स्मिता
अरुण वि. देशपांडे
बस सुरु झाली तसे गिरीश खिडकी जवळून दूर झाला, स्मिताचा गोरा लांबसडक हात किती तरी वेळ त्याच्या दिशेने हलतांना दिसत होता. बस नजरेआड झाल्यावर गिरीश बस स्टेंडच्या बाहेर आला.
आज बरेच दिवसानंतर घरात तो एकटा असण्याची वेळ आली होती. हा असा "एकटेपणा "त्याला नवीन वाटणारा होता. स्मिताशी लग्न झाल्यापासून आधीचा दोस्त असणारा एकटेपणा त्याच्या पासून पार दूर पळून गेला होता.
नंतरचे नवे नवलाईचे दिवस, स्मिताचा सहवास, गिरीशच्या आयुष्यात नवीच बहार आली होती.
राजा -राणीच्या राज्यात सुखाची बरसात सुरु झाली. एकमेकांच्या उबदार मिठीत सुरु झालेली सुखद रात्र सारून, सकाळ केव्न्हा उगवायची हे देखील काळात नसायचे. स्मिताचा सुखाने ओसंडलेला चेहेरा गिरीशच्या नजरे समोर तरळून गेला.त्याला वाटले - "स्मिता आपल्या आयुष्यात आली.आपले सारे जग त्या क्षणापासून बदलून गेले, तिच्या सुखद सहवासात ही चार-पाच वर्ष..अगदी चार दिवसा सारखी आली आली, गेली गेली असेच वाटणारी आहेत.
गिरीशने आलेला पेपर डोळ्यासमोर धरला, पण त्या रुक्ष मजकुरात त्याचे मन रमेना, पेपरची पाने त्याने भिरकावून दिली, मग हॉल मधून किचनमध्ये आला, त्याने पाहिले स्मिताने किचन अगदी मनलावून सजवलेले होते, चकचकीत, स्वछ, नीट- नेटके किचन पाहून, पहाणारा प्रत्येक जण स्मिताच्या टापटीपपणाची तारीफ करीत असे.
घरातल्या सगळ्या वस्तू अज्ञाधाराक मुलासारख्य शिस्तशीरपणे एकाजागी चुपचापपणे बसलेल्या दिसत होत्या. प्रत्येक वस्तूवरची स्वछता स्मिताच्या शिस्तशीर आणि सफाईदार हाताची आठवण करून देत होती.
कोपर्यातल्या देवघराकडे त्याची नजर गेली " सकाळीच रोजची पूजा त्याने केली होतो, देवावर वाहिलेली पारिजातकाची फुले अजूनही तजेलदार दिसत होती. वरच्या फळीवर आईने आणलेला सणावाराच्या पूजेसाठी नेसण्याचा पितांबर त्याला दिसला आणि नको ती आठवण ", झालीच...
काही महिन्या पूर्वीची गोष्ट, कालच घडलीय असे गिरीशला वाटले.
.येणारा लग्नाचा वाढदिवस फक्त दोघांनीच कसा साजरा करायचा हे स्मिताने पक्के ठरवले होते, आणि कितीदा तरी गिरीशला याच आठवण ती करून देत होती.स्मिताने एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती फायनल..पुन्हा त्यात बदल केलेला, बदल झालेला तिला अजिबात चालत नसे. हे गिरीशला आता माहिती झाले होते.
स्मिताने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवसाची रूपरेषा गिरीशला सांगितली.या दिवशी घरच्या किचन ड्युटीला पूर्णपणे सुट्टी, बाहेर फिरायचे, बाहेरच खायचे, शोप्पिंग, मग रात्रीचे जेवण सुद्धा बाहेरच, घरी आल्यावार.. रात्री.. मस्त पैकी.....!
यात बदल नाही..असे सांगण्यास ती अजिबात विसरली नाही.
लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला, सकाळ झालेली होती, आणि बाहेर बेल वाजली, दरवाजा स्मिताने उघडला, दारात गिरीशची आई उभी होती ", हातात एक प्रवासी bag, रात्रभर प्रवास करून आल्यामुळे थकवा आलेला चेहेरा दिसत होता, पण "लेकाच्या घरी आल्याच्या आनंदात " थकवा विसरून गेल्या होत्या. पण..
समोर असलेल्या स्मिताच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी पाहून गिरीशच्या आईचा चेहेरा उतरून गेला, आपले असे अचानक येणे स्मिताला अजिबातच आवडलेले नाहीये "हे त्यांच्या अनुभवी नजरेला लगेच जाणवले.. काही न बोलता त्या आत आल्या, आणि गिरीशला आवाज दिला..
