Ti Chan Aatmbhan - 4 in Marathi Moral Stories by Anuja books and stories PDF | ती चं आत्मभान .. 4

The Author
Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

ती चं आत्मभान .. 4

४. नित्या..

Mrs. Dipti Methe.

विश्व हिंदू विद्यालयाच्या गेट मधून गाडी आत गेली. पार्किंग मध्ये त्यावेळी तशी फारशी वर्दळ नव्हती नित्याने गाडी पार्क केली आणि ती तशीच बसून राहिली. तिची नजर काहीतरी शोधत होती आणि छातीत कमालीची धडधड होत होती. टेन्शन वाढलं की नखांच्या बाजूला असणारी क्युटिकल्स कुरतडण्याची तिला वाईट सवय होती नकळत आताही ती तेच करत होती. गाडीत पुन्हा एकदा मागे वळून तिने खात्री करून घेतली की, सोबत आणलेल्या साऱ्या वस्तू नीट मागच्यासीट वर तर आहेत ना..? हंम्म...! सारे व्यवस्थित होते. नित्याने पुन्हा आपली नजर बाहेर बिल्डिंगच्या एन्ट्रन्सवर स्थिर केली. गाडीत बाहेरचा कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. त्या भयाण शांततेत केवळ तिच्याच हृदयाचे ठोके तेवढे ऐकू येत होते. एवढ्यात संपूर्ण शरीरात वीज सळसळावी तशी तिच्यात चुळबुळ सुरू झाली. तो समोर होता. सुटा बुटात, भारदस्त व्यक्तिमत्त्व, हातात काही फायली, पुस्तक आणि खांद्यावरच्या शबनम बॅग च्या जागी आता मस्तपैकी मॅक आला होता. काळानुसार बदलला होता. ऐपत वाढली होती. कॉलेजातले पद आले होते. आधीचा एक शाळा मास्तर आता प्राचार्य झाला होता. केवळ पाच वर्षांत कित्ती काय काय बदलत नाही. पण चष्मा सावरत चालण्याची त्याची लकब काही बदलली नव्हती. नित्या बऱ्याच दिवसांपासून त्याचा मागोवा घेत होती. नक्की हाच ना तो. याची खातर जमा तिने केव्हाच करून ठेवली होती. त्यामुळे आता फक्त काही प्रश्नच तर विचारायचे होते सरांना. त्याने लॅपटॉप व काही बुक्स वगैरे स्वतःच्या गाडीत व्यवस्थित ठेवली, अंगातला कोट काढून आत मागच्या सीटवर ठेवला. टाय लूज करत ड्रायव्हिंग सीटवर विराजमान झाला आणि कार स्टार्ट केली. नित्या देखील आपली कार स्टार्ट करायला सरसावली. गेटबाहेर पडत दोघांनी रस्ता धरला. नित्या त्याच्या मागोमाग तो वळेल तशी कार वळवत होती. एकार्थी पाठलागच होता तो. नेहमीसारखा घराच्या दिशेने आज न जाता तो शहराबाहेर थोड्या अंतरावर असणाऱ्या वाईन शॉप कडे वळला. नित्याला काहीच उमगले नाही. कारण सर असं कधी करताना एवढ्या दिवसांच्या पाठलागात तिने पाहिलं नव्हतं. असो, ती पुढे निघून गेली. सरांनी आपली आवडती वाईन घेतली कुणा विद्यार्थ्यांनी पाहू नये म्हणून एवढ्या लांब येत. आपला स्टेटस सांभाळत बाटल्या कार मध्ये ठेवल्या आणि पुन्हा कार स्टार्ट करत घराच्या दिशेने वळवली. एव्हाना बऱ्यापैकी अंधारून आले होते. थोडे अंतर कापताच कुणीतरी स्त्री लिफ्ट मागत रस्त्याच्या कडेला आपल्या गाडीला टेकून हात हलवताना त्याला दिसली. एक भुवई उंचावत त्याने कार तिच्यापाशी थांबवली.

"येस..!!!"

"सर..! माझी कार बंद पडलीय आणि इथे मी नवीनच आहे. मेकॅनिक मिळेल का इथे कुठे आसपास..?" - नित्याने विनंती केली.

