निर्भया - १०
त्या संध्याकाळी लॅबचे रिपोर्ट. आले. ग्लासमधील सरबतात विष होतं. आणि ग्लासवर राकेश आणि दीपा दोघांच्याही बोटांचे ठसे मिळाले होते.
दीपाचे ठसे ग्लासवर मिळाले, म्हणजे तिच्यावरचा माझा संशय खरा ठरला. " मानेंच्या स्वरात त्यांचा संशय खरा ठरल्याचा आनंद होता.
"तिने स्वतःच मला सागितलं, की निघताना तिने सरबत बनवून दिलं होतं. त्यामुळे तिच्या बोटांचे ठसे ग्लासवर असणं स्वाभाविक आहे, नाही का माने?" सुशांत म्हणाले.
आज तिला पाहिल्यापासून तिचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. ती मुलगी कोणाचा खून करू शकेल असं त्याला वाटत नव्हतं. आईने लग्नाची गळ घालणं, आणि मनाला भावणारी मुलगी समोर येणं, हा एक मोठा योगायोग होता. कदाचित् याच कारणामुळे सुशांत तिच्याकडे अधिकच आकर्षिले गेले होते. पण राकेशवर तिचं प्रेम होतं, हे तिने स्पष्ट शब्दांत सागितलं होतं; हे विसरून चालणार नव्हतं. मनाला आवर घालणं आवश्यक होतं, कारण पहिलं प्रेम कोणी लगेच विसरेल हे शक्य नव्हतं. पोलीस इन्सपेक्टर म्हणून ते त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्षही करू शकत नव्हते. राकेशबरोबर असणारी दीपा ही शेवटची व्यक्ती होती. पहिली संशयीत तीच होती. जरी ती त्यांना निर्दोष वाटत होती, तरी तिच्याविषयी विशेष माहिती त्यांना नव्हती. तिला झुकतं माप देणं योग्य नव्हतं. तिचा यात हात नव्हता असं ते खात्रीपूर्वक म्हणू शकत नव्हते. "अजून काही महत्वाचे रिपोर्ट यायचे आहेत. बघू काय निष्पन्न होतंय ते. उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल." ते मनाशी म्हणाले.
********
दुस-या दिवशी शहरात एक घरफोडी झाली होती ; तिथे पंचनामा करणे, घरच्या लोकांचे जबाब घेणे, यात सुशांतचा दिवस गेला. गुन्ह्याची पद्धत पाहूनच हे कुठल्या टोळीचे काम आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. खब-यांकडून गुन्हेगार मुंबई सोडून निघाले आहेत हे कळलं, आणि स्टेशनवर त्यांना मुद्देमालासह पकडण्यात त्यांना यश आलं. पण हे सर्व होईपर्यंत रात्र झाली होती. चोरट्यांना चौकीत आणून त्यांनी गजाआड केलं. दिवसभर खूप दमछाक झाली होती. सुशांत घरी जायला निघाले तेवढ्यात काँस्टेबल कदमनी त्यांच्या हातात एक लिफाफा आणून ठेवला.
" साहेब राकेशचे पी. एम.रिपोर्ट्स आहेत. दुपारी आले." थकलेल्या सुशांतना थांबवणं कदमांच्या जिवावर आलं होतं. ती दिलगिरी त्यांच्या स्वरात दिसत होती.
"आज दिवसभर एवढी धावपळ झाली की मी ती केस विसरूनच गेलो. " परत खुर्चीवर बसत विक्रांत म्हणाले.
रिपोर्ट उघडून वाचल्यावर त्यांनी मान हलवली. "आपला कयास खोटा ठरला. त्याचा मृत्यू विष पोटात गेल्यामुळे नाही; तर हार्ट - अटॅकने झालाय." कुतूहलाने बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या मानेंना ते म्हणाले.
"म्हणजे आता पुढे शोध घ्यायची गरज नाही. केस इथेच संपली म्हणायची!" माने खुश होऊन म्हणाले. तपासाच्या त्रासातून सुटका मिळाल्याचा आनंद त्यांच्या स्वरात दिसत होता.
"केस संपली नाही माने! त्या सरबतात विष होतं, हे विसरून चालणार नाही. ते सरबतात आत्महत्या करण्यासाठी राकेशने घातलं होतं, की दुस-या कुणी...याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल." सुशांतने त्यांना समजावलं.
"साहेब! आज दिवसभर खूप त्रास झालाय तुम्हाला! आता घरी जाऊन चांगली झोप घ्या. तु्म्हाला विश्रांतीची गरज आहे. बाकी सर्व आपण उद्या बघू." माने जांभई देत म्हणाले. खरं म्हणजे दिवसभराच्या श्रमाने ते स्वतःसुद्धा थकले होते. आता चर्चा करण्याच्या मनःस्थितीत ते नव्हते.
"हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. उद्या सकाळी मात्र लवकर तयार व्हा. राकेशच्या घरी जायचं आहे. ब-याच गोष्टींचा खुलासा त्याच्या आईकडूच होईल. आणि त्याचं शेवटी ज्याच्याशी फोनवर बोलणं झाले, त्या त्याच्या मित्रालाही भेटावे लागेल. राकेशसारख्या धडधाकट तरूणाला त्याच्याशी बोलल्यावर अचानक हार्ट अटॅक का आला असेल? आणि कदम! यांच्याकडे नीट लक्ष ठेवा." निघता निघता कस्टडीतील कैद्यांकडे निर्देश करत सुशांत म्हणाले.
*******
दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत उठले, तेव्हा कालच्या थकव्याचा मागमूसही राहिला नव्हता सकाळी जॉगिंगला जायची अनेक वर्षांची सवय त्यांना होती त्याप्रमाणे ते बाहेर पडले तो नेहमीचाच रस्ता होता. तीच झाडे! पण आज फुलानी डवरलेली झाडं पाहून दीपाची आठवण आली. हा बहर पाहायला ती बरोबर असायला हवी होती असं त्यांना प्रकर्षानं वाटू लागलं. ते स्वतःशीच हसले. " कालपासून मला सगळीकडे ती मुलगी का दिसतेय? तिचं राकेशवर मनापासून प्रेम होतं, हे तिने स्पष्टपणे कबूल केलं. कालच तिला पाहिलं आणि ती आवडली इतकंच! तिच्याविषयी इतकी आत्मीयता का वाटतेय?" ते स्वतःला विचारत होते. " आणि मला तिच्याविषयी विशेष माहिती नाही, हे विसरून चालणार नाही. राकेशच्या केसमध्ये मुख्य संशयित तीच आहे. तिच्या सौदर्याच्या जाळ्यात स्वतःला गुंतवून न घेता, त्रयस्थपणे शोध घ्यायला हवा." त्यांनी स्वतःला ताकीद दिली.
सुशांतच्या कर्तव्यनिष्ठ स्वभावाप्रमाणे त्यांनी प्रथम राकेशच्या दुर्दैवी मृत्यूच्या तपासात लक्ष केंद्रित करायचं ठरवलं . ड्यूटीवर जाण्यासाठी ते तयार झाले, तोच इन्स्पेक्टर मानेंचा फोन आला. " राकेशच्या वडिलांनी आपल्याला सकाळऐवजी संध्याकाळी बोलावलं आहे.अजून त्यांच्या पत्नीची तब्येत बरी नाही. खूप धक्का बसला आहे त्यांना! अशक्तपणामुळे त्यांना चक्कर येतेय! त्या काही बोलण्याच्या अवस्थेत नाहीत, म्हणून संध्याकाळी या, असं म्हणतायत!" ते म्हणाले.
" ठीक आहे! मी आता पोलिस स्टेशनला यायला निघालोय ! तुम्ही तिथेच थांबा! आपण प्रथम राकेशच्या फ्लॅटवर जाऊन. थोडी पहाणी करू. त्याच्या शेजारच्या लोकांशीही बोलू." फोन ठेवून सुशांत ड्यूटीवर जायची तयारी करू लागले.
********
बरोबर घेऊन सुशांत राकेशच्या घरी निघाले. माने कोणत्यातरी विचारात होते. शेवटी न रहावून ते सुशांतना म्हणाले,
" साहेब, काल पूर्ण दिवस खूप टेंशनखाली गेला. आजकाल सगळे गुन्हेगार मुंबईत. एकवटलेयत असं वाटायला लागलंय. आणि हे अशा ठिकाणी लपून बसतात की त्यांना शोधणं म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखं असतं. आपण हे आव्हानही स्वीकारतो, पण कौटुंबिक आयुष्य रहातच नाही."
सुशांत होकारार्थी मान हलवत बोलू लागले,
" आपल्या भारतात कोणीही कुठेही जाऊन राहू शकतो. कोणत्याही राज्यातला माणूस कुठेही नोकरी व्यवसाय करू शकतो, या मध्ये काही आक्षेपार्ह नाही. पण कोणी जेव्हा नोकरी- व्यवसायासाठी किंवा रहाण्यासाठी एका राज्यातून दुस-या राज्यात जातो, तेव्हा सरकारी कागदपत्रांमध्ये- पोलीस खात्यामध्ये- कुठेतरी नोंद व्हायला हवी. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही या गोष्टी बंधनकारक आहेत. आपल्या देशात ही व्यवस्था नाही. ही गोष्ट गुन्हेगारांच्या पथ्यावर पडलीय. आणि पोलीसांसाठी मोठी डोकेदुखी ठरलीय. एक राज्यात गंभीर गुन्हा करून दुस-या राज्यात जाऊन लपणं हे आपल्याकडे नवीन नाही. जोपर्यंत कागदोपत्री नोंद होत नाही तोपर्यंत कायदेशीर रित्या स्थलांतर करणारे नागरिक आणि गुन्हे करून लपण्यासाठी दुस-या राज्यात अवैधरित्या आलेले गु्न्हेगार यांच्यामधून नेमके गुन्हेगार शोधून काढणं, हे पोलिसांसाठी मोठं जिकीरीचं काम रहाणार आहे. जाऊ दे! व्यवस्था बदलणं आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे जिवाची तमा न बाळगता रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करणं!" सुशांत गंभीरपणे मानेंना समजावून सांगत होते.
