बधाई हो..
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या ट्विटर अकाऊंटवर बॉलिवूडकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या शुभेच्छांच्या पाठीमागचे कारण मात्र कोणालाच माहित नव्हते. शेवटी आयुष्माननेच ही आनंदाची बातमी काय आहे, हे चाहत्यांना सांगितली आहे. आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता अजूनच ताणली गेली. चाहत्यांची प्रचंड उत्सुकता ताणणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराणा याच्या बहुचर्चित 'बधाई हो' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बधाई हो'चे हे सर्व पोस्टर अत्यंत गंमतीशीर आहेत. हे पोस्टर पाहून चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. या पोस्टरमध्ये कलाकारांचं शरीर लहान आणि डोकं मोठं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट विनोदी असल्याचं प्रथमदर्शनीच जाणवतं. 'बधाई हो'च्या ट्रेलरमधील विनोदी सीन्स पाहून तर प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी आतूर झाले ह्यात काही शंका नाही.
चित्रपट: बधाई हो
निर्माता: विनीत जैन, आलेया सेन, हेमंत भंडारी, अमित रवींद्रनाथ शर्मा
सहनिर्मिती: प्रीती शहानी
दिग्दर्शक: अमित रवींद्रनाथ शर्मा
कलाकार: आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव,शार्दूल राणा, सुरेखा सिक्री
लेखक: अक्षत घिलडीआल, शंतनू श्रीवास्तवा
पटकथा आणि संवाद: अक्षत घिलडीआल
संगीत: तनिष्क बागची, रोचक कोहली, कौशिक-आकाश गुड्डू (जॅम ९), सनी बावरा-इंदर बावरा
गीतकार: वायू, मेलोडी, कुमार
'बधाई हो' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात घरात एक गोंडस पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या डायलॉगपासून होते. हा डायलॉग सामान्य जरी असला, तरी चित्रपटात तो वेगळ्याप्रकारे दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेवढा हसवणारा आहे, त्याचप्रकारे या टायटल ट्रॅकमध्येही अनेक गमती जमती पाहायला मिळतात. या चित्रपटात चक्क आयुष्मानची आई गरोदर होते. यावेळी त्याच्या कुटुंबाची कशी धांदल उडते आणि आयुष्मानवर कसा शुभेच्छांचा वर्षाव होतो, हे पाहायला मिळणार आहे. थोडक्यात काय, एक गंभीर विषय हलक्या फुलक्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
'कुणीतरी येणार येणार गं’ हे गाणे नवदाम्पत्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. नव्या पाहुण्याच आगमन ही प्रत्येक जोडप्यासाठी विशेष असते. ही गोड बातमी कळली की संपूर्ण घर आनंदून जाते. होणाऱ्या आईची घरात सर्वतोपरी काळजी घेतली जाते. तिचे डोहाळे पुरवले जातात. बाळाच्या येण्याच्या बातमीने सगळेच कल्पनाविश्वात रमून जातात. पण, बाळाच्या येण्याची ही चाहूल जर पन्नाशीला आलेल्या जोडप्याला लागली तर? अस झाल तर अर्थात अशा परिस्थितीत सर्वांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. हाच दृष्टिकोन वेगवेगळ्या पैलूंमधून बघायला मिळतो तो अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ या सिनेमातून. सिनेमातल्या चोवीस वर्षीय नायकाची आई गरोदर होते, या प्रसंगावर घरच्यांसह मित्रपरिवार, शेजारी, नातेवाईक या सगळ्यांमध्ये चर्चा होते, या चर्चेचा सामना ते कसा करतात, त्यातून ते कसे बाहेर पडतात ही सगळी कहाणी ‘बधाई हो’ या सिनेमातून पुढे येते आणि विचार करायला भाग पाडते. विषय वेगळा आहे आणि तो प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडला आहे. हेच ह्या चित्रपटाच यश आहे. वरवर बघता चित्रपटाचा विषय मध्यवयीन जोडप्याची प्रेमकहाणी, लैंगिक जीवन असा आहे, असे वाटेल. पण हा मुद्दा ह्या चित्रपटात अधोरेखित झालेला नाही. त्याहूनही तो इतर बऱ्याच गोष्टींकडे लक्ष वेधतो. हा चित्रपट एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे त्याचे सादरीकरण क्लिष्ट न करता अतिशय साध्या-सोप्या पद्धतीने केले आहे. त्यात कोणत्याही प्रकारची भाषणबाजी नाही की संदेश दिलेला नाही. नाहीतर चित्रपट कंटाळवाणा बनू शकला असता. ह्या चित्रपटात जे काही सांगायचे आहे ते त्याच्या संवादामधून वेळोवेळी समोर येतेच. तरीही गंभीर विषयाच्या साध्या सुटसुटीत मांडणीचा ‘बधाई हो’ हा सिनेमा वेगळा ठरतो. आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अस वाटत आहे. म्हणल तर गंभीर म्हणल तर विनोदी असा हा चित्रपट वेगळा आहे.
