एकच प्याला
(मराठी नाटक)
अंक चवथा
साहित्यिक = राम गणेश गडकरी
अनुक्रमणिका
१.अंक चवथा
१.१प्रवेश पहिला
१.२प्रवेश दुसरा
१.३प्रवेश तिसरा
१.४प्रवेश चवथा
१.५प्रवेश पाचवा
***
अंक चवथा
प्रवेश पहिला
(स्थळ: रामलालचा आश्रम. पात्रे: शरद् व रामलाल.)
शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुणास कळे!
रामलाल : कोणता श्लोक?
शरद् : हा, 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्...
रामलाल : वा:, फारच रमणीय श्लोक! काव्याच्या ऐन उत्कर्षात भगवान् कालिदासांनी इथं तत्त्वज्ञानाचा परमावधि साधलेला आहे! दशावतारांतला श्रीकृष्णाचा आठवा अवतार आणि रघुवंशातला हा आठवा सर्ग, मला नेहमी समानस्वरूपाचे वाटतात. त्या अवताराचा पूर्वार्ध राधाकृष्णांच्या लीलाविलासांनी परिपूर्ण, तर उत्तरार्धात योगेश्वर कृष्ण गीतेसारखी उपनिषदं गात आहेत! इकडे या सर्गाच्या प्रारंभी भौतिकभाग्याची समृद्धी असून पुढं करुणरसात उतरून परमवैराग्यात शेवट झालेला आहे. भारतवर्षीय राजर्षीच्या सात्त्विक संसाराचं संपूर्ण चित्र या एकाच सर्गात कविकुलगुरूनं रेखाटलं आहे! ऐक, तुझ्या श्लोकाचा अर्थ- 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्'- मरण हा सदेह प्राणिमात्राचा स्वभाव आहे; 'विकृतिर्जीविमुच्यते बुधै:'- जिवंत राहणं हे सुज्ञ लोकांना अपवादरूप वाटतं! 'क्षणमप्यवतिष्ठते श्वसन' आणि म्हणून क्षणभरच जरी जीवित लाभलं, तरी 'यदि जन्तुर्न तु लाभवानसौ'- तो प्राणी भाग्यशाली नाही काय? जीवमात्राचा जन्म केवळ एकरूप आहे; परंतु मरणाला हजार वाटा आहेत. एवढयासाठीच या संसाराला मृत्यूलोक म्हणतात! परिस्थितीकडे विचारपूर्वक पाहिलं तर मरणाच्या इतक्या हजारो कारणांतून आपण क्षणमात्र तरी कसे वाचतो, याचं प्रत्येकाला मोठं आश्चर्य वाटेल! आणि म्हणून इथं म्हटलं आहे की, पदरात पडलेल्या पळापळाबद्दल आनंद मानून भावी कलाकडे आपण उदासीन दृष्टीनंच पाहिलं पाहिजे!
शरद् : श्वासमात्रानं जगण्याचा जो क्षण लाभेल त्याबद्दल आनंद मानावा, हे कवीचं म्हणणं तुम्हाला खरं वाटत असेल कदाचित! पण भाईसाहेब, असे दु:खीकष्टी जीव या जगात किती तरी सापडतील, की ज्यांना शंभर वर्षांचं दीर्घायुष्यसुद्धा शापासारखं वाटेल!
रामलाल : (स्वगत) हिंदू समाजातल्या बालविधवेच्या या प्रश्नाला कालिदासाच्या बुद्धिमत्तेनंसुद्धा उत्तर देणं शक्य नाही! (उघड) शरद्, सुदृढ आणि उदार विचारशक्तीनं ज्या वेळी समाज सर्व कार्य करीत होता आणि धीरगंभीर नीतिमत्ता ज्या वेळी क्षुद्रवृत्ती झालेली नव्हती, त्या कालाला कालिदासाची ही उक्ती समर्पक होती! त्या वेळी जीविताचा प्रत्येक क्षण सुखमय होता! हाच सर्ग पाहा! किती रमणीय सुखाचं वर्णन आहे यात! यातलं इंदूमतीचं मरणसुद्धा मनोहर आहे! दिव्य सौंदर्यालाच मुक्ती देण्यासाठी या आर्य कवीनं स्वर्गातल्या पारिजात पुष्पासारख्या कोमल शस्त्राची योजना केली आहे आणि आज राक्षसी रूढीच्या आहारासाठी असली नाजूक फुलं तापल्या तव्यावर परतून घेण्याची नीतिमत्ता निर्माण झाली आहे! शरद्, तुझ्यासारखी सुंदर बालिका वैधव्याच्या यातना भोगताना पाहिली म्हणजे आर्यावर्ताच्या अवनत इतिहासाची दीन मूर्तीच आपल्यापुढं उभी आहे, असं वाटायला लागतं! सौंदर्य कोणत्याही स्थितीत आपली नाजूक शोभा सोडीत नाही! सौंदर्याला वैधव्याचा अलंकारसुद्धा करुण शोभाच देतो! शरद्, पुनर्विवाहाबद्दल आम्ही तुला सर्वजण आग्रह करीत असताही (तिच्या पाठीवरून हात फिरवीत) बेटा, अजून तुला- (स्वगत) हिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर असा खरखरीत काटा का बरं उभा राहिला? हा अनुभव अगदी नवीन- पण नको हा अनुभव! माझा हात सारखा थरथर कापत आहे! (तिच्या पाठीवरून हात काढतो. शरद् रामलालकडे पाहते.) अशा चमत्कारिक दृष्टीनं का पाहतेस माझ्याकडे? बेटा, तुझ्या बापानं तुझ्या पाठीवर असा हात ठेवला नसता का?
शरद् : हाच हात ठेवला असता; पण असा चपापून काढून घेतला नसता! भाईसाहेब, तुम्हाला तुमच्या मनात विकल्प आल्यासारखं वाटलं! असं काहीतरी भलतंच तुम्हाला वाटलं! भाईसाहेब, खरं सांगा. काही तरी वेडंबिद्रं मनात आलं ना? बोला हो-
रामलाल : तुझ्याजवळ खोटं मी अजून कधी सांगितलं नाही; माझ्या मनात वेडंवाकडं काहीएक आलं नाही! मनाला जरासं असं मात्र वाटलं-
शरद् : की, जसं बापाला मुलीच्या पाठीवरून हात फिरविताना वाटत नाही, किंवा भावाला बहिणीच्या पाठीवरून हात फिरविताना वाटत नाही!
रामलाल : शरद्, शरद्, असं तीव्र भाषण करू नकोस.
(राग- मालकंस; ताल- झपताल. चाल- त्याग वाटे सुलभ.) सोडि नच मजवरी वचनखरतशरा। दग्ध करिसी तये हाय। मम अंतरा॥ ध्रु.॥ स्मृति काय पूर्वीची। लोपली आजची। केवि तव मति रची। कल्पना भयकरा॥ 1॥
ईश्वरसाक्ष सांगतो की, भलती भावना माझ्या मनात मुळीच आली नाही! का कुणाला ठाऊक, मला जरा- अगदी नाहीच म्हणेनास- जरा चोरटयासारखं मात्र झालं!
शरद् : आता माझ्यापासून काही चोरून- स्वत:पासून काही चोरून ठेवू नका!
(राग- जीवनपुरी; ताल- त्रिवट. चाल- पिहरवा जागो रे.) खर विषा दाहाया हृदया या का वर्षिता॥ ध्रु.॥ जे स्रवत सुधा। वदन हे सदा। हलाहल ते वमते आता॥ 1॥
भाईसाहेब, होऊ नये ते झालं! आज माझा आधार तुटला! माझे बाबा वारले तेव्हापासून दादांनी मला सांभाळली! त्या दिवशी दादानं- माझं नशीबच फुटलं हो! तिथून तुम्ही मला सांभाळलं! आज देवानं माझ्यावर अशी वेळ आणली! भाईसाहेब, इतके दिवस या जगात तुम्ही माझ्याजवळ बापासारखे उभे होता! तुमच्या जिवावर मी निर्भयपणानं वागत होते! आणखी आज असं- भाईसाहेब, बाबा वारले त्या वेळी मला कळत नव्हतं म्हणून मी रडले नाही! तेवढयासाठी आज देवानं ते संकट माझ्यावर पुन्हा आणून मला जाणतेपणानं रडायला लावलं! आज मी पोरकी झाले!
(राग- बेहागडा; ताल- त्रिवट. चाल- चरावत गुंय्यां.) जगी हतभागा। सुखी चिर असुख॥ ध्रु.॥ जनके त्यजिता। लाधे दुसरा। ये विनाश त्या। माते जधि विधी विमुख॥ 1॥
रामलाल : शरद्, काय हे वेडयासारखं करतेस? नुसता माझा हात - तुझ्या मानलेल्या बापाचा- तुझ्या अंगाला लागताच-
शरद् : नाही हो! रामलाल, हा बापाचा हात नाही! मुलीला बापाचा हात अगदी आईच्या हातासारखाच- जरासा राकट- देवाच्या पाषाणमूर्तीच्या हाताइतका राकट असतो! तुमचा हात बापाचा हात नव्हता! हा पुरुषाचा हात होता! मुलीच्या दृष्टीला बाप पुरुषासारखा दिसत नाही; तर देवासारखा निर्विकार दिसतो! बापासमोर मुलगी मोकळेपणानं वागते! आज माझा तो मोकळेपणा नाहीसा झाला! आज माझे वडील मला अंतरले! आज तुम्ही माझ्यासमोर तरुण पुरुष म्हणून उभे आहात आणि मी तुमच्यासमोर तरुण स्त्री म्हणून उभी आहे! स्त्रीनं पुरुषासमोर वागताना सावधगिरीनं राहायला पाहिजे. भाईसाहेब, आजपर्यंत तुमच्या जिवावर जगातल्या पुरुषांत मी सुरक्षितवृत्तीनं वावरत आले! आज माझा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली! भाईसाहेब, मी आता विश्वासानं कुणाच्या तोंडाकडे पाहू हो?
रामलाल : काय? एवढयानंसुद्धा तुझा माझ्यावरचा विश्वास उडाला?
(राग: वसंत; ताल- त्रिवट. चाल- जपिये नाम जाकोजी.) गणिसी काय खल माते, अलंकार केवळ कुजनांते। न विश्वासलव योग्य जयाते॥ ध्रु.॥ वद का स्मरसी चिरसहवासी। घडली कृती अनुचित या हाते। जनकधर्म कधी त्यजि काय सुते॥ 1॥
शरद् : एका क्षणात उभ्या जन्माचा विश्वास उडाला! भाईसाहेब, बायकांच्या मनात धास्ती बसायला वेळ लागत नाही! पदराच्या वाऱ्यानंसुद्धा बायकांचं हृदय हादरायला लागतं!
(राग- गरुडध्वन; ताल- त्रिवट. चाल- परब्रह्ममो रघु.) ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा॥ ध्रु.॥ सृजनि त्याच्या विधी तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम॥1॥
भाईसाहेब, जाते मी आता. माझ्यानं तुमच्यासमोर उभं राहवत नाही!
रामलाल : थांब शरद्, आण तो 'रघु' इकडे! त्यातले चार श्लोक वाच म्हणजे झालेल्या प्रकाराबद्दल तुझ्या मनाला अंमळ विसर पडेल!
शरद् : आता वाचणं नको, काही नको! काही केल्या माझ्या मनातली भीती मोडायची नाही! तुमच्याकडे पाहायचासुद्धा मला धीर होत नाही! जाते मी आता! देवा, काय रे केलेस हे (जाऊ लागते.) हे पाहा, भगीरथाच्या बरोबर मी दादाच्या घरी एकदा-
रामलाल : भगीरथ कशाला? मीसुद्धा- तुझी तशी इच्छा असेल तर तुला घेऊन जाईन तिकडे. पण थांब. शरद्, तुला एक विनंती करायची आहे.
शरद् : काय? सांगा लवकर.
रामलाल : ही हकीकत कुणाजवळ- भगीरथाजवळसुद्धा- बोलणार नाहीस ना?
शरद् : नाही.भगीरथांना नाही का ऐकून वाईट वाटणार? (जाते.)
रामलाल : माझ्या मनाची काय स्थिती झाली ती माझी मलाच कळत नाही! काय भलतंच झालं हे! शरद्, मी खरोखरीच अपराधी आहे किंवा नाही, हे नीट समजून घेतल्यावाचून तू विनाकारण दोष दिलास- पण तिनं दोष का देऊ नये? माझं मन खरंच चलित झालं आहे की- छे:, मला काहीच सुचेनासं झालं आहे! परमेश्वरा, माझा मार्ग मला नीटपणे दाखवायला तुझ्याखेरीज दुसरा कोण समर्थ आहे? (जातो.)
प्रवेश दुसरा
(स्थळ: सुधाकरचे घर. पात्रे: सिंधू कागदाच्या घडया पाडीत आहे, मागे सुधाकर उभा आहे. इतक्यात गीता येते.)
सिंधू : या गीताबाई, बसा अंमळ, एवढे चार कागद मोडायचे राहिले आहेत. जरा वेळ झाला तर चालेल ना?
गीता : सावकाश होऊ द्या! मी लागू कागद मोडायला?
सिंधू : नको. गीताबाई, माझी शपथ आहे! अगदी नको!
गीता : बाईसाहेब, का बरं नको म्हणता? नेहमी तुमचं असंच! मी जरा हात लावू लागले म्हणजे मोडता घालता लागलीच!
सिंधू : गीताबाई, तिकडच्या पायांवर हात ठेवून मी शपथ घेतली आहे ना, की, दुसऱ्यााची काडी म्हणून घरात येणार नाही अशी! दुसऱ्यााचे कष्ट आम्हाला अगदी वर्ज्य आहेत!
गीता : बाईसाहेब, काय म्हणू मी तुम्हाला? तुम्ही असे कष्ट करायचे आणि आम्ही धोंडयासारखं जवळ बसून ही डोळेफोड करायची! माझ्या जिवाला काय वाटत असेल बरं?
सिंधू : गीताबाई, आमच्यासाठी तुम्ही थोडं का करता आहात? उभा गाव पायाखाली घालून छापखान्यातून हे कागद मोडायचं काम घेऊन येता, हे तुमचे थोडे का उपकार आहेत? असं कोण कुणासाठी खपत असतं?
(राग- पहाडी- गज्जल; ताल- धुमाळी. चाल- दिलके तु हान.) मज जन्म देइ माता। परि पोशिले तुम्ही॥ निजकन्यका गणोनी। न काही केले कमी ॥ ध्रु.॥ उपकार जे जहाले। हिमाद्रितुंगसे। शत जन्म घेउनी ते। फेडीन काय मी॥ 1॥ सदया मनासि ठेवा। अपुल्या असे सदा। उपकारबध्द तनया। तुमची पदे नमी॥ 2॥
गीताबाई, असं काम रोज कुठून आणलंत म्हणजे किनई तुमचे डोंगराएवढे उपकार होतील आमच्यावर.
गीता : ते पण समाधान मेल्या देवानं ठेवलं नाही! आज काम आणण्यासाठी सारा गांव हिंडले; पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही! कायसा म्हणजे लढाईमुळे कागदाचा तुटवडा पडला आहे, अन् म्हणून कामच निघत नाही मुळी!
सिंधू : आता कसं बरं करायचं पुढं?
गीता : त्याच विवंचनेत मी पडले आहे कालपासून! कुठ्ठं कुठ्ठं काम म्हणून कसं ते नाही! देव अगदी अंतच बघायला बसला आहे जसा!
सिंधू : गीताबाई, आपलं दैव खोटं; देवाला काय वाकडं लावायचं तिथं? बरं, छापखान्यातून नसू दे मेलं! दुसरं कसलं काम नाही का मिळण्यासारखं काही?
गीता : दुसरं कसलं बरं काम पाहावं?
सिंधू : कुठलं का असेना, आपलं घरातल्या घरात होण्याजोगं काही काढा म्हणजे झालं! काय बरं बघाल? हो गडे, दळण नाही का कुणाकडचं मिळायचं? ते आपलं बरं, घरच्या घरी करायला-
गीता : अगंबाई, दळण? बाईसाहेब, भलतंच काय सांगितलंत हे?
सिंधू : त्यात काय झालं एवढं चपापायला, अशा का बघता आहात?
सुधाकर : (स्वगत) सिंधू, सिंधू, कोणत्या देवानं तुला बोलायला शिकवलं हे?
गीता : मोलानं दळण्याचं काम का तुमच्यासारख्यांनी करायचं? नवकोटनारायण तुमचे वडील, लक्षुमीशी सारीपाट खेळण्यात तुमचा जन्म गेला; आणखी आता हे काम करायचं?
सिंधू : हं! अर्ध्या डावावरून लक्ष्मी उठून गेली आणि आपल्या हाती कवडया राहिल्या! आपला हातगुण, त्याला कोण काय करणार? दोनप्रहर टळायला तर पाहिजे! ज्यांचे ते बघायला समर्थ का नव्हते? पण देवाघरी चोरी केलेली; त्यानं असं मनी योजलं! एरवी हौस का होती कुणाला?
(राग- जोगी-मांड, ताल-दीपचंदी, चाल- पियाके मिलनेकी.) कुणासि निंदू मी काय। प्राक्तनी जरी। घडिघडि रोदन माझ्या लिहीत विधाता॥ ध्रु.॥ संचितभागा। मनुजा भोगाया। ना टळते कधी हाय॥ 1॥
गीता : अहो, दळायचं सोपं का आहे ते? कुळवाडयांच्या बायका चांगल्या धडधाकड, पण त्या देखील उरी फुटतात. अन् तुमच्यानं अर्धपोटी कसं व्हावं ते?
सिंधू : अहो, उरापोटी करीन कसं तरी झालं! अर्धपोटी, नाही अगदी रित्यापोटी कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवा ना? माझं ऐका तुम्ही. खुशाल कुठं दळण मिळालं तर घेऊन या! अहो, दुसऱ्याासाठी का करायचं आहे हे? बघाल ना कुठं?
गीता : बघेन बापडी! इलाजच हटला, मग काय करायचं? बरं बाईसाहेब, आज दोन दिवस सांगेन सांगेन म्हणते, पण मेली आठवणच भारी धड! हे बघा, मी सांगेन तिथे याल का?
सिंधू : कुठं यायचं? सांगा ना तरी?
गीता : अमृतेश्वरी!
सिंधू : तिथं कशाला यायचं?
गीता : तिथं आज चार दिवस लक्षभोजनं चालली आहेत! चार दिवस तिकडं गेलो तर गोडाधोडाचे दोन घास तरी पोटभर मिळतील! तुम्हाला उपाशीतापाशी पाहिलं म्हणजे माझ्या किनई पोटात तटातट तुटतं अगदी! (सिंधू तोंड फिरवते व पदराने डोळयांतली आसवे पुसते.)
सुधाकर : (स्वगत) अरेरे, काय ऐकलं मी हे? या उदार मनाच्या पण गरीब कुळीच्या भोळया मुलीनं सहजासहजी सिंधूच्या हृदयाला केवढी जबर जखम केली ही! धनसंपन्नाची जी कन्या, ज्ञानसंपन्नाची जी पत्नी, तिच्या उपासमारीची दया येऊन या उदार मुलीनं तिला सदावर्ताचा उपदेश द्यावा? सुधाकरा, काय हा तुझा संसार! धिक्कार असो तुझ्या व्यसनाला आणि पुरुषार्थाला!
गीता : अगंबाई, तुमच्या डोळयांना पाणी आलं? माझ्या बोलण्यानं तुमच्या मनाला इतकं अवघड वाटलं? मला काय बरं ठाऊक? बाईसाहेब, मी आपली तुमची वेडीपिशी मुलगी आहे; चुकलेमाकले तर मनात आणू नका हो काही! मी भोळया भावानं बोलून गेले आपली! पण तुमच्या जिवाला ते लागलं!
सिंधू : (स्वगत) या बिचारीचं समाधान केलं पाहिजे. बापडी लागलीच गोरीमोरी झाली. (उघड) गीताबाई, नाही बरं वाईट वाटलं मला!
गीता : अशी नाही फसायची मी! मग डोळे भरून आले असे?
सिंधू : माझ्याही मनातून यायचं होतं. पण हे बघा, असं जुनेर आड करून चार लोकांत कसं बरं यायचं बाहेर? म्हणून मला वाईट वाटलं हो!
गीता : हात्तीच्या, एवढंच ना? मी आपली चरकले! म्हटलं, कुठं बोलायला गेले कुणाला ठाऊक! मग माझं पातळ आणून देऊ का?
सिंधू : वेडया तर नाही तुम्ही, गीताबाई? तुमचं पातळ मला थिटं नाही का व्हायचं? हे बघा, ते राहू द्या- त्याविणं काही अडलं नाही. दळणाचं पाहाल ना कुठं जमलं तर?
सुधाकर : (स्वगत) शाबास, सिंधू, शाबास! फाटक्या लुगडयाचं निमित्त पुढे करून माझ्या दारूबाज अब्रूवर पांघरूण घातलंस!
सिंधू : गीताबाई, तुम्ही पुन्हा गप्प बसला?
गीता : तुमच्या देवस्वभावाला काय म्हणावं, बाईसाहेब? साताजन्माच्या पुण्यवंतांनीसुद्धा तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं; अन् आमच्या घरच्यासारख्यांनी तुमच्याबद्दल दारूसारखं अभद्र- तो देव मेला दडी मारून कुठे बसला आहे का दारूबिरूच प्यायला आहे?- एरव्ही यांच्या जिभा झडून कशा जात नाहीत त्या?
सिंधू : हं, गीताबाई, आपण बायकांनी असं बोलावं का? नवरा म्हणजे देवासारखा-
गीता : हे कसले हो असले देव! अहो, हे दारूबाज देव आज गटाराच्या गंगेत वाहायचे तर उद्या आणखी कुठे लोळायचे!
सिंधू : गीताबाई, गप्प बसा अगदी! असं तोंडाला येईल ते बोलू नये. देवा ब्राह्मणांनी दिलेला नवरा कसा का असेना-
(राग- पहाडी- गज्जल; ताल- कवाली. चाल- खडा कर.) असे पती देवचि ललनांना। तयासि अन्य भावना ना॥ स्पर्शमणि वनितामन साचे। करित जे कांचन लोहाचे॥ खपतिच्या अंगिंच्या दोषा। गणिती गुण मधुर आर्ययोषा॥ तयासह नरकयातनांला। स्वर्गसुख मनि समजति अबला॥ असे जो प्रस्तर जननयनी। गणी त्या ईशचि तद्रमणी॥ वसुनि त्या या देवानिकटी। ईशपद लभति सपति अंती॥ 1॥
गीता : देवानंच मुळी आताशा लाज सोडल्यासारखी दिसते! बाईसाहेब, तुमची लुगडी धुवायला सांगा- एकदा सोडून सात वेळा धुईन- पण एवढया गोष्टीत नका माझ्या तोंडाला हात देऊ! असले नवरे जाळायचे का आहेत? यांच्या अकला चुलीत का जातात? मेल्या एकाच्या अंगी वकूब नाही काडीचा अन् हे म्हणे देव! या देवांची नित्यनेमाने खेटरांनी पूजा करायला हवी! तो देव हाती सापडता किनई तर तुमच्यापुढं उभा करून, चांगला कान पिळून त्याला हडसून खडसून विचारलं असतं, की या माउलीकडे नीट एकदाचे डोळे फोडून पाहा अन् मग सांग, की पोराबाळांनी भरल्या घरात अशी ओतायला का दारू केली आहेस? बाईसाहेब, तुम्हाला येतो माझा राग; पण मी आहे आपली सरळ! तुम्ही अशा सीतासावित्रीसारख्या, तुमची काय ओज ठेविली आहे हो दादासाहेबांनी? चांगले शिकले सवरलेले! पण यांचं सारं शहाणपण बाटलीतून जन्माला यायचं, उकिरडयावरच्या अंमगलानं यांचं उष्टावण व्हायचं आणि तिसऱ्याा कुठल्या मसणवटीत- जाऊ दे मेलं, माझ्या तोंडाला नाही सुमार! बाईसाहेब, तुमच्याकडे पाहिलं म्हणजे माझ्या जिभेला आपला फाटा फुटतो! सांगा बघू, काय केलं हो यांनी तुमच्यासाठी? कधी गोळाभर अन्न घातलं तुम्हाला वेळेवर, का बोटभर चिंधी आणली धडोतीसाठी? अष्टौप्रहर बाटलीत बुडया मारूनच बसल्या ना यांच्या मोठाल्या बुद्ध्या! हे हो कसले देव? अहो हे शेंदूरकमी देव, निव्वळ दगडधोंडे! आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन मुळूमुळू रडत बसायचं! राणीचं राज्य झालं आहे ना म्हणतात आताशा? मग राणीच्या या राज्यात बायकांचे का असे धिंडवडे निघतात हे?मला कुणी राज्य दिलं तर मी साऱ्या बायकांना सांगून ठेवीन की, नवरा दारू पिऊन घरी आला तर खुशाल त्याला दाव्यादोरखंडानं गोठयात नेऊन बांधीत जा! नवरा म्हणे देवासारखा! अशानं तर नवरेपणाचे देव्हारे माजले! दारू पितो तो कसला हो नवरा? माणसात देखील जिंमा व्हायची नाही त्यांची!
सिंधू : गीताबाई, आपण कशाला जीभ विटाळून आपला धर्म सोडायचा! हे बघा, बाळ भुकेला झाला असेल; थोडं दूध- (मागे पाहून स्वगत.) अगंबाई! इथं उभं असायचं? गीताबाईचं बोलणं सारं ऐकायचं झालं वाटतं? (उघड) गीताबाई, जा बरं. दूध घेऊन येता ना?(तिला खूण करते.)
गीता : (पाहून) अगंबाई! दादासाहेब इथंच होते वाटतं? आणखी माझ्या जिभेची सारखी टकळी चालली होती!
सिंधू : (हळूच) चला आत, भांडे देते दुधाला अन् तेवढं दळणाचं विसराल बरं का? चला. (त्या जातात. सुधाकर पुढे येतो.)
सुधाकर : (स्वगत) सिंधू, इतक्या थोरपणानं, गीतेला बोलती बंद का केलीस? दारूच्या धुंदीने बहिरून निजलेला माझा जीव तुझ्या नाजूक बोलाफुलांनी कसा जागा होणार? त्याच्यावर गीतेच्या तोंडचा दगडधोंडयांचा असा निष्ठुर माराच व्हायला पाहिजे! गीतेचा एक एक बोल जिवाला चाबकाच्या फटकाऱ्याप्रमाणं लागत होता! सिंधू, नवऱ्याच्या पोटात दडी धरून बसलेल्या या दारूची तुम्ही कदर केलीत म्हणून सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाच्या नांगीप्रमाणे ती तुम्हा सर्वांना अजून छेडते आहे! सुधाकरा, चांडाळा, दारूच्या दुष्ट नादानं केवळ पशू बनून या देवतेची काय विटंबना केलीस ही! तुझं सारं शहाणपण गेलं कुठं? ब्राह्मण जातीच्या उच्चत्वाला मी लाथ मारली, विधवेची जबाबदारी झुगारून दिली आणि एखाद्या पतिताप्रमाणं मी दारू प्यायला लागलो! अरेरे! ही पाहा सिंधू आली. ज्या तोंडानं मी दारू प्यालो ते हे तोंड या देवीला कसं दाखवू? (तोंड झाकून रडतो. सिंधू जवळ येऊन उभी राहते.)
सिंधू : काय बरं असं? गीताबाई आपल्या फटकळ तोंडाच्या आहेत! त्यांचं बोलणं असं मनावर घेऊ नये!
सुधाकर : सिंधू, मी आजपासून दारू पिणं सोडलं!
सिंधू : (आनंदाने) खरंच का हे?
सुधाकर : खरं, अगदी खरं! आजपासून दारू पिणं सोडलं; कायमचं सोडलं!
सिंधू : अहाहा! असं झालं तर देवच पावला!
(राग- भैरवी; ताल- केरवा. चाल- गा मोरी ननदी.) प्रभू अजि गमला मनी तोषला॥ ध्रु.॥ कोपे बहु माझा। तो प्रभुराजा आता हासला। मनी तोषला। मृतचि हृदय होते नाथ, हे पूर्ण झाले। परि वचनसुधेने त्यासि जिवंत केले॥ अमृतमधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्याते। श्रवणि सकल माझी शक्ति एकत्र होते॥ 1॥
हे पाहा, आपल्या पायांवर मस्तक ठेवून मागणं मागते की, शुभघडीचा हा निश्चय कधीकाळी विसरू नये. (त्याच्या पाया पडते. तो तिला उभी करतो.)
