Nishabd in Marathi Short Stories by parashuram mali books and stories PDF | सांजवेल

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

सांजवेल

अनुक्रम

१ निशब्द

२ नितळ

३ अपेक्षांच ओझं

४ अस्वस्थ

५ सुली

नि:शब्द

विनय खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा भेटला होता. थोड्या उदास वाटणाऱ्या विनयला मी बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही केल्या बदलत नव्हते.

मी विनयचा हात हातात घेवून म्हणालो...

अरे विनय काय झालय तुला? तू बोलत का

नाहीस?

इतक्या दिवसानंतर भेटूनही तुझ्या चेहऱ्यावर उदासी का?

विनय कोणाच्यातरी आठवणीने व्याकूळ झाला होता हे मला जाणवत होतं.

मी म्हणालो...

घरी सर्व ठीक आहे ना?

मुलांच शिक्षण कसं चालू आहे? आणि हो, वहिनी कशा आहेत? पण विनयचे माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.

विनयच्या मनात कोणतीतरी घालमेल सुरु होती, पण तो काही सांगत नव्हता.

शेवटी मी रागारागानेच म्हणालो...

ठीक आहे, मला नको सांगू, पण तुझ दु:ख ज्या व्यक्तीला सांगून हलक होत, त्या व्यक्तीला तू सांग.

असे म्हणून मी रागारागाने तिथून उठलो.

‘थांब प्रशांत’

विनयने हाक मारली, पण मी थांबलो नाही.

विनय पाठीमागून आला आणि माझ्या गळ्याला पडून रडू लागला.

प्रशांत, आज सगळं काही असूनसुद्धा आईची पोकळी सतत मनाला सलत असते.

आज पहाटे पहाटे आईच्या आवाजाचा भास झाला आणि मी खडबडून जागा झालो.

तो आईचा प्रेमळ स्पर्श, आपुलकी,जिव्हाळा आता कुठला आलाय...

विनय आईच्या आठवणीने गलबलून गेला होता.

मी त्याला धीर देत म्हणालो...

विनय, किती दिवस असं आईच्या आठवणीने झुरत बसणार?

आई या जगात नाही हे वास्तव तुला स्विकारायलाच हवं.

विनय डोळ्यातील आसवांना आवर घालत म्हणाला...

तू किती नशीबवान आहेस आज तुझी आई तुझ्याजवळ आहे.

विनय, तुझ दुख मला कळतंय, आईची कमी कोणीच पूर्ण करू शकत नाही, पण यातून सावरण्याचा प्रयत्न कर. आई या जगात नाही, पण तुझ्या हृदयात तर नेहमीच राहील.

विनयला थोडे बरे वाटावे म्हणून, त्याला घेवून मी माझ्या घरी आलो.

खूप दिवसानं आलास रे, आईची आठवण येत नाही वाटत तुला?

विनयला चहा देत माझी आई म्हणाली...

विनयला गहिवरून आल्यासारख झालं.

चहा बाजूला ठेवून विनयने माझ्या आईच्या चरणावर माथा टेकला.

चरणावर ओघळलेले अश्रू बघून माझी आई विनयला म्हणाली...

मला कळतंय रे तुझ दुःख, मी आहे ना, नको काळजी करू.

असे म्हणून माझ्या आईने विनयला जवळ घेतले.

काही क्षण विनय आईच्या आठवणीत रमून गेला...

माझी आई मला म्हणाली,

होऊ दे त्याला मोकळ...

विनयला त्याच्या आईच्या आठवणी जाग्या करू दे, त्याशिवाय त्याला हलके वाटणार नाही.

आईच्या आठवणीत विनय गढून गेला. आईशी संवाद साधता - साधता आईबरोबर घालवलेला एक – एक क्षण जागा करू लागला...

आई सगळ काही केलीस गं माझ्यासाठी, माझ बालपण,शिक्षण,नोकरी या सगळ्यासाठी दिवस-रात्र स्वतःला वाहून घेत राहिलीस. प्रसंगी स्वतः उपाशी राहून राब-राब राबत राहिलीस...

तुझ म्हातारपणातल दुखन-खुपण,आजारपण याची मला जाणीव असुनही मला शिक्षणासाठी खूप दूर जाव लागल.

त्यावेळी मी काहीच करू शकलो नाही. याचं गोष्टीच खूप दुख वाटतंय गं मला.

माझ्या मनातली हीच सल मांडत असताना तू मला म्हणाली होतीस...

‘‘पोरा माझी काळजी करू नको,तू सुखी आनंदी रहा,शिक्षणाकडे लक्ष दे’’

आई, तुझ प्रेम, तुझी माया यापेक्षा दुसरं काही मोठ असू शकतं का?

तुझ्यासारख जीव लावणार या जगात कुणीच उरलं नाही गं.

पुन्हा – पुन्हा मला वाटत राहत,तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं.

तुझ्या अंगा-खांद्यावर लहान होऊन बागडत रहाव.

तुझी अंगाई ऐकत-ऐकत शांत झोपावं.

असं नेहमी वाटत राहत...

पण आता हे भाग्य कुठल आलय.

घर, संसार,ऑफिस,मुलांच शिक्षण यात गुरफटून गेलोय गं.

तुझाही संसार होताच...

घर,मुलबाळ या साऱ्या रहाटगाड्यात तू सर्वांना जपत राहिलीस.

नातीगोती सांभाळत राहिलीस, सगळ्यांच खुल्या दिलान,स्वच्छ,निर्मळ मनान करत राहिलीस.

आज तुझ्यासारख असं कुणालाच जमणार नाही.

सुखाच्या शोधात एखाद्या मशीनसारख दिवस-रात्र धावत सुटलोय...

पण हे खर सुख आहे का?

मी थकलो – भागलो असताना तुझ्या त्या गालावरून, डोक्यावरून फिरणाऱ्या हाताचा स्पर्श जाणवला कि,अंगावरून शहारे येतात.

ती मायेची उब आणि ओलावा कुठला आलाय...

आई,आज सगळ असूनही तुझ्याविना सगळ शून्य असल्यासारख वाटत.

कोणताही कार्यक्रम असो,आनंदाचा क्षण असो तुझी उणीव मला सतत जाणवत राहते.

गर्दीतही खूप एकट – एकट वाटायला लागत.

आज बंगला,गाडी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना त्याचा उपभोग घ्यायला मात्र तू या जगात नाहीस ही सल माझ्या मनाला सतत बोचत राहते.

मला आठवतात माझ्या शाळेचे दिवस,माझ्या शाळेच्या फी साठी तू आजारी असतानाही जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या बांधावर उन्हा-पावसात राबत राहिलीस.

आज आम्ही दोघंही कामाच्या गराड्यात इतकं अडकून गेलोय कि, तुझ्या नातवाबरोबर बोलायलाही आम्हाला वेळ नाही.

त्याला छान छान गोष्टी सांगायला,त्याच्याशी खेळायला त्याची आजी या जगात नाही. हे मी त्या निरागस जीवाला कसं सांगू?

