आज मी त्याची खूप वाट पाहिली. त्याच कट्ट्यावर, पण तो आलाच नाही. त्याच्या ग्रुपमधलंही आज कोणीच दिसलं नाही. कोणी नाही तर तो अतुल आणि त्याची मैत्रीण तरी लेक्चर संपल्यावर कट्ट्याच्या इथून फेऱ्या मारत बोलताना दिसायचे. आज तेही नाही दिसले. पण मी का अस्वस्थ होतेय तो एक दिवस नाही दिसला तर? मला तर त्याचं नाव पण माहिती नाही… ऋचाच्या डायरीतील साधारण १६ व्या दिवशीचं पान. ऋचा न चुकता रोज डायरी लिहायची. खरंतर ही तिच्या बाबांचीच सवय, आता नकळत तिला लागलेली. सुरुवातीला बाबांनी दिलेल्या पॉकेटमनीचा हिशोब लिहिता लिहिता ती रोजनिशी कधी लिहायला लागली तिचं तिलाच आठवत नव्हतं. कॉलेजमध्ये सेकंड इयर सुरु झाल्यापासून ती लेक्चर संपल्यावर मैत्रिणींबरोबर बसायची त्या कट्ट्याजवळून तो एकदा तरी जायचाच. ते बोलले नव्हते एकमेकांशी कधीच पण नजरेतून भेटायचे ते एकमेकांना अगदी न चुकता. मधे रविवारची एक सुटी आली तरी अस्वस्थ व्हायचे दोघेही. पण आज तर मंगळवार असूनही तो न आल्याने ऋचाला काही सुचेनासे झाले होते.
कालच तर दिसलेला, आज अचानक काय झाले तिला कळेना. तिच्या मैत्रीणींनाही ही गोष्ट माहिती नसल्याने ती व्यक्तही होऊ शकत नव्हती. मात्र तिचा कावराबावरा झालेला चेहरा मैत्रिणींनी हेरला होता. सई आपल्या जर्मनच्या नव्या क्लासबद्दल काहीतरी सांगत होती. पण ऋचाचे त्याकडे अजिबातच लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात शून्यात एकटक बघत होती. मग मनालीने तिला हलवले आणि भरकटलेल्या विचारांच्या जंजाळातून ओढून वास्तवात आणले. मग त्या सगळ्यांनी तिची खूप खेचली. काय झालंय काय बाईसाहेब अचानक कसला इतका विचार करताय? कोणी आवडायला लागलंय की काय? आणि आम्हाला नाही सांगणार का तू, असं म्हणत सईने तिला थोड्याशा गुदगुल्याही केल्या. मात्र ऋचा अजूनही तो आज का आला नसेल याच विचारात होती. त्याला काही झालं तर नसेल ना? म्हणजे आजारी किंवा अपघात वगैरे, की त्याच्या घरी काही घडलं असेल? की अचानक कुठे बाहेरगावी जायला लागल्यामुळे तो आला नसेल अशा एक ना अनेक विचारांनी तिच्या डोक्यात काहूर माजलं होतं. मुख्य म्हणजे याबाबत कोणाकडे चौकशी करणंही शक्य नसल्यानं ती जास्त अस्वस्थ झाली होती. त्यात या मैत्रिणींचं आणखीनच काहीतरी… ती आपल्या मनातच पुटपुटली…
काहीवेळ चेष्टामस्करी झाल्यानंतर सई आणि मनालीला अचानक सेल्फी काढायची आठवण झाली. मग छानछान पोज देत त्या कट्ट्यावरच सईच्या नवीन मोबाईलमधून सेल्फीही काढायला लागल्या. मात्र या बाईसाहेब आपल्याच तंद्रीत. एव्हाना ऋचाची नजर भिरभिरायला लागलेली. त्याच्या ग्रुपमधंल कोणी दिसतंय का, याचा शोध ती कावरीबावरी नजर घेत होती. त्याच्यासोबत रोज असणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण जरी दिसली असते तरी तिच्या जीवात जीव आला असता. मात्र जवळपास १ तास होत आला तरी कोणाचाच थांगपत्ता नाही. सेल्फी काढणाऱ्या या मैत्रीणांचा तिला कधी नव्हे तो राग यायला लागला होता. एरवी त्यांच्यात रमणाऱ्या हसून-खिदळून मज्जा करणाऱ्या ऋचाला त्या काही वेळासाठी का होईना पण अचानक नकोशा वाटायला लागल्या होत्या. मनालीला आपला फोटो छान कसा येईल याचंच पडलं होतं. तर ऋचाने फोटोपुरते तरी हसावे म्हणून काहीतरी जोक मारुन तिला हसवायचा प्रयत्न सई करत होती. मात्र काही केल्या बाईसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव लपेनात. शेवटी कसेबसे पाच-सहा क्लिक्स झाल्यावर आता निघायचं का की तुला अजून पण असंच बसायचंय इथे, असं चिडून मनाली म्हणाली. तेव्हा ऋचा काहीशी भानावर आली आणि गोंधळतच हो हो माझी १२.३५ ची लोकल आहे, असं म्हणत कट्ट्यावरुन उठली. मात्र रेल्वे स्टेशनवर जाईपर्यंत तिच्या डोक्यात तेच चक्र चालू होते. या वाटेवरही तो कधीतरी त्याच्या मित्रांसोबत दिसायचा. मग ती कोणत्या लोकलमध्ये बसते हेही टिपायचा.
ती मैत्रिणींसोबत स्टेशनकडे जायला निघाली खरी पण तिचं मन मात्र अजून कट्ट्यावर आणि त्याच्या विचारातच अडकलं होतं. जुलै महिना असल्यानं पाऊसही येत-जात होता. मधेच एखादी मोठी सर येऊन सुरळीत चाललेले दैनंदिन व्यवहार विस्कळीत करत होती. एरवी तिला पाऊस खूप आवडायचा. छत्री असेल तरीही ती भिजत, हातात पावसाचे पाणी झेलत अतिशय आनंदात जायची. मात्र हाच पाऊस तिला आज अचानक नकोसा झाला होता. एक लहानशी सर आली तशी तिनं आपल्या सॅकमधून छत्री काढली आणि काहीसा वैताग करतच ती डोक्यावर धरली. एकीकडे सई आणि मनाली आपल्याच विश्वात रमलेल्या. ऋचाला कदाचित एकांत हवा असेल या समजुतीने त्यांनी तिला तो दिला. मैत्रीतली स्पेस जपण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. स्टेशनजवळ यायला लागलं तशी हिची घालमेल आणखीनच वाढत होती. तो आज न येण्यामागचं कारण काय असेल याच्या विचाराने तिच्या डोक्याला एव्हाना मुंग्या येण्याची वेळ आली होती.
अखेर ती स्टेशनवर आली. तिची रोजची १२.३५ ची लोकल प्लॅटफॉर्मवर जणू तिचीच वाट पाहात असल्याचे तिला वाटले. मग ती सई आणि मनालीला बाय करत स्वतःच्याच नादात चालत लोकलमध्ये चढणार होती इतक्यात समोरुन काहीसा त्याच्यासारखाच दिसणारा एक मुलगा गेला. काही क्षण तिला तो तोच असल्याचा भासदेखील झाला. मात्र लगेचच ती भानावर आली आणि लोकलमध्ये चढली. नेहमी अगदी घाईने आत शिरत जागा पकडणारी ती आज अतिशय जडपावलाने आतमध्ये येत होती. सगळ्या जागा भरल्या मग तिला एका ठिकाणी चौथ्या सीटवर बसावं लागलं. कशीतरीच अधांतरी अंग आखडून ती तिथे बसलीही. ‘पुढील स्टेशन…’ अशी न थकता अनाऊंन्समेंट करणारी बाई एव्हाना तिला नकोशी झाली होती. एरवी या आवाजाकडे तिचे लक्षही जात नसे. इतर मुली कोणी मोबाईलमध्ये रमलेल्या, कोणी काही खाण्यात तर कोणी गप्पा मारण्यात दंग, काही जणी चाफा आणि मोगरा घेत होत्या, तर काही अतिशय आवडीने कानातले आणि डोक्याला लावायच्या क्लिपा पाहात होत्या. कधी नव्हे ते ऋचाला या सगळ्याचा उगाचच राग येत होता.
मग अचानक तिला लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू ही काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचलेली बातमी आठवली. त्यानंतर पुन्हा त्याचा चेहरा समोर आला. असे तर काही झाले नसेल ना या विचाराने ती आणखीनच कावरीबावरी झाली. मग तिला सेल्फी काढताना कड्यावरुन पडून ३ मित्रांचा मृत्यू ही बातमी आठवली आणि ती आणखीनच हळहळली. या गोष्टीही अशा नको तेव्हा का डोळ्यासमोर येतात हे तिला समजत नव्हते आणि ती आणखीनच सैरभैर होत होती. काही वेळाने तिचे लक्ष त्या ‘पुढील स्टेशन’वाल्या बाईकडे गेले आणि आपले स्टेशन आले हे लक्षात येऊन ती भानावर आली. मग स्टेशनवर तिला एकमेकांना बाय करताना डोळ्यात प्राण आलेले एक प्रेमीयुगूल दिसले.
थोडं पुढे आल्यावर नुकतेच लग्न झालेले एक जोडपेही एकमेकांचा हात धरुन लोकलमध्ये चढताना दिसले. एरवी असे सगळे आपल्या आजुबाजूला सुरु असले तरीही त्याकडे लक्ष जात नाही. आज मात्र या सगळ्या गोष्टी मुद्दामहून अंगावर येताहेत असंच तिला वाटत होतं. आपल्याला डिवचण्यासाठी हे सगळं घडतंय की काय असाच काहीसा विचार करत ती घरापर्यंत पोहोचलीदेखील.
घरात गेल्या गेल्या आईची प्रश्नांची सरबत्ती नेहमीप्रमाणे सुरु झाली. लहान भाऊ ताई मला हे करुन दाखव म्हणत पुढे आला. तर आजी तिच्या तुटलेल्या चष्म्याची काडी दाखवत होती. घरातली मोठी मुलगी असल्याने ती आल्यावर घरातल्या सगळ्यांना काय सांगू नी काय नको होऊन जात असे. तिला मात्र कोणाशीच काहीच बोलायचा मूड नव्हता. अगदी कोणाचं काही ऐकायचाही. पण असे वागून चालणार नव्हते कारण आपल्याला काय झालंय असं जर कोणी विचारलं तर सांगायला ठोस कारणही जवळ नव्हते. आणि खोटं बोलायचंच झालं तर घरातले लोक चेहऱ्यावरुन आपण खोटं बोलतोय हे अगदी सहज ओळखतात याचीही तिला जाणीव होती. तितक्यात तिची शेजारची जिवश्च कंठश्च मैत्रीणही आली. जगातली कोणताही गोष्ट या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत असं नाही. तासन्तास, दिवसरात्रही कमी पडतील अशी त्यांची मैत्री. मात्र तरीही ऋचाला आता तिच्याशी काहीच बोलावेसे वाटत नव्हते. अचानक असे काय झाले हे न कळाल्याने नम्रताही २ मिनिटे बोलून आपल्या घरी निघून गेली.
शून्यात बघत बसलेल्या ऋचाच्या डोक्यातून तो कुठे असेल, काय झाले असेल हा विचार मात्र काही केल्या जात नव्हता. कॉलेजला कधीच दांडी न मारणारा, अगदी रविवारी आणि सुटीच्या दिवशीही कट्ट्यावर न चुकता येणारा तो अचानक का बरं आला नसेल, या प्रश्नाने तिचे डोकं भणभणायला लागलं होतं. बरं कोणाकडे चौकशी करावी तर मध्यस्थी करेल असं कोणीच ओळखीचं नव्हतं. एकतर उद्याच्या दिवसाची वाट पाहण्याशिवाय पर्यायही नव्हता. संध्याकाळची कातरवेळ जसजशी जवळ आली तसतशी तिची चिंता आणखीनच वाढायला लागली. त्याच्या न येण्याने तिचे आयुष्य व्यापून टाकले होते. एरवी खरंतर तिने त्याचा कधीच इतका विचार केला नव्हता. तो कॉलेजमध्ये रोज दिसायचा, फारतर तिला पाहायला तो खास त्यांच्या ग्रुपसमोरुन जायचा इतकाच काय तो या दोघांचा मूकसंवाद.
पण आज मात्र त्यांच्या एका दिवसाच्या न दिसण्याने आपण इतके कावरेबावरे होऊ असे तिला कधी स्वप्तानही वाटले नव्हते. घरातील सगळ्यांना एव्हाना काहीतरी बिनसलंय हे कळालं होतं. मात्र काय करावं हे न कळाल्यानं कोणीच तिला काही विचारलं नाही आणि तीही सांगायला गेली नाही. घरात पसरलेली स्मशान शांतता मात्र जाणवण्याइतपत होती. कधी एकदा आजची रात्र सरते आणि उद्याचा दिवस उजाडतो असे तिला झाले होते. कधीच एकमेकांशी न बोललेले एकमेकांना चेहऱ्याशिवाय न ओळखणारे हे दोन जीव अचानक इतके कसे काय जवळ येऊ शकतात, असा विचार करतच रात्रीचे तीन कधी वाजले तिचे तिलाच कळले नाही. अखेर काही तासांसाठी तिचा डोळा लागला खरा.
