खरा मित्र
पांडुरंग सदाशिव साने
तीन मडकी
एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य राहात होता. त्याचे नाव होते भिकंभट तो फारच गरीब होता; परंतु त्याचे कुटुंब फार मोठे होते. बायको होती. चार कच्चीबच्ची होती. घरात खाण्यापिण्याची सदैव पंचाईत पडायची. कधी कधी नवराबायकोचे कडाक्याचे भांडणही होई. त्या वेळेस मुले रडू लागत. शेजारीपाजारी मात्र हसत व गंमत बघत.
एके दिवशी तर गोष्ट फारच निकरावर आल्या. भिकंभट ओसरीत बसले होते. घरात खाण्यासाठी पोरे आईला सतावीत होती. सावित्रीबाई शेवटी एकदम ओसरीत येऊत गर्जना करू लागल्या, 'काय द्यायचे पोरांना खायला? घरात एक दाणा असेल तर शपथ. बसा येथे ओटीवर मांडा ठोकून. संसार चालवता येत नाही तर लग्न कशाला केलेत? नेहमी गावात चकाटया पिटा. पानसुपार्या खायच्या, पिचकार्या मारायच्या. दुसरा उद्योग नाही तुम्हाला. काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज. लोकांजवळ तरी कितीदा तोंड वेंगाडायचे? ही पोरे घेऊन विहीरीत जीव द्यावा झाले. शंभरदा सांगितले कि काही थोडे फार तरी मिळवून आणा. कोठे बाहेर जा, उद्योगधंदा पाहा; परंतु घरकोंबडे येथेच माशा मारीत बसता. मला तर नको हा संसार असे वाटत आहे.'
सावित्रीबाईंचा पट्टा सारखा सुरू होता. बिचारे भिकंभटजी. त्यांना कोण देणार नोकरी चाकरी? कोणतेही काम त्यांना येत नसे; परंतु त्या दिवशी त्यांना फार वाईट वाटले. बायको रोजच बोलत असे; परंतु आज त्यांचा स्वाभिमान जागा झाला होता. त्यांची माणुसकी जागी झाली. एकदम उठले व म्हणाले, 'आज पडतो घराबाहेर. काही मिळवीन तेव्हाच घरी परत येईन. पोराबाळांचे पोट भरण्यास समर्थ होईन तेव्हाच परत तोंड दाखवीन. ही तोपर्यंत शेवटचीच भेट. 'परंतु सावित्रीबाईंस त्या बोलण्याने तेवढेसे समाधान झाले नाही, त्या चिडविण्याच्या आवाजात म्हणाल्या, 'आहे माहीत तुमची प्रतिज्ञा. आजपर्यंत सतरांदा जायला निघालेत; परंतु अंगणाच्या बाहेर पाऊल पडले नाही. जाल खरोखरच तेव्हा सारे खरे. 'भिकंभट खरोखरच घरातून बाहेर पडले. लांबलांब चालले. पाय नेतील तिकडे जात होते. कोणाकडे जाणार, कोठे जाणार? ना कोठे ओळख, ना कोणापाशी वशिला. दमेपर्यंत चालत राहावयाचे असे त्यांनी ठरविले होते. शेवटी ते अगदी थकून गेले. पोटात काही नव्हते. एक पाऊलही पुढे टाकवेना. शेवटी एका झाडाखाली ते रडत बसले.
त्या वेळेस शंकर आणि पार्वती तिकडून जात होती. पार्वती शंकरला म्हणाली, 'देवा, रडण्याचा आवाज कानांवर येत आहे. कोणी तरी दु:खी मनुष्य जवळपास असावा. चला, आपण पाहू. 'ती दोघं कोण रडतो ते शोधू लागली. त्यांना झाडाखालचा भिकंभट दिसला.
'तो पाहा रडणारा माणूस. चला का रडतोस ते त्याला विचारू. चला देवा.' पार्वती म्हणाली.
