Ti Chan Aatmbhan - 7 in Marathi Moral Stories by Anuja books and stories PDF | ती चं आत्मभान... 7

The Author
Featured Books
Categories
Share

ती चं आत्मभान... 7

७. स्वयंसिद्धा..

प्रियांका न्यायाधीश.

अरविंद आणि वंदनाच्या संसारात शाल्मली नावाचं सावळं फूल. मध्यमवर्गीय संसारात जे शक्य असेल ते कौतुक तिच्या वाट्याचं. शाल्मली एकुलती एक त्यामुळे अरविंद आणि वंदनाची लाडाची पोर. शाल्मलीला दोघे लाडान शामी म्हणत...

सौम्य प्रकृतीची, मितभाषी आणि फार हुशार नसलेली पण अगदी सुमार पण नाही अशी बुद्धी असलेली शामी. अंगात फार गुण नसले तरी अतिशय संवेदनशील मनाची! आईवडील जसे ठेवतील तसं रहाणारी.. त्यामुळे समंजस... उगाच फालतू हट्ट तिने कधी केलेच नाहीत. तिच्या सुमा आत्याच्या घरची पण लहानपणापासूनच लाडकी. खूप लाड व्हायचे तिचे. खाऊ खेळणी सगळं काही आत्याच्या घरून.. सुमी आत्याचा दीर बाळकाका ट्रेनिंगच्या निमित्ताने घरी रहायला आला. अरविंदरावांच्या सततच्या बाहेर गावच्या वाऱ्या, नोकरी निमित्ताने चालू असलेले दौरे यामुळे त्यांना शामीची ने आण करायचं जमत नसे. ते काम वंदनाच करायची. शामी तशी मोठी होती आपण आपली जायला यायला..तरी वंदना तिच्यासोबत जायची तेवढीच शामीच्या अभ्यासाची विचारपूस व्हायची. पण बाळकाका आल्यावर वंदनाचे हेलपाटे वाचले. तो घरी आल्यावर तर शामीचं राज्यच घरी. बाळ काका शामीचे भरपुर लाड करायचा. लाड करण्याबरोबर तो अरविंद आणि वंदनाच काम पण हलक करत होता. शाळेत, क्लासला आणायला सोडायला बाळ काकाच असायचा. तो आल्यापासून अरविंद आणि वंदना दोघांच्या वाट्याची बरीच कामं कमी झाली..आणि शामीची भेळ आणि आईसक्रीम पार्टी पक्की झाली.सगळं कसं छान मस्त चालू होतं.

काही दिवसांपासून मात्र शाल्मलीचं मात्र काहीतरी बिनसलं होतं. दिवसेंदिवस ती जास्त अबोल होत चालली होती. शामीच शाळेत सुद्धा लक्ष लागेनास झाल होतं. अभ्यास सुद्धा मागे पडला होता. कधी नाही ते एक दोनदा नापासही झाली. मग काय रागवारागवी सुरू झाली वंदनाची. एक दिवशी वंदना चिडलीच आणि शामी ला मारण्यासाठी तिने हात उचलला. त्यावेळी बाळ काका शामीसाठी धावून आला. त्याने मध्ये पडून कसंबसं प्रकरण आवरलं. असे प्रकार बऱ्याचवेळा व्हायला लागले. शेवटी काकाच्या ओळखीच्या अजून एका क्लासला शामीची रोज रवानगी व्हायला लागली. आणि तिला ने आण करायचं अजून एक काम बाळकाकाच्या वाट्याला आलं.

बाळकाका ही सगळी जबाबदारी घेत होता..त्यामुळे वंदनाला त्याचं किती कौतुक. ती नेहमी सुमनला म्हणायची..

" सुमाताई तुम्ही नशीबवान हो. अगदी पाठच्या भावासारखा दीर लाभला तुम्हाला." वंदनाच हे बोलण ऐकून सुमा आत्याची मान दोन्हीकडे ताठ व्हायची.