सुधाकर : सिंधू, सिंधू, काय करतेस तू हे? माझ्या पायांवर मस्तक ठेवतेस? या सुधाकराच्या? या दारूबाज सुधाकराच्या?- ज्यानं आपल्या विद्येला, ज्ञानाला, नावलौकिकाला, दारूच्या पेल्यात बुडविलं, त्या सुधाकराच्या? सिंधू, मी दारूच्या व्यसनानं काय करायचं ठेवलं आहे? वडिलांच्या पुण्याईला, ब्रह्मकुलींच्या पवित्रतेला, दारूनं तिलांजली दिली! तुझ्यासारख्या देवीची अशी विटंबना केली! ज्या तुझ्या बापाच्या घरी रोज सदावर्ते चालावी त्या तुला घासभर अन्नाला अशी महाग केली, की गीतेसारख्या मुलीनं तुझ्यावर दया करावी आणि तुला सहस्त्रभोजनाचा रस्ता दाखवावा! लहानपणी बाहुला-बाहुलीच्या लग्नात चिमुकला अंतरपाट धरण्यासाठी तू बेदरकारपणानं पैठणीच्या धांदोटया केल्या असशील; त्या तुला आज फाटक्या कपडयांमुळं बाहेर जाण्याची पंचाईत पडावी! तुझ्या बापाच्या घरी खेळताखेळता ओंजळीच्या वैरणीने तू जात्यात मोती भरडले असतेस तरी कुणाला त्याचं काही वाटलं नसतं; त्या तुझी मी अशी दशा करून टाकली, की, पोटासाठी आसवांची मोती वेरून तुला मोलाचं दळण करणं भाग पडावं! पंचपतिव्रतांनी पुण्यसंपादनासाठी प्रत्यही तुझी पूजा करावी अशी तुझी पवित्र योग्यता! त्या तुझ्या अंगाला तळीरामासारख्या नरपशूनं स्पर्श केला! ज्या दीनदुबळया परंतु पवित्र वैधव्याला पाहून देवांनीसुद्धा मार्गातून बाजूला सरून मार्ग द्यावा, त्या वैधव्यात पडलेल्या बिचाऱ्या शरद्चीही मी विटंबना करविली! तोच हा पातक्यांतला पातकी सुधाकर! त्या माझ्या पायांवर तू मस्तक ठेवतेस? त्यापेक्षा लाथेसरशी मला दूर नरकात का लोटून देत नाहीस? सिंधू, गीतेनं खोटं काय सांगितलं? भलत्या भावभक्तीनं माझ्यासारख्या दगडाची देवपूजा तू कशाला करीत बसलीस? तुझा नवरा होण्याला मी पात्र आहे का? बाबासाहेब, आपण सर्वस्वी फसून या रत्नाला दारूत बुडविलं! पण आपणाला तरी आधी काय ठाऊक, की ब्राह्मण कुलातला हा विद्यासंपन्न सुधाकर, पुढं असा दारूबाज दिवटा निघणार आहे म्हणून! तक्षकाला मारण्यासाठी अस्तिकानं त्याला पाठीशी घालणाऱ्या इंद्रदेवतेलाही आगीत उडी टाकण्याला आमंत्रण केलं, त्याप्रमाणं या दारूच्या व्यसनाला घराबाहेर घालविण्यासाठी तुझ्यासारख्या साध्वींनीसुद्धा, या व्यसनाला पोटात थारा देणाऱ्या पतिदेवतेला लाथेनं घराबाहेर हाकललं तरच आजच्या संभावित समाजातून हे दारूचं व्यसन हद्दपार होईल!
सिंधू : ऐकलं का? आता मी नाही असं वेडंबिद्रं बोलू द्यायची! सोडायची झाली ना आजपासून? मग आता गेल्या गोष्टींनी जीव कशाला कष्टी करून घ्यायचा? गेलं ते गंगेला मिळालं! एकदा मनाचा निग्रह करून टाकला तर आपल्याला काय बरं कमी आहे? अजून सारं सोन्यासारखं होईल! करायचा ना हा निश्चय कायम?
सुधाकर : कायम, कायम, अगदी कायम! आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, की आजपासून दारू अगदी वर्ज्य! वकिलीची सनद गेली तरी हरकत नाही; माझ्या चार वजनदार स्नेह्यांकडून कुठं नोकरीची सोय पाहतो. आता हा सुधाकर तुझ्या एका शब्दाबाहेर जाणार नाही!
सिंधू : अहाहा! असं झालं तर अमृतेश्वराला लक्ष वाती लावून- लक्ष वातीचशा काय- पण पंचप्राणांची पंचारती पाजळून ओवाळणी करीन! आपल्या एका शब्दासरशी माझ्या आनंदाला त्रिभूवन थोडं झालं आहे आणि आकाश ठेंगणं झालं आहे! ही सोन्याची अक्षरं कोणाला सांगू आणि कोणाला नको असं मला झालं आहे! आधी आपल्या बाळाच्या चिमुकल्या जिवालाच ही कानगोष्ट सांगते! (जाते.)
सुधाकर : (स्वगत) चिरकालीन निराशेत झालेला हा हिचा ब्रह्मानंद मला कोणता उत्साह देणार नाही?(राग- खमाज; ताल- त्रिवट. चाल- दखोरी गइ गइ.)
देतसे बहु उत्साह मना विमल हिचा हर्षातिरेक नवचि जीवना॥ ध्रु.॥ निर्मल मंगल पावन पुण्यद। जे त्रिभुवनी। तद्भवन सतीमन। प्रसाद त्याचा जनि करि न काय॥ 1॥ (सिंधू मुलाला घेऊन येते.)
सिंधू : बघितलं का या लबाडालासुद्धा हे ऐकून कसं हसं येतं आहे ते? बाळ, पुन्हा आपल्याला सोन्याचे दिवस लाभणार बरं!
(राग- पहाडी; ताल- कवाली. चाल-तारि विछेला.) स्वस्थ कसा तू? ऊठ गडया। झणि टाक उडया॥ ध्रु.॥ नकळे का वर्षे। घन सुधेचा, छबडया?॥ 1॥ सरले अजि सारे। कुदिन अपुले, बगडया! ॥ 2॥
बाळ, अजून तू इतका लहान का बरं राहिलास? ही आनंदाची गुढी घेऊन बाबांकडे, भाईकडे, तुला दुडदुडा धावत जायला नको का? पुन्हा पुन्हा काय विचारतोस मलाच? तिकडे विचारीनास? ऐकलं का, याला एकदा आपल्याच तोंडानं सांगायचं बरं!
सुधाकर : बाळ, तुझी शपथ घेऊन सांगतो की, या सुधाकरानं आजपासून दारू कायमची सोडली, अगदी कायमची सोडली! (दोघेही मुलाचा मुका घेऊ लागतात. पडदा पडतो.)
प्रवेश तिसरा
(स्थळ- बंडगार्डन. पात्रे- सुधाकर व इतर मंडळी.)
सुधाकर : काय चमत्कारिक माझी स्थिती झाली आहे! लहानपणापासून या बागेची शोभा माझ्या पुऱ्या ओळखीची; पण आज तिच्याकडे नव्यानं पाहिल्यासारखं वाटतं. सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळं उघडया डोळयांनी पाहण्याचा धीर होत नाही! अगदी लहानपणी एका इंग्रजी गोष्टीत वीस वर्षाच्या अखंड झोपेतून जागा झालेल्या एका मनुष्याची प्रथम जगाकडे पाहताना जी विचित्र मन:स्थिती वर्णिली आहे, तिचं आज मला अनुभवानं प्रत्यंतर पटत आहे. या बागेकडेच काय, पण एकंदर जगाकडेच पाहताना माझ्या दृष्टीतला हा भितरा ओशाळेपणा कमी होत नाही. दारूसारख्या हलक्या वस्तूच्या नादानं ज्या सोज्ज्वळ समाजातून, प्रतिष्ठित परिस्थितीतून, बरोबरीच्या माणसांतून- अगदी माणसांतूनच- मी उठलो, त्या जगात हे काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरटयासारखं होतं आहे. या सुंदर जगात माझी जागा मला पुन्हा मिळेल का? अजून तोंडाला दारूची दुर्गंधी कायम असताना माझ्या पूर्वाश्रमीच्या जिवलग बंधूंना माझी तोंडओळख तरी पटेल का? अजून दारूच्या धुंदीनं अंधुक असलेल्या माझ्या दृष्टीला माझी हरवलेली जागा हुडकून काढता येईल का? हजारो शंकांनी जीव कासावीस होऊन उदार सज्जनांच्या समोरसुद्धा आश्रयासाठी जाण्याची माझ्या चोरटया मनाला हिंमत होत नाही. फार दिवस परक्या ठिकाणी राहून परत आलेल्या प्रवाशाला आपल्या गावात हिंडताना किंवा बिछान्यात फार दिवस खितपत पडून आजारातून उठलेल्या रोग्याला आपल्या घरातच फिरताना असाच अपुरा नवेपणा वाटत असतो खरा; पण पहिल्याला प्रियजनांच्या दर्शनाची उत्कंठा आणि दुसऱ्यायाला पुनर्जन्माच्या लाभाचा निर्दोष आनंद, जो पवित्र धीर देतो, तो घाणेरडया व्यसनाने दुबळया झालेल्या पश्चात्तापाला कोठून मिळणार? आज अजून कोणीच कसं फिरकत नाही? (पाहून) अरेरे, हे लोक या वेळी कशाला इथं आले? दारूच्या खाणाखुणा अजून अंगावर आहेत. अशा स्थितीत निर्व्यसनी जगात जाववत नाही म्हणून मद्यपानाच्या स्नेहातल्याच ज्या वजनदार लोकांनी अडल्या वेळी मला साहाय्य देण्याची वारंवार वचने दिली, त्यांची भेट घेण्याच्या अपेक्षेनं मी इथं आलो तो माझ्या गतपातकांची ही मूर्तिमंत पिशाच्चं माझ्यापुढे दत्त म्हणून उभी राहिली! (शास्त्री व खुदाबक्ष येतात.)
शास्त्री : शाबास, सुधाकर, चांगलाच गुंगारा दिलास! तुला हुडकून हुडकून थकलो! अखेर म्हटलं, मध्येच तंद्री लागून कुठं समाधिस्थ झालास की काय कोण जाणे!
खुदाबक्ष : सगळया बैठका, आखाडे पायाखाली घातले. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्तेदेखील पालथे घातले!
शास्त्री : गुत्तेच पालथे घातले; त्यातल्या बाटल्या नव्हेत!
खुदाबक्ष : अरे यार, साऱ्या गटारांचासुद्धा गाळ उपसला; पण तुझा कुठं पत्ता नाही!
शास्त्री : बरं खांसाहेब, आता उगीच वेळ घालवू नका. सुधाकर, तळीरामाचा आजार वाढत चालल्यामुळं त्याच्याभोवती आळीपाळीनं पहाऱ्यासाठी जागता सप्ता बसवायचा आहे. तेव्हा त्याचा कार्यक्रम ठरविण्यासाठी आपल्या मंडळाची खास बैठक बसायची आहे, म्हणून लवकर क्लबात चल.
सुधाकर : तळीरामाचा प्राण जात असला तरी आता मला क्लबात यायचं नाही!
खुदाबक्ष : असा वैतागलास कशानं? बैठक नुसतीच नाही!
सुधाकर : एकदा सांगितलं ना मी येणार नाही म्हणून! आजच नाही, पण मी कधीच येणार नाही!
खुदाबक्ष : वा:! तू नाहीस तर बैठकीला रंग नाही! बर्फावाचून व्हिस्कीला तशी तुझ्यावाचून मजलशीला मजा नाही!
सुधाकर : काय, कसं सांगू तुम्हाला? मी दारू पिणं सोडलं आहे!
दोघे : काय? सोडलं आहे? यानंतर?
सुधाकर : हो, यानंतर!
शास्त्री : काय भलतंच बोलतोस हे? दारूच्या धुंदीतसुद्धा तू असं कधी बरळला नाहीस! मद्यपान सोडून करणार काय तू? अरे वेडया, एकदा एक गोष्ट आपली म्हणून जवळ केल्यावर पुढं अशी बुध्दी? अरे- स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:! काय खांसाहेब?
खुदाबक्ष : बराबर बोललात! अरे दोस्त, 'अपना सो अपना!' चल, हे वेड सोडून दे. (सुधाकर काहीच बोलत नाही.)
शास्त्री : चला, खांसाहेब, तापलेली काच आपोआप थंड पडू द्यावी हे उत्तम! निवविण्यासाठी पाणी घातलं की, ती एकदम तडकायचीच! हा या घटकेपुरताच पश्चात्ताप आहे. स्मशानवैराग्यामुळं डोक्यात घातलेली राख फार वेळ टिकायची नाही. जरा धीरानं घ्या, म्हणजे आपोआपच गाडं रस्त्याला लागेल. सुधाकरा, आम्ही तर जातोच; पण तू आपण होऊन क्लबात आला नाहीस तर यज्ञोपवीत काढून ठेवीन, हे ब्रह्मवाक्य लक्षात ठेव! (शास्त्री व खुदाबक्ष जातात.)
सुधाकर : (स्वगत) दारूच्या गटारात या पामर किटकांच्या बरोबर आजपर्यंत मी वाहात आलो ना? पण यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? जळलेला उल्का मातीत मिसळून दगडाधोंडयांच्या पंक्तीत बसतो याचा दोष त्याच्या स्वत:च्याच अध:पाताकडे आहे. जाऊ देत! यांच्याबद्दल विचार करण्याइतकी सुद्धा- तसंही नाही- या दोघांची सारी विशेषणं माझी मलाच लावून घेतली पाहिजेत- माझी अशी दशा व्हायला- अरेरे! किती भयंकर दशा! तिची कल्पनासुद्धा करवत नाही. बुध्दिमत्तेच्या तीव्र अभिमानामुळं बहुतांशी बरोबरीच्या माणसांच्यासुद्धा हातात हात मिळविण्याची ज्यानं कधी कदर केली नाही, तो मी आज दारूच्या समुद्रातून बाहेर निघण्याकरता त्याच समुद्राच्या काठावर बसलेल्या नालायक माणसांच्या पायांचा आधार मिळविण्यासाठी आशेनं धडपडतो आहे. (एक गृहस्थ येतो.) सुधाकरा, या क्षुद्र मनुष्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आशाळभूत दृष्टीनं तोंडावर गरिबीचं कंगाल हसू आणून कृत्रिमपणानं पदर पसरायला तयार हो! (त्याला नमस्कार करतो; तो गृहस्थ नमस्कार न घेता निघून जातो- स्वगत) अरेरे! निर्दय दुर्दैवा, सुधाकराच्या स्वाभिमानाला ठार मारण्यासाठी या बेपर्वाईच्या हत्याराखेरीज एखादा सौम्य उपाय तुझ्या संग्रही नव्हता का? आरंभी या शेवटच्या शस्त्राची योजना कशाला केलीस? (दुसरा गृहस्थ येतो.)
दुसरा गृहस्थ : (सुधाकराला पाहून स्वगत) काय पीडा आहे पाहा! हे अवलक्षण कशाला पुढं उभं राहिलं! या भिकारडया दारुबाजाबरोबर उघडपणे बोलताना जर कुणी पाहिलं तर चारचौघात अंगावर शिंतोडे उडायचे! आता ही पीडा टाळायची कशी? मांजर आडवं आलं तर तीस पावलं मागं फिरावं, विधवा आडवी आली तर स्वस्थ बसावं, पोर आडवं आलं तर कापून काढावं, पण असं आपलंच पाप आडवं आलं तर कशी माघार घ्यावी याचा कुठल्याही शास्त्रात खुलासा केलेला नाही. चार शब्द बोलून वाटेतला धोंडा दूर केला पाहिजे. (सुधाकर त्याला नमस्कार करतो. त्याला नमस्कार करून व कोरडे हसून) कोण सुधाकर? अरे वा:! आनंद आहे! (घाईने जाऊ लागतो.)