परवा एकदा आमच्या कंपनीतील अधिकारी वर्गाचा गेट-टूगेदर प्रोग्राम होता.

सर्वजन आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेवून आले होते.

माझा मित्र गौतम आपल्या आईची ओळख करून देत असताना, मला तुझी तीव्र आठवण आली.

तुझ्या आठवनींचे अश्रू आपोआपच डोळ्यातून ओघळायला लागले.

या सुख – आनंदाच्या क्षणाला तू असायला हवी होतीस असं वाटून गेलं.

मी शाळा-कॉलेजमध्ये असतानाही नेहमी तुझ असंच व्हायचं

माझ्या बक्षीस समारंभालाही तुला कधी येता आलं नाही.

नेहमी माझ्या पोटाची आणि शिक्षणाची काळजी करत राहिलीस.

मी बक्षीस घेत असताना तुझी कमी खूप जाणवायची.

समोर टाळ्यांचा कडकडाट आणि भल्या मोठ्या गर्दीत मला तुझा चेहरा दिसायचा, तू मात्र उन्हा-पावसात काबाड कष्ट करत असायचीस,माझ्या उद्याच्या भविष्यासाठी...

मी एकदा खूप आजारी होतो,त्यावेळी तुझ्या जीवाची झालेली घालमेल मी पाहिली आहे गं.

तू त्या दिवशी न काही खाल्ल होतस, ना तोंडात पाणी घेतल होतस फक्त माझ्याजवळ बसून होतीस.

केवढे हे निरपेक्ष प्रेम आणि त्याग! तुझ्या निरपेक्ष प्रेमाची आणि त्यागाची तुलना कुणाशीही करता येणार नाही.

आईच्या आठवणींच्या स्वप्नात रमून गेलेला विनय स्वप्नातून बाहेर आलेला होता...

नि:शब्द झालेल्या भावूक आणि व्याकूळ विनयकडे पाहून आम्ही सुद्धा नि:शब्द झालो...

----------------------------------------------------------------

नितळ

श्वेता आणि दिपाली लहानपणापासून मैत्रिणी अगदी जीवाला जीव देणाऱ्या. एकमेकींपासून काहीही लपवून ठेवायच्या नाहीत. कुठेही जायचं झाल तरी नेहमी एकत्रच जाणाऱ्या, एकमेकींपासून क्षणभरही दूर रहायला घाबरणाऱ्या या जिवलग मैत्रिणी होत्या. एकमेकींशिवाय दोघींनाही करमत नव्हते.आयुष्यातील प्रत्येक प्रसंग एकमेकींना सांगणाऱ्या आणि एकमेकींच दु:ख वाटून घेणाऱ्या या मैत्रिणी होत्या.एखादा महत्वाचा निर्णयही एकमेकींच्या सल्ल्यानेच घेत असत.

कॉलेजमधील सर्वजण त्यांना दोस्ताना म्हणून चिडवायचे.मैत्रीला दृष्ट लागावी असच काहीस त्यांच्या बाबतीत घडल. दिपाली सुरज नावाच्या एका मुलावर खूप प्रेम करत होती. ती नेहमी दिवस रात्र त्याचाच विचार करायची,

त्याच्यासाठी ती वेडी झाली होती. कॉलेजमध्ये नेहमी त्याचीच वाट पहायची.सुरजसाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. कुणालाही न सांगण्याच्या अटीवर श्वेताजवळ दीपालीने सुरजला प्रपोज करण्याची इच्छया बोलून दाखवली. अशा कठीण प्रसंगी श्वेताशिवाय आधार देणार असं कुणीच नव्हत.

दीपालीची होणारी घालमेल श्वेताला पाहवत नव्हती. श्वेताने दीपालीला साथ देण्याचे ठरवले आणि श्वेता दीपालीला म्हणली, असं मनात ठेवून झुरत बसण्यापेक्षा एकदाच मन मोकळ कर. दिपाली घाबरत घाबरत म्हणाली, पण त्याने नकार दिला तर त्यावर श्वेताने दीपालीला धीर दिला आणि म्हणाली तुझ प्रेम निस्वार्थी आणि सच्चे आहे असं काही होणार नाही. मी तुझ्या सोबत आहे.

तू घाबरू नकोस, यामुळे दीपालीला धीर आला.एकदाच दीपालीने सुरज जवळ मन मोकळ करायचं ठरवलं सोबत श्वेता होतीच.

दीपालीने सुरजला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. त्या दिवशी दिपाली थोडी उदास दिसत होती. एकदाचे तिघे कॉफी शॉपमध्ये आले. कॉफी झाल्यानंतर सुरजने घाईघाईने दिपालीला विचारले...

का बोलावले मला? काही प्रॉब्लेम आहे का? तसा सुरज आमचा पहिल्यापासूनचा चांगला मित्र होता त्यामुळे त्याला भेटताना दोघींनाही अवघडल्यासारखे वैगेरे होत नव्हते, पण भीती नक्कीच होती. कारण विषयच तसा होता.

दिपाली अडखळतच म्हणाली मला थोड बोलायचं होते. त्यावर सुरज अधीर होऊन म्हणाला, बोल लवकर काय बोलायचे ते, मला उशीर होतोय.त्यावर दिपाली म्हणाली, सुरज मी तुझ्यावर खूप प्रेम करते.तू मला खूप आवडतोस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.दिपाली हे सर्व पट्कन बोलून गेली. एका क्षणाला सुरजला काय करायचे तेच कळेना. थोड्याच वेळात स्वतःला सावरत सुरज दीपालीला म्हणाला, मला माफ कर दिपाली, तुझे प्रेम मी समजू शकतो पण माझ प्रेम एका दुसऱ्याच मुलीवर आहे. सूरजच्या मुखातून हे शब्द येताच दीपालीला आभाळ कोसळल्यागत झाले, काय करायचे तेच कळेना, दीपालीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. श्वेता पूर्ण हताश झाली होती. समुद्राच्या वाळूने नाव कोरावे आणि लाटांनी ते नाव पुसावे असेच काहीसे दिपाली बरोबर झाले होते.

श्वेताने दीपालीला धीर दिला आणि श्वेता सुरजला रागारागाने म्हणाली,कोण आहे ती मुलगी? यावर सुरज म्हणाला, श्वेता तूच ती मुलगी आहेस, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. त्या क्षणी दीपालीला धक्काच बसला आणि श्वेताला आश्चर्यही वाटले.

श्वेता स्वत:ला सावरून रागारागाने सुरजला म्हणाली, तू काय बोलतोयस ते तुला काही कळतय का? तुझे डोके ठीकाण्यावर आहे का ? तू हे खूप चुकीचे केलेस, खरे प्रेम करणाऱ्या व्यक्तीला लाथाडले आहेस हे विसरू नकोस असे म्हणताच, सुरज तिथून रागारागाने निघून गेला. श्वेता दीपालीला घेवून तिथून निघुन आली. दिपाली चार- पाच दिवस या धक्क्यातून सावरली नव्हती. तिकडे श्वेताचे मनही श्वेताला खात होते.

