Amol goshti - 4 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | अमोल गोष्टी - 4

Featured Books
  • ऋषि की शक्ति

    ऋषि की शक्ति एक बार एक ऋषि जंगल में रहते थे। वह बहुत शक्तिशा...

  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

Categories
Share

अमोल गोष्टी - 4

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

४. किसन

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिना-यावर शिंपा-कवडयाची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किना-यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प्रकारच्या समुद्रतीरावर उगवणा-या वेली वगैरे होत्या. या टेकडीवरून एकीकडून झाडीतून वर डोके काढणारी गावातील घरांची शिखरे, तर दुसरीकडे अफाट दर्या पसरलेला, असे मनोहर दृश्य दिसे. दूरवर पसरलेला तो परमेश्वराचा पाणडोह व त्यावर हंसाप्रमाणे पोहणारी ती शेकडो गलबते यांची मोठी रमणीय पण भव्य शोभा दिसे. सायंकाळ झाली म्हणजे गावातील मुले-मुली आपले चित्रविचित्र पोशाख करून येथील वाळवंटात किंवा टेडीवर खेळण्यास येत. टेकडीवरून घसरगुंडी करून खाली घसरत येण्याची मुलांना फार गंमत वाटे. सायंकाळी मावळत्या सूर्याचे सुंदर सोनेरी किरण लाटांशी शेवटची खेळीमेळी करताना पाहून आनंद होई. सूर्याचा तांबडा गोळा समुद्रात दूर क्षितिजाजवळ गडप होताना व त्या वेळची हिरवी निळी कांती दिसताना मनात शेकडो विचार उत्पन्न होत. रात्रीच्या वेळी तर समुद्राचा देखावा फरच सुंदर दिसे.हजारो ता-यांची प्रतिबिंबे पाण्यात पाहून जलदेवतांची ही वेषभूषणेच चमकत आहेत असे भासे. चंद्रमा उगवला व समुद्राच्या लाटांगणीक अनंत चंद्रमे खाली नटलेले पाहिले म्हणजे शेकडो चांद छातीवर लटकवून हा महासागर आपली अद्भूत शक्ती, आपले प्रभुत्व, आपली संपत्ती दाखविण्यास उत्सुक आहे असे वाटे. खरोखर ज्या गावाला समुद्र आहे तो गाव धन्य आहे. ईश्वराचे वैभव दाखवणारा समुद्र हा कुबेर आहे; हे ईश्वराचे भव्य सिंहासन आहे.ती पाहा संध्याकाळी झाली व मुले वाळवंटात खेळत आहेत. मुली कवडया जमा करीत आहेत. कोणी वाळूत किल्ले वगैरे बांधीत आहेत.परंतु थोडयाच वेळाने भरतीच्या लाट येऊन हे चिमुकले वाळूचे किल्ले कोठल्या कोठे जातील याची त्या मुलांस कल्पना आहे का? ती पाहा काही धीट मुले ढोपर ढोपर पाण्यात जाऊन गंमत करीत आहेत व मोठी लाट आली म्हणजे एकमेकांचे हात धरीत आहेत; समुद्राच्या लाटांवरील फेस पाहून ती पण खदाखदा हसत आहेत. पण त्या टेकडीवर पाहिलीत का ती तीन मुले? काय बरे त्यांचे भांडण चालले आहे? दोन मुलगे व एक मुलगी. ते दोन मुलगे आहेत ना, त्यांपैकी रतन हा जरा श्रीमंत आहे, परंतु किसन हा त्या मानाने गरीब आहे. त्या मुलीचे नाव लीला.

लीला लहान पण खेळकर होती. ती दिसावयासही चांगली होती. ती या दोघा मुलांची मैत्रीण. ही एके ठिकाणी खेळत, हिंडत, बागडत. संध्याकाळ झाली म्हणजे समुद्रकाठी ती तिघे खेळावयास येत. लीलाच्या घरी कधी थट्टेने म्हणत, की, ''लीला व रतन यांचा जोडा चांगला शोभेल. लीलाचे रतनशीच लग्न लावावे.'' या मुलांच्या कानावर ते शब्द पडत असत. लग्न म्हणजे काय याची त्यांस कोठे कल्पना होती! अल्लड त्यांची मने. तरी पण आज रतन म्हणाला, ''किसन, लिली माझी बायको होणार, लिली माझी होणार.'' किसन म्हणाला, ''नाही, माझीच होईल, पाहीन तुझी कशी होते ती!'' रतन म्हणाला, ''तू तर भिकारी, तुला कोण लिली देणार? लिली माझीच.'' हे ऐकून किसनला वाईट वाटले, म्हणून त्याला रडू आले.

लिली तर दोघांची मैत्रीण, तिला किसन जरा जास्त आवडे. कारण तो नाना प्रकारचे खेळ शोधून काढी. टेकडीवर सर्वांत आधी तो चढे. समुद्रात पोहण्यात तो पटाईत. म्हणून हा चपळ खेळाडू किसन तिला आवडे. ती म्हणाली, ''किसनदादा, रडू नको. अरे मी तुम्हां दोघांची लहानशी बायको, तर मग झाले-भांडू नका. आपण खेळू.'' लिलीच्या काल्पनिक जगात सर्व गोष्टी त्या वेळेस शक्य होत्या. व्यावहारिक जगाच्या घडामोडी अजून तिच्या मनास कोठे माहीत होत्या? लिलीच्या शब्दांनी किसन आनंदी झाला. ती तिघेजण गमतीचे खेळ खेळनू रात्र पडू लागल्यावर आपली माघारी गेली.बरीच वर्षे गेली. लिली व किसन यांचाच शेवटी विवाह झाला. कारण लिली काही घरची फार श्रीमंत नव्हती. तेव्हा रतनच्याच घरी देण्यास पैशाची अडचण आली. किसनचे घर लहानसे होते. त्याला रोज कामधाम करावे लागे. लिली पण घरी शिवणाचे वगैरे काम करी व या प्रकारे त्यांचे नीट चालले होते. किसन दमूनभागून घरी आला म्हणजे लिलीने गोड बोलून व काही खावयास देऊन त्याचा श्रमपरिहार करावा. घराशेजारी लिलीने लहानशी बाग केली होती. तेथे मोगरी, शेवंती लावल्या होत्या. शेवंतीची ती पिवळी फुले सोन्यासारखी शोभत. लिली मोठी टापटिपीची व गृहदक्ष गृहिणी होती. मिळेल त्यात मौज करावी व भालप्रदेशावर कधी म्हणून तिने आठी दाखवू नये. आठयांचे गाठोडे तिने समुद्रात फेकून दिले होते.रतनची व यांची आता कधी गाठ पडत नसे. रतनने विवाह केला नाही. रतनचे आईबापही त्यास सोडून गेले. रतनच्या घरात संपत्ती भरपूर होती; परंतु तो उदासीन असे. रात्र झाली तरी तो त्या टेडीवर बसे व 'मी तुमची दोघांची लहानशी बायको होईन.' हे शब्द तो आठवी, लहानपणच्या सर्व गोष्टी त्याला आठवत व त्या समोर पसरलेल्या सागराकडे त्याचा हृदयसागर मिळविण्यासाठी अश्रुपुराने बाहेर येई.

