मनोगत
नमस्कार वाचनप्रेमिंनो, मातृभारतीने केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. यांच्यामुळेच मला वाचकांपर्यंत पोहोचता आले. आज वाचन संस्कृती संपत चालली आहे, असे सगळीकडे चर्चा असताना मातृभारतीची ही साहित्य चळवळ वाचन संस्कृतीला उभारी देणारी आहे. त्यामुळे मातृभारतीचे सहस्र आभार...
या कथेची पार्श्वभूमी जरी वास्तविक असली, तरी या कथेचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. ही पूर्णपणे एक काल्पनिक कथा आहे. आशा आहे आपणा सर्वांना ही कथा आवडेल... काही चुका आढळल्या तर जरूर कळवा...
पुस्तक वेड्यांना समर्पित...
"द पॅरासाइट"
लेखक : सूरज काशीनाथ गाताडे
क्रॅश्श्श्श्श....!!!
क्रॅश...
सर्वांच्या नजरा स्पेस सेंटर मधील मोनिटर्सवर...
पण कोणालाच काही समजेना की काय झालंय...
आणि काही क्षणांच्या शांततेनंतर;
"सर, निओ वरून मेसेज आलाय. स्पेस शटल व अस्ट्रोनोट्स ठीक आहेत. पण प्रॉब्लेम हा झालाय, की स्पेस शटल चंद्रावर जाण्याऐवजी दुसऱ्याच एका ठिकाणी पोहोचलंय... मेबी एखादा नवीन उपग्रह..." एका एस्ट्रोनोमरने चेअरमनला सूचित केले.
"शुद्धीत आहात ना शिंदे? पृथ्वीला एकच उपग्रह आहे हे ध्यानात आहे ना तुमच्या? स्पेस शटल दुसऱ्या ग्रहावर कसं पोहोचेल? काही कॅलक्युलेशन्स तर चुकली नाहीत?"
"कॅलक्युलेशन्स वेअर ओके. त्यात काही गडबड झालेली नाही. पण नवीन ग्रहाबद्दल मी खरं तेच बोलतोय सर... ही पहा आपल्या निओनं पाठवलेले फोटोज... चंद्र ऑर्बिटमधून अचानक हललाय आणि त्या जागी कोणता तरी दुसराच एक ग्रह अचानक जागा घेऊन प्रस्थापित झालाय."
"व्हॉट नॉनसेन्स! आपण दुसऱ्या कोणत्या स्पेस एजन्सीज कडून कंफर्मही करू शकत नाही. विचारले तर म्हणतील हे लोक भांग पिऊन स्पेसशीप उडवतात की काय? जवळचं प्रक्षेपणही यांना नीट जमलं नाही. आधीच आपली प्रगती सगळ्यांच्याच डोळ्यांत सलते!"
"डोन्ट वरी सर. अमेरिकेच्या टेलिस्कोप्सनेही हे कंफर्म केलंय."
"फाईन. शटलमधील दोघांना पण सतत संदेश पाठवून अपडेट्स घेत रहा. त्यांना तेथे काही हाती लागतंय का बघू. तो प्लॅनेट एक्झामिन करायला सांगा त्यांना! जर हा खरंच नवीन ग्रह किंवा उपग्रह असेल तर भारत पहिला असेल ज्याने त्याचा शोध लावला आहे. आणि तेही त्याच्या सरफेसवर पाय ठेऊन! आज पर्यंत अशा प्रकारे कोणताच ग्रह शोधण्यात आला नाही! विल मेक अ ब्लास्ट!"
हे बोलत असताना चेअरमनचे डोळे चमकले, पण त्यांना हे माहिती नव्हतं, की खरंच एक मोठा ब्लास्ट होणार आहे...
सतरा दिवसांपूर्वी...
भारताची चांद्रयान मोहीम...