सुमा आत्या तशी मनमिळावू. खूप आवडायची शामीला. पण हल्ली मात्र तिच्याशी फोनवर बोलणं पण टाळायची. आणि बोललीच तर काहीतरी तुटक उत्तरं देऊन बाजूला व्हायची. वंदनाच मग म्हणायची, " सुमाताई राग मानू नका हं. ह्या पोरीचं काय बिनसलं आहे कोण जाणे.!" असं म्हणून शामीच्या सगळ्या गोष्टीचा पाढा वाचायची. "आणि त्यातून बाळकाकाने लाडावून ठेवलंय हो अगदी. त्यांचं लाड पुरवणं थांबेल तर ना. सारखं काही ना काही आणत असतात तिच्यासाठी ड्रेस म्हणू नका खाऊ म्हणू नका..महागाची पेनं काय रंग काय काही विचारू नका." असं लटक्या रागाने वंदना सांगत रहायची. सुमन म्हणायची,"असू दे गं वहिनी अर्धवट वय आहे. जरा लहरी होतात मुली. शहाणी झाली की होईल सगळं सुरळीत." शामी आईच आणि आत्याच बोलण ऐकायची पण त्यावर काही सुद्धा प्रतिक्रिया द्यायची नाही. शामीच्या वागण्याच कारण कधी कुणी समजून घेतच न्हवत. शामी एकटी पडत होती. तिला कळत नव्हत मन मोकळ करायचं तर कोणाकडे? शाल्मलीला अवघड परिस्थितीमधून जात होती.

आणि खरंच छोटीशी शाल्मली मोठी झालीच एक दिवस!

शाळेत मासिकपाळीची सगळी माहिती दिलेली होती तरी पहिल्या वेळी काय वाटायची ती भीती वाटलीच तिला. शामी शाळेतून अर्धी सुट्टी घेऊन घरी आली. आईला येऊन बिलगली. वंदनाला शामी मोठी झालीये ह्याची जाणीव झाली आणि मग वंदनाने सगळे सोपस्कार पुन्हा सांगितले तिला. कौतुकाचा गोड शिरा करून भरवला आणि म्हणाली..

"शाम्या आता जरा दंगा घालणं कमी करा हां. तारीख लक्षात ठेव ह्या महिन्याची. पुढे मागे झाली तारीख तर सांगा वेळेत हां.." आईचा असा प्रेमाचा वर्षाव पाहून शाल्मली नुसती रडत राहिली.

" अगं वेडाबाई रडतेस काय ..मोठी झालीस बयो! प्रत्येक मुलीला ह्यातून जावच लागत. मी पण गेले होते."

वंदना हे बोलली खरी पण वंदनाचेच डोळे भरून आले. तिच्या पिल्लाचं मुलगीपण संपून बाईपण सुरू झालं होतं. स्वतःला कसं जपायचं याच्या हजार सूचना दिल्या तिने शामीला!

पण वंदना भारावली होती तरी शामीच्या आयुष्यात अजून एका तणावाची भर पडली होती.

आपले आहेत ते प्रश्न कसे सोडवावेत या विवंचनेशी लढू पहाणारी ती पोर या नवीन बदलाने अजून कातावून गेली. मैत्रीणीही याच चक्रात असलेल्या. सगळ्याजणींचे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच. कुणाला नवीन काय सांगणार ..तीच ती शारीरिक वेदना आणि मानसिक आंदोलनं!

पण शाल्मलीच्या शारीरिक वेदना मात्र या पेक्षा खूप वेगळ्या.. बऱ्याच दिवसांपासून सहन केलेल्या ..कुणाला सांगता आल्या नसत्या अश्या. आणि सांगितल्यावर विश्वास ठेवणार कोण? शाल्मली मनातल्या मनात कुढत रहायची पण कोणासमोर बोलायची तिची कधी हिम्मत व्हायची नाही.

दिवस सरत होते आणि शाल्मली अधिक उदास झाली. अधिकच हतबल झाली.

स्वतःला सांभाळ म्हणजे काय कर हे सांगितलं नाही कुणी तिला. जे महत्वाच होतं त्या विषयावर कधी कोणी बोललंच न्हवतं तिच्याशी. छोटी पोर पुरती घाबरून गेली होती. आणि खरंच एक दिवस ही गोष्ट समजून आली तिला.

