Sonsakhali - 7 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | सोनसाखळी - 7

Featured Books
Categories
Share

सोनसाखळी - 7

सोनसाखळी - 7

शब्दावरुन पारख करावी

पांडुरंग सदाशिव साने

एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एकदा एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली. राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु त्या साधूचे दर्शन त्याला कधीच झाले नव्हते. "जो कोणी मला साधुपुरुषाचे दर्शन करवील, त्याला मी एक हजार सोन्याची नाणी देईन." अशी राजाने सर्वत्र दवंडी देवविली. त्या साधूला कोणीच पाहिले नव्हते. साधू निरनिराळ्या वेशात वावरतो, निरनिराळी स्वरुपे धारण करतो, असे लोक म्हणत. साधूला ओळखायचे कसे? एक गरीब मनुष्य होता. त्याला बायको होती. त्याला मुलेबाळे होती. परंतु घरात खायला नव्हते. आपली उपाशी मुलेबाळे पाहून त्याला वाईट वाटे. तो राजाकडे गेला व म्हणाला, "राजा, मला आजच हजार सोन्याची नाणी दे. दोन महिन्याचे आत साधूचे दर्शन तुला घडवीन." राजा म्हणाला, "दर्शन न घडविलेस तर?" दरिद्री म्हणाला, "मरणाची शिक्षा मला दे." राजा म्हणाला, "ठीक." त्या दरिद्री माणसाला एक हजार सोन्याची नाणी देण्यात आली. तो घरी गेला. मुलांबाळांना आनंद झाला. बायको आनंदली. घरी आता कशाला वाण नव्हती. मुलाबाळांना चांगले कपडे करण्यात आले. त्यांच्या आंगावर दागदागिने घालण्यात आले. त्याची बायको सोन्याने पिवळी झाली. पैठणीने सजली. नवीन घर बांधण्यात आले. शेतीवाडी खरेदी करण्यात आली. गाईगुरे विकत घेतली गेली. घोड्याची गाडी आली. अशी मौज झाली. सर्वांना सुख झाले. परंतु तो दरिद्री मनुष्य दुःखी होता. त्याच्या डोळ्यांसमोर सारखे मरण होते, साधूपुरुष त्याला कोठे भेटणार, कोठे दिसणार? परंतु जरी मरणाच्या विचाराने त्याला दुःख होई, तरी त्यातल्या त्यात त्याला थोडे समाधान होते. आपण जरी मेलो तरी मुलांबाळांना सुख होईल या विचारानेच त्याने राजाजवळ तसे वचन दिले होते. आपण मेलो तरी मुलांना ददात उरणार नाही, आणि आईही आहे त्यांची, काळजी घ्यायला; असे समाधान तो मानी. परंतु मरणाच्या कल्पनेचे दुःख काही कमी होत नसे. त्याचे खाण्यापिण्याकडे लक्ष नसे. तो दुःखी, कष्टी, उदासी दिसे. तो अशक्त झाला. फिक्कट दिसू लागला. "तुम्हाला काय होते? नीट जेवत नाही; नीट बोलत नाही, का असे? घरात सारी सुखी आहेत, तुम्ही का दुःखी?" असे बायकोने विचारले. "आपण सुखी झालो. परंतु कितीतरी गरीब माणसे जगात आहेत. त्यांना कोण देणार पोटभर खायला? त्यांच्या विचाराने मनाला वाईट वाटते." तो म्हणाला. "जगात दुःख पुष्कळ आहे. आपण काय करणार?" ती म्हणाली. "थोडेपार दुःख दूर करता येईल तर बघावे." तो म्हणाला. "मी अडल्यापडल्यास मदत करीन. भाकरीतुकडा कुणाला देत जाईन. मी उतणार नाही, मातणार नाही. गर्वाने दुसऱ्यास कधी हिडिसपिडीस करणार नाही." ती म्हणाली. "देव तुझ्यावर दया करील." तो म्हणाला. "परंतु तुम्ही हसा, खेळा, आनंदात रहा." ती म्हणाली. "देवाची कृपा होईल तर हसेन-खेळेन." तो म्हणाला. तो गरीब मनुष्य दिवस मोजीत होता. एक