Singapore, Malaysia, Thailand in Marathi Travel stories by Uddhav Bhaiwal books and stories PDF | सिंगापूर, मलेशिया, थायलंड

Featured Books
Categories
Share

सिंगापूर, मलेशिया, थायलंड

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

सिंगापूर, मलेशिया थायलंड

१० फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१७ या बारा दिवसांमध्ये मी आणि माझी पत्नी सौ. निर्मला, सिंगापूर, मलेशिया, थायलंडची सहल करून आलो. औरंगाबादच्या "हेरंब ट्रॅव्हल" या टूर कंपनीने आयोजित केलेल्या या सहलीमध्ये आम्ही एकूण अठरा जण होतो. "हेरंब" ने सहलीला निघाल्यापासून औरंगाबादला परत येईपर्यंत नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि परदेशातील निवासाची उत्तम व्यवस्था या ट्रीपमध्ये ठेवली होती.

या प्रवासात सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांमधील विविध पर्यटन स्थळांना आम्ही भेट दिली.

दहा फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो. विमानतळावरील सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही विमानात प्रवेश केला. रात्री बारा वाजता आमच्या विमानाने सिंगापूरला जाण्यासाठी आकाशात झेप घेतली. सिंगापूरच्या स्थानिक वेळेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता आम्ही सिंगापूरच्या विमानतळावर पोचलो. विमानतळावरील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सर्वजण फ्रेश झालो आणि साडेदहा वाजेच्या सुमारास ए.सी.बसने 'कोमल रेस्टोरंट'ला पोचलो. तिथे नाश्ता करून 'मरीलोंयन बीच'कडे आम्ही सव्वा अकरा वाजता प्रयाण केले. ओर्चीड रोड, प्रेसिडेंट हाउस, धोबी घाट, धोबी एक्सचेंज, जापनीज मेमोरिअल ही स्थळे बसमधून पाहात, पाहात आम्ही 'मरीलोंयन बीच'ला पोचलो. त्या बीचवर आम्ही भरपूर फोटो काढले आणि तिथून सिंगापूर फ्लायरपाशी आलो. सिंगापूर फ्लायर म्हणजे अजस्त्र आकाशपाळणा. आमच्यापैकी काही लोक सिंगापूर फ्लायरमध्ये चक्कर मारून आले तर इतरांनी खालीच थांबून आजूबाजूचा परिसर बघितला.

त्यानंतर मरीना बे कॅसिनो, सिंगापूरची स्थापना करणाऱ्या रॅफलचा पुतळा बघून झाल्यावर "सिंगापूर चॉकलेट गॅलरी"ला भेट दिली. "ज्वेल ऑफ इंडीया" या भारतीय पद्धतीच्या हॉटेलमध्ये दुपारचे जेवण करून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास 'हॉटेल बॉस' नावाच्या हॉटेलमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सर्व सामानासह प्रवेश केला.

सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत 'गार्डन्स बाय द बे' बघितले आणि "तंदुरी रेस्टोरंट" मध्ये जेवण करून रात्री पावणे दहा वाजता मुक्कामाच्या ठिकाणी आलो.

१२/०२/२०१७ : सकाळी दहा वाजता एस. ई. ए. अक्वेरीयम आणि टायफून शो बघण्यासाठी बाहेर पडलो. अक्वेरीयम प्रचंड मोठे होते. टायफून शो म्हणजे एक लघु चित्रपट होता. तिथून युनिवर्सल स्टुडीओ पाहण्यासाठी गेलो. स्टीव्हन पिल्सबर्ग या हॉलिवूडच्या नामवंत दिग्दर्शकाने चित्रपट तयार करतांना चित्रपटातील साहसी दृश्ये, पाण्यातील साहसी दृष्ये, प्रचंड आगीची दृष्ये इत्यादी कशी दाखवतात याचे प्रात्यक्षिकच या ठिकाणी दाखवलेले आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तिथे 'सिसम स्ट्रीट'मध्ये कार्टूनच्या वेशात लहान मुलांनी केलेले नृत्य बघितले. दरम्यान दुपारी दोन वाजता तिथून जवळच असलेल्या ओयासीस हॉटेल मध्ये जेवण केले.

सायंकाळी साडेपाच वाजता सिंगापूरच्या प्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयाला भेट देण्यासाठी बोटीने गेलो. तिथे जगातील अनेक नामवंत व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. आम्ही श्री नरेंद्र मोदीजी, बराक ओबामा, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांच्या पुतळ्यांजवळ उभे राहून आमचे फोटो काढले.