"ओहो..! आय सी..! मिळेल ना. पण त्यासाठी तुम्हाला शहरात जावं लागेल. मीही तिथेच निघालोय या तुम्हाला सोडतो. एकदा शहराच्या रस्त्याला लागलो आपण की, बरेच गॅरेजेस दिसतील तुम्हाला."

"ओह..! थँक यु व्हेरी मच सर." - नित्या खुश झाली.

"अहो थँक यु काय त्यात मी शहरातच रहातो. तिथेच निघालोय म्हणून तुम्हाला लिफ्ट देतोय नाहीतर अनोळखी लोकांशी मी बोलत नाही बर का..?"- मिश्किल हसतो

"हाहाहा...! खरच की काय..?"

"कम..! कम अॅँन्ड रिलॅक्स. मी सोडतो तुम्हाला डोन्ट वरी.."

नित्याने आपल्या कार मधून स्वतःचे जॅकेट तेवढे आठवणीने घेतले आणि ती त्याच्या कारमध्ये मागच्या सीटवर बसली. पुढल्या सीटवर त्याचा लॅपटॉप न बुक्स असे सारे पसरलेले होते. दोघांच्या अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. पण नित्याच्या मनात काहीतरी चालले होते. तिचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. सभोवताली बऱ्यापैकी झाडी असलेला तो तसा सुना रस्ता होता. वर्दळ नाहीच. तो कार ड्राइव्ह करण्यात मग्न होता. नित्याने वेळ न दवडता आपल्या जॅकेट मधून प्लास्टिक ची पिशवी बाहेर काढली आणि काही समजण्या आधीच त्याच्या डोक्यावर चढवली व मागून करकचून आवळून टाकली त्याला अशा अचानक झालेल्या हल्ल्यावर प्रतिकार करायला वेळच तिने दिला नाही. तो श्वास घेण्यासाठी तडफडत होता. त्याचा स्टेअरिंग वरचा ताबा केव्हाच निसटला होता. गाडी रस्त्यालगतच्या झाडीत घुसत धाडकन आवाज करीत एका विशालकाय झाडावर आदळली. थोडावेळ नित्याला देखील भोवळ आल्यासारखे झाले. पण स्वतःला सावरत तिने त्याचा पल्सरेट तपासला तो अजून जिवंत होता. फक्त बुशुद्ध झाला होता इतकंच. वेळ न दवडता नित्याने सोबत आणलेल्या टायरॅप ने त्याचे हात, पाय बांधले आणि तोंडावर सेलोटेप लावत त्याला तसाच बेशुद्ध अवस्थेत सोडला. ती घाईघाईने आपल्या कारच्या दिशेने निघाली. त्या रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट्स देखील नव्हते त्यामुळे अंधार जरा जास्तच भयाण वाटत होता पण त्याही पेक्षा भयावह विचार नित्याच्या डोक्यात थैमान घालत होते. आपल्या कारपाशी जाताच तिने लगबगीने ती स्टार्ट केली आणि घटनास्थळी कानोसा घेत पुन्हा परतली. अजून तो तसाच निपचित पडला होता. नित्याने पूर्ण ताकदिनिशी त्याला त्याच्या कार मधून बाहेर खेचलं आणि कसेबसे आपल्या कारच्या डिक्कीत त्याला कोंबलं. घामाने ती नखशिखांत भिजली होती. ओठ थरथरत होते. हाताला देखील कंप सुटला होता. डिक्की बंद करीत क्षणाचाही विलंब न करता तिने आपल्या फार्म हाऊस च्या दिशेने गाडी भरधाव वेगात सोडली. कार पार्क करीत नित्याने एक मोठा श्वास घेतला. ती गाडीतून उतरली. डिक्की उघडली, एव्हाना त्याला जाग आली होती कपाळावर थोडी जखम वहात होती पण तो आता पूर्णपणे शुद्धीवर आला होता. नित्या मनातून थोडीशी चरकली पण पुन्हा अंगात बळ एकवटून क्लोरोफॉर्मच्या सहाय्याने तिने त्याला बेशुद्ध केलं.

त्याला शुद्ध आली तेव्हा तो एका साउंडप्रूफ खोलीत बंदिस्त होता. तोंडावर पट्टी तशीच होती. हात पाय टायरॅप ने बांधलेले. त्याने स्वतःला सोडवण्याचा विफल प्रयत्न केला कारण तो जेवढा प्रयत्न करीत होता तेवढे टायरॅप मुळे त्याचे हात पाय जखमी होत होते. आता तिथून रक्तही वाहू लागले होते. त्याने स्वतःला सोडवण्याचा तो पेनफुल प्रयत्न अखेर थांबवला. एवढ्यात दारावर कसलीशी हालचाल झाली त्याने डोळ्यांत त्राण आणीत पाहिले. नित्या पाण्याचा जग हातात घेऊन आली होती. येताच तिने त्याच्या तोंडावरची पट्टी काढली. तो मदतीसाठी आक्रोश करू लागला. पण नित्या मात्र शांतपणे तिथे बसून त्याची धडपड पहात होती. अखेर त्याचा घसा कोरडा पडला त्याचे ते भेसूर ओरडणे थांबल्यावर नित्याच्या हातून तो पाणी प्यायला तेव्हा कुठे त्याला थोडेसे हायसे वाटले. त्याला कळत नव्हते हे सारे का? आपले किडनॅप कशासाठी? काय हवं आहे ह्या बाईला आपल्या कडून. "किती पैसे हवेत...?" - तो धापा टाकत बोलला.

"तुला काय वाटतं हे सारं मी पैशासाठी केलं ?"- नित्याने तिरस्काराने प्रत्युत्तर दिले.

"मग काय हवं आहे तुला?"

"तुझं नाव...खरं नाव...!"

"प्रो..प्रोफेसर...व...व...वसंत दिघे." - त्याला घाम फुटला होता.

नित्याने रागाने हातातले पाणी त्याच्या चेहऱ्यावर मारले आणि ती तडकाफडकी दरवाजा बंद करीत काहीच न बोलता तिथून निघून गेली.

किचनमध्ये येताच नित्या स्वयंपाकाला लागली. जेवण होताच घासभर स्वतः जेवून घेतलं आणि ताटात त्याच्यासाठी जेवण घेऊन ती त्या बंदिस्त खोली जवळ गेली. आत शिरताच तिने त्याचे हात मोकळे केले. हाताला फारच रग लागल्याने आधी बराचवेळ त्याला धड जेवताही येईना. पण भूक लागल्याने त्याने ते समोर आलेले अन्न महत्प्रयासाने घशाखाली ढकलले. तिने पुन्हा टायरॅप ने त्याचे हात करकचून बांधले. पुन्हा नाव विचारले त्याने ठरलेलेच उत्तर दिले...

"वसंत दिघे...? ठीक आहे नको सांगूस तुला कायमचं इथेच राहायचं असेल तर माझी अजिबात हरकत नाही." - नित्या कठोरपणे बोलत उठली.

"माझं नाव खरंच प्रोफेसर वसंत दिघेच आहे हो...! मी कसं पटवून देऊ तुम्हाला? माझं ड्रायव्हिंग लायसन्स बघा, माझी कॉलेज ची आय डी बघा हवं तर."

नित्याने सणसणीत कानाखाली देत त्याला गप्प केलं. तिला राग अनावर झाला होता.

"तुला खरं बोलायचं नसेल तर ती तुझी मर्जी. मला तुझी आय डी बघण्यात अजिबात रस नाही. तू नाव सांगितलंस तरच आपण पुढे मुद्याचं बोलू शकतो. अन्यथा इथेच मरशील. आणि कुणाला तुझा ठावठिकाणाही लागणार नाही."

नित्या आली तशीच निघून गेली. त्याची मात्र धडपड सुरू झाली तिथून सुटण्याची. पण सारे प्रयत्न विफल होताना दिसत होते तो रडकुंडीला आला होता. काहीच सुचत नव्हते. मदतीसाठी ओरडण्याचाही काही उपयोग होत नव्हता आवाज बाहेर जात नव्हता. तसेपण ती जागा तशी सुनसानच असावी असा अंदाज त्याने बांधला. याच विचारांत त्याला झोप लागली. खोलीत मिट्ट काळोख होता जसा त्याच्या मनात पसरला होता.

सकाळी उठताच नित्याने आपल्या दिनचर्येला प्रारंभ केला. आंघोळ होताच देवपूजा आटोपून किचनमध्ये कॉफी केली डब्यातून केकचा तुकडा काढत कापून घेतला आणि बाहेर सोफ्यावर बसत ती आठवणींत हरवली. कानावर छोट्या मुलीचे हसण्या खिदळण्याचे आवाज येऊ लागले. हळूहळू ते आवाज संपूर्ण खोलीत ऐकू येऊ लागले. त्या सोबत नित्या त्या छोटया मुलीच्या मागे धावत जाऊ लागली. तिला पकडण्याचा प्रयत्न करु लागली. ती काहिकेल्या नित्याच्या हातात येत नव्हती. कधी सोफ्यामागे तर कधी दारामागे लपत होती.

"आदिती...आदी ! नॉटी गर्ल ! ममाला किती त्रास देशील ?" - नित्या थकून बोलत होती.

"ममा ! पकड मला....पकड." (खळखळून हसत.)

कोणीतरी हे सारं व्हिडीओ शूट करताना जाणवत होते. नित्या त्या छोट्याशा निरागस, गोड मुलीचा आदीतीचा पाठलाग करू लागली. तिला पकडण्यासाठीची तिची धडपड दिसत होती. नित्या अडखळून पडली, तशी ती चिमुरडी आदिती काळजीने तिच्यापाशी गेली.. संधी साधुन नित्याने लगेच तिला पकडले..

"चीटिंग चीटिंग...!" (ती मस्तीखोर स्वतःला नित्या पासून सोडवत पळते)

नित्या हसते. हे दृश्य इतका वेळ हँडीकॅम ने शूट करत असलेली ती व्यक्ती सेल्फी स्टाईलने फ्रेम मध्ये स्वतःला एंटर करून घेते. तो नित्याचा नवरा अंगद असतो. तो सुद्धा चिटर म्हणून नित्याला चिडवतो व गोड आदितीला साथ देतो.

"अंगद तुम्ही सुद्धा ना..? जा बाबा कट्टी..." - नित्या खोटे रुसण्याचे नाटक करते.

"चिटर...! चिटर....! ....चिटर...!!!" - दोघे अजूनही नित्याला चिडवत रहातात.

पण नित्याला रुसलेली पाहून आदिती तिच्यापाशी येते आणि तिला जवळ घेते तिच्या गालावर पापा देते. आणि रोमॅंटिकली अंगद सुद्धा नित्याला किस करायला जातो. नित्या लाजते. छोटीशी हॅपी फॅमिली तिघे एकमेकांना जवळ घेतात खूप हसतात. नित्या एकटीच हसत असते. भानावर येते तेव्हा ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा टिपते. आपल्या नवऱ्याच्या अन मुलीच्या सोबतचे सारे आनंदी क्षण नित्या आपल्या मोबाईल मध्ये पहात असते. डोळ्यातून झरणारे अश्रू आवरत नित्या नाश्ता प्लेट मध्ये भरते आणि त्याला द्यायला त्या खोलीमध्ये शिरते एवढ्यात कसेबसे टायरॅप मधून सोडवल्या हातांनी तो नित्यावर आक्रमक हल्ला करतो. दोघांमध्ये अतिशय तीव्र हाथापायी होते. हात जरी मोकळे असले तरी पाय मात्र अजून टाय रॅप मध्ये गुंतलेले असल्याने त्याला तिथून पळण्याचे त्राण येत नाहीत. तिथून सुटका हवी असेल तर नित्याला ठार मारावेच लागेल या विचारांनी तो नित्यावर हमला करतच रहातो पण नित्या धीराने त्याला सडेतोड उत्तर देत अखेर आपल्या रिव्हॉल्व्हरने फायर करते. गोळी त्याच्या खांद्याला लागते. तो कळवळून घायाळ होऊन निपचित पडतो. नित्या धापा टाकत तिथेच बसते.

त्याला जाग येते तेव्हा त्याच्या खांद्यावर भलेमोठे बँडेज बांधलेले त्याला दिसते. मात्र त्या हातात ताकद अजिबात नसते. केवळ हातच नव्हे तर हळूहळू त्याला आपले पाय देखील हलवता येत नाहीत तो उठण्याचा प्रयत्न करतो पण त्याला आपले अंग हलत नसल्याचे जाणवते.

"अनेस्थेशीया दिलाय मी. इथून जायचे असेल तर केवळ सत्य बोलावे लागेल. सर...!" - नित्या ठामपणे त्याला दरडावते. तो थंड उसासा टाकत बोलायला सुरुवात करतो. "माझं नाव जनार्दन पटवर्धन."

"काम काय करता." -

"विश्व हिंदू विद्यालयात प्राचार्य.....!!!"

"आता नाही...! या पूर्वी...पाच वर्षांपूर्वी."

"पाच वर्षांपूर्वी...?"

"होय.."

"मी मुंबईत होतो. अमेलिया हायस्कुल मध्ये. सायन्स शिकवायचो."

"सायन्स शिकवायचात आणि कोवळ्या मुलांना शिक्षा देताना कुठे आणि किती मारल्याने काय होऊ शकते याची थोडीही जाणीव तूम्हाला नव्हती, प्लिज आता असं म्हणू नका..."- नित्याच्या बोलण्यात तिरस्कार घृणा तो द्वेष् तो राग स्पष्टपणे धगधगत होता.

"काय म्हणायचंय तुम्हाला...?

"दोन हजार अकरा साली मुलांना शिक्षा म्हणून इलेक्ट्रिक शॉक देण्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक झाली होती पटवर्धन..."

"पण ते सारं खोटं होतं. माझी निर्दोष सुटका झाली होती."

"कारण त्यापैकी एक मुलगा तुमच्या धमक्यांना घाबरून कोर्टात खोटं बोलला."

"नाही...नाही...! मुलं खेळत असताना पावसाच्या पाण्यातल्या त्या वायर कडे कुणाचं लक्ष गेलं नाही आणि करंट लागून मुलं घायाळ झाली होती. मी काही केलं नाही."

नित्या त्याच्या घायाळ हातावरील जखमेवर जोरदार लाथ मारते. वाहणारे रक्त पाहून तो घाबरतो. अनेस्थेशीया मुळे त्याला वेदना जाणवत नसल्या तरी नित्याकडे पाहून मात्र तो मनात हादरून गेलेला होता.

"सेप्टिक झालं तर हात कायमचा गमवावा लागेल. आता तुमचा हात वाचवणं तुमच्याच हातात आहे..सर...!" - नित्या त्याला बजावते.

"होय...होय...! मीच दिला होता त्यांना शॉक. ऐकतच नव्हती. सदानकदा मस्ती. अभ्यासाकडे लक्ष नाही. हजारदा सांगितलं तुम्ही मुली हात मुलांसोबत खेळायचं नाही, पण नाही, ऐकायचं नाही. संताप आला होता. संताप...दिली....मीच दिली शिक्षा..."

"विक्षिप्त आहेस तू...शिक्षक कसला रे..! काही कल्पना आहे तुला..? त्यापैकी एकाला आपला जीव गमवावा लागला आणि दोघांचे हात लुळे पडलेत आणि एक तर अजून स्वतःलाही ओळखत नाही. गतिमंद करून टाकलीस तू तिला. चार मुलांचं बालपण हिरावून घेतलंस तू. केवळ तिसरीतली मुलं ती त्यांना काय कळत होता मुलगा- मुलगी भेद...? आणि तसा भेदभाव करणारा तू कोण..?" - नित्याला राग आवरत नव्हता.

"अशानेच पुढे गुन्हे वाढतात. तुमच्यासारखे खुल्या विचारांचे पॅरेंट्स आहेत म्हणून तर सोसायटी नासली आहे. कमी कपड्यात मुलांच्या गळ्यात गळे घालून फिरणे काय..? पब काय..? ड्रगस्, एच आय व्ही, बलात्कार हे सारं यामुळेच होतं या सो कॉल्ड फ्रीडममुळे.."

"पण ते कोवळे जीव होते. आणि कोणत्या जगात जगतोयस तू..? आज मुली मुलांपेक्षाही सर्व क्षेत्रात पुढे आहेत. काही विक्षिप्त लोकांमुळे संपूर्ण समाज चुकीचा नाही ठरत...नाव बदलून तू स्वतःची ओळख मिटवू शकतोस पण तू केलेला गुन्हा कधीच मिटणार नाही."

