सोनसाखळी - 2
दगडफोड्या
पांडुरंग सदाशिव साने
एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा करीत जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी अडविले. ते त्याला म्हणाले, "हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे. माहीत नाही का तुला, दिसत नाही का तुला? चालला गाढवे घेऊन. गाढवच दिसतोस."
तो दगडफोड्या म्हणाला, "मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. मग मला कोणी अडविले नसते. मीच साऱ्यांना अडविले असते." त्याच्या मनात असे आले नाही तोच त्याच्यासमोर एक देवता उभी राहिली. तिने त्याला विचारले, "तुला काय राजा व्हायचे आहे?"
तो म्हणाला, "हो, मला राजा व्हायचे आहे, म्हणजे सारे हात जोडून माझ्या समोर उभे राहतील." देवता म्हणाली, "ठीक तर. मीट डोळे व उघड म्हणजे तू राजा झालेला असशील."
दगडफोड्याने डोळे मिटले व उघडले. तो काय आश्चर्य! तो एकदम राजा झालेला. तो पांढऱ्या छानदार घोड्यावर बसलेला होता. अंगावर जरीचा पोशाख होता. डोक्यावर मुगुट होता. भालदार, चोपदार जयजयकार करीत होते. मोठमोठे शेट, सावकार, सरदार, जहागीरदार नजराणे देत होते व अदबीने नमस्कार करीत होते.
परंतु आकाशात वर सूर्य तापत होता. राजाला ताप सहन होईना. तो मनात म्हणाला, "हा सूर्य माझ्यापेक्षा मोठा दिसतो. त्याला माझी पर्वा वाटत नाही. मी सूर्य असतो तर चांगले झाले असते." तो असे मनात म्हणतो तोच ती देवता त्याच्यासमोर उभी राहिली व म्हणाली, "काय तुला सूर्य व्हायचे आहे? मीट डोळे व उघड म्हणजे तू सूर्य झालेला असशील."
त्याने तसे केले व तो सूर्यनारायण झाला. तो आता सारा पराक्रम दाखवू लागला. बारा डोळे जणू त्याने उघडले. झाडेमाडे सुकून गेली. नद्यानाले आटून गेले. गाईगुरे तडफडू लागली. सूर्याला ऐट आली.
परंतु आकाशात एक लहानसा ढग आला. हळूहळू तो मोठा झाला. सूर्याला त्याने झाकून टाकले. सूर्याचे ऊन पृथ्वीवर पडेना. सूर्याचा प्रखर ताप पृथ्वीपर्यंत पोचेना. सूर्य मनात म्हणाला, "हा ढग माझ्याहून मोठा दिसतो, माझा प्रकाश अडवतो. मी असा ढग असतो तर किती छान झाले असते." तो असे मनात म्हणतो तोच ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, "काय तुला ढग व्हायचे आहे?" तो सूर्य म्हणाला, "हो." देवता म्हणाली, "मीट डोळे व उघड म्हणजे तू ढग होशील."
तो आता ढग झाला. काळाकुट्ट ढग. दिवस असून पृथ्वीवर अंधार पडला. आता तर मुसळधार पाऊस पडू लागला. नद्यानाले भरुन गेले. शेतेभाते वाहून जाऊ लागली. गावे वाहून जाऊ लागली. जणू प्रलयकाळ आला असे वाटले. पूर्वी लोक उन्हाने मरत होते, आता पाण्यात मरु लागले. ढगाला आपल्या पराक्रमाचे कौतुक वाटले. तो अभिमानाने खाली पाहू लागला.
परंतु त्याला एक भला मोठा फत्तर दिसला. एवढा पाऊस पडत होता, तरी त्याला ढमसुद्धा झाला नव्हता. ढगाला वाटले की, हा दगड माझ्याहून मोठा दिसतो. मी जर असा दगड असतो तर बरे झाले असते. त्याच्या असे मनात येता ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, "काय तुला दगड व्हायचे आहे?" तो म्हणाला, "हो." ती म्हणाली, "मीट डोळे व उघड म्हणजे तू भला मोठा दगड होशील." तो आता प्रचंड फत्तर झाला. परंतु एके दिवशी एक दगडफोड्या तेथे आला. तो घणाचे घाव घालून त्याला फोडू लागला. त्याचे तुकडे होऊ लागले. तो दगड मनात म्हणाला, "हा दगडफोड्या माझ्याहून मोठा दिसतो. मी दगडफोड्या झालो तर बरे होईल." तो असे मनात म्हणताच ती देवता समोर उभी राहिली व म्हणाली, "तुला दगडफोड्या का दगडा व्हायचे आहे? अरे तो तर तू पूर्वी होतास. पुन्हा मूळ पदावरच आलास. हो दगडफोड्या."
पुन्हा आपला तो पूर्वीचा दगडफोड्या झाला!
***