Sorab ni rustam - 2 in Marathi Short Stories by Sane Guruji books and stories PDF | सोराब नि रुस्तुम - 2

Featured Books
Categories
Share

सोराब नि रुस्तुम - 2

सोराब नि रुस्तुम

पांडुरंग सदाशिव साने

२. पाखराची गोष्ट

फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे. एक होता शेतकरी. त्याचे नाव होते खंडू. खंडूची बायको होती. तिचे नाव चंडी. चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती. जणू त्राटिकेचा अवतार. ती सदा संतापलेली असायची. डोळे तारवटलेले, कपाळाला सतराशे आठ्या. घरात अक्षयी तिची आदळआपट चालायची.

खंडूला वाईट वाटे; परंतु काय करणार? घर सोडून जावे असे त्याला वाटे; परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सदसद्विवेकबुद्धी सांगे. ‘तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी. आता भिऊन पळू नकोस. सहन कर सारे.’ असे सदसद्विवेकबुद्धी म्हणे.

चंडी खंडूजवळ कधी एकही शब्द गोड बोलत नसे. ती सदैव त्याच्या अंगावर ओरडायची, त्याला शिव्या द्यायची, हातात लाकूड घेऊन मारायला यायची. प्रत्यक्ष मारीत नसे एवढेच. शेजारीपाजारी तरी का खंडूला सहानुभूती दाखवीत होते? नाही. तेही हसत, थट्टा करीत.

कोंबडा आरवताच खंडू उठे. तो शेतावर जाई. चंडी त्याला काहीसुद्धा न्याहारीला देत नसे. ना थोडी चटणीभाकर, ना मूठभर पोहे. बारा वाजेपर्यंत उपाशी पोटी तो शेतात काम करी. नंतर भुकेलेला तो घरी येई.

‘आला मेला घरी. इतक्यात कशाला आला? का मरत होता उन्हात? मोठा नाजूक की नाही? नखरे करायला हवेत मेल्याला. अजून भाकर भाजून नाही झाली, तो आला गिळायला. बसा ओसरीत आता. हे दाणे निवडा. नीट निवडा. खंड्या, अरे तुला सांगत्ये मी. घे ते सूप व निवड दाणे. खडादगड पाहून ठेव. नवरोजी झालाय नुसता छळायला.’

असे सारखे तिचे तोंड सुरू असायचे. खंडू घरी दमून भागून आल्यावरही चंडी जे काम सांगे ते तो निमूटपणे करी. मग जी जाडीभरडी कोरडी भाकर चंडी वाढी ती तो खाई.

‘कोरडी भाकर कशी खाऊ?’ तो म्हणे.

‘तर काय बासुंदी आणू? श्रीखंड आणू? भिकारी तर आहे मेला; परंतु ऐट आणतो राजाची. म्हणे कोरडी कशी खाऊ? मला जात नाही कोरडी म्हणून माझ्यापुरते थोडे कालवण केले आहे. तुला रे काय झाले? भरपूर काम करीत नाहीस वाटते शेतात? ज्याला भूक चांगली लागते त्याला चार दिवसांचे शिळे तुकडेसुद्धा साखरेवाणी गोड लागतात. म्हणे कोरडी भाकर कशी खाऊ? घशाखाली जात नाही वाटते? जरा मुसळ सारा घशात व भोक मोठे करा घशाचे. मी म्हणून ताजी भाकर तरी देत्ये करून. दुसरी कोणी सटवी असती, तर चार दिवस तुला उपाशी ठेवती, शिळे खायला घालती. आपले पाय चेपायला लावती. खा कोरडी भाकर. सुखाची मिळते आहे भाकर तीसुद्धा उद्या देव देणार नाही, जर असे कुरकुराल तर.’ असे ती म्हणे.

ती तोफ एकदा सुरू झाली म्हणजे खंडू घाबरे. मुकाट्याने भाकर खाई व उठून जाई. मग जरा ओसरीत तो घोंगड्यावर अंग टाकी. तो ती हिडिंबा लगेच गर्जत येई.

‘पडलेत काय पालथे? जा की शेतात. आळशी आहे मेला. खातो व लोळतो. शेतकरी का असा दिवसा झोपतो? उठा, जा.’

खंडू आता घरी फार बसत नसे. बहुतेक त्याचा वेळ आता शेतातच जाई. दमला तर तेथेच झाडाखाली पडे. त्या दाट छायेच्या एका झाडाखाली उशाला धोंडा घेऊन तो पडे. झाडावर पाखरे गोड गाणी गात असत. ती मधुर किलबिल ऐकून खंडूला आनंद होई. तो मनात म्हणे, ‘पाखरे इतके गोड बोलतात. माणसे का बरे गोड बोलत नाहीत? माझी बायको का बरे गोड बोलत नाही? आणि शेजारीही माझा उपहासच का करतात?’

एक नवीनच पक्षी एकदा त्याला दिसला आणि पुढे रोज त्याच्यासमेर तो पक्षी येऊन बसे. नाचे. गोड शब्द करी. खंडूला आनंद देण्यासाठी का ते सुंदर पाखरू येत असे?

एके दिवशी खंडू त्या पाखराजवळ गेला, तो काय आश्चर्य? ते पाखरू पळालं नाही, भ्यायल नाही. खंडूने त्या पाखराला धरले. त्याने ते पाखरू घरी आणले. एका सुंदर पिंज-यात त्याने ते ठेवले.

खंडू आता त्या पाखरावर जीव की प्राण प्रेम करी. त्याला ताजी फळे घाली. त्याच्या पिंज-यावर हिरवे पल्लव बांधी, फुले बांधी. मोठ्या पहाटे उठून त्या पाखराला तो बोलायला शिकवी.

‘ये हो खंडू. दमलास हो. भागलास हो. बस जरा. मी गाणी गातो. तू आनंदी राहा. मी तुला रिझवीन. मी तुझ्याजवळ गोड बोलेन. मी तुला प्रेम देईन. ये हो खंडू.’

असे त्या पाखराला तो बोलायला शिकवी. त्याची ती कजाग बायको त्या वेळेस झोपलेली असे. बायको जागी झाली की, खंडू शेतावर निघून जाई; परंतु शेतावर गेला तरी त्याला त्या पाखराची आठवण येई. डोक्यावर सूर्य आला की, खंडू आता घरी येई. येताना त्या पाखराला ताजी कोवळी कणसे आणी. रानमेवा आणी.

खंडू घरी येताच ते पाखरू पिंज-यात नाचू लागे. गाऊ लागे. ते खंडूचे स्वागत करी व गोड वाणीने म्हणे, ‘ये हो खंडू. दमलास हो. बस हो जरा. मी तुला गाणे गाईन. मी गोड बोलेन. ये.’ खंडूला ते गोड शब्द ऐकून आनंद होई. तिकडे बायको बडबडत असली तरी खंडू तिकडे लक्ष देत नसे. पाखराची गोड वाणी ऐकण्यात तो तल्लीन होई.

खंडू आता आनंदी असे. त्याच्या आत्म्याला जणू प्रेमामृताचा चारा मिळाला. त्याच्या मनाला सहानुभूतीचे खाद्य मिळाले. भुकेलेला खंडू तृप्त झाला. बायको त्याला भाकर करून वाढी आणि ते पाखरू प्रेम देई. जगात न मिळणारे दुर्मिळ प्रेम.

एके दिवशी खंडू शेतात गेला; परंतु पाखराच्या पिंज-याचे दार उघडे राहिले. इकडे ती चंडी उठली. नवरा गेल्यावर ती गोड गोड करून खायची. आज तिने शिरा करण्याचे ठरविले. ताटात रवा काढला. साखर काढली. एका पातेलीत तूप घेतले. तिने सारी तयारी केली इतक्यात अंगणात कोणाची तरी गुरे आली म्हणून त्यांना हाकायला ती गेली. इकडे ते पाखरू पिंज-यातून खाली आले. स्वयंपाकघरात गेले. रव्यामध्ये चोच घालून रवा खाऊ लागले. साखरेत चोच मारून साखरेचे कण त्याने खाल्ले. ते पाखरू मेजवानीत रमले. इतक्यात चंडी आली. तिने ते पाहिले. तिला राग आला. ते पाखरू फडफड करून पिंज-याकडे जाऊ लागले; परंतु तिने ते पकडले. ते पाखरू धडपडत होते. केविलवाणे ओरडत होते.

‘घालशील पुन्हा चोच? घालशील? आणि त्याच्याजवळ गोड गोड बोलायला हवं नाही? मी पिंज-याजवळ आल्ये तर जीभ जशी झडते मेल्याची. खंड्याजवळ गोड गोड बोलतोस? थांब, तुझी जीभ कापून टाकत्ये. का निखारा ठेवू जिभेवर? नको. कापूनच टाकावी. मग बघत्ये कसा गोड बोलशील तो.

असे म्हणून तिने खरोखरच कात्री आणली आणि त्या पाखराची चोच उघडून तिने त्याची जीभ कटकन् कापली. तुकडा उडाला. पाखराने किंकाळी फोडली. ची ची केले. अरेरे!

त्या पाखराला त्या चंडीने आता सोडले. ते दीनवाणे पाखरू पिंज-यात जाऊन बसले. त्याला वेदना होत होत्या; परंतु कोणाला सांगणार, कशा सांगणार? त्याची वाणी गेली. त्या पाखराच्या डोळ्यांतून पाणी आले.