महिना गेला. दुसरा सुरु झाला. त्याने साधूची सर्वत्र चौकशी केली, परंतु पत्ता लागेना. दुसरा महिनाही संपत आला. शेवटी तोही संपला. राजाने त्या गरीब माणसाकडे शिपाई पाठविले. मोठा दरबार भरला. हजारो लोकही साधू येतो की काय, ते पाहण्यासाठी जमले होते. शिपायाबरोबर तो गरीब मनुष्य आला. त्याला तेथे उभे करण्यात आले. "कोठे आहे साधुपुरुष!" राजाने विचारले. "राजा, पुष्कळ हिंडलो फिरलो. परंतु साधूमहाराज दिसले नाहीत. त्यांना ओळखायचे तरी कसे? ते नाना रुपे धारण करितात. अमुकच ते असे कसे समजावे? माझ्यावर कृपा कर. माझी मुलेबाळे आहेत. मला मरणाची शिक्षा देऊ नकोस. मी पाया पडतो. निराधाराला आधार दे." तो गरीब मनुष्य म्हणाला. राजा संतापला रागाने म्हणाला, "तू लफंग्या दिसतोस. तू फसवलेस. तुला का ही गोष्ट आधी माहीत नव्हती? ते साधूमहाराज नाना वेष धारण करतात, नाना रुपात वावरतात हे तुझ्या कानी नव्हते आले? आता क्षमा नाही. तुझी मरणाची शिक्षा टळत नाही. तुला हालहाल करुन मारले पाहिजे. साधे मरण नाही उपयोगी. राजाला फसविले आहेस." त्या राजाचे चार प्रधान होते. त्यांतील तिघांवर राजाची फार मर्जी होती. चौथ्यावर विशेषशी नव्हती. ते चारी प्रधान तेथे बसलेले होते. राजाने पहिल्या प्रधानाला विचारले, "या लफंग्याला कसे मारावे?" तो म्हणाला, "महाराज याला कुंभाराच्या आव्यात भाजून मारावे." इतक्यात सभेतील एक मनुष्य उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी." राजाने त्याच्याकडे पाहिले परंतु तो काही बोलला नाही. नंतर त्याने दुसऱ्या प्रधानाला तोच प्रश्न केला. तो दुसरा प्रधान म्हणाला, "राजा, वस्तरा घ्यावा व त्याच्या शरीराचे राईराईएवढे तुकडे करावे." सभेतील तो मनुष्य पुन्हा उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी." राजाने रागाने त्याच्याकडे पाहिले. नंतर त्याने तिसऱ्या प्रधानाला विचारले. तो तिसरा प्रधान म्हणाला, "महाराज, याला भिंतीत चिणून मारावे." पुन्हा तो सभेतील मनुष्य म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी." त्या माणसाचे हे उद्धट वर्तन पाहून राजा संतापला. परंतु अद्याप चौथ्या प्रधानाला विचारायचे राहिले होते. शेवटी त्या चौथ्या प्रधानालाही विचारण्यात आले. चौथा प्रधान म्हणाला, "महाराज, याला मारु नये. या गरिबाला सोडून द्यावे. पहा त्याची स्थिती. दोन महिन्यापूर्वी तो कसा होता व आज कसा आहे? तो केवळ अस्थिपंजर झाला आहे. रोज त्याच्या डोळ्यांसमोर मरण होते. आपण दोन महिन्यांनी मरणार असे सारखे त्याच्या मनात होते. तो क्षणाक्षणाला मरत होता. किती मानसिक वेदना त्याला झाल्या असतील? झाली एवढी शिक्षा त्याला पुरे. त्याला आणखी मारणे योग्य नव्हे. मेलेल्याला मारण्यात काय अर्थ?" सभेतील तो पुरुष पुन्हा उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी." राजा त्या माणसाकडे वळला व म्हणाला, "पुन्हा पुन्हा तू हे शब्द उच्चारीत होतास, त्याचा अर्थ काय? नीट काय ते सांग, नाहीतर तुलाही मरणाची शिक्षा देतो." तो मनुष्य उभा राहून म्हणाला, "राजा, पहिल्या प्रधानाने मडकी भट्टीत भाजतात