Nirbhaya - 12 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया - १२

Featured Books
  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

  • ખજાનો - 76

    બધા એક સાથે જ બોલી ઉઠ્યા. દરેકના ચહેરા પર ગજબ નો આનંદ જોઈ, ડ...

Categories
Share

निर्भया - १२

                                निर्भया - १२ -  

        "जेव्हा राकेशने  नयनाला बघून लग्नाला होकार दिला तेव्हा आम्हाला वाटलं की आता सगळं सुरळीत होईल. पण आता कळलं की, ऑफिसच्या निमित्ताने घरी यायला जमणार नाही, असं आमहाला सांगून  तो आमच्या दुसर्‍या घरात  अजूनही दीपाला भेटत होता. शेवटी तिच्या प्रेमानेच माझ्या मुलाचा जीव घेतला." 
         राकेशचे  आई-वडील  आपल्या   मनातल्या  सर्व  गोष्टी सुशांतला  न  लपवता  सांगत होते होते,  राकेशच्या   मनावर   ताण   वाढायला  या  दोघांचे विचारच  कारणीभूत  असावेत.  दीपाच्या  मनाचा विचार यांनी केला नाहीच; पण सामाजिक प्रतिष्ठा जपतांना कधी  स्वतःच्या मुलाच्या भावना  जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही." सुशांतचं विचारचक्र चालू होतं.
    राकेशच्या आई-वडिलांचं दुःख  सुशांत  समजू  शकत  होते. पण त्यांनी   दीपावर  कोसळलेल्या संकटाचा कधी माणुसकीच्या दृष्टिकोनातून  कधी विचार  केला  नव्हता हेसुद्धा  तितकंच  खरं  होतं. त्यांची  मनस्थिती   लक्षात   घेऊन  सुशांत जास्त बोलणं  टाळत  होते.  पण  शेवटी   न  रहावून ते म्हणाले,   
    "तुमचा काहीतरी गैरसमज  झालाय! राकेशला शेअर  मार्केटमध्ये  जबरदस्त  फटका  बसला.  ही अचानक् मिळालेली बातमी तो पचवू शकला नाही, आणि  त्याला  हार्ट - अटॅक   आला. त्या  घटनेशी  दीपाचा  काहीही संबंध नाही."
      ते पुढे म्हणाले,
      " तुम्ही  दिलेली  माहिती  सध्या  पुरेशी  आहे. तुम्हाला जास्त  त्रास  द्यायची गरज पडणार  नाही. आवश्यकता  वाटली तर  परत  येऊन  भेटू. आता   आम्ही निघतो." असं  म्हणून सुशांत  तिथून बाहेर पडले.   निघताना  राकेशच्या  मित्रांचे  पत्ते आणि फोन   नंबर    विश्वासरावांकडून   घ्यायला   माने  विसरले नाहीत.
                ********
      माने आणि   सुशांत व्हॅनमध्ये जाऊन बसले. बराच  वेळ  ते  दोघे  गप्प  होते. राकेशच्या आई- वडिलांचे  दुःख पाहून ते दोघेही मनातून हेलावले    होते. थोड्या वेळाने मानेंनी शांततेचा भंग  करत विचारले," काय  वाटतं  तुम्हाला? यात  सरबतात विष कोणी मिसळलं असेल?  दीपा  निघाल्यावर कोणी तेथे गेलं असण्याची शक्यता अगदी कमी आहे."
      " पण  ते  राकेशनेच  मिसळलं  असेल  तर? आज  फिंगर-प्रिंटचे आणखी काही रिपोर्ट येणार  आहेत. बघू  काही    धागा   हाती  लागतो  का!" सुशांतचा चेहरा विचारमग्न होता.
फिंगरप्रिंट   रिपोर्टमध्ये   विशेष    काही     नव्हतं. आधीच्या रिपोर्टची पुष्टी केलेली होती.  त्या  घरात मिळालेले बोटांचे ठसे राकेश आणि दीपाचेच होते.
      " दीपाने जर नेहमीप्रमाणे घराची साफसफाई केली असेल, तर  तिचे  फिंगरप्रिंट्स  तिथे  मिळणं स्वाभाविक   आहे.  त्यासाठी  तिच्यावर   खुनाचा संशय घेता येणार नाही. मला तर आता  असं वाटू लागलंय   की,  राकेशने आत्महत्या  करण्यासाठी स्वतःच   सरबतात   मिसळलं   असावं ."  सुशांत मानेंना म्हणाला.
    " त्याची आई त्याचं लग्न दुस-या मुलीशी लावून देणार  होती,  हे  त्याला  सहन   झालं  नसावं. तरी आपण परत एकदा  दीपाशी   बोलूया." राकेशच्या आईकडून    दीपावर  ओढवलेल्या   प्रसंगाविषयी    कळल्यावर तिला एकदा भेटलं पाहिजे, असं  वाटू लागलं होतं.  
" तिला मानसिक आधाराची गरज आहे, ती  मुलगी प्रचंड वादळ मनात घेऊन वावरतेय, आणि वरवर  सर्व काही  ठीक असल्यासारखं दाखवतेय. कधीतरी  असह्य  झालं  तर  स्वतःचं काय करून घेईल; सांगता येत नाही."  ते  मनाशी म्हणत होते. त्यांना दीपाची काळजी वाटू लागली  होती; याला   एक मोठं कारण होतं.
                        ********
         दीपाची  कहाणी   ऐकल्यापासून   सुशांतना आठवत  होती  त्यांची बालमैत्रिण वैशाली! दोघांची घरं अगदी लागून होती. ती  श्रीमंत  आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. दर  दरवर्षी    सुशांतला राखी  बांधत असे. सुशांतकडे उंचावरच्या   कै-या- चिंचा पाडून द्यायचा हट्ट  करीत असे. आणि घरात आणलेला   खाऊ   सुशांतला  दिल्याशिवाय कधी खात नसे. दोघं  एस.एस.सी. पर्यंत  एकाच  वर्गात शिकली.   वैशाली    अभ्यासात  अतिशय  हुशार! देखणीही लाखात एक!  तिला सी.ए. व्हायचं होतं. त्यासाठी   तिने   पुण्याच्या   काॅमर्स  काॅलेजमध्ये  अॅडमिशन  घेतलं, आणि    पुण्याला   आत्त्याकडे राहायला   गेली.  सुशांत  कोल्हापूरमध्येच  बी. ए. करत होते. तिने ठरवल्याप्रमाणे शिक्षण पूर्ण केलं. तिकडेच  एका  मोठ्या फर्ममध्ये  तिला नोकरीही मिळाली.   मधल्या     काळात   सुशांत   त्यांच्या  आवडीच्या पोलिसखात्यात   इन्सपेक्टर   म्हणून   मुंबईला रुजू झाले  होते. तिचे फोन  सुरूवातीला नियमाने  येत. पण  नंतर   मात्र   क्वचितच    येऊ लागले. एकदा  तिचा फोन  आला,  तेव्हां ती  खूप  आनंदात  होती. एका मुलाच्या ती  प्रेमात  पडली  होती, हे सांगण्यासाठी तिने फोन केला होता.
      "हल्ली तू   फोन करत   नाहीस. एवढाही वेळ मिळत    नाही ;  म्हणजे    माझ्यासाठी   नक्कीच  वहिनी शोधलेली  दिसतेय."  ती  त्याला   चिडवत         होती.
    "इथे गुन्हेगारांना शोधण्यातच माझा सगळा वेळ जातो. वहिनी  कधी  शोधणार?"   सुशांत म्हणाला.
   "ठीक आहे! म्हणजे ते काम आता मलाच करावं लागणार!" वैशाली म्हणाली.
   " तेवढं मात्र करू नको!  आईने  माझ्या लग्नाचं मनावर घेतलंय; तेवढंच पुरे आहे. त्यात तुझी भर नको!" सुशांत तिला मधेच थांबवत म्हणाले.
  " मी   मात्र  मस्त  पार्टनर  शोधलाय! केमिकल इंजिनियर आहे. मात्र  लग्नानंतर  आम्ही लंडनला सेटल   होणार   आहोत. त्याला  तिकडे नोकरीची आॅफर आहे. कधी   वेळ   मिळाला  तर  पुण्याला  येऊन  जा. राजीवशी  तुझी ओळख करून देईन." तिचा उत्साह  फोनवरसुद्धा  लपत नव्हता. 
     त्यानंतर बरेच दिवस तिचा  फोन आला नाही. आणि सुशांतही रोजच्या कामापुढे तिला पुण्याला जाऊन भेटण्याचं दिलेलं प्राॅमिस  विसरून गेले......
     आणि एक दिवस तिच्या आत्महत्येची बातमी आली. त्यावेळी  सुशांत कोल्हापूरात  होते. तिच्या आईवडिलांना  घेऊन विक्रांत पुण्याला गेले, तेव्हा  कळलं   की वैशाली  प्रेग्नंट  होती.  तिचा प्रियकर नोकरीसाठी फाॅरेनला गेला होता. त्यानंतर  त्याने  तिच्याशी सगळे  संबंध पूर्ण  तोडून टाकले  होते. ......
     सुशांतना आजही  वाटत  होतं  की  तिने जीव द्यायला  नको   होता.  त्या   सुशिक्षित,  स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या वैशालीनं  लढायला हवं होतं. इतक्या  लवकर  हार  मानायला   नको  होती. आता   दीपाविषयी   ऐकलं, आणि  त्यांना  वैशाली आठवली. दीपा   ज्या  कणखरपणाने  अायुष्याला सामोरी जात होती, ते पाहून त्यांना तिचं मनापासून  कौतुक वाटत होतं. स्वतःच्या भावना बाजूला ठेवून  कुटुंबासाठी   झटण्याची   तिची जिद्द पाहून त्यांच्या मनात  तिच्याविषयी   आदर   निर्माण झाला  होता. तिच्याविषयीच्या प्रेमभावनेला खतपाणी मिळायला एवढी  आत्मीयता  पुरेशी     होती. 
                        *********
      त्या केसच्या  निमित्ताने  सुशांत   अनेक   वेळा  दीपाला भेटले. पण नंतर, केसची चर्चा होण्याऐवजी  अवांतर  गप्पाच जास्त व्हायला लागल्या. तो विषय    ते टाळतच होते  म्हणाना!  कारण  त्यांच्या  भेटीचा मुख्य हेतू  दीपाशी मैत्री करून तिची  एकटेपणाची भावना कमी करणे हाच होता. आपण राकेशबरोबर थांबायला  हवं  होतं, ही  रुखरुख   एकदा  दीपाने त्यांना  बोलून  दाखवली    होती.  त्यामुळे  दीपाशी त्याचा  मृत्यू  कसाव झाला  याविषयी  त्यांनी  कधी केली  नाही.   शक्यतोवर    राकेशचा   उल्लेख    ते संभाषणात  टाळत   होते. त्यामुळे   दीपा  अजूनही    स्वतःला   राकेशच्या  मृत्यूसाठी  जबाबदार   मानत होती,  नितीनची  परीक्षा   संपली,  की   सर्व   काही सुशांतना सांगायचं असं   तिने   ठरवलं   होतं,  पण त्यापूर्वीच  सुशांतची नाशिकला बदली झाली; आणि   तपासाची  सूत्रे  दुसऱ्या  इन्स्पेक्टरच्या  हाती   गेली.  त्यांनी विशेष छाननी न करता नैसर्गिक  मृत्यू म्हणून  ती  फाईल      बंद केली.  
                            ********
 माने  जणू  दीपाच्या  घरचे सदस्य झाले होते. दीपाला ते धाकटी बहीण समजू लागले होते. सुशांत आणि माने यांचा त्या कुटूंबाला  मोठा आधार  वाटू लागला   होता.  मानेंकडून   दीपाला  कळलं,   की राकेश ते  सरबत  पिण्याआगोदरच   त्याचा   मृत्यू  नैसर्गिक   हार्ट- अटॅक येऊन  झाला  होता. त्याच्या  मृत्यूला  ती   जबाबदार   नव्हती; हे  कळलं  तेव्हा   ती  पश्चात्तापाच्या    भावनेतून   मुक्त   झाली. तिने त्याला  मारण्याचे  पाप  आपल्या  माथी   लागू  न दिल्याबद्दल  परमेश्वराचे   आभार    मानले. आता  गु्न्हा कबूल करण्याचीही गरज राहिली नव्हती.