भगवान शंकर म्हणाले, 'या जगातील लोक एकाच गोष्टीसाठी रडत असतात. त्यांना पैसा पाहिजे, धनदौलत पाहिजे, परंतु जगाला देऊन देऊन आपण भिकारी झालो. आता आपणाजवळ देण्यासारखे काय बरे आहे? नाही म्हणायला भस्म आहे. त्याला का पडगुलीभर भस्म देऊ?'
पार्वती म्हणाली, 'देवा, आपणाजवळ अद्याप तीन मडकी शिल्लक आहेत. ती आहेत तोपर्यंत तरी काय द्यावे ही पंचाईत नाही. चला जाऊ त्या दु:खी माणसाकडे. दु:खी मनुष्य पाहून माझ्याने पुढे जाववत नाही.'
भगवान शंकर म्हणाले, 'तू पर्वताची मुलगी म्हणून तुला पार्वती म्हणतात, परंतु तुझे हृदय पर्वतासारखे कठीण नाही. तुझे हृदय इतके लोण्याप्रमाणे मऊ कसे?'
पार्वती म्हणाली, 'देवा माझा पिता हिमालय काही कठोर नाही. त्याच्या पोटातून सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना वगैरे शेकडो नद्या वाहातात. माझ्या पित्याचे हृदय दयेने भरलेले आहे; परंतु ते राहू दे. चला त्या दु;खी माणसाकडे व पुसू त्याचे डोळे.'
शेवटी शंकर व पार्वती त्या भिकंभटाजवळ आली, 'का रे ब्राह्मणा, का रडतोस? काय झाले? या रानात असा दु:खी कष्टी होऊन का बसलास?' शंकराने विचारले.
ब्राह्मण रडत म्हणाला, 'काय करू रडू नको तर? मला गरिबीने गांजले आहे. घरात बायको, चार मुलेबाळे आहेत; परंतु त्यांना खायला काय देऊ? आपल्या मुलांची उपासमार कोणाला बघवेल? शेवटी येथे रानात येऊन रडत बसलो.'
भगवान शंकर म्हणाले, 'आम्ही सुध्दा गरीबच आहोत; परंतु आमच्याजवळ तीन मडकी आहेत. त्यातील एक तुला देता ते तू घे.'
भिकभट म्हणाला, 'रिकामी मडके घेऊन काय करू? माझ्या घरात हांडे घंगाळे नसली तरी मातीची मडकी पुष्कळ आहेत; परंतु त्या मडक्यांत ठेवायला मात्र काही नाही. त्या मडक्यांत का दु:ख भरू, डोळयांतील पाणी भरू?
शंकर म्हणाले,' अरे, हे मडके असे तसे नाही. हे मंतरलेले मडके आहे. या मडक्यातून डाळेमुरमुरे बाहेर पडतात. 'पड पड' असे म्हटले की गरमागरम माल बाहेर पडतो. त्याचे दुकान घाल. लोक तुझ्या दुकानावरच येतील; कारण असा माल दुसरीकडे मिळणार नाही.'
भिकंभट आनंदला. आपल्यासमोर प्रत्यक्ष शंकर पार्वती आहेत हे त्याला माहीत नव्हते. नमस्कार करून व ते मडके घेऊन तो निघाला. वाटेत त्याला एक गाव लागले. तेथे तो थांबला. एका वाण्याच्या दुकानावर आपले मडके ठेवून म्हणाला, 'वाणीदादा वाणीदादा, मी नदीवरून आंघोळ करून येतो, तोपर्यंत माझे हे मडके सांभाळा.' वाणीदादा बरे म्हणाला, भिकंभट थोडेसे चालूच गेल्यावर परत माघारी आला व त्या वाणीदादाला म्हणाला, 'वाणीदादा, खरोखरच सांभाळा बरे मटके. पोरेबाळे येतील, फोडतील बिडतील, हे मडके माझा प्राण आहे. हे मडके म्हणजे माझे सारे काही. मी येतोच चाली चाली स्नान करून.'
भिकंटन लगबगीने गेले. नदीवर पोचले व आंघोळ करू लागले. इकडे त्या वाण्याच्या मनात आले की हा ब्राह्मण एवढयाशा मडक्याला इतका काय म्हणून जपतो. त्या मडक्यात काय आहे ते पाहाण्याचे त्याने ठरविले. त्याने मडक्यात डोकावून पाहिले तो काही दिसेना. ते मडके हलवावे असे त्याला वाटले. त्याने ते हातात घेऊन सहज 'पड पड' असे म्हटले. तो काय आश्चर्य? आतून गरम गरम डाळेमुरमुरे यांची रास पडू लागली. त्याला आनंद झाला. त्याने आपल्या बायकोला हाक मारली व तो तिला म्हणाला, 'हे बघ, हे मडके घरात ठेव व घरातील अगदी असेच एक मडके बाहेर आणून ठेव. 'बायकोने त्याप्रमाणे केले. वाणीदादा जणू काही झालेच नाही अशा साळसूदपणे तेथे बसला होता.
भिकंभट आंघोळ करून आले. 'वाणीदादा, माझे मडके आहे ना रे?' त्यांनी विचारले. वाणीदादा म्हणाला, 'अहो मडक्याला कोण लावील हात? तो का सोन्याचा हंडा आहे की कोणी चोरील बिरील? ते आहे तेथे मडके. जा एकदाचे घेऊन.
भिकंभट मडके घेऊन निघाले. मनात मनोराज्ये करीत ते चालत होते. मी आता श्रीमंत होईन. माडया-महाल बांधीन, बागबगीचे करीन, असे मनात म्हणत चालले होते. रस्ता कसा संपला ते कळलेही नाही; गावची नदी आली तेव्हा आपले घर जवळ आले असे त्यांच्या ध्यानात आले. आले लगबगीने घरी. त्यांनी दारावर थाप मारली. सावित्रीबाईंनी दार उघडले तो दारात पतीची स्वारी!
'आलेत ना परत! मी केलेच होते मुळी भाकित. एक दिवस जाल. दोन दिवस जाल. शेवटी हात हलवीत परत याल -' सावित्रीबाई म्हणाल्या
'हात हलवीत परत आलो नाही. हे पहा मडके आणले आहे. 'भिकंभट म्हणाले.
'मडके आणले आहे! घरात का थोडी मडकी आहेत?' सावित्रीबाई वेडावीत म्हणाल्या.
भिकभट म्हणाले, 'तुम्हा बायकांचा फारच उतावळा व अधीर स्वभाव, जरा नीट ऐकून तर घेशील की नाही? आलो नाही तो तुझी तोफ आपली सुरू, जरा धीराने घे.'
सावित्रीबाई उसळून म्हणाली, 'आज दहा वर्षे तुमच्याबरोबर संसार केला तो का धीर असल्यावाचून? पोराबाळांना खायला देता येत नाही. थंडीवार्याला अंगावर पांघरूण घालता येत नाही. तरी मी सारे मुकाटयाने बघते, सहन करते. म्हणे धीर नाही! लक्षात ठेवा, तुम्हा पुरूषांपेक्षा आम्ही बायकाच अधिक धीराच्या असतो, खंबीर असतो, सोशिक असतो. अगस्ती ऋषी सात समुद्र प्यायला. आम्ही बायका अपमान, दु:ख, कष्ट, हाल, अपेष्टा यांचे शेकडो समुद्र पीत असतो. म्हणे धीर नाही. धीर नसता तर केव्हाच जीव दिला असता!'
भिकंभट म्हणाले, 'कशी छान बोलतेस? तू पुराणिकबाई का नाही होत? माझे मुलाबाळांचे पोट तरी भरेल.
सावित्रीबाई म्हणाली, घरचे पुराण संपून वेळ असेल तेव्हा की नाही?'
भिकंभट म्हणाले, 'बरे, ते राहू दे. अग हे मडके आहे ना, ते मंतरलेले मडके आहे. याच्यातून डाळेमुरमुरे बाहेर पडतात. सारखी अखंड धार सुरू होते. आपण दुकान घालू. श्रीमंत होऊ. मग तुला सोन्यामोत्यांनी नुसती मढवीन.'
सावित्रीबाई हसून म्हणाली, 'मडक्यातून का कोठे डाळेमुरमुरे बाहेर पडतात? वेड लागले तुम्हाला.'भिकंभट म्हणाले, 'तुला प्रत्यक्षच दाखवतो. तू पोती आण भरायला. 'असे म्हणून ते ते मडके हलवू लागले. 'पड पड' म्हणून हलवू लागले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ!
'आता किती वेळ ते मडके हलवीत घुमणार? ठेवा खाली. दमलेत, घामाघूम झालेत. 'सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली.
परंतु भिकंभट हसला नाही. त्या वाण्याने आपणास फसविले असे त्याला वाटले. ते मडके त्याने हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणार्या मुलांना समजावीत बसली.
अंधारातून भिकंभट जात होता. उजाडते न उजाडते तोच तो वाणीदादाच्या घरासमोर दत्ता म्हणून उभा राहिला. 'वाणीदादा, माझे मडके तुम्ही लांबवलेत. हे नव्हे माझे मडके. तुम्ही अदलाबदल केलीत. होय ना? द्या माझे मडके. 'असे तो ब्राह्मण म्हणाला.
वाणीदादा संतापून भिकंभटाच्या अंगावर धावून गेला. तो रागाने म्हणाला, 'मला काय करायचे तुझे मडके? मला का भीक लागली आहे? मी का चोर आहे? नीघ येथून. नाहीतर थोबाड रंगवीन. नीघ.'
ती बाचाबाची ऐकून शेजारची मंडळीही तेथे आली. त्या सर्वांनी भिकंभटाची हुर्यो केली. त्याला हाकलून लावले. बिचारा भिकंभट पुन्हा रडत निघाला. रानात जाऊन त्या पूर्वीच्याच झाडाखाली रडत बसला.
तिकडून शंकर पार्वती जात होती. त्याचे रडणे त्यांच्या कानी पडले. पार्वती शंकरास म्हणाली, 'देवा, कोणी तरी दु:खीकष्टी प्राणी रडत आहे. चला. आपण पाहू. 'शंकर म्हणाले, 'पुरे झाले तुझे. या जगाला रडण्याशिवाय धंदा नाही व तुला त्याचे रडणे थांबविण्याशिवाय धंदा नाही. या रडारडीला मी तरी कंटाळलो आता आणि आपल्याजवळ तरी असे काय उरले आहे?' पार्वती म्हणाली, 'अजून दोन मडकी शिल्लक आहेत. तोपर्यंत काय द्यायचे ही चिंता नको. चला जाऊ त्या दु:खी प्राण्याकडे.
'ती त्या झाडापाशी आली. तो तोच पूर्वीचा ब्राह्मण. शंकरांनी विचारले, 'का रडतोस, काय झाले?' भिकंभट म्हणाला, 'काय सांगू महाराज? त्या एका वाणीदादाकडे मी मडके ठेवून आंघोळीला गेलो. आंघोळ केल्यावर मडके घेऊन घरी गेलो. 'पड पड' म्हणून मडके हलविले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ. त्या वाण्याने मडके बदलले असावे अशी शंका येऊन मी त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले; परंतु तो माझया अंगावर धावून आला. शेजारीपाजारी त्याच्याच बाजूचे. खर्याची दुनिया नाही. मी गरीब, एकटा पडलो. आलो पुन्हा या झाडाखाली व बसलो रडत.'
भगवान शंकर म्हणाले, 'हे दुसरे मडके घे.'
भिकंभटाने विचारले, 'यातून काय बाहेर पडते?'
शंकर म्हणाले, 'यातून 'पड पड' म्हटले की राक्षस बाहेर पडतात. 'शिव शिव' म्हटले की ते नाहीसे होतात. घे हे मडके व त्या वाण्याची खोड मोड. 'ब्राह्मणाच्या सारे ध्यानात आले. नमस्कार करून व ते मडके घेऊन ब्राह्मण निघाला. तो त्या वाण्याकडे आला व म्हणाला, 'वाणीदादा, वाणीदादा, सापडले हो माझे मडके. उगीच तुमच्यावर आळ घेतला. झाले गेले विसरून जा. हे माझे मडके सांभाळा. मी नदीवरून आंघोळ करून येतो. सांभाळा हां. 'ब्राह्मण नदीवर गेला. त्या मडक्यात काय असावे हे पाहाण्याच्या निमित्ताने वाणीदादा उठला. त्याने मडके हलविले. 'पड पड' म्हटले तो एकदम अक्रळविक्राळ राक्षस बाहेर पडले. त्यांच्या हातात सोटे होते. गदा होत्या, त्या वाण्याला ते राक्षस बदडू लागले. वाणीदादा ओरडू लागला. त्याच्या आरोळया ऐकून शेजारीपाजारी धावले. त्यांनाही राक्षसांनी भरपूर प्रसाद दिला. 'मेलो, मेलो, ब्राह्मण धाव! असे सारे ओरडू लागले. पाठीवर तडाखे बसत होते. सारे चांगले झोडपले गेले. भिकंभट सावकाश येत होता.
'अरे ब्राह्मणा, हे राक्षस आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत असे दिसते. सांग यांना काही. वाचव आमचे प्राण-' सारे गयावया करीत म्हणू लागले.
भिकंभट वाणीदादाला म्हणाला, 'वाणीदादा, माझे पहिले मडके मुकाटयाने दे. तरच हे राक्षस नाहीसे होतील.'
वाणीदादाची तर कणीक चांगलीच तिंबली गेली होती. तो पटकन घरात गेला व ते मडके घेऊन बाहेर आला. ब्राह्मणाने ते मडके घेतले व नतंर 'शिव शिव' 'शिव शिव' असे म्हणताच ते राक्षस अदृश्य झाले.
भिकंभट आता ती दोन मडकी हातात घेऊन निघाले. केव्हा एकदा घरी जाऊ असे त्यांना झाले होते. आले एकदाचे घर. दोन हातांत दोन मडकी घेऊन आलेल्या आपल्या नवर्याला तो अवतार पाहून सावित्रीबाईना हसू आले. भिकंभट म्हणाले, 'हसू नको, पोती आण. डाळेमुरमुर्यांनी भरून देतो. ' 'पड पड' असे म्हणत मडके हलवू लागले. काय आश्चर्य! डाळेमुरमुर्यांची धार लागली. पोराबाळांना आनंद झाला. मुठी भरभरून ती खाऊ लागली. भिकंभट बायकोला म्हणाले, 'तू सुध्दा खाऊन बघ अमृतासारखी चव आहे. ' तिने दोन दाणे तोंडात टाकले व मग ती म्हणाली, 'खरेच हो, डाळेमुरमुरे असे कोठेही कधी खाल्ले नाहीत.'
भिकंभटाने भडभुंजाचे दुंकान थाटले. जो तो त्याच्या दुकानावरून माल नेऊ लागला. त्याच्या दुकानावर ही गर्दी. भिकंभट श्रीमंत होऊ लागला. तो शेतीवाटी विकत घेऊ लागला. सावकारी करू लागला. त्याने बायकोला, मुलाबाळांना दागदागिने केले. कशाला आता जणू तोटा नव्हता.
एके दिवशी भिकंभट खेडयावर गेले होते. आज मडके कोण हलविणार? त्यांच्या मुलांत भांडण सुरू झाले. एक म्हणे मी हलवीन, दुसरा म्हणे मी हलवीन. झोंबाझोंबी सुरू झाली. शेवटी ते मडके जमिनीवर पडले व त्याचे झाले तुकडे. ती मुले रडू लागली. तिकडून आई आली व तिनेही त्यांना मार मार मारले, 'मस्ती आली होती मेल्यांना, खाल काय आता भुरी?' असे ती ओरडली.
भिकंभट घरी आले. त्यांना सर्व प्रकार कळला. सावित्रीबाई म्हणाली, 'पुन्हा एकदा बसा ना झाडाखाली त्या रडत. मिळाले एखादे मडके तर बरे झाले. नाही मिळाले तर हे दागदागिने मोडू व पोटाला खाऊ.'
बायकोचा हा पोक्त सल्ला भिकंभटाने ऐकला. तो पुन्हा निघाला व त्या झाडाखाली रानात रडत बसला. तिकडून शंकर पार्वती जात होती. 'देवा, कोणी तरी रडते आहे, चला आपण पाहू. ' शंकर म्हणाले, 'शेवटचे मडके आज देऊन टाकू. पुन्हा कोणाकडे जायला नको. कोण रडतो पाहायला नको. ती दोघे त्या झाडाजवळ आली तो तोच ब्राम्हण'
'काय रे ब्राह्मणा, आता काय झाले?' मुलांच्या भांडणात मडके फुटले, मी फुटक्याच नशिबाचा जणू आहे. काय करू महाराज?'
शंकर म्हणाले, 'आता हे शेवटचे मडके देतो. पुन्हा रडत येऊ नकोस. आलास तरी उपयोग नाही.'
भिकंभटाने विचारले, 'या मडक्यातुन काय बाहेर पडते?'
भगवान म्हणाले, 'पाहिजे असेल ते पक्वान हवे असेल तितके बाहेर पडते?'भिकंभट आनंदाला. नमस्कार करून ते तिसरे मडके घेऊन घरी आला. बायको वाटचपाहात होती. नवीन मडके पाहून तिलाही आनंद झाला.
'यातून काय पडते बाहेर?' तिने विचारले.'
'पातेले घेऊन ये. तो म्हणाला'
सवित्रीबाई पातेले घेऊन आल्या. भिकंभटाने मडके हलवून 'श्रीखंड' असे म्हटले. तो काय आश्चर्य! घट्ट सुंदर पिवळे धमक श्रीखंड पडू लागले. मुलाबाळांनी, सर्वांनी पोटभर खाल्ले.
भिकंभटाने आता हलवायचे दुकान घातले. पेढे, बर्फी, श्रीखंड, बासुंदी, पुरी, जिलबी, लाडू, रसगुल्ले सारे पदार्थ तेथे असत. सारी दुनिया त्याच्याकडून माल घेई. सणवार आला की भिकंभटाच्या दुकानावर गर्दी असायची. भिकंभटाकडे माल मिळतो तसा कोठेही मिळत नाही अशी दुकानाची कीर्ती पसरली.
त्या गावात धनमल म्हणून एक श्रीमंत मनुष्य होता. तो कारस्थानी होता. युक्तिबाज होता. भिकंभटाकडील या श्रीखंडबासुंदीच्या मडक्याची गोष्ट त्याच्या कानावर आली. भटजीकडील हे मडके लांबविण्याचा त्याने विचार केला.
एकदा काय झाले, त्याचा जावई आला. बर्याच दिवसांनी आलेल्या जावईबोवांस थाटाची मेजवानी द्यावी असे धनमल याला वाटले. सर्व तयारी झाली. धनमल भिकंभटाकडे जाऊन म्हणाला, 'जावयाला पंगत आहे. तुम्ही उत्कृष्ट पक्वाने पुरवाल काय? भिकंभट म्हणाला, 'हो. 'त्यावर पुन्हा धनमल म्हणाला, 'ताजा ताजा माल तेथल्या तेथे मिळावा म्हणून तुम्ही आमच्याकडे या व पक्वानांचा पुरवठा करा. 'भिकंभट म्हणाला, 'एका अटीवर मी तुमच्या घरी येईन. मला स्वतंत्र खोली दिली पाहिजे. खोलीत कोणी येता कामा नये. मी आतून पातेली, पराती भरभरून देत जाईन. 'धनमल म्हणाला, 'ठीक, तशी व्यवस्था करू.'
मेजवानीचा दिवस उजाडला. गावातील मोठमोठयांस आमंत्रण देण्यात आले. जेवणाची तयारी झाली, कण्यारांगोळया घालण्यात आल्या. चंदनाचे पाट मांडले गेले. सुंदर केळीची पाने होती. जावयासाठी सुंदर असे चांदीचे ताट होते, अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला होता.
अगदी आयत्या वेळेस भिकंभट फडक्यात मडके गुंडाळून घेऊन धनमलच्या घरी आला. त्याला खोली दाखविण्यात आली. तो त्या खोलीत गेला. भरपूर माल पाच मिनिटात त्याने दिला. बाहेर पंगत बसली. मंडळी जेवू लागली.
धनमलने काय केले, वाढायला भरपूर पक्वाने आहेत असे पाहून ज्या खोलीत ब्राह्मण होता तिला एकदम त्याने बाहेरून कडी लावून घेतली. ब्राह्मण ओरडू लागला, मला शौचास जावयाचे आहे. मला लघवीस जावयाचे आहे, दार उघडा. असे ओरडू लागला. कोणी दार उघडीना.
धनमल येऊन म्हणाला, 'भटजीमहाराज, आता खोलीतच मरा. मडक्यातील पक्वान खा. पाणी मिळणार नाही. बाहेर पडता येणार नाही. जर खोलीतून बाहेर पडायचे असेल तर ते मडके मला दिले पाहिजे.' काय करणार भिकंभट? मडके द्यावयास तो तयार झाला. धनमलने मडके घेऊन त्याला दार उघडले. ब्राह्मण रडत घरी गेला. इकडे जेवणे चालली होती. धनमल पंगतीत जाऊन म्हणाला, 'स्वस्थ होऊ दे भोजन. आता' आणखी दुसरी पक्वाने लवकरच येतील. 'त्या मडक्यातून तर्हेतर्हेची ताजी ताजी पक्वाने बाहेर पाडण्यात येऊ लागली. मंडळी संतुष्ट होत होती.
इतक्यात भिकंभट ते राक्षसाचे मडके घेऊन धनमलकडे आला. ते मडके इतके दिवस माळयावर नीट ठेवण्यात आले होते. ब्राह्मण धनमलला म्हणाला, 'एक मडके घेतलेस, आता हेही घे. यातून तर अधिकच सुंदर पदार्थ बाहेर पडतात. घ्या हे. मला काही नको.'
धनमल म्हणाला, 'आण इकडे. नको तर नको. ' ब्राह्मण मडके देऊन निघून गेला. धनमल पुन्हा पंक्तित जाऊन म्हणाला, 'स्वस्थ जेवा. आता आणखी निराळेच पदार्थ येणार आहेत. हे पदार्थ कधी बाधणार नाहीत. खायला संकोच नका करू.'
धनमलने ते नवीन मडके हलवले. तो काय! त्यातून सोटे घेतलेले राक्षस बाहेर पडले. ते भयंकर राक्षस सर्वांना बदडीत सुटले. जावईबोवांच्या पाठीत चांगलाच तडाखा बसला. सासरे धनमल तर ओरडू लागले, 'मेलो मेलो' म्हणू लागले. सर्वांची त्रेधातिरपीट. पोटे फार भरलेली म्हणून न पटकन उठता येई न पळता येई. नेसूचे सावरणेही मुष्कील झाले.
'अरे त्या ब्राह्मणाला बोलवा. त्याला बोलवा' असे धनमल सांगू लागला. कोणी तरी ब्राह्मणाला सारे जाऊन सांगितले. ब्राह्मण तेथे आला. तो धनमल यास म्हणाला, 'माझे पहिले मडके दे म्हणजे राक्षस नाहीसे करतो.' ते पहिले मडके देण्यात आले. भिकंभटाने 'शिव शिव' 'शिव शिव' असे म्हटले. तात्काळ राक्षस अदृश्य झाले. सर्वांचे जीव खाली पडले.
भिकंभट दोन्ही मडकी घेऊन घरी आला. पुनश्च त्याच्या वाटेला कोणी गेले नाही. भिकंभट, सावित्रीबाई, त्यांची मुलेबाळे सारी सुखात राहिली.
संपली आमची कथा सरो ऐकणाराची व्यथा