निर्भया - १४ -
"माझं मन दीपानं जिंकून. घेतलंय." या सुशांतच्या म्हणण्यावर बाबा म्हणाले, " मग उद्या सुप्रियाच्या घरी जाण्यात काहीच हशील नाही. तू अगोदर सांगितलं असतंस तर उद्याचा कार्यक्रम आम्ही ठेवला नसता." बाबांना राग आला नाही, हे पाहून सुशांतच्या मनावरचं बरंचसं ओझं कमी झालं. तरी त्याला मुख्य काळजी होती, आईची प्रतिक्रिया काय असेल याची! पण वसुधाताईंनीही त्याला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
" ते आपली वाट बघतील! आपण असं करूया; अगोदर त्यांच्याकडे जाऊया आणि मग दीपाच्या घरी जाऊ. चालेल?" आईने विचारलं.
" नको आई! नाहीतरी मी सुप्रियाला नकार देणार हे नक्की असताना उगाच तिथे जाणं मला काही पटत नाही. काही कारणास्तव येऊ शकत नाही, असं कळवूया." सुशांत त्याच्या मतावर ठाम होता.
सुशांतला वाटलं होतं, तसा त्याच्या आईला त्याचा राग आला नव्हता. उलट आपल्या मुलाला कोणीतरी मुलगी मनापासून आवडली आहे याचा त्यांना आनंदच झाला होता. मुलगा आनंदात असणं त्यांच्यासाठी अधिक महत्वाचं होतं. मुलींपासून नेहमीच चार पावले दूर रहाणा-या सुशांतला आवडलेल्या मुलीमध्ये नक्कीच विशेष गूण असणार. त्यांना तर उद्या कधी तिला पाहते असं झालं होतं. त्या आतुरतेने दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागल्या.
*********
दुस-या दिवशी सुशांतचे आई - बाबा ठरल्याप्रमाणे दीपाच्या घरी आले. सुंदर आणि सोज्वळ दीपा त्यांना पाहिल्याबरोबर पसंत पडली. महिन्याभरात दोघांचं लग्नही झालं. सुशांतच्या सहवासात हळूहळू ती पूर्वीच्या कटु स्मृती अाणि दुःख विसरून गेली आणि नव्या जोमाने आयुष्य जगू लागली. शिवाय नाशिकमध्ये तिच्याविषयी माहिती असणारे परिचित लोक आजूबाजूला नसल्यामुळे तिला नको असलेल्या नजरांचा सामना करावा लागत नव्हता. नवीन वातावरणात ती आत्मविश्वासाने वावरू लागली.
पण सहा महिन्यातच सुशांतची बदली परत मुंबईला झाली.
शेतीकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे सुशांतच्या आई-बाबांना गावी रहाणे भाग होते. सुशांतच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. ब-याच वेळा ते रात्री उशीरा घरी येत. घरी दिवसभर एकटे रहाण्यापेक्षा दीपाने परत हाॅस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. सुरूवातीला तिला भिती वाटत होती; की आता परत पूर्वीच्या वातावरणाचा सामना करावा लागणार, पण आता इन्स्पेक्टर सुशांत सारखा खंदा पाठीराखा तिला मिळाला होता. त्यामुळे आता तिच्याविरूद्ध ब्र काढायची कोणाची हिंमत नव्हती. ज्यांनी तिला सतत अपमान करून जगणं मुष्किल केलं होतं, तेच लोक आता तिला सन्मानाने वागवत होते.
लग्नानंतरची दोन वर्ष, दोन दिवसांसारखी गेली. पण दोन वर्ष झाली तरी घरात पाळणा हलत नाही हे पाहून सुशांतची आई अस्वस्थ झाली. एकदा काही दिवसांसाठी मुंबईला आली असताना, न राहवून त्या दीपाला म्हणाल्या,
" दादरला आमच्या ओळखीचे एक चांगले गायनाकॉलॉजिस्ट आहेत आपण त्यांना भेटू या का? काही प्रॉब्लेम असेल तर वेळेवर उपचार केलेले बरे!" त्यांचा स्वर समजावणीचा होता. लाडक्या सुनेचं मन दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
दीपा त्यावेळी काही बोलली नाही; पण सुशांतला हे सांगताना ती भावनाविवश झाली.
" मी त्यांना कसं सांगू की मी कधीच आई होऊ शकणार नाही! त्या पार कोलमडून जातील. नातवंडं मांडीवर खेळावी ही त्यांची इच्छा अगदी नैसर्गिक आहे. जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा मला खूप अपराधी वाटत होतं. तुम्ही माझ्याशी लग्न करून त्यांना खूप दुःख दिलंय. आता त्यांना सत्य सांगितलंच पाहिजे. त्यांना अंधारात ठेवणं मला योग्य वाटत नाही ." ती रडू आवरत म्हणाली.
"तू शांत हो आणि विचार कर ! मी तुला मागे म्हणालो त्याप्रमाणे जर आपल्याला लग्नानंतर समजलं असतं, की आपल्याला मूल होऊ शकत नाही, तर आपण एकमेकांना सोडून दिलं असतं कां? नाही नं? मी आईला समजावतो. तू काळजी करू नको." सुशांत तिला धीर देत म्हणाले."
" तुम्ही त्यांना समजावाल; पण आपल्या घरात कधीच मूल खेळणार नाही, ही तर वस्तुस्थिती आहे! आणि माझ्यामुळे हे दुःख फक्त त्यांनाच नाही; तुम्हालाही स्वतःबरोबर आयुष्यभर वागवावं लागणार आहे; ही खंत नेहमीच माझ्या मनात राहील. आता मला वाटतंय की तुमच्याशी लग्न करून मी तुमच्यावर मोठा अन्याय केलाय!" दीपाला होणारा पश्चात्ताप तिच्या स्वरात जाणवत होता.
" मुलं म्हणजे संसारातील मोठं सुख आहे हे मलाही मान्य आहे. पण तो सुखी संसाराचा अंतिम टप्पा नाही. जर तसं असतं, तर गोड मुलं असलेल्या अनेक जोडप्यांनी घटस्फोट का घेतला असता? मी तुझ्या सहवासात अत्यंत सुखी आहे. " सुशांत दीपाला समजावत होता.
सुशांतच्या बोलण्यात तथ्य आहे, हे दीपा नाकारू शकत नव्हती. तिला काही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
तिची जवळची मैत्रीण मीनल काही दिवसांपूर्वी तक्रार करत होती. तिला दोन वर्षांपूर्वी मुलगा झाला. खूप आनंदात होती. त्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवत होती. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही. सुरूवातीला तिचा नवरा संतोष तक्रार करत असे की तू मला पुर्वीसारखा वेळ देत नाहीस. तुझ्यातला चार्म संपून गेलाय. तिने त्यावेळी त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण काही दिवसांनी तो जास्त वेळ घराबाहेर काढू लागला. " घर, बाळ आणि नोकरी--- सर्व आघाड्या सांभाळताना माझे अक्षरशः हाल होतायत. पण तो सोइस्करपणे दुर्लक्ष करतोय. अत्यंत आत्मकेंद्रित झालाय तो! हल्ली तर त्याने घरी पैसे देणंही कमी केलंय. जर कुळाचं नाव मोठं व्हावं, म्हणून यांना मुलं हवी असतात; तर त्याला वाढवण्याची संस्कार देण्याची थोडी तरी जबाबदारी त्यांनी घ्यायला नको का? आणि जेव्हा तो उशीरा घरी येतो, तेव्हा आॅफिसचं काम करत नसतो; ही खात्री मी करून घेतलीय. मी सुद्धा सहनशक्ती संपली, की रोहनला घेऊन वेगळी होणार आहे." मीनलचा संताप अवाजवी नव्हता.
"घाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. स्वतःसाठी नाही, पण तुझ्या लाडक्या रोहनसाठी संसार वाचवण्याचा प्रयत्न कर." दीपाने तिला आपुलकीचा सल्ला दिला होता.-----
हा प्रसंग आठवला; आणि सुशांत जे बोलतोय त्यात तथ्य आहे हे तिच्या लक्षात आलं. पण हे खरं असलं तरी आईंच्या स्वप्नांचं काय? आणि मनाची समजूत कितीही घातली ,तरीही आपल्या संसारात ही कमतरता नेहमीच रहाणार आहे, हे दु:ख तिला स्वतःलाही होतं. यावर काही तोडगा निघेल अशी आशा तिला नव्हती.
********
मी आईला समजावतो असं आश्वासन सुशांतने दीपाला दिलं खरं, पण आता त्यांनाही काय करावं; सुचत नव्हतं. ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, पण आज त्यांचं कामात लक्ष नव्हतं.
"आईला दीपाविषयी सर्व काही सांगावंच लागेल. त्याशिवाय आता गत्यंतर नाही. नाहीतर हा विषय आई सतत काढत रहाणार. आणि दीपाला प्रत्येक वेळी मनस्ताप होत रहाणार. आज रात्रीच तिला सांगावं लागेल. गेल्या काही दिवसांत ती दीपावर मुलीप्रमाणे माया करू लागली आहे. त्यामुळे हे सत्य कटू असलं, तरी ती दीपाच्या प्रेमाखातर नक्कीच समजून घेईल." हा निर्णय घेतल्यावर त्यांना मनावरचा ताण हलका झाला.
"साहेब, पेढे घ्या. विकास दादाने पाठवलेयत. सगळ्यांना वाटायला सांगितलंय." त्यांचे सहकारी मित्र जाधव पेढ्यांचा बाॅक्स त्यांच्या समोर ठेवत म्हणाले. आज ते खूप आनंदात दिसत होते.
