नाळ..
नाळ ह्या चित्रपटाच्या नावावरूनच त्यात काहीतरी वेगळ पाहायला मिळणार अस जाणवतच! दर्जेदार चित्रपट आणि झी स्टुडीओज् हे समीकरण प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. नाळ ह्याच धाटणीचा चित्रपट आहे का हे पाहण औत्युक्याच ठरणार आहे. मराठी चित्रपटात बरेच वेगवेगळे प्रयोग होतांना दिसत आहेत आणि मराठी प्रेक्षकही चांगल्या चित्रपटांना नेहमीच उचलून धरतो.
‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ ह्या चित्रपटाची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहे. नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेताही आहे. ह्या चित्रपटात नागराज मंजुळे यांचा अभिनय देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. ह्यावेळी काय नवीन पाहायला मिळतंय ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. नाळ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे तर ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाद्वारे नागराजने समाजातील प्रश्न लोकांसमोर उभे केले आहेत. आता नाळ हा चित्रपट देखील एखाद्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणार अशी आशा आहे आणि नाळ हा चित्रपट सैराट सारख अभूतपूर्व यश हा चित्रपट मिळवतो का ते पाहण्यासारख आहे. चित्रपटामध्ये कोण कलाकार आहेत हे मात्र टीझर किंवा ट्रेलर मधून कळल नव्हत. आज चित्रपट चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या चित्रपटात अजून कोण कलाकार आहेत ते पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. म्हणजेच, चित्रपटाचा सस्पेन्स वाढवून त्यात काय असेल हे जाणून घ्यायची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
चित्रपटाची कथा-
नदीच्या काठी वसलेल्या एका लहान खेडेगावात चित्रपटाची गोष्ट घडते. अंदाजे आठ वर्षांचा चैतन्य (श्रीनिवास पोकळे) हाच या सिनेमाचा नायक. चैतन्यचे वडील (नागराज मंजुळे) गावातील जमीनदार आहेत. चैतन्य आपले वडील, आई (देविका दफ्तरदार) आणि आपल्या आजीसह गावात राहत आहे. गावात दोस्तमंडळींच्या साथीने मस्त हुंदडत आहे. गावातल आयुष्य दाखवण्यात आल आहे. चैतन्य कोंबड्यांशी खेळत आहे, शेतात-जंगलात बागडत आहे. गोठ्यातल्या म्हशींसोबत रमत आहे. जवळच असलेल्या गावातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत आहे. अगदी ग्रामीण भागात आजही अनुभवायला येणाऱ्या ग्रामीण जीवनाचा तो मस्त आनंद लुटत आहे. त्याचं भावविश्व चितारण्याला लेखक-दिग्दर्शकाचे प्राधान्य आहे. आणि त्यातून चित्रपटाचा खरा आनंद घेता येतो. चैतन्यच आयुष्य सुरळीत चालू असत पण त्याच्या आयुष्यात एकदम एक वादळ येतं. दूर गावावरून त्याचा एक मामा (ओम भूतकर) येतो आणि तुझी सध्याची आई ही खरी आई नाहीच, असं त्याला सांगतो. तुला दत्तक घेण्यात आलं असून, तुझी आई दूर गावाला राहते असं त्याला सांगण्यात येतं. लहान वयात जे सांगू त्यावर विश्वास बसतो तसच काहीस चैतन्यच सुद्धा होत. अत्यंत निरागस अशा चैतन्यला ही गोष्ट खरी वाटते आणि मग तो सुरू करतो त्याच्या खऱ्या आईचा शोध. अक्षरश: दुधात मिठाचा खडा पडावा तसं त्याच्या जीवनाचं होतं. राहत असलेल्या आईकडं संशयाच्या नजरेने तो पाहू लागतो आणि एकूणच आईविषयी वाटणारं ममत्वही कमी व्हायला लागतं. चैतन्यने केलेल्या आईच्या शोधाची गोष्ट म्हणजे ‘नाळ’ हा सिनेमा. त्याला खरी आई भेटते का ? दरम्यानच्या काळात घरात आणखी काय घडतं? जन्म देणारी आई आणि दत्तक आई यांच्यातील फरक तो कसा ओळखतो आणि नक्की कोणत्या आईला तो आपलंसं करतो. त्याची नाळ नक्की कोठे जुळते? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नाळ पाहायला हवा.
