Mulanchya bhavvishwat dokavtana.. in Marathi Human Science by Suchita Ghorpade books and stories PDF | मुलांच्या भावविश्वात डोकावताना..

Featured Books
Categories
Share

मुलांच्या भावविश्वात डोकावताना..

मुलांच्या भावविश्वात डोकावताना..


 लहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे असते. आपल्याला ते जाणून उमजून घेणे फार गरजेचे असते. जर आपण ते समजून घेतले तरच त्यांचे बालपण कोमेजून जाण्याऐवजी अबाधित राहील. लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात.आपण जसा आकार देऊ तशी ती घडत जातात; पण यासाठी त्यांना हाच आकार हवा, हाच आकार त्यांच्यासाठी योग्य आहे, असा अट्टाहास मात्र करू नये. त्यांना त्यांना जसे हवे तसे घडू द्यावे. 

 आपल्याकडे मुलांच्या जन्मांसोबतच त्यांच्या शाळेचा विचार चालू झालेला असतो. पण ह्या सगळ्याचा विचार करत असताना ती केवळ छोटी मुलेच आहेत; याचा मात्र आपल्याला विसर पडतो. एखाद्या रोबोसारखे त्या मुलांना वागवले जाते. कदाचित आता चालू असलेली जीवघेणी स्पर्धीही त्या गोष्टीला तितकीच जबाबदार असू शकते, पण आपण आपल्या पाल्याचे बालपण कसे सुरक्षित राहील याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.  

 अडीच-तीन वर्षात या मुलांचा विकास हळूहळू होत असतो. पहिल्या पाच वर्षात मुलांमध्ये अनेक महत्वाचे बदल घडतात. या वयात त्यांचे स्वत:वर जास्त नियंत्रण नसते. त्यामुळे अपरिचित व्यक्ती किंवा मुले यांच्यामध्ये तीन-चार तास घालविणे त्यांच्यासाठी कठीण जाते. याचा नकारात्मक परिणाम त्या मुलांवर दिसून येतो. एक प्रकारचा तणाव त्यांच्यात निर्माण होऊन ती चिडचिडी बनू शकतात. त्यांना स्वत:ला सांभाळणे जिथे कठीण असते; तिथे पाठीवरच्या बॅगचे, हातातील बॉटलचे ओझे कसे सांभाळू शकतील. पण हे ओझं लादलं जातं आणि मग त्या ओझ्याखाली त्यांचे बालपणही दबले जाते.

     त्या मुलांसाठी त्यांचे घरचे हेच त्यांची पहिली शाळा आणि आई-वडील त्यांचे पहिले गुरू ठरावेत, हे अधिक योग्य आहे. शिकण्याच्या दृष्टीने त्यांचे पहिले पाऊल हे घरातूनच पडायला हवे. एखाद्या चित्रांतून किंवा कृतीमधून मुलांना गोष्टी समजावून सांगणे तितकेसे कठीण नसते. उलट अश्या समजावण्याने मुलांना गोष्टी लवकर उमजायला मदत होते. छोट्या मुलांची निरीक्षण क्षमता अधिक जास्त असते, त्यामुळेच ते अनेक गोष्टींचे अनुकरण लगेच करतात. त्यासाठी या मुलांवर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असते.

  तीन ते चार वर्ष या वयाच्या कालवधीत त्यांना मनसोक्त खेळू द्यावे. आजूबाजूचा परिसर, व्यक्ती समजावून घेण्यासाठी मदत करावी. पण या वयात अश्या अनेक गोष्टींपासून दूर राहून शाळेत जाताना अनेक वेगवेगळ्या अनाकलनीय गोष्टींचा मारा त्यांच्या बालमनावर होतो आणि त्याचा परिणाम बराच काळ त्या मुलांच्या वर राहतो. छोट्या मुलांना नकार पचवणे अवघड जाते, अश्या वेळी ती मुले आक्रमक बनू शकतात. त्यांची काळजी घेत त्यांना समजावणे खूप कठीण असते. आणि हे काम घरातील व्यक्तीच अधिक चांगल्या रितीने करू शकते. संस्कारांच्या जडणघडणीचा मूळ पाया, आधारस्तंभ हे तर त्या मुलांचे घरच असू शकते.

सहा वर्षापर्यंत मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण झालेला असतो.या वयात गोष्टी समजून घेणे त्या मुलांना सोपे जाते.

१)  मुलांना आपल्या आजूबाजूचे वातावरण अनोळखी वाटत नाही.एखादी गोष्ट नाही समजली किंवा पसंद नाही पडली तर त्या गोष्टीवर त्यांना प्रतिक्रिया देता येऊ शकते.

२) मुलांची आकलन क्षमता या वयात वाढलेली असते, त्यामुळे एखादी गोष्ट ग्रहण करणे अवघड नाही जात.

३)आरोग्याची किंवा इतर काही तक्रार असेल, तर ती सांगण्या इतपत समज त्या मुलांच्यात या वयात आलेली असते.

४)तीन तासांपेक्षा जास्त वेळ घराबाहेर राहण्याची म्हणजे शाळेत थांबण्याची त्यांची मानसिक तयारी झालेली असते.

५) एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना योग्य किंवा अयोग्य या गोष्टींची समज आल्याने ते स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्यात ताण-तणाव निर्माण होत नाही.

६)नवनवीन वस्तू,पदार्थ,लोक यासारख्या अनेक गोष्टी समजून घेण्याची आकलन शक्ती त्यांच्यात निर्माण झालेली असते. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडत नाही.

७)एक परिपक्वता त्यांच्यात निर्माण होण्याचा हा काळ असतो. या काळात त्यांचे  मानसिक आरोग्य,स्वास्थ्य बिघडत नाही. पण कमी वयात ही परिपक्वता येऊ शकत नाही. आणि तसा प्रयत्नही आपण करू नये.

  म्हणून तर जेवढे जास्त वय तेवढे स्वत:वर नियंत्रण जास्त आणि जेवढे वय कमी तेवढे स्वत:वर नियंत्रण कमी. त्यामुळे त्यांची ही अवस्था समजून योग्य त्या वयातच त्यांना शाळेत घालणे त्या मुलांच्या हिताचे ठरू शकते.

मुले ही निर्जीव खेळणी नाहीत की, ज्यांना आपण आपल्याला हवे तसे , हवे तेंव्हा कोणत्याही गोष्टी करण्यास भाग पाडू. लहान मुलांच्या निरागस विश्वात आपल्याला डोकावता यायला हवं. पण त्यासाठी वेळ नसणे या करणास्तव त्या मुलांना कमी वयात शाळेत घालणे हे चुकीचे आहे. संस्काराची बीजे बालमनात रुजायला हवीत; पण त्यासाठी त्यांच्या वयाचे भान विसरून चालणार नाही. कारण ही मुलेच आपल्या संस्कारक्षम उज्ज्वल समाजाचे आणि देशाचे भवितव्य असणार आहेत. 

-सुचिता प्रसाद घोरपडे