एरवी ७ च्या ठोक्याला न चुकता जाग येणाऱ्या ऋचाला आज घडाळ्यात ९ वाजले तरी जाग आली नाही. कधी नव्हे ते इतकी झोपलीये म्हणून आई आणि आजीनेही तिला उठवले नाही. मग ९ वाजता बेडमधून बाहेर येत तिने भराभर आवरायला घेतले. पुढच्या अर्ध्या तासात स्वारी आवरुन तयार. आईने केलेला नाश्तादेखील न खाता ती तशीच घाईत पायात चप्पल सरकावत निघूनही गेली. कधी एकदा कॉलेजला पोहोचते असे तिला झाले होते. आज तरी तो नक्की येईल या आशेने ती जवळपास धावतच कॉलेजला पोहोचली. एरवी सिनसिअरपणे किमान पहिली दोन ते तीन लेक्चर करणारी ऋचा आज लेक्चरला न जाता आल्यापासूनच कट्टयावर बसून राहिली. आता येईल, मग येईल असे करत जवळपास एक तास होत आला तरी काही तो दिसेना. मग सई आणि मनालीही कट्ट्यावर आल्या.
ऋचाचे नेमके काय चालले आहे म्हणून त्यांनी तिला जरा खोपच्यात पण घेतले. पण उघडपणे काही बोलतील तर त्या बाई कसल्या ना. मग तिथेच काहीवेळ टाईमपास करुन निघायचे ठरले. मात्र मॅडमना काही इतक्यात निघायचा मूड नव्हता. पण या दोघींना मात्र जर्मनच्या क्लासला जायचे असल्याने त्यांनी निघायचे ठरवले. इतरवेळी टॉयलेटला जातानाही सोबत लागणारी ऋचा अशी एकटी कट्ट्यावर बसायला कशी काय तयार झाली हे काही केल्या या दोघींना कळेना. पण काहीतरी शिजतंय याचा विचार करतच त्या तिला बाय करुन आपल्या कामाला निघून गेल्या. आता काय मॅडम पुन्हा एकट्याच इकडे-तिकडे बघत बसलेल्या. एव्हाना तो तर नाहीच पण त्याच्या ग्रुपमधलेही कोणी आले नव्हते. शेवटी एक चक्कर मारुन यावी म्हणून ऋचा कट्ट्यावरुन उठली तर तितक्यात तिला त्याचा एक मित्र दिसला.
आपल्याला नाव माहिती नाही तर त्याच्याबद्दल विचारायचे कसे असा प्रश्न पडल्याने ती काहीशी गोंधळली. मात्र दुसऱ्याच क्षणाला त्याच्या राहणीमानाचे वर्णन करुया असे स्वतःशीच बोलत ती पुढे गेली. ही मुलगी आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात आल्यावर तो मुलगाही जागीच थांबला. मग थोडेसे चाचरतच तो तो तुझा मि….त्र….असे म्हणताच समोरचा मुलगा पटकन म्हटला आकाश… तिच्या चेहऱ्यावर काहीसे गोंधळलेलेच भाव होते. तिला नेमके कोण म्हणायचेय ते एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. पुढे तीच म्हणाली तो उंच चष्मेवाला कानात भिकबाळी घालणारा… आपल्या मित्राचे वर्णन तोही अतिशय शांतपणे ऐकत होता. मग आता हिला काय सांगावे याचा विचार तो करत असल्याचे तिच्याही लक्षात आले. तो काहीतरी सांगणार इतक्यात ती म्हणाली. काय ते खरं सांग लपवू नकोस माझ्यापासून. मग तोही पटकन म्हणाला, त्याचा अपघात झालाय परवाच. लोकलमधून उतरताना पायाला लागलंय खूप. पुन्हा उभा राहू शकेल की नाही माहिती नाही. तो असं म्हटला आणि तिच्या काळजात चर्रर्रर्र झालं. आता काय बोलावे हे कळेना त्याचवेळी श्वासांची लय वाढली असल्याचे तिच्या लक्षात आले. म्हणजे? असा कसा पडला? कोणी धक्का दिला का? की त्याचंच लक्ष नव्हतं? नेमकं काय झालंय? आता कसा आहे? डॉक्टर काय म्हणतायत? असे एक ना अनेक प्रश्न तिने अक्षरशः एका दमात विचारले. आपण काय बोललो हे तिचे तिलाही कळायच्या आतच बहुदा…
