३. राणी माशीचा विजय...
अपर्णा कुलकर्णी- दामोदरे.
झोमू माशी आणि पीहू माशी घरात म्हणजे पोळ्यात आल्या. झोमू आणि पीहू अत्यंत आंनदी दिसत होत्या. बाजूचा झरा वाहू लागला होता आणि ते बघून बालकवींच गाणं त्या गात होत्या,
गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवीत येई
कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या
घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभवती,
जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत,
मस्त आयुष्य झोमू आणि पीहू माश्या जगत होत्या. कोणतीच बंधने त्यांना अडवू शकत न्हवती. गाण गात झोमू आणि पीहू माश्या महालात शिरल्या. त्या दोघी महालात शिरल्या खऱ्या पण त्या स्वतःच्या धुंदीतच होत्या. आपण पोळ्यात आलो आहोत ह्याच भानही त्यांना न्हवत.
राजमहालात, राणीमाशी आराम करत होती. काहीच काम नाही. नुसता आराम. दिमतीला सगळे हजर. तिला जे जे हवाय ते सगळ मिळत होत. तिच्या इशाऱ्यावर कामकरी माश्या नाचत होत्या. आत्ताच एक छानसा मसाज घेऊन राणीमाशी पहुडली होती. तितक्यात तिच्या कानावर झोमू आणि पीहूच गाण पडलं.
गाणे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिला जाणवलं, झोमू आणि पीहू माश्या बाहेर फेरफटका मारून आल्या आहेत. हल्ली अस का होत होत तिला पण सांगता येत नव्हत. पण बाहेरून कोणी माशी पोळ्यात आली की राणीमाशी चिडत होती. माश्या बाहेरून आल्या कि राणीला बाहेर काय काय पाहिलं ते सांगायच्या. त्यांची बाहेरची निसर्गाची, फुलांची, बागांची वर्णने ऐकून तिला आनंद व्हायचा पूर्वी पण आता राग येत होता. 'मी इतकी राणीमाशी असून मला बाहेर जात येत नाही, या सध्या माश्या पण बाहेर जाऊन मजा करतात' असा विचार तिची पाठ सोडत नसत आणि साहजिकच याचा तिला अतिशय राग येत होता पण हा राग बोलून दाखवायची पण सोय नव्हती. राणी माशी मनातल्या मनात कुढत बसायची. दुसर काहीही ती करू शकत न्हवती कारण त्यांच्या जमातीच्या बंधनांमधे ती अडकली होती.
माश्यांची एक सामिती होती ज्यात १० कामकरी माश्या होत्या. त्यांचे निर्णय अगदी राणीमाशीला पण बंधनकारक होते. त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार अगदी राणी माशीला सुद्धा नव्हता. आणि त्या नियमानुसार प्रत्येकाचे काम आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा ठरलेल्या होत्या. कामकरी माश्या बाहेर जाऊन काम करायच्या आणि मध बनवायच्या. त्यांच्यातल्या तरुण माश्या रॉयल जेली नावाचं अन्न बनवायच्या जे खासकरून राणीमाशीला देण्यात यायचे. राणीमाशी करता हे अगदी अत्यावश्यक होते. ते अन्न खाऊनच तिला रोज हजारो अंडी घालायची ताकद मिळत होती आणि तिच्या तब्येतीला तंदुरुस्त ठेवत होती.
राणीमाशी चे काम होते अंडी घालणे आणि राज्य करणे. तिला सगळ्या सुखसोयी आणि ऐषोआराम उपलब्ध होते. परंतु बाहेर जाऊन फिरण्याची अथवा कामकरी माश्यांप्रमाणे फुलाफुलांवर जाऊन मध तयार करण्याची परवानगी नव्हती. पोळ्या मध्ये तिचा प्रत्येक शब्द झेलला जायचा. पूर्वीच्या अनेक राण्यांप्रमाणे ती पण इतकी वर्षं हे सगळे नियम पाळत होती. परंतु हल्लीच तिच्या मनात या नियमांबद्दल राग येऊ लागला होता. तिला सुद्धा सामान्य आयुष्य जगायचं होत जिथे तिला सुखसोयी नसतील पण स्वातंत्र मात्र मिळेल. राणी माशी स्वतःशीच विचार करत बसायची पण त्यातून बाहेर पडण्यासाठी मात्र तिला मार्ग मात्र मिळत नव्हता.
विचार करता करता, राणीमाशीला मागच्या वर्षीचा प्रसंग आठवला. झाले असे झोमु माशी आणि पीहू माशी बाहेर जाऊन आल्या होत्या.