सुधाकर : रावसाहेब, आपल्याशी जरा दोन शब्द-
दुसरा गृहस्थ : सध्या मी जरा गडबडीत आहे- हे दादासाहेब गेले- (जातो.)
सुधाकर : (स्वगत) याच्या पाजी संभावितपणापेक्षा पहिल्यानं केलेला उघड अपमान पुरवला. उभ्या जगानं प्रामाणिक हसण्यानं माझा तिरस्कार केला असता तरीसुद्धा याच्या हरामखोर हसण्यानं माझ्या हृदयाला जसा घाव बसला तसा बसला नसता. (पाहून) हा तिसरा प्रसंग आहे. काही हरकत नाही. एकामागून एक अपमानाच्या या सर्व पायऱ्या चढून जाण्याचा मी मनाशी पुरता निर्धार केला आहे.
(तिसरा गृहस्थ येतो. एकमेकांना नमस्कार करतात.)
तिसरा गृहस्थ: कोण तुम्ही? काय नाव तुमचं? कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं-
सुधाकर : दादासाहेब, माझं नाव सुधाकर.
तिसरा गृहस्थ: सुधाकर! नावसुद्धा ऐकल्यासारखं वाटतं. काय म्हणालात? सुधाकर नाही का?
सुधाकर : दादासाहेब, इतकं विचारात पडण्यासारखं यात काहीच नाही. आपल्या माझ्या अनेक वेळा गाठी पडल्या आहेत. आर्यमदिरामंडळाच्या बैठकीत आपण बंधुभावानं संकटकाळी मला साहाय्य करण्याची कित्येकदा वचनं दिली आहेत. दादासाहेब, आज मी खरोखरी संकटात आहे आणि म्हणूनच त्या वचनांची आठवण देण्यासाठी.
तिसरा गृहस्थ: बेशरम मनुष्या, भलत्या गोष्टीची भलत्या ठिकाणी आठवण करून द्यायची तुला लाज वाटत नाही? मूर्खा, पहिल्यानं मी तुला न ओळखल्यासारखं केलं होतं तेवढयावरूनच तू सावध व्हायला पाहिजे होतंस! दारूच्या बैठकीत दिलेली वचनं, केलेल्या ओळखी, ही सारी दारूच्या फुटलेल्या पेल्याप्रमाणं, खान्यातल्या खरकटयाप्रमाणं, तिथल्या तिथं टाकून द्यायच्या असतात. काळोखातली दारूबाज दोस्ती अशी उजेडात उजळमाथ्यानं वावरू लागली तर तुझ्याप्रमाणंच माझीही बेअब्रू भरचवाठयावर नायाचला लागेल. दारूबाजीसारख्या हलक्या प्रकारात आमच्या बरोबरीच्या लोकांची मदत मिळत नाही, एवढयासाठीच आम्हा थोरामोठयांना तेवढयापुरतंच तुझ्यासारख्या हलकटांत मिसळावं लागतं! पण ते अगदी तेवढयापुरतं असतं. पायखान्यातला पायपोस कोणी दिवाणखान्यात मांडून ठेवीत नाही. थोरा-मोठयांच्या मैत्रीच्या आशेनं तुझ्यासारखे कंगाल दारूबाज मुद्दाम या व्यसनाशी सलगी करतात, हे आम्हाला पहिल्यापासून ठाऊक असतं. चल जा. माझ्यासारखा आणखी कोणाला अशा संकटात पाडू नकोस. (जातो.)
सुधाकर : (स्वगत) दुर्दैवा, सुधाकराच्या निर्लज्जपणात अजून थोडी धुगधुगी आहे. (चौथा गृहस्थ येतो- नमस्कार होतात.) रावसाहेब, मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे आहेत. माझं नाव सुधाकर! माझा चेहेरा आपल्याला कुठं तरी पाहिल्यासारखा वाटत असेल, पण खरोखरी पाहता तो आपल्या पूर्ण परिचयाचा आहे.
चौथा गृहस्थ : सुधाकर, असं तीव्रपणानं बोलायचं काय कारण आहे? तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आणि आम्हाला हे बोलणं?
सुधाकर : उतावळेपणानं आपल्या उदार मनाचा उपमर्द केला याची क्षमा करा. पण मला आता मिळालेल्या अनुभवाच्या औषधाचा कडवटपणा अजून माझ्या तोंडात घोळत आहे. प्रसंगात सापडलेल्या आपल्या जिवलग मित्राचं नाव आठवत नसलं म्हणजे आपल्या सोईसाठी त्याला नावं ठेवायला सुरुवात करावी, हा जगातला राजमार्ग आहे. ओळखीचा चेहेरा पटत नसला, म्हणजे इतका चिकित्सकपणा दाखवावा लागतो, की हुंडीवरची सही पटवून घेताना पेढीवरच्या कारकुनानंसुद्धा तो कित्त्यादाखल पुढं ठेवावा. पण जाऊ द्या. तुमच्यासारख्या सत्पुरुषाला हे ऐकविणं असभ्यपणाचं आहे. रावसाहेब, मी आज विलक्षण परिस्थितीत आहे. मला एखादी नोकरी पाहिजे! अतिशय काकुळतीनं आपणाजवळ एवढी भीक- रावसाहेब, अगदी पदर पसरून भीक मागतो की, कुठं तरी एखादी नोकरी मला लावून द्या; म्हणजे तीन जिवांचा- (कंठ दाटून येतो.)
चौथा गृहस्थ : तुम्हाला नोकरी- सुधाकर- तुम्हाला आम्ही नोकरी काय पाहून द्यायची? तुमची विद्वत्ता, तुमची हुशारी, तुमची लायकी-
सुधाकर : माझ्या लायकीबद्दल कशाला या थोर कल्पना? माझी लायकी एखाद्या जनावरापेक्षाही हलक्या दर्जाची आहे! पट्टेवाल्याची, हमालाची, कुठली तरी नोकरी- रावसाहेब, तीन पोटांचा प्रश्न आहे म्हणून पंचाईत! नाही तर एका पोटासाठी गाढवाच्या रोजमुऱ्यावर कुंभाराचा उकिरडा वाहण्याची सुद्धा आता माझी तयारी आहे!
चौथा गृहस्थ : तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- आम्ही तुमच्यासाठी काय नाही करणार? आहे एक नोकरी- दरमहा पंधरापर्यंतची-
सुधाकर : फार झाले पंधरा- रावसाहेब-
चौथा गृहस्थ : पण ती आहे कंत्राटदाराकडे स्टोर सांभाळण्याची. खोरी, फावडी, होय नव्हे- म्हणजे आज पाचपन्नासांचा जंगम माल तुमच्या हाती खेळायचा आणि- राग मानू नका. सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे! तुमच्याजवळ खोटी भाषा नाही व्हायची- त्या जागी अगदी लायक, सचोटीचा माणूस पाहिजे- हो, एखादा छंदीफंदी असला आणि त्यानं निशापाण्यासाठी दोन डाग नेले कलालाकडे- निदान त्याला जामीन तरी हवीच!
सुधाकर : मग माझ्यासाठी आपण जामिनकी पत्करायला-
चौथा गृहस्थ : आता काय सांगावं? सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे! तुमच्याजवळ आपलं स्पष्ट बोलायचं- हे बघा, तुम्ही बोलूनचालून व्यसनी, तुमची जामिनकी म्हणजे धोतरात निखारा बांधूनच हिंडायचं- हो तुम्हीच सांगा- व्यसनी माणसांचा भरवसा काय घ्या? म्हणून माझं आपलं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे की, मला या संकटात- आमच्या पाठच्या भावासारखे तुम्ही- तुम्हाला नाही म्हणायचं जिवावर येतं अगदी- पण तुम्हीच दुसऱ्या कोणाला तरी- हो, तेही खरंच, दुसरं कोण मिळणार? हो, जाणून बुजून काटयावर पाय द्यायचा- मोठं कठीण कर्म आहे! जग म्हणजे एवढयासाठी! तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे! तेव्हा तुम्हाला उपदेश करायचा आम्हाला अधिकारच आहे- तात्पर्य काय, की दारू पिणं चांगलं नाही. दारू म्हटली की, माणसाची पत गेली, नाचक्की झाली! दरवाज्यात कुणी उभं करायचं नाही, खऱ्या कळवळयाचं कुणी भेटायचं नाही- सगळे दादा बाबा म्हणून लांबून बोलतील- पाठचा भाऊ ओळख द्यायचाच- तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे म्हणून सांगायचं तुम्हाला- सुधाकर, तुम्ही दारू सोडा! बरं, येऊ आता? वेळ झाला!
सुधाकर : (स्वगत) बस्स! दुर्दैवाची दशावतार पाहण्याची आता माझ्यात ताकद नाही! रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडाभोवती घोटाळत आहे, त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश करावा! जोडयाजवळ उभं राहण्याची ज्याची लायकी नाही त्यानं जोडयानं माझं मोल करावं? जिथं कवडी किमतीच्या कंगालांनी माझी पैजारांनी पायमल्ली केली, तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार? दारूबाज दोस्तांनी लाथाडलेलं हे थोबाड आता कुणाला कसं दाखवू? माझं उपाशी बाळ, काबाडकष्ट उपसणारी सिंधू- यांच्यापुढं कोणत्या नात्यानं जाऊन उभा राहू? बेवकूब बाप- नालायक नवरा- मातीमोलाचा मनुष्य- दीडदमडीचा दारूबाज- देवा, देवा, कशाला या सुधाकराला जन्माला घातलंस, आणि जन्माला घालून अजून जिवंत ठेवलंस? मी काय करू? कुठं जाऊ? या जगातून बाहेर कसा जाऊ? कोणत्या रूपानं मृत्यूच्या गळयात मगरमिठी मारू? पण सुदृढ मनालासुद्धा आत्महत्येसाठी मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते. मग दारूबाज दुबळया मनाला एवढं धैर्य कुठून येणार? दारूबाजाच्या ओळखीचं मृत्यूचं एकच रूप म्हणजे दारू! तडफडणाऱ्या जिवाच्या जाचण्या बंद करण्याचा दारूखेरीज आता मार्ग नाही! मुलासकट माणुसकीला, सिंधूसकट संसाराला, सद्गुणांसकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला, सुधाकराचा हा निर्वाणीचा निराशेतला शेवटचा प्रणाम! आता यापुढं एक दारू- प्राण जाईपर्यंत दारू- शेवटपर्यंत दारू! (जातो. पडदा पडतो.)
प्रवेश चवथा
(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: शास्त्रीबुवा, तळीराम आजारी, व त्याचे मित्र वगैरे)
खुदाबक्ष : काय शास्त्रीबुवा, मिळाला का एखादा डॉक्टर-वैद्य?
शास्त्री : मिळालाय म्हणायचा. पण फार श्रम पडले शोधायचे! आधी तळीराम डॉक्टरचं किंवा वैद्याचं नावच काढू देत नव्हता मुळी; शेवटी सर्वांनी आग्रह केला, तेव्हा दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य मिळाला तर आणा, म्हणून कबूल झाला! पुढं दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य हुडकण्यासाठी आम्ही निघालो. सारा गाव डॉक्टरांनी आणि वैद्यांनी भरलेला, पण असा एखादा डॉक्टर वैद्य औषधापुरतासुद्धा मिळायची पंचाईत!
खुदाबक्ष : मग झालं काय शेवटी?
शास्त्री : दारू पिणारा डॉक्टर शोधून काढण्यासाठी आपल्या सोन्याबापू अजून फिरतो आहे. गावात मला दारू पिणारा वैद्य काही आढळला नाही; शेवटी एक इसम मिळाला.
खुदाबक्ष : वैद्य आहे ना पण तो?
शास्त्री : वैद्य नाही! एका वैद्याच्या घरी औषध खलायला नोकर होता तो पहिल्यानं! पुढं त्यानंच स्वत:चा कारखाना काढला आहे आता! म्हटलं चला, अगदी नाही त्यापेक्षा ठीक आहे झालं! आता एव्हानाच त्यानं यायचं कबूल आहे- (सोन्याबापू व डॉक्टर येतात.) काय सोन्याबापू, दारू पिणारे डॉक्टर मिळाले वाटतं हे?
सोन्याबापू : नाही. डॉक्टर नाहीत हे, नुसते दारू पिणारेच आहेत. पण डॉक्टरची थोडी माहिती आहे यांना. मी आणलंच यांना आग्रहानं! तुमचे ते वैद्य काही आपल्याला पसंत नाहीत!
शास्त्री : काय असेल ते असो! आपला आयुर्वेदावर अंमळ विश्वास विशेष आहे. वैद्याला कळत नाही- अन् डॉक्टरला कळतं- डॉक्टरसाहेब, क्षमा करा. हे माझं आपलं सर्रास बोलणं आहे- असं का तुम्हाला वाटतं?
सोन्याबापू : तसं नाही केवळ; पण या वैद्यांच्या जाहिरातींवरून मोठा वीट आला आहे! जो भेटतो त्याचं एक बोलणं! शास्त्रोक्त चिकित्सा, शास्त्रोक्त औषधं, अचूक गुणकारी औषधं, रामबाण औषधं, हटकून गुण, तीन दिवसांत गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत; अनुपानखर्डा सोबत, टपालखर्च निराळा-
डॉक्टर : शिवाय, सरतेशेवटी आगगाडीच्या डब्यातल्यासारखी धोक्याची सूचना!
सोन्याबापू : त्यामुळं खरा वैद्य आणखी खोटा वैद्य ओळखणं एखाद्या रोगाची परीक्षा करण्याइतकंच अवघड होऊन बसलं आहे! वैद्याविषयी आमचा अनादर नाही; आम्हाला एखादा का होईना, पण खरा वैद्य पाहिजे- (वैद्य प्रवेश करतो.)
वैद्य : आपली मनीषा पूर्ण झालीच म्हणून समजा. आपणाला एखादा खरा वैद्य पाहिजे ना? मग हा पाहा तो आपल्यापुढं उभा आहे. आमची औषधं अगदी शास्त्रोक्त असून रामबाण असतात; हटकून गुण, तीन दिवसांत गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत; अनुपानखर्डा सोबत, टपालखर्च निराळा- विशेष सूचना- सोन्याबापू : म्हणजे आपली धोक्याची सूचना! हे घ्या डॉक्टरसाहेब, ऐका आता! (डॉक्टर मोठयाने हसतो.)
वैद्य : काय हो, काय झालं असं एकदम हसायला?
डॉक्टर : (हसत) मूर्ख आहात झालं!
वैद्य : अल्पपरिचयानं दुसऱ्याला एकदम मूर्ख म्हणणारा स्वत:च मूर्ख असतो!