" विकासदादा तुमचा मोठा भाऊ नं? पेढे कशासाठी? " सुशांतने चौकशी केली.
" त्याने कालच एक मुलगी दत्तक घेतली. लग्न होऊन दहा वर्षे झाली. अनेक अौषधोपचार, नवसायास झाले,पण पदरी निराशा आली. योग्य वय असताना मूल वाढवणं सोपं असतं. म्हणून हा निर्णय घेतला. खुप गोड मुलगी आहे. अवघ्या सहा महिन्यांची ! आम्ही तिचं नाव निशिगंधा ठेवलंय. त्याचे हे पेढे." जाधव हसत म्हणाले.
आता सुशांतना गर्द अंधारात आशेचा किरण दिसू लागला होता.
**********
त्या दिवशी सुशांत आणि दीपाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. ते आईला आणि दीपाला म्हणाले, " संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचंय. मी लवकर घरी येईन. तुम्ही तिघं तयार रहा."
"पण कुठे जायचंय ते तरी सांग! दीपाच्या आईला भेटायला जायचंय का?" आईने विचारलं .
" ते मी संध्याकाळी सांगेन तुम्ही दोघी तयार रहा. आणि बाबांनाही तयार रहायला सांगा. मी घरी आलो; की लगेच आपल्याला निघायचंय." सुशांत निघता निघता म्हणाले.
संध्याकाळी सुशांत कधी नव्हे ते अगदी वेळेवर आले. त्या दोघीही तयार होत्या. त्याचा चहा झाल्याबरोबर सगळे निघाले . त्याने गाडी थांबवली तिथे अनाथाश्रमाची पाटी पाहून आई म्हणाली, "लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुला अनाथाश्रमाला देणगी द्यायचीय का? फार चांगली कल्पना आहे."
सुशांतचं बहुतेक संचालकांशी अगोदरच बोलणं झालेलं होतं. त्यांनी चौघांचं चांगलं स्वागत केलं. त्यांना आश्रम दाखवला.आईवडिलांचं छत्र हरवलेली ती लहान लहान मुलं बघून वसू्धाताईंना गलबलून आलं.
अनाथाश्रमात मुलांबरोबर त्या खूप रमल्या. त्यांना तिथल्या मुलांबरोबर गप्पा मारताना पाहून सुशांत म्हणाले,
"आई जर चांगले पालक मिळाले तर यांच्या आयुष्याला चांगले वळण लागेल. अशी अनेक दांपत्ये असतात जी इतर बाबतीत सुखी असतात पण अपत्यासाठी झुरत असतात जर या मुलांना त्यांनी आधार दिला तर या मुलांना आईवडील मिळतील आणि त्यांचीही अपत्य वाढवण्याची, त्यांच्या आयुष्याला आकार देण्याची इच्छा पूर्ण होईल." बोलताना सुशांत आईच्या चेहऱ्यावरील भाव पाहात होते. ते येथे का घेऊन आले आहेत , हे आता वसुधाताईंच्या लक्षात येत होतं .
"हो! पण आपलं मूल ते आपलं मूल असतं. ते नातं बाहेरून आणलेल्या मुलाशी कसं निर्माण होणार? त्या तिथून उठून बाहेर पडत म्हणाल्या. सुशांतचा तिथे येण्याचा हेतू कळल्यावर आता त्या मुलांशी खेळण्यात त्यांना स्वारस्य वाटत नव्हतं.
"आई! सहवासाने प्रेम आपोआप निर्माण होतं. कोणतंही लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. ज्या संस्कारात वाढेल ते संस्कार घेणार. आपण प्रेमाने मायेने वाढवलं तर साहजीकच त्याच्या मनातही आपल्याविषयी प्रेम निर्माण होणार." सुशांत आईला समजावण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्या काहीही न बोलता गाडीत जाऊन बसल्या. दीपाला तिथून निघावंसं वाटत नव्हतं; पण तीसुद्धा त्यांच्या मागोमाग निघाली.
घरी गेल्यावरही आईचा राग कमी झालेला नव्हता.
"तुमचं अजून वय गेलेलं नाही. होतील मुलं ! मूल दत्तक घ्यायची एवढी घाई कशाला हवी?" त्या सुशांतना म्हणाल्या .
"हो होतीलही कदाचित! पण यांच्यापैकी एक मूल वाढवण्याची आपली परिस्थिती नक्कीच आहे. तुम्ही दोघं गावी असता, तेव्हा दीपा घरी एकटी असते . माझ्या ड्युटीच्या वेळा ठरलेल्या नसतात. ब-याच वेळा घरी परतायला रात्र होते. एकटी राहून खूप कंटाळते! तिलाही सोबत मिळेल. एवढ्या लांब नोकरीसाठी जायची गरज रहाणार नाही." त्यांचं हे बोलणं वसुधाताईंना पटत होतं, पण परंपरागत विचार त्यांना ते मान्य करू देत नव्हते.
********
******* contd... part - 15 -