दीपालीचा गैरसमज तर होणार नाही ना...? मी तिला फसवले असे तर तिला वाटणार नाही ना...? या आणि अश्या प्रश्नांनी श्वेता घायाळ झाली होती. खर तर श्वेताचे सुरज बरोबरच्या मैत्रीच्या नात्यापलीकडे असे कोणतेच नाते नव्हते पण सुरज श्वेतावर एकतर्फी प्रेम करत होता हे ना श्वेताला कळाले ना दीपालीला.

मी या दोघांच्या नात्यामध्ये आल्यामुळेच या दोघांचे नाते तुटले, असे श्वेताला वाटू लागले.

श्वेता दिपालीशी नजरही मिळवू शकत नव्हती. ती स्वतःला अपराधी मानु लागली. स्वतःला मी कधीही माफ करू शकणार नाही. असा श्वेता स्वतःला दोष देवू लागली.

काही दिवस श्वेता दीपालीला टाळत होती. ही गोष्ट दीपालीच्या लक्षात आली. दीपालीने श्वेताला रस्त्यात अडवले आणि दिपाली श्वेताला म्हणाली तुझी काहीच चूक नसताना तू मला का टाळण्याचा प्रयत्न करतेस? यात तुझा काय दोष? प्रेम हे कोणावरही होऊ शकते. दोघींनीही एकमेकाला मिठी मारली आणि रडू लागल्या.

श्वेता रडत रडतच दीपालीला म्हणाली, तू माझ्याबरोबर असलेली मैत्री तोडणार तर नाहीस ना...? मला सोडून तर जाणार नाहीस ना...?

दिपाली श्वेताला सावरत म्हणाली अगं वेडे आपली मैत्री इतकी नाजूक आहे का? आपली मैत्री कुणाच्याही येण्या-जाण्याने थोडीच तुटणार आहे? असे अनेक सुरज मी तुझ्यासाठी कुर्बान करेन. तू मनाला लावून घेवू नको. आजपासून आपल्यासाठी सुरजचा विषय संपला आहे.

या सर्व प्रसंगातून दिपाली आणि श्वेता यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. एकमेकींच सुख – दु:ख हे एक झाल होत. दोन शरीर एक जीव अस नात या दोघींचं झाल होत. अशाच आणखी एका घटनेने श्वेता आणि दिपाली खूपच जवळ आल्या

एक दिवस दिपाली आजोबांना पेपर वाचून दाखवत होती. ती पेपर वाचता वाचता थांबली तिला काहीच कळले नाही. तिने श्वेताच्या बाबांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि सुन्न झाली. श्वेताच्या बाबांवर चोरीचा आरोप झाला होता.दिपालीने लगेच श्वेताला फोन केला पण तिने तो उचला नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.सर्व लोकांच्यात कुजबुज सुरु झाली होती.त्यामुळे श्वेता कॉलेजला आली नव्हती.

तिची विचारपूस करण्यासाठी दिपाली तिच्या घरी गेली.दीपालीला पाहून श्वेताला रडू कोसळले. हीच खरी दिपालीच्या आयुष्याची कसोटीची वेळ होती. दिपाली श्वेताला शांत करत तिला धीर देवू लागली. अलीकडे श्वेताने कॉलेजला येणेही बंद केले होते. दीपालीने श्वेताला तिची शपत घातली आणि कॉलेजला येण्यासाठी आग्रह केला. मी असल्यावर तुला चिडवायची आणि त्रास द्यायची कोणाचीही हिम्मत नाही. माझ्या मैत्रिणीच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. तू काळजी करू नको आणि स्वताला एकटी समजू नको.मी तुझ्या सोबत आहे. असा धीर दीपालीने श्वेताला दिला.

हे सर्व ऐकून श्वेताला गहिवरून आले. दिपाली श्वेताला म्हणाली हे बघ श्वेता जेव्हा माझ्या आयुष्यातून माझी आवडती व्यक्ती गेली त्यावेळी त्या धक्क्यातून तू मला सावरलीस, तू आधार दिलास तुझ्यामुळे आज मी सुरजला विसरू शकले तसेच तुझ्या कठीण प्रसंगी मी तुला साथ देणे हे माझे कर्तव्यच आहे.

जगाची पर्वा करू नको तुझे जसे ते बाबा आहेत तसे माझेही आहेत तू उद्या कॉलेजला येशील, मी वाट बघेन.

दिपाली श्वेताचा हात हातात घेवून म्हणाली. श्वेताचा होकार येताच दिपाली आनंदाने घरा बाहेर पडली.अस हे दीपालीच आणि श्वेताच सुख दु:खात एकमेकाला साथ देणार नितळ मैत्रीच नात निरंतर तेवत आहे...

----------------------------------------------------------------

अपेक्षांचं ओझं

कुठे गेला होतास?

आई रागारागाने संजयला म्हणाली.

खेळायला गेलो होतो.

संजयने आईला घाबरत,घाबरत सांगितले.

किती वेळा सांगितलंय,त्या मवाल्यांच्यात खेळायला जाऊ नको म्हणून,तरी तुला कळत नाही का?

तुला बोर्डिंगलाच घालायला हवं,त्याशिवाय तू सुधारणार नाहीस.

हो चालेल मला,मीही तुझ्या दररोजच्या कटकटीला कंटाळलेलो आहे.

संजय रडत रडत आईला म्हणाला.

( तेवढ्यात संजयचे वडील कामावरून येतात.)

काय झाल? घरी आल्या आल्या सुरु झालं का रडगान.

वडील रागाच्या स्वरात म्हणाले.

अहो, किती वेळा सांगितलं याला ऐकायलाच तयार नाही.

आता काय झाल ? वडील म्हणाले.

संजयचं अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही. दहावीचे महत्वाचे वर्ष सुरु असूनसुद्धा टी.व्ही.पाहणे आणि मवाल्यांबरोबर हुंदडायला जाणे सुरूच आहे.

आई, प्लीज माझ्या मित्रांना मवाली नको म्हणू. जरूर ते गरीब असतील पण मनाने श्रीमंत असलेले ते माझे जिवलग मित्र आहेत.

गप्प बस! पुढे आणखी काही बोलशील तर थोबाड फुटेल.

वडील संजयवर हात उगारत म्हणाले.

( आई – वडीलांच्या अपेक्षांचं ओझं वाढत होत,तसा संजय त्या ओझ्याखाली दबून जात होता.)

संजय उदास होऊन एका झाडाखाली बसला होता. रस्त्याने घाईगडबडीने जाणाऱ्या आणि संजयच्या घराशेजारी राहणाऱ्या दामू काकांची नजर संजयकडे वळली.संजयला उदास आणि दु:खी पाहून दामू काकांना आश्चर्य वाटले.

अरे,संजय इथे काय करतोयस? आणि हे काय तुझ्या डोळ्यात चक्क पाणी!

दामुकाकांना पाहून संजयला गहिवरून आले. संजयने दामुकाकांना घट्ट मिठी मारली.

संजयने घरामध्ये घडलेली घटना दामुकाकांना सांगितली.

