अमोल गोष्टी
पांडुरंग सदाशिव साने
६. अब्बूखाँकी बकरी
(डॉ. जाकीर हुसेन हे सुप्रसिध्द शिक्षणशास्त्रज्ञ होते. वर्धा शिक्षण पध्दतीचे ते प्रमुख होते. हिंदीच्या परिचय-परीक्षेसाठी त्यांनी लिहिलेली ''अब्बूखाँकी बकरी'' ही सुंदर गोष्ट आहे. ती मनोहर व भावपूर्ण गोष्ट माझ्या सर्व वाचकांस कळावी म्हणून देत आहे.)हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.आल्मोडात एक मोठा मिया राहात होता. त्याचे नाव अब्बूखाँ. बक-यांचे त्याला फार वेड. तो एकटा होता. ना बायको, ना पोर. दिवसभर बक-या चारीत असे. त्या निरनिराळया बक-यांना तो गमतीगमतीची नावे ठेवी. एकीला कल्लू म्हणे, दुसरीला मुंगीया म्हणे, तिसरीला गुजरी, चौथीला हुकमी. तो बक-यांजवळ बसे व नाना गोष्टी करी. सायंकाळी बक-या घरी आणी व बांधून ठेवी.आल्मोडा ही पहाडी जागा. अब्बूखाँच्या बक-या पहाडी जातीच्या. अब्बूखाँ बक-यांवर इतके प्रेम करी, तरी त्या पळून जात. मोठा दुर्दैवी होता. बक-या पळून जात व एक लांडगा त्यांना मटकावी. अब्बूखाँचे प्रेम, सायंकाळचा दाणा, कशाचाही त्यांना मोह पडत नसे.ते दाणे, ते प्रेम त्यांना रोखू शकत नसे. पहाडी लांडग्याने भयही त्यांना डांबू शकत नव्हते. पहाडी प्राण्यांना स्वातंत्र्याची चाड असते. आपले स्वातंत्र्य कितीही मोठी किंमत मिळाली तरी गमविण्यास ते तयार नसतात. आनंद व आराम मिळावा यासाठी कैदेत पडणे त्यांना रुचत नसे.
अब्बूखाँच्या ध्यानात येत नसे की, बक-या का पळून जातात. तो त्यांना हिरवे हिरवे गवत चारी. शेजा-यांच्या शेतात चोरून चारून आणी. सायंकाळी दाणा देई. तरीही त्या बिचा-या पळून जात! लांडग्याला आपले रक्त देणे का पसंत करीत?अब्बूखाँने आता निश्चय केला की, बकरी नाही पाळायची. बकरीशिवायच राहावयाचे. तोही म्हातारा झाला होता. परंतु एकटयालाही काही करमेना. पुन्हा बिचा-याने एक बकरी आणली. बकरी लहान होती. पहिल्यानेच व्यायली होती. लहानपणीच आणली तर लळा लागेल असे म्हाता-या अब्बूखाँला वाटले. ही बकरी फार सुंदर होती. ती गोरीगोरीपान होती. तिच्या अंगावरचे केस लांब लांब होते. काळी काळी शिंगे जणू शिसव्याच्या लाकडावर कुणी नक्षी करून तयार केली होती. डोळे लालसर होते. बकरी दिसायलाच चांगली होती असे नाही, तर स्वभावही चांगला होता. अब्बूखाँचे हात ती प्रेमाने चाटी. लहान मुलाने धार काढली तरी ती पाय उचलत नसे. दुधाचे भांडे पाडीत नसे. अब्बूखाँला तर तिला कोठे ठेवू अन् कोठे न ठेवू असे होई. तिचे नाव काय ठेवले होते, माहीत आहे? चांदणी. चांदणीजवळ तो गप्पा मारी. पहाडातील लोकांच्या गोष्टी सांगे.
लहानशा अंगणात बक-या कंटाळून पळून जात असतील असे मनात येऊन त्याने एक नवीन मोठे वाडगे तयार केले. चारी बाजूंनी कुंपण घातले. चांदणीच्या गळयात लांब दोरी बांधली. त्यामुळे ती खुंटयाला बांधलेली असली तरी दूरवर फिरू शके.अब्बूखाँला वाटले की, चांदणी आता रमली. परंतु ती त्याची भूल होती. स्वातंत्र्याची भूक अशी लवकर मरत नाही. पहाडात स्वातंत्र्यात नांदणा-या जनावरांना चार भिंतीत मेल्यासारखे होते व गळयातील दोरी तोडण्याचा प्रयत्न सुरू होतो.एक दिवस सकाळी रवंथ करीत असता चांदणीचे डोळे एकदम पहाडाकडे गेले. सूर्य अद्याप डोंगराच्या आडच होता. त्याचे कोवळे सोनेरी किरण शुभ्र पहाडावर पडून अवर्णनीय शोभा दिसत होती. चांदणी मनात म्हणाली, ''तेथे किती मौज असेल? तेथील ती मोकळी हवा कोठे व इथली कोंदट हवा कोठे? तेथे नाचता-कुदता येईल, खेळता-खिदळता येईल. येथे तर अक्षय्य ही मानेला गुलामगिरीची दोरी. अशा या गुलामीच्या घरात दाणे खायला मिळतात म्हणून गाढवांना फार तर राहू दे. खेचरांना राहू दे. आम्हां बक-यांना विशाल मैदानातच मौज.''चांदणीच्या मनात हे विचार आले, या भावना उसळल्या आणि चांदणी पूर्वीची राहिली नाही. तिचा आनंद लोपला. तिचा हिरवा चारा आवडेना, पाणी रुचेना. अब्बूखाँच्या गप्पा तिला नीरस वाटत. ती कृश होऊ लागली. तिचे दूध आटले. सारखे पहाडाकडे डोळे. 'बें बें' करून दीनवाणी रडे, दोरीला हिसके देई. अब्बूखाँला बक-यांचे बोलणे समजू लागले होते. प्रेमामुळे त्यांची भाषा तो सहज शिकला. 'मला पहाडात जाऊ दे, येथे नाही माझ्याने राहवत' हे चांदणीचे शब्द ऐकून तो चमकला. त्याचे अंग थरारले. हातातील मातीचे दुधाचे भांडे खाली पडले व फुटले.
अब्बूखाँने करुण वाणीने विचारले, ''चांदणी, तूही मला सोडून जाणार?''ती म्हणाली, ''हो, इच्छा तर आहे.''अब्बूखाँ म्हणाला, ''येथे का तुला चारा मिळत नाही? सायंकाळी दाणे देतो, ते किडलेले असतात? आज चांगले दाणे आणीन.''बकरी म्हणाली, ''खाण्यापिण्याकडे माझे लक्षही नाही.''त्याने विचारले, ''मग का दोरी आणखी लांब करू?''ती म्हणाली, ''त्याने काय होणार?''अब्बूखाँने विचारले, ''मग पाहिजे तरी काय?''ती म्हणाली, ''पहाड. मला पहाडात जाऊ दे.''तो म्हणाला, ''वेडी आहेस तू. तेथे लांडगे आहेत. ते आले म्हणजे काय करशील?''ती म्हणाली, ''देवाने दिलेल्या शिंगांनी त्यांना मारीन.''
