the sixth sense in Marathi Adventure Stories by Vinayak Potdar books and stories PDF | द सिक्स्थ सेन्स

Featured Books
Categories
Share

द सिक्स्थ सेन्स

The Sixth Sense

कथा : डायरी

लेखक : विनायक नारायण पोतदार

***गुरुवार १३ ऑक्टोबर

नवीन कंपनी जॉईन करून आज जवळपास एक महीना होऊन गेला होता. मी तिथं नवीन असल्यामुळं तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागत होता. पहिल्या कंपनीमधील आठवणी अजून ताज्या होत्या, मनात घोळत होत्या. तिथल्या मित्रांची आठवण येत होती. रोज तिथं केलेली मस्ती, धमाल डोक्यातून जात नव्हती. नव्या कंपनीत मन न रुळण्याचं आणखी एक कारण पहिल्या कंपनीच्या तुलनेत इथं काम खूप कमी होतं.

सर्व काही सामान्य रीतीने सुरळीत सुरु होतं ... एक गोष्ट सोडून. गेल्या काही दिवसांपासून कुणास ठाऊक का, पण मला असं वाटत होतं की कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवून आहे. मी सस्पेंस नोव्हेल ,मूवीजचा प्रचंड क्रेझी फॅन आहे, कदाचित या कारणामुळे देखील माझा मेंदू जरा जास्तच ओव्हर स्मार्ट थिंकिंग करत असेल, शेवटी मेंदूला काही काम नसेल तर अशा प्रकारच्या कल्पना, विचार तर घोळतातच ना .... म्हणूनच माझ्या बाबत असं घडत असावं असाच विचार करून मी ही गोष्ट डोक्यातून काढून टाकली. सुरुवातीला थोडं मन हलकं झालं. पण काही दिवसांनी पुन्हा तेच. पण कोणी माझ्यावर पाळत का ठेवावी? मी एक सामान्य व्यक्ती होतो, जी आपलं आयुष्य साधेपणाने जगत होती. मी कुणी खास नव्हतो किंवा माझ्या जॉबमध्ये पण सिक्रेट ठेवण्यासारखं काही नव्हतं, ज्यामुळे मी अचानक कुणासाठी तरी व्हीआयपी बनावं. पण काहीतरी होतं नक्कीच. माझा सिक्थ सेन्स मला कधीच धोका देत नाही.

हे जे पण काही माझ्याबरोबर घडत होतं ,मी कुणाला सांगू शकत नव्हतो. पहिल्या कंपनीत असतो तर कदाचित अमित किंवा आशिषला सांगितलंदेखील असतं. ते माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र, सहकारी होते. कमीतकमी त्यांनी माझं बोलणं हसण्यावारी नक्कीच नेलं नसतं. पण इथं नव्या कंपनीत मी एकटा पडलो होतो आणि जे काही घडत होतं, त्याचा सामना मला एकट्यालाच करायचा होता. एक गोष्ट नवल वाटण्याजोगी होती... ऑफिसच्या इमारतीत प्रवेश केल्यावर ही पाळत ठेवत असल्याची जाणीव गायब व्हायची. जणू ऑफिसमध्ये मी सुरक्षित होतो. मग संपूर्ण दिवस ऑफिसमधली छोटी मोठी कामं करण्यात किंवा नेट सर्फिंग करण्यात जायचा. आज का कुणास ठाऊक पण हे सर्व डायरीत लिहावंसं वाटलं. आजच्या दिवशी इतकंच. आशा आहे उद्याचा दिवस माझ्यासाठी चांगला जाईल.

शुक्रवार १४ ऑक्टोबर

आजचा दिवस बऱ्याच घटनांमुळे माझ्यासाठी विशेष दिवस ठरला. ऑफिसमध्ये माझ्या आवडीचं काम मला करायला मिळालं. जे मी अगदी मन लावून पूर्ण केलं. जिंगल लिहिणं माझी खासियत आहे आणि यात आता मी चांगलाच तरबेज झालोय... देवाची कृपा. मुख्य म्हणजे माझी लिहिलेली जिंगल माझ्या कंपनीच्या क्लायन्टला खूप आवडली आणि ऑफिस मधील सर्वांचा माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या नजरेत आता माझ्यासाठी आदर आणि प्रेम दिसलं ज्याची मी वाट पाहत होतो. एकूण काय तर आजचा ऑफिसमधला माझा दिवस एकदम झकास गेला.... पण याला दृष्ट तर लागणार होतीच. सकाळपासून ऑफिसला येईपर्यंत जे घडलं नव्हतं किंवा कदाचित मी जे अनुभवलं नव्हतं, ते ऑफिसमधून बाहेर पडताच पुन्हा सुरु झालं. आज तर माझ्या अगदी पाठीमागे मला अगदी खेटून कुणीतरी चालतंय असा भास झाला. माझ्या पाठीवर उष्ण श्वास मी कितीतरी वेळा अनुभवला.पाठीमागे वळून पाहिलं तर माझ्या मागून कित्येक लोक चालत होते, पण इतक्या जवळ कुणी नव्हतं ज्याचा उष्ण श्वास माझ्या पाठीला जाणवेल.

काय भानगड होती ? काय हे सर्व निव्वळ भास होते ? की कुणी खरंच माझा पाठलाग करत होतं ? जे पण काही असेल याचा छडा मी नक्की लावेन.

शनिवार १५ अक्टूबर

आज सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे आज खूप वेळ मी बिछान्यात लोळून काढलं. माझ्या फ्लॅटमध्ये माझ्या व्यतिरिक्त आणखी कुणी राहत नव्हतं. माझा बाकी परिवार कोल्हापूरला असतो. त्यांना इकडचं ,मुंबईचं हवामान मॅच होत नाही. आणि तसंही सर्व नातेवाईक तिकडच्या भागात जास्त असल्याने त्यांना तिकडं राहणं जास्त आवडतं.मी त्यांना इकडं आणायचा प्रयत्न केला, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. मुंबई शहर तुला लखलाभ बाबा पण, आम्हांला इथंच राहू दे. आमचं सगळं आयुष्य इथं गेलंय. आता आमची दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथं सेटल व्हायची मानसिकता नाही. मला देखील त्यांचं बोलणं पटलं. शेवटी मी देखील केवळ पैसे कमावण्यासाठीच मुंबईला आलो होतो.मला शक्य असतं तर मी कोल्हापूर कधीच सोडलं नसतं. तिथली लोकं, त्यांचं उदार मन, तिथलं प्रसन्न वातावरण, तिथली हवा सगळंच कसं प्रेमात पाडणारं. असो तर आज सुट्टी असल्यानं सर्व कामे आरामात आटपून स्वतःसाठी नाश्ता तयार केला. सुट्टी दिवशी स्वतःच घरच्याघरी नाश्ता, जेवण बनवायला आवडतं. मग मोबाईलवर आज माझ्या जवळील थियेटरला कोणती मुव्ही रिलीज झालीय ते पाहिलं. बाकी मुव्ही यथातथाच होत्या. पण एक मात्र माझ्या आवडीची मुव्ही होती.हॉलिवूडची हॉरर मुव्ही. मला हॉलिवूडवाल्यांचं एका बाबतीत कौतुक वाटतं. ते कोणताही विषय असो एक ते दिढ तासात पडद्यावर आणतात. आमच्या बॉलिवूडकरांना मात्र यासाठी तीन- तीन तास लागतात.कारण यांच्या मते मुव्ही कोणत्याही विषयावर असो त्यात सेक्स,रोमान्स,आयटम सॉंग हे सर्व लागतंच . त्याशिवाय पब्लिक थियेटरकडे वळत नाही असं यांना वाटतं. (केव्हा सुधारणार हे लोक कुणास ठाऊक.) माझी कुणी खास गर्लफ्रेंड अशी नसल्याने माझा वायफळ खर्च फारसा नव्हताच. (सिंगल असण्याचे फायदे !) त्यामुळे माझ्या मर्जीने मी सुट्टीचा प्लॅन आखू शकत होतो. आज ही असच संध्याकाळी ७च्या शोचं तिकीट बूक केलं. आता संध्याकाळपर्यंतचा दिवस कसा घालवायचा हा प्रश्न होता. पण त्याचंही उत्तर लगेच डोक्यात आलं. मुंबईमध्ये माझी सर्वात फेव्हरेट जागा होती- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच पूर्वीचं व्ही.टी.आताचं सीएसएमटी.एकतर इथं बऱ्याच गोष्टी स्वस्त आणि मस्त मिळतात. आणि दुसरं म्हणजे काहीही खरेदी न करता तुम्ही केवळ चर्चगेट स्टेशनवरून बाहेर पडून फॅशन स्ट्रीट वरून सीएसटी पर्यंत चालत आलात, तरी तुमचं विंडो शॉपिंग झकास होऊन जातं. आणि मला असं चकटफू विंडो शॉपिंग करायला खूप आवडतं. दुसरं म्हणजे इथल्या इराणी हॉटेलमधला चहा आणि जेवण एकदम झकास असतं. चहा तर असा की एखादा कप पिऊन हौस भागत नाही, एक और चलेगा असं म्हणत दोन तीन कप चहा होतोच. मी आज संध्याकाळच्या मुव्हीपर्यंतचा वेळ तिकडच घालवायचं ठरवलं. माझ्या राहत्या फ्लॅटपासून मेट्रो स्टेशन अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथून घाटकोपर स्टेशन सात मिनिटे आणि तिथून लोकलने सीएसटी १५ ते २० मिनिटे. माझा मूड एकदम छान होता आज. साधारणपणे सुट्टीच्या दिवशी माझा मूड असाच असतो.

मी मेट्रोच्या तिकीट विंडोसमोर लाईनमध्ये उभा होतो, कुठलंसं आवडीचं गाणं गुणगुणत एवढ्यात पुन्हा तेच फिलिंग. कुणीतरी माझ्या जवळपास असून माझ्यावर पाळत ठेवून असल्याचं फिलिंग. मी चहूबाजूला पाहिलं तर सगळीकडे लोक पसरले होते पण खास माझ्याकडं पाहणारं कुणीच दिसलं नाही. पुन्हा भास ? इतक्या लोकांच्या उपस्थितीत कुणी मला काय करू शकत होतं? विचार करत करत मी कधी तिकीट खिडकीजवळ आलो कळलंच नाही. पाठीमागच्या व्यक्तीने मला हलवून जागं केलं तेव्हा भानावर आलो.

"घाटकोपर रिटर्न एक "

मी शंभरची नोट आत सरकवली. समोरून कॉईन आणि रिसीट मिळताच मी एंट्रीकडे निघालो.मी टोकन पंच करणार तेव्हढ्यात पाठीमागून माझ्या खांद्यावर हात पडला. मी संपूर्ण शहारलो आणि हळुवारपणे मागे पाहिलं, तर माझ्यामागची व्यक्ती मला तिकीट खिडकीकडे इशारा करून दाखवत होती. मी त्या दिशेने पाहिलं तर तिकीट खिडकीवरचा मुलगा मला बोलवत होता. आता काय झालं ? असा विचार करत तिकीट खिडकीजवळ पोचलो.

" काय साहेब कुठं लक्ष आहे ? सुट्टे पैसे न घेताच निघालात."

" धन्यवाद मित्रा "

त्याचे आभार मानत मी काउंटरवरून पैसे उचलले आणि पाठीमागे वळलो. तेवढ्यात अचानक पाठीमागे उभी असलेली व्यक्ती मला जोरात थडकली. अजूनही माझ्या हातातच असलेले पैसे या धक्क्यामुळे खाली पडले. मनातल्या मनात त्याला शिव्यांची लाखोली वाहत मी पैसे गोळा करण्यासाठी खाली झुकलो.दुसऱ्या क्षणी माझ्या पाठीवर खूप मोठं ओझं पडल्याचं जाणवलं . कुणीतरी माझ्या पाठीवरकोसळलं होतं. मी ते खाली ढकललं तेव्हा कोसळल्यावर जे दिसलं ते पाहून मी पार हादरलोच. ही तीच व्यक्ती होती जिची आणि माझी टक्कर होऊन माझे पैसे खाली पडले होते. खाली पडलेल्या व्यक्तीच्या मानेखालून रक्त ओघळायला सुरुवात झाली होती. यावरून एक निश्चित होतं की ती व्यक्ती एकतर स्वर्गवासी झाली होती किंवा शेवटच्या घटका मोजत होती. मी जोरात हेल्प-हेल्प म्हणून ओरडलो. चेकिंग पोस्टवर असलेले सुरक्षा रक्षक ताबडतोब तिथं पोचले. आणि खाली पडलेल्या व्यक्तीपासून गर्दी हटवायला त्यांनी सुरुवात केली. त्यापैकी एकाने पडलेल्या व्यक्तीची नाडी तपासली. बहुतेक कार्यभाग संपला होता तिचा. पोलिसही ताबडतोब तिथं हजर झाले. गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी आपलं डाव शिताफीने साधला होता. मी अजूनही थरथर कापत तिथं उभा होतो. मग सर्वांच्या साक्षी झाल्या सवाल-जवाब झाले पोलिसांनी तिथं असलेल्या साक्षीदारांचे ज्यात मी एक नम्बरला होतो .. नंबर्स घेतले आणि वेळ पडल्यास पोलीस स्टेशनला हजर राहण्याची सक्त ताकीद देऊन सोडून दिलं. या सगळ्या गोंधळात कमीत कमी दिढ -दोन तास गेले. माझा आता सीएसटी ला जायचा मूड पूर्ण गेला होता. मला आता गरज होती माझा मूड ठीक करण्याची. आणि यासाठी एकच उपाय होता. मी तेच करायचं ठरवलं. मेट्रो स्टेशनखालीच असलेल्या बारमध्ये मी शिरलो. तसं मी रोज ड्रिंक घेत नाही. मला त्याचं व्यसनही नाही. केव्हातरी पार्टी किंवा काही खास सेलिब्रेशन असेल तर एखाद दुसरा पेग होतो. पण आज जे काही घडलं होतं त्या नंतर मला ड्रिंकची नितांत गरज वाटली.मी बारमधील एक कोपऱ्यातील टेबल निवडलं. मला शांतता हवी होती आणि नेमकं बारमधील वातावरण मला हवं तसं शांत होतं.बार अगदी सुनसान होता. दुपारची वेळ असल्यामुळे असेल कदाचित, पण बार मध्ये एखाद-दुसरं गिऱ्हाईक वगळता वेटर आणि मीच होतो . मी माझ्यासाठी एक लार्ज पेग ऑर्डर केला जो तात्काळ माझ्यासमोर हजर झाला. वेटर मोठ्या अदबीने माझ्यासमोर उभा राहिला मी त्याला खाण्याची ऑर्डर दिली आणि एक दहाची नोट त्याच्या हातात टेकवली. (शेवटी आपल्याला रिस्पेक्ट देण्यामागचा त्याचा सरळ सरळ उद्देश, टीप कधी देताय हाच असतो.) मी एक मोठा घोट घेतल्यावर ते रसायन आत आग लावत खाली गेलं आणि माझा मूड चेंज झाला. आता झाल्या प्रकारचा तणाव गेला होता आणि सर्व घटना एखाद्या पिक्चरसारखी डोळ्यासमोरून सरकायला सुरुवात झाली. मी हळूहळू पेग सिप करत ती घटना पुन्हा आठवायला सुरुवात केली. मी तिकीट खिडकीवरून बाकी पैसे घेऊन जसा वळलो, माझ्या मागून येणाऱ्या व्यक्तीला थडकलो आणि माझ्या हातातील पैसे खाली पडले. आणि मी पैसे उचलण्याकरिता खाली वाकलो. आणि दुसऱ्या क्षणी माझ्या अंगावर ती व्यक्ती कोसळली... काय हा निव्वळ योगायोग होता ? जर ती व्यक्ती मला धडकली नसती आणि मी खाली वाकलो नसतो तर ? ती गोळी मला लागली असती.