काळजी करू नको, घरी येऊन आई-बाबांना सांगेन. असे म्हणून,दामुकाकांनी संजयची समजूत काढली.

दामूकाका हीच संजयचा एकमेव आधार आणि संजयला समजून घेणारी व्यक्ती होती. दामूकाका हे संजयचे जिवलग मित्र होते. सगळी व्यथा संजय दामुकाकांकडेचं व्यक्त करायचा.

संजयला दामुकाकांजवळ व्यक्त झाल्यावर खूप हलके वाटायचे. अध्यात्माची ओढ असणारे दामूकाका संन्यस्त व्यक्ती आणि अनेकांचे मार्गदर्शक होते. सगळे त्यांना प्रेमाने दामूकाका म्हणत असे. दामुकाकांना समाजामध्ये खूप मानाचे आणि आदराचे स्थान होते.

(रविवारचा सुट्टीचा दिवस,संजयच्या

घराची बेल वाजते... )

कोण आहे? आले थांबा.

संजयची आई घाईगडबडीने येऊन दार उघडते.

अय्या,दामू काका !

अहो, ऐकलं का ? कोण आलय आपल्या घरी?

कोण आलय ? आणि येवढं ओरडायला काय झाल?

अहो बघा तर खरं, कोण आलय ते.

अरे दामू काका! नमस्कार काका..

आज कसा वेळ मिळाला म्हणायचं?

थोडं बोलायचं होत,म्हणून आलो होतो.

अहो,बोलण नंतर पहीला नाष्टा काय करता ते सांगा.

आज माझा उपवास आहे.

मग चहा की कॉफी?

ठीक आहे.चहा चालेल.

चहा घेऊन ये गं.

हो आलेच.

बोला काका काय म्हणताय?

संजय कुठे आहे ?

तो अभ्यास करतोय.

कुठे पण?

या समोरच्या खोलीत.

पण या खोलीला तर कुलूप आहे.

अहो काका ते आम्ही मुद्दामहून लावलय.

का ?

कारण हे त्याच दहावीच वर्ष आहे. तो अभ्यास सोडून त्याच्या मवाली मित्रांबरोबर खेळायला जाऊ नये म्हणून. हे ऐकून दामूकाकांचा राग अनावर झाला...

तुम्ही माणसे आहात की राक्षस? लहान निरागस जीवाचा असा छळ करताना, तुम्हाला शरम कशी वाटली नाही?

तुमच्या आई-वडिलांनी तुमच्याबरोबर असाच छळ केला होता काय? पण; दामूकाका मुलांनी अभ्यास नको का करायला? आज आम्ही दोघ नोकरी करतो. समाजामध्ये आम्हाला मान-सन्मान आहे. आम्हालाही वाटत आमच्या मुलालाही असा मान – सन्मान मिळावा,वेगळी ओळख मिळावी.

मान – सन्मान गेला खड्यात. पहिला माणूस बना माणूस; आणि मुलालाही माणूस बनायला शिकवा.

( इतक्यात संजयची आई चहा घेऊन येते.)

अगोदर चहा घ्या दामूकाका, मग नंतर निवांत बोला. संजयची आई म्हणते...

माफ करा, मला चहा नको. जाण्याआधी एकच आपल्याला बजावतो,तुमच्या अपेक्षांचं ओझ संजयवर लादून असंच क्रूर कृत्य संजयवर करत राहाल तर संजय एक दिवस या जगात नसेल.

दामूकाका, तोंड सांभाळून बोला. संजयचे वडील दामुकाकांवर रागाने ओरडतात...

हो आज खरं बोलतोय, याच गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटतंय कारण सत्य हे खूप कटू असते ते पचायलाही जड जाते. मी जे बोलतोय ते वास्तव आहे; आणि हे वास्तव तुम्हाला स्वीकारायलाच हवं. येतो मी...

(दामूकाका रागारागाने निघून गेले.)

इकडे संजयचे हाल सुरूच होते. बिच्चारा आई-वडिलांच्या रोजच्या कटकटीला वैतागून गेला होता.

आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि दबावाखाली एकदाची दहावीची परीक्षा संपून गेली. विज्ञान आणि इंग्रजीचा पेपर अवघड गेला होता; पण संजयने आई-वडिलांना सांगितले नाही.आता मात्र निकालापर्यंत संजयची रुखरुख सुरु राहणार होती.

आई-वडिलांना न सांगता संजय, दामू काकांना भेटायला गेला.संजयने विज्ञान आणि इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याचे दामुकाकांना सांगितले.पास झाल्यानंतर कला शाखेला प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. दामुकाकाही संजयला आधार देत म्हणाले; काळजी नको करू,सर्व काही चांगल होईल.

परीक्षेचा निकाल जवळ येत होता. तसं संजयला निकालाची धास्ती वाटू लागली होती. संजय खूपच खचून गेला होता. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या अंगात काहीच त्राण राहिलेले नाहीत असं वाटत होत. संजयचे डोळे खोल गेले होते.

एकदाचा निकालाचा दिवस उजाडला.अपेक्षेप्रमाणे विज्ञान आणि इंग्रजीला कमी गुण मिळाले होते. ५५% गुणांनी संजय दहावीला पास झाला होता. आई-वडिलांची ८०% ते ९०% ची अपेक्षा फोल ठरली होती.दोघांनीही निकाल कळताच त्रागा करायला सुरुवात केली. आई-वडिलांचा वाढलेला संताप पाहून संजय पुरता घाबरून गेला.

जा खेळायला त्या मवाली-टपोऱ्या पोरांबरोबर, बघत बसं आता दिवसभर टी.व्ही.शेजारच्या आजितला ९०% मिळाले. शिक त्याच काहीतरी, समाजामध्ये तोंड दाखवायलाही आम्हाला जागा ठेवली नाहीस. संजयची आई संजयला संतापाने म्हणाली. वडिलांनीही आईच्या सुरात-सूर मिसळला, सगळ्या सुख-सोई असूनही, सगळा हट्ट पुरवून, हवं ते देवूनही मस्ती आली आहे याला. सगळ्या गोष्टी मिळत असूनही फायदा करून घ्यायची अक्कल नाही याला. संजयच्या बाबांचा राग वाढत होता...

बाबा मला नाही झेपत. मला नाही जमणार तुमच्या इच्छा पूर्ण करणं,प्लीज नका करू माझ्याकडून अपेक्षा.संजय बाबांचे पाय धरून विनवणी करायला लागला.

व्वा! छान! सकाळ,दुपार,संध्याकाळ चरायला जमत का? मग अभ्यास म्हटल्यावर झेपत नाही. काहीही असो, उद्या शाळेत जाऊन कमी गुण मिळाल्याचा जाब मुख्याध्यापकांना विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. संजयच्या वडिलांमधला क्रूर राक्षस जागा झाला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी संजयचे वडील संजयला घेवून शाळेमध्ये मुख्याध्यापकांना भेटायला येतात.

संजयचे वडील, नमस्कार सर.

मुख्याध्यापक, नमस्कार बोला काय काम काढले?