नित्या जवळच पडलेला रिमोट हातात घेत टीव्ही ऑन करते. त्यावर ती लुळी मुले आपले आयुष्य मोठ्या कष्टाने जगत असलेले दिसते. नित्याला हुंदका आवरत नाही. जेव्हा तिचा नवरा अंगद व्हीलचेअर वरून आदितीला हॉस्पिटल बाहेर फिरवताना दिसतो. आदिती व्हेजिटेबल सारखी निस्तेज बसून आहे तिला धड बोलता येत नाही की खाता येत नाही. डोक्यावरचे केस विरळ झाल्याने ती अधिकच भेसूर दिसत आहे. वाकड्या झालेल्या तोंडातून सतत लाळ पाझरत आहे. हे सारे पाहून त्याची मान देखील शरमेने खाली जाते.

"आमची क्षमता होती म्हणून आदीतीची ट्रिटमेंट आम्ही अमेरिकेत करू शकलो. पण त्या मुलांचं काय ज्यांच्या आई वडिलांना नाईलाजाने आपल्या मुलाचे हाल जिवंतपणी पहावे लागत आहेत. मुलांनी आयुष्यात चुकू नये म्हणूनच तर आम्ही मुलांना शाळेत घालतो ना सर..? आई वडील जसे संस्कार देतात तसे शिक्षक मुलांच्या व्यक्तिमत्वाला घडवतात.मुलं चुकली तर शिक्षा द्यावी जरूर द्यावी पण जीवावर बेतेल अशी...?"

पटवर्धन सर काहीच बोलत नाही. शांतपणे सारे ऐकून घेतो.

"आता तर डॉक्टरांनी साफ सांगितलंय की, ट्रीटमेंटचा आदितीवर काही परिणाम होणार नाही तिला घरी घेऊन जा. केवळ पैसे खर्च होतील. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की ती मुलगा आहे की मुलगी याचा तिला आता काही फरक पडत नाहीय. मला फक्त तुमच्या तोंडून हे ऐकायचं होतं की तुम्ही खरंच हे कृत्य केलंत की नाही...?"- नित्या मन कठोर करत आपले अश्रू आवरते. नित्याचा मोबाईल वाजतो, "हॅलो, निघालात तुम्ही..? मी एअरपोर्टवर येईन. आदी कशी आहे..?.....!!!!"

नित्याचा आवाज हळूहळू ऐकू येईनासा होतो... तो अजूनही अनेस्थेशीयाच्या अंमलाखाली असल्याने हालचाल करू शकत नसला तरी आपण केलेल्या अक्षम्य अपराधाची जाणीव मात्र त्याला मनापासून होते.

एअरपोर्टवर आदिती आणि अंगदला पहाताच नित्या आनंदाने त्यांच्या दिशेने धाव घेते. तिला पहाताच आदितीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळून पडतात. हे पाहून नित्या आणि अंगद दोघेही खुश होतात. एवढ्या वर्षांनी आदिती भावना व्यक्त करत होती ती काहीतरी रिस्पॉन्स देतेय असे पाहून दोघांच्याही मनात आशेचे किरण प्रकाशमान होते. दोघे आनंदाने तिला घेऊन घराच्या दिशेने निघतात.

कुठेतरी दूर ओसाड जागी रात्रीच्या काळोखात प्रोफेसर पटवर्धन धडपडून जागा होतो. खांद्याच्या ठणका एकदम डोक्यात गेल्याने तो कळवळतो. सभोवार एक नजर टाकतो. शून्य घनदाट जंगल पसरलेले पाहून त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. चालण्याचा प्रयत्न करतो पण पायात त्राण नसल्याने तो धड उभा राहू शकत नाही. सरपटत एका झाडाचा आधार घेत तो कसाबसा बसतो. मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करतो पण आवाज निघत नाही. वाकड्या तोंडातून केवळ लाळ ओघळून पडत रहाते. अनेस्थेशीयाचा ओव्हर डोस झाल्याने त्याला अजून किती तास ही अवस्था सहन करावी लागणार कोण जाणे...? पण आदितीच्या जागी तो आता स्वतःला पाहू लागतो अनुभवू लागतो. पश्चातापाच्या अग्नीत तो होरपळून जातो.

Mrs. Dipti Methe.