बाहेर खूप छान थंडी पडली होती. झोंमु आणि पीहू माशा उबदार कपडे घालून बाहेर मध आणायला बाहेर पडल्या. मधाचं काम केलं आणि त्या फिरायला मोकळ्या झाल्या. खूप सुंदर फुलं फुलली होती. पांढरी,निळी, पिवळी, केशरी अशी सर्व रंगांची. त्यांनी खूप फोटो काढले. शेजारच्या झाडावरचा बुलबुल आणि इतर बरेच पक्षी पण आले होते त्यांच्याबरोबर. फोटो मध्ये सगळे मस्त उत्साहात, ताजेतवाने दिसत होते. फुलं आनंदानी डोलत होती. घरी आल्यावर सगळे फोटो त्यांनी त्यांच्या कामकरी माशा मैत्रिणींना दाखवले. सगळ्यांना खूप आवडले. नुसता दंगा आणि गोंधळ चालू होता. राणी माशीनी तिच्या सेविका ला सांगितले काय ते बघून ये. राणी माशीची आज्ञा ऐकून माशीनी दंगा आणि गोंधळ कुठून ऐकू येतोय हे पाहिलं. आणि लगोलग सगळा वृतांत राणी माशी ला दिला. तिनी सांगितल्यावर राणी माशी स्वतः महालाच्या बाहेर आली फोटो बघायला. राणी माशीला पाहताच सगळे एकदम शांत झाले. राणी माशी नी झोमु आणि पीहू माशी ला सांगितले मला पण फोटो दाखवा. त्या घाबरल्या.. राणी माशी बरोबर बोलण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. पण हिम्मत करून त्यांनी राणी माशी ला दाखवले फोटो. राणी माशी नी कधीच अस काही पाहिलं नव्हता. नुसता तिच्या खिडकीतून दिसणार नेहमीचं दृष्य ती बघायची. पण जवळून तिनी कधी निसर्ग अनुभवलाच नव्हता. ते नितांतसुन्दर फोटो बघून ती चकितच झाली. खूप आनंद झाला तिला आणि वाटलं आता आपण असा बाहेर जाव आणि या फुलांबरोबर राहाव .. गाणी म्हणावी आणि इकडून तिकडे मस्त उडावं. महालाच्या बाहेर पडून बाहेरच जग अनुभवायची तिची इच्छा अधिकाधिक प्रबळ होत होती. राणी माशी ने मनोमन ठरवले आपण पण बाहेर जायचे आणि मस्त हिंडायचे आणि असेच सुंदर आपले पण फोटो काढून घ्यायचे. इथे रोज अंडी घालून तोचतोचपणा आला आहे..गेल्या कित्येक वर्षात बाहेर जाणे झाले नाही बंधनामुळे पण आता नाही. आता ह्या बंधनातून मुक्त होऊन राणी माशीला मनाप्रमाणे आयुष्य जगायचं होतं. ठरवल्याप्रमाणे तिने सांगितले तिच्या सेविकेला माझी तयारी कर मी बाहेर निघाले आहे. एकदम सगळ्या माश्या शांत झाल्या आणि घाबरल्या सुद्धा. आता काय होणार.. राणी माशी पोळ्याबाहेर पडली तर संकंटांची मालिकाच सुरु होते अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे राणी माशी ला हवे ते मिळेल पण बाहेर पडत येणार नाही असा नियमाचा त्यांच्या उच्चस्तरीय समितीने शेकडो वर्षांपूर्वी घेतला होता आणि आता पर्यंत तो नियम अमलात आणला जात होता. त्या नियमाविरुद्ध राणी माशीची साथ कशी द्यायची हे इतर माश्यांना कळत नव्हत. राणी माशी ला महालाबाहेर पडायचं आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही गोष्ट समजताच समितीच्या ४ अति कर्मठ अश्या माश्या पुढे आल्या आणि म्हणाल्या, 'राणी माशी तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. आपला नियमाचा आहे तो.' त्यावर राणी माशी म्हणाली, 'मी जाणार मी पण बाहेरचा सुंदर आयुष्य जगणार कोण मला थांबवता ते आता मी बघते.' कर्मठ माश्याप्रमुख म्हणाली आम्हाला नाईलाज झाला तर सैनिकांना आज्ञा द्यावी लागेल. आपल्याला इथे स्थानबद्ध करावे लागेल. मधमाश्या वरती येणाऱ्या संकटातून वाचवावे लागेल. तुम्ही तुमचा हट्ट सोडा राणी माशी अशी विनवणी सुद्धा राणी माशी ला केली. ते ऐकून राणी माशी म्हणाली, "कसली संकटे ...रोज आपण संकटांशी सामना करतो. बाहेर जातात माश्या तेव्हा किडे, पक्षी, मनुष्य प्राणी अश्या कितीतरी संकटांशी त्यांना झुंजावे लागते. आपल्या पोळ्या ला कायम मनुष्य प्राणी, अस्वले यांच्यापासून दूर ठेवावे लागते, वाचवावे लागते. अजून कुठली संकटे ? आणि आली तर तेव्हा बघू. लढा देऊ . आपण सहज मरणाऱ्या पण माश्या नाहीत तर ..झुंजार माश्या आहोत. आणि संकटांना घाबरून इथेच अडकून का बसू मी?'
परंतु कर्मठ माश्या मागे हटायला तयार नव्हत्या. शेवटी उच्च समितीमधल्या प्रगतिशील माश्या ज्यांना राणी माशीचे बोलणे पटत होते त्या म्हणाल्या राणी माशी ला, 'महाराणी आपण शांत व्हा. चर्चा करून यावर मार्ग निघतो का बघू. आपले म्हणणे आम्हाला पटते आहे. आपण मीटिंग घेऊ आणि संपणे बोलू.'