माझ्या मुलाला इतके कमी गुण कसे मिळाले? याबद्दल मला खुलासा पाहिजे होता. संजयचे वडील मुख्याध्यापकांना म्हणाले.

तसे उत्तर देणे अशक्य आहे; पण एक गोष्ट खरी आहे की, सगळ्या मुलांची कुवत किंवा क्षमता सारखी नसते. आपण सगळ्याच मुलांकडून सारख्याच अपेक्षा करने चुकीचे आणि मूर्खपणाचे ठरेल. तुमचा मुलगा गुणवत्तेमध्ये जरूर कमी पडत असेल पण त्याची शिस्त आणि वागण खूप चांगल आहे. सर्वांचा आदर करणारा विद्यार्थी आहे. तो खेळामध्ये चांगला आहे. त्याने विविध खेळाच्या प्रकारामध्ये जिल्हा आणि राज्य स्थरावर चांगली कामगिरी केलेली आहे. हे तुम्हालाही माहित आहे.

अहो, पण तुम्ही त्याला गुणवत्तेमध्ये का आणू शकत नाही? का त्याला चांगले गुण मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही? संजयच्या वडिलांनी पुन्हा मुख्याध्यापकांना प्रश्न केला.

हे बघा, आमच्याजवळ काही जादूची कांडी नाही.मुलांच्या प्रगतीमध्ये शाळेबरोबर तितकाच सहभाग आणि वाटा पालकांचाही महत्वाचा असतो.प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ताबडतोब करने बरोबर नाही. आम्हाला थोडा वेळ द्या.

अजून किती वेळ द्यायचा आम्ही तुम्हाला? चार वर्षे झाले हेच पाहतोय मी. काहीच सुधारणा दिसत नाही माझ्या मुलामध्ये. संजयचे वडील म्हणाले...

शाळा म्हणजे काही पिंजरा नाही.मुलांना हसू,खेळू द्यायचं नाही का? त्यांना त्याचं आयुष्य जगण्याचा, एन्जॉय करण्याचा अधिकार नाही का? मुलांना त्यांच बालपण एन्जॉय करू द्या. मुलांचं कौतुक करा, त्यांना शाबासकी द्या, त्यांना हसू द्या, बागडू द्या. तुम्ही तुमच्या लहानपणी मजा - मस्ती केली नाही का? एन्जॉय केला नाही का? का तुम्ही प्रत्येकवेळी संजयची तुलना इतरांशी करता? तुम्ही तुमचं बालपण एन्जॉय केलं.मग तुम्हाला या कोवळ्या जीवांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणी दिला?

सर,प्लीज इमोशनल ब्ल्यँकमेल करून मुख्य विषयावरून माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. संजयचे वडील म्हणाले.

मी इमोशनल ब्ल्यँकमेल करत नाही. वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडतोय.कधीतरी मुलांसाठी वेळ काढा.त्यांच्याबरोबर बोला,खेळा त्यांच्या समस्या समजून घ्या.फक्त काम आणि पैसा म्हणजे सर्वस्व नाही.मुलांशी भावनिक नात जोडन या वयात त्यांना भावनिक सुरक्षितता आणि आधार देने खूप महत्वाचे आहे.मुले म्हणजे चोवीस तास चालणारे मशीन नाही. मुलांनाही भावना आहेत हे समजून घ्या.

संजयचे वडील काहीच न बोलता रागारागाने संजयला घेवून निघून गेले.

(संजयच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मुख्याध्यापक आणि वडिलांमध्ये चाललेलं वैचारिक युद्ध आणि वडिलांची चुकीची भूमिका यामुळे तो निराश आणि हताश झाला होता. हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.)

५५% ला विज्ञान शाखेत प्रवेश मिळत नसतानाही संजयच्या मर्जीविरुद्ध वडिलांनी कॉलेजमध्ये वशिला लावून प्रवेश मिळवला. सगळे काही संजयच्या मनाविरुद्ध चालल होत. अपेक्षेप्रमाणे संजयच्या परीक्षेचा निकाल लागला. संजय इंग्रजी आणि विज्ञान या विषयात नापास झाला होता. वडिलांनी संजयला दार झाकून लाथा-बुक्क्यांनी मारलं.

असह्य होणाऱ्या वेदना घेवून घडलेली सर्व हकीकत सांगण्यासाठी दुसऱ्या दिवशी संजय दामुकाकांकडे गेला. दामूकाका घरी नव्हते. संजयने एका कागदावर दामू काकांसाठी एक चिट्टी लिहिली...

दामू काका तुम्ही मला खूप आधार दिला. तुम्ही माझे मित्र झाला. मला प्रत्येकवेळी तुम्ही धीर आणि आत्मविश्वास देत राहिला.त्यामुळेच मी जिवंत राहू शकलो. मी आई – बाबांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही.माझी जगण्याची इच्छा आता संपली आहे. मला माफ करा दामूकाका.

तुमचा लाडका

संजू

अवाजवी अपेक्षांच्या लादलेल्या ओझ्याखाली एकुलता एक मुलगा आई-वडिलांनी कायमचा गमावलेला होता.संजयच्या आत्महत्येची बातमी ऐकून त्याच्या मित्र परिवाराबरोबर संपूर्ण शहर हळहळत होते.

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आलेली संजयच्या आत्महत्येची बातमी वाचून दामूकाका सुन्न झाले.

-----------------------------------------------------------

अस्वस्थ

अनेक वर्षे समर्पित वृत्तीने सेवा बजावणारे राजाभाऊ सर्वांमध्ये प्रिय असणारे व्यक्तिमत्व होते. अलिकडच्या काळातील वाढते आधुनिकीकरण आणि बदललेली शिक्षण पद्धती यामुळे ते अस्वस्थ होते. तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करत आहेत; पण हा वापर कशासाठी आणि किती प्रमाणात याचे उत्तर देणे कठीण आहे. आजची मुले दिवस रात्र टी.व्ही.समोर बसून असतात. बघेल त्यावेळी मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो.

आजच्या विद्यार्थ्यामधील थोरा-मोठ्याबद्दल संपलेला आदर आणि बेशिस्त यामुळे राजाभाऊ उदास झाले होते. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये राजाभाऊ प्रमुख भूमिका बजावत. वेगवेगळ्या सभा- संमेलनामध्ये मुलांमधील बदलणारे संस्कार, पालकांचे अतिलाड,टी.व्ही आणि मोबाईलचा अतिवापर याबद्दल ते आपले मत व्यक्त करत होते. हे सगळे घातक बदल त्यांना मान्य नव्हते.

राजाभाऊ स्वेच्छ्या सेवा निवृत्ती घेत आहेत हे कळाल्यानंतर अनेक वर्षे घरगुती संबंध असणारा आणि ज्याला राजाभाऊ आदर्श शिष्य मानत होते;

असा राजाभाऊंचा माजी विद्यार्थी विनयला ही बातमी बातमी समजल्यानंतर विनय राजाभाऊंच्या भेटीसाठी आला होता.

राजाभाऊ पुस्तक वाचत खिडकीजवळ बसले होते. विनय येत आहे हे त्यांनी पाहिले. पुस्तक ठेवून राजाभाऊ बाहेर आले. पुन्हा आत जाऊन विनयसाठी पाणी घेवून आले. विनयला पाणी देवून न बोलताच गडबडीने पुन्हा गुरुजी आत गेले. विनय फक्त पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हते. गुरुजी बाहेर आले.

चहा ठेवून आलो रे, बोल कसा आहेस,

घरी सर्वजन कसे आहेत.

हो बरा आहे. घरचेही बरे आहेत.

मी येणार होतो तुझ्याकडे पण तब्बेत थोडी बरी नव्हती, त्यामुळे आलो नाही. दोन दिवस मुलीकडे जाऊन आलो. नातीचा वाढदिवस होता. लेकीन निरोप दिला म्हणून गेलो होतो; पण लेकीशिवाय कोण बोलतं या म्हाताऱ्याबरोबर. मोबाईल आणि टी.व्ही. मध्ये सगळ्यांची डोकी घुसलेली.गुरुजी अस्वस्थ झालेले पाहून विनयला काय बोलायचे हे समजत नव्हते.

गुरुजी आजची पिढी बदललेली आहे. आम्हा विद्यार्थ्यांचा आणि तुमचा काळ वेगळा होता. आज सगळ्या सुख-सोयी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची किंमत नाही. आज जग खूप जवळ आले आहे. घरबसल्या सर्व गोष्टी मिळायला लागल्या आहेत;त्यामुळे कष्टाची कामे कमी झाली आहेत. सोशल मिडीयाचा अतिवापर बदललेली जीवनशैली यामुळे माणसातलं माणूसपण हरवत चाललेलं आहे.

गुरुजी चहा घेवून आले. चहा पिऊन झाल्यानंतर विनय म्हणाला, गुरुजी तुम्ही असा अचानक स्वेच्छया निवृत्तीचा निर्णय का घेतला?

तु आता जे विचार मांडलास याच होणाऱ्या बदलामुळे मी अस्वस्थ आहे.आणि यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे.

परिस्थिती बदलली आहे; परिस्थितीनुसार बदल होणे साहजिक आहे. आपण काय करू शकणार आहे? विनय गुरुजींना म्हणाला तसे गुरुजी उत्तरले; विनय,परीस्थिती बदललेली आहे हे खरं आहे. यंत्रांमध्ये जसा बदल होतो;तसा मानवी शरीरयंत्रणेमध्ये तरी बदल झालेला नाही ना! हातानेच खातो आणि पायानेच चालतो ना आपण! संगणकाला माणसाने आज्ञा केल्याशिवाय ते काम करत नाही हे ही सत्य आहे; जरूर आपण एकविसावे शतक हे संगणकाचे शतक आहे असे म्हणतो;पण याचा शोध कुणी लावला? माणसाशिवाय त्याचा वापर शक्य आहे का?

हे बघ,विनय बदल वगैरे काही नाही रे, आपण या सगळ्याच्या आहारी गेलो आहोत. आपल्याला या सगळ्या गोष्टींच व्यसन लागले आहे. प्रत्येक गोष्टीच्या वापराला मर्यादा असतात त्या मर्यादा आपण तोडत आहोत आणि यामुळेच आपली वाटचाल ही विनाशाकडे होत आहे. आज सर्वांना मेहनत न करता सर्वकाही हवं आहे. आज समाजामध्ये चोरी, दरोडे, बलात्कार, खून यांचे प्रमाण वाढले आहे. हे कशामुळे? आज टी.व्ही.वर किती भडक दृश्ये दाखवली जातात हे तर तुला माहीतच आहे. सगळ्या गोष्टींच फक्त आणि फक्त अंधानुकरण आजची पिढी करत आहे.

सर, नका वाईट वाटून घेऊ. विनय कापऱ्या स्वरात म्हणाला.

विनय, तीस – पस्तीस वर्षे मी शिक्षक म्हणून काम करत आहे; पण आजकाल माझ मनच रमत नाही. पूर्वीच्याकाळी शिक्षक आणि पालकांचा विद्यार्थ्यांमध्ये धाक होता त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली शिस्त होती. शिक्षक आणि पालकांबद्दल आदरयुक्त भीती होती;पण आज विद्यार्थी अतिशय लाडावलेले आणि उर्मठ वागतात.कुठेतरी संस्काराची उणीव मला त्यांच्यामध्ये जाणवते,पालकांचे अतिलाड मला दिसतात.

संवाद हरवत चाललेला आहे. आज मुलं कुणाशीही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. शिक्षक असोत अथवा पालक आजची मुले कुणाचंही ऐकत नाहीत. एखादा सल्ला जरी द्यायला गेला तरी मुलांचा अहंकार दुखावला जातो. यामुळेच आपापसातील प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,आत्मियता संपत चालली आहे. मीच शहाणा, माझच खर! अशी मनोभूमिका असणारी मुलं देशाच भवितव्य कसे घडवणार याचीच मला चिंता वाटते.

पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये मान वर करून बोलायचेही धाडस होत नव्हते;पण आज-

गुरुजी बोलता-बोलता गलबलून गेलेले पाहून विनय म्हणाला;

गुरुजी, आपल्या सेवेची चारच वर्षे राहिली आहेत. माझी मनापासून इच्छा आहे कि, तुम्ही स्वेच्छया निवृत्ती घ्यायला नको.

माझा स्वाभिमान मारून आणि लाचार मनान मला सेवा करायची नाही. पण गुरुजी असं काय झालं? विनय गुरुजींना म्हणाला-

विद्यार्थ्यांच्या सततच्या उर्मठपणाने दिल्या जाणाऱ्या उत्तरांनी मी तुटून गेलोय. स्वाभिमानान आयुष्याची तीस-पस्तीस वर्षे सेवा केली. कधी कुणापुढ लाचार झालो नाही.आजच्या मुलांची बेशिस्त पाहिल्यानंतर कुठतरी माझ मन दुखावलं जात. माझ्या स्वाभिमानाला हे पटणार नाही.आजवर इतकी सेवा झाली;पण कुठल्याही विद्यार्थ्याच उलट उत्तर आणि उर्मठपणा मी पाहिला नाही.

गुरुजी अस्वस्थ झालेले पाहून,विनयला काय बोलायचे कळत नव्हते.गुरुजींचा स्वभिमानी आणि कणखर बाणा विनय लहानपणापासून पाहत होता. निर्भीड बाण्याचे गुरुजी कुणापुढेही झुकणारे नव्हते. विनय काहीतरी बोलणार इतक्यात गुरुजी म्हणाले...

पूर्वीच्या विद्यार्थ्यांना कुठलीही कडक शिक्षा दिली तर; पालक कधीही जाब विचारायला आले नाहीत.शिक्षकांना स्वायत्तता होती;पण आज सगळी उलटी परिस्थिती आहे. अभ्यास का केला नाही म्हणून, परवाच एका विद्यार्थ्याला ओरडलो तर त्याने पालकांजवळ तक्रार केली. दुसऱ्यादिवशी पालक मला जाब विचारायला शाळेत आले.पालकांना मी त्याच्या प्रगतीबद्दल सांगितले त्यावर ते म्हणाले आमचा मुलगा शिकू दे अगर नाही शिकू दे! त्याला हात लावायचा तुम्हाला काय अधिकार? पालकांचा समजूतदारपणा आणि शिक्षकांबद्दलचा विश्वास आणि आदर कमी होत चालला आहे.एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून छडी जरी मारली तरी तो पालकांना तक्रार करतो.

पालक शाळेत येऊन शिक्षकांवर पोलीस केस करण्याची भाषा बोलतात.

विनयला आपल्या शाळेचे दिवस आठवले. एकदा विनयचे बाबा शाळेत आले असताना गुरुजींना म्हणाले होते, गुरुजी आता याला आपल्या ताब्यात दिलेला आहे. हवी ती शिक्षा करा, छड्या द्या, कान पकडा, पायाचे अंगठे धरायला सांगून उभे करा आमची काहीही हरकत नाही पण याच भलं होऊ दे, चांगली प्रगती होऊ दे! असा विश्वास ठेवणारे पालक आता दुर्मिळ झालेले आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही.

विनय जागेपणी स्वप्न तर पाहत नाहीस ना?

नाही गुरुजी!

मग मी बोलतोय त्याच्याकडे लक्ष आहे का? कुठे भटकतो आहेस?

मी जी वस्तुस्थिती सांगतोय ती कदाचित तुला पटत नसेल.

गुरुजी शंभर टक्के मला पटतंय. आजची स्थिती आणि पूर्वीची स्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.

म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?

गुरुजी, आजच्या पालक आणि विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही सांगत असताना माझ्या बाबांचा चेहरा आणि बाबांनी माझ्या प्रगतीसाठी हवं ते करा. असे सांगून तुमच्याबद्दल दाखविलेला आदर आणि विश्वास मला आठवला. बोलता-बोलता विनयच्या डोळ्यातून अश्रू तरळांयला लागले. गुरुजी, मी तुमच्या भावना समजू शकतो,तुमच्यासारखे निस्वार्थी भावनेने सेवा करणारे शिक्षक मी पाहिलेले नाहीत. परिस्थिती बदललेली आहे आणि परिस्थितीबरोबर माणूसही बदलला आहे पण माणसाने आपली नितीमुल्ये बदलायला नकोत.तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमांचा वापर वाढला आहे पण माणसाने संस्कार का विसरावेत?

गुरुजी स्तब्ध होते. मनावर झालेले घाव विसरता येण्यासारखे नव्हते.पण पुन्हा-पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. विनय आज चांगल्या पदावर काम करत होता. त्याचा सुखी संसार आणि आनंदी आयुष्य पाहून गुरुजींना समाधान वाटत होते. न राहून गुरुजी विनयला म्हणाले, विनय आज तुझ्या यशस्वी जीवनाचा मला हेवा वाटतो. अनेक विद्यार्थी होऊन गेले पण तुझ्यामध्ये मी जे वेगळपण पाहिलं ते कुणामध्ये नाही.

घरची गरिबीची परिस्थिती असतानाही तू जिद्दीने शिक्षण घेतलस याचा मला अभिमान वाटतो.

गुरुजींनी विनयला जवळ घेतले आणि म्हणाले...

विनय तुला माझ्यामुळे खूपच उशीर झाला.मला माफ कर.

नाही नाही गुरुजी असं काही नाही.

तुम्ही मोकळे झालात तुमचे मन हलके झाले याचा मला आनंद आहे.

माझ्याजवळ हलके होणार नाही तर कोणाजवळ...?

विनय गुरुजींचा निरोप घेवून घरी गेला...

गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते...

----------------------------------------------------------------

सुली

पित्ताडा नवरा पक्या, मतीमंद मुलगा सगऱ्या, कॉलेजात जाणारा मंग्या, लग्नाला आलेली मुलगी राजी या सगळ्यांचा हिम्मतीने आणि नेटाने सांभाळ करणारी सुली.

सुलीची सकाळच्या प्रहरी घाई-गडबड, तारांबळ उडत असे. सगळ्यांच जेवण-खाण,धुण-भांडी आवरून तिला दुसऱ्याच्या बांधावर जाण भाग पडायच.

सुली, आग ए सुली.

शेजारच्या सकणीन आवाज दिला, तस सुली सकणीला म्हणाली.

आलो,आलो गं थांब जरा.

सगळ आवरून सुली घराच्या बाहेर पडली.

किती येळ ह्यो,मालक वरडलं की,झाटदिशा आवरायला येत नाय व्हय तुला.

सकणी रागारागाने सुलीला म्हणाली.

सगऱ्याच आवरत हुती,म्हणून जरासा येळ झाला.

सुली सकणीला म्हणाली.

कशाला सांभाळतीस त्या येडयाला, किती केलं तरी ते खूळ, फुकटच खायाला घालून काय उपयोग त्याचा.

सकणी सुलीला म्हणाली, तसा सुलीचा चेहरा रागाने लालभडक झाला.

का गं फोडावणी, सगऱ्या माझ पॉर हाय. मी त्याला जलम दिलाय.

माझ्या पोराला खूळ-बीळ म्हणशील तर हितच जीव घीन तुझा.

रस्त्याने येणारे-जाणारे लोक सुली आणि सकणीच चाललेलं भांडण पाहत होते.

सुलीचा रुद्रावतार पाहून सकणीची घाबरगुंडी उडाली. सकणी पुन्हा कधी सुलीच्या नादी लागली नाही.

सूर्य मावळतीकडे झुकलेला होता. पक्ष्यांना घरट्याची ओढ लागली होती. पक्ष्यांची किलबिल, चिमण्यांचा चिवचिवाट वाढलेला होता. हवेतला गारवा आल्हाददायक वाटत होता. रानात कामाला गेलेल्या बाया-बापड्यांची पावले घराकडे वळत होती.

सुलीला घरी यायला वेळ झाला होता.राजीन चूल शिलगावली आणि चहा ठेवला.

मंग्या कुठ हाय?

सुलीन राजीला प्रश्न केला.

शाळसन आलाय तवापासन कुठं गेलाय,आजून आला नाय.

राजी म्हणाली.

आणि सगऱ्या?

सुलीन पुन्हा प्रश्न केला.

सगऱ्या पाणी भरायला लागलया.

सुलीचा नवरा पक्या दारू पिऊन सोप्यात पडला होता.

इतक्यात मंग्या येतो.

आई मला पैस पाहिजेत.

कशाला रं पैस?

कॉलेजच्या परीक्षेची फी भरायची हाय.

किती पैस लागणार हायत?

पाचशे रुपये.

पाचशे रुपय!

व्हय आई.

एवढी मोठी रक्कम ऐकून सुलीचा घसा सुकल्यासारखा झाला.

आई, नगो इचार करू, कायतरी करू आपण. मी यीन उध्यापासन तुझ्याबरोबर भांगलणीला.

राजी आईला धीर देत म्हणाली.