डॉक्टर : पण अल्पपरिचयांतच आपला सारा मूर्खपणा स्पष्टपणानं दाखविणारा त्यापेक्षाही मूर्ख असतो!
शास्त्री : ते राहू द्या तूर्त! तळीरामाला उठवायला काही हरकत नाही ना? तळीराम, अरे तळीराम, ऊठ बाबा! हे वैद्य आणखी डॉक्टर आले आहेत. (तळीराम उठून बसतो.)
डॉक्टर : काय हो सोन्याबापू, हे वैद्यबुवा इथं औषध देण्यासाठीच आले आहेत का?
वैद्य : अहो, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार माझा आहे. (शास्त्रीबुवास) काय हो शास्त्रीबुवा, मी असताना आणखी यांना आणण्याची काय जरुरी होती?
मन्याबापू : हे पाहा वैद्यराज, तुम्हा दोघांचे पंथ अगदी निरनिराळे आहेत. म्हणून आम्ही मुद्दाम दोघांनाही आणलं आहे! हो, 'अधिकस्य अधिकं फलं'!
वैद्य : भलतंच काही तरी! नवऱ्याया मुलीला एक नवऱ्याच्या ठिकाणी दोन नवरे, किंवा एखाद्याला एका बापाच्याऐवजी दोन बाप-
मन्याबापू : वैद्यराज, असे एकेरीवर येऊ नका. आता आलाच आहात, तेव्हा दोघेही सलोख्यानं तळीरामाला औषध द्या म्हणजे झालं!
तळीराम : शास्त्रीबुवा, एकटया वैद्यानं किंवा डॉक्टरानं मी मरण्यासारखा नव्हतो, म्हणून का तुम्ही या दोघांनाही आणलंत?
डॉक्टर : आपला असा समज या राजश्रींच्या औषधांमुळेच झालेला आहे! खरोखरीच यांच्या औषधात काही जीव नसतो!
तळीराम : औषधात जीव नसेना का! रोग्याचा जीव घेण्याची शक्ती असली म्हणजे झालं!
वैद्य : नाही. आमची औषधं तशी नाहीत! हे पाहा डोळयांचे औषध. एकाला दिसत नव्हतं त्याला हे दिलं. आता त्याला अंधारातसुद्धा दिसतं.
डॉक्टर : यांच्या तोंडाला कुलूप घालील अशी त्या औषधावरची कडी आहे आमच्याजवळ! आमचं डोळयांचं औषध एका जन्मांधाला दिलं त्याला अंधारात तर दिसतंच, पण डोळे मिटून घेतले तरी दिसतं!
तळीराम : (स्वगत) मला एकंदर सोळा-सतरा रोग आहेत. त्यापैकी जलोदर हा माझा जीव घेईल असं मला वाटत होतं; पण यांच्या या चढाओढीवरून या दोघांपैकीच कोणीतरी पैज जिंकणारसं वाटतं!
वैद्य : मग काय, काढू मी आपली औषधं?
डॉक्टर : अहो राहू द्या आपलं शहाणपण आपल्याजवळच! मी देणार आहे यांना औषध!
तळीराम : अहो वैद्यराज, डॉक्टरसाहेब, असे आपापसात भांडून तुम्ही जर एकमेकांचा जीव घेऊ लागलात, तर मग माझा जीव कोण घेईल? असे भांडू नका, मी आपल्या मरणाचं अर्धे अर्धे श्रेय तुम्हा दोघांनाही वाटून द्यायला तयार आहे? हं, काढा वैद्यराज, तुमची औषधं.
वैद्य : या पाहा मात्रा. याच पाहून तुमचा वैद्यांबद्दलचा सारा विकल्प दूर होईल.
जनूभाऊ : अबब! काय या मात्रा! एखाद्या नवशिक्या कवीच्या पदांतूनसुद्धादा मात्रांचा इतका सुकाळ नसेल!
वैद्य : ही पाहा चूर्ण, ही सत्त्वं, ही भस्मं! हे सुवर्णभस्म, हे मौक्तिकभस्म, हे लोहभस्म-
तळीराम : प्राण घेण्याच्या शास्त्रातसुद्धादा काय दगदग आहे ही! रोगाला नि:सत्त्व करण्यासाठी आधी इतक्या पदार्थांची सत्त्वं काढायची तयारी! एका देहाचं भस्म करण्यासाठी इतकी भस्मं करण्याची तालीम!
जनूभाऊ : एकूण वैद्याच्या हाती सापडलेला रोगी जिवंत सुटणं कठीणच! हो, प्रत्यक्ष लोखंडाचंही भस्मकरण्याची ज्याची तयारी, त्याच्यापुढं रोगी शरीराची काय कथा?
वैद्य : हं, या औषधांची अशी थट्टा करणं पाप आहे. प्राणापेक्षाही अमूल्य आहेत ही औषधं!
जनूभाऊ : तरीच, रोग्याचा प्राण घेऊन शिवाय पैसेही घेता औषधांबद्दल!
वैद्य : उगीच शब्दच्छल नका करू असा. अशी तशी औषधे नाहीत ही! खुशाल डोळे मिटून ही औषधे घ्यावीत!
तळीराम : आणि औषध घेऊन पुन्हा डोळे मिटावेत!
जनूभाऊ : ते मात्र कायमचे! खरंच, राजासाठी तयार केलेली पक्वान्नं स्वयंपाक्याला अगोदरच खावी लागतात, त्याप्रमाणे रोग्याबरोबर वैद्यांनाही औषध घेण्याची वहिवाट असायला हवी होती! मग मात्र हा घातुक मालमसाला तयार करताना वैद्यांनी जरा विचार केला असता!
तळीराम : खरंच, काय ही औषधांची गर्दी! काय हो डॉक्टर, वैद्यांवर नाही का औषध?
वैद्य : असं म्हणू नये. वैद्याबद्दल असा अविश्वास दाखवू नये. वैद्य हाच रोग्याचा खरा जिवलग मित्र असतो.
तळीराम : रास्त आहे! एरवी रोग्याच्या जिवाशी इतकी लगट कोण करणार?
डॉक्टर : अहो सोन्याबापू, उगीच काय पोरखेळ मांडला आहे हा! वैद्याच्या औषधानं कुठं रोग बरे व्हायचे आहेत का? बापानं औषध घ्यावं तेव्हा मुलाच्या पिढीला गुण यायचा!
वैद्य : अस्तु. तरी पुष्कळ आहे. वैद्याच्या औषधानं मुलगा जिवंत तरी राहतो; डॉक्टरच्या बाबतीत मात्र बाप औषधानं मरायचा आणि मुलगा बिलाच्या हबक्यानं मरायचा!
डॉक्टर : कुचेष्टेने सर्वत्र प्रतिष्ठा वाढतेच असे नाही, बरं का! देशी औषधांचा गुण सावकाशीनं येतो, हे तुमचे लोकच कबूल करतील. तेच विलायती औषधांचं पाहा. औषध घेण्यापूर्वीच्या आणि औषध घेतल्यानंतरच्या रोग्याच्या स्थितीत तीन दिवसांत जमीन-अस्मानाचं अंतर!
वैद्य : सत्य आहे. म्हणजे जो रोगी जमिनीवर असायचा तो तीन दिवसांत अस्मानात जायचा!
डॉक्टर : डॉक्टरी विद्येचा अपमान होतो आहे हा!
वैद्य : आणि आयुर्वेदाची आपण हेटाळणी केलीत तेव्हा? मी आयुर्वेदाचा एक आधारस्तंभ आहे!
डॉक्टर : तू आयुर्वेदाचा आधारस्तंभ? अरे, औषधी कारखान्यात रोजावर खल चालवायला मजूर म्हणून तू होतास, एवढाच आयुर्वेदाच्या नावाला तुझा विटाळ! तू एखादा वैद्य का आहेस?
वैद्य : हात दाखवून अवलक्षण करून घेतलंस खरं! मग तू तरी डॉक्टर आहेस वाटतं! खलतांना देशी औषधं माझ्या हाताला तरी लागली होती. आणि तू डॉक्टर तर नाहीसच; पण नुसता कंपाउंडरसुद्धा नाहीस. एका डॉक्टरच्या दवाखान्यात थकलेली बिलं वसूल करण्याचं तुझं मूळचं काम! इतक्या हलक्या वशिल्यानं डॉक्टरी विद्येशी नातं जोडून आयुर्वेदाचा अपमान करीत आहेस!
मन्याबापू : अहो गृहस्थहो, तुमच्या बोलाचालीत आयुर्वेद, वैद्य, डॉक्टरी विद्या, डॉक्टर, असली मोठाली नावं कशाला हवीत? तुम्ही एकमेकांच्या नालस्त्या केल्यानं त्या मोठाल्या नावांना काही धक्का पोहोचत नाही. तुम्हा नामधारकांचा त्या पवित्र नावाशी काय संबंध आहे? वाऱ्यानं नकाशा फडफडला म्हणून काही देशात धरणीकंप होत नाही! आता आलाच आहात, तेव्हा एकोप्यानं नीट तळीरामाची प्रकृती पाहा, आणि सुखाच्या पावली आपापल्या घरी परत जा. हं, तळीराम, हो पुढं. वैद्यराज, डॉक्टर, आता वादंग नको उगीच! डॉक्टर, तुम्ही याची उजवी बाजू तपासा आणि वैद्यबुवा, तुम्ही याची डावी बाजू सांभाळा. (दोघे तळीरामला तपासू लागतात.)
वैद्य : काय करावं, शास्त्रात उजव्या हाताची नाडी पाहावी असं आहे. इथं आमच्या नाडया आखडल्या! याच्या डाव्या बाजूलाही नाडीपुरताच एक छोटासा उजवा हात असता तर काय बहार झाली असती!
डॉक्टर : नाडी झाली. आता जीभ काढा पाहू!
वैद्य : हं शास्त्रीबुवा; यांना आवरा! जीभ कोणाची? यांची का आमची? जीभ कोणालाच बघता यायची नाही. रोग्याला दोन तोंडं असती तर गोष्ट निराळी! तूर्तास जीभ लढयात पडली आहे! नुसता हात पाहण्यावरच भागवलं पाहिजे!
तळीराम : (स्वगत) काय करू! चांगला असतो तर एकेकाला असा हात दाखविला असता की, एका तोंडाची दोन तोंडं झाली असती!
डॉक्टर : नाडी फार मंद चालते!
वैद्य : नाडी फार जलद चालते!
डॉक्टर : थंडीनं हातपाय गार पडले आहेत.
वैद्य : तापानं अंगाला हात लाववत नाही!
डॉक्टर : झोप लागत नाही!
वैद्य : सुस्ती उडत नाही!
डॉक्टर : रक्तसंचय कमी झाला आहे!
वैद्य : रक्तसंचय फाजील झाला आहे!
डॉक्टर : पौष्टिक पदार्थांनी रक्ताचा पुरवठा केला पाहिजे!
वैद्य : फासण्या टाकून रक्तस्राव करविला पाहिजे!
डॉक्टर : नाही तर क्षयावर जाईल!
वैद्य : नाही तर मेदवृध्दी होईल!
तळीराम : काय हो, ही परीक्षा आहे का थट्टा आहे? दोघांच्या सांगण्यात जमीन अस्मानाचं अंतर! शास्त्रीबुवा, यापैकी एकटयानं मी मरण्याजोगा नव्हतो म्हणून या दोघांनाही आणलंत वाटतं?
डॉक्टर : असं कसं म्हणता? शरीरात डावं-उजवं हे असायचंच! अर्धशिशीच्या वेळी नाही का अर्धच डोकं दुखत? एकीकडे एक डोळा येतो तर एक डोळा जातो!
वैद्य : शिवाय, यांच्या-आमच्या पध्दतीचा विरोध लक्षात घेतला पाहिजे. यांच्या-आमच्या शब्दांत कुठं जमत असेल तर एकमेकांशी न जमण्यांत! त्या मानानं हा फरक असायचाच!
तळीराम : हं, मग ठीक आहे. आता माझ्या शरीराची वाटेल तशी दुर्दशा करा. एक बाजू क्षयानं रोडावली असून दुसरी बाजू मेदानं फुगून दिसते, असं सांगितलंत तर पहिलवान बाजूच्या वतीनं काडीपहिलवान बाजूला मी हसून दाखवितो! इतकंच नाही तर एका बाजूने मेलो असलो तर जित्या बाजूनं मेल्या बाजूला खांदा द्यायलासुद्धा माझी तयारी आहे! चालू द्या परीक्षा पुढे!
डॉक्टर : तत्राप रोग प्रयत्नसाध्य आहे.
वैद्य : रोग अगदी असाध्य आहे!
डॉक्टर : पथ्यपाणी केलं तर रोगी खडखडीत बरा होईल.
वैद्य : धन्वंतरी जरी कोळून पाजला तरी रोगी जगायचा नाही!
डॉक्टर : जीव गेला तरी रोगी मरायचा नाही!
वैद्य : तीन दिवसांत रोग्याचा मुडदा पाडून दाखवितो!
डॉक्टर : अहो, ही तुमची पैजहोड नको आहे. औषध काय द्यायचं ते द्या.
डॉक्टर : (स्वगत) आता या चोराला चांगलाच फसवितो. (उघड) ठीक आहे, माझ्याबरोबर मनुष्य द्या म्हणजे औषध पाठवितो. ते दिवसांतून तीन वेळा दारूतून द्यायचं! दारूचा सारखा मारा ठेवावा लागेल!
वैद्य : हे आमचं औषध. हे तीन दिवसांतून एकदा घ्यायचं, पथ्य दारू न पिण्याचं! दारूच्या थेंबाचा स्पर्श यांना होता कामा नये!
तळीराम : दारूचा स्पर्श नको? असं काय? शास्त्रीबुवा, उठवा या दोघांनाही! दारूचा स्पर्श नको काय? हं चला, उठा! डॉक्टर, तुमचं काय औषध आहे ते पाठवा आणि बाकीचा सारा दवाखाना त्या वैद्याला पाजा आणि वैद्यबुवा, तुम्ही आपला सारा आयुर्वेद या डॉक्टरच्या घशात कोंबा! चला निघा! (ते दोघे जातात.) काय नशिबाचा खेळ आहे पाहा! औषधासाठी दारू प्यायला सुरुवात केली तो दारूसाठी औषध पिण्यावर मजल येऊन ठेपली! खुदाबक्ष, काढा काही शिल्लक असेल तर! बस्स झाला हा पोरखेळ! (ते दारू आणतात; सर्वजण पिऊ लागतात.)
सुधाकर : थांबा, सगळी संपवू नका. असेल नसेल तेवढी दारू आता मला पाहिजे आहे. (एक खुर्ची, टेबल, दोन तीन शिसे वगैरे घेऊन पुढे येतो व पेला भरतो.)