अरे देवा ! ती गोळी माझ्यासाठी तर नव्हती ? पण कुणी मला का मारावं ? माझं कुणाशी ही वैर नव्हतं. या शहरात आल्यापासून माझं सर्वांशी चांगलं रिलेशन होतं. मग कुणी मला का मारेल ? गेल्या काही दिवसांपासून माझं डोकं भलते सलते विचार करायला लागलं होतं . छे!छे! हा निव्वळ योगायोग असला पाहिजे. हा सगळा माझ्या रिकाम्या डोक्याचा उपद्व्याप असावा. बाकी काही नाही. म्हणूनच आजची घटना पण त्याच्याच एक भाग वाटतेय मला. मी आणखी एक मोठा सीप घेतला. परिणाम लगेच समोर आला. आता मला कशाचीच भीती वाटेनाशी झाली. दारू मेंदूत भिनल्याचा परिणाम. मी आता शेर झालो होतो. खूप झालं टेन्शन. अब बस .अब और नही. आता जे होईल ते बघून घेऊ पण घाबरायचं नाय. कुणास ठाऊक हे सगळं माझ्या मनाचा खेळ असेल. मी उगाचच टेन्शन घेतोय आणि दिवस आणि मूडचा सत्यानाश करतोय. आता मी खूपच स्वतःला सावरलं होतं. मी माझं ड्रिंक आरामात संपवलं. तोवर वेटरने मी दिलेली ऑर्डर टेबलवर लावली होती. मी लंच संपवलं. बिल पे केलं आणि तिथून बाहेर पडलो . माझा फ्लॅट जवळच असलेल्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर होता आणि सुदैवाने लिफ्ट तळमजल्यावरच होती. मी फ्लॅटवर येऊन सरळ बेडवर ताणून दिलं. ड्रिंकचा परिणाम चांगलाच झाला असल्यानं मी ताबडतोब गाढ झोपी गेलो. संध्याकाळी जाग आली तेव्हा साडे पाच वाजले होते. झोप छान झाल्यामुळे मूड एकदम ताजातवाना झाला होता. माझा मुव्हीचा प्रोग्रॅम माझ्या लक्षात होता. मी स्वतःसाठी मस्तपैकी चहा बनवला. आणि तयार होऊन रमतगमत थिएटरवर पोचलो. माझ्या घरापासून हे अंतर जेमतेम पायी २०- २५ मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे मी मुव्ही सुरु व्हायच्या बराच आधी तिथं पोचलो होतो. कानाला हेडसेट लावून मी माझ्या आवडीची डाऊनलोड केलेली गाणी ऐकत ऐकत आलो होतो त्यामुळे मूड छान होता. वेळ अजून ही शिल्लक असल्यामुळे मी व्हाट्सअप चेक करून ज्यांचे मेसेजेस मी झोपलेल्या वेळेत आले होते त्या सर्वांना रिप्लाय द्यायला सुरु केलं. स्टेट्स टाकलं की डोन्ट डिस्टरब मी नाऊ वॉचिंग मूवी. आता कमीतकमी स्टेट्स पाहणारी लोकं तरी त्रास देणार नाहीत ही भाबडी आशा (?) बाळगून मी थिएटरमध्ये शिरलो. मुव्ही टाईम झाला होता. त्यामुळे मी स्क्रीन नम्बर पाहून आत शिरलो. आत गेल्यावर पाहिलं तर जवळपास सगळं थियेटर रिकामं होतं. मुव्ही रिलीज होऊन दोन आठवडे झाले होते त्यामुळे थियेटर रिकामं असावं. ऑडियन्समध्ये काही कपल्स होती, ज्यांनी कॉर्नर सीट्स पकडल्या होत्या आणि आपापसात गप्पा (?) मारण्यात गुंग झाली होतीत. शेवटी मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात हक्काचा एकांत म्हणजे फ्लॉप मुव्हीचा शो. इथं एकदा आत आलं की एक दोन तास कुणी डिस्टर्ब करत नाही. प्रेमातुर युगुलांना थिएटरचा आधार! मी माझ्या पाठीमागच्या रो मध्ये पाहिलं तर कोपरे वगळता बाकी सर्व लाईन रिकामी होती. मी निवडलेली सीट रो च्या मध्यभागी होती. एक दोन जाहिरातीनंतर मुव्ही सुरु झाली आणि मी पहिल्या दहा मिनिटातच मुव्ही पाहण्यात गुंग झालो. खरंच मुव्हीची सिनेमॅटोग्राफी आणि स्पेशल इफेक्टस कमालीचे सुंदर होते. क्षणाक्षणाला थरार वाढत होता. पैसे वसूल मुव्ही होती. पाऊण तासानंतर इन्टरवल झाली. मी फ्रेश होण्यासाठी बाहेर पडलो. पॉपकॉर्न आणि कॉफीची ऑर्डर दिली आणि पुन्हा माझ्या जागी येऊन बसलो. येताना एक फरक मला जाणवला. माझ्या मागची रो जी जवळपास रिकामी होती ती आता भरल्यासारखी वाटली. माझ्या सीटच्या बरोबर मागच्या दोन सीटवर आता दोन व्यक्ती बसल्या होत्या. कदाचित मुव्ही सुरु झाल्यावर त्या येऊन बसल्या असाव्यात. त्यामुळेच मला ते कळलं नसावं. मी माझ्या जागी येऊन बसलो आणि मुव्ही सुरु झाला तसा पुन्हा त्यात गुंग झालो. दरम्यानच्या काळात मी दिलेली ऑर्डर घेऊन डिलिव्हरी बॉय आला आणि पॉपकॉर्न आणि कॉफी देऊन गेला. त्याचा आस्वाद घेत घेत मी मुव्ही एन्जॉय करत होतो. आता सिनेमा सुटायला काहीच मिनिटं शिल्लक होती. अचानक माझ्या मानेला काहीतरी टोचलं. एखाद्या किड्याने चावा घ्यावा तशी कळ आली. थियेटरमध्ये किडा कुठून आला ? याची तक्रार केलीच पाहिजे मॅनेजरकडे. आता मुव्ही संपला की हे काम पाहिलं करू असं ठरवलं आणि मी पुन्हा मुव्ही पाहू लागलो. पण थोड्या वेळानंतर माझ्या डोळ्यसमोरील चित्र धूसर धूसर दिसायला लागलं. मला ग्लानी येतेय असं वाटायला लागलं. मी खूप मुश्किलीने झापड दूर करण्याचा प्रयत्न केला. पण आता बेहोशी संपूर्ण शरीरभर पसरायला लागली होती. मुव्ही संपला तसं मी उठायचा प्रयत्न केला पण मी खुर्चीतच कोसळलो. दुसऱ्या प्रयत्नांत मी समोरील आणि मागच्या रो च्या खुर्च्यांची बॅकसाईड हातांनी घट्ट पकडली आणि कसाबसा रो च्या बाहेर पडलो. त्याचवेळी दोन्ही बाजूनी काखेत हात घालून दोन व्यक्तींनी मला पकडलं. मी त्यांच्याकडे पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर चेहरे तर धूसर झाले होते पण कपड्यांच्या कलर वरून मी ओळखलं की माझ्या बरोबर मागच्या सीटवर बसलेल्याच या दोन व्यक्ती होत्या. मी कोणताही विरोध करण्याच्या स्थितीत नव्हतो. जे घडतंय ते माझ्या मर्जीविरुद्ध घडतंय एवढंच मला कळत होतं. दोघांनी आधार देऊन मला थिएटरच्या एक्झिट गेट पर्यंत आणलं. तिथं त्यांनी सिक्युरिटी ऑफिसरला सांगितलं की आमच्या मित्राची तब्येत अचानक बिघडलीय. सिक्युरिटीने जास्त खोलात न शिरता आम्हांला बाहेर जाऊ दिलं. मला काय घडतंय हे कळत होतं पण मी काहीही करू शकत नव्हतो. आता एकच आधार होता देवाचा. मी त्याचीच प्रार्थना करायला सुरु केली. आमच्या समोर एक कार आली ज्याचं पाठीमागचं दार दोघांपैकी एकाने उघडलं आणि मला आत ढकलणार तेवढ्यात मला कुणीतरी हाक मारली " विकास ... विकास . अरे काय झालं विकास ? "

