आर्या आशुतोष जोशी
गप्पा दोन गणपतींच्या.....
गजानन , विनायक, हेरंब, अमेय आणि गणेश हे पाच जण एकमेकांचे घट्ट मित्र होते.
गणेशोत्सव संपला आणि हे सगळे गणपतीबाप्पा आपापल्या घरी परत आले. भरपूर मोदक खाऊन गलेलठ्ठ झाले होते सगळेच, आधीच मोठ्ठं पोट ते आणखीनच मोठ्ठं झालं होतं. आईने घरून निघतानाच सांगितलं होतं की “ मोदक आवडतात म्हणून तेच खाऊ नका.” पण ऐकतील तर ते बाप्पा कसले! पण ते ही तुमच्यासारखेच छोटे. डोळ्यावर येणारे केस बांधून पार्वती आईने त्यांचा छान डोक्यावर मुकुट बांधून दिला होता. कोणी त्यावर मोरपीस लावलं होते तर कुणी छान फूल. कुणी छान अंगरखा घातला होता तर कुणी घाईत तसेच उघडेबंबूच पृथ्वीवर धावत सुटले होते!!! भक्तांच्या हाकेला ओ देऊन भक्तांना भेटण्यासाठी ते ही आतुर झाले होते. उंदीरमामाही उत्सुक होते घराघरातल्या तुमच्यासारख्या छोट्या मित्र मैत्रिणीना भेटायला.
पृथ्वीवर भरपूर मजा केल्यावर आता कैलासावर परतल्यावर बाबांनी आणि कार्तिकेय दादाने फर्मानच काढला. चला .... नुसता बसून होतास आता जरा हालचाल करा. व्यायाम करा. मग सगळे बाल गणपती मित्र आपापल्या हातात बेट आणि उंदीरमामा तोंडात चेंडू घेऊन मैदानावर जमले. थोडावेळ मस्त क्रिकेट खेळले मिळून. अंपायर म्हणून नंदीकाकाला उभं केलं होतं. …
खेळून दमल्यावर बाकी तीन मित्र घरी गेले पण अमेय आणि गणेश तिथेच गप्पा मारत बसले. त्यांच्या उंदीरमामांनी तेवढ्यात डुलकी काढून घेतली. अमेय म्हणला “ मी गेलो होतो मुंबईत , एका घरात. तिथे आपल्यासारखेच छोटे भाऊ बहीण होते. मोठा दादा आणि छोटी ताई. खूप मज्जा वाटली मला त्यांना पाहून. मी ज्या काकांच्या दुकानात बसलो होतो तिथे ते मला घ्यायला आले होते मोठ्या थंडगार गाडीतून. छान मस्त रंगीत कपडे घालून त्यांचे आईबाबा पण आले होते. मला त्यांच्या मोठ्या घरात घेऊन गेले. गाडीतून जाताना मला आपले खूप नवे दोस्त दिसले. त्यात काही आपले मोठे दादाही होते मुकुट घातलेले. ते उगीचच आमच्यावर दादागिरी करत आहेत अस पण वाटलं मला! पण तेही छान नटून आलेले होते. मला न तुमची सगळ्यांची खूप आठवण आली.घरात भरपूर फुलांची आरास केली होती. घर सजवलं होतं फुलांनी. मला रात्री उत्सुकतेने झोपच नाही आली की या छान घरात उद्या आपल्याला काय काय गंमत मिळणार या कल्पनेनेच. पण कसलं काय! त्या घरातली काकू उशीरा उठली. एक मावशी आल्या आणि त्यांनी घर आवरलं. मुलांचा
बाबा रात्री काम करत बसला होता त्यामुळे तोही लवकर उठला नव्हता. मला खूप भूक लागली होती पण करणार काय मी तरी??
कधीतरी उशीराने त्या सगळ्यांची तयारी झाली. छान कपडे घालून मुलं आली. माझी पूजा झाली. केवढं सोनं आणि चांदी माझया अंगावर. मोदक चांदीचा! तो खाऊन माझं पोट कसं भरणार रे ! मग दुपारी कधीतरी त्या सकाळी आलेल्या मावशी डब्यांमधून खाऊ घेऊन आल्या ! प्लॅस्टिक बंद आहे न आता त्यामुळे डबे न्यायला लागले घरातून असं काहीतरी म्हणत होत्या! मोदक , पोळी , भाजी , वरण,भात सगळं आलं त्या डब्यातूनच ! त्या काकूंना बहुतेक स्वयंपाक करता येत नसेल अरे !!!
मला वाटलं की मुलं आता बसतील जेवायला माझ्याबरोबर! पण नाही… जेवणाची ताटे हातात घेऊन टीव्हीवर आपलाच सिनेमा पाहत बसली होती... बालगणेश... आणि मला ठेवलं एकटाच बसवून !!! मला खूप रडू यायला लागलं. एकटं वाटायला लागलं. नंतर ते सगळे जेवून कुठल्याशा खूप गर्दी असलेल्या मोठ्ठया गणपतीला भेटायला जाणार होते लाल रंगाच्या बागेत!!! आणि गेलेही. मग त्या मावशीही गेल्या मला कुलूप लावून. मला कित्ती एकटं वाटलं, उंदीरही म्हणाला “बापुड्या चल जाऊया” नको वाटतय इथे. पण मी त्याला म्हटलं की भक्त आहेत ते माझे. ते वेडे असले तरी मी शहाणा आहे न!” राहिलो आम्ही दीड दिवस. दुस-या दिवशी त्या मुलांच्या घरात मोठे चौकोनी खोके आले. त्यात छान रंगीबेरंगी पोळी होती जाडसर. सगळ्यांनी खाल्ली. माझ्यासाठी त्या कालच्या मावशी येऊन थोडासा वरणभात आणि खीर करून गेल्या घरी परत.
रात्री आजूबाजूला खूप जोरात आवाज येत होते. गाणी वाजत होती. ढोल वाजत होते. गणपतीची गाणी वाजत होती. उंदीरमामा जाऊन पाहून आला खिडकीतून डोकावून तर काय ! लोक कसेही हातवारे करीत नाचत होते, काहीजण तर नाचता नाचता पडत होते. कुठल्याशा बाटलीतून काहीतरी पेय पीत होते. फटाक्यांचा आवाज आणि धूर ! नाकला तो वास सहनच होईना बंद घरातसुद्धा ! आजूबाजूला कुठेकुठे लहान मुले नाचत होती, गाणी म्हणत होती, संगीतखुर्ची का काहीतरी खेळ खेळत होती. ते ऐकून जरा बरं वाटलं तेवढंच! इकडे येताना समुद्राचा भणाणता वारा प्यायलो आणि इतका अनांद झाला. वाटेत काही मोठे उंच उंच दादा होते आपले. ते दिसले, भेटले, आम्हाला त्यांनी टाटा केला. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कधी येणार घरी? तर ते म्हणाले की अजून आठ दिवसांनी! आणि आमची तर फारच तब्येत बिघडून जाते. घरी येताना हे लोक काहीवेळा आमचे हातपाय पण तोडतात ! भयंकर लोक आहेत हे ! गणेश म्हणाला " अरे बापरे". मग त्यांना खूप जखमा होत असतील न ! "" असा लोकांना चांगलाच ठोक दिला पाहिजे आपण . उगीचच लाड करतो आपण आपल्या भक्तांचे. " अमेय म्हणाला हो ना रे . एक दादा मला म्हणाला की पहा वेळीच सावध व्हा. आम्ही मोठे झालो तसे तुम्हीही मोठे होणार आणि हे लोक तुम्हाला पण असाच त्रास देणार "! समुद्रात ढकलून देणार ! उगीचच दिवस रात्र मिरवणूक काडून तुमच्यासमोर नाचत बसणार ! ऐकून वैतागलोच मी पण तुम्हाला भेटायला येणार होतो न मी परत. त्या आनंदात विसरलो ते सगळं ते आता आठवलं. पुन्हा यांच्या घरी , यांच्या शहरात जायचं नाही अस पक्क ठरवलं मी!”
अर्थात सगळेच असे असतील असे नाही , काही भक्त खूप प्रेमळही असतात. आपली खूप काळजी घेतात. .... तरीही आपल्याला सावध रहायला हवं.
गणेश म्हणाला,” अरे मग मी तर खूप मज्जा करून आलो. मी कुठे गेलो होतो माहिती आहे का? टुमदार कौलारू घरात! छोटुकल्या गावात, कोकणात ! खूप माणसांनी घर भरलं होते. माझ्या स्वागतासाठी त्या गावात मुंबईतून माणसं आली होती भरपूर. खूप सारे काका, काकू, आजी , आजोबा आणि खूप खूप मुलं. मला तिथे पोहोचल्यावर इतकं भारी वाटलं अरे ! मला न त्या घरातल्या एका काकांनी पाटावर ठेवलं. आणि तो पाट डोक्यावर घेतला. मला वाटलं की मी पडणार आता. उंदरुही घाबरला. पण काहीही झालं नाही. नंतर तर मला पण नाच करावासा वाटला. हिरवेगार भाताची शेती, नारळाची आणि सुपारीची झाडं, पाटाच्या पाण्याचा आवाज , भुरभुरून गेलेला पाऊस, कमाल वाटत होते! टाळ वाजवत सगळे निघाले. तुला भेटले तसे मलाही आपले दादालोक भेटले तिथेपण. घरात गेल्यावर एका काकूंनी माझं स्वागत केलं. माझी दृष्ट काढली! रांगोळी, झावळ्यांचा मंडप, गाणी लावलेली, मुलं बागडत होती. तेरड्याचा फुलांची आरास, खूप सारा खाऊचा दरवळणारा वास. अहाहा , आठवलं तरी छान वाटतय! सगळे रात्रभर गप्पा मारत बसले, एकत्र जेवले. सकाळी पूजा झाली छान. मलाही प्रसन्न वाटलं. जोराजोरात आरती झाली, मलाही खर नाचायचा मोह आवरेना ! मग लोक जमायला लागले टाळ पखवाज घेऊन भजने म्हणत होते घराघरात जाऊन. आणि बालगोपाल तर काय माझया अवतीभवतीच होते सारखे. कुणी उदबत्ती लावली तर कुणी माझया हातावर छोटुकला तळलेला मोदक आणून ठेवला आणि लगेचच स्वतः गट्ट केला. घरात भाकरी, भात आमटी करण्यात सगळ्या काकू आजी दंग होत्या. धम्माल केली रे मी फारच! मला न परत यावस वाटेना तिथून. वाटायचं की तुम्हा सर्वाना पण इथे बोलावून घेऊया. दिवसभर जोरजोरात गाणी वाजत रहायची पण ठीक आहे, तेवढं चालायचंच! माझ्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं सगळ्यांना !!! शेवटच्या दिवशी निघताना मला रडूच आलं. पुढच्या वर्षी लवकर येतो असं सांगूनच आलो आहे मी त्यांना!
ते सगळं ऐकून अमेय म्हणाला “गणेश आपण असं करूया का ? तू मला पण नेशील तुझ्याबरोबर पुढच्या वर्षी तिथे त्या गावात, त्या लोकांनी भरल्या- गजबजलेल्या घरात??? जिथे सगळेजण माझा आदर करतील आणि माझ्याबरोबर वेळ घालवतील?
गणेश म्हणाला आपण असं करूया. आपल्या बाकीच्या मित्रांना बोलावून एक मीटिंग ठरवूया. आणि सर्वाना हे सांगूया. प्रत्येकाच्या पोटात भरपूर मोदक आहेत तसेच अनुभवाच्या पिशवीत खूप अशा गंमतीजमतीहीआहेत, चांगल्या आणि काही वाईटही. सर्वानी मिळूनच ठराव करूया...
अमेय आणि गणेशने तर ठरवलं आहे की पुढच्या वर्षी काय करायचं? पण आपण काय करूया रे सगळे? ज्यामुळे गणेशला अनुभवायला मिळाली तशीच मज्जा आणि आनंद बाकीच्याही बाळ गणपतींना मिळेल? कारण तेही आपल्यासारखेच छोटे आहेत न? आणि आपल्या आई, बाबा, आणि दादाला सोडून ते फक्त आपल्याला भेटायला येतात न दहा दिवस ???