दुपारची वेळ झाली. खंडूच्या येण्याची ते पाखरू वाट पाहात होते. खंडू आला. कोवळी कणसे घेऊन आला. फुलांचे तुरे पिंज-यावर लावण्यासाठी घेऊन आला. खंडू पिंज-याजवळ गेला; परंतु पाखरू आज नाचेना, गोड गाणे म्हणेना. ‘ये हो खंडू. दमलास हो.’ असे म्हणेना. का बरे?

‘पाखरा, का रे आज बोलत नाहीस? तूही का रागावलास माझ्यावर? आज मला यायला का उशीर झाला? कालची फळे का आंबट होती, कडवट होती? परंतु मी ती खाऊन पाहिली होती. गोड होती ती. हे बघ फुलांचे तुरे आणले आहेत. का रे? आज असा का? आणि हे तुझ्या डोळ्यांत आज पाणी का? मी तुला पिंज-यात कोंडले म्हणून का तू दु:खी आहेस? तुला का बाहेरच्या स्वातंत्र्याची आठवण झाली? झाडांवर झोके घेण्याची का आठवण झाली? तू वा-यावर बाहेर नाचत असशील. झाडांच्या डहाळ्या टाळ्या वाजवीत असतील, तुझ्या नाचण्या गाण्याला ताल धरीत असतील. होय ना? ते का सारे आज तुला आठवले? का तुझ्या घरची तुला आठवण झाली? तुझा का बायको आहे? तुझी का मुलेबाळे आहेत? कोठे आहे तुझे घरटे? परंतु तुला मी पकडले तेव्हा तू पळाला नाहीस. मला वाटले की, तू माझ्यावर प्रेम करायला आलास आणि खरेच तू आनंदी होतास. आज सकाळी मी जाईपर्यंत तू सुखी होतास! आणि नंतर काय झाले? ती चंडी का तुला बोलली? अरे ती तशीच आहे. तिचे बोलणे नको मनावर घेऊ. बोल. गोड गोड गाणे म्हण. ‘खंडू दमलास हो’ असे म्हण. तू माझा आधार. तूही का रागावलास? बोल राजा, बोल. नाच, गा’ परंतु ते पाखरू मुके झाले होते. थोडीफार हालचाल ते करी; परंतु पुन्हा स्वस्थ बसे. दीनवाणे बसे. खंडू घरात गेला.

‘का ग आज पाखरू का बोलत नाही? तू काय त्याला केलेस? त्याला का शिव्याशाप दिलेस? त्याला का मारलेस? ते खिन्न आहे, दु:खी कष्टी आहे. त्याचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येतात. तू मला बोलतेस, शिव्या देतेस. त्या मुक्या प्राण्याचेही का मन दुखवलेस? त्यालाही का त्रास दिलास? काय केलेस?’

‘काय केले? कापली त्याची जीभ. तुमच्याजवळ गोड गोड बोलते ते पाखरू; मला ते बघवत नव्हते. इतके दिवस मी माझा राग आवरला होता; परंतु आज त्याने माझ्या खाण्याच्या भांड्यात चोच घातली. मी जरा बाहेर गेल्ये, तो पिंज-यातून बेटे खाली आले व बसले खात. जणू मेजवानीच होती त्याला. आला मला राग. धरले, घेतली कात्री व कापली जीभ. ठारच मारणार होत्ये, त्याचा गळाच चरचर चिरणार होत्ये, परंतु आजच नको म्हटले. बोल म्हणावे आता कसे गोड बोलतोस ते. मी पिंज-याजवळ कधी गेल्ये तर एक आवाज काढीत नसे. तुम्हाला पाहून ते हसे, नाचे, गाणे म्हणे. माझ्यावर जणू खप्पा मर्जी. टाकली जीभ कापून. खंड्या आता कोण रे गोड बोलेल तुझ्याजवळ? त्या पाखराची पूजा करीत होतास. त्याला फुलांचे तुरे आणीत होतास; परंतु माझ्या केसांत घालण्यासाठी आणलीस का कधी फुले?’

‘नव्हतो का एके काळी आणीत? परंतु तू ती कुस्करून टाकीत असस. पायांखाली चिरडून टाकीत असस. मग आणणे मी बंद केले.’

‘मी तुझे सत्त्व पाहात होते खंड्या. देवी एकदम नाही प्रसन्न होत. जा त्या पाखराकडे. ते रडत आहे, तू रड. जा नीघ.’

खंडू खरेच पिंज-याजवळ आला. त्या पाखराकडे दु:खाने पाहात राहिला. बराच वेळ विचार करून खंडू त्या पाखराला म्हणाला, ‘पाखरा, तुला मी आज सोडूनच देईन हो, तुला मी आणले हीच चूक. पाखरांची झाडावरच शोभा. झाडांवरचीच त्यांची गाणी ऐकावी. मन रिझवून घ्यावे. उगीचच तुला आणले व कोंडले. आज तिने जीभ कापली, उद्या तुझा गळाही ती कापील. ती राक्षसीण आहे. अगदी राक्षसीण. पाखरा, जा हो. सोड मला. मी अभागीच आहे. मला एकट्यानेच राहिले पाहिजे. फार तर सृष्टीची दुरून मिळेल ती संगत घ्यावी. फुलांची, पाखरांची, झाडामाडांची, डोंगरटेकड्यांची, नद्यानाल्यांची, गाईगुरांची दुरून संगत. मेघांची, ता-यांची, थंडापावसाची, ऊनवा-याची हीच संगत. खरे ना? होय. ही सृष्टीतील गंमत मी घेत जाईन. तुला सोडतो हो आज; परंतु तुझे जातभाई तुला मारणार नाहीत ना? तू दास्यात जिवंत राहिलास म्हणून तुला चोची नाही ना मारणार? नाही मारणार. कारण तू उपकारासाठी कैदी झालास. एका दु:खी माणसाला आनंद देण्यासाठी तू आपखुषीने आलास. तुझे भाईबंद तुझ्यावर रागावणार नाहीत. तुझे स्वागत करतील. तुझा मुलेबाळे, तुझी बायको तुझ्यावर अधिकच माया करतील. जा पुन्हा प्रेमळ घरट्यात, डोल फांद्यांवर, पोह आकाशात, खा रानचे मेवे. जा हो पाखरा. आज मी मुक्त करीन हो तुला.’

असे तो बोलत होता, तो आतून घसरा आला. ‘या गिळायला. भाकर झाली आहे.’ खंडू गेला. त्याच्याने आज खाववले नाही. पाखराला आज खाता येत नव्हते. पाखराची जीभ दुखत होती. खंडूला खाणे का गोड लागेल? दोन तुकडे खाऊन तो उठला. पाणी प्यायला. हातात पिंजरा घेऊन तो शेतात गेला. त्या गर्द छायेच्या झाडाखाली बसला. त्याने पिंज-यातून ते पाखरू बाहेर काढले. त्याने ते प्रेमाने हृदयाशी धरले. अश्रूंनी त्याला त्याने न्हाऊ घातले. पाखराने चोच वर केली. दोन अश्रू ते प्यायले; परंतु ते पाणीही त्याच्या जिभेला झोंबले.

‘पाखरा, जा हो आता. जा लांब उडून. येथे शेतावरही नको येऊस. एखादे वेळेस ती येईल. तुला मारील. लांब बनात जा. पूर्वेच्या बाजूला एक बन आहे. त्यात एक सदैव वाहणारा झरा आहे. बांबूची, कळकीची उंच बने आहेत. जा तेथे. सुखात राहा. तुझी मला आठवण आहे. मी तुला विसरणार नाही. माझ्या हृदयात तुझ्यासाठी घरटे आहे. त्या घरट्यात तुझी मनोमय मूर्ती सदैव राहील. मुकी गाणी ती गाईल हो. जा.’

पाखराला जणू ती वाणी समजली. ते उडाले. पुन्हा एकदा येऊन, खंडूसमोर जरा नाचून, त्याच्या डोक्यावर घिरट्या घालून ते गेले. खंडू पाहात होता. पूर्वेकडच्या बाजूला ते उडाले. ते दमले. एका झाडावर ते बसले. पिंज-यात बसून त्याच्या पंखांची शक्ती कमी झाली होती; परंतु ते पाहा पुन्हा उडाले. निळ्या निळ्या आकाशातून उडत चालले. खंडू पाहात होता. ते पाखरू दिसेनासे झाले. खंडू पुन्हा काम करू लागला.

काही दिवस गेले. काही महिने गेले. एके दिवशी खंडू शेतावर न जाता, पूर्वेकडच्या वनात वळला. ते पाखरू दृष्टीस पडावे, पुन्हा एकदा भेटावे म्हणून त्याचा जीव आसावला होता. ते पाखरू म्हणजे त्याच्या पंचप्राणातील जणू एक प्राण बनले होते.

तो चालला बनातून. झाडांकडे तो पाहात होता. पाखरांकडे तो पाहात होत; परंतु ते पाखरू त्याला कोठे दिसेना. खंडू निराश न होता चालला पुढे आणि तो खळखळ वाहणारा झरा आला. कसे स्वच्छ स्फटिकासारखे पाणी! जणू वनदेवता त्यात आपले तोंड पाही. वनदेवतेचा जणू तो आरसा. रानातील पशुपक्ष्यांचा जणू तो आरसा!

