Nirbhaya - 8 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया -८

Featured Books
Categories
Share

निर्भया -८

                       निर्भया- ८
     त्यादिवशी सकाळी  इन्स्पेक्टर  सुशांत  पाटील खूप उशिरा उठले. कालचा पूर्ण दिवस  धावपळीत    गेला होता. उत्तर प्रदेशात खंडणी आणि खुनासाठी पोलिसांना हवा असलेला एक सराईत गुंड  मुंबईत  आला   होता  आणि   इथल्या  एका   झोपडपट्टीत लपला  होता. झोपड्यांचं  गच्च  जाळं  असणा-या त्या विभागात त्याला शोधणं जेवढं जिकीरीचं होतं, तेवढीच ती जिवावरची जोखीम होती. तिथे नेहमीच अनेक  अट्टल गुन्हेगारांना आसरा  दिला जात असे. त्यांना   शोधायला  आलेल्या   पोलिसांवर   हल्ले  झाल्याच्याही अनेक घटना घडल्या होत्या. पण त्या खतरनाक एरियात बेडरपणे  जाऊन  सुशांतने  ती मोहीम  यशस्वी  करून   दाखवली होती. खुन्याला बेड्या   घालून   'उत्तर  प्रदेश'  पोलिसांकडे  सुपूर्द करण्यात ते यशस्वी  झाले. पण   ते  एवढे  थकले     होते की  डोळ्यावरची  झोप अजून  उडत नव्हती. त्यांनी   कडक   चहा करून   घेतला. गरम  चहा प्याल्यावर  थोडा  उत्साह वाटू  लागला.  "लवकर तयारी  करून  पोलिस- स्टेशनला   जायला    हवं. आज  ड्यूटीवर  जायला थोडा  उशिरच  झालाय! "  ते मनाशी म्हणाले. ते तयारी करून घरातून  बाहेर पडणार  एवढ्यातच   फोनची  बेल वाजू  लागली. कोल्हापूरहून आईचा फोन होता.
      " बहुतेक आई आज मला खूप सुनावणार आहे. गेल्या आठवड्यात फोन करायला वेळच मिळाला नाही." सुशांतने आईला काय उत्तरं द्यायची हे ठरवत बोलायला सुरूवात केली. 
 "कशी आहेस तू आई? आज तुला फोन करणारच होतो." ते आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. 
 "आम्हाला  फोन करायला तुला वेळ कुठे असतो? रात्रंदिवस  गुन्हेगारांच्या  मागे  असतोस! स्वतःकडे जराही लक्ष देत नाहीस. तुझ्यावर  लक्ष   ठेवायला  तिथे  कोणी  नाही  याचा  फायदा घेतोयस तू! आणि म्हणूनच  तुला सांभाळायला  कोणीतरी शोधलंय  आम्ही!" आई  रागात नव्हती, उलट  खुश  दिसत  होती. ती पुढे म्हणाली,
" तुझ्यासाठी छान मुलगी पाहिली आहे.आम्हाला दोघांनाही  पसंत आहे. तुलाही नक्कीच आवडेल.    जर लवकर इथे आलास, तर लग्न ठरवायला बरं पडेल. तू  तिला पाहिलंस, की  लग्नाची  बोलणी  करता  येतील. येत्या रविवारी तू इथे येशील का?" आई उत्साहाने  बोलत होती. 
   " लग्नाची    एवढी   काय    घाई    आहे? मला   सध्या  इथे  एवढं काम  आहे  की तिथे  येणं मला काही दिवस  तरी  शक्य  नाही. तेव्हा उगाच मुली बघायची  घाई  करु   नकोस."  सुशांत   म्हणाला.  लग्नाचा   विषय   निघाला, की  सुशांत   नेहमीच काही ना काही सबब सांगून टाळाटाळ  करतो  हे त्याच्या आईला चांगलंच माहीत होतं. तिने विषय    पुढे रेटला,  
       " अरे सुशांत ! तुझे  जेवणाखाण्याचे  किती   हाल होतायत! एकदा तुझं  लग्न झालं  की माझी काळजी दूर होईल."  ती मुलाला  समजावण्याचा  प्रयत्न करत म्हणाली.
    " ते  खरं  आहे! पण. आई! सध्या मला  तिकडे येणं शक्य नाही! खूप काम आहे इथे! आणि आता    तर  इलेक्शन  जवळ  आलंय! मला  रजा  मिळणं शक्य नाही. आई! मी ड्यूटीवर जायला  निघालोय. उशीर  होतोय! मी  तुला  नंतर फोन  करतो!" असं म्हणून  सुशांतने फोन   ठेवला. आईने  गेल्या  दोन वर्षांपासून लग्नाचं टुमणं लावलं होतं;  पण  सध्या  तरी  लग्नाच्या बंधनात अडकण्याची त्यांची इच्छा नव्हती.  करिअरवर  लक्ष   केंद्रित  करायचं; असं सुशांतने ठरवलं होतं.
                        *******
    त्या दिवशी सकाळी इन्सपेक्टर सुशांत पोलीस स्टेशनला  गेले; तेव्हा  कॉन्स्टेबल माने त्याची वाट  बघत   होते.  " साहेब     गोरेगावला    'आकांक्षा'  बिल्डिंगमध्ये  खून झाला आहे. रात्रभर कोणाच्या लक्षात आलं नाही. सकाळी दूधवाला नेहमीप्रमाणे शेजारच्या घरी आला होता. एवढ्या सकाळी दार सताड उघडं  पाहून त्याने  'दूध  हवंय   कां?; '  हे   विचारण्यासाठी सेफ्टी- डोअरमधून आत पाहिलं, तेव्हा त्याला जमिनीवर पडलेला तरूण  दिसला, आणि त्याने शेजा-यांना बोलावलं. त्यांनी पोलिस- स्टेशनला फोन करून कळवलं. आपल्याला तिथे जावे लागेल. " 
      "  चला  आपण  निघूया. फोटोग्राफर  आणि फिंगरप्रिंट  एक्सपर्टना   डायरेक्ट   तिथे  यायला सांगा." सुशांत खुर्चीवरून उठत म्हणाला.
    व्हॅनमधे बसल्यावर बराच वेळ साहेबांना गप्प पाहून मानेंनी बोलायला सुरूवात केली,
          "गेल्या  महिन्यात   मालाडमध्ये त्या तीन  तरूणांचा  मृत्यू    झाला,  त्याचा  काही  सुगावा लागला   का? सुशांतला   बोलतं   करण्यासाठी  त्यांनी विचारलं.ते पुढे म्हणाले, "हा सुद्धा तरूण    आहे, म्हणून त्या केसची आठवण झाली."  
     "तिथल्या इ. नाईकनी माझ्याकडे सुरवातीला  तपासासाठी मदत मागितली. ते म्हणाले, की तिथे त्यांच्याबरोबर एक स्त्री होती; कारण  पावसामुळे झालेल्या   झालेल्या   चिखलात   सँडलचे    ठसे उमटले होते.  अजूनही  ती स्त्री कोण होती, याचा   शोध  लागला  नाही. त्यांनी  बराच  प्रयत्न  केला,   पण  त्यात त्यांना यश मिळालं नाही. आणि नंतर  त्यांनी ती फाइल बंद केली. आणि आज आणखी  एका तरूणाचा मृत्यू!  हे  काय  चाललंय? काही कळत नाही.चला तिथे जाऊन बघूया." इन्स्पेक्टर पाटील व्हॅनमधून उतरताना  म्हणाले.
                        ********
     हाॅलमधील दिवाणवर एक तरुण मृतावस्थेत पडला   होता. त्याच्याकडे   पाहून   तो   श्रीमंत घरातला  असावा   असं   वाटत  होतं. शरीरावर जखम  दिसत  नव्हती. तोंडातून  फेस  आलेला दिसत होता. जवळच  टेबलावर एक सरबताचा    ग्लास  दिसत होता.       
      " साहेब, हा सुद्धा तरुण मुलगा आहे. आज-   काल   मुंबईच्या   तरुणांमध्ये ही  कसली  लाट पसरली आहे काही  कळत नाही." 