शाळेत कसलंसं व्याख्यान होतं. सगळ्या मुलींना शाळेच्या हॉलमध्ये बोलावलं होतं. चक्क गणिताचा तास न घेता शास्त्रीबाईंनी हॉलमध्ये बोलावलं.गणिताचा तास नाही ही एक गोष्ट शामीच्या आनंदासाठी पुरेशी होती.

शास्त्रीबाईंनी बोलायला सुरुवात केली.

" मुलींनो आज आपण इथे एका महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी आलो आहोत. शाळेतल्या विषयापेक्षाही महत्त्वाचा विषय. बाकी कोणत्याही विषयात कमी मार्क आले तरी.. नापास झालात तरी चालेल पण या विषयात तुम्ही चांगल्या पद्धतीने पास व्हायलाच हवं. "

बाईंचं बोलणं ऐकून मुली चकीत झाल्या अगदी. "अभ्यासापेक्षा अगदी गणितापेक्षा ही काय असा विषय आहे त्यात पास व्हायलाच पाहिजे? " शाल्मली विचारात पडली हा नवा अभ्यास कसा झेपणार?

बाई बोलायला लागल्या. जसा जसा बाईंनी विषय सांगितला. त्याला अनुसरून चित्र दाखवली तशी तशी शाल्मली एकदम सावरून बसली. अगदी तिचाच विषय जणू काही. चित्र ही तिच्या अगदी परिचयाची...त्या तासाचा प्रत्येक क्षण शाल्मली पुन्हा जगलीच जणू!

कधी नाही ते शास्त्रीबाईंचा प्रत्येक शब्द तिने मनात साठवून घेतला. आणि तिला अचानकपणे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली..जादू व्हावी तशी शामी आनंदून गेली. आजचा दिवस ती कधीही विसरणार नव्हती...शामी शाळेतून घरी आली तेव्हाही खुश होती. शामीचा असा छान मूड पाहून वंदना अगदी हरखून गेली ..मनात म्हणाली, "शेवटी सुमाताई म्हणाल्या तेच खरं झालं सुधारली शामी. बरं झालं, पोर आनंदी झाली." असा विचार करत मनातल्या मनात शामीची दृष्ट काढली तिनं.

आज शामी गणिताच्या क्लासला जायला बाळकाकाच्या आधी तयार झाली. ड्रेसपण काकाच्या आवडीचा घातला तिने.. केसाचा छानसा हाय पोनी बांधून मस्त तयार झाली.. शामी खुलली होती. वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर आलं होतं.

" बाळकाका मला भेळ हवी हां आज!"

बाळकाकाला तिच्या उत्साहाचं गुपित कळेना. तरीपण वंदनासमोर तिला म्हणाला.." हो हो काय हवं ते देतो पण आधी क्लासला चला."

बाळकाका तिला गाडीवर बसवून क्लासला घेऊन आला.

शाल्मलीचा बदललेला मूड रूप बाळकाकाला सुखावत होता. ती दिसत ही होती सुरेख. किती वेळा सांगितलं होतं तिला धाक दाखवून, प्रसंगी रागावून पण की जरा छान रहात जा ..

पण पोरगी ऐकतच नव्हती. आणि आज हा बदल म्हणजे सुखद धक्काच की.

शेवटी एकदाचे क्लासला पोचले.

बाळ काका म्हणालाच शेवटी "शामी काय सुंदर दिसते आहेस आज तू. ऐकलंस माझं एकदाचं..आता आज पण काय सांगतो ते ऐकायला हवं हां तुला. अशीच शहाण्यासारखी वाग. मला हवं ते करू दे. म्हणजे नेहमीसारखा त्रास नाही होणार तुला."

बाळ काकाने तिचे केस मोकळे केले..आणि ओढणी काढून टाकली.. पण ह्यावेळी शामी सावध होती. शामीच्या डोळ्यासमोर शास्त्रीबाईंनी दाखवलेली चित्र सरकू लागली..

आणि त्यांचे शब्द....ह्यावेळी शामीला काय करायचं ते माहिती होतं. शामीने पटकन जाऊन तिच्या कंपासपेटी उघडली. आणि हातात तिच्या कंपास पेटीमधील कर्कटक घेतलं..ह्यावेळी शामीनी काही निर्णय घेतले होते. सगळी इच्छाशक्तीपणाला लावून बाळकाकाच्या उघड्या झालेल्या मांड्यांवर तिने ते कर्कटक घुसवलं..रक्ताची धार लागली..ह्यावेळी शामी वेगळीच वागली. बाळ काकासाठी शामीचं हे वागण नवीन होतं. तो क्षणात दूर झाला आणि आत्यंतिक वेदनेनं विव्ह्ळू लागला. त्याच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता त्याच्या तोंडून शब्द फुटेना ..

आज शामी खंबीर बनली होती. आज तिला वेदना नाही झाल्या. आज तिचा विश्वास तिला परत मिळाला होता. आणि तिला आज काही बोलायची गरज पडली नव्हती..

शास्त्रीबाई सांगत होत्या ते शब्द तिच्या कानात घुमत होते,

" मुलींनो ..आज मी जी माहिती तुम्हाला दिली ती फार महत्वाची आहे कायम लक्षात ठेवा. कुणी तुमच्या शरीराला वाईट पद्धतीने स्पर्श करीत असेल तर तो चाईल्ड अब्यूझचा भाग आहे. मराठीत त्याला लैंगिक शोषण म्हणतात. अशा लोकांपासून स्वतःचे रक्षण करणे हा आपला हक्क आहे. कुणी मदतीला नसेल तर आपण कोणत्याही मार्गाने स्वतःचा बचाव करायला हवा. आपल्या घरातील मोठ्या माणसांना विश्वासात घ्या. मी आहे इथे मला किंवा तुमच्या कोणत्याही बाईंना सांगा. पण घाबरू नका आपली भीती ही अशा लोकांची खरी ताकद असते .

या लढाईमध्ये मानसिक ताकद जास्त हवी हे लक्षात ठेवा."

ह्यावेळी शामी घाबरली नाही. शामीने स्वतःच रक्षण केल होत. तिचा आत्मविश्वास दुणावला होता आणि शाल्मली कणखर आवाजात म्हणाली ..

" बाळ काका झाला एवढा क्लास पुरे झाला आता मी माझ्या अभ्यासाचं काय ते पाहून घेईन. तू तुझ्या घरी गेलास तरी चालेल. पुन्हां कुणाला क्लास लावायला जाऊ नको. आणि अस काही करायचा पुन्हा प्रयत्नही करू नकोस. "

बाळ काका शामीच बोलण ऐकत होता पण तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. बाळकाकाच्या वेदना आणि नजरेतली भीती पाहून तिच्या मनाला विलक्षण आनंद झाला होता.

आज संपूर्ण जगात शास्त्रीबाई तिच्या सगळ्यात आवडत्या शिक्षिका होत्या! त्यांच्यामुळे शामी तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकली होती. तिला जाणीव झाली होती, ती एक अबला नाही.

अंतहीन चालेल अशा वाटणाऱ्या ह्या स्वतःच्या गोष्टीचा अंत करणारी शाल्मली ही स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्धा नायिका होती. आणि आत्मविश्वासाची ही देणगी तिला कोणतीही परिक्षा पास व्हायला कायम पुरेशी ठरणार होती.

प्रियांका लक्ष्मण न्यायाधीश.

परिचय-

मी पुणेकर आहे . माझं शालेय शिक्षण शिवरामपंत दामले प्रशाला अर्थात पूर्वीची महाराष्ट्रीय मंडळ गुलटेकडी इथे झालं.एस पी .कॉलेजमधून मी मानसशास्त्रात पदवी घेतली आहे .आणि टिळक महाराष्ट्र विद्यालयातून मी ग्रंथालय शास्त्राची पदवी घेतली आहे. रेणुका स्वरूप करिअर कोर्सेस च्या माध्यमातून मी टीचर्स ट्रेनींग कोर्स केला आहे आणि २०११ पासून मी एस. पी. एम पब्लिक स्कूलमध्ये प्री. प्रायमरी विभागात शिक्षिका आहे.

माझी थोडक्यात ओळख म्हणजे...

माझं लिखाणच माझी ओळख आहे .मी मराठी कविता आणि ललितलेखन करते . वाचन आणि लेखन माझे आवडीचे विषय आहेत.

***