असे तर भारताने आतापर्यंत शेकडो उपग्रह अंतराळात सोडले आहेत. २२ ऑक्टोबर २००८ साली लॉन्च केलेले 'चंद्रयान १' अत्यंत यशस्वी झाले आहे. कोणी लावू शकले नाही असा चंद्रावर पाणी असल्याचा शोध पण 'इस्रो'च्या 'चांदयान १' ने लावून खगोलशास्त्राला नवी दृष्टी व कलाटणी दिली. २५ सप्टेंबर २००९ रोजी नासा कडूनही या गोष्टीची पुष्टी करण्यात आली. चंद्रयान १ च्या शोधाला पुष्टी देत नासाच्या मून मिनरलोगॉजी मॅपर (एम ३) ने हायड्रॉक्झिअल अणूंना चंद्राच्या पृष्ठभागावर आणि दगडांवर शोधून काढले.
५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताने प्रक्षेपित केलेल्या मंगळयानानेही आपली कामगिरी चोख पार पडली आणि तेही प्रथम प्रक्षेपणात. जे आजवर पहिल्याच प्रयत्नात इतर कोणालाही जमले नाही. मंगळयान (मास ऑर्बिटर मिशन) ने हे दाखवून दिलं, की भारत कोणत्याच प्रगत राष्ट्रापेक्षा तंत्रज्ञानात कमी नाही. मंगळयान पाठवून भारताने 'मंगळयान मोहीम' ही आशिया खंडातील पहिलं मार्स मिशन ठरवली आहे. आशियातील दुसरा कोणताही देश अजून मंगळापर्यंत पोहोचू शकला नाही. हे मिशन त्याच्या सर्व प्राथमिक आणि वैज्ञानिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी झाले, जे तंत्रज्ञान प्रदर्शित करणे आणि मार्स आणि त्याचे वातावरण दोन्हीचे आकृतिबंध अभ्यास करणे हे होते. त्याच्याकडे ६ महिन्यांचा नियोजनबद्ध मिशन कालावधी होता, परंतू हे पुढे ३ वर्षांपर्यंत चालले! तसेच, नासाच्या 'MAVEN मिशन' व भारतीय मंगळयानची तुलना करताना बघितले, तर मॅव्हनची इन्व्हेस्टमेंट $ ६७२ दशलक्ष यूएस डॉलरची आहे, तर एमओएम केवळ $ ७४ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे मंगळयान मिशनला नासाच्या मॅव्हन मिशनपेक्षा केवळ ११% इतका खर्च आला.
पण आताची ही मोहीम जरा वेगळी आणि कठीण होती. खगोलशास्त्रात उत्तुंग उंची गाठूनही आजचे हे उड्डाण जरा जोखमीचेच होते. सर्व सायंटिस्टसच्या चेहऱ्यावर उत्सुकता, उत्साह या सोबत जरा भीतीही होतीच. 'निओ चंद्रयान' या नांवाने आज नवीन यान आकाशाकडे उंचावणार होते. चंद्रयान मिशनचा हा पुढचा टप्पा होता आणि या यानातून भारत पहिल्यांदा 'मानव' अंतरिक्षात पाठवणार होता...
सगळी तयारी तर उत्तम रित्या पार पडली होती. दोन दिवसांपूर्वी यानाचे काऊंट डाऊनही चालू झाले होते.
शेवटची अगदी काही सेकंदच बाकी होती. सेंटरसह स्पेस शटल मधील वातावरणही तणावात होते.
तरी शटल मध्ये हजर असलेल्या आन व सुखविंदर यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता... आणि का नसणार? भारतातील ते पाहिले नागरिक होते जे चंद्रावर पाय ठेवणार होते. लहान मुलांना खेळायला एक मोठे मैदान मिळाल्यासारखे त्यांना झाले होते.
"आख्छी..."
"काय झालं सुखी? शिंकतोयस का?"
"सर्दी झालीये यार!"
"अरे मग फिजिशियननी सेंटरला तुझा क्लिअर रिपोर्ट कसा काय दिला?"
"मीच डॉक्टरला मॅनेज केलं. आजारपणामुळं मला ही गोल्डन अपॉरच्युनिटी सोडायची नव्हती. हा हा!"
"इंडियन विल बी इंडियन! हं! मग कितीची ब्राईब दिलीस?"
"आपल्या भारतात पान सुपारीवर सुद्धा काम भागतं!" सुखविंदर गालातल्या गालात हसत म्हणाला.
"पण तुला सर्दी झाली कशी? ट्रेनिंग वेळी तर ठीक होतास."