आईचा आवाज ऐकताच आत पलंगावर लोळत पडलेला गिरीश आनंदाने लहान मुला सारखा धावतच बाहेर हॉलमध्ये आला. सकाळी सकाळी आईचे दर्शन त्याला खूप आनंद देणारे वाटत होते. स्मिताला तो म्हणाला, चहा टाका लवकर, आज पहिला चहा आईच्या सोबत घेऊ या आपण दोघे मिळून..
असे अचानक कशी काय आलीस या वेळी ? ठीक आहे ना गावाकडे ? त्याने आईला विचारले.
गिरीश, अरे काय सांगावे, यंदा गावात भीषण दुष्काळ, पिण्या साठी पाणी नाही, खाण्यासाठी धान्य नाही. उजाड गावात कशी राहू आता ? निघाले मग माझ्या लेकाकडे.
हे छान केलेस तू आई, आमचे लग्न झाल्या पासून असे तू राहण्यास आलीच नाहीस कधी इकडे.
आईचा हात धरीत, तिला तो किचनमध्ये आला, स्मिताने बनवलेला मस्त चहा आईला खूप आवडेल, तिथेच बसून गप्पा करू आणि चहा पण घेऊ, स्मिता करील काही तरी गरम गरम नाश्त्याला, ते खाऊनच किचन मधून उठूत.
पण गिरीशला, किचन मध्ये स्मिता दिसली नाही, आणि चहा पण नाही.
गिरीश बेडरूम मध्ये गेला..स्मिता डोक्यावर चादर ओढून घेत पडली होती., हे पाहून तो म्हणाला -
स्मिता, आज आपल्या लग्नाच्या वाढदिवशी आई आलीय, किती छान झालं ना, माझ्या आवडीच्या पुरणपोळ्याचा बेत करणार आहे आई, तेंव्हा बाहेरचे सगळे कार्यक्रम आपण पुन्हा कधी तरी करू या,
गिरीश बोलत होता, पण, स्मिताने डोक्यावरची चादर काढली सुद्धा नाही, भिंतीकडे तोंड फिरवीत तशीच पडून राहिली. स्मिता अशी का वागते आहे ? तिला अचानक असे काय झाले ? अंदाज करता येई ना. गिरीशची आई बेडरूम मध्ये येत म्हणाली..
गिरीश, अरे माझ्या येण्यामुळे सकाळी, सकाळी झोपमोड झाली सुनबाईची, करू दे तिला थोडा वेळ आराम, मी आली आहे ना, काळजी नको करू तू कामाची.
गिरीश आणि आई, स्मिताला तसेच झोपू देत, बाहेर येऊन बसले. आईने लगेच चहा केला, चहा घेता घेता गिरीश आईशी बोलत होता..त्यातूनच गावाकडील ख्याली खुशाली काळात होती.
त्याची वडिलोपार्जित इस्टेट असून नसल्यासारखी होती. घराण्याच्या वाड्यातल्या दोनच खोल्या..वाटणी करतांना आईच्या वाट्याला आल्या, त्यातच ती राहायची. लहान्या गिरीशला मोठ्या गावाला शिकण्य साठी पाठवणे हीच तिच्या दृष्टीने भविष्यातील तरतूद होती. तिच्या आयुष्याची कमाई गिरीश.तिचा मुलगा होता.
समोर बसलेल्या आईकडे गिरीशने पाहिले..वर्षनुवर्षे दारिद्र्याशी लढाई करावी लागल्या मुले तिच्या चेहेर्यावर एक रुक्षपणा आलेला होता. दोन्ही हातांना चांगलेच घट्टे पडलेले होते. तिच्या डोळ्यात आणि मनात एकच अशा आहे असे त्याला जाणवले..ती म्हणजे आपले उरलेले दिवस सुखाने -आनंदाने मुलाच्या -सुनेच्या सोबत, येणाऱ्या नातवाच्या सोबत घालवायचे स्वप्न.
गिरीश तिला म्हणाला - आता तू आम्हाला सोडून कुठेच जायचे नाहीस", इथेच राहायचे आहे आता तुला..आमच्या सोबत.
गिरीशचे हे शब्द ऐकून आईच्या चेहेर्यावर आनंदाचे समाधान उमटलेले गिरीशने पाहिले, त्याला ही बरे वाटले.
परंतु, हा आनंद स्मिताने क्षणभराचा ठरवला.स्पष्टपणे ती काहीच बोलली नाही.तिचा नूर पार बिघडलेला आहे हे मात्र जाणवत होते.
आई आता आपल्याकडेच रहाणार आहे " हे गिरीशने सांगितल्या पासून, स्मिताचे गोड वागणे, प्रेमाचा सहवास हे सगळे बंद झाले, सकाळी सकाळी उठल्या पासून स्मिताच्या सुंदर चेहेर्यावर नाराजी दिसू लागली, कपाळावर आठयांचे जाळे दिसू लागले होते..
