Paramvir Caption Manoj Pandey - Kargil Hero in Marathi Biography by Omkar Mirzapure books and stories PDF | परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो

Featured Books
Categories
Share

परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो

#GreatIndianStories

परमवीर कॅप्टन मनोज पांडे – कारगिलचा हिरो

सनातन काळापासून भारत मातेच्या कुशीत अनेक रत्ने जन्मली . तिच्याच अंगाखांद्यावर वाढली . लहानाचे मोठे झाली अन आपला अस्तित्व सिद्ध करून इथेच अस्तास पावली. मायभूचे पांग फेडण्यासाठी त्या रत्नांनी अवघ आयुष्य ओवाळून टाकल. आपल्या छातीवर परक्यांबरोबर आपल्यांचेही घाव झेलले. त्या प्रत्येक घावांबरोबर नवीन पैलू पडत गेले. त्या पडणाऱ्या पैलूंनी रत्नाची चकाकी अजूनही वाढविली.

भारत मातेला हेवा वाटावा अशी ती रत्ने . त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात राष्ट्रभक्ती भरलेली. त्यांच्या बलिदानामुळे त्याचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात कोरल गेल. अश्या अनेक विरपुरुश्यांच्या गाथांनी भारताच्या इतिहासाचा गाभारा सजविला. ही गाथा आहे अशाच एका रत्नाची, एका विरपुत्राची. ही गोष्ट आहे परमवीर चक्र प्राप्त कॅप्टन मनोज कुमार पांडे ची. कारगिलच्या युद्धात आपल्या असाधारण साहस अन दांडग्या आत्मविश्वासाच्या जोरावर पाकिस्तानला धुळीस मिळवणाऱ्या उत्तरप्रदेशच्या मातीची. खालुबार वर भारताचा विजयी तिरंगा फडकविणाऱ्या गनिमाची.

२५ जून १९७५ च्या प्रातकाळी उत्तरप्रदेशच्या रूधा गावात निसर्गाने आपला नियमच बदलला. डोंगराच्या कुशीतून उगवणाऱ्या सूर्याबरोबर अजून एक सूर्य उगवला , मोहिनीबाई गोपिचंद्र पांडे मातेच्या कुशीतून. त्या दोन्ही सूर्याने आपल तेजस्वी रूप, अस्तित्व सिद्ध केलं . अगदी आपल्या जन्मापासून.

मनोज कुमारला बालपणापासून राष्ट्रभक्तीच वेड होत. देशाबद्दल प्रेम होत. आई जिजाऊ नी जसा स्वराज्याचा अधिपती शिवबा घडविला अगदी त्याचप्रमाणे मोहिनी बाईनी बाल मनोजच्या मनावर थोर महापुरुश्यांचे विचार बिंबवले. त्यांनी केलेल्या कार्याच्या गोष्ट सांगितल्या . तल्लक बुद्धिमत्तेच्या बालमनावर देशभक्त अन विरपुरुश्यांच्या गोष्टींमुळे प्रचंड परिणाम झाला. गोष्टीतल्या हिरोसारख स्वत: व्हायचं ही इच्छा निर्माण झाली. विशेषतः सैन्याबद्दल विलक्षण आकर्षण निर्माण झाल. मनोजच देशप्रेम अन चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित करण यामध्ये त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. त्या नेहमी मनोजला प्रोत्साहीत करत. मनोजना त्या लाडाने ‘भय्याजी’म्हणत. मनोज कुमार ने आपल्या डायरी मध्ये आपल्या आई बद्दल लिहिताना तिला ताऱ्याची उपमा देऊन खूप सुंदर वर्णन केलं.ते लिहितात , ’ती म्हणजे शुक्राचा तारा आहे.अंधारात प्रकाश देणारा. भरकटलेल्या प्रवाशाला त्याची वाट दाखवणारा.अथांग सागरातील नौकेला काठावर पोहचवणारा ’.