कोणत्याही प्रेक्षणीय सिनेमाची गोष्ट हीच खऱी सिनेमाचा नायक असते. इथेही तसंच आहे. वेगळाच विषय उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर मांडला गेला आहे. सातत्यानं पुढं काय होतं, अशी उत्सुकता लागून राहिलेल्या या गोष्टीची हाताळणीही दिग्दर्शक सय्यामानी करतो. गोष्ट पटापट पुढे सरकत नाही. वेळ घेऊन, थांबून ही गोष्ट आणि एकूणच चैतन्यचं भावविश्व उलगडतो. लहान मुलाच आयुष्य कस असत हे दाखवायचा प्रयत्न ह्या चित्रपटातून झाला आहे. व्यवसायाने सिनेमटोग्राफर असणाऱ्या आणि सैराट, देऊळसारखे सिनेमे सजवणाऱ्या सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी दिग्दर्शनाच्या पदार्पणातच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रेक्षकाला विचार करायला लावण ही सुद्धा एक कला आहे आणि ह्या चित्रपटात ते उत्तम रित्या केलेलं आहे. काही प्रश्नांची उत्तरे देऊन, काही प्रश्नांची संदिग्ध उत्तरे देऊन आणि काही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांवर शोधण्याचे काम सोपवून त्यांनी प्रेक्षकांच्या डोक्याला चालना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. अर्थात असं असलं तरीही सिनेमाचे संवादलेखन करणाऱ्या नागराज मंजुळेची छाप संपूर्ण सिनेमावर जाणवत राहते. सातत्यानं वास्तव उलगडण्याचा त्याचा प्रयत्न इथेही सुरूच राहतो. मायलेकाचे नाते उलगडताना म्हैस आणि रेडकूचे वापरलेले रूपकही नेटके. सुधाकर यांनी अगदी पहिल्या फ्रेमपासून सिनेमा उत्तमरितीने नटवला आहे. गावाकडचं जीवन, त्यातले बारकावे त्यांचा कैमेरा तरलतेने टिपतो. अद्वैत नेमळेकर यांचे पार्श्वसंगीत, अँथनी रुबेनची साऊंड चित्रपटातील एक व्यक्तिरेखा म्हणूनच आपल्यासमोर येतात. गावाकडं जीवन दाखवताना ग्रामीण टच असलेल्या काही गोष्टी मुद्दामून सिनेमात दाखवल्या जातात. म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या चैतन्यच्या घरात टीव्ही आहे, इतर सुविधा आहेत. मात्र, तरीही त्याची आई अजूनही जात्यावरच पीठ कांडतेय, हे जरा खटकतं. काही गोष्टी खटकतात. उगाच आल्या आहेत अस सुद्धा वाटून जात आणि त्यावर विश्वास ठेवता येत नाही. मध्यंतरानंतर सिनेमाची गतीही काहीशी मंदावते. मात्र, पुन्हा शेवटाकडे सिनेमा ट्रॅकवर येतो. नागराज, देविका दोघांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सर्वात भाव खाऊन जातो तो श्रीनिवास पोकळे. ह्या चित्रपटाचा नायकाने त्याचे काम उत्तम रित्या केलेले आहे. या बालकलाकाराने कमाल केली आहे. विविध प्रसंगातो तो सहज अभिनयाने बाजी मारतो. ‘जाऊ दे न वं’ गाणही धम्माल. थोडक्यात काय तर नाळ ही अगदी रोजच्या जगण्यातील गोष्ट आहे, त्याचा बाज ग्रामीण आहे, त्यातलं भावविश्वही गावातलं आहे. मात्र, त्यात सांगितलेला आशय अगदी कोणालाही लागू आहे. आई-मुलाच्या विश्वाची सफर एकदा करू शकतो. ढोबळमनानं हा लहानांचा सिनेमा असेलही. मात्र, तो मोठ्यांनाही तितकाच अपील होऊ शकतो आणि विचार करायला लाऊ शकतो. ह्या चित्रपटात एक गोष्ट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सिनेमानं सांगायला हवं, असा आग्रह तो धरत नाही. फक्त जे आजूबाजूला घडतं ते दाखवतो, थेटपणे दाखवतो. फूल टू टाइमपासचा आग्रह न धरणाऱ्यांनी ही नाळ पाहायला हवी. प्रेक्षकांशी असलेली नाळ तुटणार नाही, याची खबरदारी निर्माता-लेखक-दिग्दर्शकाने घेतली आहे. जर फक्त टाईमपास म्हणून हा चित्रपट पाहायला जाल तर मात्र तुमची निराशा होऊ शकते.
मृदगंध फिल्म्सचे वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे आणि सुधाकर रेड्डी तसेच नागराज मंजुळेयांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांची प्रस्तुती आहे.चित्रपटाची कथा आणि पटकथा सुधाकर रेड्डी यांची असून, संवाद नागराज मंजुळे यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन संचारी दास मौलिक यांनी केलंय. सतीश पोतदार, प्रशांत देशमाने यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून अद्वैत नेमलेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. तसेच चित्रपटातील वेशभूषा साकारली आहे सचिन लोवाळेकर यांनी. या चित्रपटातील 'जाऊं दे न व' ह्या गाण्याला तीन दिवसात १० लाख व्हियुज मिळाले असून हे गाणे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध तसेच शब्दबद्ध केले आहे आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प मधून अल्पावधीतच सर्वांचा लाडका झालेला जयस कुमारने हे गायले आहे. सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शनाबरोबरच छायाचित्रणातूनही चैतूचे भावविश्व चितारले आहे. नाळ हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही तर आपल्याला विचार सुद्धा करायला लावतो. त्यामुळे वेगळ्या धाटणीचा आणि उत्तम चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा.