Mulansathi fule - 1 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | मुलांसाठी फुले - १

Featured Books
Categories
Share

मुलांसाठी फुले - १

मुलांसाठी फुले- १

साहित्यिक = पांडुरंग सदाशिव साने

  • सत्वशील राजा
  • मोरु
  • आई व तिची मुले
  • प्रामाणिक नोकर
  • मधुराणी
  • सत्वशील राजा

    फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहेर पडला नाही.

    एके दिवशी राजा एकटाच गच्चीत बसला होता. आकाशात तारे चमकत होते. बागेतील रातराणीच्या वेलीचा वास येत होता. वारा हळूहळू वाहत होता. राजा विचार करीत होता. तो मनाशी म्हणाला, मी उदार म्हणून प्रसिद्ध आहे परंतु वास्तविक माझे असे मी काय देतो? प्रजेपासून मला पैसा मिळतो. त्या पैशांतूनच मी देणग्या देतो व उदार म्हणून मिरवतो. माझ्या स्वतःच्या मालकीचे मी काय दिले आहे? राजाच्या मालकीचे काय आहे? हे राजवाडे प्रजेच्या पैशातूनच बांधले. हे जडजवाहीर प्रजेच्या करातूनच विकत घेतले. ह्या माझ्या देहाशिवाय माझे असे काहीच नाही. माझी सारी मालमत्ता म्हणजे हा साडेतीन हातांचा देह. हा देह जर कुणी मागितला व मी दिला, तर मात्र मी खरा उदार ठरेन, खरा सत्वशील ठरेन.

    हे विचार करीत राजा झोपला. सकाळ झाली. राजाने स्नान केले. देवपूजा केली. नंतर तो याचकगृहाकडे निघाला. ज्याला ज्याला काही मागावयाचे असे, तो तो तेथे जाई. आज देवाच्या मनात राजाचे सत्व पाहण्याची इच्छा झाली. भगवान् शंकरांनी एका आंधळ्या अतिथीचे रूप घेतले व त्या अतिथीशाळेजवळ, त्या याचकगृहाजवळ ते उभे राहिले.

    राजा आला. जो जो जे जे मागत होता, ते ते राजा देत होता. आंधळ्याची पाळी आली. राजा त्याला म्हणाला, "आंधळ्या! तुला काय पाहिजे ते माग; असा मागे मागे काय राहतोस?" तो आंधळा म्हणाला, "राजा! जे मागावयाचे आहे ते मागावयाला धीर होत नाही." राजा म्हणाला, "निर्भयपणे माग. येथे भिण्याचे काही कारण नाही." तो आंधळा म्हणाला, "मी आंधळा आहे. तुझ्या दोन डोळ्यांतील एक डोळा काढून मला देशील तर माझ्यावर उपकार होतील. देवाचे वैभव मी पाहू शकेन. तारे पाहीन, फुले पाहीन. तुझे मुखकमल पाहीन. समुद्र, सरिता, वृक्ष, पर्वत, सारे पाहीन. राजा, बोलत का नाहीस? नसेल देता येत तर नाही म्हण. तुझी कीर्ती ऐकली म्हणून मी आलो."

    राजा बळेच म्हणाला, "आंधळ्या! अरे, घरदार माग, जमीनजुमला माग. डोळा रे काढून कसा देऊ? जरा विचार करुन तरी मागावे की नाही?" तो आंधळा म्हणाला, "म्हणूनच मी मागत नव्हतो. 'माग' म्हणालास म्हणून मागितले. प्रजेचे पैसे प्रजेला द्यायचे. गंगेतल्याच पाण्याने गंगेला अर्ध्य द्यायचे. राजा, तुझ्या उदारपणाची काय रे मोठीशी थोरवी? परंतु मी कशाला अधिक बोलू? बरे तर, मी जातो."

    राजा म्हणाला, "आंधळ्या! थांब, थांब. मी डोळा देण्यास तयार आहे. कालच रात्री मी म्हणत होतो, जर माझा कोणी देह मागेल तर तो मला दिला पाहिजे. माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल, असे मला वाटले नव्हते. परंतु देवाची कृपा. आज माझ्या एका डोळ्याचे तरी सार्थक होत आहे." राजा डोळा काढून देणार, ही बातमी शहरात पसरली. राणी म्हणाली, "असा सुंदर डोळा का काढून देणार? वेडेपणा आहे. त्या आंधळ्याचे काय ऐकता?" प्रधान म्हणाले, "देण्याला तरी काही मर्यादा आहे. साऱ्या प्रजेचे तुम्ही पोशिंदे. तुम्ही सुखी तर प्रजा सुखी. असा वेडेपणा करु नये." राजा म्हणाला, "मी वेडा का तुम्ही वेडे? अरे, जरा विचार तरी करा. हे दोन डोळे आज सुंदर दिसत आहेत. आणखी पाचदहा वर्षांत त्यांची काय दशा होईल ते पहा. सारखे पाणी गळेल, दिसत नाहीसे होईल, पू येऊ लागेल. अरे, हा सारा देह जावयाचा आहे. दहा वर्षांनी मी आंधळाच होईन किंवा सारा देहच मातीत जाईल. जाणाऱ्या नाशिवंत वस्तूला देऊन न जाणारी व चिरकाळ टिकणारी कीर्ती जर मोबदल्यात मिळत असेल, तर ती का न घ्या? हा डोळा देऊन मी अभंग, अमर असे यश जोडीत आहे. माझ्या कुळाचे नाव राहील, माझी गोष्ट लोक नेहमी सांगतील व ऐकतील. मी वेडा का तुम्ही वेडे?"

    राजाचा निश्चय कायम राहिला. डोळे काढणाऱ्याला बोलावण्यात आले. वेलीवरचे फूल खुडावे, तळ्यातील सुंदर कमल तोडावे, तसा तो डोळा काढण्यात आला. राजाने हूं की चूं केले नाही. त्याच्या तोंडावर अपार आनंद व शांती विलसत होती. राजाच्या दुसऱ्या डोळ्यातून पाणी आले. राजा आंधळ्याला म्हणाला, "माझा डोळा तुम्हाला चांगला बसला. जणू तुमच्यासाठीच तो होता. तुमच्या खाचेत नीट बसला. हा दुसराही घ्या. ह्या डोळ्याला वाईट वाटत आहे. दोन्ही डोळे दोघा भावांप्रमाणे एकत्र राहू देत." राजाने दुसरा डोळा काढविला. तो दुसरा डोळाही आंधळ्याच्या डोळ्याच्या जागी बसविण्यात आला. आंधळ्याला ते दोन्ही डोळे चांगलेच शोभू लागले. राजा आंधळ्याला वंदन करता झाला. आंधळ्याने त्या राजाच्या डोक्यावर हात ठेवला व त्याच्या डोळ्यांवरुनही हात फिरवला. तो काय आश्चर्य? राजाला एकदम पुन्हा डोळे आले. पूर्वीच्या डोळ्यांहून सुंदर डोळे! राजा समोर बघतो तो प्रत्यक्ष भगवान शंकराची मूर्ती!

    डोक्यावर गंगा आहे, कपाळावर चंद्र आहे, अंगावर साप आहेत; अशी ती शंकराची कर्पूरगौर मूर्ती पाहून राजाने त्याच्या पायांवर डोके ठेवले.

    भगवान् शंकर म्हणाले, "राजा, ऊठ. तुझी उदारता पाहून मी प्रसन्न झालो. नीट राज्य कर व अंती माझ्याकडे ये. तुला बाहेरचे डोळे परत दिलेच; पण ह्या बाहेरच्या डोळ्यांहून मौल्यवान् असे जे अंतरीचे डोळे, जे ज्ञानचक्षू, ते तुला मी देतो म्हणजे तुझ्या हातून चूक होणार नाही, अन्याय होणार नाही. सर्वांपेक्षा राजाला या विचाराच्या डोळ्यांची, या ज्ञानदृष्टीची फारच जरुरी असते. कारण, कोट्यावधी लोकांचे हिताहित त्याच्या कृत्यांवर अवलंबून असते."

    भगवान् शंकर गुप्त झाले. अंतर्धान पावले. राजाला नवे डोळे आले व ज्ञानदृष्टीही आली. तो सर्व प्रजेला प्रिय झाला. पुष्कळ वर्षे न्यायाने व सत्याने राज्य करुन अंती तो कैलासवासी होऊन भगवान् शंकराजवळ राहिला! खरा थोर राजा!

    ***