दुसऱ्या दिवशी १० उच्च समितीच्या माश्या आणि राणीमाशी यांची ५-६ तास चालणारी मीटिंग झाली. कोणीच मागे हटत नव्हते. प्रगतिशील अश्या २-३ माश्या होत्या पण त्यांना बहुमत नव्हते. शेवटी राणी माशी ला तात्पुरती माघार घ्यावी लागली. पण राणी माशीनी तिची जिद्द मात्र सोडली न्हवती.
तेव्हापासून रोज राणी माशी झुरत होती, संतापत होती, चिडत होती. खूप विचार करत होती. आपल्या बाकी पोळ्यामधल्या राणी माशी मैत्रिणींशी पण तिने त्यांच्या नैसर्गिक अँटेना मार्फत संपर्क साधला. काही राणी माश्या तिच्या बाजूनी होत्या. तिने खूप विचार करून एक प्लॅन ठरवला.ती आणि तिच्या सारख्या ३-४ राणी माश्यांची मिळून गरुड राजाशी संपर्क साधला. गरुड राजा राणी माशी ला भेटायला तिच्या पोळ्यात आला. उच्च समितीच्या माशांना वाटले ही नेहमीची सद्दीछा भेट आहे. गरुड राजाचे मोठे स्वागत झाले.
राणी माशी ने गरुड राजाला तिची इछा सांगितली. गरुड राजा प्रगतिशील विचारांचा असल्यामुळे त्याला पटले. नेहमीप्रमाणे रुढीमध्ये अडकलेल्या उच्च समितीच्या कर्मठ माशांनी खूप विरोध केला. गरुड राजांने एक चांगला उपाय सुचवलं जो राणी माशी ने आधीच त्याला सुचवून ठेवला होता. गरुड राजा म्हणाला, 'आलटून पालटून उच्च समितीच्या माश्यांनी राणी पद सांभाळायचे आणि तेव्हा राणी माशी सामान्य माशी प्रमाणे वागणार. बाहेर जाऊन काम करणार, मध गोळा करणार आणि तिला पोळ्यात राणी माशी च्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. आणि राणी ची जागा कधी रिकामी सुद्धा राहणार नाही त्यामुळे कोणती संकटे यायचा प्रश्न उरणार नाही.' गरुड राजा होता तो. गरुड राजाला नाही म्हणायची हिम्मत कोणाकडेही न्हवती. अगदी कर्मठ माश्यांकडे सुद्धा नाही. त्यामुळे कर्मठ माश्या गरुड राजाच्या ह्या निर्णयाला नाही म्हणू शकल्या नाहीत आणि त्यामुळे ही व्यवस्था चालू झाली. राणी माशी आता सगळ्या बंधनातून मुक्त झाली होती,मोकळा श्वास घेऊ शकत होती. राणी माशी तिच आयुष्य मनाप्रमाणे जगात होती. आणि अर्थात, राणी माशी स्वत:च्या निर्णयावर अत्यंत खुश होती.
गरुड राजाच्या उपायामुळे प्रत्येक उच्च समितीमधल्या माशीला १-१ आठवडा पोळ्यात राहावे लागत होते. बंदिस्त जीवन जगावे लागत होते. महालात सुखसोयींनी भरलेल आयुष्य होत पण स्वातंत्र मात्र नव्हत. होत ते फक्त बंदिस्त आयुष्य...१ आठवडा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र त्यांना मिळत न्हवत. त्यांना सगळे ऐषोआराम मिळत होते पण स्वातंत्र्य नव्हते. आपल स्वातंत्र आपल्यापासून काढून घेतलं जातंय हि गोष्ट अतिशय वेदनादायी होती. त्यांना हळू हळू समजू लागले की राणी माशी ला कसे वाटत असेल. त्यांना राणी माशीच दुःख समजू लागल होत. आणि त्यांचा विरोध आपोआप कमी व्हायला लागला. समितीने आपल्या जुन्या निर्णयांवर पुन्हा विचार केला आणि ह्यापुढे राणी माशीला कोणत्याही बंधनात रहायची गरज नाही, तिलाही मुक्त आयुष्य जगता येईल अश्या नवीन निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. राणी माशी नी तिची जिद्द सोडली नव्हती आणि अखेर राणी माशीचा विजय झाला.
ही गोष्ट होती राणी माशीची..पण राणी माशी सारख्याच आपल्यातल्या किती बायका त्यांच आयुष्य मनाप्रमाणे जगू शकतात? आणि किती आयुष्य मनाप्रमाणे जगण्यासाठी झटत आहेत? प्रत्येकाला आयुष्य जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे मन मारून जगण्यापेक्षा परिस्थितीचा सामना करून न घाबरता आयुष्य सुंदर जगायचं असा निर्धार प्रत्येक स्त्रीने करण्याची गरज आहे.
अपर्णा कुलकर्णी-दामोदरे.