    जरी  नाशिकला  ट्रान्सफर  झाली  होती तरीही सुशांत मात्र दीपाला भेटत राहीले. दोघांची चांगली मैत्री  झाली   होती. ते   जेव्हा  जेव्हा मुंबईला येत  तेव्हा  दीपाच्या घरी न चुकता येत असत. ते   जर   भेटले  नाहीत तर दीपालाही चुकल्यासारखं  होत  असे. हळूहळू   तो  काळा   दिवस   विसरून  ती  वास्तवात    जगायला   शिकत   होती.  नितिनचा  मेडिकलचा  अभ्यास   व्यवस्थित  चालला  होता. वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ती कर्तव्यपूर्तीच्या समाधानात होती.
                      *******
 एक    दिवस. सुशांतना   त्यांच्या    आईचा   फोन   आला. " तुझ्यासाठी  एक  मुलगी बघितली आहे. मुंबईलाच राहते त्यामुळे तुझा रजेचा बहाणा आता  चालणार  नाही .  नाशिक मुंबई अंतर  फार नाही.  या शनिवारी आम्ही तुझ्या घरी  येत आहोत . रविवारी   संध्याकाळी  आपण   मुलगी   बघायला   जायचं आहे. या दोन दिवसांसाठी काही काम  ठेवू नकोस. फार   चांगली  मुलगी   आहे.  सुंदर  आहे. डबल  ग्रॅज्युएट   आहे आणि  मोठ्या   कुटुंबातली  आहे. आपलं  घर चांगलं  सांभाळेल. तुला  नक्की आवडेल."  त्या  उत्साहाने  बोलत  होत्या.  एवढी चांगली सून मिळणार, म्हणून खूप आनंदात होत्या.         
" आई! माझ्या लग्नाची घाई करु नको असं मागेच  सांगितलंय    मी   तुला ! एवढ्यात   लग्न नाही  करू  शकत   मी !"  सुशांतने  नेहमीप्रमाणे   टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.
     " आता  मी  तुझं  काही ऐकणार नाही! लग्नाचं  वय निघून चाललंय  तुझं! एकूलता  एक मुलगा  आहेस  तू आमचा! तुझ्या लग्नाची किती    स्वप्नं रंगवली आहेत आम्ही ! येत्या रविवारी तुला आमच्याबरोबर  यावंच   लागेल.  पसंतीची  गोष्ट पुढची आहे. तू तर मुली  बघायलाही  तयार होत नाहीस!  ती तुला पसंत  नाही  पडली तर आम्ही तुझ्यावर  जबरदस्ती  थोडीच  करणार  आहोत?" आई आता त्याचं काही ऐकायला तयार  नव्हती. यावेळी तिने त्याच्या मनात काय  आहे हे जाणून घेण्याचा चंग बांधला होता.
      तिला  काय  उत्तर  द्यावं, हे सुशांतला कळेना. जीवनसाथी म्हणून त्याच्या नजरेसमोर फक्त दीपा होती,  पण  तिने  स्वतःभोवती असा कोश निर्माण  केला  होता; की तिच्यासमोर प्रेम व्यक्त करण्याचा  धीर त्यांना होत  नव्हता. राकेशच्या प्रेमाचा पगडा तिच्यावरून    कितपत्  उतरलाय  याचा   अंदाज त्यांना बांधता  येत नव्हता. त्यांनी   विचार   केला,       " शनिवारी आई  येणार, म्हणजे   अजून  चार-पाच दिवस बाकी  आहेत. तोपर्यंत  दीपाचा कल जाणून  घ्यायला हवा. उद्या तिला आठवड्याची सुट्टी असते. उद्याच तिला   भेटायला  हवं.  आता  वेळ घालवून चालणार नाही."
   
                       ******** contd....part- 13-