नंतर तिथून जवळच एका हॉटेलमध्ये जेवण करून "विंग्ज ऑफ टाईम" हा लेझर शो पाहण्यासाठी आगगाडीने गेलो. हा लेझर शो खूपच संस्मरणीय आणि मनोरंजक होता. तिथून आमच्या बसने 'हॉटेल बॉस' येथे मुक्कामासाठी परतलो.

१३/०२/१७ :

सकाळी ७.५० ते ८.१० पर्यंत आमच्या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर नाश्ता केला. लगेच सर्व सामानाची आवराआवर करून सर्व सामानासह सकाळी साडेनऊ वाजता हॉटेलला रामराम केला. दहा वाजता जुराँग बर्ड पार्कला पोचलो. जुराँग बर्ड पार्क हे आशिया खंडातील सर्वात विशाल बर्ड पार्क आहे. इथे पाच हजारपेक्षा जास्त पक्षी आहेत. इथे पाण्यात पोहणाऱ्या पेंग्विन पक्षांसह अनेक प्रकारचे पक्षी बघितले. पाण्यात पोहणाऱ्या पेंग्विंनचे आम्ही फोटो कढले. येथील अम्फी थिएटर म्हणजे एकआगळावेगळा अनुभव होता. अनेक पक्षी त्यांच्या मालकाच्या आज्ञेप्रमाणे हालचाल करीत होते. एक पोपट तर अगदी सुरामध्ये गात होता आणि मनुष्यासारखे बोलत होता.

दुपारी साडेबाराच्या सुमारास सिंगापूर फ्लायरजवळील 'हॉटेल भंडारी सॅफ्रॉन' येथे जेवण करण्यासाठी पोचलो.

दुपारी १.२० वाजता क्वालालम्पूरसाठी बसने निघालो. रस्त्यामध्ये सिंगापूरच्या सीमेवर आणि मलेशियाच्या सीमेवर इमिग्रेशनची प्रोसेस पूर्ण करून क्वालालंपूरकडे रवाना झालो. सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी चालूच होत्या. रस्त्यात चहासाठी थोडे थांबून सायंकाळी ७.४५ वाजता क्वालालंपूरच्या हॉटेल 'ग्रँड सिझन्स'ला पोचलो. रात्री साडेनऊ वाजता जेवण केले.

१४/०२/२०१७ : सकाळी साडेआठपर्यंत नाश्ता आटोपून ९.२५ ला क्वालालंपूर शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी बसने निघालो. 'इस्ताना नायगरा' हा राजवाडा, राष्ट्रीय स्मारक, ट्विन टॉवर्स बघितले. तसेच चॉकलेट फॅक्टरीला भेट देऊन तिथे चॉकलेट खरेदी केले. दुपारी 'ऑलिव्ह ट्री' या हॉटेलमध्ये जेवण केले. दुपारच्या जेवणानंतर के. एल. टॉवर्सला भेट दिली. तिथे लिफ्टने बाविसाव्या मजल्यावर जाऊन संपूर्ण क्वालालंपूर शहराचे तिथून दर्शन घेतले.

दुपारी ३.४५ वाजता बेर्जाया टाईम स्क़ेअर मधील मॉलला भेट दिली. या दहा मजली मॉलमध्ये आमच्यापैकी काहीजणांनी खरेदी केली.

सायंकाळी साडेसहा वाजता रेस्टोरंटकडे निघालो. सात ते आठ दरम्यान 'सागर बँक्वेट' हॉटेलमध्ये जेवण केले. रात्री साडे आठ वाजता हॉटेल 'ग्रँड सिझन्स' मध्ये मुक्कामासाठी पोचलो.

१५/०२/२०१७ :