"  हा सरबताचा ग्लास पाहिला?" सुशांत सूचक नजरेने मानेंना म्हणाले.
  "पण हा ग्लास भरलेला आहे!" माने म्हणाले.
  "ग्लास भरलेला आहे, पण जालीम वीष असेल तर एखादा घोटही जीवघेणा ठरू शकतो. रिपोर्ट्स आले की कळेलच." ते गंभीरपणे म्हणाले.

    "शेजारी चौकशी करून याची माहिती काढावी लागेल. हा इथे एकटाच रहात होता असं दिसतंय."   ते पुढे  म्हणाले. बाॅडी पी. एम.साठी पाठवण्याची व्यवस्था झाल्यावर तो ग्लास  त्यांनी  लॅबोरेटरीत पाठवला  आणि    शेजारच्या  लोकांचे    जबाब घ्यायला सुरुवात केली. 
     "साहेब, मी कदम, बाजूच्या  फ्लॅटमधे रहातो.  मीच   तुम्हाला   फोन   केला   होता. हा  राकेश! प्रसिद्ध   उद्योगपती,  श्री. विश्वास  फाटक  यांचा मुलगा ! या बिल्डिंगमधे  यांच्या वडिलांचा  जुना फ्लॅट आहे.   हे  सगळे  हल्ली  वांद्र्याला  नवीन बंगल्यात रहातात. हा मात्र  इथे नेहमी  येत असे. त्याचं  'दीपा'  नावाच्या  एका  मुलीबरोबर  लग्न  ठरलं आहे.  ती  आठवड्यातून  एकदा इथे   येते.   खूप लाघवी मुलगी आहे. कालही ती आली होती.   मी  रात्रीचा  फेरफटका  मारून घरी आलो तेव्हाच   ती  इथून निघाली. राकेश त्यावेळी फोनवर बोलत    होता. 
     " म्हणजेच ती  इथून  निघाली,  तेव्हा  राकेश व्यवस्थित होता." पाटील म्हणाले. अशा   त-हेने फ्लॅटमध्ये एखाद्या  मुलाला भेटणा-या मुलीची ते   एवढी स्तुती करत होते; हे  त्यांना  जरा विचित्रच वाटलं.
"होय  साहेब! तिला त्याने फोनवर  बोलता- बोलता  हात सुद्धा केला." कदम म्हणाले.
 " नंतर त्याच्याकडे  कोणी आलं होतं का?" सुशांतने विचारलं.