खंडू त्या झ-यातील पाणी प्यायला. त्याच्या काठाने तो पुढे चालला. तीरावर ओलाव्याने रानफुले फुलली होती. नाना रंगांची फुले. पांढरी, पिवळी, निळी, लाल, नाना छटांची, नाना आकारांची. काही चिवटीबावटीही होती आणि ती पाहा फुलपाखरे नाचत आहेत. या फुलावरून त्या फुलाकडे जात आहेत. ती फुलपाखरे फुलांचे संदेश पोचवीत होती. फुलांचे टपालवाले जणू. का ती फुलपाखरे म्हणजे छोटे पतंग होते? बिनदोरीचे पतंग; परंतु कोण उडवीत होते त्यांना

खंडू ती सारी मौज पाहात होता; परंतु तेथे तो थांबला नाही. त्याचे लक्ष फुलांकडे नव्हते, झ-याकडे नव्हते. ते आपले पाखरू केव्हा कोठे भेटेल असे त्याला झाले होते.

ती पाहा वेळूची बने आली. कळकीची बने, उंचच उंच. जणू उंच वाढलेले रसहीन ऊसच. वारा त्या बनांतून खेळत होता. गोड आवाज येत होता. ते वेळू म्हणजे निसर्गाचे का वेणू होते?

‘येथेच असेल ते पाखरू,’ खंडू म्हणाला. तो चौफेर पाहात होता. तेथे एका शिलाखंडावर तो बसला. दुपार होत आली. पाखरे घरट्यात चालली. जरा विश्रांती घ्यायला, पिलांना घास द्यायला ती घरट्यात आली. झाडांवर मंजुळ किलबिल होत होती.

अरे, ते पाहा खंडूचे पाखरू. ते पाहा जात आहे. खंडूने शीळ वाजवली. टाळी वाजवली.

‘पाखरा ये ये. हा बघ खंडू आला आहे. दमलास का म्हण. ये.’ पाखराने ते शब्द ओळखले. ते पाखरू खंडूजवळ आले. ते नाचले. ते गाऊ लागले.

‘अरे, तुझी जीभ तुटली ना होती? गाणे कसे गातोस? आवाज कसा काढतोस?’ खंडूने विचारले.

‘माझी वाणी परत आली. इतकेच नव्हे, तर मला माणसांसारखे सारे बोलता येते. आकार पाखराचा, परंतु तुमच्यासारखे सारे बोलते. खंडू, तुला पाहून मला खूपच आनंद होत आहे. तू माझ्यावर प्रेम केलेस. आज माझ्या घरी तू आला आहेस. माझा पाहुणचार घे. त्या वेळूच्या बनात आमचे मोठे घरटे आहे. माझी मुलेबाळे तेथे आहेत. बायको तेथे आहे. त्या सर्वांना मी घेऊन येतो. तुझे दर्शन होईल त्यांना. तुझ्या कितीतरी गोष्टी त्यांना मी सांगत असतो. बस हो येथे. जाऊ नको.’

असे म्हणून ते पाखरू उडाले. ते आपल्या घरट्यात गेले. पिले चिव चिव करीत त्याच्याभोवती आली. बायकोने त्याचे स्वागत केले.

‘बाबा, बाबा, आज का उशीर केलात? आम्हाला भूक लागली.’ पिले म्हणाली.

‘खरेच, कोठे गेले होतेत आज लांब फिरत?’ बायकोने विचारले.

‘रोजच्यासारखा वेळेवर मी येत होतो; परंतु माझा तो मानव मित्र आज येथे आला आहे. त्या झाडाखाली बसला आहे. त्याच्याजवळ मी बोलत होतो. म्हणून मला उशीर झाला. चला. तुम्हाला मी तो दाखवतो. माझ्यावर त्याचे किती प्रेम. मला शोधीत शोधीत तो आला. आज आधी त्याला जेवण. चला सारी. करू त्याचे स्वागत. येता ना?’ पाखराने विचारले.

‘हो बाबा, चला.’ पिले म्हणाली.

‘चला. मीही त्याला पाहीन.’ बायको म्हणाली.

ते पाखरू निघाले. बरोबर पिले होती. पत्नीही आली. सारी त्या खंडूजवळ आली. पिले नाचू लागली. पत्नीने प्रणाम केला.

‘ही माझी पत्नी, ही माझी पिले.’ पाखरू म्हणाले.

‘वा! आनंदी आहे तुझे कुटुंब.’ खंडू म्हणाला.

‘माझी पत्नी गोड बोलते, मी घरी येताच माझे स्वागत करते. पिले माझ्याभोवती नाचतात. मी त्यांना गोड गाणी शिकवतो. म्हणा रे गाणी. बाळांनो, सोनुकल्यांनो, म्हणा गाणी, खंडूचे स्वागत करा.’ पाखराने सांगितले.

पिले गाऊ लागली. मानवी वाणी असलेल्या त्या पाखरानेच ती गाणी रचली होती. सुंदर अर्थाची गाणी. काय होता त्यांत अर्थ?

‘जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालील. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारे गाणी गातील. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तरी वाईट नका वाटून घेऊ. या निसर्गाकडे पाहा व आनंदी राहा.’

‘आनंद आनंद! हृदयात आनंद असला म्हणजे मन कसे हलके होते! ते मग चिखलात न पडता उंच उंच उडते. देवाजवळ जाते. हसा व देवाजवळ जा. आनंदी व्हा व प्रभूजवळ जा.’

‘दु:ख? होय. दु:ख आहे; परंतु ते का आहे? आपणच ते निर्मितो व मग रडतो. चला, दु:ख दूर करू. सर्वांजवळ गोड बोलू. सारे मिळून खाऊ, सारे मिळून राहू. भांडण नको, मत्सर नको. आपल्यासारखेच सारे सर्वांना द्या. झाडे आपली फळे देतात. मेघ आपले पाणी देतात. फुले आपली सुगंध देतात. सूर्य प्रकाश देतो. आपणही देऊ. सारे सुखी राहू. म्हणजे मग आनंद होईल!

अशी ती गाणी होती. एक गाणे तर फारच छान :

‘नाचा, नाचा, नाचा. वा-यावर नाचा. प्रकाशकिरणांवर नाचा. लाटांवर नाचा. डोंगरावर नाचा. भावनांवर नाचा. आनंदावर नाचा. सारी सृष्टी नाचत आहे. पृथ्वी सूर्याभोवती नाचते. चंद्र पृथ्वीभोवती नाचतो. नाच, विराट नाच, नाचा, नाचा.’

‘कशी आहेत गाणी?’ पाखराने विचारले.

‘छान आहेत. आमच्यामध्ये अशी नाहीत आणि तुझी पिले म्हणतातही छान.’ खंडू म्हणाला.

‘बाळांनो, जा. पळसाची ताजी पाने आणा आणि गोड गोड फळे घेऊन या. खंडूला भूक लागली असेल. जा.’ पाखरू म्हणाले.

पिलांनी पळसाची पाने आणली. बायकोने चोचीत धरून रसाळ फळे आणली. पेरू होते. अंजीर होते. पिस्ते होते. रानातील नाना प्रकारचे मेवे होते. त्या पानांवर ती फळे वाढण्यात आली.

‘खंडू, कर फलाहार. पोटभर खा.’ पाखरू म्हणाले.

खंडू फळे खाऊ लागला. त्याने त्या पिलांना ‘घ्या’ म्हटले.

ती म्हणाली, ‘नको, मग आम्ही खाऊ.’

‘अरे. तुम्ही लहान. घ्या हो.’ खंडू म्हणाला.

‘घ्या हो.’ पाखरू म्हणाले.

पिलांनी पाहुण्यांचा प्रसाद घेतला. फलाहार झाला.

‘आता मी जातो. तुला सुखात पाहून मला सुख झाले. मधून मधून येत जाईन.’ खंडू म्हणाला.

‘जरा थांबा. तुम्हाला एक देणगी देतो. आम्हाला कधी कधी गवताच्या विणलेल्या सुंदर सुबक अशा पेट्या सापडतात; परंतु आम्ही कधी त्या उघडीत नाही. काही जड असतात. काही हलक्या. जा रे बाळांनो. आणा दोन पेट्या. एक हलकी आणा, एक जड आणा.’ पाखराने सांगितले.

ती पिले गेली. ती दोन पेट्या घेऊन आली.

‘घ्या. हवी असेल ती घ्या.’ पाखरू म्हणाले. खंडूने दोन्ही पेट्या हातात घेऊन पाहिल्या. त्याने हलकी पेटी पसंत केली.

‘ही हलकीच नेतो. थोडेच बरे. अधिक कशाला? ही जड पेटी ठेवा.’ खंडू म्हणाला.

‘त्या पेट्यांतून काय असते ते आम्हास माहीत नाही. आम्ही त्या उघडीत नाही. आम्हाला फार सोस नाही, हव्यास नाही.’ पाखराची बायको म्हणाली.

‘बरे येतो, नमस्कार.’ खंडू म्हणाला.

‘येत जा, आम्हाला भेटत जा.’ ती सर्वजण म्हणाली. खंडू ती पेटी घेऊन निघाला. पाखरू थोड्या अंतरापर्यंत त्याला पोचवीत आले.

‘जा हो पाखरा, तुम्ही अद्याप खाल्ले नाही. जा. असेच प्रेम ठेव. माझी आठवण ठेव.’ खंडू प्रेमाने म्हणाला.

पाखरू परत गेले, खंडू परत घरी आला.

‘आज गेले होतात कोठे मस्णात? घरी यायचे नसेल तर तसे सांगा. कोठे होती धिंडका? शेतात आज गेला नाहीस ना खंड्या? घरातून चालते व्हायचे असेल तर तसे सांग. माझा त्रास तरी वाचेल.’ चंडी ओरडू लागली.

‘अग, आज बनात गेलो होतो; त्या पाखराला भेटायला गेलो होतो.’

‘अशी पाखरे भेटतात वाटते? भुतासारखे हिंडत बसले वाटते? आणि आता आलात घरी.’

‘परंतु पाखरू मला भेटले. त्याला किती आनंद झाला. त्याने माझे स्वागत केले. त्याच्या पिलांनी गाणी म्हटली. त्यांनी मला फळे दिली. किती सुखी त्यांचे कुटुंब आणि ही पेटी मला भेट म्हणून त्यांनी दिली. कशी आहे छान, नाही? ही बघ. दोन पेट्या त्यांनी आणल्या होत्या. एक जड व एक हलकी. म्हणाली, ‘वाटेल ती न्या.’ मी हलकीच आणली. थोडी तो गोडी.’ तो ती पेटी दाखवून म्हणाला.

‘आहे काय त्या पेटीत? असतील किडेबिडे. रद्दी पेटी. गवताची पेटी.’

‘परंतु उघडून तर बघ, थांब मीच उघडतो.’ असे म्हणून त्याने ती पेटी उघडली. तो आतून मोत्यांचे सर निघाले. सुंदर पाणीदार गोलबंद मोती! पृथ्वीमोलाची मोती. टपोरी मोती.

‘आहाहा, किती रमणीय ही मोती.’ खंडू म्हणाला. चंडी ती मोती मोजीत बसली.

‘चांगली आहेत की नाही? आकाशातील जणू तारे तशी ही आहेत.’ खंडू म्हणाला.

‘परंतु ती जड पेटी का नाही आणलीत? हलकी आणलीत. खंड्या तुला अक्कल नाही. अगदी दगडू शेट आहेस. जा, ती जड पेटी घेऊन ये.’

‘मी जाणार नाही.’

‘तू नसशील जाणार तर मी जात्ये. तू घरी स्वयंपाक कर. भाकरी भाज. मी उद्या सकाळी उठून जाईन. मला रस्ता सांग. जाईनच मी. जाणारच. जड पेटी घेऊन येईन. तीत हिरे असतील. सांग रस्ता.’

खंडूने तिला रस्ता सांगितला. दुसरा दिवस केव्हा उजाडतो असे तिला झाले. एकदाची रात्र संपली. बाहेर झुंजूमुंजू होते तोच चंडी निघाली. घरी खंडू होता. आज चुलीजवळ भातभाकरी तो करणार होता. उगीच गेली चंडी. हे बरे नाही, असे त्याला राहून राहून वाटत होते.

चंडी गेली. हिंडत हिंडत दूर आली. ते बन लागले. त्या बनात ती शिरली. ते वेळूचे बन कोठे आहे? तो खळखळ वाहणारा झरा कोठे आहे? रस्ता चुकले की काय? नाही. तो पाहा आला झरा. गाणे गाणारा झरा. सतत वाहणारा, निर्मळ पाण्याचा झरा. चंडी झ-याचे पाणी प्यायली. तेथे एका दगडावर बसली.

आता दुपार झाली. पाखरे विश्रांतीला झाडांवर येऊन बसली. वेळूचे बन गजबजले. ते पाहा आपले पाखरू येत आहे. त्याने चंडीला पाहिले. पाखरू चंडीकडे आले.

‘आज इकडे कोठे आलात? त्याने विचारले.

‘अरे, तुझी जीभ ना कापली होती मी? तरी बोलतोस?’

‘मला देवाने मानवी वाणी दिली, जीभ परत आली. तुम्ही आज माझ्या दारी आल्यात. मला तुमचे स्वागत करू दे. गोड फळे देऊ दे. काही देणगी देऊ दे. बसा येथे.’ असे म्हणून ते पाखरू उडत घरी आले.

‘बाबा, बाबा, आज पुन्हा उशीर? आज कोण आले? कोण भेटले?’ पिलांनी विचारले.

‘बाळांनो, आज त्या खंडूची चंडी आली आहे.’ त्याने सांगितले.

