Nirbhaya - 2 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया - part 2

Featured Books
Categories
Share

निर्भया - part 2

निर्भया - २

दीपाच्या मैत्रिणीच्या लग्नसमारंभात राकेशने तिला पाहिलं होतं. त्याला ती एवढी आवडली होती, की तिच्या मैत्रिणींकडून तिची सर्व माहिती त्याने मिळवली होती, तिला सतत भेटून मैत्री वाढवण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि तिची सतत मनधरणी करून शेवटी तिची मैत्री मिळवण्यात यशस्वी झाला होता. दीपालाही देखणा, सुशिक्षित आणि मनमिळाऊ राकेश आवडला होता.

दीपाचे वडील त्या विभागातले नावाजलेले डॉक्टर होते. आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर बनवून समाजाची सेवा चालू ठेवायची हे त्यांचं ध्येय होतं. पण दुर्दैवाने दीपा कोलेजमधे शिकत असताना एका अॅक्सिडेंटमध्ये त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. आई खूप आजारी पडली. तिला जबरदस्त मानसिक धक्का बसल्यामुळे डिप्रेशन आलं.

त्यावेळी नितीन लहान होता. घराची सगळी जबाबदारी दीपावर येऊन पडली. मेडिकलला अॅडमिशन घेऊन डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही ; हे तिने ओळखलं आणि नर्सिंगचा कोर्स केला. काही दिवसांपूर्वीच तिला अंधेरीच्या एका मोठ्या हाॅस्पिटलमधे नोकरी मिळाली होती. सगळ्या जबाबदा-या पूर्ण करून नंतरच लग्न करायचं असं तिने ठरवलेलं होतं. नितीनला डॉक्टर करून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणे; हे तिने जीवनाचं ध्येय ठरवलं होतं. याच काळात तिची राकेशबरोबर ओळख झाली.

याच राकेशने तेव्हा तिचं मन जिंकण्यासाठी जिवाचं रान केलं होतं. आताचा राकेश आणि तो राकेश यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता. त्यावेळी तो दीपासाठी काहीही करायला तयार होता. त्यामुळे दीपाच्या मनातही त्याच्याविषयी ओढ निर्माण झाली. पण इतक्यात लग्न कायचं नाही, असा ठाम निश्चय केलेला असल्यामुळे तिने कधीही प्रेम व्यक्त केलं नाही. मैत्रीच्या सीमारेषा ओलांडायच्या नाहीत, हे तिने मनोमनी ठरवलं होतं.

राकेशला मात्र लग्नाची घाई झाली होती. त्याने तिच्या घरी सतत येणंजाणं ठेऊन तिच्या आईचं मतही स्वतःविषयी अनुकूल करून घेतलं होतं. मात्र आईवडिलांच्या संमतीशिवाय निर्णय घेणे त्याला योग्य वाटत नव्हते; म्हणून तो एकदा तिची भेट करविण्यासाठी त्यांना तिच्या घरी घेऊन गेला. त्या दोघांनाही सुंदर आणि संस्कारी दीपा सून म्हणून आवडली. त्यांची फक्त संमती मिळाली नाही; तर त्याने लवकरात लवकर लग्न करावे ही इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

राकेशने दीपाचा होकार गृहित धरला होता. ती नाही म्हणणार नाही , याची त्याला खात्री होती. त्यामुळेच त्याने तिला विचारण्या अगोदर त्याच्या आई - बाबांना विश्वासात घेतलं होतं ; पण जेव्हां त्याने दीपाला लग्नाविषयी विचारलं तेव्हा ती स्पष्ट शब्दांत म्हणाली, "तुझ्यारखा जोडीदार मिळणं, हे कोणाही मुलीचं भाग्य असेल. पण मला माझ्या जबाबदा-या आहेत. एवढ्यात लग्न करणं मला शक्य होणार नाही. माझ्या भावाचं - नितीनचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी लग्नाचा विचारही करू शकत नाही. आणि एवढे दिवस तू माझ्यासाठी थांबावंस, अशी अपेक्षा मी करू शकत नाही. तुझा मार्ग तुला मोकळा आहे. यामुळे आपल्या मैत्रीत फरक पडणार नाही. "

आत्मकेंद्रित राकेशला दीपाच्या परखड बोलण्यामुळे धक्का बसला. पण त्यावेळी तिच्याशी बोलून काहीही उपयोग होणार नाही हे त्याच्या लक्षात आले. कारण आई आणि नितीनवर तिचं किती प्रेम आहे, हे अनेक वेळा तिच्या बोलण्यातून त्याला जाणवलं होतं. त्या दोघांसाठी ती कितीही मोठा त्याग करायला तयार होईल, याविषयी त्याच्या मनात शंका नव्हती. " याबाबत तिच्या आईशी - निर्मलाताईंशीच बोलावं लागणार. त्यांच्याशिवाय दीपा कोणाचंही ऐकणार नाही." त्याने मनाशी ठरवलं.

एके दिवशी ती ड्यूटीवर गेलेली असताना, निर्मलाताईना भेटून त्याने दीपाला समजावण्याची विनंती केली.

" दीपा माझ्या आईबाबांना खूप आवडली आहे. त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे . माझं लग्न लवकर व्हावं असं त्यांना वाटणं साहजिक आहे. तुम्ही प्लीज तिला समजावलं तर फार बरं होईल. एखादं वर्ष ठीक आहे पण पाच- सहा वर्षांपर्यंत थांबायला ते कसे तयार होतील?"

" माझ्याशी ती कधी या विषयावर बोलली नाही. बरं झालं तू मला सागितलंस. मी उद्याच तिच्या मनात काय आहे, विचारून घेते. " त्या म्हणाल्या. त्यांनाही राकेश जाव‌ई म्हणून पसंत होता. एवढं चांगलं स्थळ स्वतःहून चालत आलं म्हणून त्या देवाचे आभार मानत होत्या. दीपाने त्याला असं का सांगितलं असेल हेच त्यांना कळत नव्हतं. अजूनपर्यंत कोणताही महत्वाचा निर्णय दीपाने त्यांना विचारल्याशिवाय घेतला नव्हता. पण राकेशला नकार देताना तिने त्यांचा सल्ला घेतला नव्हता. "असं तिने का केलं असेल? तिला राकेश पसंत नसेल का? त्याच्याबद्दल तिचं काय मत आहे याची तिला विचारूनच खात्री करून घ्यावी लागेल." त्या गंभीरपणे विचार करत होत्या.

दुस-या दिवशी सकाळी चहाच्या वेळी त्यांनी दीपाकडे विषय काढला. " दीपा! तू खरंच नशीबवान आहेस.राकेशच्या आईचा फोन आला होता. तुला त्यांनी सून म्हणून पसंत केलंय. इतकं चांगलं स्थळ आपल्याला शोधूनही सापडलं नसतं! पुढच्या महिन्यात साखरपुडा आणि सहा महिन्यांनी जानेवारीत लग्न करायचं म्हणत होत्या. आयत्या वेळी हाॅल मिळत नाहीत; आतापासून तयारी करावी लागेल, हे त्यांचं म्हणणं मलाही पटलं. लग्नाची बोलणी करायला कधी बोलवूया त्यांना? "

" एवढी घाई काय आहे आई? मला एवढ्यात लग्न करायचं नाही. आता तर कुठे मला नोकरी लागलीय! मला एवढ्यात लग्न करायचं नाही. राकेशसाठी दुसरी मुलगी शोधायला सांग त्यांना; किंवा त्यांना काही दिवस वाट बघावी लागेल. राकेशबरोबर गेल्याच आठवड्यातच याविषयी बोललेय मी! तो नीट समजावेल त्यांना! लग्न न करण्याचं कारण जर आईला सांगितलं, तर तिला अपराधी वाटेल, म्हणून तिला उडवा- उडवीचं उत्तर देत दीपा म्हणाली, आणि तिथून उठून बाहेर जाऊ लागली.

तिला थांबवत आईने विषय पुढे रेटला, " काही दिवस म्हणजे किती? किती काळ तू राकेशला वाट पहायला लावणार आहेस? तो तुला पसंत नसेल, तर प्रश्नच मिटला. मी तसं त्यांना कळवून टाकते. तुझ्या मनाविरुद्ध मी काही ठरवणार नाही. तू एकदा नक्की सांगितलंस, की राकेशच्या आईशी बोलायला मला बरं पडेल. बड्या घरातली माणसं आहेत ती! पण त्यांचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य घराशी संबंध जोडायला मान्यता दिली. त्यांना टांगणीवर ठेवणं बरं दिसत नाही."

"राकेश मला आवडतो! हे तुलाही माहीत आहे आई! पण नितीनचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी लग्नाचा विचारही करणार नाही. आम्हाला दोघाना डॉक्टर बनवून डिस्पेंसरी पुढे चालवायची, हे बाबांचं स्वप्न होतं. माझं शिक्षण अर्धवट राहिलं, पण नितीन त्यांचा दवाखाना पुढे चालवेल. त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत मी हयगय होऊ देणार नाही . गेल्या वर्षीच त्याने कोलेजला अॅडमिशन घेतलंय. म्हणजे अजून पाच - सहा वर्षे नक्कीच जातील. तोपर्यंत तुला माझी साथ लागेल आई! राकेशला जर थांबायचं नसेल, तर त्याने दुस-या मुलीशी लग्न करावं. पण मी एवढ्यात लग्न करणार नाही." शेवटी खरं बोलल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर मनातली गोष्ट आईला सांगणं दीपाला भाग पडलं.

" पण तुझ्या लग्नाचा आणि त्याच्या शिक्षणाचा काय संबंध? तुझ्या वडीलांनी तुमच्या शिक्षणाची आणि तुझ्या लग्नाची सर्व सोय करून ठेवली आहे. तू जेव्हा कोलेज सोडलंस, तेव्हा मी अचानक् बसलेल्या धक्याने आजारी पडले होते. आजूबाजूला काय घडतंय हे मला कळत नव्हतं. स्वतःला सावरायला मला अनेक दिवस लागले. जर माझी तब्येत चांगली असती तर मी तुला शिक्षण सोडायला कधीच दिलं नसतं. आता निदान लग्नाच्या बाबतीत तरी स्वतःचं नुकसान करून घेऊ नको. राकेश चांगला मुलगा आहे. तुला सुखी ठेवेल. तू जर आमच्यासाठी एवढी चांगली संधी सोडलीस, तर मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही." आईने दीपाला बजावलं.

***

Contd....part -III