mi shivaji park in Marathi Film Reviews by Anuja Kulkarni books and stories PDF | मी शिवाजी पार्क..

Featured Books
Categories
Share

मी शिवाजी पार्क..

मी शिवाजी पार्क..

महेश मांजरेकर यांचा ‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम या दिग्गज कलावंतांच्या भूमिका आहेत. सगळे दिग्गज एकत्र आल्यामुळे हा चित्रपट पाहतांना नक्कीच मजा येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. आता आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि तो पहायची उत्सुकता नक्कीच सिनेरसिकांमध्ये दिसून येते आहे.

समाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाज मनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाची कथा गुंफली गेली आहे. ‘न्यायदेवता आंधळी असते…आम्ही डोळस होतो’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ही टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. त्यासाठी ते कोणता मार्ग अवलंबतात, कशाप्रकारे ते अन्यायाला वाचा फोडतात आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात हे चित्रपट पाहिल्यावरच स्पष्ट होईल. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा पहायला मिळणार आहे. ‘दिलीप प्रभावळकर हे निवृत्त प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखले यांनी निवृत्त न्यायमूर्ती तसेच शिवाजी साटम यांनी पारसी व्यक्तीची भूमिका वठवली आहे. निवृत्त बँक अधिका-याची भूमिकेत सतीश आळेकर असून अशोक सराफ यांनी निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर यात साकारला आहे.

विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे आदि कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपटाचा विषय गंभीर आहे हे लक्षात येत. आपल्या माननीय न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्त्व म्हणजे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील; परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. कलम ३०२ संदर्भात तर ते अत्यंत बारकाईने आणि दहा दिशांनी तपासले जाते. का? तर कोण्या निष्पाप व्यक्तीला दंड होऊ नये. 'एका जीवाच्या बदल्यात दुसरा जीव' हे सर्वसामान्यांच्या मेंदूला पटणाऱ्या सरळ गणिताची आकडेमोड करताना वर्षे लोटतात. कोणत्याही निष्पाप व्यक्तीला न्यायव्यवस्थेकडून कायदेशीर दंड होता कामा नये याची दक्षता घेतली जाते. पण, दुसरीकडे त्या निष्पाप व्यक्तीला होणाऱ्या मानसिक दंडाचे काय? त्यात सामान्य नागरिक भरडला जातो आणि वर्षनुवर्ष लोटल्यावर न्याय मिळतो. न्यायव्यवस्थेच्या त्या आकडेमोडीत कधी अर्थकारणाचे तर कधी राजकारणाचे पारडे जड राहते. यातून निर्दोष सुटलेल्या त्या शंभर गुन्हेगारांचे काय? त्यांचे काय करायचे? त्यांना कोण दंड करणार? या सर्व प्रश्नांचे उत्तर महेश मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजी पार्क' हा सिनेमा देतो. विषय तसा खूप गंभीर आहे आणि तो तितक्याच प्रभाविपणे मांडण्यात आलेला दिसतो.

चित्रपटाची कथा-

सिनेमाच्या नावावरून तुम्हाला असे वाटेल की, 'शिवाजी पार्क' या स्थळाची ही कहाणी आहे. पण, तसे नसून ही गोष्ट आहे उतार वयाला आलेल्या पाच मित्रांची. जे शिवाजी पार्कमध्ये रोज व्यायामासाठी तर कधी गप्पा मारण्यासाठी एकत्र भेटत असतात. त्यातील एक निवृत्त न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष (विक्रम गोखले) आहे. तर एक डॉक्टर रुस्तम मेस्त्री (शिवाजी साटम), निलंबित पोलीस अधिकारी दिगंबर सावंत (अशोक सराफ), सीए सतीश जोशी (सतीश आळेकर) आणि प्राध्यापक दिलीप प्रधान (दिलीप प्रभावळकर) आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पाच मित्र कोणत्यातरी प्रकरणाचा छडा लावण्याच्या तयारीत आहेत. हे प्रकरण कोणते तर 'अन्याय' झालेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणे. आपल्यातल्या बऱ्याच जणांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा अस वाटत असत पण मन धजत नसत. नको कोर्टाची पायरी चढायला असा विचार करत असणारा सामान्य माणूस हा चित्रपट बघून झाल्यावर 'आपणही हे करू शकतो' असा विचार करेल ह्यात काही वाद नाही.


सिनेमा सुरु होतो तो या मित्रांच्या शिवाजी पार्कात रंगेलेल्या गप्पांनी आणि मित्रामित्रांमधील टोचून बोलण्यानी. तशी या पाचही मित्राची एकत्र गट्टी असली तरीही प्राध्यापक दिलीप प्रधान वगळता इतर चार मित्रांचे वैचारिक मत एकसारखे असते. आणि दिलीप प्रधान गांधीवादी दाखवले आहेत. कोणत्याही प्रश्नांचे उत्तर शांततेच्याच मार्गाने सुटू शकते; यावर त्यांचा विश्वास असतो. चित्रपट हलत असल्यामुळे कंटाळवाणा होत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन दिग्दर्शक आपल्या गोष्टीत प्रेक्षकांना लवकरात लवकर गुंफण्यासाठी पटकथेतील पुढील काही प्रसंगांमध्येच तो सिनेमाच्या मूळ विषयाला हात घातलो. त्यात सतीश जोशी या गृहस्था आयुष्यात एक घटना घडते. त्यात दोषी असलेला आरोपी पैश्यांच्या बळावर स्वतःचा जामीन करून घेतो खरा. पण, ही बाब समान विचार करणाऱ्या मित्रांना मात्र खटकते. त्यात आपल्यातीलच एका मित्रावर अन्याय होतोय म्हणल्यावर ते अस्वस्थ होतात. यातूनच स्वतः स्वतःला न्याय मिळवून देण्याचा मार्ग हे मित्र कसा काढतात? त्यातील एक निवृत्त न्यायाधीश, एक निलंबित पोलीस आणि एक डॉक्टर असल्याने आपापल्या पेश्याप्रमाणे काम वाटून घेतात. याची परिणीती म्हणजे ते न्यायालया बाहेर न्यायालय कसे स्थापन करतात? आरोप्यावर स्वतःच्या न्यायालयात चौरंगी खटला ते कसा चालवतात? आणि शेवटी त्या आरोप्याला मृतू दंड देतात की नाही? आदींची नाट्यमयता पाहणे रंजक ठरते. सिनेमाचा पूर्वार्ध थोडा विस्कळीत आणि अधिक नाट्यमय वाटला असला तरी तो प्रेक्षकांना आपल्या आसनात खिळवून ठेवतो. बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तर मिळत राहतात. चित्रपटाच्या मध्यावरच सतीश जोशीला न्याय मिळवून देण्याचा संघर्ष पूर्ण होता आणि निलंबित पोलीस अधिकारी असलेल्या दिगंबर सावंत याची गोष्ट उत्तरार्धात सुरु होते. राजकारण आणि पोलीस यंत्रणेतील आकडेमोडीमुळे स्वतःवर झालेल्या अन्यायाची दिगंबरला आठवण होते. आणि पुन्हा एकदा न्यायालया बाहेरचा कोर्ट ड्रामा शिताफीने सुरु होतो. यासगळ्यात या चार मित्रांचा पाचवा मित्र अर्थात गांधीवादी प्राध्यापक दिलीप प्रधान घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त असतो. त्याला सत्याची पाठराखण करत आपल्या मित्रांना योग्य मार्गावर आणायचे असते. आता पुढे नेमक हे कसे होते? दिगंबरला न्याय मिळतो का? आरोपीला शिक्षा होते का? गांधीवादी दिलीपचे पुढे काय होते. या प्रश्नांची उत्तर शब्दात सांगण्यापेक्षा पडद्यावर पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. चित्रपट उत्तम पकड घेतो. आणि काळजाचा ठाव घेतो. थोडक्यात म्हणजे चित्रपटाची उत्कृष्ट मांडणी ही चित्रपटाची जमेची बाजू आहे.

सिने-नाट्य सृष्टीतील पाच दिग्गज मंडळी एकत्र सिनेमात दिसणे ही प्रेक्षकांसाठी अभिनय पाहण्याची पर्वणीच आहे. सर्वांनी आपापल्या भूमिका अगदी उत्तम साकारल्या आहेत. पण, यातही आपले विशेष लक्ष वेधून घेतात ते डॉक्टर रुस्तमची भूमिका साकारलेले शिवाजी साटम. सीआयडी मधले एसीपी प्रद्युम्न हे आपल्या लक्षात राहिलेले पण त्यांना वेगळ्या भूमिकेत पाहतांना नक्कीच मजा येते. बाकीचे कलाकारांच्या अभिनयाबद्दल शंका घेण्यासारखं काहीच नाही. तसेच शरद पोंक्षे, उदय टिकेकर यांची कामे देखील चोख झाली आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच हा चित्रपट पाहावा अस वाटून जात. त्याच कारण ह्या चित्रपटाची कथा. कथा आणि पटकथा मांजरेकरांचीच असल्यामुळे त्यांना नेमक माहिती होतं काय दाखवायचे आहे आणि काय नाही. पण, तरीही सिनेमाला थोडा तडका देण्यासाठी कथानकात एक लावणी आणि मज्जेशीर गाणे गुंफले आहे. अभिराम भडकमकर यांचे सरळ सोप्पे संवाद आणि करण रावत यांची छायालेखन चांगले झाले आहे. पण, तरीही सिनेमात मुंबईतील काही प्रत्यक्ष घटनास्थळी झालेले चित्रीकरण उर्वरित छायांकनाच्या पातळीशी मेळ धरत नाही अस वाटू शकत. पण काही गोष्टी आपण सहज सोडून देऊ शकतो. आणि चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. गंभीर विषयात दिग्गज कालावातांना एकत्र काम करतांना पाहायचं असेल तर हा चित्रपट एकदा पाहावा असा नक्कीच आहे.