याची तब्येत बिघडलीय. आम्ही याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो. " मला दोन्ही बाजुंनी धरलेल्या व्यक्तींपैकी एकाने उत्तर दिलं.

" मी अनिल याचा खास मित्र. थँक यू . तुम्ही याची मदत केली. पण मी त्याला घेऊन जाईन डोन्ट वरी. पुन्हा एकदा थँक्स. चल विकास मला पकड "

आता मला क्लिक झालं की हाक मारणारा दुसरा तिसरा कुणी नसून माझा बेस्ट फ्रेंड अनिल होता. जो कुणास ठाऊक कसा पण अगदी देवासारखा धावून आला होता तिथं.गेल्या १० वर्षांपासून आमची मैत्री होती. एकाच भागातले असल्यानं मुंबईत आम्हांला एकमेकांचा खूप आधार वाटायचा. खरं तर वीकएंड आम्ही नेहमी एकत्रच साजरा करायचो. पण यावेळी तो आपल्या गावी जाणार असं समजल्यानं आज मी त्याला फोन केला नव्हता. आमच्या आवडी-निवडी देखील जवळपास सारख्याच असल्यानं आम्ही खूप लवकर फास्ट फ्रेंड झालो होतो. त्यानं मला घट्ट धरलय याची खात्री होताच मी स्वतःला त्याच्याकडे झोकून दिलं आणि माझी शुद्ध हरपली.

रविवार १६ ऑक्टोबर

मला जाग आल्यावर मी पाहिलं तर मी स्वतःच्या फ्लॅटवर होतो.

" गुड मॉर्निंग साहेब. झाली का झोप ? मला तर कालची तुझी अवस्था बघून वाटलं की तू आठवडाभर तरी उठायचा नाहीस. काय झालं होतं तुला ? जरा जास्तच घेतली होतीस का ? इतकं टुन्न झालेलं तुला कधीच पाहिलं नाही यार. आणि कोण होते ते दोघे जे तुला कारमध्ये बसवत होते ? ऐन वेळी मी पोचलो नसतो तर कुणास ठाऊक तू कुठं असतास ? मला तर ती माणसं काही चांगली माणसं वाटली नाहीत. "

" अरे अनिल, जरा श्वास तर घे. किती प्रश्न ? आणि तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीय माझ्याजवळ. जे काही काल घडलं त्याच्या धक्क्यातून मीच अजून बाहेर नाही आलोय. डोकं आऊट झालंय माझं."

अनिलने मी उठण्यापूर्वीच चहा करून ठेवला होता. त्याने मला गरम करून तो आणून दिला. चहा घेतल्यावर थोडी तरतरी आली.

" अनिल काल मी ड्रिंक जरूर केलं होतं पण मुव्हीला गेल्यावर नाही. त्याच्या कितीतरी आधी म्हणजे दुपारी केलं होतं. त्यानंतर दुपारी छान पैकी विश्रांती घेऊन मी मुव्हीला गेलो होतो. थिएटरमध्ये मुव्ही संपत आलेली असताना माझ्या मानेवर काहीतरी टोचलं . त्यावेळी मला काहीतरी किडा चावला असेल असं वाटलं. पण त्यानंतर मला अचानक अंधारी यायला लागली. मी कसाबसा रो मधून बाहेर पडलो. त्यानंतर त्या दोन व्यक्तींनी मला दोन्ही बाजुंनी धरलं आणि बाहेर आणलं. मला त्या दोन अनोळखी व्यक्तींबद्दल मला काहीच माहित नाही. पण तू ऐनवेळी आला नसतास तर कुणास ठाऊक त्या दोघांचा मला कुठं न्यायचा प्लॅन होता? तू तिथं कसा काय पोचलास?"

" माझं गावी जाणं अचानक रद्द झालं म्हणून मी तुला मुव्हीला जाऊ म्हणून कॉल करत होतो. पण तुझा फोनच लागत नव्हता.मग म्हटलं जाऊ एकटेच. "

"माझं नशीब तुला नेमकं मुव्हीला आणि त्याच थियेटरला यायची बुद्धी झाली. अनिल आणखी एक गोष्ट मी तुला सांगितली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवतंय असं मला वाटतंय. आणि त्यात काल घडलेल्या दोन घटनांनी ते खरं असावं असं मला वाटतंय. "

" दोन घटना? अजून काय घडलं बाबा ?"

" अरे मी सकाळी सीएसटीला जायचा प्लॅन आखला होता आणि त्याप्रमाणे मी मेट्रोने घाटकोपरला जाण्यासाठी तिकीट काढलं आणि निघालो तेवढ्यात एंट्री कारण्यापूर्वीच मला तिकीट खिडकीवरील बॉय ने माझे बाकी पैसे ... चेंज घ्यायला बोलावलं जी मी परत घ्यायला विसरलो होतो. मी चेंज घेतली आणि मागे वळलो तोच पाठीमागून तिकीट काढायला येणाऱ्याला मी धडकलो. माझ्या हातातील पैसे खाली पडले. मी ते उचलायला खाली वाकलो त्याच क्षणी माझ्या पाठीवर धडकलेली व्यक्ती कोसळली. अनिल ती व्यक्ती गोळी लागल्यामुळे कोसळली होती. मी जर त्या व्यक्तीला धडकलो नसतो तर कदाचित त्या व्यक्तीच्या जागी मी असतो. "

" छे काहीतरीच काय ? तुला कोण कशाला मारेल ? हे जरा अतीच होतंय. जास्त थ्रिलर मुव्हीज बघण्याचा परिणाम झालेला दिसतोय तुझ्यावर. " अनिल हसत हसत म्हणाला.

"मला पण असंच वाटलं अन्या. पण मग थियेटरमध्ये काल जे घडलं ते तर तू स्वतः पाहिलंस. तू नसतास तर माझं काय झालं असतं ?"

यावेळी मात्र अनिल विचारात पडला.

" तू म्हणतोस त्यात तथ्य आहे यार. आणि असं असेल तर हे फारच सिरीयस आहे. तू पोलिसांना हे सर्व काल सांगितलंस का ?"

" वेड लागलंय का मला ? कोण विश्वास ठेवेल यावर ? तुझा तरी बसला का जवळचा मित्र असून ?" मी त्याला म्हणालो.

" पण कालच्या घटनेनंतर मात्र तुला हे सर्व पोलिसांना सांगावेच लागेल. तुला बेसावध राहून चालणार नाही. "

" हम्म्म्मम. आपण जाऊया आज. मी थोडं आवरतो मग जाऊ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला. "

" ठीकय. तू फ्रेश हो. मी आधीच आवरलंय. "

मी बेडवरुन उठलो आणि पटापट आवरायला सुरुवात केली. आता अनिलसोबत जाऊन पोलिसांत तक्रार देणं गरजेचं होतं. म्हणजे इतके दिवस मला जे काही वाटत होतं तो निव्वळ भास नव्हता तर! माझ्या सिक्सथ सेन्सने मला वेळोवेळी खबरदार केलं होतं. मी झटपट फ्रेश झालो आणि अनिलला थोडं थांबायला सांगून कालच्या आणि आजच्या दिवसाचं या वेळेपर्यंतचं पान मी लिहून पूर्ण केलं. जे काही काल घडलं त्या नंतर ही डायरी लिहिणं माझ्यासाठी अतिशय गरजेचं वाटायला लागलं होतं. कुणास ठाऊक कदाचित त्या गजनीमधल्या आमिर खान सारखी माझी डायरी पण महत्वाची ठरेल माझ्यासाठी किंवा इतरांसाठी ...माझ्याबाबत जे गेल्या काही दिवसांपासून घडत होतं ते त्यांना कळण्यासाठी. मी आता अनिलसोबत पोलीस स्टेशनला जात आहे.

१५ नोव्हेंबर

आज जवळपास एक महिन्यानंतर मी डायरी लिहायला घेतलीय. मधल्या काळात अशा काही विलक्षण घटना माझ्या बाबत घडल्या ज्यांना सामान्य नक्कीच म्हणता येणार नाही. अनिलसोबत मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी खाली उतरलो आणि काही अंतर चाललो असेन तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची फियाट आमच्याजवळ येऊन थांबली. फ्रंटसाईडची ड्रायव्हरच्या बाजूची खिडकीची काच खाली झाली आणि त्यातून एक चेहरा बाहेर डोकावला.

" हे हाय विकास. सो मच सरप्राईज. तू इकडे काय करतोयस ? "

ती निशा होती. माझ्याबरोबर दोन वर्षांपूर्वी एकाच कंपनीत काम केलेली. डॅशिंग वागणं ,दिसायला सुंदर, एकदम बिनधास्त. तिच्याबरोबर डेटवर जायला सगळे तडफडायचे. पण आम्ही चांगले मित्र होतो. पण मी तिला कधी प्रपोज नाही केलं. ती चेष्टेत म्हणायची "सगळॆ माझ्यापाठी, आणि मी तुझ्यापाठी. पण तुला मात्र काहीच वाटत नाही माझ्याबद्दल ?

" वाटतं ना. पण जळता निखारा कोण पदरात बांधून घेईल ? " मी हसत हसत म्हणायचो. ती यावर खूप चिडायची. तिला तो तिचा अपमान वाटायचा. पण ही वस्तुस्थिती होती. ती एक ओपन माईंडेड आणि जरा जास्तच मोकळ्या विचारांची मुलगी होती आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या व्याख्येत बसणारी नव्हती. त्यामुळे मैत्री पर्यंत ठीक हे मी तिला स्पष्ट सांगितलं होतं.

" काय मग कुणी पटवली की नाहीस ? डोन्ट टेल मी की अजून सिंगल आहेस. "मी तिच्या बोलण्याने पुन्हा वर्तमान काळात आलो.

" चल बस. मी सोडते तुला. कुठं जायचंय ? घाबरू नको पळवून नाही नेणार तुला. "

" अग मी एकटा नाही. माझा मित्रपण आहे सोबत. आम्ही जाऊ. जवळच जायचं आहे. "

" गाडीत त्याच्यासाठी पण जागा आहे. चल उगाच मूड ऑफ करू नकोस. किती दिवसांनी भेटलायेस. आज तसा पण संडे आहे. कम ऑन यार. "

आता नाही म्हणणं मला अवघड झालं होतं. अनिलने आपणहून मागे बसायचा निर्णय घेतला. मी पुढे तिच्या शेजारी बसलो.

" मस्तपैकी नाश्ता करू. मला खूप भूक लागलीय. " निशा म्हणाली.

मी होकारार्थी मान हलवली.

" बाकी तुझं काय चाललय निशा ? सध्या काय करतेस ?"

" लाईफ एन्जॉय करतेय. नवीन बिझनेस सुरु केलाय ऑनलाईन. मला फारसं काही करावं लागत नाही. अजून एक पार्टनर आहे तो सारं पाहतो. मी इन्व्हेस्ट केलंय. बस्स. दिवसभर मोकळी असते. मग काय गाडी काढायची आणि मन म्हणेल तिकडं भटकायचं. "

" अरे वा. नशीबवान आहेस बाकी. आम्ही आपलं नोकरी एके नोकरी करतोय. "

" यु कॅन अल्सो जॉईन मी. अरे खूप मस्त आहे बिझनेस. " बोलता बोलता तिने तिची सिगारेट पेटवली.

"अजून तुझी सवय सुटली नाही ? "

" अरे इथे कुणाला सोडायची आहे ? दम मारो दम ... मीट जाये गम. आपला तर लाईफचा फण्डा हाच आहे. तू पण एक कश मारून बघ. अरे तुझ्या फ्रेंडची ओळख नाही करून दिलीस. " तिने मागे वळून अनिलला हाय केलं. अनिल पण तसाच प्रतिसाद दिला.

" हा माझा बेस्ट फ्रेंड अनिल. आम्ही वीकएंडला एकत्र असतो नेहमी. संपूर्ण वीकएंड झकास पैकी एन्जॉय करतो. "

निशाने सिगारेटचा एक झुरका घेऊन हवेत सोडला आणि माझ्याकडे पाहात म्हणाली," अरे ये भी कोई एन्जॉय होता है जिसमें गर्लफ्रेंड ना हो ?"

" अपना अपना नजरिया है मैडम" मी म्हणालो. एव्हाना आम्ही मरीन ड्राइव्हकडे कधी आलो कळलं पण नाही. समुद्राचा गार वारा खिडकीच्या काचा उघड्या ठेवल्यानं आता बोचरा वाटायला लागला होता. अचानक लक्षात आलं की गप्पा मारायच्या नादात आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायचं विसरूनच गेलो होतो. मला पुन्हा माझ्या एरियात जाणं खूप आवश्यक होतं. समोरून रेड सिग्नल पडला तसा फियाटचा स्पीड निशाने कमी केला.

" साला मारिन ड्राइव्हचे सगळे सिग्नल कमीत कमी संडेला तरी बंद केले पाहिजेत. साला या रस्त्यावर पण फस्ट सेकण्ड गियरवर गाडी चालवायची ? माय फूट. " तेवढ्यात तिला रस्ताच्या कडेला एक पानबिडीवाला दिसला. " तुम्ही बसा मी तेवढ्यात एक सिगारेट पॅकेट घेऊन येते. अजून सिग्नल ग्रीन व्हायला वेळ आहे. मी लगेच जाऊन येते. " मी काही बोलायच्या आत ती दरवाजा उघडून बाहेर गेली पण.

इतका वेळ चुपचाप बसलेल्या अनिलने आता मौनव्रत सोडलं.

" काय भन्नाट पोरगी आहे यार. अशी पोरगी तुझ्यावर फिदा झालीय आणि तू तिच्यापासून लांब पळतोयेस. साला आपलं नशीब एवढं चांगलं असतं तर ? आपण नसता चान्स सोडला. पोरगी सुंदर आहे, श्रीमंत आहे. अजून काय हवंय ?"

" अन्या ती पोरगी आपल्यासारख्या मिडल क्लास माणसाला झेपणारी नाही यार. तिचे शौक पाहिलेस ना ? हे असलं आपल्या घरात खपवून घेतील का ? शिवाय ती बंधनात राहणारी नाहीय. मुक्त वातावरणात वाढलीय ती. बाकी स्वभावाने चांगली आहे ती. मनात एक आणि बाहेर एक असलं तिला जमत नाही. आहे हे असं आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या."

निशा जाऊन बराच वेळ झाला होता एव्हाना ती यायला हवी होती. त्याचवेळी ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडला. मला वाटलं निशा परत आली असेल. पण माझा अंदाज खोटा ठरला. एक बुरखाधारी व्यक्ती आत शिरली आणि दार लावून घेतलं. मी काही विचारण्याच्या आतच त्यानं आमच्या समोर रिव्हॉल्वर धरलं. दोघांना कव्हर करत त्याने चुपचाप बसण्याचा इशारा केला. त्या नंतर त्याने दुसऱ्या हातातून आमच्यावर आळीपाळीने स्प्रे मारला. बघता बघता आमच्या डोळ्यांवर अंधारी आली आणि काही कळायच्या आत आम्ही बेशुद्ध झालो.

जाग आली तेव्हा मला एका खुर्चीवर हात पाय बांधून ठेवल्याचं आढळलं. पण चेहरा कोणत्याही प्रकारे झाकायचा प्रयत्न केला नव्हता. म्हणजेच मी ओरडल्याने मला इथं मदत मिळणार नाही याची त्यांना खात्री होती, ज्यांनी मला इथं आणलं होतं. हे सगळं एखाद्या मसाला बॉलिवूड मुव्ही सारखं घडत होतं. पण त्या बॉलिवूड हिरोसारखा मी काही एका फटक्यात दहा दहा गुंडाना लोळवणारा नव्हतो. मी इथून कसा सुटणार होतो ? माझं पुढं काय होणार होतं ?

मी तर पोलीस स्टेशनला तक्रार पण नोंदवू शकलो नव्हतो. कशाला ती निशा मध्येच कडमडली कुणास ठाऊक ? नाहीतर हे सगळं घडलंच नसतं. पण काही उपयोग नव्हता. समोर काय वाढून ठेवलं होतं देवाला ठाऊक ? अचानक माझ्या डोक्यात अनिलचा विचार आला. अनिलचं काय झालं असावं? या खोलीत माझ्या व्यतिरिक्त दुसरं कुणीच नव्हतं. मी शांतपणे खोलीत नजर फिरवली, तेव्हा खोलीला माझ्या समोर दरवाजा तर माझ्या मागच्या बाजूला एक मोठी काचांचे दरवाजे असलेली खिडकी, एक टेबल,एक खुर्ची जी टेबलजवळच ठेवलेली होती. त्यावर पाण्याचा जार आणि एक स्टीलचा पेला ठेवलेला दिसला. खोलीच्या एका कोपऱ्यात बरीच अडगळ जमा करून ठेवलेली दिसत होती. म्हणजे ही खोली घराचा मुख्य भाग नसावी. आजूबाजूला पसरलेली बरीचशी धूळ यावरून पण हे स्पष्ट होत होतं की या खोलीचा वापर रोज केला जात नव्हता. मी किती वेळ इथं अशा बांधलेल्या अवस्थेत हातो कुणास ठाऊक. निशाच्या गाडीतून आम्हांला किडनॅप केलं गेलं होतं. त्यामुळे तिने नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असेल आणि एव्हाना आमचा शोध सुरु पण झाला असेल. अर्थात मुंबई पोलीस किती तत्परता दाखवतात यावर सगळं अवलंबून होतं. माझं हे लोक काय करणार होते ? माझ्या जवळ किती वेळ होता ? काहीच कल्पना नव्हती. अनिल कुठं असेल ? तो सुरक्षित असू दे. त्याला यांनी सोडलं असलं तर तो देखील माझ्यासाठी धडपड नक्की करेल. पण त्याला हे लोकं सोडतील ?

ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय, त्यांच्या पैकी कुणीतरी समोर आल्याशिवाय मला काहीही कळणार नव्हतं. तोपर्यंत मी माझे हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण थोडी हालचाल करण्यापलीकडे मी काहीच करू शकलो नाही. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समोर जी व्यक्ती आली ते पाहून मी थक्क झालो. माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझ्या समोर जी व्यक्ती उभी होती ..... ती ती म्हणजे मीच होतो. हे खरंच अशक्य होतं. हुबेहूब माझं प्रतिबिंब माझ्या समोर उभं होतं आणि मोठमोठ्यानं अगदी हसत होतं.

" काय लग गया ना जोर का झटका ? आपन तुला फर्स्ट टायम पायला तेव्हा आपली पण सेम हालत झाली. म्हणून मी एकदा नाही हजारवेळा तुला पाहीलं. म्हणजे तुझे फोटो अगदी वेगवेगळ्या अँगलने काढून. मग प्रत्यक्ष जवळून पण पाहिलं.तेव्हा खात्री पटली. शाला आपण मानलं देवाला. क्या बनाया तेरेकु ! आपला भेजाच फ्राय झाला. आता पर्यंत फक्त पिक्चरमधेच जुडवा भाय पहिले होते आपण. पण आता तुला पाहिल्यावर शाला खात्री झाली की असली दुनियेत पण डुप्लिकेट होता है अपना. "

हे सर्व जे काही माझ्यासोबत घडत होतं, त्यामुळे मला ही एकावर एक धक्के बसत होते. तो म्हणत होता तेच अगदी मला पण वाटत होतं. आपल्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या सात व्यक्ती या जगात असतात, असं कुठंतरी वाचल्याचं त्यावेळी मला आठवलं. पण एकाच शहरात माझ्याबाबतीत असं कधीकाळी घडू शकेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण हे सगळं जरी खरं असलं तरी मला इथं आणण्यामागचा हेतू काय ? हा प्रश्न आता मला सतावत होता.

" तुला असा प्रश्न पडलाय की आपल्या एकसारखं दिसण्याचा आणि तुला इथं किडनॅप करून आणण्याचा काय संबंध ?

खूप मोठा संबंध आहे यार. मला मोठा प्रश्न पडला होता की 'तात्याचा' पिच्छा कसा सोडवायचा ? तात्या म्हणजे अंडरवर्डमधला डॉन . त्याचे ५० कोटी मी पळवलेत. तो मला जिवंत सोडणार नाही. पैसे तर वसूल करेलच पण मला अगदी डोक्यापासून पायापर्यंत उभा चिरेल. तात्यापासून वाचणं सोपं नाही. आणि ज्यानं कुणी त्याच्याविरोधात जायचा प्रयत्न केला त्याला तात्यानं कधी जिवंत जाळलं, तर कधी हाल हाल करून मारलं. लोकं त्याच्याकडे मरणाची भीक मागतात, पण तो सहजासहजी कुणाला मरण देत नाही. आता तू म्हणशील की इतकं सगळं माहित असून मी त्याला ५० कोटींचा चुना कसा काय लावला ? शाला आपली पण हिम्मत होत नव्हती. पण शाला आपल्या पंटर लोकनी तुला पायलं. शाला ते पण शॉक ! मग त्यांनी तुझ्यावर पाळत ठेवली."

म्हणजे इतके दिवस माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याची जाणीव खरी होती तर !

" मग आपन स्वतः तुला जवळून पायला. शाला तेव्हा आपली खात्री पटली की शाला तुझ्यात आन माझ्यात काडीचा पन फरक नाय. मग आपण प्लॅनिंग केला. तात्याचा माल उडवायचा आणि माझ्या जागी तू तात्याच्या ताब्यात सापडशील अशी एंगेजमेंट करायची.” त्याचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो “एंगेजमेंट नाही अरेंजमेंट “ “ शाला तेच ते आपुन जितकं इंग्लिश समजत तेवढाच बोलतो शाला . तर तात्या तूला ठोकल मी समजून. मंग आपण करोडपती. मंग मी थेट फॉरेन गाठन आणि नवीन लाईफ सुरू करन . शाला कसा काय वाटला आपला प्लॅन ? हाहाहाहाहा " .

त्याचं ते गडगडाटी हसणं माझं काळीज चिरत गेलं. तरी पण धीर धरून मी स्वतःला शांत ठेवत त्याला, माझ्या डुप्लिकेटला विचारलं म्हणजे माझ्यावर मेट्रो स्टेशनवर गोळी तूच झाडली होतीस वाटतं. “ तो निर्लाज्जासारखा हसला . “ तसा तुला आधी उडवायचाच प्लॅन होता आपला . मंग पुन्हा इचार केला म्हनलं तू माझ्या हातून मरण्यापेक्षा तात्याच्या हातून मरणं जास्त चांगलं. तात्याला त्येच समाधान लै मिळंल. “ मी पुढं त्याला विचारलं, " माझ्या मित्राचं काय झालं? "

" त्याला रस्त्यामध्येच एका बाजूला सोडला , शाला शुद्धीवर आला की जाईल उठून आपल्याआपण त्येच्या घरी. आपला त्येच्याशी काय लेनादेना नाय. "

एक गोष्ट त्यातल्या त्यात मला चांगली वाटली की किमान अनिल सुरक्षित होता आणि त्यामुळेच कदाचित माझ्या सुटकेची शक्यता होती. अनिल नक्कीच गप्प बसणार नाही. तो पोलिसांत जाईल आणि जे काही माझ्या बाबत घडलं ते सर्व त्यांना सांगेल. पण हे सर्व घडून येईपर्यंत, पोलीस माझ्या सुटकेसाठी येईपर्यंत माझ्या जवळ किती वेळ होता हे माझं मलाच माहित नव्हतं. आता इथून बाहेर पडण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार होतं. पण काय ??? सध्या तरी माझे हात आणि डोकं बंद होतं. तोपर्यंत माझ्या डुप्लिकेटने त्याच्या डाव्या उजव्यांना बोलवलं आणि त्यापैकी एकाला ठरल्याप्रमाणे तात्याला फोन कर असं सांगितलं. त्याने लगेच फोन लावला आणि बोलायला सुरुवात केली, " हॅलो कोन ? बारक्या ? तात्यांस्नी फोन दे. एकदम महत्वाची टीप द्यायची हाय.... हॅलो तात्या .... राम राम तात्या. तुमच्यासाठी येकदम इम्पॉर्टन्ट खबर हाय. तुमचा पैसा घिऊन बन्या आजच बँकॉकला पळणार हाय. गाडी नम्बर नोट करा .... एमएच १०-०४२०. सायेब सोडू नगासा त्येला. च्यायला आमास्नी बी थुक लावली बगा त्येनं. काम करताना लई पैसा देतो म्हनला आन काम झाल्यावर पायावर गोळी घातली बगा. म्हूनशान सूड उगवायचा हाय मला. त्यो मेला की मला पैसा मिळाल्यागतच हाय. अजून एक तासान त्यो तुमास्नी हायवे वर मिळंल. मी कोन त्ये जाऊ द्या. तुमच्या आन माज्या दुशमनाला मात्र सोडू नगा. रामराम. "

त्या आडदांड व्यक्तीनं फोन ठेवला आणि बन्या आणि तो एकमेकांना टाळी देऊन हसायला लागले. म्हणजे माझ्या डुप्लिकेटचं नाव बन्या होतं तर.

बन्या माझ्याकडं वळला," काही आलं का ध्येनात ? काय गेम आखलाय ते ? आता तात्याची माणसं हायवे वर आपल्या गाडीची वाट बगत असनार. गाडी तू चालवायचीस.मी तुझ्या मागच्या सीटवर तुझ्या मानेवर रिव्हॉल्व्हर रोखून बसेन. तात्याची शार्पशूटर माणसं आपला पाठलाग करतील, तुला गाठतील आणि तुला मी म्हणजे बन्या समजून गोळ्या घालतील. त्यांना जरा पण डाउट येणार नाय की शाला तू कुणी येगळाच हायेस. ती गाडीतून उतरतील आपल्या गाडीची तलाशी घ्यायला त्यांना पैश्याची बॅग पायजे असनार. ती जवळ येऊन दार उघडतील तेव्हा त्यांना मी स्वर्गाची वाट दाखवीन गोळ्या घालून. आणि मग मी आरामात पक्याला फोन करून गाडी मागवून त्या गाडीतून आज बँकॉकला जाईन. तात्याला पैसे नाय मिळाले तरी मला मारल्याचं समाधान मिळंल. माज्या मागचा तात्याचा पिच्छा सुटल आन मी कायमचा बँकॉकमध्ये शेटल. शाला लाईफ बन जायेगी आपन की. लेकिन शाला तेरी तो लाईफ ही चली जायेगी. "

साई ..... आता तुमचाच आधार. मला या संकटातून वाचवा बाबा. मी मनोमन बाबांची प्रार्थना करायला सुरु केली. शेवटी 'जाको राखे साईयां मार सके ना कोई'. तोच एक आधार होता.

आता निघायची त्यांची तयारी सुरु झाली. माझे हात सोडण्यात आले. पण माझ्यावर एकजण रिव्हॉल्वर रोखून उभा होता. सर्व तयारी झाल्यावर त्यांनी मला काळ्या रंगाच्या फियाटमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर बसवलं आणि मागे माझा डुप्लिकेट बन्या एकटाच बसला. बाकीचे त्याचे पंटर लोक त्याचा फोन आल्यावर गाडी घेऊन निघणार होते. ठरल्याप्रमाणे मी गाडी ड्राइव्ह करू लागलो आणि माझ्या मानेवर रिव्हॉल्वर ताणून बन्या अगदी माझ्या मागे बसला होता. मला काहीच कळत नव्हतं की यातून मार्ग कसा काढायचा ?

आता काहीतरी करणं आवश्यक होतं नाहीतर मरण अटळ होतं. गाडी आता कच्या रस्त्यावर होती आणि थोड्याच वेळात हायवे वर पोचणार होती. रास्ता अगदीच कच्चा असल्यामुळे गाडीला सारखे धक्के बसत होते. अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी त्यावर अंमल करायचं ठरवलं. गाडीला वेग दिला आणि अचानक जोरात ब्रेक मारला. मला जे अपेक्षित होतं तेच घडलं. माझ्या मानेवर रिव्हॉल्वर रोखून बसलेला बन्या जोरात ब्रेक मारल्यामुळे सरळ पुढच्या सीटवर माझ्या शेजारी येऊन आदळला. तो डोक्यावर पडल्याने त्याची अवस्था शीर्षासन केल्यासारखी झाली. आणि रिव्हॉल्वर त्याच्या हातातून सुटून माझ्या पायात पडलं होतं. मी एक क्षणदेखील वाया न घालवता ते उचललं आणि बन्यावर रोखलं. बन्याला हे सर्व अनपेक्षित असल्यानं तो अजून या धक्क्यातून सावरला नव्हता. मी माझ्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर पडलो आणि बन्यावर पिस्तूल रोखून त्याला ड्रायव्हरच्या सीटवर बसायला सांगितलं. आता त्याची जागा मी घेतली होती आणि माझ्या जागी तो आला होता. एका क्षणात नशिबाने खेळी बदलली होती. काही क्षणापर्यंत माझी जी अवस्था होती तीच आता बन्याची झाली होती. बन्यानं गाडी सुरु केली आणि लवकरच आम्ही हायवेवर आलो. जी चूक बन्याने केली ती मी केली नाही. मी पाठीमागच्या सीटवर बन्यापासून अंतर राखून रिव्हॉल्वर रोखून बसलो होतो. थोड्या वेळाने आमच्या मागे एक कार येत असल्याचं मी पाहिलं आता इथून पुढं मी आणि माझं नशीब. पाठीमागची कार जवळ येत होती हे पाहून बन्यान स्पीड वाढवला आता गाडीचा वेग ताशी १०० च्या पुढे गेला होता. ते पाहून मागच्या कारने देखील आपला वेग वाढवला. आमच्यातलं अंतर क्षणाक्षणाने कमीकमी होत होतं. आता आमची गाडी थोड्याच वेळात ब्रिजवर पोचणार होती. बन्याने आणखी स्पीड वाढवला. पण त्याही पेक्षा वेग पाठीमागच्या कार ने वाढवला आणि बघता बघता गाडी आमच्या जवळून समांतर धावायला लागली. मी स्वतःला दोन सीटच्यामध्ये झोकून दिलं. दुसऱ्या क्षणी रिव्हॉल्वरमधून धडाधड गोळ्या सुटल्या आणि काय घडतंय हे कळायच्या आत आमची कार पुलाच्या कठड्याला धडकली आणि स्पीड जबरदस्त असल्यानं कठडा तोडून खाली कोसळली. सुदैवानं खाली पाणी होतं. आमची फियाट पाण्यात बुडाली मी ताबडतोब पाठीमागचा दरवाजा उघडला. (कुठल्यातरी हॉलिवूड सिनेमात असाच सिन पहिला होता त्यावेळी तो हिरो कसा बाहेर पडतो हे पहिल्याच आठवलं. तेच आता इथं माझ्या उपयोगाला आलं. बन्या केव्हाच स्वर्गात पोचला होता. मी दोन सीटच्या मध्ये झोपलो होतो तेव्हा मला तिथं एक बॅग दिसली होती. मी ती माझ्या सोबत घेतली आणि पोहत पोहत पाण्याच्या बाहेर आलो. वेळ संध्याकाळची असल्यानं आणि दिवस थंडीचे असल्यानं अंधार लवकर पडला होता, ज्याचा फायदा मला काठावरून कुणाच्याही दिसण्यात न येता निसटायला झाला. काही क्षणात किती किती काय काय झालं होतं आणि मी मरणाच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलो होतो. तू ही सच्चा दाता साई . 'तेरी लीला किसी समझ में न आई . इतकंच नाही तर आता माझ्या जवळ आयुष्यात कधी ही मिळाला नसता इतका पैसा आला होता. ज्याचा मी कुणाला ही हिशोब द्यायचा नव्हता. तात्या काय किंवा बन्याची माणसं काय कुणी ही हाच विचार करणार होतं की मी काय किंवा पैशाची बॅग काय सगळं गंगेला मिळालं होतं.

माझं मात्र ड्रीम लाईफ आता खऱ्या अर्थानं सुरु झालं होतं .

--शेवट ---