Amol goshti - 3 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | अमोल गोष्टी - 3

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

अमोल गोष्टी - 3

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

३. मातेची आशा

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व मंगले होती. परंतु आज काय आहे? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोडकी घरे दिसतात. गाव पाहून वाईट वाटते. त्या गावचा जुना इतिहास आठवून डोळे भरून येतात. परंतु सा-या हिंदुस्थानचेच असे नाही का झाले? किती रडणार, आणि रडून काय होणार?त्या गावात एक बाई होती. ती विधवा होती. लहान लहान मुले घरात होती, परंतु कर्ते माणूस घरात कोणी नव्हते. सारी त्या मातेवर जबाबदारी होती, काही शेतीवाडी होती. एक लहानसा मळा होता. ती बाई घरी शेती करी. शेजारी-पाजारी मदत करीत. कोणी नांगर देत, कोणी बैलाची जोडी दोन दिवस देई. तिचा संसार साजरा करीत.परंतु सावकारीचा साप तिच्या संसारात शिरला होता. जेथे हा साप शिरतो तेथे सत्यानाश होतो. हा साप प्रथमच घरात शिरू देऊ नये. परंतु एकदा घरात आला म्हणजे त्याचा विळखा निघता निघत नाही. त्याचा दंश टळत नाही. मग मेल्याशिवाय सुटका नाही.त्या बाईचा नवरा मेल्यावर सावकार काही दिवस शांत होता. बाईचा मोठा मुलगा सज्ञान केव्हा होतो, त्याची तो वाट पाहात होता. शेवटी आनंदा वयात आला. सज्ञान झाला. सावकाराचे हस्तक त्या गावात होते. एके दिवशी सावकार गावात आला. आनंदाला बोलावणे गेले. सावकार गोड बोलत होता. त्याच्या ओठांवर साखर होती, पोटात जहर होते.सावकार : आनंदा, आता तू मोठा झालास. आईला मदत करतोस की नाही?आनंदा : मदत न करीन तर पाप होईल. आम्हांला तिने काबाडकष्ट करून पोसले. लहानाचे मोठे केले. मी स्वत: मोट धरतो, मळा करतो.सावकार : तुझा बाप फार देवमाणूस होता. त्याची नियत चांगली. त्याला मी कधी 'नाही' म्हणत नसे. रात्री बेरात्री आला तरी त्याला पैसे देत असे.आनंदा : थोर आहात तुम्ही.सावकार : हे बघ आनंदा, तुम्ही लहान होतात म्हणून आजपर्यंत मी बोललो नाही. म्हटले, तुझ्या आईला का द्यावा त्रास? परंतु तू आता मोठा झाला आहेस. तुझ्या वडिलांनी पैसे घेतले होते. आज पुन: नव्याने कागद करू. ही लिहून ठेवली आहे प्रॉमिसरी. सही कर म्हणजे झाले.

आनंदा : सही मला येत नाही, शाळेत कोणी घातले नाही.सावकार : बरे, आंगठा कर पुढे. त्याला शाई लावून येथे उठवितो.आनंदा तयार होईना. परंतु सभोवतालच्या मंडळींनी 'दे आंगठा; सावकार का फसवील?' असे सांगून आनंदाचा आंगठा घेतला. आनंदास सुपारी फोडून देण्यात आली. त्याच्यापुढे विडी फेकण्यात आली. आनंदा म्हणाला, ''मी विडी ओढीत नाही.''ती लहानशी गोष्ट आनंदा घरी बोलला नाही. आंगठयाला लागलेली ती शाई सारा संसार बुडवील असे त्याच्या मनातही नव्हते. ती काळी शाई म्हणजे काळसर्पाचे जहर होते. ती काळी शाई म्हणजे सारी कृष्ण कारस्थाने होती. पंरतु अकपट आनंदाला काय माहीत? प्रेमळ मातेच्या संगतीत वाढलेले ते पोर. त्याला जगातील छक्केपंजे माहीत नव्हते.दोन-चार महिने गेले, आणि घरी बेलीफ आला. आनंदाला समन्स लागले. सावकाराने फिर्याद केली. आनंदाच्या बापाने दोनशे रुपये घेतले होते. आनंदाची आई म्हणाली, ''त्यांनी १०० रुपये तर देऊन टाकले होते, व मला वाटले की, सारे देणे त्यांनी चुकते केले. कारण मरताना म्हणाले होते, 'कोणाचे देणे नाही. तुम्ही सुखाने कष्ट करा व राहा.' कोठले आहे हे देणे? मरताना का मनुष्य खोटे बोलेल?''ती अनाथ माता सावकाराकडे गेली. ''माझ्या मुलाची भाकर ओढू नका. कोण आहे माझ्या मुलांना? कोठे जातील ती?''-किती तिने सांगितले. सावकाराचे गुमास्ते हसत होते. एक जण म्हणाला, ''अगं बाई, हा व्यवहार आहे. व्यवहारात का दयामाया असते? कोर्ट-कचेरीत का डोळयांतील पाणी उपयोगी पडते? तेथे शाईचे काम, हिशोबाचे काम.''सावकाराने सारी शेतीवाडी जप्त केली. आता लिलाव होणार होता. आनंदाचा आनंद अस्तास गेला. त्याची भावंडे रडू लागली. माता लाचा झाली. ती आपली लहान मुले घेऊन सावकाराकडे गेली. मुलांना सावकाराच्या पायांवर घालून म्हणाली, ''यांच्याकडे पाहा हो जरा. तो दीड दोन बिघ्यांचा मळा तरी ठेवा. बाकीचे घ्या सारे. पोरांना तेवढा तरी तुकडा ठेवा, पदर पसरते दादा.''सावकाराला का दया आली? मुसळाला का अंकुर फुटतो? रक्ताला चटावलेला वाघ का दया करतो? त्याने सारे घशात घातले. लिलावात कोण बोलणार? तोच बोलणारा. मातीमोलाने सोन्यासारखी शेती गेली. ती माता व तिची मुले मजूर झाली.ती माता एके दिवशी मजकडे आली व म्हणाली, ''काँग्रेसचे सरकार आहे म्हणतात. माझे शेत परत मिळेल का? बिघा-दीड बिघ्याचा मळा तरी मिळेल का? पोरांना आधार होईल.'' मी म्हटले, ''कर्जबिल येणार आहे. परंतु जुन्हा हुकुमनाम्याची फेरतपासणी होईल की नाही देव जाणे! शेतक-यांची मूळची शेते त्यांना परत मिळावी, असा कायदा केला पाहिजे. परंतु तसा आज करता येणार नही, त्यासाठी झगडावे लागेल. एक दिवस मात्र असा खास उजाडेल की, ज्या दिवशी किसानांची शेती त्यांना परत मिळेल.'' त्या मातेच्या तोंडावर आशा फुटली. तिच्या डोळयांत आनंदाश्रू आले. ती म्हणाली, ''दहा वरसांनी का होईना, परंतु मळा परत मिळो. मी मेल्ये तरी मुलांना होईल. दहा वरसांनी तरी मिळेल ना?''