तो म्हणाला, ''वा:! लांडग्याला मारणार ना तू? वेडये, त्याने आजपर्यंत माझ्या किती बक-या मटकावल्या! त्या माझ्या बक-या तुझ्यापेक्षा मोठया होत्या. कल्लू बकरी तू पाहिली नाहीस. कल्लू का बकरी होती! छे. जणू काळे हरिण होते हरिण! कल्लू रात्रभर लांडग्यांशी शिंगांनी झुंजली. परंतु उजाडता उजाडता लांडग्याने शेवटी तिला मारले व खाल्ले.''चांदणी म्हणाली, ''गरीब बिचारी कल्लू. परंतु ते काही असो. मला पहाडातच जाऊ दे.''अब्बूखाँ रागाने म्हणाला, ''तू पण लांडग्याच्या पोटात जाऊ पाहतेस. मला सोडू पाहतेस. कृतघ्न आहेस तू. मी तुला जाऊ देणार नाही. तुला तुझ्या इच्छेविरुध्द वाचवणार. तुझा हेतू कळला. तुला घरात कोंडून ठेवतो, नाही तर संधी मिळताच पळशील.''''असे म्हणून अब्बूखाँने तिला घरात बांधले. दाराला कडी लावून गेला, परंतु बिनगजाची खिडकी उघडी होती. अब्बूखाँ बाहेर पडतो न पडतो तो चांदणी खिडकीतून पळून गेली!''उंच पहाडावर ती गेली. तिच्या आनंदाला सीमा नव्हती. मुकतीचा आनंद मुक्तच जाणे. तिने लहानपणी डोंगरावरची झाडे पाहिली होती. परंतु आज त्या झाडात काही विराळीच गोडी तिला वाटत होती. जणू ते सारे वृक्ष उभे राहून पुन्हा येऊन पोचल्याबद्दल तिला धन्यवाद देत होते, तिचे स्वागत करीत होते!
नाना प्रकारची फुले फुलली होती. शेवंतीची फुले आनंदाने हसू लागली. डोलू लागली. उंच उंच गवत चांदणीच्या गळयाला मिठी मारू लागले. तिचे अंग कुरवाळू लागले. बंधनात पडलेली ती छोटी बकरी पुन्हा आलेली पाहून त्या सा-या पहाडाचा आनंद गगनात मावेना. चांदणीची मन:स्थिती कोण वर्णील? आता ना ते बाडगे, ना ते कुंपण, ना ती गळयातील दोरी, ना तो खुंटा आणि तो पहाडातील सुगंधी चारा तसा गरीब अब्बूखाँला तर कधीही आणता येत नसे.चांदणी स्वातंत्र्याचा आनंद अनुभवू लागली. ती इकडे उडी मारी, तिकडे कुदी मारी, इकडे धावे, तिकडे पळे. ती पाहा घसरली, परंतु पुन्हा सावरली. आजवर बांधलेला उत्साह शतमुखांनी प्रगट होऊ लागला. एक चांदणी आली, परंतु सा-या पहाडात जणू नवचैतन्य आले. नवीन प्रकारचे तेज आले. जणू दहावीस बक-या सुटून आल्या होत्या! तिने गवत खाता खाता जरा मान वर करून पाहिले तो खाली अब्बूखाँचे घर दिसले. ती मनात म्हणाली, ''त्या चार भिंतींच्या आत मी कशी राहिल्ये? इतक्या दिवस त्या घरकुलात कशी मावल्ये? कसे सारे सहन केले?'' त्या उंच शिखरावरून तिला खालची सारी दुनिया तुच्छ व क्षुद्र वाटत होती.
सा-या जन्मात नाचली बागडली नसेल, हसली कुदली नसेल, इतकी ती आज हसली कुदली. वाटेत तिला एक पहाडी बक-यांचा कळप भेटला. त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. तरुण बकरेही तिच्याभोवती जमले. परंतु पांढ-या ठिपक्यांचा एक काळा बकरा होता; चांदणी व तो जरा लांब गेली. त्यांची काय बोलचाली झाली कोणाला माहीत? तेथे एक स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्याला कदाचित माहीत असेल. त्याला विचारा. परंतु तोही कदाचित सांगणार नाही.चांदणी पुन्हा बंधनात पडू इच्छीत नव्हती. तो ठिपकेवाला काळा बकरा निघून गेला. सायंकाळ झाली. सारा पहाड लाल झाला होता. चांदणी मनात म्हणाली, ''सायंकाळी झाली! आता रात्र येणार.''खाली पहाडात कोणी धनगर बक-यांना कवाडात कोंडीत होता. त्यांच्या गळयांतील छोटया घंटांचा आवाज येत होता. तो आवाज चांदणीच्या परिचयाचा होता. तो घंटांचा आवाज ऐकून ती जरा उदास झाली. अंधार पडू लागला. तो ऐका 'खू खू' आवाज एका बाजूने येत आहे.तो आवाज ऐकताच लांडग्याचा विचार चांदणीच्या डोक्यात आला. दिवसभर लांडग्याचा विचारही मनात आला नाही. खालून अब्बूखाँच्या बिगुलाचा, शिट्टीचा आवाज ऐकू येत होता. 'चांदणी, परत ये' असे तो आवाज म्हणत होता. इकडून लांडग्याचा 'खू खू' आवाज येत होता.कोठे जावयाचे? क्षणभर चांदणीने विचार केला. परंतु तिला तो खुंटा, त्या भिंती, ते कुंपण, ती गळयाभोवतालची दोरी, सारे आठवले. ती मनात म्हणाली, 'गुलामगिरीत जगण्यापेक्षा येथे स्वातंत्र्यात मरण बरे.' अब्बूखाँची शिट्टी ऐकू येईनाशी झाली. पाठीमागून पानांचा सळसळ आवाज झाला. चांदणीने मागे वळून पाहिले तो, ते टवकारलेले दोन कान. ते अंधारात चमकणारे दोन डोळे! लांडगा जवळ आला होता.