त्यांचं संभाषण चालू असतानाच जीप 'आकांक्षा ' बिल्डींगजवळ पोचली होती. कोणी पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून सध्या तो फ्लॅट सील केलेला होता.
राकेशचा फ्लॅट उघडून सुशांत आणि माने आत गेले. स्वच्छ नीटनेटकं घर बघून सुशांतला थोडं आश्चर्य वाटलं. दोन दिवसापूर्वी राकेशच्या मृत्यूचा पंचनामा करताना त्याचं लक्ष आजूबाजूला फारसं गेलं नव्हतं. एका अविवाहित तरुणाचं घर इतकं व्यवस्थित असणं ही खरंच नवलाची गोष्ट होती. किचनमध्ये डिश आणि ग्लास नीट ठेवलेले होते. गॅस चकचकीत होता. घराची लादीसुद्धा नुकतीच कोणीतरी स्वच्छ पुसलेली होती.
समोरच्या फ्लॅटमधून डोकावणाऱ्या एका वयस्कर गृहस्थाना पाहून सुशांतने जवळ बोलवून घेतले. त्यांना घाबरलेलं पाहून जवळीकीच्या स्वरात विचारलं,
" राकेशने घराच्या साफसफाईसाठी कोणी नोकर ठेवला होता का? घर अगदी नीट नेटकं आहे म्हणून विचारतोय. असं कोणी असेल तर. त्याचा जबाब नोंदवावा लागेल." तो पुढे म्हणाला. त्याच्या आवाजात जरब नव्हती, हे पाहून ते शेजारी अगदी बिनधास्त बोलू लागले,
" नाही साहेब, तसं कोणी नाही पण ती बिचारी मुलगी - दीपा, आठवड्यातून एकदा येथे येते, आणि निघेपर्यंत घरात राबत असते. त्यांचा सेफ्टी डोर नेहमी उघडा असतो, त्यामुळे आत चाललंय, सगळं समोरून आम्हाला दिसतं. त्यांचं लग्न ठरल्याला दोन वर्ष झाली. पूर्वी कधी इथे येत नव्हती! हल्लीच तीन-चार महिने झाले, ती आठवड्यातून एकदा येते. मला वाटतं लग्नानंतर त्यांचा इथेच राहण्याचा विचार असावा!" सुशांतना अगदी विस्तृत उत्तर मिळालं. नाहीतरी फ्लॅटमध्ये एकत्र भेटणाऱ्या अविवाहित स्त्री-पुरुषांवर त्यांचं बारीक लक्ष असणं नैसर्गिक होतं. त्याचं बोलणं ऐकून सुशांत मनात सुखावत होता कारण दीपाच्या चारित्र्याची ग्वाही अप्रत्यक्षपणे ते शेजारी देत होते.
" साहेब! तरीच या फ्लॅटमध्ये सगळीकडेच राकेशपेक्षाही दीपाच्या हाताचे ठसे जास्त मिळाले. पण या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणाचे ठसे मात्र मिळाले नाहीत." इन्स्पेक्टर माने म्हणाले.
"त्या दिवशी सर्व घर तिने स्वच्छ केलं. राकेश आणि त्याच्या मित्राची दोन दिवसांपूर्वी पार्टी झाली होती. त्यावेळच्या डिश आणि ग्लास ती आत घेऊन जाताना तिला मी पाहिलं. त्या तिने स्वच्छ करून ठेवल्या असतील. त्यामुळे तुम्हाला इतर कोणाचे ठसे मिळाले नसावेत. पण हे तिने आत्ताच केलं नाही. ती दरवेळी येते , तेव्हा हे सर्व करते." मराठेंनी दीपाची बाजू घेतली.
"त्या दिवशी ती निघाली जेव्हा तुम्ही तिला पाहिलं होतं ? घाबरलेली वाटत होती? खूप घाईत वाटत होती का?" सुशांतने विचारलं.
" ती घाबरलेली नव्हती, रात्र खूप झाली होती; दहा वाजले होते त्यामुळे घाईत होती. तशी ती नेहमीच निघताना घाईत असते. तेव्हा मी दरवाजासमोरच आरामखुर्चीत बसलो होतो. मला हात करूनच ती पुढे गेली. तिच्याबरोबर मी बोलत होतो, तेव्हा कदमही त्यांच्या दरवाजासमोर उभे होते. ती त्यांच्याशीही बोलली." मराठे आता दिलखुलासपणे बोलू लागले होते.
" ती गेल्यावर दुसरं कोणी आलं होतं का? " सुशांतने विचारलं. शेजारी राकेशच्या घरावर आणि हालचालींवर लक्ष ठेवून होते, हे लक्षात आल्यावर आपला तपास आता लवकरच पुढे जाईल याविषयी त्यांना खात्री वाटू लागली होती.
******* contd... part -11-