चित्रपटाची कथा-
नवी दिल्लीतील सादिक नगरातील सरकारी क्वार्टर्समध्ये कौशिक कुटुंब राहत असते. जितेंद्र कौशिक (गजराज राव) रेल्वे तिकीट कलेक्टर असून स्पष्ट बोलणारी प्रियंवदा कौशिक (नीना गुप्ता) ही त्यांची पत्नी. प्रियंवद घरी सासूचा (सुरेखा सिक्रि) सांभाळ करत असते. मुलगा गुलार (शार्दूल राणा) घरात सगळ्यात लहान असल्याने सगळ्यांचे त्याला अधिक प्रेम मिळत असते. तर मोठा मुलगा नकुल (आयुषमान खुराना) एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचा त्याचा प्रयत्न असतो. रेनी (सान्या मल्होत्रा) ही नकुलची गर्लफ्रेंडसुद्धा एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असते. आणि एके दिवशी अचानक नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी कळते. आणि मग होणाऱ्या गमती-जमती ह्या चित्रपटात
कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपट चालतो. ह्या चित्रपटात हेच पाहायला मिळते. गजराज राव आणि नीना गुप्ता यांनी अभिनयाच्या पीचवर जबरदस्त बॅटिंग केली आहे. जबाबदार वडील म्हणून गजराज यांनी निभावलेली व्यक्तिरेखा चोख जमलेली आहे. काही ठिकाणी शब्दांची गरज नसते तिथे फक्त हावभाव काम करून जातात. त्याचप्रमाणे सिनेमातल्या काही प्रसंगात ते केवळ हावभावांवरुन कमाल दाखवतात. त्यांना एकही संवाद नसला तरी ते काही प्रसंगांमध्ये प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करतात. आणि नीना गुप्ता यांनीही आईची भूमिका चोख बजावली आहे. त्यांचा सहज अभिनय आजवर आपण अनेक कलाकृतींमधून पाहिलेला आहे. तीच मजा त्यांनी याही सिनेमात आणली आहे. गृहिणी म्हणून येत असलेले अनुभव, तिचे भावनाविश्व, तिचे व्यक्त होणे हे सगळे नीना यांनी अभिनयातून अगदी सहज दाखवलं आहे. आयुषमान खुराना नेहमीच त्याच्या भूमिकांना न्याय देतो. त्याचे सगळेच चित्रपट उत्तम असतात. त्याचा अभिनय सुद्धा वाखाखण्यासारखा झाले आहे. रोडीज ते चित्रपट अश्या प्रवासात आयुष्मानने त्याची उत्तम बाजू दाखवली आहे. चित्रपटात, नकुलचे स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं, त्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड, घरात गरोदर असलेली आई या सगळ्या भावनांची मनात झालेली गर्दी त्याने बिनचूक दाखवली आहे. त्याची संवादफेक कमाल आहे. सान्या मल्होत्रानेही दंगल मधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली होती आणि ह्या चित्रपटात रेनी उत्तम साकारली आहे. या सगळ्यात घरातली आजीची भूमिका साकारणाऱ्या सुरेखा सिक्रि मात्र भाव खाऊन जातात. सुरेखा सिक्रि ह्यांनी टिव्ही ते मोठा पडदा, आजवर अनेक भूमिका केल्या आहेत आणि प्रत्येक भूमिकेला त्या न्याय देतांना दिसातत.
ह्या चित्रपटाचा विषय तसा गंभीर! जास्ती न बोलला जाणारा. गंभीर विषयाची साध्या मांडणी हे चित्रपटचे यश आहे. गंभीर विषय असलेल्या चित्रपटात गाणी बसवणे हे खरंतर आव्हान असते. पण, दिग्दर्शकाने तिथेही बाजी मारली आहे. परिस्थितीला साजेशी गाणी पटकथेत पेरली आहेत. खरे तर या सिनेमाची कहाणी नकुल आणि रेनीची आहे असे प्रथमदर्शी वाटेल. पण, सिनेमा कौशिक आणि प्रिंयवदा यांच्या भोवती अधिक फिरतो. तेच सिनेमाच्या कथेचे बलस्थाने आहेत. दिग्दर्शकाला जे म्हणायचे होते ते त्यांने प्रामाणिकपणे आणि साधेपणाने मांडले आहे. इकडेच दिग्दर्शक अमित आणि त्याची कथा सर्वांपासून वेगळा ठरतो. सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन पाहता येईल असा हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट एकदातरी पाहावा. हा चित्रपट पाहून काहीतरी वेगळ पहिल्याचा अनुभव आणि चित्रपट पाहिल्यावर चेहऱ्यावर हसू देखील नक्की येईल.
मध्यमवयीन पालकांच्या लैंगिक जीवनावर उघडपणे भाष्य फारसे होताना दिसत नाही. खरे तर त्याविषयी बोलणे, त्याविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पण याबद्दल आपल्याकडे आजही दुर्लक्षच होते. पण दिग्दर्शक अमितने अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सिनेमाचे प्रोमो बघून सिनेमा विनोदी असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी त्यातील मर्म समजून घ्यायला हवे. हे समजून घेतलं तर सामान्य कुटुंबामधील मध्यमवयीन दाम्पत्य प्रेम करू शकत नाही का, या प्रश्नाचे उत्तर या सिनेमातून नक्कीच मिळेल. 'बधाई हो' हा सिनेमा आज १८ ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. वेगळा विषय वेगळ्या अंदाजात मांडण्यात आल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल.