मुलांसाठी फुले- ४
साहित्यिक = पांडुरंग सदाशिव साने
प्रामाणिक नोकर
एका कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते.
प्रामाणिकपणाने वागावे, कोणाला फसवू नये. कोणाला हसू नये. कष्टाने मिळेल ते खावे. चोरी-चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे लागले तरी आनंदाने राहावे, असे त्याचा बाप त्याला शिकवीत असे. निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते. मुलगा चुणचुणीत होता; चपळ होता; परंतु त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता. दुकानात तो सर्वांना आवडे. गिऱ्हाईक त्याच्याकडे जास्त यावयाचे; दुसऱ्या नोकराकडे कमी जावयाचे. बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवाघरची फुले.
एके दिवशी एक श्रीमंत बाई काही रेशमी कापड खरेदी करावयास आली होती. एक रेशमी साडी तिने पसंत केली. तिला पोत आवडले, रंग आवडला. पदरही सुंदर होता. तो मुलगा ती साडी बांधून देत होता परंतु इतक्यात ती साडी एके ठिकाणी थोडी फाटली आहे असे त्याला दिसले. त्या बाईने ते पाहिले नव्हते. परंतु तो मुलगा प्रामाणिक होता. तो तिला गोड शब्दांत म्हणाला, "बाई, ही साडी येथे जरा फाटली आहे. ही नका घेऊ. दुसरी पसंत करा; येथे पुष्कळ नग आहेत."
परंतु त्या बाईला तसलीच साडी पाहिजे होती. तशी दुसरी साडी त्या दुकानात नव्हती. ती बाई निघून गेली. दुकानदार गादीवर बसलेला होता. नोकराचे ते वर्तन पाहून त्याला राग आला. असला नोकर काय कामाचा? त्याच्यामुळे दिवाळे काढण्याची पाळी यावयाची, असे तो मनात म्हणाला.
'तुमचा मुलगा दुकानात काम करावयास योग्य नाही. तो माझ्या मनातून अजिबात उतरला आहे. असे नोकर ठेवून धन्याला लवकरच हाय हाय म्हणत बसण्याची पाळी येईल. मी तुमच्या मुलास काढून टाकू इच्छित आहे.' अशी एक चिठ्ठी लिहून त्या मुलाबरोबरच त्याच्या बापाकडे त्याने पाठवली.
बापाने चिठ्ठी वाचली. बापाने मुलाला, काय झाले म्हणून विचारले. मुलगा म्हणाला, "माझ्या हातून काही चूक घडल्याचे मला तरी माहीत नाही. त्यांनाच जाऊन विचारा म्हणजे उलगडा होईल."
मुलगा व बाप दोघे दुकानात आले. बाप त्या शेठजीजवळ जाऊन चौकशी करू लागला. तो शेठजी रागारागाने म्हणाले, "अहो, ती बाई साडी चांगली घेत होती. ती साडी बांधून देणे एवढे याचे काम. दुकानातील मालावर टीका करीत बसण्याची काही जरुरी होती? ती साडी कोठे जरा फाटकी होती. त्या बाईचे लक्षही नव्हते. याला ते दिसले व आपण होऊन हा त्या बाईला म्हणतो, 'बाई, ही घेऊ नका साडी. ही जरा फाटली आहे.' आहे की नाही अक्कल! अशाने का दुकान चालेल? पंचवीस रुपायांचा माल पडला अंगावर?"
"ह्याचा आणखी काही अपराध आहे का?" बापाने विचारले.
"नाही, तसा तो फार चांगला आहे, गोड बोलतो, गोड वागतो. परंतु नुसत्या गोडपणाला काय चाटायचे आहे? व्यवहार आधी. व्यवहारासाठी गोडपणा; व्यवहारासाठी तिखटपणा; व्यवहारासाठी खरे; व्यवहारासाठी खोटे. व्यवहार चालला पाहिजे." तो शेठजी म्हणाला.
"माझ्या मुलाचा एवढाच अपराध असेल तर मीच त्याला तुमच्या दुकानात ठेवू इच्छित नाही. तुमचेही नुकसान नको व्हायला व त्याच्याही जन्माचे नुकसान नको व्हायला. चल रे बाळ, येथे तू राहू नकोस!" असे म्हणून बाप आपल्या मुलाला घेऊन गेला.
त्या मुलाची ही कीर्ती सर्वत्र पसरली व एका नामांकित दुकानातून त्याला मुद्दाम मागणी आली. त्या दुकानात तो रुजू झाला. तो मुलगा त्या दुकानात कामावर राहताच त्या दुकानाची विक्री दसपट वाढली.
त्या नव्या मालकाने त्या मुलाला पुढे आपल्या दुकानात भागीदारी दिली व तो मुलगा सुखी झाला. तो मुलगा आपल्या वृद्ध आईबापांना प्रेमाने म्हणतो, "तुम्ही मला प्रामाणिक केलेत त्याचे हे फळ. आणि हे फळ न मिळता आपण गरिबीत राहिलो असतो. तरीही मी सुखाने राहिलो असतो. कारण मनाचे समाधान ही सर्वांत मोठी संपत्ती होय. ज्याचे मन खाते, तो कितीही श्रीमंत असला तरी दुःखी व दरिद्रीच असणार! आई, खरे आहे ना म्हणतो मी ते?"
***