स्मिता.गिरीशच्या आईला किचन मध्ये येऊ देत नसे, त्यांनी काही काम केले तर त्या कामाला नावं ठेवायची, खेड्यातल्या बाईला काय जमणार इथे? मोठ्या गावात कशाला आल्या कुणास ठाऊक ?
गिरीशची आई हे ऐकून घेत, न बोलता बाहेर येऊन बसते " हे गिरीश पाहत होता.
एके दिवशी तो म्हणाला -
स्मिता, आई आल्यापासून तुझा मूड बिघडला आहे.तूच सांग, आईने मुलाच्या घरी येऊ नये तर, कुठे जावे ? या वयात कुणा परक्या कडे हात पसरावेत काय तिने ?
तिच्याशी तू असे वागू नयेस हीच अपेक्षा आहे माझी.साभाळू तिला आपण दोघे मिळून.
गिरीश ने तिला इतके सांगितले त्यावर एका शब्दाने ही स्मिता काही बोलली नाही. घरातले तीनजण प्रत्येकाचे जग वेगळे होऊन बसले.असेच गिरीशला जाणवत होते. काही झाले तरी यापुढे आईला इथून परत जाऊ द्यायचे नाही, हे त्याने मनोमन पक्के ठरवून टाकले होते. स्मिता बदलत नव्हती, गिरीशच्या आईला होणारा त्रास होतच होता, फक्त गिरीश घरात असतांना त्याच्या समोर स्मिता आईला काही बोलत नव्हती.
एक दिवस आई म्हणाली..गिरीश, उद्या रविवार, तुमच्या दोघांच्या हाताने सत्यनारायणाचीपूजा करावी "अशी माझी इच्छा आहे, त्या साठी..आपल्या घरातला तुझ्या बाबा पासूनचा पितांबर आणलाय पूजेसाठी. रविवारची पूजा व्हावी, देवाच्या कृपेने माझ्या मांडीवर नातू खेळावा अशी प्राथना करतेय रोज.
मोठ्या मिनतवारीने गिरीशने स्मिताला पूजेसाठी तयार केले, नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला, संध्याकाळी परत आल्यावर घराला कुलूप पाहून त्याला धक्काच बसला. कदाचित स्मिता बाजारात गेली असेल, येईल ती, पण, मग आई कुठे गेली ? तो जागच्या जागी उभा राहिला.
शेजारच्या काकू बाहेर आल्या आणि त्याला सुनावत म्हणाल्या -
गिरीश, तुम्ही एव्हढे बायकोच्या ऐक्न्यातले असाल असे वाटले नव्हते. अहो, स्मिताने तुमच्या आईला, बस झाले, गावी जाऊन रहा असे बजावले आहे, आणि म्हणाली..आत्ता जास्त गरज बायकोची असते, आईची नाही ", हे पण समजत नाही का तुम्हाला ? हे ऐकून तुमच्या आई आपले समान घेऊन निघून गेल्या की हो.
हे ऐकून काय बोलावे गिरीशला सुचत नव्हते. आईचा असा अपमान करून स्मिताने फार मोठी चूक केली आहे एवढेच त्याला काळात होते.
बाहेर राग रागात गेलेली स्मिता परत आली ते आनंदाच्या भरात. गिरीशच्या जवळ जात ती म्हणाली.. अहो, तुम्ही बाबा होणार, मी आई होणार..
पुन्हा त्याचे जग स्मिताभोवती फिरत राहिले, दोघांच्या जगात तिसर्याची आठवण होतच नव्हती.
आज स्मिता तिच्या आई-बाबा कडे जाऊन येते म्हणून बाहेरगावी गेल्यावर, त्याला मागचे सारे पुन्हा आठवत होते. आपण आपल्या आईला विसरलो, याबद्दल त्याने स्वतःलाच दोषी ठरवले.
काही ही होवो..यापुढे स्मिताच्या विरोधाला अजीबात घाबरायचे नाही, येणाऱ्या बाळावर आईबाबांचा जितका हक्क तितकाच या नातवंडावर आजीचा हक्क असतो, आजीची माया -आईची माया तो स्मिताला याच दिवसात दाखवून देणार होता.
गिरीशला वाटले..खरी चूक आपलीच आहे.आपले जग फक्त बायको एव्हढेच ठेवले, त्यात इतरांनाही जागा द्यायची असते", आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे होते. चूक दुरुस्त करण्यासाठी वेळ अजून गेली नाही .गिरीश गावाकडे निघाला. आईला परत घेऊन येणार होता, आई होणार्या स्मितासाठी.
कथा -
स्मिता
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342