Ice patra in Marathi Letter by Savita Satav books and stories PDF | आईस पत्र

Featured Books
Categories
Share

आईस पत्र

प्रिय आई,
      तू कदाचित हसशील,वेडी म्हणशील.कारण मी तुला पत्र लिहिते म्हणून.हल्ली एकत्र रहाणार्या माणसांचा एकमेकांशी संवाद कमी झालाय,तिथे पत्र लिहिण तर दूरच.पण मला खूप मनापासून जाणवल की तुला पत्र लिहाव.

    तू आमच्या साठी जे केल ते शब्दांत मांडण कठीणच,खरतर प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी जे करते त्याचे उपकार कधीच फिटू शकत नाही.तू आमच्या साठी दिवसरात्र एक केला.आमच आजारपण आमची शाळा,हे सगळं तू सांभाळलस.नानांच्या सामाजिक कार्यामुळे संसाराचा गाडा तू खरतर एकहाती पेललास.पण तेव्हा आम्हांला त्याची जाणीव झालीच नाही कधी.तू जे करतेस ते तुझ कामच आहे,आणि तू ते करायलाच हव असच वाटायच.

  आमची शाळा,कॉलेज,मित्रमैत्रीणी या विश्वातच आम्ही दंग राहिलो,पण तुझी काही स्वप्न होती का ? तुला काय वाटत होत याचा कधी विचारच केला नाही.आम्ही सगळेच तुला फक्त गृहित धरत आलो.शिक्षणानंतर लग्न,मग आमचा संसार,मुल यातच रमलो.पण तू मात्र तरीही आमचाच विचार करत राहीलीस.आम्हांला झालेला त्रास पाहून काळजी करत राहीलीस.मुल,सुन,जावई,नातवंड यांची काळजी हेच तुझ विश्व मानलस.पण या सगळ्यात तू खरच समाधानी आहेस का अस तुला विचारलच नाही.

      शाळेत असताना आमच्या प्रगतीपुस्तकावरील अभ्यासात 'हुशार'आणि वर्तणुक चांगली हा शेरा पाहून तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसायच.इतरांकडून तुझ्या मुलांच्या बाबतीत चांगले शब्द ऐकून तुला त्यांच्या अभिमान वाटायचा,पण तू स्वतः कधी त्यांच कौतुक केल नाही.पण तुझ्या आमच्या वरील चांगल्या संस्काराची पावती तुला वेळोवेळी मिळाली आणि त्यात तू तुझ्या आयुष्याच सार्थक मानलस.तू नेहमी म्हणतेस आम्ही तिघेच तुझी संपत्ती आहोत,यापेक्षा वेगळ तुला काही नको.

    'आई' या शब्दाचा अर्थ मला खरतर तेव्हा कळला,जेव्हा मी दोन मुलांची आई झाले.आई होण सोप नाही हे तेव्हा कळल.माझही आयुष्य त्यांच्या भोवतीच मर्यादित राहील.पण हळूहळू ते आता मोठे होवू लागले आणि त्यांच विश्व बदलल.आणि त्यांच्या आयुष्यातील माझी जागा हळूहळू   कमी होतेय अस मला जाणवायला लागल आणि मग तू डोळ्यासमोर दिसायला लागली.आम्ही असे मोठे झाल्यावर तुला ही असच वाटल का ग ? की आपली पाखर आपल्या पासून लांब होताहेत.आयुष्यातील हा रितेपणा तुला ही वाटला होता का ? खरतर वेळ घालवण्यासाठी,स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी आता भरपूर मार्ग आहेत माझ्यापुढे पण तू तेव्हा काय केल याचा विचार कधी मनात आलाच नाही.पण आता विचारायच तुला.

       मला शिस्त,वळण लागाव म्हणून तू अनेकदा माझ्याशी कठोर वागायचीस.तेव्हा मी तुला म्हटल होत मला नाना आवडतात तू आवडत नाही.कदाचित् तुला आठवतही नसेल.मी तेव्हा ७ वीत असेन.तेव्हा तू खूप दुखावली होतीस.पण लक्षात येवूनही मी तुझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल.आणि तुझी माफी ही मागितली नाही,कारण त्या वयाचा परिणाम असेल कदाचित् आपली चूक मान्य करण मला जमलच नाही.पण मी माफी न मागता ही तू मला माफ केलस कारण शेवटी तू आईच आहेस.
    आता कधी कधी खूप एकट वाटत ना तेव्हा अस वाटत तू जवळ असावीस अन तुझ्या कुशीत शिरुन खूप खूप रडाव ,अगदी मनसोक्त उगीचच,लग्नात सासरी जाताना मारली तशी घट्ट मिठी तुला मारावी,आणि माझ्या सगळ्या चुका पदरात घे अस तुला सांगाव.त्या तू घेशीलच मी न सांगताही
 
   तरी आई मला माफ कर,आणि तू मला खूप खूप आवडतेस.माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.

    I LOVE YOU आई
    
आई तुझ्या उपकारांची 
परतफेड होवू शकत नाही
एका जन्मात काय,तर सात जन्मातही,
मी तुझी होवू शकत नाही उतराई.

   सावी ९/१०/२०१८