कॅप्टनचे शिक्षण लखनौ शहरात वसलेल्या सैनिकी शाळेत झाले. अगदी त्यामुळेच शिस्त आणि देशप्रेमाची भावना अधिक बळकट होत गेली. जन्मापासून लाभलेली तेजस्वी बुद्धिमत्ता अजूनही तिक्ष्न होत गेली. एका घावात एखाद्या विचारवंताच्या विचाराचा पण घात करेल एवढी धार तिला आली होती. ते सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगले होते. त्यांची क्रीडेतील कामगिरी नेत्रदीपनिय होती. सैनिकी शाळेत त्या मातीच्या गोळ्याला एक आकार मिळाला. एक दिशा मिळाली. कर्तृत्व दाखव्ण्यासाठीची प्रेरणा मिळाली.

इंटरमेडीयट चा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी एन. डी. ए ची पुर्वपरिक्षा दिली. अन पुण्यातील खडकासावला येथील एन. डी. ए अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी आपला प्रशिक्षण पूर्ण केलं अन तदनंतर ११ गोरखा रायफल्स चे अधिकारी झाले. आपल्या शिक्षणाच्या जोरावर चांगली वातानुकुलीत खोलीतील नोकरी मिळत असताना पण ते फौजेत गेले. त्या वयात त्यांनी सैन्यात जायचे ठरवले ज्या वयात बऱ्याच जणांची ध्येय पण ठरत नाहीत. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे ते पण ठरलेल नसत. आई वडिलांच्या पैशावर मस्ती करन , रस्त्यावर सुसाट गाड्या पळवण अन काही कारण नसताना भांडण करण ह्याला हिरोगिरी मानतात.फालतू गोष्टी करण्यात आपली धन्यता मानतात.प्रेम आणि लफडी ह्यांतला फरक न समजता नको ते उद्योग करून बसतात.ह्या वीराने सुद्धा प्रेम केलं होत. पण ते प्रेम होत देशावरच.ते प्रेम होत एका मुलाच आपल्या आईवरच.देशासाठी एक काय शेकडो जन्म जीव देणाऱ्या वीराच. त्या प्रेमापोटी सैन्यात गेले. ज्यांच्या भाग्यारेखेतच परमवीर चक्र आहे त्यांनी दुसरा मार्ग निवडला तरी कसा असता? शेवटी वाघांचा वाघ आपल्या जंगलात दाखील झाला.

मनोज कुमार ह्यांना डायरी लिहिण्याची सवय होती.एका सैनिकाला तिच्याशिवाय जवळच असत तरी कोण ? प्रेम,राग ,मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचे एकमेव व्यासपीठ. मैत्रिणीसारखी सोबत असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर. प्रेरणा ,ध्येय ,भविष्यातील उद्दिष्ट ,वर्तमान परिस्थिती आणि भूतकाळाच्या आठवणी ह्यांचा संचय म्हणजे डायरी.आपल्या ध्येयाबद्दल वर्णन करताना ते लिहितात की,’माझी काही ध्येय इतकी श्रेष्ठ आहेत की ती मिळवताना अपयशी जरी झालो तरी ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होईल.’

त्यांच्या फौजेतल्या आयुष्याची पाने चाळता चाळता एक मजेदार गोष्ट हाती लागली. एकदा ते आपल्या तुकडी बरोबर एका आतंकवाद्याच्या शोधात निघाले होते. बऱ्याच वेळापासून न आल्यामुळे सगळेजण खूपच चिंतेत पडले होते. सगळ्याना काळजी लागली होती की परत येणार की नाही? परंतु ते सुमारे दोन दिवसानंतर परत आले. जेंव्हा एवढ्या उशीरा येण्याचे कारण त्यांच्या कमांडिंग ऑफिसर ने विचारलं तेंव्हा त्यांनी उत्तर दिल की आतंकवाद्याचा पत्ता नाही लागला तोपर्यंत आम्ही समोर सरकत गेलो आणि जोपर्यंत त्यांच्याशी सामना नाही केला तिथपर्यंत आम्ही परतीचा मार्ग धरला नाही. माघार घेतली नाही. ह्यावरून त्यांच्या दृढ निश्चयाचा अंदाज येतो.

जेंव्हा यांना आपल्या बटालियन सोबत सियाचीन मध्ये तैनात केले गेले. तेंव्हा ते नुकत्याच भरती झालेल्या ऑफिसरच्या तुकडीचे प्रशिक्षण घेत होते. त्यांना नेहमी एकच भीती मनाला खात होती. त्यांना चिंता वाटत होती की , जेंव्हा तुकडी कठीण परिस्थितीने काठोकाठ भरलेल्या स्थळांवर परिस्थिती आटोक्यात आणण्यास जाईन तर प्रशिक्षन चालू असताना कसे काय जमणार ? हीच गोष्ट त्यांच्या मनाला वेळोवेळ सतावत होती. शेवटी हिम्मत करून आपल्या कमांडिंग ऑफिसरला मनातली गोष्ट बोलून दाखवली. आपल्या मागणीत लिहील ‘जेंव्हा माझी तुकडी उत्तरेच्या ग्लेशियर कडे जाईन, तेंव्हा मला बाणा चौकी सांभाळायला पाठवा आणि जर माझी ही तुकडी सेन्ट्रल ग्लेशियर कडे जाईन तेंव्हा मला पहिलवान चौकीची तैनाती द्यावी. ’

कमांडिंग ऑफिसरने शेवटी त्यांच्या मागणीला मंजुरी दिली. आणि त्यानंतर ते बराच काळ सुमारे १९७०० फुटावर वसलेल्या ‘पहिलवान’ चौकीवर तैनात होते. कडाक्याच्या थंडीची आता त्यांना सवयच झाली होती . त्या उंचीवर प्राणवायूची अत्यंत कमतरता होती . परंतु राष्ट्रप्रेमासमोर त्या समस्या कवडीमोल होत्या. आपल्या मातेच्या रक्षणासाठी ते उभे होते भिंत बनून. दुश्मनाची गोळी निधड्या छातीवर झेलत , होणाऱ्या प्रत्यक वारला उत्तर देण्यासाठी. आपला किल्ला राखण्यासाठी हा किल्लेदार उभा होता. त्याचं तिथलं अस्तित्व होत बांधावरच्या बाभूळझाडासारख. वारा खात, गारा (हिम) खात पहिलवान चौकीच रक्षण केलं. अशाप्रकारे त्यांनी कित्येक मोहीमा सफलतापूर्वक फत्ते केल्या आणि देशाचा मान वाढविला.

शेवटी तो दिवस उजाडला. आपल कर्तृत्व सिद्ध करण्याचा. मायभूच ऋण फेडण्याचा. तो सुर्य उगवला कारगिलच्या युद्धाचे संकेत घेऊन. होणाऱ्या रक्तपाताची रेखाटणे आभाळावर रंगून. ती वेळ होती वीरांच्या समर्पणाची , विरगतीची. धरती रक्ताने माखणार होती. अनेक प्राणांची आहुती युद्धाच्या यज्ञात जाणार होती. ह्या कुरुक्षेत्रावर पुन्हा एकदा महाभारत घडणार होत.त्यावेळी मनोज पांडेची तुकडी सियाचीन चौकीवरून परत येत होती. तेंव्हा त्यांना कारगिलच्या युद्धाचे संकेत मिळाले. शेजारीच बिनबुलाये महेमान होऊन बसला होता. कार्य संपल्यामुळे सुट्टी मिळत असून सुद्धा ह्या विरयोद्याने घरी जाण्यास साफ नकार दिला. आरमालाच विश्रांती देऊन ते निघाले दुश्मनाला धुळीस मिळवण्यास.

महत्वाचे म्हणजे ते पहिले ऑफिसर होते ज्यांनी स्वतःहून पुढाकार घेत कारगिल च्या युद्धात सामील होण्याची इच्छा प्रदर्शित केली. जर त्यांना नुसतं वाटला असत तर ते सहज घरी जाऊ शकले असते. परंतु देशप्रेम त्यांच्या रक्ताच्या थेंबाबरोबर नसानसात वाहत होत. त्यांनी आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या युद्धात उडी मारली. दुश्मनाच्या शक्तीचा अंदाज असूनसुद्धा प्राण संकटात घातले. फळाची पर्वा न करता कार्य करण्याची तयारी दाखवली. मनी फक्त एकच ध्यास होता , विजयी तिरंगा फडकवण्याचा. भारत मातेला दुश्मनाच्या रक्ताचा अभिषेक घालण्याचा. पाकिस्थानला त्यांची लायकी दाखवण्याचा.

त्या दरम्यात तीन पंजाब अन सोळा ग्रेनेडीयर्स ची तुकडी पेट्रोलिंग साठी गेली होती पण परतली नव्हती. ह्यावरूनच होणाऱ्या घातपाताची पूर्वकल्पना आली होती. कारगिलच युद्ध लढण भाग होत. आपला प्रदेश पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय सैन्याची रणनीती सुरु झाली.त्यांच्या मिशन ला ऑपरेशन विजय नाव देण्यात आल. मनोज कुमारच्या खांद्यावर जबाबदारी मिळाली ती खालुबार जिंकण्याची. त्यांच्या सोबतीस होते त्यांचे १/११ गोरखा राईफल्स च्या बी कंपनी चे मावळे. युद्धाच्या दरम्यात त्याचं नेतृत्वगुण पाहून त्यांना पदोन्नती देण्यात आली. लेफ्टनन्ट मनोज कुमार वरून कॅप्टन मनोज कुमार बनवले गेले. युद्धाला निघण्याच्या आधी त्यांनी सोबत न्यावे लागणारे राशन कमी करून दारुगोळा जास्त देण्याची मागणी केली.

अशाप्रकारे एक भीषण युद्ध सुरु झाल. ते युद्ध होत सत्य अन असत्य ह्यांच्यातला. ते युद्ध होत सिंह बनू पाहणाऱ्या कुत्र्याला त्याची लायकी दाखवण्यासाठीच. ते युद्ध होत हैवनी महत्त्वाकांक्षेला धूळ चाटण्याच. कॅप्टन वर सोपवलेल कार्य अवघड होत. त्यांना कुकारथांग पोस्ट मिळवत जुबर पोस्ट काबीज करायची होती. त्यानंतर शेवटच लक्ष होत खलुबार. एक एक करत त्यांनी दोन्ही पोस्ट काबीज केल्या. परंतु सोबतचे बरेच गडी त्यांनी वाटेतच गमावले. तिथे जणू मृत्यूचा स्वयंवर सोहळा चालला होता. ती उभी होती हिमालयाच्या कुशीत, एका एकाला मिठी मारत. त्या परिस्थितीत देखील त्यांनी सैन्याचे मनोबल खचू दिले नाही. प्रत्येक क्षणाला प्रोत्साहित करत होते. मनात साथीदार गमावल्याच दु:ख होत पण काळजावर दगड ठेवून त्यांनी ना ओठावर आणल ना डोळ्यात. हे उत्कृष्ट नेतृत्व गुणाच प्रतिबिंब होत. डोळ्यात एकच स्वप्न दिसत होत, विजयी तिरंगा आकाशात फडकताना पाहण्याच. त्यांनी म्हंटल, ”माझ लक्ष पूर्ण करण्याच्या आधीं, माझ मातृभूमी प्रतीच कर्तव्य पार पाडण्याच्या कार्यात मृत्यू जरी आडवी आली तर तिला पण ठार करेन. ”