सकाळी ९.२०ला नाश्ता करून हॉटेलच्या बाहेर पडलो. थोड्याच वेळेत 'बाटू केव्हज'ला पोचलो. इथे बाटू केव्ह्जच्या पायथ्याशी लॉर्ड मुरुगन { कार्तिक स्वामी} यांची १४० फूट उंच सोनेरी मूर्ती आहे. नेपाळमधील कैलाशनाथ महादेवाची मूर्ती जगात सर्वात उंच असून दुसऱ्या क्रमांकावर ही लॉर्ड मुरुगन यांची मूर्ती आहे. बाटू केव्हज चढण्यासाठी २७२ पायऱ्या चढून जावे लागते. आमच्यापैकी काहीजण तिथे जाऊन आले. तिथेसुद्धा एक मंदिर आहे. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही जिनेव्हा वॉच फॅक्ट्रीचे शोरूम बघण्यासाठी गेलो. तिथे अनेकांनी आकर्षक अशी मनगटी घड्याळे विकत घेतली. मीसुद्धा सौ.साठी एक घड्याळ घेतले. नंतर आम्ही जेन्टींग हायलँडच्या पायथ्याशी गेलो आणि तिथून केबल कारने जेन्टींग हायलँडला पोचलो. तिथे वरच एका हॉटेलमध्ये जेवण केले. अत्यंत स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण असल्यामुळे आम्ही पोट आणि मन भरेपर्यंत जेवलो! सायंकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही तिथेच रेंगाळलो. कुणी खरेदी केली तर कुणी इनडोअर खेळ खेळण्याचा आनंद लुटला.

सायं. ६.१० ला तिथून बसने निघून ७.३० वाजता 'हॉटेल ग्रँड सिझन्स'ला पोचलो. ८.३० ते ९.३० पर्यंत जेवण करून रूमवर आलो आणि उद्याच्या बँकॉकच्या प्रवासासाठी बॅगा भरून तयार ठेवल्या.

१६/०२/२०१७

सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता आटोपून आठ वाजता बसने निघून क्वालालंपूरच्या विमानतळावर पावणे नऊ वाजता पोचलो. दहा वाजेपर्यंत विमानतळावरील सर्व औपचारिकता पूर्ण करून विमानाच्या प्रतीक्षेत थांबलो.

पावणेबारा वाजता विमानाने उड्डाण केले आणि थायलंडच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी आम्ही थायलंडच्या, बँकॉक {डॉन मुयांग] विमानतळावर पोचलो. तिथे इमिग्रेशन प्रक्रियेला बराच वेळ लागला. आम्ही पावणेचार वाजेपर्यंत विमानतळावरच होतो. तिथून चार वाचता निघून जेवणासाठी 'हॉटेल अशोका'मध्ये पावणेपाचला पोचलो. जेवण करून सव्वापाच वाजता बसने पटायाकडे प्रयाण केले. हॉटेल अशोका समोरील रस्त्यावर खूपच खड्डे तसेच कचरा होता. सायंकाळी पावणेआठ वाजता सरळ "अल्काझार शो" च्या ठिकाणी पोचलो. आठ वाजता सुरू झालेला शो सव्वानऊ वाजता संपला. तिथून निघून जेवणासाठी साडेनऊ वाजता हॉटेल 'वेदा' मध्ये पोचलो. जेवणानंतर मुक्कामासाठी हॉटेल "सिझन्स पटाया" इथे रात्री १०.४० ला पोचलो.

१७/०२/२०१७ :

हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता करून ८.२० वाजता बसने कोरल आयलंड कडे प्रयाण केले. तिथे बेस पॉईंटला पोचल्यावर बोटीने एकानंतर एक अशा दोन समुद्र किनाऱ्यांवर गेलो. अलीकडच्या समुद्र किनाऱ्यावर आमच्यापैकी काही जणांनी पॅरासेलिंगचा आनंद लुटला तर नंतरच्या समुद्र किनाऱ्यावर स्नानाचा आनंद लुटला. आम्ही दोघे आणि इतर काहीजण मात्र समुद्र किनाऱ्यावरील आराम खुर्च्यांमध्ये आराम करणेच पसंत केले. इथे साधारणपणे साडेअकरापर्यंत थांबून जेवणासाठी एका हॉटेलकडे प्रयाण केले. जेवण झाल्यानंतर 'जेम्स गॅलरी' पाहण्यासाठी गेलो. या जेम्स गॅलरीमधून सौ.साठी काही मौल्यवान खडे विकत घेतले. साडेपाच वाजता निघून जवळच्या 'हॉटेल वेदा'मध्ये चहा घेतला. आमच्यापैकी काहीजण थाई मसाज करण्यासाठी गेले तर काहीजण रशियन शो पाहण्यासाठी गेले. आम्ही मात्र सायंकाळी सहा ते साडेआठपर्यंत आमच्या मुक्कामाच्या हॉटेलमध्ये येऊन आराम केला. रात्री ८.४० ते १०.४० पर्यंत सर्वांसोबत हॉटेल वेदा मध्ये जेवण करून पटाया शहर पाहण्यासाठी बसने बाहेर पडलो. पटाया शहरात एक वॉकिंग स्ट्रीट आहे. तिकडे जाऊन आलो. एक किलोमीटर अंतराच्या परिसरात विविध प्रकारची दुकाने जसे की, रेस्टॉरंट, दागिन्यांचे शोरूम इत्यादी पाहतांना खूप आनंद वाटला. इथेच पटायाची नाईट लाइफ बघितली. रात्रभर या संपूर्ण रस्त्यावर गर्दी असते.