किसन यास दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन गोजिरवाणी नक्षत्रासारखी मुले होती. कोणीही त्या मुलांस उचलावे, त्यांचे मुके घ्यावे. सुंदर फुलास कोण घेणार नाही? शिरावर धरणार नाही? सुंदर वस्तू जगाचे दु:ख दूर करते.सुंदर वस्तू सुंदर असण्यानेच धन्य आहेत. तिने आपल्या सौंदर्याने समस्तांस रिझवावे व संसारास शोभा आणावी. किसन याची सोन्यासारखी मुले-पण किसन दिवसेंदिवस गरीब होत होता. मोलमजुरी अलीकडे भरपूर मिळत नसे. थंडीत त्या गोजि-या बाळांचे देह आच्छादण्यास पुरेसे कपडे नसत. त्यांना दूध वगैरे देता येत नसे. खेळणी आणता येत नसत. त्यामुळे किसन कष्टी होई. लिली त्याचे समाधान करी, परंतु तो असमाधानीच राही.एक दिवस किसनच्या मनात आले. आपण व्यापारास जावे. दूरदूरच्या देशांत जाऊन व्यापार करावा व श्रीमंत व्हावे. 'साहसे श्री: प्रतिवसति।' साहस केल्याशिवाय भाग्यदेवता येणार कशी? येथे माश्या मारीत बसून काय होणार? धाडस करावे असे त्यास वाटले. त्याने आपला विचार लिलीस सांगितला. त्याबरोबर ती चरकली व म्हणाली, ''नको गडे! असे वेडेवाकडे धाडस करू नये.

समुद्र आता हसेल, हसवील; पण मग बुडवील, रडवील. कोकरांप्रमाणे, लहान मुलांप्रमाणे दिसणारा हा समुद्र मग राक्षसासारखा खवळतो व चेंडूप्रमाणे गलबतें फेकून देतो, बुडवितो. नको, येथेच मीठ-भाकर खाऊ. आपली मुले कसलाही हट्ट धरीत नाहीत. मोठी गुणी आहेत माझी बाळे! पाहा, पाहा, त्यांना एका पांघरुणात निजविले आहे, प्रत्येकास निरनिराळे पाहिजे असा हट्ट धरून नाही बसली ती!'' असे म्हणून तिने सर्वांत लहान मुलाचा निजला असताच एकदम पापा घेतला.आईचे प्रेमाचे पांघरूण असल्यावर मुलांस अन्य काय पाहिजे! अमृतमय आईच्या दृष्टीचा वर्षाव असला म्हणजे आणखी काय खाऊ पाहिजे? आईचा मुखचंद्रमा असल्यावर दुसरी भिकारडी खेळणी काय कामाची! पण हे किसनला कोठे पटत होते? तो म्हणाला, ''तुम्ही बायका अशाच भित-या. तुम्ही उत्साह देण्याऐवजी पाय मागे ओढणा-या. वेडी आहेस तू. रडावयास काय झाले? हजारो व्यापारी जातात व श्रीमंत होऊन येतात. मी तुला सिलोनच्या समुद्रातील मोती आणीन. हिंदुस्थानातील हिरे आणीन. अगं, धाडस केल्याशिवाय कसे होणार?'' लिली काही बोलली नाही. परंतु तिच्या प्रेमळ व सात्त्वि दृष्टीला काही तरी अशुभ दिसत होते. शेवटी एक दिवस किसनने व्यापारास जाण्यासाठी निघावयाचे ठरविले. एक मोठे गलबत बंदरात आले होते. त्यावर किसन पण चढला. आपली मुले घेऊन लिली समुद्रावर त्याला पोचवण्यास आली होती. रडून अपशकुन होऊ नये म्हणून तिने आपला अश्रुपूर अडवून ठेवला होता. पतीने मुलांचे मुके घेतले, लिलीने प्रेमळ व डबडबलेल्या डोळयांनी पाहिले व गेला. तो पाहा गलबतात किसन चढला व बाजूस लिलीकडे तोंड करून उभा आहे.गलबत हाकारण्यात आले. किसनचे तोंड अजून तेथेच बाहेर होते. लिलीस पिऊन टाकून तो आपल्या हृदयात साठवून ठेवीत होता का? गलबत लांब गेले; वळले. लिली माघारी वळली. दाबून ठेवलेला अश्रुपूर जोराने बाहेर पडला, परंतु मुलांस आपल्या रडण्याने कसेतरी होईल म्हणून तिने आपले रडे आवरले. डोळे पुसले, ''चला हां घरी.'' असे मुलांस म्हणून ती घरी आली.तिचे मन कशात रमेना. मुलांना तिने जेवू-खाऊ घातले व मुले फुलपाखरासारखी बाहेर खेळण्यास गेली. लिलीला जेवण नाही, खाणं नाही. एकंदर काही बरे होणार नाही असे तिला वाटे. समुद्रावर काय कष्ट होतील, वारे सोसाटयाचे येतील, आजारी तर नाही पडणार! ना जवळ कोणी मायेचे. शेकडो दु:खद विचार तिच्या हृदयात उसळत व तिच्या डोळयांतून खळखळा पाण्याचे पूर येत.

परंतु काळ हा सर्व दु:खावेग कमी करणारा आहे. दु:खावर सर्वांत मोठे औषध काळाचे आहे. या क्षणीची दु:खाची तीव्रता पुढल्या क्षणी नसते. मोठमोठी दु:खे काळ विसरावयास लावतो. काळ अश्रूंना आटवतो. कोमेजलेले मुखमंडल काळ पुन्हा खुलवतो. भरलेले डोळे तो पुसून टाकतो.लिलीचे दु:ख कमी झाले. दु:ख करावयास तिला वेळच नव्हता. या जगात कित्येक गरिबांस रडण्यास तरी कोठे अवकाश असतो! शेतातून व कारखान्यांतून कामे करावयास त्यांस डोळे पुसून जावे लागते.

किसनने घरात थोडीफार तरतूद करून ठेविली होती, तरी ती पुंजी फार दिवस पुरणार नाही हे लिलीस माहीत होते. शिवाय समुद्रावरची सफर ती ठरल्या वेळी थोडीच थांबणार व संपणार! चार चार महिन्यांची चार वर्षे व्हायची! म्हणून लिली आता मोलमजुरी करावयास जाई. मुलांस घरी खाण्यास करून ठेवावे व कामावर जावे. बारा वाजता येऊन मुलांनी खाल्ले की नाही ते पाहावे, त्यांना पोटभर पाहून, त्यांना पोटाशी घेऊन, प्रेमाची ऊब देऊन पुन्हा कामावर जावे.किसनची येण्याची मुदत संपली. एक वर्ष झाले. किसनचा पत्ता नाही. बंदरात येणा-या गलबताजवळ जाऊन लिली चौकशी करी. कोणी तिला हसत, कोणी थट्टा करीत. कोणी काही उत्तर देई. पतीची वार्त तिला समजेना. कधी दुस-या गलबताने पत्र नाही, निरोप नाही. काही नाही. घरातील पुंजी संपली. लिलीची मोलमजुरी पुरेशी होईना. ती स्वत: उपाशी राही व मुलांस खाण्यापिण्यास देई. एक दिवस मोठया मुलाने विचारले, ''आई, तू नाही ग जेवत?'' त्यावर लिली म्हणाली, ''हल्ली मी एक व्रत करते. ते रात्री सोडायचे. तुम्ही निजता, तेव्हा मी मग व्रत सोडते!'' मुलांची मने, समजूत पटली. लिलीचे शरीर कृश झाले. तिचे ता-यासारखे डोळे निस्तेज झाले.आज सणाचा दिवस होता. लिली आज कामावर गेली नव्हती. परंतु घरात मुलांस गोडधोड देण्यासही काही नव्हते. लिली खिन्न होऊन बसली होती. इतक्यात त्यांच्या घरात कोणीसे आले? 'आई आहे का रे घरात मुलांनो?' 'हो आहे, या.' 'आई, हे बघ कोण आले आहेत.'

आपले डोळे पुसून लिली बाहेर आली. तो कोण दृष्टीस पडले! दुसरे कोणी नसून लहानपणचा सवंगडी रतन. लग्न झाल्यापासून रतन लिलीजवळ कधी बोलला नाही. पण आज रतन आला होता. दोघांची मने भरून आली. बाळपणीच्या हजारो आठवणी मन:सृष्टीत जमू लागल्या. शेवटी रतन म्हणाला. ''लिले मी आलो म्हणून मजवर रागावू नको. तुझे कष्ट मला दिसतात. तुझ्या या मुलांबाळांससुध्दा पोटभर अन्न मिळत नाही हे मला दिसते. तू मरमर काम करतेस तरी भागत नाही. आज सणावाराचा दिवस, पण तू रडत होतीस. हे पाहा, पुन्हा आले अश्रू. लिले! मी तुला खिजविण्यासाठी आलो नाही. साहाय्य करण्यास आलो आहे. लिले! माझी धनदौलत मला काय करायची? तुझा पती परत येईतो मी तुला मदत करीन, ती तू स्वीकारीत जा. नाही म्हणू नकोस. लहानपणच्या प्रेमासाठी तरी नाही म्हणू नको. मला इतका परका लेखू नकोस. तुझा पती परत आला म्हणजे मी पुन्हा तोंड दाखविणार नाही. लिले, या लहान्यासाठी, बालपणीच्या प्रेमासाठी तरी मी देईन ती मदत घेत जा. घेईन म्हण! हे पाहा नवीन सुंदर कपडे तुझ्या मुलांसाठी आणले आहेत. हा खाऊ आणला आहे. बोलाव त्या मुलांस आत. आपण हे कपडे त्यांस नीट होतात का पाहू! हे पाच रुपये ठेव. मी दर रविवारी येत जाईन, कमीजास्त मला सांगत जा. तुझ्या मोठया मुलास शाळेत घातले पाहिजे. त्याला मी पुढचे वेळी पाटी घेऊन येईन. लिले, तू बोलत का नाहीस? माझा राग येतो का? बरे, आता मी जातो. तुझ्याने बोलवत नाही हे मला स्पष्ट दिसते आहे.'' असे म्हणून रतन बाहेर आला. त्या मुलांस घेतले, आंजारले, गोंजारले व निघून गेला. मुले चिवचिव करीत घरात आली. ''आई, कोण ग ते?'' इतक्यात तो खाऊ, ते कपडे सर्व त्यांना दिसले. ''आई, हे त्याने आम्हांला दिले, होय? हो आई?''

लिलीने अश्रू पुसले. मुलांच्या अंगात ते नवीन अंगरखे घातले. त्यांना खाऊ दिला. ती मुलांस म्हणाली, ''ते तुमचेच आहेत हो. ते पुढील रविवारी येतील आणि माणकूला पाटी आणणार आहेत.'' ''आणि मला, आणि मला-,'' असे ती ओरडू लागली. ''तुम्हांस खाऊ, बरे का? जा आता खेळावयास, मला काम आहे.'' मुले सुंदर पोशाख करून बाहेर आली. त्यांस आज राजाप्रमाणे वाटत होते.स्वाभिमानी माणसास दुस-याने आपली कीव करावी ही गोष्ट कधी आवडत नाही. लिलीसही आपण गरीब म्हणून रतनने येऊन ही सहानुभूती दाखवावी हे प्रथम आवडले नाही. परंतु रतनचे व आपले बालपणाचे संबंध तिला आठवले. लहानपणी आपण रतनची बायको होणार हे त्यास कसेसेच वाटे. त्याची भयंकर निराशा, आईबापांचे मरण या सर्व गोष्टींनी रतनच्या मनास किती कष्ट होत असतील हे तिला समजून ती रतनला नाही म्हणून शकली नाही. याच वेळेस किसनचे विचार येऊन तिचे मन पुन्हा भरून आले. आज सणाचा दिवस-आज ते कोठे असतील? एखाद्या दूर अनोळखी देशात, किंवा क्रूर समुद्राच्या भेसूर लाटांवर-का कोठे?

रतन दर रविवारी येई. मुलांस जवळ घेई. तो आता मुलांच्या ओळखीचा झाला होता. खाऊ देणा-यांची मुलांजवळ लौकर ओळख जमते. त्या मुलांस घेऊन तो समुद्रावर फिरावयास जाई. त्या टेकडीवर तो मुलांबरोबर पळत सुटे व अडखळला म्हणजे मुले हसत. ''मला हसता का रे गुलामांनो? पण मी लहान होतो तेव्हा तुमच्याहून जास्त पळत असे, आणि किसन तर-'' इतक्यात त्याने ओठ चावला. किसनच्या चपळाईची त्यास आठवण झाली, पण मुलांसमोर तो काही बोलला नाही. माणकू आता शाळेत जात असे. त्याला पाटील-पेन्सिल आणली होती. पाटी-पेन्सिलीचे हे सौभाग्य पाहून त्याला वाटे आपण केवढे मोठे झालो. रतन रविवारी आला म्हणजे माणकू म्हणे, ''दाखवू मी काढून 'गवताचा ग,' 'मगराचा म'-मला कितीतरी येते लिहावयास.''

किसनला जाऊन थोडेथोडके नाही, सहा वर्षांवर दिवस झाले. ना बोटभर पत्र, ना निरोप! समुद्राच्या लाटा व समुद्रावरचा वारा यांनीसुध्दा काही निरोप आणला नाही. किसनची काय बरे दशा झाली होती? किसन व्यापार करून संपत्ती घेऊन परत येत होता. परंतु दैव प्रतिकूल त्याला कोण काय करणार? आपण घरी जाऊन लिलीच्यापुढे हे द्रव्य ओतू व तिला सुखाच्या सागरात डुंबत ठेवू हे त्याच्या मनातले सुखमय विचार-पण क्रूर विधात्याला लोकांचे मनोरथ धुडकावून लावण्यात, चढणा-यास धुळीत मिळविण्यात आनंद वाटतो. किसनचे गलबत वादळात सापडले. सोसाटयाचा वारा व पर्वतप्राय लाटा आपले काळेकभिन्न जबडे पसरून खदखदा विकट हास्य करीत. त्या भीषण लाटा त्या गलबतास गिळंकृत करण्यास चौफेर धावून येत. गलबत वा-याने भडकले, खडकावर आपटले.

किसन पोहणारा पटाईत, समुद्राच्या लाटांशी तो दोन हात करीत होता. फुटलेल्या गलबताची त्याला एक फळी सापडली. तिच्या आधाराने तो किना-यास लागला. ओलाचिंब असा किसन किना-यावर आला. थंडीने तो काकडला; भुकेने कासावीस झाला. शेजारी लोक आहेत नाही हे पाहण्यास तो चालू लागला. किना-यापासून जवळच एक गाव होते. तेथील भाषा त्यास येत नव्हती; परंतु लोकांनी त्यास कपडेलत्ते दिले; खाण्यास अन्न दिले.

हळूहळू तेथील रीतिरिवाज तो शिकला. तेथून तो दुस-या गावी गेला. त्या देशाच्या राजाच्या पदरी तो नोकरीस राहिला. त्याची हुशारी व त्याचे गुण यामुळे तो मोठा अधिकारी झाला. राजाजवळ तो स्वदेशी परत जाण्यास परवानगी मागे. पण 'तू परत येणार नाहीस; येथेच लग्न करून राहा' असे राजा सांगे.किसनच्या डोळयांसमोर ती गोजिरवाणी मुले व लिली यांची मूर्ती उभी राही. त्यांची काय कंगाल हीनदीन स्थिती झाली असेल, माझी चातकासारखी वाट पाहून कशी निराश झाली असतील, वगैरे विचारांनी किसन कावराबावरा होई. एखादा दिवस तो आपल्या खोलीत खिन्न बसून काढी.आज मुलांबरोबर लिली पण टेकडीवर समुद्रावर फिरावयास आली होती. बरोबर रतन पण होता. मुले खाली वाळवंटात खेळू लागली. वाळूचे मनोरे रचू लागली. त्या टेकडीवर दोन दगडांवर लिली व रतन बसली होती. किती दिवसांनी लिली तेथे आली हाती. रतनच्या मनात एक गोष्ट विचारावयाची होती. पण किती दिवस त्यास धैर्य होईना. आज तो मनाचा हिय्या करणार होता. तो लिलीला हळूच म्हणाला, ''लिले, मी एक गोष्ट तुला विचारीन म्हणून म्हणतो. पण धीर होत नाही. आज विचारतो. तू अगदी रागावू नकोस. लिले, तू माझ्याशी लग्न लाव. लहानपणी तू म्हणाली होतीस 'मी तुमची दोघांची लहानशी बायको होईन.' ते आठव. आज आठ वर्षे झाली. किसनचा पत्ता नाही. समुद्राने त्याला दगा दिला असावा. नाही तर तो येता. पत्र अगर निरोप पाठवता. आता तू मला नाही म्हणू नकोस. लहानपणचे तुझे शब्द देवाने खरे करण्याचे ठरविले! का? लिले माझ्या या औध्दत्याबद्दल, स्पष्टपणाबद्दल रागावू नकोस.''लिलीच्या मनात काय आले, काय ठरले? ती म्हणाली, ''विचार करीन.'' सायंकाळ संपली व सर्व जण घरी गेले.मुले जेवून-खाऊन गुरफटून निजली. लिली एकटीच विचार करीत बसली. ती मनात म्हणाली, ''रतन म्हणतो, त्याप्रमाणे केले तर काय होईल? माझा पूर्व पती किसन खरोखरच या जगातून निघून गेला का? ते जिवंत असतील आणि येतील तर? परंतु शक्यच नाही. समुद्राच्या लाटांनी केव्हाच त्यास गिळंकृत केले असेल; त्याच वेळेला मला वाटले, 'काही तरी अशुभ होणार.' देवाच्या मनात मी दोघांची व्हावे असेल असेल का? काही हरकत नाही. रतनची मी पत्नी झाले तर-भगवंता! माझ्या मनात पाप नाही; संपत्तीचा, सुखाचा माझ्या मनात अभिलाष नाही. लहानपणचे हे दोन सवंगडी-मी दोघांची होते.''

लिलीने ठरविले. पुन्हा रतन भेटला. लिली म्हणाली, ''सहा महिने थांबू व मग आपण पतिपत्नी होऊ.'' रतनचे मन आनंदित झाले. त्याचे उदासीन हृदय सुखासीन झाले. सहा महिने गेले व लिली आणि रतन ही नवरा-बायको झाली. लिली व तिची मुले रतनच्या घरात राहावयास गेली. रतनचे घर आतापर्यंत भेसूर दिसे, ते झकपक झाले, झाडलोट झाली, बैठकी घातल्या, चित्रे टांगली, बागबगीचा फुलला, सर्वत्र टवटवी नटली, रतन संसारात रमू लागला. लिलीचे मन मात्र एखादे वेळेस खिन्न होई व तिचे हृदय चरके.

किसनला राजाने घरी जाण्याची परवानगी दिली. माझी मुले-माणसे घेऊन मी येथे परत येईन अशी त्याने कबुली दिली. किसन घरी जाणा-या गलबतावर चढला. आनंदाच्या शिखरावर चढला. घराची आठवण झाली. मुले सर्वत्र दिसू लागली. पत्नी डोळयांसमोर दिसू लागली. उत्कंठेचा आनंद-त्याचे वर्णन किती करणार? त्या लाटा जशा खालीवर होत होत्या, तसे किसनच्या मनाचे होई. माझी मुले सर्व सुखरूप असतील का? लिली कुशल असेल ना? या विचाराने मन खाली जाई, तर सर्व चांगले असेल या विचाराने मन वर जाई. समुद्रावरचा प्रवास संपत आला. किसनचा गाव, ती टेकडी दिसू लागली. किसन उभा राहून आनंदाने पाहू लागला. माझा गाव, माझी टेकडी-त्याचे हृदय उचंबळून आले. आठ-नऊ वर्षांनी तो परत मातृभूमीस आला होता. परदेशातील सुखांच्या राशीपेक्षा स्वदेशातील दु:खही गोड असते.किसन किना-यावर उतरला. परंतु त्यास कोणी ओळखले नाही. त्याच्या चेह-यावर किती फरक दिसत होता. वादळाचा, समुद्राचा, हालअपेष्टांचा, चिंतेचा, परदेशीय हवेचा कितीतरी परिणाम त्याच्यावर झाला होता. किसन एकदम घरी गेला नाही. किना-यावरच्या एका खानावळीत तो गेला. ही खानावळ पूर्वीचीच होती. एका म्हाता-या बाईची ती खानावळ होती. किसनने त्या म्हातारीस ओळखले. किसनने आपले सामान तेथे ठेवले व खाटेवर बसला. म्हातारीने जेवण वाढले. किसनने म्हातारीस विचारले, ''बाई, या गावातील किसन, रतन यांची काही माहिती आहे तुम्हांला?'' म्हातारी म्हणाली, ''हो, आहे तर! गरीब दुर्दैवी किसन, लहानपणी कितीदा तो येथे खेळे. प्रवासास गेला, तो तिकडेच मेला. दहा वर्षे झाली, परत आला नाही. त्याची बायको, ती मुले कोण कष्टात! लिली तर मोजमजुरी करी, शेवटी एक वर्षांपूर्वी तिने रतनशी लग्न लावले. रतन त्यांचा लहानपणचा मित्रच. बरे झाले मुलाबाळांस. किसन मात्र गेला.'' हे सर्व ऐकून किसन काळवंडला. त्याच्या डोळयांतून अश्रू आले. म्हातारीने पाहिले. ती म्हणाली, ''रडून त्रास होणार, देव ठेवील तसे राहावे.''किसनला पायांखालची सर्व सृष्टी बुडाली असे वाटले. समोरच्या समुद्रात उडी घ्यावी असे वाटले. लिलीकडे जाऊन तिला ठार मारू? छे; लिली प्रेमळ मनाची. 'मी तुमची दोघांची लहानशी बायको होईन हे शब्द त्याला आठवले. लिली, फुलासारखी कोमल लिली.' मी जाऊन तिच्या सुखावर निखारे ओतू? तिच्या कुसुमसम हृदयाची होळी पेटवू? छे:? रतन तरी माझा मित्रच, राहू दे. त्यांना सुखात राहू दे. मी आलो, जिवंत आहे हे त्यांस कळवू नये, आपण दूरदेशी निघून जावे.परंतु दुस-या दिवशी किसनला झणझणून ताप आला. म्हातारीने त्याला अंथरून दिले. म्हातारीस तरी कोण होते? मुलाप्रमाणे म्हातारी त्याची शुश्रूषा करी. ताप कमी होईना. एक दिवस म्हातारी त्याच्या खाटेजवळ बसली होती. किसनने डोळे उघडले. त्याचे ओठ थरथरले. म्हातारी म्हणाली, ''मुला, तुला काही सांगावयाचे आहे?'' किसन म्हणाला, ''मन घट्ट करा, ऐका. मी किसन-'' म्हातारी चपापली. नीट न्याहाळून पाहू लागली, तो खरेच ओळख पटली. किसन याने थांबून थांबून सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, ''म्हातारबाई-आजीबाई, माझे हे धनद्रव्य तुमचे, तुम्ही लिलीस काही कळवू नका; मला जगण्याची आशा नाही. मी आता मरणारच.'' म्हातारीच्या डोळयांतून अश्रू तिच्या सुरकुतलेल्या गालांवर आले. त्या दिवसांपासून किसन शुध्दीवर आला नाही.म्हातारीने लिलीस ही गोष्ट कळवली. लिली, रतन, मुले सर्व म्हातारीकडे आली. परंतु किसनने कोणास ओळखले नाही. किसन या जगातून निघून गेला.किसनचा थोरपणा लिली व रतन यांच्या मनावर कायमचा ठसला. त्याचा फोटो त्यांच्या दिवाणखान्यात आहे, त्याची ती रोज पूजा करतात.