिशातून काढली. त्याला उभे पाच होल्स होते. सोबत काढलेल्या गोळ्या त्याने त्या होल्समध्ये लोड करायला सुरुवात केली.
मी टरकलो. मला एक कळत नाही हा हे असलं सगळं माझ्या समोर येऊनच का करतो?
"ओरिजिनल कार्टेजेस्" लोड करता करता तो म्हणाला.
पण पाच ऐवजी ती चारच होतीत... एक गोळी गेली कुठे?...
त्याने अतिकाळजीपूर्वक ती स्टीलची पट्टी उभी करून त्या चौकोनी पेटीमध्ये वरून खुपसली. तेव्हा माझ्या लक्षात आले, की ती पेटी म्हणजे मॅगझीन आहे. पाचच गोळ्या त्यात बसतात. आणि आता चार गोळ्या त्यात लोड झाल्या होत्या. त्याने स्टील पट्टी जोराने खेचून बाहेर काढली.
मला जेवढे माहीत आहे त्यानुसार तरी त्याकाळच्या रिव्हॉल्व्हर्सचे मॅगझीन्स सिलेंड्रीकल असायच्या. पिस्टल्सचे मॅगझीन्सही हँडलमध्येच फिट केले जायचे, म्हणूनच ही पिस्टल वेगळी होती.
"चिनी याला बॉक्स कॅनन म्हणतात. याच्या या चौकोनी मॅगझीनमुळे. याचे होलस्टरही चौकोनी बॉक्स असतो म्हणून पण. तो आता मला बनवून घ्यावा लागेल." व पिस्टल लोड केली आणि नेहमी प्रमाणे माझ्यावर एम केली.
मला माहित आहे, हा माझ्यावर गोळी नाही चालवणार, पण याने असे केले, की नेहमीच मी अस्वस्थ होतो, कारण पुढे काही तरी भयानक कळणार याची ती खूण असते...