शास्त्री : का, खुदाबक्ष? आमचं म्हणणं खरं झालं की नाही? सुधाकर, तुझ्या स्वभावाची परीक्षा बरोबर झाली होती ना? तुझी प्रतिज्ञा फुकट गेली.
सुधाकर : (पेला भरीत) माझ्या जोडीदार मूर्खांनो, तुम्हाला माझ्या स्वभावाची परीक्षा झाली असे नाही. पण मला माझ्या दुर्दैवाची परीक्षा झाली नाही! मित्रहो, बोलल्या न बोलल्याची एकदा मला माफी करा, पण या वेळी मला छेडू नका! जखमी झालेल्या सिंहाचं विव्हळणं ऐकूनसुद्धा भेकड सावजांना दूर व्हावं लागतं! मला हसायचं आहे? माझी कुचेष्टा करायची आहे? करा, खुशाल करा. पण एका बाजूला जाऊन करा! (सर्वजण मागे जातात. यानंतरचा प्रवेश शेवटच्या पडद्यावर.) सुधाकर ज्या रस्त्यानं जाणार आहे, तिथं संगतीसोबतीची त्याला जरुरी नाही. ये, मदिरे, ये. मदिरे, तू देवता नाहीस, हे सांगायला जगातल्या पंडितांचा तांडा कशाला हवा? तुझ्या जुलमी जादूनं जडावलेल्या जनावरालासुद्धा कळतं, की तू एक राक्षसी आहेस! तू घातकी राक्षसी आहेस! तू क्रूर राक्षसी आहेस! पण तू प्रामाणिक राक्षसी आहेस! गळा कापीन म्हणून म्हटल्यावर तू गळाच कापीत आली आहेस! घरादाराचा सत्यानाश करण्याचं वचन देऊन तू कधी अन्यथा कृती केली नाहीस! मृत्यूच्या दरवाज्यापर्यंत सोबत करण्याचं कबूल केल्यावर तू कधी माघार घेत नाहीस! सुंदर चेहेऱ्याचं तुझ्यामुळं भेसूर सोंग झालं तरी त्या चेहेऱ्याची तुला चटकन ओळख पटते! तू एखाद्याचं नाव बुडविलंस तरी अनोळखी पाजीपणानं तू त्याचं नाव टाकीत नाहीस! चल, मदिरे! आपल्या अघोर, घातुक शक्तीनं, सुधाकराच्या गळयाला मगरमिठी मार! मग या कंठालिंगानं सुधाकराचे प्राण कंठाशी आले तरी बेहत्तर! (भराभर पेले पितो. रामलाल येतो व सुधाकराच्या हातातला पेला घ्यावयास जातो.) बेअकली नादान! दूर हो- खबरदार एक पाऊल पुढं टाकशील तर! जा रामलाल, कोवळया पाडाचाच अघोर घास ओढून काढण्यासाठी आधी वाघाच्या उपाशी जबडयात हात घाल; आणि मग माझ्या समोरचा हा प्याला उचलण्यासाठी आपला तो हात पुढं कर!
रामलाल : अरेरे, सुधा, तुझ्या निश्चयाबद्दल सिंधूताईचा निरोप ऐकून मी मोठया आशेनं रे इथं आलो आणि तू हा प्रकार दाखविलास?
सुधाकर : त्यापेक्षाही मोठया आशेनं मी तो निश्चय केला होता; पण-
रामलाल : पण, पण-पण काय कपाळ? सोड, सुधा, अजून तरी ही दारू सोड रे-
सुधाकर : आता सोड? इतके दिवस दारू प्याल्यावर- वेडया, इतके दिवस कशाला? एकदाच प्याल्यावर दारू सोड? वेडया, दारू ही अशीतशी गोष्ट नाही की, जी या कानानं ऐकून या कानानं सोडून देता येईल! दारू ही एखादी चैनीची चीज नव्हे, की शोकाखातर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल! दारू हे एखादे खेळणे नव्हे, की खेळता खेळता कंटाळून ते उशापायथ्याशी टाकून देऊन बिनधोक झोप घेता येईल! अजाण मुला, दारू ही एक शक्ती आहे, दारू हे काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाडयाला घातलेली खीळ आहे. दारू ही पोरखेळ करता येण्यासारखी क्षुद्र, क्षुल्लक वस्तू असती, तर तिच्याबद्दल एवढा गवगवा जगात केव्हाच झाला नसता! हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरीसुद्धा जिचा अखंड ओघ चारी खंडांत महापुरानं वाहत राहिला, वेदवेदांची पानं जिच्या ओघावर तरंगत गेली, कठोर शक्तीचे मोठाले राजदंड जिच्या गळयात रुतून बसले, ती दारू म्हणजे काही सामान्य वस्तू नव्हे! दारूची विनाशक शक्ती तुला माहीत नाही! मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकाव धरून राहणारी इमारत दारूच्या शिंतोडयांनी मातीला मिळेल! दारूगोळयांच्या तुफानी माऱ्यासमोर छाती धरणारे बुरुज, या दारूच्या स्पर्शानं गारद होऊन जमीनदोस्त पडतील! फार कशाला, पूर्वीचे जादूगार मंतरलेले पाणी शिंपडून माणसाला कुत्र्या-मांजऱ्याची रूपं देत असत. ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकल्या-सवरलेल्या आजच्या पंडिताला केवळ थट्टेची वाटेल; पण रामलाल, दारूची जादू तुला पाहायची असेल, तर तुला वाटेल तो बत्तीसलक्षणी आणि सर्व सद्गुणी पुरुष पुढं उभा कर आणि त्याच्यावर दारूचे चार थेंब टाक; डोळयाचं पातं लवतं न लवतं तोच तुला त्या मनुष्याचा अगदी पशू झालेला दिसू लागेल! अशी ही दारू आहे, समजलास?
रामलाल : तुझ्या मनोनिग्रहानं, तुझ्या विचारशक्तीनं,- सुधा, सुधा, तू मनात आणल्यावर तुला काय करता येणार नाही? दारू कितीही अचाट शक्तीची असली तरी तिच्या पकडीतून तुला खात्रीनं सुटता येईल- आपल्या निश्चयाची नीट आठवण कर!
सुधाकर : कसला कपाळाचा तो निश्चय! दारूच्या बेशुध्दीत घोंगडीवर घरघरत पडलेल्या आसन्नमरणानं, शेवटच्या नजरेनं, एखाद्याला सावधपणानं ओळखल्यासारखं केलं, तर जीवनकलेच्या तशा तुटल्या आधारावर विवेकी पुरुषानं भरवसा ठेवून भागत नाही. आजपर्यंत मलासुद्धा असंच वाटत होतं; पण भाई, आता माझी पुरी खात्री झाली आहे की, दारूच्या पेचातून मनुष्याची कधीही सुटका व्हायची नाही! रामलाल, नदीच्या महापुरात वाहताना गारठयानं हातपाय आखडल्यावर, नदीत खात्रीनं आपला जीव जाणार, अशी जाणीव झाली तर बुडत्याला त्या पांगळया हातापायांनी ओघाच्या उलट पोहून नदीतून बाहेर येता येईल का? भडकलेल्या गावहोळीच्या फोफोटयात भाजून निघताना, जीव जाण्याची धास्ती वाटली तरी जळत्याला त्या जात्या जिवाच्या शेवटच्या श्वासांचे फुंकर मारून ती भोवतालची आग विझविता येईल का? मग या दोन्ही महाभूतांच्या ओढत्या-जळत्या शक्ती जिच्यांत एकवटल्या आहेत, त्या दारूच्या कबज्यात गळयापर्यंत बुडाल्यावर प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती लाभली तरी मरत्याला बाहेर कसं येता येईल? रामलाल, दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती वेळ म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वीचीच! पहिला एकच प्याला-- मग तो कोणत्या का निमित्तानं असेना- ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला! निव्वळ हौसेनं जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा हलकल्लोळ भडकल्यावाचून राहायचा नाही! रामलाल, दारूची कुळकथा एकदाच नीटपणानं ऐकून घे! दम खा! मला एकदा- (पेला भरून पितो. रामलाल तोंड खाली करतो.) बस्स, ऐक आता नीट! प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या दारूबाज आयुष्याच्या संमोहावस्था, उन्मादावस्था व प्रलयावस्था अशा तीन अवस्था हटकून होतात. या प्रत्येक अवस्थेची क्रमाक्रमानं सुरुवात एकच प्याला नेहमी करीत असतो. प्रत्येक दारूबाजाची दारूशी पहिली ओळख नेहमी एकच प्यालानं होत असते! थकवा घालविण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी, कुठल्याही कारणामुळं का होईना, शिष्टाचाराचा गुरुपदेश म्हणून म्हण किंवा दोस्तीच्या पोटी आग्रह म्हणून म्हण, हा एकच प्याला नेहमी नवशिक्याचा पहिला धडा असतो! एखादा अक्षरशत्रू हमाल असो; किंवा कवींचा कवी, आणि संजीवनी विद्येचा धनी एखादा शुक्राचार्य असो; दोघांचाही या शास्त्रातला श्रीगणेशा एकच- हा एकच प्याला! दारूच्या गुंगीनं मनाची विचारशक्ती धुंदकारल्यामुळं मनुष्याला मानसिक त्रासाची किंवा देहाच्या कष्टाची जाणीव तीव्रपणानं होत नाही, आणि म्हणून या अवस्थेत दारूबाजाला दारू नेहमी उपकारी वाटत असते. जनलज्जेमुळं आणि धुंद उन्मादाच्या भीतीमुळं- समजत्या उमजत्या माणसाला घटकेपुरतीसुद्धा बेशुध्दपणाची कल्पना अजाणपणामुळं फारच भयंकर वाटत असते आणि म्हणून सुरुवातीला जनलज्जेइतकीच नवशिक्या दारूबाजाला गैरशुध्दीची भीती वाटत असते! अशा दुहेरी भीतीमुळं या अवस्थेत मनुष्य, दुष्परिणाम होण्याइतका अतिरेक तर करीत नाहीच; पण आपल्याला पाहिजे त्या बेताची गुंगी येईल इतक्या प्रमाणातच नेहमी दारू पीत असतो. आणि म्हणून संमोहावस्थेत दारूबाजाला प्रमाणशीर घेतलेली दारू हितकारक आणि मोहकच वाटते! दारूच्या दुसऱ्या आणखी तिस ऱ्या परिस्थितीतले दुष्परिणाम त्याच्या इष्टमित्रांनी या वेळी दाखविले म्हणजे ते त्याला अजिबात खोटे, अतिशयोक्तीचे किंवा निदान दुसऱ्याच्या बाबतीत खरे असणारे, वाटू लागतात. सुरुवातीच्या प्रमाणशीरपणामुळं स्वत:चं व्यसन त्याला शहाण्या सावधपणाचं वाटतं आणि अवेळी दाखविलेली ही चित्रं पाहून, आपले इष्टमित्र भ्याले असतील किंवा आपल्याला फाजील भिवविण्यासाठी ती दाखविली जातात, अशी तरी स्वत:ची मोहक फसवणूक करून घेऊन दारूबाज आपल्या उपदेशकांना मनातून हसत असतो. याच अवस्थेतून न कळत आणि नाइलाजानं पुढच्या अवस्था उत्पन्न झाल्यावाचून राहात नाहीत. हे दुर्दैवी सत्य या वेळी मनुष्याला पटत नाही, आणि तो आपलं व्यसन चालू ठेवतो! परंतु मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर सवयीचा जो परिणाम होतो तोच तितक्यामुळे उद्या होत नाही आणि म्हणून दारूबाजाला रोजच्याइतकी गुंगी आणण्यासाठी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक दारू पिण्याचं प्रमाण अधिक वाढवीत न्यावं लागतं! या संमोहावस्थेच्या शेवटच्या दिवसांत तर हे प्रमाण वाढत वाढत इतक्या नाजूक मर्यादेवर जाऊन ठेपलेलं असतं, की बैठक संपल्यानंतर एकच प्याला अधिक घेतला तर तो अतिरेकाचा झाल्यावाचून राहू नये! या सावधपणाच्या अवस्थेची मुख्य खूण हीच असते, की अगदी झोप लागण्याच्या वेळी मनुष्य पूर्ण सावध असतो. निशेचा थोडासा तरी अंमल असेल अशा स्थितीत त्याला झोप घेण्याचा धीर होत नाही. अशा स्थितीत एखाद्या दिवशी कुठल्या तरी कारणामुळे विशेष रंग येऊन मित्रमंडळी एकमेकांना आग्रह करू लागतात. आपण होऊन आपल्या प्रमाणाच्या शुध्दीत राहण्याच्या कडेलोट सीमेवर जाऊन बसलेल्या दारूबाजाला त्या बैठकीचा शेवटचा म्हणून आणखी एकच प्याला देण्यात येतो. संमोहावस्था संपून उन्मादावस्था पहिल्यानं सुरू करणारा असा हा एकच प्याला! बरळणं, तोल सोडणं, ताल सोडणं, कुठं तरी पडणं, काहीतरी करणं या गोष्टी या अतिरेकामुळे त्याच्याकडून घडू लागतात. रामलाल, ही भाकडकथा ऐकून कंटाळू नकोस. या पुढच्या अवस्थांत जितक्या जलदीनं दारू मनुष्याचं आख्यान आटोपतं घेत जाते, तितक्याच जलदीनं मी दारूचं आख्यान आटोपतं घेतो. या उन्मादावस्थेत दररोज मनुष्याला भरपूर उन्माद येईपर्यंत दारू घेतल्याखेरीज चैन पडत नाही आणि समाधान वाटत नाही. इतक्या दिवसांच्या सरावामुळे शरीर आणि मन यांना जगण्यासाठी दारू ही अन्नापेक्षा अधिक आवश्यक होऊन बसते. या उन्मादावस्थेत निशेच्या अतिरेकामुळे वेळोवेळी अनाचार आणि अत्याचार घडतात. सावधपणाच्या काळी पश्चात्तापामुळे तो हजारो वेळा दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो, आणि कमकुवत शरीराच्या गरजेमुळे तितक्याच वेळा त्या प्रतिज्ञा मोडतो. कंगाल गरिबी आणि जाहीर बेअब्रू यांच्या कैचीत सापडून तो दारू सोडण्याचा प्रयत्न करतो आणि निर्जीव शरीर आणि दुबळे मन यांच्या पकडीत सापडून तो अधिकाधिक पिऊ लागतो. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही; आणि या अवस्थेत दारू मनुष्याला सोडीत नाही. मद्यपानाचे भयंकर दुष्परिणाम भावी काळी आपल्याही ठिकाणी शक्य आहेत अशी दूरदृष्टीने भाग्यशाली जाणीव झाली तर एखादा नवशिका दारूबाज अतिशय करारीपणानं, पोलादी निश्चयानं आणि अनिवार विचारशक्तीनं पहिल्या अवस्थेत असताना एखादे वेळी तरी दारूचं व्यसन सोडायला समर्थ होईल. पण या दुसऱ्या अवस्थेत काही दिवस घालविल्यानंतरही दारूच्या पकडीतून अजिबात सुटणारा मनुष्य मात्र अवतारी ताकदीचा, ईश्वर शक्तीचा, आणि लोकोत्तर निग्रहाचाच असला पाहिजे. उत्तरोत्तर अनाचार वाढत जातात आणि त्यानंतरचे पश्चात्तापाचे क्षण मनाला सहन होईनासे होतात. अशा वेळी जगात तोंड दाखवायला वाटणारी लाज कोळून पिण्यासाठी निर्लज्जपणानं दारू कधीही सुटणार नाही. आणि पश्चात्तापामुळे पिळून काढणारा सावधपणाचा एकही क्षण आपल्याजवळ न येऊ देण्याच्या निश्चयानं अष्टौप्रहर आणखी अखंड गुंगीत पडून राहण्यासाठी म्हणून तो एकच प्याला घेतो; दारू न पिण्याची प्रतिज्ञा मोडतो; आणि पुन्हा तशी प्रतिज्ञा करीत नाही. हा एकच प्याला म्हणजे तिसऱ्या प्रलयावस्थेची सुरुवात! भाई, आज सकाळी सिंधूजवळ प्रतिज्ञा करताना मला मूर्खाला कल्पनासुद्धा झाली नाही, की आजच्या दिवशीच माझ्या आयुष्याची प्रलयावस्था सुरू होणार आहे! सकाळची सिंधूची आनंदी मुद्रा, तो आनंदाश्रू, मिटत चाललेल्या माझ्या डोळयांतली अखेरच्या आशेची ती निस्तेज लकाकी, वेडया आशेच्या भरात, आम्ही दोघांनी चुंबन घेतल्यामुळं बाळाच्या कोवळया गालावर आलेली लाली- भाई, आमच्या चिमुकल्या जगातला तो शेवटचा आनंद- तो आनंद - जाऊ दे या एकच प्याल्यात! (दारू पितो.) वेडया, आता वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. इतका वेळ मी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून अजाण जिवा, तुला थोडीशी आशा का वाटू लागली आहे? माझं हे ब्रह्मज्ञान पश्चात्तापाचं नाही; ते विषारी निराशेचं आहे. माझ्या दारूबाज आयुष्यातली ही तिसरी प्रलयावस्था आहे. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही. दुसऱ्या अवस्थेत दारू मनुष्याला सोडत नाही, आणि तिसऱ्या अवस्थेत दोघेही एकमेकांला सोडीत नाहीत. या अवस्थेत दारू आणि मनुष्य यांचा इतका एकजीव झालेला असतो की, जीव जाईपर्यंत त्यांचा वियोग होत नाही. अष्टौप्रहर दारूच्या धुंदीत पडला असता त्या धुंदीच्या गुंगीतच एखादा रोग बळावल्यामुळं म्हण, एखाद्या मानसिक आघातामुळं म्हण किंवा आकस्मिक अपघातामुळं म्हण; त्याचा एकदाचा निकाल लागतो. आणि तो निकाल जवळ आणण्यासाठी अशी भराभर दारू घेत बसणं, एवढंच या जगात माझं काम आहे. हा एक- आणखी एक- बस्स, आणखी एकच प्याला! (पुन्हा भराभर पितो.)
रामलाल : सुधा, सुधा, काय करतो आहेस हे तू?
सुधाकर : काय करतो आहे मी? ऐक, रामलाल! तू माझा जिवलग मित्र, निस्सीम हितकर्ता आहेस; पण तुझ्याहूनही माझा एक अधिक निस्सीम हितकर्ता- माझाच नाही, एकंदर जगाचा- जीवमात्राचा एक जिवलग मित्र, निस्सीम हितकर्ता आहे. त्याच्या सन्मानाचा मी प्रयत्न करीत आहे. ज्याच्यापुढं धन्वन्तरीनंसुद्धा हात टेकले आहेत; अशा रोग्याच्या यातनांनी तळमळणाऱ्या जिवाला अखेर कोण हात देतो? मृत्यू! दुष्काळाच्या उपासमारीमुळं तडफडून केविलवाण्या नाइलाजानं एकमेकांकडे पाहणाऱ्या मायलेकरांच्या दु:खाचा शेवट कशानं होतो? मृत्यूनं! आपल्या जुलमी जोरानं जीवकोटीला त्राही त्राही करून सोडणाऱ्या नराधमाच्या नाशासाठी निराश मनुष्यजाती अखेर कोणाच्या तोंडाकडे पाहते? मृत्यूच्या! तो मृत्यू तुला आणि मला भेटण्यासाठी यायचाच! अशा परोपकारी काळपुरुषाला दोन पावलं आणायला गेलं तर त्यात आपली माणुसकी दिसून येऊन त्याचे तेवढे कष्ट वाचतील. अशा रीतीनं यमाला सामोरा जाण्यासाठी या दुबळया देहात मी दारूनं थकवा आणीत आहे. रामलाल, दुसऱ्याचा नाश केल्यामुळं आपल्याला खून चढतो खरा; पण मी ही आत्महत्या करीत आहे, तिचाच मला खून चढत चालला आहे! भल्या मनुष्या, खुनी इसमासमोर उभं राहणं धोक्याचं असतं! (पुन्हा पितो.)
रामलाल : पण असा जिवाचा त्रागा करायचं काय कारण आहे?
सुधाकर : काय कारण? एकच कारण- आणि तेही हा एकच प्याला!
रामलाल : एकच प्याला- एकच प्याला- या एकच प्याल्यात आहे तरी काय एवढं?
सुधाकर : या एकच प्याल्यात काय आहे म्हणून विचारतोस? भाई, अगदी वेडा आहेस! या एकच प्याल्यात काय काय नाही म्हणून तुला वाटतं? (प्याला भरून) हा पाहा एकच प्याला! हा भरलेला आहे खरा! यात काय दिसतं आहे तुला? रामलाल, मनुष्याच्या आयुष्यात निराशेचा शेवटचा असा काल येतो, की ज्या वेळी जीविताची आठवण मोहानं त्याला फसवू शकत नाही आणि मरणाच्या खात्रीमुळं तो स्वत:च्या देहावर मृत्यूच्या दरबाराची सत्ता कबूल करायला लागतो- मृत्यूच्या भयानक स्वरूपाशी मनुष्याशी दृष्टी परिचयानं एकरूप होताच, तो क्षणभंगुर जगाकडे काळाच्या क्रूरपणानं पाहू लागतो. मनुष्यहृदयातल्या सहज काव्यस्फूर्तीतही हा दृष्टीतला क्रूरपणा खेळू लागतो. अशा वेळी तीव्र निराशेनं कडवटलेल्या मृत्यूच्या क्रूर काव्यदृष्टीनं पाहताना सुंदर वस्तूंबद्दलसुद्धा भयाण कल्पना आठवतात. त्या दृष्टीनं पाहताना, आईच्या मांडीवर समाधानानं स्तनपान करणारं मूल दिसलं, की ते तिथल्या तिथे मेलं तर त्या आईला काय दु:ख होईल, असं चित्र अशा क्रूर कल्पनेपुढं उभं राहतं! हळदीनं भरलेली नवी नवरी पाहताच वपनानंतर ती कशी दिसेल याबद्दल कल्पना विचार करू लागते! रामलाल, मी हल्ली त्या अवस्थेत आहे आणि माझ्या कल्पनेला मद्यपानाच्या ज्योतीची ज्वाला प्रदीप्त करीत आहे. अशा वेळी मी उचंबळून बोलत आहे! आता माझ्या दृष्टीनं या एकच प्याल्यात काय भरलेलं आहे ते पाहा! पृथ्वीनं आपल्या उदरीच्या रत्नांचा अभिलाष केल्यामुळे खवळलेल्या सप्तसमुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पालाण घालण्याचा विचार केला; त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्मपृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उद्धार केला! पुढे विश्वाला जाळण्याच्या अभिमानानं आदित्यानं बारा डोळे उघडले! त्या अग्निप्रलयात एका वटपत्रावर चित्स्वरूप अलिप्त राहून त्यानं सारी सृष्टी पुन्हा शृंगारली! उभयतांच्या या अपमानामुळं अग्नि आणि पाणी यांनी आपापलं नैसर्गिक वैर विसरून सजीव सृष्टीच्या संहाराचा विचार केला! परीक्षितीचा प्राण घेण्यासाठी मत्सराच्या त्वेषानं तक्षकानं बोरातल्या आळीचं रूप घेतलं, त्याप्रमाणे खवळलेले सप्तसमुद्र सुडाच्या बुध्दीनं या इवल्याशा टीचभर प्याल्यात सामावून बसले; आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्यांच्या मदतीला दिली! मनुष्याच्या दृष्टीला भूल पाडणारा मोहकपणा आणण्यासाठी, तरण्याताठया विधवांच्या कपाळाचं कुंकू कालवून या बुडत्या आगीला लाल तजेला आणला! या एकाच प्याल्यात इतकी कडू अवलादीची दारू भरली आहे! नीट बघितलीस ही दारू? (प्याला पितो.) आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसतं तुला? काही नाही? नीट पाहा, म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूपदर्शनप्रसंगी यशोदेला जे चमत्कार दिसले नसतील, ते या रिकाम्या प्याल्यात तुझ्या दृष्टीला दिसतील! काबाडकष्ट उपसून आलेला थकवा घालविण्याच्या आशेनं दारू पिणाऱ्या मजुरांच्या या पाहा झोपडया! निरुद्योगाचा वेळ घालविण्यासाठी म्हणून दारू पिणाऱ्या श्रीमंतांच्या या हवेल्या! केवळ प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू प्यायला शिकलेल्या, शिकलेल्या पढतमूर्खाचा हा तांडा! अकलेच्या मार्गानं न साधणारी गोष्ट मजलशीत एखाद्याजवळून साधून घेण्यासाठी धूर्ततेनं त्याच्याबरोबर म्हणून थोडीशी घ्यायला लागून पिता पिता शेवटी स्वत:ही बुडालेल्या व्यवहारपंडितांची ही पागा! उद्योगी, गरीब, आळशी श्रीमंत, साक्षर पढतमूर्ख, निरक्षर व्यवहारी सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पाहा एकच प्याला! दारूबाज नवऱ्याच्या बायकांची ही पाहा पांढरी फटफटीत कपाळं! दारूबाजांच्या पोरक्या पोरांच्या या उपासमारीच्या किंकाळया, कर्त्यासवरत्या मुलांच्या अकाली मरणानं तळमळणाऱ्या वृद्धा मातापितरांचं विव्हळणं! चोरीस गेलेल्या चौदा रत्नांच्या मोबदल्यासाठी या एकच प्याल्यात सामावलेल्या सप्तसमुद्रांनी दारूच्या रूपानं भूमातेची कैक नररत्न अकाळी पचनी पाडली! स्त्रीजातीला नटविण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितकी मोती बाहेर निघाली त्याच्या दसपट आसवांची मोती दारूमुळं स्त्रीजातीनं या एकच प्याल्यात टाकली आहेत! बेवारशी बायकांची बेअब्रू, बेशरम बाजारबसव्यांची बदचाल, बेकार बेरडांची बदमाषी! बेचिराख बादशहाती, जिवलग मित्रांच्या मारामाऱ्या, दंगलबाजी, खून- रामलाल, हा पाहा, जगावर अंमल चालविणारा बादशाहा सिकंदर, दारूच्या अमलाखाली केवळ मारेकरी बनून आपल्या जिवलग मित्राचा खून करीत आहे! तो पाहा, मेलेल्याला सजीव करणारा दैत्यगुरू शुक्राचार्य, आपल्या त्या संजीवनीसह या एकच प्याल्यात बुडून अध:पात भोगीत आहेत! (पेल्यात दारू भरू लागतो; रामलाल त्याचा हात धरू लागतो.) हट्टी मूर्खा, अजून माझा हात धरतोस! आता माझा हात धरून काय फायदा होणार? अजून तुला हा एकच प्याला थट्टेचा वाटतो का? रामलाल, अनादिकालापासून समुद्रात बुडालेली जहाजं; मनुष्यसंसाराचा अफाट पसारा, ही सारी एकवटून लक्षात आणली म्हणजे सामान्य मनुष्यबुध्दीला त्या सर्वांनी गजबजलेला समुद्राचा तळ भयानक वाटू लागतो. भाई, तू बुध्दिवान आहेस आणि कल्पकही आहेस. माझ्या हातातला हा लहानसा एकच प्याला तुझ्या कल्पनेच्या विश्वात इतका मोठा होऊ दे, की या सुंदर जगाचा जितका भाग त्या पेल्याच्या तळाशी रुतून बसला आहे, तो तुझ्या डोळयांसमोर नाचू लागेल. तुझी दृष्टी भेदरू लागली, तरळू लागली! रामलाल, हाच तो विराट्स्वरूप एकच प्याला! रामलाल, हे उग्र आणि भयानक चित्र नीट पाहून ठेव. माझ्या हातचा पेला काढून घेण्याच्या भलत्या भरीला पडू नकोस. परोपकारी मनुष्या, इतका वेळ घसा फोडून तुझ्या कल्पनेपुढं हा विराट्स्वरूप एकच प्याला मूर्तिमंत उभा केला, तो या सुधाकरासाठी नव्हे. जा, साऱ्या जगात तुझ्या वैभवशाली वाणीनं हे मूर्तिमंत चित्र हा विराट्स्वरूप एकच प्याला- अशा उग्र स्वरूपात प्राणिमात्राच्या डोळयांपुढं उभा कर! चारचौघांच्या आग्रहानं, किंवा कुठल्याही मोहानं फसलेला एखादा तरुण पहिला एकच प्याला ओठाशी लावतो आहे तोच हा विराट्स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळयांपुढं उभा राहून त्याच्या भेदरलेल्या हातांतून तो पहिला एकच प्याला गळून पडला आणि खाली पडून असा खळ्कन भंगून गेला, तरच या सुधाकराचा दारूत बुडालेला जीव सप्तपाताळाच्या खाली असला तरी समाधानाचा एक नि:श्वास टाकील! रामलाल, यापुढं हे तुझं काम आणि हे माझं काम! (पितो.)