‘तुमची जीभ कापणारी चंडी, होय ना? पिलांनी एकदम संतापून विचारले.

‘होय तीच.’ त्याने सांगितले.

‘बाबा, आम्ही जातो आणि तिचे डोळे फोडतो.’ पिले म्हणाली.

‘मी जाते व तिचे नाक तोडत्ये. फोडत्ये तोंड.’ बायको म्हणाली.

‘छी छी, असे नका म्हणू. असे नका करू. मग तिच्यात नि आपल्यात फरक काय? ती दुष्ट असली तरी आपण दुष्ट होऊ नये आणि ती कशीही असली तरी तिच्या नव-याने माझ्यावर भरपूर प्रेम केले आहे. ती त्याला छळते; परंतु तो सारे सहन करतो. मग आपण नये का सहन करू? चला सारी. पिलांनो गाणी गा. गोड गोड फळे आणा. केळीची पाने तोडून आणा.’

‘हिला कशाला केळीचे पान?’ बायकोने विचारले.

‘जो वाईट असतो त्याचेच अधिक स्वागत करावे. त्याला अधिक प्रेम द्यावे. चला, ती वाट पाहात असेल.’

पाखरू आले, त्याची बायको आली. ती पिलेही आली. पिलांनी गाणी म्हटली. बायकोने केळीचे-रानकेळीचे-पान चोचीने तोडून आणले.

‘पुरे तुमची गाणी. मला लागली भूक.’ चंडी म्हणाली.

‘जा रे बाळांनो, फळे आणा.’ पाखराने सांगितले.

पिलांनी रसाळ फळे आणली. पानावर वाढली. चंडीने पटापट खाल्ली. तिचे पोट भरले.

‘जा रे पिलांनो. त्या दोन पेट्या आणा. एक हलकी आणा, एक जड आणा.’ पाखराने सांगितले.

‘हलकी नकाच आणू. जडच आणा. त्या जड पेटीसाठी तर मी आल्ये.’ चंडी म्हणाली.

‘बरे तर. जडच फक्त आणा. जा लवकर.’

पिलांनी ती जड पेटी आणली. चंडीने ती उचलली. नमस्कार वगैरे न करता, निरोप वगैरे न घेता लगबग ती निघाली.

‘या हां बाई.’ पाखरू म्हणाले.

‘या हां बाई.’ बायको म्हणाली.

‘या हां बाई.’ पिले म्हणाली.

‘अडलंय माझं खेटर, झालं माझं काम.’ असे चंडी म्हणाली.

धावपळ करीत ती घरी आली. खंडूने स्वयंपाक केला होता. तो वाट पाहात होता.

‘ही बघ आणली जड पेटी. आता बघत्ये उघडून आत काय काय आहे ते.’ चंडी म्हणाली.

‘आधी जेवू, मग फोड.’ खंडू म्हणाला.

‘आधी फोडीन. जेवण काय आहेच रोजचे.’

‘नको फोडू ती पेटी. माझे ऐक. ती पेटी तशीच ठेव. मला लक्षण बरे दिसत नाही.’ खंडूने सांगितले.

‘गप्प बस तू जा जेवायला. माझे पोट भरले आहे.’ असे म्हणून चंडी पेटी फोडू लागली.

तो काय निघाले आतून? काय होते आत? हिरे की माणके? पाचू की पोवळे? हे काय? चंडीने ती पेटी एकदम फेकली. आतून एकदम एक सर्प बाहेर आला. तो सर्प बाहेर पडून मोठा झाला. त्याने चंडीच्या अंगाला विळखे घातले. चंडीला त्याने दंश केले. चंडी मरून पडली. सर्प फूं करीत निघून गेला.

चंडी मेली. खंडू आता एकटा राहिला. त्याने घरातील मोती वगैरे गावातील राममंदिरातील मूर्तींना दिली. खंडू शेतात खपतो. आनंदात असतो. तो सर्वांना सांगत असतो, ‘अती लोभ करू नये. गोड बोलावे, प्रेम द्यावे. द्वेष कराल तर तुमच्या हातात माणिकमोती पडली तरी त्यांचे साप होतील. प्रेम कराल तर सापांचे हार बनतील. पाखरेसुद्धा मानवांवर प्रेम करतात. मानवांनी परस्परांवर करू नये का?’

कंटाळा आला म्हणजे खंडू त्या वेळूच्या बनात जातो. त्या पाखराला भेटतो. तेथे फळे खातो. गाणी ऐकतो. मग घरी येतो.

पुढे खंडू वारला; परंतु त्या वेळूच्या बनात गोड गाणी ऐकू येतात. त्या पाखराला मनुष्याची वाणी मिळाली तसे अमर जीवनही मिळाले होते का?

***