 "त्यानंतर त्याच्याकडे  कोणी  आलं  असेल, तर   मला  माहीत  नाही, कारण   नंतर  झोपायची   वेळ झाली होती. मी   रात्रभर   फ्लॅटबाहेर  आलो   नाही." कदम म्हणाले.
  "सकाळी दूधवाल्याने आरडाओरडा केला, तेव्हा     मी  आणि  समोरचे मराठे लगेच  आलो. राकेशला  उचलून     दिवाणवर    ठेवला,  त्याला     शुद्धीवर  आणण्याचा     प्रयत्न  केला,  पण तो सगळ्याच्या  पलीकडे  गेला  होता,  हे  आमच्या  लक्षात  आलं. आणि  आम्ही    पोलिसांना  फोन   केला. फाटक साहेबांनाही    कळवलं.  ते   येतीलच   इतक्यात! राकेश  त्यांचा  एकुलता  एक  मुलगा! एवढं मोठं दुःख कसं सहन करतील -- कळत नाही!"  ते पुढे म्हणाले.
     विश्वास  फाटक आणि  त्यांची  पत्नी शालिनी  काही  वेळातच तिथे आले . कालपर्यंत धडधाकट असणारा  आपला  मुलगा  आज  अशा  अवस्थेत पाहून  त्यांच्या   शोकाला   सीमा  उरली  नव्हती. शालिनीताईची मनःस्थिती अत्यंत वाईट      होती.  त्या   पोलिसांच्या    कोणत्याही   प्रश्नाचं    उत्तर    द्यायच्या  मनःस्थितीत  नव्हत्या.  पण  तपासाला  लगेच  सुरुवात  करावी    लागणार   होती. आणि दीपाविषयी   माहिती    त्यांच्याकडूनच   मिळणार   होती.  राकेशचे  वडील  थोडे   धीराचे  वाटत होते. त्यांच्याकडून   माहिती   मिळाली,  तर  तपासाला सुरूवात   करता  येईल, असा  विचार  करून   इ. पाटीलनी  राकेशच्या   वडिलांकडे  निदान  काही  प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न  केला. त्यांनाही खूप     मोठा   धक्का  बसला  होता, ते एवढे मोठे उद्योगपती, पण आज त्यांच्या ऐश्वर्याची किंमत शून्य झाली होती. पण विश्वासरावांनी पहिल्या धक्क्यातून स्वतःला थोडं  सावरलं  होतं.
  "राकेशवर विषप्रयोग झाला असावा, असं वाटतंय. त्याची  कोणाशी दुष्मनी होती  कां? " विक्रांतच्या या  प्रश्नाला  त्यांनी  सविस्तर उत्तर दिलं. ते दुःखी स्वरात म्हणाले,
    "आमचा  मुलगा  हसतमुख   स्वभावाचा  होता. त्याचा कोणी शत्रू   असेल असं  मला  वाटत  नाही. त्याला दडपणाखाली आम्ही  कधी  पाहिला नाही. त्याच्या आॅफिसपासून हे घर जवळ आहे. कधी उशीर झाला, की तो  इकडे येऊन  रहात असे. ब-याच वेळा वीक- एन्डला  मित्रांसोबत इथे येत असे.तो मजेत  अायुष्य  जगणारा   मुलगा होता.  आता  तर त्याचं  एका चांगल्या मुलीबरोबर आम्ही लग्न ठरवलं होतं. "
     "तुम्ही त्याचं लग्न ठरवत  होतात; तर ही  दीपा कोण आहे? जी  दर   आठवड्याला  राकेशबरोबर    इथे येत होती?" इन्सपेक्टरनी आश्चर्याने   विचारलं.
हे ऐकून विश्वासराव अविश्वासाच्या स्वरात म्हणाले, 
"  हे कसं शक्य आहे?  दीपा? तिच्यावर  आमच्या  राकेशचं  प्रेम  होतं;  आम्हालाही ती  पसंत  होती, दोघांचं लग्नही ठरलं होतं, पण  काही कारणास्तव     ते  लग्न मोडलं.   ती  अजून  त्याच्या   आयुष्यात  होती,  हे आम्हाला   माहीत नव्हतं. इन्स्पेक्टर! मी खरं सांगतोय तुम्हाला. राकेश लग्नाला मनापासून तयार झाला होता."
   इन्स्पेक्टरनी त्यांच्याकडून दीपाच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि तिच्या घरी  चौकशीसाठी जायला निघाले. या प्रकरणात ही दीपा महत्वाचा    दुवा आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. 
                          ********
                       ****    contd....part -9