मुंबई पुणे मुंबई - ३...
मुंबई- पुणे वाद हा मुंबईकर आणि पुणेकरांनाही काही नवा नाही. पण एकमेकांशी वाद घालणारे हे मुंबई -पुणेकर एकमेकांच्या प्रेमात पडले तर..? अशीच काहीशी कथा घेऊन सतीश राजवाडे 'मुंबई पुणे मुंबई' हा चित्रपट घेऊन आले. गौरी-गौतमची अशीच काहीशी हटके लव्हस्टोरी सांगणारा ‘मुंबई-पुणे -मुंबई’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यावेळी ह्या चित्रपटाबद्दल भलतीच उत्सुकता होती. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्यात हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेंच्या या चित्रपटांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘मुंबई पुणे मुंबई- ३’ या चित्रपटाचा तिसरा भाग आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर काय मजा करतो हे पाहण्यात मजा येईल. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. दोघांचा अभिनय उत्तम आहे. आणि ही जोडी मोठ्या पडद्यावरची आवडती जोडी आहे. साधी, सोप्पी आपल्या सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट उत्तमरित्या ह्या दोन्ही कलाकारांनी मंडळी आहे आणि हाच ह्या चित्रपटाची जमेची बाजू!
‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटात स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते हे पाहण्याची उत्कंठा सिनेरसिकांना लागून राहिली आहे. चित्रपटाशी घट्ट जोडल्या गेलेल्या या नावांसह ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये आणखीही दिग्गज कलाकार जोडले गेले आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा तगडी स्टारकास्ट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे प्रदर्शित झाल्याने या जोडीच्या पुढील प्रवासाचा अंदाज रसिकांना आला असला, तरी तो प्रत्यक्ष पाहण्याची मजा काही औरच असेल आणि त्याचमुळे उत्कंठा वाढली आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. गोड भांडण ते पाहुण्याच आगमन, गौतम आणि गौरीच आयुष्य प्रत्येक टप्यावर पेक्षकांना आपलस वाटून देण्यात यशस्वी होत आहे. आजची पिढी ही करियरच्या मागे धावत आहे. त्यामुळे त्यांना लग्नानंतर लगेचच मूल नकोय. लग्नाला तीन-चार वर्ष झाल्यानंतरही मुलांचा विचार करायला ही पिढी घाबरतेय. पण या सगळ्यामुळे भविष्यात त्यांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागणार हेच त्यांना कळत नाहीये. आजच्या पिढीचा हा महत्त्वाचा प्रश्न सतीश राजवाडे यांनी 'मुंबई पुणे मुंबई-3' मध्ये मांडला आहे.
चित्रपटाची कथा-
गौरी (मुक्ता बर्वे) आणि गौतम (स्वप्निल जोशी) यांच्या लग्नाला तीन वर्ष झाले आहेत. आपल्या आयुष्यात ते दोघे खूप खुश आहेत. घर, करिअर अशा दोन्ही गोष्टी ते खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. गौतमचे आई (मंगला केंकरे) वडील (प्रशांत दामले) त्यांच्या अगदी जवळ राहत असून त्यांचे एक सुखी कुटुंब आहे. लग्नाला तीन वर्ष झाली असली त्या दोघांनी अजून मुलाचा विचार केलेला नाहीये. पण गौरी गरोदर असल्याचे अचानक त्या दोघांना कळते. मुलाला जन्म द्यायला आम्ही तयार नाही असे त्यांचे स्पष्ट मत असते. पण एका क्षणाला ते त्यांचा निर्णय बदलतात. त्यांनतर त्यांचे आयुष्य कसे बदलते. त्यांच्या या नव्या जबाबदारीला ते कसे स्वीकारतात, त्यांचा आई बाबा होण्याचा हा प्रवास पाहायचा असेल तर 'मुंबई पुणे मुंबई 3' पाहायला लागेल.
‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटामधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे पारंपारिक डोहाळजेवण (आता त्याला बेबी शॉवर असेही म्हणतात) समारंभातील असून ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर घराघरात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. हे गाणे हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. या गाण्याला संपूर्ण नवा साज असून कानाला भावेल असे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
'मुंबई पुणे मुंबई'ची कथा ही नवीन नसली तरी ती खूप चांगल्याप्रकारे मांडण्यात आली आहे. कधी कधी तीच कथा उत्तमरित्या मांडण्यात आली तर तो चित्रपट सुरेख बनतो. तसच ह्या चित्रपटच आहे. दिग्दर्शन सुरेख झाले आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यपासून आपण नकळत या कथेत गुंतले जातो. मध्यंतरपर्यंत चित्रपटात अनेक गोष्टी घडतात. पण मध्यंतरानंतर चित्रपट काहीसा संथ वाटतो. चित्रपट ताणला जात आहे असे वाटत असतानाच चित्रपटाचा शेवट पुन्हा एकदा आपल्याला खिळवून ठेवतो. आणि म्हणून हा चित्रपट चांगला बनतो. चित्रपटात स्वप्निल, मुक्ता या दोघांनीही अफलातून काम केले आहे. दोघ उत्तम कलाकार आहेत आणि ते ह्या चित्रपटात जाणवत राहत. दोघांची केमिस्ट्री तर सुरेख!. प्रशांत दामले यांचे काम पण मस्त झाले आहे. रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, विजय केंकरे, मंगला केंकरे या सगळ्यांनीच आपली भूमिका चोख पार पडली आहे. सजनी आणि कोणी येणार ही गाणी ओठावर चांगलीच रुळतात आणि चेरी ऑफ द केक म्हणजे प्रशांत दामले यांनी गायलेली गाणी. ही गाणी विशेष रंगत आणतात. तसेच गौरी आणि गौतमच्या होणाऱ्या बाळाचे चित्रपटात मध्ये मध्ये दाखवलेले मनोगत ऐकायला मस्त वाटते. गौतमच्या आई वडिलांना त्यांची गुड न्यूज कळल्यानंतर त्यांची जमून आलेली गाण्याची मैफिल, गौतमने बाळाच्या जबाबदारीसाठी तयार व्हावे यासाठी त्याचे वडील त्याला समजवतात ही दृश्य मस्त जमून आलेली आहेत. चित्रपटाचे संवाद तर प्रेक्षकांच्या टाळ्या घेणार यात काही शंकाच नाही.
'मुंबई पुणे मुंबई-३' चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या संजय छाब्रिया यांनी केली असून चित्रपटाचे सहनिर्माते ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली आहेत. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या बऱ्याच हिट चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांची आहे.
थोडक्यात म्हणजे, आजच्या पिढीला साजेसा असा हा चित्रपट आहे. आजच्या पिढीची करियर आणि नाते सांभाळताना होत असलेली फरपट, त्यांनी मनस्थिती चित्रपटात चांगल्या प्रकारे मांडण्यात आलेली आहे. आणि ते अनुभवण्यासाठी नक्कीच हा चित्रपट पाहावा.