"स्पेस एनवायर्नमेंटची सवय व्हावी म्हणून आपण पाण्यात ट्रेनिंग केलं ना, तेव्हा पासूनच. पण मी लपवून ठेवलं. नाही तर मला डिस्क्वालिफाय केलं असतं. आणि पहिल्यांदा चंद्रावर जाण्याचा मान माझ्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी मिळाला असता!"
"काय पण माणूस आहेस यार तू! तुझ्या इच्छेसाठी संपूर्ण मिशनला स्टेकला लावलंस!"
"तू मला बोलू नको. प्रत्येक जण हेच करतो. तुला पण जेव्हा निकड वाटेल, तेव्हा तूही इतर लोकांना स्टेकला लावायला मागं पुढं पाहणार नाहीस."
"आय विल नॉट!"
"हं! विल सी!"असो. काऊंट डाऊन संपत आलं आहे. लेट्स फ्लाय हाय!"
"याह!"
सेंटरमध्ये -
सर्व जण एक मुखानं काऊंट डाऊन करत होते...
दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक. एग्निशन!
आणि निओ चंद्रयान श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून अंतरळाकडे झेपावलं...
आठ दिवसांनी...
"झोप नाही लागत?"
"नाही यार... इथून पृथ्वी इतकी सूंदर दिसत असताना झोप कुणाला लागेल सुखी!?"
"खरंय तुझं आन. भारत पण बघ ना किती सूंदर दिसतोय. तुला आठवतंय... इंदिरा गांधींनी राकेश शर्मा यांना विचारलं होतं, की वरून भारत कसा दिसतोय, तेव्हा ते काय म्हणाले होते?"
"कोणताही भारतीय त्यांचे उद्गार कसा विसरू शकतो सुखी? ते म्हणाले होते,
"सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा!" दोघे एकत्रच म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते.
"हो. ते खरंच म्हणाले होते. पण आता आपल्याला चंद्रावरून भारत बघण्याची संधी मिळाली आहे. नाही!?"
"हो. खोटं बोलून."
"तू अजून त्यातच आहेस? फरगेट अबाउट इट यार."
शेवटी काहीच न बोलता आन अंतरिक्षातील शांत, गूढ, अद्भुत देखाव्याकडे पाहू लागला. सुखविंदरचे सारे ध्यानही अंतराळात लागून राहिले.
फॉल्स लँडिंग...
कोकपिटमध्ये -
"रेडी टू लँडिंग!"
स्पेस शटल चंद्राच्या ऑर्बिट पासून काही अंतरावर असतानाच अचानक...
अंतराळात -
एक नवीन ग्रह तिथे प्रकट झाला! आणि चंद्राला बाजूला ढकलून त्याच्याच ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झाला. त्याच बरोबर स्पेस शटल सुद्धा त्या ग्रहाकडं खेचलं जाऊ लागलं...
कोकपिटमध्ये -
"व्हॉट द हेक! हे काय होतंय? चंद्रानं आपल्याच ऑर्बिटमध्ये राहून जागा बदलली!!! आणि कोणता नवाच उपग्रह चंद्राच्या ऑर्बिटमध्ये प्रकट झालाय! हाऊ इज इट पॉसिबल?"
"एवढंच नाही आन. तो उपग्रह आपलं शटल त्याच्याकडं खेचतोय..."
"ऑल कंट्रोल्स आर फेल..."
"थँक गॉड! सेंटरशी तरी कॉन्टॅक्ट होतोय..."
आज
अपरिचित...
स्पेस शटल त्या अचानक समोर आलेल्या ग्रहावर आदळले.
"सुखी तू ठीक आहेस?"
"आह! हो जास्त काही झालं नाही... कंट्रोल रुमशी काही संपर्क?"
"होय. मेसेज पाठवलाय. सॅटेलाईट ही लवकरच लॉन्च होईल. ग्रह एक्झामिन करण्याचे आदेश आहेत."
"पण कसं शक्याय? आपली सारी इक्विपमेंट्स चंद्राच्या एनवार्नमेंट नुसार डिझाईन केली आहेत. तू इथे काम करतील?"
