अमोल गोष्टी
पांडुरंग सदाशिव साने
७. आई, मी तुला आवडेन का?
''माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारटयास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावयास आले. चल, ऊठ घे त्या शांतीला व खेळव झोपाळयावर तिला. उठतोस की नाही; का घालू कमरेत लाथ-''संतापलेल्या आईचे वाग्बाण विश्वनाथाच्या हृदयास घरे पाडीत गेले. विश्वनाथ दिसायला हूड होता. परंतु बाहेरून कठोर दिसणारे त्याचे हृदय मृदू व प्रेमळ होते. त्याचा खरा स्वभाव कोणालाच कळला नव्हता. प्रेमाच्या व सहानुभूतीच्या अभावी त्याचे हृदयपुष्प कोमेजून जात होते.विश्वनाथ पुण्यास आपल्या मामांकडे शिकावयास राहिला होता. परंतु तेथे त्याचे पटेना व तो तीनदा घरी पळून आला. या वेळेस तो घरी पळून आला त्या वेळेस त्याची एकुलती एक बहीण आजारी होती. या बहिणीवर सर्वांचा जीव. ती खरोखर फार गुणांची होती. सासरी तिचे किती हाल होत, परंतु ते माहेरी तिने कधी सांगू नये. फक्त या दुखण्यात मात्र वातात ती ते सर्व बोलली. तिला एक मुलगी होती. तिचे नाव शांती. शांती लहान आठ-दहा महिन्यांची होती. परंतु तापात आईजवळ कशी द्यावयाची? तिला सांभाळण्यास कोणी तरी लागे. विश्वनाथ तिला घेऊन घेऊन कंटाळला व त्याने शांतीस खाली ठेवून दिले आणि शांतीने रडण्यास आरंभ केला. आणि मग वर सांगितल्याप्रमाणे विश्वनाथास त्याच्या आईने वाग्बाणांनी घायाळ केले.आयुष्यात असे काही क्षण येतात की, त्या वेळेस सर्व आयुष्यास निराळेच वळण मिळते. उनाड उद्योगशील होतात, चोर साव होतात, गर्विष्ठ नम्र होतात. विश्वनाथाचे तसेच झाले. त्या क्षणापासून विश्वनाथ निराळा झाला. तो शांतीस जराही रडू देत नसे. रात्रीच्या वेळी आपल्या बहिणीच्या तप्त कपाळावर ताम्हणात गार पाणी घालून तो ते धरून बसे. त्या खेडेगावात बर्फ व बर्फाच्या पिशव्या कोठून मिळणार? विश्वनाथ बहिणीच्या शुश्रूषेत तहान, भूक, झोप सर्व विसरून जाऊ लागला.
गावातील सर्व वैद्य थकले, पण बहिणीच्या दुखण्यास उतार पडेना. एक दिवस विश्वनाथ आपल्या आजोबांस म्हणाला, ''आजोबा, त्या आयुर्वेद ग्रंथात आपण आक्काच्या दुखण्याची लक्षणे पाहून एक काढा ठरवू या.'' नातवाचा पोक्त विचार आजोबांस पटला. ते मराठी पुस्तक दोघेजण पाहू लागले. त्यांनी एक काढा ठरविला. आजोबा म्हणाले, ''आता देवावर विश्वास, हा काढा द्यावा झाले.''विश्वनाथ आक्कास काढा करून देई. काढयाजवळ तोच चुलीजवळ बसत असे.
आज पहाटेची वेळ होती. बाहेर झुंजमुंजू होते तोच विश्वनाथ आज समुद्रतीरी गेला होता. विश्वनाथाचे गाव समुद्रकाठी होते. अफाट समुद्राकडे विश्वनाथ पाहात होता. ते त्याचे डोळे पाहा. त्याच्या हृदयसागरातील लाटा डोळयांवाटे बाहेर पडून समोरच्या समुद्रास मिळू पाहात होत्या. विश्वनाथ कसचा बरे विचार करीत आहे? ते पाहा उगवत्या सूर्यनारायणाला त्याने हात जोडले व म्हणत आहे, ''देवा, माझ्या बहिणीस माझे आयुष्य दे; मला मरण दे. माझ्या आईस मी आवडत नाही. तुझ्याकडे येऊन मी चांगला होईन व मग पुन्हा आईकडे येईन. देवा, माझी प्रार्थना ऐक; बाबराची प्रार्थना तू ऐकलीस तशी माझी पण ऐक.'' विश्वनाथ घरी निघून गेला.विश्वनाथाच्या बहिणीस उतार पडू लागला. विश्वनाथास वाटले, 'देवाने प्रार्थना ऐकली.' विश्वनाथ आनंदी दिसू लागला. घरात आनंद वाटू लागला. परंतु हा आनंद फार दिवस राहावयाचा नव्हता.एक दिवस सायंकाळी विश्वनाथ समुद्रकिना-यावरून आला तो तसाच अंथरुणावर जाऊन निजला. तो आज जेवला नाही, खाल्ला नाही. बोलला नाही, चालला नाही. थोडया वेळाने विश्वनाथाची बरी झालेली अशक्त बहीण त्याच्याजवळ गेली व म्हणाली, ''का रे, बरे नाही का वाटत?'' असे म्हणून तिने त्याच्या कपाळास हात लावून पाहिले, विश्वनाथाची उशी रडून भिजून गेली होती, त्याचे कपाळ सणसणले होते. त्यास फणफणून ताप आला होता, आक्का बरी झाली नि विश्वनाथ आजारी पडला.
विश्वनाथाचा ताप दोषी होता. चढउतार होत होता. आज दोन दिवस तर तो वातातच होता. ताप उतरावा म्हणून शंकरावर अभिषेक, अनुष्ठाने चालली होती. शंकराची पिंडी रोज थंड दहीभाताने लिंपण्यात येत होती. विश्वनाथाचा ताप दैवी किंवा मानवी प्रयत्नांनी हटला नाही.''आई, मी तुला आवडत नाही; तर देवाकडे जातो व चांगला होऊन येतो, मग तर तुला आवडेन ना! मग मला रागाने नाही ना बोलणार?'' वातात विश्वनाथ असे बोलत होता. ते शब्द ऐकताच त्याच्या उशाशी खिन्न व सचिंत बसलेल्या त्याच्या आईचे हृदय चरकले. तिला त्या दिवशीची आठवण झाली. भरल्या डोळयांनी ती म्हणाली, ''बाळ, नको रे असे बोलू; नाही बरे माझ्या बाळास रागाने बोलणार!'' परंतु आईचे शब्द विश्वनाथास कोठे समजत होते? चूक वेळेवर बरोबर कळावी लागते, मग उशीर होतो.
'देवा, मला ने व माझ्या आक्कास वाचव, ही माझी प्रार्थना तू ऐकलीस वाटते. मग फार काही वाईट नाही तर मी-'' विश्वनाथ वातात बोलत होता. ते शब्द ऐकून त्याच्या बहिणीच्या खोल गेलेल्या डोळयांतून मोत्यांसारखे घळघळ अश्रू येऊ लागले.
आज विश्वनाथ शुध्दीवर आला होता. तो आपल्या खोल गेलेल्या आवाजाने आईस म्हणाला, ''आई, घे ना माझे डोके तुझ्या मांडीवर! घे, हां. मी आता सांगतो तसे करा-मी की नाही माझे मृत्युपत्र करतो.'' विश्वनाथाने 'मृत्युपत्र' शब्द ऐकला होता, त्याच्या मास्तरांनी त्याचा अर्थ त्याला समजावून दिला होता.''बाळ, नकोरे असे बोलू. माझ्या बाळाला देव उदंड आयुष्य देईल.'' ''छे, आई, आता मी बरा होणार नाही. मी की नाही देवाला प्रार्थनाच केली होती की मला ने. तो मला नेणार. आई, माझी रामाची तसबीर आहे ना, ती माझा मित्र नारायण आहे ना, त्याला दे.'' दम लागला म्हणून विश्वनाथ थांबला. पुन्हा क्षीण स्वराने तो म्हणाला,''माझा पोपट त्या नामदेवास द्या. कारण तो प्रेमळ आहे. तो त्याला वेळच्या वेळी खावयास-प्यावयास देईल आणि माझा मोगरा, त्याला कोणीतरी पाणी घाला, नाहीतर तो सुकून जाईल. माझी चांदीची झारी शांतीला द्या. कोठे आहे ग शांती? ती पाहा हसते आहे गुलाम. शांते, आता रडत जाऊ नकोस, आक्कास त्रास देऊ नकोस, आता मी नाही हो तुला घेणार. आजोबा-बाबा-'' अडखळत सर्व प्राण कंठी एकवटून विश्वनाथ बोलत होता, ''आई, माझे सर्व मित्र बोलाव ना! अरे, हे तर आलेच आहेत, मग आत का नाही आलात? आई, आई, देवाने ऐकले म्हणून मी जातो-मी की नाही, चांगला होऊन येईल-आई-''विश्वनाथ किती क्षीण स्वराने हे बोलत होता. जाणा-या जिवाची ती शेवटची शक्ती होती. विश्वनाथ मातेच्या मांडीवर मलूल होऊन पडला आणि दोन-चार घटकांत त्याचे प्राणोत्क्रमण झाले.