१८/०२/२०१७ : सकाळी हॉटेलवर नाश्ता आटोपून ८.५० ला सर्व सामानासह निघालो आणि ९.४० ला "नॉंगनूच पटाया गार्डन अँड रिसॉर्ट"ला पोचलो. विविध प्रकारची फुलझाडे आणि निरनिराळ्या रंगांची आणि प्रकारची फुले हे या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे. शंभर 'थाई बाट' {थायलंडचे चलन} देऊन तिथे बसलेल्या खऱ्याखुऱ्या वाघाच्या शेजारी बसून आमच्यापैकी अनेकांनी फोटो काढले. तिथेच एका भव्य थिएटरमध्ये थाई कल्चरल शो तसेच हत्तींच्या कसरती आम्ही बघितल्या. अनेकांनी तिथे शंभर 'थाई बाट' देऊन हत्तीच्या सोंडेवर बसण्याचा आनंद लुटला.

१.२० ते २.२० गार्डनमधील एका हॉटेलमध्ये जेवण केले. दुपारी २.४५ ला निघून ६.१५ वाजता बंकोकच्या हॉटेल मार्व्हल मध्ये पोचलो.जवळच्याच हॉटेल इंडियन होस्ट मध्ये जेवण केले. सौ. निर्मलाची तब्येत ठीक नसल्यामुळे ती जेवली नाही.

१९/०२/२०१७ : सकाळी नाश्ता करून ८.२० वाजता सफारी वर्ल्ड पाहण्यासाठी बसने निघालो. नऊ वाजता तिथे पोचल्यावर बसमधूनच सफारी वर्ल्डला फेरफटका मारला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी बघितले. काही लोकांनी सफारी पार्कमध्ये दोन शो पाहिले.

११.३० ते १२ पर्यंत आम्ही स्टंट शो बघितला.दुपारी जंगल क्रूज रेस्टॉरंट मध्ये जेवण करून दोन वाजेपर्यंत डॉल्फिन शो बघितला. नंतर duty free shop तसेच इंद्र मार्केटमध्ये शोपिंग्साठी गेलो. साडेसहा वाजेपर्यंत तिथे थांबून आमच्या हॉटेलच्या जवळच असलेल्या इंडियन होस्ट मध्ये जेवण करून हॉटेलला परतलो.

२०/०२/२०१७ :

सकाळी नाश्ता करून ९.२० ला हॉटेलमधून सर्व सामानासह बाहेर पडलो. सर्व समान बसमध्ये ठेवून आम्ही स्थानिक पर्यटनस्थळे बघितली. बसमधून चायना टाउन तसेच इतर स्थळे पाहात पाहात गोल्डन बुद्ध आणि रिक्लाय्निंग बुद्ध या स्थळांना भेट दिली. तिथेच थोडा वेळ थांबून फोटो काढले.

१२.१० वजता निघून जेवणासाठी इंद्र मार्केटपाशी आलो. एक ते दीडपर्यंत तिथल्या इंडियन करी पॉट या हॉटेलमध्ये जेवण केले आणि साडेतीन पर्यंत इंद्र मार्केटमध्ये आरामशीर खरेदी केली. आम्ही एक हँड बॅग विकत घेतली.

दुपारी ३.३५ वाजता बँकॉकच्या सुवर्ण भूमी विमानतळाकडे प्रयाण करून ४.१५ वाजता विमानतळावर पोचलो. साडेपाच नंतर विमानतळावरील सर्व औपचारिकता पूर्ण केली. रात्री साडेआठला एअर इंडियाच्या विमाम्नाने उड्डाण केले. भारतीय वेळेप्रमाणे रात्री ११.४५ वाजता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो. आमच्या सोबतचे दहा जण गोहाटीला जाण्यासाठी विमानतळावरच थांबले.

विमानतळाच्या बाहेर आमच्यासाठी इनोवा कारची व्यवस्था केलेली होती. आम्ही सहाजण इनोवा कारने रात्री एक वाजता निघून २१ तारखेला सकाळी सव्वा आठ वाजता औरंगाबादला पोचलो.

अशाप्रकारे आमच्या प्रवासाची इतिश्री झाली.

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

email : ukbhaiwal@gmail.com