नगो पोरी, लोकं चांगली नाहीती. तरणीताट पोर तू, जीवाला घोर नगो.

नराधमांच्या तरासापोठी तुझ शिक्षण सुटल. बाप असा पिऊन पडणारा, ना संसाराचा घोर, ना पोरा-बाळांचा.

माझंच नशीब फुटकं, काय करू. सुली नशिबाला दोष देत म्हणाली.

इतक्यात आतून आवाज येतो...

जीव घेतो तुझा, हरामखोरा.

ए, आय, ए, आय, आय...

आतून आवाज येताच, मायलेकी आत धावत जातात.

पाहतात तर काय...

सगऱ्याचा बाबा पक्या, सगऱ्याला लाथा-बुक्यांनी मारहाण करत होता.

मन हेलावणारे दृश्य पाहून राजीला राहवलं नाही.राजीन बाबाला ढकलून दिल तस पक्या एका कोपऱ्यात जाऊन पडल.

अगं ए व्हयमाले, विष घालून मार त्या सगऱ्याला. कशाला खाद घालून सांभाळलीयास या येडयाला.

दारूला एक पैसा मिळणा झालाय आन खुळ्याच लाड पुरवायला लागलीया. मला भूक लागलीया जेवायला दे.

पक्या सुलीला नको,नको ते वाईट वंगाळ बोलत होत.

एका बाजूला सगऱ्या इव्हळत पडल होत.

सुलीन जवळ जाऊन सगऱ्याला पोटाशी धरल तसं सगऱ्या हमसून रडायला लागलं...

सगऱ्या मतीमंद असला तरी घरातली सगळी काम करत होता.राजीन त्याला सगळ शिकवलं होत.

वयात आलेली पोरं राजी, मंग्याच शिक्षण, पक्याच दारूच व्यसन, सगऱ्याला सगळ्यांच नाकारन, या सगळ्या आव्हानांना सुली हिम्मतीन, निर्भीडपणे तोंड देत होती.

दररोजच नव संकट, नवा संघर्ष सुली खचणारी,माघार घेणारी नव्हती.

स्वाभिमान तिच्या रक्तात भिनलेला होता.

रावसाहेबांच्या शेताभातात भांगलणीला जाणारी सुली. मंग्याच्या परीक्षेच्या फीसाठी उधार-उसनवार घेण्यासाठी वाडयावर गेली होती.

रावसाहेब आहेत काय?

आताच बाहेर गेल्याती. काय काम होत?

वाड्यावर कामाला असणाऱ्या बबण्यान सुलीला इचारलं.

थोडं पैस पायज हुत.

किती?

पाचशे रुपय.

बरं ठीक हाय.साहेब आल्यावर निरोप देतो.

सुली निराश मनान घरी परतली.

मंग्याची फीसाठी कटकट सुरूच होती.

राजी जळान गोळा करायला रानात गेली हुती.

सुलीला घरी यायला येळ झाला हुता.

सगऱ्या कुठं हाय रं ?

सुलीन मंग्याला इचारलं.

सगऱ्या व्हय, हाय की आत.

आत काय करायला लागलाय?

भांडी घासायला लागलंय, चहापण ठेवलाय.

हे ऐकून सुलीच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळायला लागले.

जग सगळ सगऱ्या काय कामाच हाय,त्याला कशाला सांभाळलय असं म्हणतंय. पण सगऱ्याच घरातल्या बारीक-सारीक कामाला हातभार लावत होत.

पाचशे रुपये आणि रावसाहेबांचा निरोप घेवून बबन्या सुलीच्या घरी आला.

बबन्या पैसे घेवून आल्याचे पाहून सुलीचा चेहरा खुलला.

सुली हे घे पैसे. बरोबर पाचशे रुपये आहेत,मोजून घे.

साहेबांनी संध्याकाळी वाड्यावर यायला सांगितलंय.

सुलीला बबन्याचा आणि साहेबांचा हेतू कळाला.

सुलीन पाचशे रुपये बबन्याच्या तोंडावर फेकले.आणि सुली बबन्याला म्हणाली...

तुझ्या आई- भनीला न्हेजा म्हणावं वाड्यावर.

सुलीचा राग पाहून, बबन्या तिथून पळत सुटला.

साहेब,सुलीच्या नादी लागू नका.सुली स्वाभिमानी हाय. ती कुणापुढही झुकणारी नाही.

का, काय झाल?

आहो, साहेब तुमचा निरोप सांगताच,सुलीन माझ्या अंगावर पाचशे रुपये फेकले.

त्या दीडदमडीला एवढी मस्ती! यील कवातरी वाकत.

साहेब,सुली लाचार नाही. तिचा नाद सोडा.

बबन्याच म्हणन रावसाहेबांना पटलं नाही. साहेबांनी सुलीबद्दलचा मनातला राग तसाच धग-धगत ठेवला.

स्वाभिमानी सुली रावसाहेबांपुढे कधीच लाचार झाली नाही.

सुलीन आणि राजीन दिवस – रात्र एक करून मंग्याच्या फी ची व्यवस्था केली.

मंग्या नियमितपणे कॉलेजला जात होता.

राजीची शेजारच्याच गावात राहणाऱ्या सोमनाथ बरोबर सोयरीक जुळविण्यात आली.सोमनाथ सुसंस्कारी,गरीब कुटुंबात वाढलेला मुलगा होता. सोमनाथ गावातल्या दुध डेअरीत कामाला होता.चार आकणी शेती,आणि दुभती जनावर.

सोमनाथच कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होत.

थाटा-माटात राजीच लग्न झालं.

राजीच चांगल झाल. सुलीच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली. सुलीला राजीच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याच समाधान परमोच्च आनंद देवून गेल.

सुलीच्या आयुष्यात ऊन-पावसाचा खेळ मात्र चालूच होता. तिचा संघर्ष काही संपला नव्हता.

बाहेर विजांचा कडकडाट चालू होता. अचानक मुसळधार पाऊस कोसळायला लागला. इतक्यात सुलीचा नवरा पक्या फुल्ल दारू पिवून आला.

सुली, आगं ए सुली.

पक्या सुलीला हाका मारता-मारताच उंबरठ्यावर कोसळतो ते कायमचाच.

सुली जीवाच्या आकांताने ओरडायला लागते.

सुलीवर दुःखाचा डोंगर कोसळतो.

या घटनेतून सुली सावरते न सावरते तोपर्यंत मंग्या त्याच्याच कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलगीला घेवून घर सोडून पळून जातो.

एका पाठोपाठ एक बसणाऱ्या घाव-आघात्तांनी सुली कोसळून जाते.

घरा-दारासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या सुलीच्या नशिबी हा भोग यावा हा कसला नियतीचा खेळ?

सुलीच्या जिव्हारी लागलं होत. सुली अंथरुनाला खिळून होती.

स्वत:च्या बापासकट सगळ्या जगाने अवहेलना केलेला आणि नाकारलेला सगऱ्या मात्र दिवस-रात्र सेवेसाठी आईजवळ बसून होता...

-----------------------------------------------------------------------