सुरु झालेल्या जवानाच्या शेवटच्या युद्धात ह्या वीराने दुश्मनाच्या धाबधब्यासारख्या बरसणाऱ्या गोळ्या, बॉम्ब आणि तोफांपासून स्वतःला वाचवत एक एक करत घुसखोऱ्यानी बनविलेल्या त्यांच्या घूसपिठाना साफ करीत जात होते. गोळ्यांचा पाऊस पाडत ते आपल्या तुकडीला घेऊन समोर समोर सरकत होते. सोबत राशन कमी नेल्यामुळे ते जवळपास संपल होत. उपाशीपोटी जात होते आणि दुसऱ्या बाजूस पाकिस्थानी सैन्य सुमारे १६००० फुटावर भारतीय सैन्याची वाट पाहत बसले होते की कधी ते येतील अन कधी त्यांना मृत्यूला भेट करणार. परंतु हे वीर मृत्यूला ही न जोमनता पुढे सरकावत गेले. कॅप्टन मनोज कुमार एक-एक करून दुश्मनाच्या साऱ्या छावनिना उद्वस्त करीत चालले होते. परंतु एका ठराविक उंचीवर गेल्यावर त्यांना कळून चुकलं होत की फुकट जवान गमावणं मूर्खपणाच होत.छातीवर भुतासारख बसलेल्या दुश्मनाला उंचीचा जास्त फायदा मिळत होता. समोरून येणारा प्रत्येक भारतीय सैनिक निशाण्यावर दिसत होता.त्यामुळे आपल्या तुकडीला वर सरकवत घेऊन जान कॅप्टन ला अवघड जात होत.

खालुबार घेण्यासाठी एवढी समस्या काणत्याही परिस्थितीत पार करायची होती. शक्ती पेक्षा युक्ती त्या संकटावर मात करण्यासाठी जास्त उपयोगाची होती. रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात पुढे सरकन जास्त चांगला पर्याय वाटला.ती युक्ती होती रात्रीच्या काळोखाचा फायदा घेण्याची.कोंडाजी फर्झंद सुद्धा फक्त साठ मावळे घेऊन पन्हाळ्यासारखा किल्ला जिंकला ,तोही रात्रीच्या अंधारात.एका वीराला दुसऱ्या वीराची प्रेरणा मिळाली होती.एका मावळ्याच्या पाऊलावर पाऊल टाकून दुसऱ्या मावळ्याने रात्रीच चढाई करण्याचे ठरवले.आपल्या तुकडीला गोळीबार थांबवण्याचा आदेश दिला. रात्री चढाई करण्याची रणनीती बनविली. रात्र होईपर्यंत दुश्मनाच्या गोळ्यांना हुसकावणी देत स्वतःचा बचाव केला. रात्र झाली खरी पण चंद्राचा प्रकाश बऱ्यापैकी मोठा होता. त्या प्रकाशात दुश्मनाच्या सहज नजरी आल असत.जसा जसा चंद्र एका एका ढगाच्या मागे झाकला जायचा तसा तसा एक एक करत जवान चढाई करत वर सरकत होता. पण काही अंतर पार करताच दुश्मनाला चालीची कल्पना आली. पायाखालून सरकणाऱ्या दगडगोट्यांच्या आवाजामुळे त्यांना चढाईची अंदाज आला.त्याच क्षणी त्यांनी गोळ्यांचा ,तोफांचा भडीमार सुरु केला.

डाव लवकरच फसला. पण धीर गमावण परवडण्याजोग नव्हत. घाबरून गेल तरी मृत्यू ,लढल तरी मृत्यू. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. भ्याडपणे पळून जान ह्या मर्दाना माहीतच नव्हत.आता माघार शक्यच नव्हती.आता ती परिस्थिती आणि तो काळ दोघेपण त्या वीराची कसोटी होते. ती अग्निपरिक्षा होती. आतापर्यंत न केलेलं वा न पाहिलेलं काम त्याला करायचं होत. कधी न घेतलेला निर्णय कॅप्टन ला घ्यायचा होता. निर्णय घेताना जराशी जरी चूक झाली तरी त्याचा परिणाम सरळ मृत्यू होता.त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती पण कॅप्टन चा निर्णय तुकडीतील सर्वांच्या जीवावर बेतू शकतो.तो निर्णय होता एका कॅप्टन चा. त्यांनी आपल्या तुकडीचे दोन भागात विभाजन केले. एका तुकडीचे नेतृत्व करत सरळ बंकरावर हल्ला चढविला. रवींद्र टागोर आपल्या एका कवितेत लिहितात की,”एकीत बळ आहेच पण एकटी व्यक्ती सुद्धा खूप मोठा चमत्कार घडवू शकते”.हाच तो चमत्कार होता.

पहिल्या बंकरला उध्वस्त करीत असताना मनोज कुमार ने दुश्मनासोबत समोरासमोर युद्ध केलं अन त्यात तिथल्या दोघांना खंजरनेच ठार केलं. त्यानंतर दुसऱ्या बंकरचा पण नामोनिशान मिटविला. इथेपण दोघांना नरकात पाठवल. जेंव्हा ते तिसऱ्या बंकर कडे निघाले तेंव्हा त्यांच्या खांद्यावर अन पायावर गोळी लागली. पण कधी हार न मानणारा वीराने त्याची पर्वा केली नाही आणि तिसरा बंकर पण धुळीस मिळविला. अजस्त्र आभाळाला आव्हान देऊन एकटेच झुंजत राहिले.ऑपरेशन विजय आणि मृत्यू ह्यामधील भिंत बनून.त्याचं शरीर सुद्धा त्यांना साथ देत नव्हत.मरण येणार होत हे कळून चुकलं होत.मग मेल्यावर मिळणारी ती पदके, ती बक्षिसे काय कामाची ? जीवनच नसेल जगायला तर ते का लढत होते ? अशी कोणती भावना होती जी जीवनापेक्षा जास्त महत्वाची होती ? पदकांपेक्षा श्रेष्ठ होती ? ती होती देशभक्तीची भावना . बंकर उध्वस्त करण्यात कॅप्टन ला मिळालेल्या यशामुळे तुकडीत अजून जोश आला. ते अधिक क्षमतेने लढायला लागले. सर्वस्व पणाला लावल. मनोज कुमारने आपल्याकडील हातबॉंबने शेवटचा चौथा बंकर उडविला. पण ह्या दरम्यात एक गोळी वेध घेत त्यांच्या डोक्यात घुसली. त्या गोळीने त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले. चित्रगुप्ताने आपला रथ तयार केला. शेवटी विराला वीरगती मिळाली. जीवनातील शेवटचे ते क्षण होते. अन त्या क्षणी त्यांचा सहकाऱ्यांना एकच आदेश दिला,’सोडू नका त्यांना ,ज्यांनी आपल्या देशाकडे नजरेने पहिले.ह्यांना अस उत्तर द्या की हेच काय भविष्यात कधीच कोणत्याही देशाची हिम्मत होणार नाही .’ वीरगतीला प्राप्त होण्याआधी त्यांनी आपली नाव पैलतीराला नेली होती. खालुबार वर कब्जा करून विजयी तिरंगा फडकविला होता. त्या तिरंग्याला सलाम करून त्यांच्या शरीराने आत्म्याला मुक्त केलं. मृत्यूने वीरास मिठी मारली एकदाची . ती सुद्धा कर्तव्य पार पाडल्यावर. मायभूला गर्व वाटावा असा वीर तिच्या समृद्ध इतिहासात अजरामर झाला. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी जीवनाचे लक्ष साध्य केले.

अश्या युद्धाच्या त्या रात्रीबरोबर तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. तो अस्त होता उल्लेखनीय शौर्य आणि अतुल्य धैर्य असणाऱ्या सैनिकाचा. तो केवळ कर्तव्य भक्त असलेल्या कॅप्टन चा मृत्यू नव्हता तर भारतीय सैन्याच्या समृद्ध परंपरेला लाभलेला तो सर्वोच्च मुजरा होता. भारत मातेला पुत्र गमावल्याच दु:ख होत पण त्याचं बलिदान व्यर्थ गेल नाही याचा आनंद ही होता. ती रात्र होती विजयाची. ती रात्र होती वीरांच्या त्यागाची . त्या रात्रीनंतर जेवढेही दिवस उजाडले , प्रत्येक दिवस ऋणी आहे त्या रात्रीचा आणि त्या विरपुत्राचा .