लांडगा जमिनीवर बसला होता. त्याने घाई केली नाही. आता कोठे जाणार ही पळून? असा त्याला विश्वास होता. बकरीने त्याच्याकडे तोंड केले. लांडगा म्हणाला, 'अब्बूखाँचीच बकरी, चांगली केली आहे धष्टपुष्ट!' त्याने आपल्या काळयासावळया ओठावरून आपली लाल जीभ फिरवली. चांदणीला कल्लू बकरीची गोष्ट आठवली. कल्लू उजाडेपर्यंत झुंजली, अखेर मेली. असे झुंजण्यात काय अर्थ? एकदम त्याच्या स्वाधीन का होऊ नये? असे चांदणीच्या मनात आले. परंतु पुन्हा म्हणाली, ''नाही, आपणास लढता येईल तोपर्यंत लढायचे.'' तिने शिंगे सरसावली. पवित्रा बदलला.चांदणीला का स्वत:ची शक्ती माहीत नव्हती? लांडग्याशी आपण टिकणार नाही हे तिला का कळत नव्हते? कळत होते. पण ती म्हणाली, ''आपल्या शक्तीप्रमाणे आपण शेवटपर्यंत झगडणे हे आपले काम. जय वा पराजय हे देवाहाती. कल्लूप्रमाणे उजाडेपर्यंत मला टक्कर देता येते की नाही हे पाहण्याची इच्छा होती. आली आहे वेळ. झुंजू दे मला.''
लांडगा पुढे आला. चांदणीने शिंगे सावरली. लांडग्यावर तिने असे हल्ले चढवले की, तो लांडगाच ते जाणे! दहा वेळा तिने लांडग्याला मागे रेटले. मध्येच ती प्रभात होऊ लागली की नाही हे पाहण्यासाठी वर पाही.एकेक तारा कमी होऊ लागला. चांदणीने दुप्पट जोर केला. लांडगाही जरा मेटाकुटीस आला होता. इतक्यात पहाटेची वेळ झाली. कोंबडयाने नमाजाची बांग दिली. खालच्या मशिदीतून 'अल्लाह अकबर' आवाज आला. चांदणी म्हणाली, ''देवा, पहाटेपर्यंत शक्तीप्रमाणे स्वातंत्र्यासाठी झुंजले. तुझे आभार. माझे काम मी केले. आता तुझी इच्छा प्रमाण.''मशिदीतील शेवटचा 'अल्लाह अकबर' आवाज आला व चांदणी मरून पडली. तिचे गोरे गोरे अंग रक्ताने लाल झाले होते. लांडग्याने तिला फाडले, खाल्ले. उजाडू लागले. झाडावरील पाखरे किलबिल करू लागली. तेथील झाडावरील चिमण्या चर्चा करू लागल्या, ''जय कोणाचा? लांडग्याचा की चांदणीचा?'' पुष्कळांचे मत पडले 'लांडग्याचा.' परंतु एक म्हातारी चिमणुलीबाय म्हणाली, ''चांदणीने जिंकले.''