त्याप्रमाणे या माणसाला भाजून मारावे असे सांगितले. का बरे त्याने असे सांगितले? अरे, तो कुंभार आहे. परंतु तू त्याला प्रधान केलेस. त्याच्या डोळ्यांसमोर नेहमी मडकी असतात. आणि तो दुसरा प्रधान? तो आहे न्हावी. म्हणून त्याने वस्तऱ्याने तुकडे करावे असे सांगितले. त्याच्या डोळ्यांसमोर सदैव वस्तराच असायचा. आणि तो तिसरा प्रधान? तो आहे गवंडी. भिंती बांधणे हे त्याचे काम. म्हणून भिंतीत चिणून मारा असे त्याने सुचविले. कुंभार, न्हावी, गवंडी यांना तू प्रधान केलेस. त्यांचे धंदे वाईट नाहीत. त्या त्या धंद्याने ते समाजाचीच सेवा करतात. परंतु राज्यकारभार कसा त्यांना हाकता येईल? राज्यकारभार चालवायला मोठी दृष्टी हवी. जगाचा खूप अनुभव हवा. मनुष्य-स्वभावाचे ज्ञान हवे. खोल पाहता आले पाहिजे. नीट सल्ला देता आला पाहिजे. हा चौथा प्रधान भला दिसतो. किती सुंदर विचार त्याने सांगितले! कसा चांगला सल्ला त्याने दिला परंतु त्याच्यावर तुझा लोभ नाही. राजा, चांगले प्रधान नेम व त्यांच्या सल्ल्याने वाग." त्या मनुष्याचे ते बोलणे ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. परंतु ते तीन प्रधान खट्टू झाले. त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. राजा म्हणाला, "त्या मनुष्याला इकडे आणा. या सिंहासनावर त्याला बसवू दे, त्याची पूजा करु दे." परंतु कोठे आहे तो मनुष्य? कोठे गेला? कोठे बसला? सारे इकडे तिकडे पाहू लागले. परंतु तो मनुष्य दिसेना. आता होता, क्षणात नाहीसा झाला. तो साधुपुरुषच तर नव्हता? होय. ज्याच्या दर्शनासाठी राजा अधिर झाला होता, तोच तो साधूमहाराज होता. परंतु आता काय? तो चौथा प्रधान राजाला म्हणाला, "अनेक वेषात वावरणारे, नाना रुपात दिसणारे ते साधूमहाराज समोर होते. त्यांचे दर्शन तुम्हाला झाले. या गरीब माणसामुळेच शेवटी हे दर्शन झाले. दर्शनच नव्हे तर त्यांचे शब्दही तुम्हाला ऐकायला मिळाले. धन्य झालात तुम्ही, धन्य झालो आम्ही सारे." राजा म्हणाला, "होय, ते साधूमहाराजच होते. या गरीब माणसाला सोडून द्या. शेवटी याच्यामुळे दर्शन झाले. याला आणखी एक हजार नाणी द्या. जा. गरीब माणसा, जा. सुखी रहा." त्या तीन प्रधानांकडे वळून राजा म्हणाला, "तुम्ही आपापले धंदे करायला जा. ते धंदे नीट करा म्हणजे झाले. ज्यांच्यावर माझी मर्जी नव्हती, त्यांना आता मी मुख्य प्रधान नेमतो. राज्यकारभार कसा हाकावा हे तेच चांगले सांगतील." ते तीन प्रधान निघून गेले. चौथा प्रधान मुख्य प्रधान झाला. राज्याचा कारभार चांगला चालू झाला. आणि तो गरीब मनुष्य? त्याच्या घरात आनंदीआनंद झाला. बाबा परत आले म्हणून मुले उड्या मारु लागली. पत्नीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. "तुम्ही आमच्या सुखासाठी मरण पत्करले होते. आमची दैना तुम्हाला पाहवेना? होय ना? किती तुमचे आमच्यावर प्रेम!" ती स्फुंदत म्हणाली. "त्या प्रेमानेच वाचलो. त्या त्यागानेच देव प्रसन्न झाला. त्याने दया केली. आता मी हसेन-खेळेन. आनंदात राहीन. सारीच आनंदात राहू." तो म्हणाला. "हो. सारी आनंदाने राहू, गंमत करु." मुले नाचत म्हणाली.

***