रामलाल : सुधाकर, डोळयांनी पाप पाहावत नाही म्हणतात, पण आता यापुढं मात्र-
सुधाकर : प्रतिज्ञा पुढं बोलूच नकोस; म्हणजे ती मोडल्याचं पाप लागणार नाही. भाई, माझं दारूचं व्यसन एक वेळ सुटेल, पण माझं व्यसन सोडविण्याचं वेड तुझ्या डोक्यातून मात्र जाण्याचं कठीण दिसतं. रामलाल, एकच प्याला, एकच अनुभव- केवळ दारूपुरताच हा सिद्धान्त मी तुला सांगितला नाही. मोहाची जी जी वस्तू असेल, त्या प्रत्येकीच्या बाबतीत हाच सिद्धान्त आहे. स्त्रियांची गोष्ट घे; एखाद्या स्त्रीकडे कित्येक वेळा पाहिलं- दयेनं पाहा, ममतेनं पाहा- जाऊ दे- रामलाल, तू शहाणा आहेस, आणि शरद्- माझी ती बहिणच आहे- तू तिला मनापासून मुलगी मानलीच आहेस. चांडाळाच्या मनातसुद्धा इथं पापाची कल्पना येणार नाही ना? लाख वेळा तू तिच्याकडे निर्दोष दृष्टीनं पाहिलं आहेस ना? - जा, बोलण्याच्या भरात बेसावधपणानं तिच्या अंगाला एकदा नुसता स्पर्श कर! भाई, एकच स्पर्श- पण तेवढयानं माणुसकीचं मातेरं होऊन, तू जन्माचा पशू होशील!
रामलाल : (स्वगत) एकच प्याला! एकच स्पर्श! शब्दाचं शहाणपण शिकवायला म्हणून मी इथं आलो! आणि शहाणपणाचे शब्द शिकून परत चाललो! एकच प्याला! एकच स्पर्श! एकच कटाक्ष! मोहाच्या कोणत्याही वस्तूचा पहिला प्रसंग पहिला प्रसंगच टाळला पाहिजे- नंतर सावधपणानं वागणं म्हणजे जन्माचा पशू! शरद्चा एकच स्पर्श! पशू! (उघड) सुधा, आधी घरी चल. (जातात.)
प्रवेश पाचवा
(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू दीन वेशाने दळीत आहे. पाळण्यात मूल.)
सिंधू : चंद्र चवथिचा। रामच्या गं बागेमधे चाफा नवतिचा॥
(दोन चार वेळ म्हणते) (पाळण्यात मूल रडू लागते.) अगं बाई, बाळ उठला वाटतं! (उठून त्याला पाळण्यातून बाहेर घेते.) आज चवथीची ही चिमुकली चंद्रकोर लवकर का बरं उगवली? चतुर्थीचा उपास लागला वाटतं चिमण्या चंद्राला? भूक लागली का बाळाला? बाळ, थांब हं जरा. आता गीताबाई येतील, त्यांना दूध आणायला सांगू माझ्या बाळासाठी बरं! आता का बरं काजळकाठ भिजवतोस असा? मघाशी थोडं दूध पाजलं होतं तेवढयावरच थोडा वेळ काढायला नको का? असा हट्ट करू नये? मागितल्या वेळी दूध मिळायचे दिवस, राजसा, आता आपले नाहीत रे! आपल्या लेखी गोकुळीच्या गोठणी ओस पडल्या!
(राग- कालंगडा; ताल- दीपचंदी. चाल- छुपनापे रंग.) बघू नको मजकडे केविलवाणा, राजस बाळा॥ ध्रु.॥ ये देवा। अपुली ना करुणा तोवरी समजुनी। वर्ते अनुकाला॥ 1॥
गरिबीत लहान जिवालासुद्धा मोठया माणसाची समजूत यायला हवी बरं, बाळ! अस्सं, आता कसा बरा हसलास! असाच शहाणपणा शिकला पाहिजे आता! गुणाचं मोठं गोजिरवाणं आहे माझं! दृष्टसुद्धा लागेल एखाद्याची अशा गुणाच्या करणीनं! झालं, लागलीच दृष्ट! आली बाळगंगा डोळयांतून! माझ्या डोळयांतून पाणी आलं म्हणून का वाईट वाटलं तुला? बाळा, मी रडते म्हणून तू सुद्धा असा रडणारच का? मी रडू नको तर काय करू? आज वाटलं, देवाला दया आली म्हणून! चांगली शपथ घेऊन सोडणं झालं होतं; पण आपलं दैव आड आलं! आताच भाईनं सांगून पाठविलं, की क्लबात जाऊन पुन्हा घ्यायला सुरुवात झाली म्हणून! आता बाळा, संसाराला तुझाच काय तो आधार! बाळ, लौकर मोठे व्हा, आणि आपल्या गोजिऱ्या हातांनी माझी आसवं पुसून टाका! तोवर या आसवांच्या अखंड धारेनं तुझ्या आटलेल्या दुधाचा वाढावा करायला नको का? ऐकता ऐकता डोळे मिटून ध्यान मांडलं का इतक्यात? हसायला वेळ नाही, न रडायला वेळ नाही! नीज, मी गाणं म्हणते हं! (त्याला मांडीवर निजवून पुन्हा दळू लागते. इतक्यात गीता प्रवेश करते.) चंद्र चौथिचा। रामाच्या गं बागेमध्ये चाफा नवतिचा! (पुन्हा पुन्हा म्हणू लागते. गीतेला पाहून) अगं बाई! गीताबाई, अशा उभ्या का? बसा ना? आज तळीरामांची तब्येत कशी आहे? काही उतार वाटतो आहे का?
गीता : उतार नाही न् काही नाही! पण बाईसाहेब, काय तुमची दशा ही? जात्याची घरघरसुद्धा अशा गाण्यानं गोड करून घेता आहात, तेव्हा धन्य म्हणायची तुमची!
सिंधू : म्हणतात ना, वासना तशी फळं! बाबांच्या घरी माझ्या लहानपणी आमची मोलकरीण रोज पहाटेची गोड गळयावर हे गाणं म्हणून दळीत असायची; मी नित्यनेमानं आपली अंथरुणावर पडल्या पडल्या ते ऐकायची. बाळपणाची समजूत- एकदा आलं सहज मनात, आपणही असंच गाणं म्हणून दळावं असं; देव बापडा कुठं तेवढंच ऐकत होता; त्या वेळी त्याला माझा बाळहट्ट नाही पुरवता आला; आता सटवीच्या फेऱ्यात सापडून पुन्हा बाळपण लाभलं आणि दळण्याची हौस फिटली! त्या गोष्टीची आठवण होऊन गाणं म्हणत होते झालं! हो पण, काय हो गीताबाई, संध्याकाळी हे दळण द्यायचे आहे, त्याचे किती पैसे मिळायचे आहेत?
गीता : सहा!
सिंधू : मग ते आता नाही का मिळायचे?
गीता : कामाआधी कसे मिळतील?
सिंधू : अगदी हातापाया पडले तरी नाही का मिळायचे?
गीता : त्या घरची माणसं मोठी नतद्रष्ट आहेत मेली! पाप मागितल्यानं द्यायची नाहीत कुणाला! पण बाईसाहेब, आताच कशाला हवे होते पैसे?
सिंधू : (स्वगत) आता काय सांगायचं या मुलीजवळ? घरात चिमणीच्या चाऱ्यापुरतासुद्धा आधार नाही, हे कसं सांगू हिला? देवा लक्ष्मीनारायणा, कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविशी दारोदारी! यात पुरुषार्थ- पण तुझ्याकडे काय दोष? पूर्वजन्मी केलं ते कपाळी उमटलं, त्याला तू काय करणार? मागल्या जन्मी ब्राह्मण ताटावरून उठवला असेल म्हणून आज अन्नासाठी दाही दिशा पाहणं आलं; अतीत अभ्यागताला रित्याहाती दवडलं असेल म्हणून घरची लक्ष्मी पारखी झाली! हिरव्या कुरणांतून गाईगुजीला हाकललं असेल, तेव्हा आज बाळाला दूध मिळत नसेल! आमचं संचित खोटं, तिथं तुझ्याकडे काय बरं गा-हाणं आणायचं?
(राग- सावन; ताल- रूपक. चाल- पति हूं पियूं.) कशी मी प्रभो निंदू तुला। नच बघे तुझ्या दोषा। कोणावरी रोषते। अणुही धरी न मी। दोषी स्वभावा! ॥ ध्रु.॥ संचित छळिते। माझे असे। भजनी त्याच्या। नच बललव तुझ्या अमरा दयेला॥ 1॥
गीता : सांगितलं नाही तुम्ही कशाला आता हवेत पैसे ते?
सिंधू : काय सांगायचं, गीताबाई? आज किनई आमच्या घरात अन्नपूर्णामाई अगदीच रुसून बसली आहे हो! देवाच्या अक्षतांपुरतेसुद्धा तांदूळ नाहीत घरात! म्हणून म्हणत होते- मूठभर भात उकडला म्हणजे मध्यान्ह टळेल कशी तरी! माझ्यापाशी हे एवढे दोन पैसे बाळाच्या दूधापुरते आहेत काय ते!
गीता : हात्तीच्या, अहो, मग माझ्या- (स्वगत) अगंबाई, पण माझ्याजवळचे म्हटले तर या घ्यायच्या नाहीत! (उघड) बाईसाहेब, तसं आवर्जूनच मागितले तर त्यांच्याकडून- किती बरं? (पैसे मोजीत) एक, दोन, तीन अन् (उघड) चार पैसे मिळतील! नाही असं व्हायचंच नाही अगदी! येऊ का जाऊन? अगदी उभ्या उभ्या आले हं-
सिंधू : अगदी बसल्या बसल्यासुद्धा आणाल! हं बघा, तसं नको, हे दोन पैसे घ्या आणि बाळासाठी आधी दूध आणा! मघापासून तो भुकेनं कासावीस झाला आहे! तंवर मी हे दळण आटोपते! मग ते घेऊन जा म्हणजे झालं!
गीता : बाईसाहेब, एक दहा वेळ तोंडावर आलं असेल, पण आता टाकतेच बोलून! तुमच्या घराची अशी विटंबना झाली आणि तुम्ही तिकडच्या तब्येतीच्या चौकशी करता! त्या दिवशी कथेत ऐकलं, त्या घटकेपासून माझ्या मनाला कसा चटका लागला आहे! घटोत्कचाला कर्णाची शक्ती लागली तेव्हा त्यानं विचार केला की, मागं पडलो तर पांडवांचीच माणसं चेंगरून मरतील! म्हणून तशात पुढं झेप घालून त्यानं एवढं मोठं कलेवर कौरवसेनेवर टाकलं! बघा! एकेकांनी मरता मरता आपल्या माणसांची हितं पाहिली आणि आमच्याकडून अगदी अखेरी-अखेरीला दादासाहेबांना ही दारूची सवय लावली, आणखी तुमच्या सोन्यासारख्या सोज्ज्वळ संसारात माती कालवली! होणं जाणं कुणाच्या हातचं नसतं, पण त्यापेक्षा आपलं आज-उद्या व्हायचं तेचं चार वर्स आधी!
सिंधू : हं गीताबाई, असं भलतं बोलावं का? जा, घरातून ते भांडं घेऊन लौकर जाऊन या पाहू आधी! वेडया नाही तर कुठल्या! आणखी हे बघा, बाळ मांडीवर निजला आहे, म्हणून दळताना अवघडल्यासारखं होतं; त्याला तेवढा असाच त्या अंथरुणावर नेऊन ठेवा पाहू जाता जाता! (गीता मुलाला घेऊन जाते.) 'चंद्र चवथिचा-' (मूल रडू लागते.) अगं बाई, जागा झाला वाटतं? आणा त्याला इकडे, गीताबाई! (गीता मुलाला परत आणून देते व जाते.) लौकर या बरं का? (मुलाला) बाळ, का बरं झोपमोड झाली तुमची? फार लागली का भूक? आत्माराम भुकेनं तळमळत असल्यावर डोळयाला डोळा लागणार तरी कसा? बाळ, जरा थांब, आता येतील हं गीताबाई! अगं बाई, असा उपाशी आशेनं या पिठाकडे पाहायला लागलास? बाळ, अश्वत्थामाला त्याच्या आईनं पीठपाणी कालवून देऊन त्याची दूधाची तहान कशी तरी भागवली! पण बाळ, आपली नशिबं अगदीच पांगळी आहेत; यातल्या चिमूटभर पिठावरसुद्धा आपली सत्ता नाही! ते लोकांचं आहे! त्या पीठपाण्याचा ओघळ तुझ्या तोंडावर पाहिला, तर राजसा, तारामतीचा रोहिदास तुला हसून हिणवायचा नाही का?
(राग- भैरवी; ताल- पंजाबी. चाल- बाबुल मोरा.) गुणगंभीरा। त्यजि न लव धीरा॥ ध्रु.॥ सत्त्वपरीक्षा महा। यदा परमेश्वर नियोजी। अवसाद तेव्हा उचित का वीरा? ॥ 1॥ नको रडवं तोंड करू गडे! त्या पाहा आल्या हं गीताबाई दूध घेऊन! (पाहून) अगं बाई, येणं झालं वाटतं! पण हे कसलं येणं? देवा, काय पाहणं नशिबी आणलंस हे? (सुधाकर येतो- त्याचे पाय लटपटत आहेत.)
सुधाकर : सिंधू, इकडे ये, मला आणखी प्यायची आहे! फार नाही, फक्त एकच प्याला! पैसे आण! सिंधू, पैसे आण!
सिंधू : आता कुठले बरं आणू पैसे मी? माझ्याजवळ काही नाही अगदी!
सुधाकर : खोटं बोलतेस! आहेत! चल आण! आणतेस की नाही? का जीव घेऊ?
सिंधू : आपल्या पायांशपथ मजजवळ आता काही नाही. आता दोन पैसे होते तेवढे बाळासाठी दूध आणायला दिले तेवढेच! अगदी बाळाच्या गळयावर हात ठेवून सांगते हवी तर!
सुधाकर : त्याचा गळा दाबून टाक! का दिलेस पैसे?
सिंधू : बाळासाठी नकोत का द्यायला? असं काय करायचं हे?
सुधाकर : चल जाव! मला नाहीत आणि त्याला पैसे आहेत? नवऱ्यापेक्षा ते कारटं जास्त आहे काय? सिंधू, तू पतिव्रता नाहीस! हरामखोर! ते कारटं त्या रामलालचं आहे! माझं नाही!
सिंधू : शिव शिव! काय बोलणं हे?
सुधाकर : शिव शिव नाही, रामलालच आहे! आता मारून टाकतो! (एक मोठी काठी घेऊन मुलाकडे जातो.)
सिंधू : (घाबरून) अगं बाई, आता कसं करू? हाका मारून चारचौघांना जमविलं तर तिकडून काही तरी भलतंच व्हायचं! देवा, काय रे करू आता? माझ्या फाटक्या अंगाचं मायेचं पांघरूण कसं पुरणार माझ्या बाळाला आता! (सुधाकर काठी मारतो. सिंधू मध्ये येते; तिला काठी लागून खोक पडून ती बेशुध्द पडते.)
सिंधू : देवा, सांभाळ रे माझ्या बाळाला!
सुधाकर : तू मर! आता कारटं मर जाव! (काठी मारतो. मूल मरते.) (पद्माकर येतो.)
पद्माकर : हरामखोरा, काय केलंस हे?
सुधाकर : काही नाही; आणखी प्यायची आहे- एकच प्याला!
***