६. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग १
रोड ट्रीप म्हणलं की काहीतरी मस्त डोळ्यासमोर येत. बऱ्याच लोकांना रोड ट्रीपच थ्रील अनुभावायच असत पण नक्की कुठे जाता येईल ह्याचा मात्र अंदाज लावता येत नाही. मग रोड ट्रीप चा प्लान तिथेच सोडून दिला जातो. पण रोड ट्रीप ही खूपच सुंदर कल्पना आहे. आणि त्यासाठी बरेच पर्याय आहेत. आधी फारशी प्रचलित नसलेली रोड ट्रीप, बॉलीवूड मुळे तरुणाईला वेड लावत आहे. परिवारासमवेत किंवा मित्र मैत्रिणींबरोबर केलेला प्रवास नक्कीच खास असतो. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा’ , 'दिल चाहता ही' मध्ये मित्र मैत्रिणींनी एकत्र केलेली रोड ट्रिप मध्ये अनुभवलेले प्रसंग होते. तसेच वेगवेगळे अनुभव आपल्याला सुद्धा रोड ट्रीप मध्ये मिळू शकतात. नेहमीपेक्षा काहीतरी हटके वेगळ करायची इच्छा असणाऱ्यांना रोड ट्रीप नेहमीच खुणावत असते. अश्या ह्या सुंदर, रोमांचक प्रवासात किती काही घडतं. अलीकडच्या काळात भारतातल्या पर्यटकांना रोड ट्रीप हटके करण्यासाठी खूप पर्याय मिळत आहेत. आणि अश्या रोड ट्रीपचा थ्रील अनुभवण्याचा कल वाढलेला दिसतो आहे. गाडीत सामान भरून नाहीतर बाईकवर एक रस्ता धरायचा आणि सरळ सुटायचं!! जिथे वाट नेईल तिथे...भारत निसर्ग संपन्न देश आहे. विविधतेनी नटलेला देश आहे जे बाहेर पडल्याशिवाय अनुभवता येत नाही.. भारतातही असे काही कमी रस्ते नाहीत जे खास आहेत आणि तुमची ट्रीप सुंदर करतात! त्यातल्याच काही सुंदर, देखण्या आणि नवीन अनुभव देणाऱ्या रोड ट्रिप्स! आयुष्यात एकदातरी अनुभवाव्या अश्या रोड ट्रिप्स, ज्या आयुष्यात खूप काही नवीन दाखवून जातील. अश्या रोड ट्रिप्स मन प्रसन्न तर करतीलच पण खूप नवीन अनुभव देऊन जातील. निसर्गाच्या अधिक जवळ जाता तर येईलच पण त्या ठिकाणच्या लोकांशी सुद्धा तुमचा संवाद होऊ शकेल. फक्त रस्ते नवीन असतील त्यामुळे काळजी घेतली, थोडी माहिती आधी पाहून घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि सुखकर नक्कीच होईल. आणि अडचणी येणार नाहीत.
* भारतात असे बरेच पर्याय आहेत जिथे रोड ट्रीप करता येते आणि अशी ट्रीप नक्कीच रोमांचकारक असते. प्रत्येक ट्रीप मध्ये काही नवीन अनुभव तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला अनुभव संपन्न करतील. त्याचबरोबर तुमच्या गाठीशी बऱ्याच आठवणी जोडल्या जातील. प्रत्येक ठिकाणाची अशी वेगळी आठवण असेल आणि ती आठवण नेहमीच तुम्हाला प्रसन्न करत राहील. कुठे जाऊन रोमांचक अनुभव घेऊ शकाल त्याची यादी-
१. जयपूर ते जैसलमेर-
जयपूर ते जैसलमेर मार्गावर रोड ट्रीप चा आनंद काही वेगळाच येतो. ह्या मार्गात असलेली छोटी छोटी शहरं, गावं तुमचं आदरातिथ्य करायला सज्जच असतात. तिथलं राहणीमान, त्यांचे पेहराव, संस्कृती, स्वादिष्ट जेवण सगळंच अनुभवायला एकदा तरी जयपूर ते जैसलमेर रोड ट्रीपचा आनंद घेण मस्ट आहे.
अंतर : 570 किलो मीटर अंतर साधारण 9 तासात पार होऊ शकते.
टीप : कुंभलगढचा कुंभलगढ किल्ला आणि वाईल्डलाइफ सँक्च्युरीसठी वाटेत थांबायला विसरू नका.
२. दिल्ली ते लेह-
अप्रतिम सृष्टिसौंदर्य लाभलेल्या या प्रदेशाच्या सफरीवर जून ते सप्टेंबर दरम्यान जाता येऊ शकते. बाईक किंवा कार यापैकी काहीही चालेल. रोहतांग पास, जांस्कर रेंज, नुब्रा घाटी, हिमालयातील विलोभनीय शिखरे.. अजून बरच काही ह्या प्रवासात अनुभवता येते.
अंतर : 990 किलो मीटर म्हणजे साधारण 3 दिवस लागतीलच.
३. मुंबई ते गोवा-
पहाटे 5 च्या दरम्यान एनएच 17 मार्गे निघालात तर सूर्यास्तापर्यंत तुम्ही गोव्यात पोचू शकाल. अफलातून अनुभव घेत हा प्रवास रोमांचकारी बनतो.
अंतर : 615 किलो मीटर अंतर पार करायला 10 तास लागू शकतात पण सुंदर निसर्ग पाहत कधी संपेल कळणार देखील नाही.
टीप : हा मार्ग आणि तिथला निसर्ग नितांत सुंदर आहे. फक्त तुमचा कॅमेरा रेडी ठेवा.
४. बंगळुरू ते कुर्ग-
भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळख असलेलं कुर्ग तुम्हाला तिथल्या निसर्गासोबत खाद्य पदार्थांसाठीही नक्कीच आवडेल. पश्चिम घाटातला हा प्रवास संस्मरणीय आहे. निसर्गाच विलोभनीय दर्शन ह्या प्रवासात होईल आणि ह्या प्रवासात नक्कीच वेगवेगळे अनुभव घ्यायला मिळतील ह्यात काही शंका नाही.
अंतर : 260 किलो मीटर अंतर आहे आणि साधारण 5- 6 तासाचा रस्ता असेल.
टीप : म्हैसूर शहरात प्रवेश न करता श्रीरंगपटणच्या बायपासरोडने कुर्ग मार्गे जा. शहरातली वाहतूक कोंडी टाळता येईल.
५. जयपूर ते रणथंबोर-
जयपूर ते रणथंबोरचा प्रवासही तुम्हाला नक्की आवडेल. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलं तरी इथला पानगळीचा जंगलाचा थरारक अनुभवही रोमांचित करणारा आहे. छोटय़ा-छोटय़ा गावांमधून जाणारा रस्ता तसंच रस्त्याशेजारील धाबे तुमच्या ग्रुपमधील खवय्यांसाठी पर्वणी ठरू शकतात. आणि रोड ट्रीप ची मजा द्विगुणीत नक्कीच करतील.
अंतर : 180 किलो मीटर अंतर अंदाजे 4 तासात पार होऊ शकेल.
टीप : रणथंबोरला जाण्यासाठी जमल्यास टोंक मार्ग निवडा. या मार्गावरील रस्ते सुस्थितीत आहेत. शिवाय या रस्त्यांशेजारच्या धाब्यांवर मिळणाऱ्या दाल-बाटीची चव घ्या.
६. कोलकाता ते कुमाउॅँ-
कोलकातापासून कुमाउँला जाणारा मार्ग इतका सोयीस्कर आहे की अगदी नवखा ड्रायव्हरदेखील ही सहल मस्त एंजॉय करू शकेल. वाराणसीच्या घाटातून जाणारा मार्ग शिवाय थोडय़ा-थोडय़ा अंतरावर असलेले पेट्रोल पंप आणि हॉटेल्समुळे तुमच्या प्रवासाची अर्धी अधिक काळजी मिटते. आणि हा प्रवास नेहमीच लक्षात राहील.
अंतर : १३६३ किलो मीटर इतक अतर आहे. आणि साधारण ४ दिवस लागू शकतात पण प्रवासात कंटाळा येणार नाही हे अगदी नक्की.
टीप : वाटेत बिनसर अभयारण्यालाही भेट द्यायची असेल तर मेन रोडला लागून असलेल्या जर्मन बेकरीतही जाऊन या. इथल्या पिङझा आणि थुक्पाची चव जरूर घ्या.
७. मुंबई ते माऊंट अबू-
उन्हाळ्याच्या सुटीत अनेकजण आपलं गाव गाठतात किंवा जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देतात. आणि तुम्ही रोड ट्रीपची योजना करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्यासाठी माऊंट अबू चांगला ऑप्शन ठरू शकतो. इथला नक्की लेक रिलॅक्स होण्यासाठीचा उत्तम पर्याय. शिवाय अहमदाबादमध्ये थांबून हे शहर जाणूनही घेता येईल.
अंतर : 745 किलो मीटर अंतर आहे आणि 12 तासाच्या आसपास वेळ लागू शकतो.
टीप : एनएच 18 मार्ग सोयीस्कर. या मार्गावर भरपूर पेट्रोल पंप व धाबे आहेत.
८. अहमदाबाद ते दीव-
स्वच्छ समुद्रकिनारे ही इथली खासियत. पर्यटकांकडून थोडा दुर्लक्षित राहिलेला हा स्पॉट उन्हाळ्याच्या सुटीत भटकंतीसाठी मस्त! हा प्रवास प्रिय व्यक्तींबरोबर केल्याने नवीन आठवणी नक्कीच तयार होतील.
अंतर : हे अंतर 380 किलो मीटर आहे आणि अंदाजे 8 तास लागू शकतात.
टीप : धोलवीराला आठवणीने भेट द्या.
९. अहमदाबाद ते कच्छ-
कच्छला जाण्यासाठी डिसेंबर ते मार्चदरम्यानचा काळ सर्वात उत्तम. चंद्राच्या शीतल प्रकाशात चमकणाऱ्या कच्छच्या वाळवंटाचं सौंदर्य पाहण्याबरोबरच तिथली संस्कृती, हस्तशिल्प, पारंपरिक संगीत, जीवनशैली सारं काही अनुभवता येईल. शिवाय इथलं जंगली गाढवांचं अभयारण्यही पाहता येईल. म्हणजे ही रोड ट्रीप बरेच अनुभव देऊन जाईल.
अंतर : साधारण अंतर 400 किलोमीटर आहे आणि अंदाजे 7 तास प्रवास होऊ शकतो. आणि जो नक्कीच कंटाळवाणा होणार नाही.
टीप : इथल्या हस्तशिल्पांसाठी होदका गावाला आवर्जून भेट द्या.
१०. गुवाहाटी ते तवांग-
नॉर्थ इस्ट मध्ये प्रवास करावाच असा हा रस्ता आहे. सुंदर भोवताल प्रत्येक क्षणी तुमच मन प्रसन्न करेल. गुवाहाटी ते तवांग मार्गावर चेरापुंजी, इंफाल, काझीरंगासारखे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर पिकनिक स्पॉट आहेत त्याच दर्शन घ्यायचं नक्की विसरू नका.
अंतर : ५२० किलो मीटर अंतर आहे जे तुम्ही तुमच्या मर्जीने पार करू शकता पण अंदाजे १० तास ह्या प्रवासाचा आनंद नक्की घेता येईल. जर एखादी जागा खूपच आवडली तर तिथे थांबून आठणींमध्ये भर घालू शकता.
टीप : तवांगला जाताना बोम्दिलामार्गे जाणे श्रेयस्कर ठरू शकते. येताना तुम्ही भालुकपोंग येथे थांबू शकता. हादेखील एक चांगला पिकनिक स्पॉट आहे. तवांग मार्गावर अनेक चहा, मोमोजचे स्टॉल्स आढळतात. आणि चहा, मोमोज बाजोबर निसर्ग पाहतांना तुमच्या ट्रीपची मजा नक्कीच वाढेल.
* नमूद केलेली अंतरे अंदाजे लिहील आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ पण फक्त अंदाज यावा म्हणून लिहिला आहे.