परिस्थिती लक्षात घेत त्याचा मित्र तिची समजूत काढण्याच्या सूरातच म्हणाला. आता बराच बरा आहे. प्राण वाचला आणि पायावर निभावलं इतकंच काय ते. एक ऑपरेशन झालंय, सध्या रॉड घातलाय पायात पुढचे ३ महिने बेड रेस्ट सांगितलीये त्याला. मग तिनं विचारल कुठे राहतो नेमका? मी येऊ शकते का त्याच्या घरी? त्याचा मोबाईल नंबर दे ना मला. आता मित्रंही काहिसा गोंधळात पडला. हे दोघं एकमेकांशी कधीच बोलले नाहीत, हे त्यालाही पक्कं ठाऊक होतं. पण मग आपण काहीच न विचारता थेट नंबर, पत्ता द्यावा का, असा विचार त्याच्या मनात आला. पण मग त्याने नंबर दिलाच. नंबर घेतल्यावर घाईघाईनेचे त्याला काळजी घ्यायला सांग असं म्हणत ती निघाली. तेवढ्यात तो म्हणाला, पण कोणी सांगितलंय असं सांगू. तेव्हा गालातल्या गालात हसतच ती म्हणाली, त्याच्या चाहतीनं सांगितलंय सांग. तो मित्रंही हसला आणि दोघेही आपापल्या दिशांना निघून गेले. आता या नंबरवर फोन करावा की मेसेज करावा. की थेट व्हॉटसअॅपवरच बोलावे हे तिला कळेना. फोन केला आणि त्याच्याजवळ नसेल तर काय, कोणीतरी वेगळ्यानेच उचलला तर आपण काय बोलणार असे एक ना अनेक प्रश्नांचे काहूर तिच्या मनात माजले. व्हॉटसअॅप करायला त्याचे नेट सुरु असेल का, असाही प्रश्न तिला पडला. मग मनाचा हिय्या करुन अखेर तिने ‘समवन स्पेशल’ नावाने सेव्ह केलेला त्याचा नंबर व्हॉटसअॅपमध्ये उघडून पाहिला. तर त्याचा फोटो ती पहातच बसली. लाल रंगाचा शर्ट आणि त्याची बाईक पाहून तर तिला काहीच सुचेना आपल्याला त्याच्याशी बोलायचंय याचाही तिला काही वेळासाठी विसर पडला आणि वेड लागल्यासारखे ती त्याच्या फोटोकडे पहातच बसली.
मग पुन्हा एकदा तिच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. काय करावे तिला कळेना ती असाच काहीवेळ भटकत राहिली. मग एकटीच जाऊन आपल्या नेहमीच्या कट्ट्यावर बसली. खूप वेळ स्वतःच्याच विचारात तिला वेळेचेही भान राहिले नाही. मग अचानक तिला सईने हाक मारली आणि ती भानावर आली. सईने विचारले, काय अशी एकटी का बसलीयेस. तिने सहजच असे उत्तर दिले आणि पुन्हा आपल्या विचारात गढून गेली. काय बोलावे हे सईलाही न कळाल्याने ती बाय म्हणत निघून गेली.
एव्हाना त्याच्या मित्राने आपल्याला ती भेटली होती आणि आपण नंबर दिलाय हे सांगितले होते. तितक्यात त्याच्यासमोर असणाऱ्या त्याच्या एका मित्राकडे त्याने आपली डायरी दिली आणि ती तिला द्यायला सांगितली. हे दोघेही पुन्हा ती बसलेल्या कट्ट्यावर आले आणि त्याची डायरी तिच्यापुढे धरली. काय आहे असे विचारताच एक मित्र म्हटला, पाहा तर… तिने डायरी उघडून पाहिली आणि त्यातील अक्षर आणि रोजच्या दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वेळा असणाऱ्या तिच्या उल्लेखाने ती अक्षरशः मोहरुन गेली….