"नो आयडिया. प्रयत्न तर करावाच लागेल. अदर वाईज विल स्टक हिअर..."
सॅटेलाईट त्या ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये इन्स्टॉल केलं गेलं. आणि मून रोव्हर ग्रहावर सोडला गेला.
आतापर्यंत आन आणि सुखविंदर यांच्या हे लक्षातच आलं नव्हतं, की ते कशावर उतरलेत.
हे पाणी आहे का? की दुसरंच काही? बाहेर सोडलेला रोव्हर त्यामध्ये बुडून गेला होता.
"आपण नेमके कशावर लँड झालोय. बाहेर सगळं लिक्विडच दिसतंय..."
"थँक गॉड की आपण सॉलिड सरफेसवर आहोत..."
"एक... एक मिनिट. रोव्हरकडून काही इमेजेस आणि डेटा येत आहे..."
"इट्स एचसीएल!"
स्पेस सेंटर...
"सर, निओ कडून अजून काही देटा मिळालाय... दॅट प्लॅनेट इटसेल्फ इस ए लिविंग थिंग!"
हे ऐकून चेअरमनचे डोळे पुन्हा चमकले.
"आर यू शोअर?"
"येस सर!"
"आणि काही लिविंग ट्रेसेस?"
"नो सर. "
"आपल्या एस्ट्रोनोट्सनी पाठवलेल्या मेसेज नुसार तेथे अमोनियाच्या ढगांचे मोठे प्रमाण आहे. तो ग्रह २% न्यूक्लियस व ९८% गॅस्ट्रिक ऍसिड पासून बनलाय. ज्यात त्याच्या अनुपातात १% हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत पोटॅशिअम क्लोराईड, सोडियम क्लोराईड व पाणी आहे. बेसिकली इट्स अ ब्रेन विथ स्टमक. सगळ्या देशांच्या स्पेस सेंटर्सचे ध्यान त्या ग्रहानं वेधून घेतलंय... त्याची ग्रॅव्हीटेशनल व मॅग्नेटिक फोर्स चंद्राच्या दुप्पट आहे आणि म्हणूनच त्याच्या अचानक येण्याने चंद्र बाजूला सरकला. चिंतेची बाब म्हणजे त्याची ग्रॅव्हीटेशनल व मॅग्नेटिक फोर्स वाढतीए. अशाने चंद्र त्याचे ऑर्बिट तोडून बाजूला पडेल आणि तो पृथ्वीवर आदळण्याची सुद्धा शक्यता आहे..."
आपल्या सायंटिस्टने बोलून दाखवलेली भीती ऐकून चेअरमनचे चमकलेले डोळे काळजीने विस्फारले...
"आता काय करायचं?"
"पण सर एखादा प्लॅनेट कसा लिविंग स्टेट मध्ये असू शकतो?"
"असतो शर्मा, असतो. आपली पृथ्वी; ही पण लिविंग प्लॅनेटच तर आहे. तिचं रिप्रोडक्टिव्ह असणं हे तिच्या जिवंत असण्याचंच तर लक्षण आहे. आपली पृथ्वी झाडांच्या माध्यमातून ब्रिदिंग आणि तिचं खाणं पिणं पण करते. पोल्युशनचा सुद्धा तिच्यावर तसाच दुष्परिणाम होतो, जसा आपल्यावर होतो. कळलं? तिचा जन्म झाला, आता ठराविक काळानं मृत्यूही आहे. आणि आपल्या मूर्खपणामुळं आपण तिचा जीवनकाळ अधिकच कमी करत चाललोय..." हे बोलत असताना चेअरमन यांच्या डोळ्यांसमोरून माणसाने केलेल्या दुर्दशेची असंख्य चित्रे तरळून गेली.
इतक्यात एक मेल चेअरमनच्या स्क्रीनवर ब्लिक झाला. तो गडबडीने त्यांनी वाचला,
"रशियन स्पेस सेंटर मधून मेल आलाय. त्यांचं म्हणणं आहे, की तो ग्रह काय आहे हे ते जाणतात... आणि त्यांनी तात्काळ आपल्या फॉर्मर चेअरमन बाल पिल्लई यांना संपर्क करण्यास सांगितले आहे. ते आपल्याला या बद्दल सविस्तर माहिती देतील असे त्यांचे म्हणणे आहे..."
लिविंग प्लॅनेट...
"रोव्हर पूर्णपणे डॅमेज झालाय. एचसीएल मध्ये वितळून गेलाय. आता आपल्यालाच बाहेर पडावे लागेल."
"आर यू इंसेंन?" आपण बाहेर पडलो तर आपली हाडेही शिल्लक राहणार नाहीत!" शटलपण सॉलिड सरफेसवर आहे म्हणून बरंय. नाही तर कधीच या ग्रहानं आपल्याला पचवूनही टाकलं असतं! डोन्ट बी रिडिक्युलस आन!"
"का? तुलाच आऊटर स्पेस बघायचं होतं ना?"
"पण..."
"आपल्याला परतीचा मार्ग शोधवाच लागेल. नाही तर आपण इथेच मरू! तू विसरतोयस की हा ग्रह जिवंत आहे. आपण खडकावर नाही, तर एखाद्या सेलवर लँड झालोय आणि जे गॅसस्ट्रिक ऍसिड आहे ते ग्रहावर येणाऱ्या प्रत्येक वस्तूला पचवत चाललंय..."
"पण बाहेर जाऊन काहीच साध्य होणार नाहीये! शिवाय बाहेरचे एचसीएल आपल्याला भस्म करून टाकेल. अमोनियामुळे शरीराची, डोळ्यांची लाही लाही होईल... बाहेर पाय टाकताच अमोनिया आपला जीव घेईल. आपण चंद्रावर जाण्यासाठी तयारी केली होती. आपली सगळी इक्विपमेंट्स इथं निकामी आहेत. जस्ट लेट द कॅप्सूल लाँच अँड गो बॅक!" सुखविंदर किंचाळला.
"सेंटर वरून ऑर्डर आहे एक्झामिनसाठी. आपल्याला पाळावीच लागेल. आपण एचसीएल मध्ये उतरायचं नाही. जो पर्यंत आपल्याकडं आपले स्पेससुट्स व ऑक्सिजन सप्लाय आहे तो पर्यंत आपल्याला भीती नाही..."
"हो पण कधी पर्यंत?..."
शीत युद्ध...
"१९४५ - ९१ च्या दरम्यानचा काळ..."
पिल्लईनी काही रहस्यांचा उलगडा करण्यास सुरुवात केली. कसलीही पूर्व सूचना न देता पिल्लईना त्यांच्या राहत्या घरून तडख श्रीहरिकोटाला आणण्यात आलं होतं.
"पाश्चिमात्य राष्ट्र आणि सोव्हिएत युनियन मधील शीतयुद्धाचा काळ. प्रत्येक देश स्वतःला तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नात होते. पण इतकंच नाही, या दरम्यान नवनवीन हत्यारे बनवली जात होती. मग ती मेकॅनिकल असोत, केमिकल असोत किंवा मग बोयोलॉजीकल असोत...
यातच सोव्हिएत युनियनच्या काही सायंटिस्ट्सनी एक जीव बनवला... 'स्त्रीला पॉईंट ओ वन' त्याचे नांव. वास्तविक हा परजीवी वेपेन म्हणून बनलाच नव्हता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला एक जीव तयार करणे इतका एकच उद्देश त्याच्या मागं होता, पण हळूहळू त्या ऑरगॅनिसमचे दुष्परिपाम दिसू लागले. एखाद्या दुसऱ्या जीवाला खाऊन टाकण्याची त्याला चटकच लागली. सॅम्पल सर्व पॅरासाइट्स त्याने संपवून टाकले. आणि एकटाच टेस्ट ट्युबमध्ये जिवंत राहिला. आणि सायंटिस्ट्सना त्याचा वापर बायोलॉजीकल वेपेन म्हणून अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध म्हणजे ब्रिटन आणि फ्रांस विरुद्ध करण्याची कल्पना सुचली. म्हणून त्याचे नांव 'स्त्रीला' म्हणजे रशियन लँग्वेजमध्ये 'बाण' असे ठेवण्यात आले.
पुढं त्या पॅरासाइटची भूक इतकी वाढली, की त्यानं लॅब मधील सर्व लिविंग व नॉनलिविंग ऑब्जेक्टस् खाण्याचा सपाटाच लावला. आणि त्यामुळं त्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होत गेला. मग त्याला आटोक्यात आणण्यासाठी एक चेंबरमध्ये बंद करून ठेवले. १९९१ ला शीतयुद्धाची समाप्ती झाल्यानंतर व सोव्हिएत युनियन अलग झाल्यानंतर त्या पॅरासाइटचं करायचं काय असा प्रश्न रशियापुढं पडला. त्याला आळा घालणं गरजेचं असल्यानं मग त्याला आऊटर स्पेस मध्ये पाठवण्याच ठरवलं. आणि या मिशनला कोणी सिरियस्ली घेऊ नये म्हणून त्यावेळी इतके प्रभावी नसणाऱ्या आपल्या सेंटरची त्यासाठी रशियाकडून निवड करण्यात आली आणि गुप्तपणे हे ऑपरेशन करण्यात आले. हे आपले स्पेस मिशन आहे असे समजून इतर कोणी देशांनी त्याकडे इतके लक्ष दिले नव्हते. पॅसाईटचे लाँचिंग झाल्यानंतर त्या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्वच सायंटिसट्सचे ब्रेन वॉशिंग करण्यात आले. त्यामुळं त्या मिशनशी रिलेटेड कोणालाच या संदर्भात काही लक्षात नाहीये. ते सर्व काही विसरून गेले आहेत. आपले ब्रेन वॉश केले जाणार आहे हे मला आधीच समजलं होतं. म्हणून मी लाँचिंग नंतर लगेच येथून पळ काढला आणि अमेरिकेत जावून लपलो. मला अंदाज होता, की रशिया आपल्याला अमेरिकेत शोधून नवीन वादाला तोंड फोडण्याचं धाडस इतक्यात करणार नाही. मग २००१ ला मी भारतात परतलो आणि पुण्यात राहू लागलो..."
"तो पॅरासाइट दिसायला कसा होता?" चेअरमननी त्यांचं बोलणं मधेच तोडत विचारलं.
"त्याला स्पेसिफिक असा आकार नव्हता. इट वॉज लाईक एन अमिबा!"
हे ऐकल्यावर शिंदेने घाईने निओ कडून आलेला डेटा व फोटोज् त्यांना दाखवले. ते फोटोज् व इन्फॉर्मेशन बघून पिल्लई अतिशय घाबरले.
"इट्स सो बिग... हा असाच वाढत राहिला, तर पृथ्वी सुद्धा गिळंकृत करेल..."
"पण सर हा स्पेसमध्ये जिवंत कसा काय राहू शकला?" चेअरमननी प्रश्न केला.
"जसं की मी मघाशी म्हणालो, याच्याकडं आर्टिफिशल इंटेलिजन्स आहे. त्याला असाच डिझाईन केला होता, की कोणतंही एनवायर्नमेंट अडॅप्ट करण्याची क्षमता त्याच्यात येईल."
"असं आहे, तर त्याला स्पेसमध्ये का पाठवला?"
"स्पेसमध्ये तो मरून जाईल असा निष्कर्ष होता, पण दिसतंय, की त्यानं स्पेस एनवायर्नमेंटसुद्धा अडॅप्ट केलंय."
"पण मग त्याचं रूपांतर ग्रहात कसं झालं? तुम्हाला काही कल्पना?" आणखी एका शास्त्रज्ञाचा पिल्लईला प्रश्न.
"कसंय... आम्हाला तर त्याला आपल्या मिल्की वेच्या बाहेरच पाठवायचा होता, पण तशी टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती. म्हणून मग आम्ही त्याला आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेरपर्यंतच पोहोचवू शकलो. कदाचित तिथं त्याला कोणता तरी प्लॅनेट सापडला असणार आणि त्यानं त्याचं एनवायर्नमेंट अडॅप्ट करून त्या प्लॅनेटला आपला होस्ट बनवलं असणार."
"मग आता त्याचं इथं प्रकट होण्यामागचं कारण काय असेल?" आणि एकाचा प्रश्न.
प्रश्नांचा भडिमार आता पिल्लईंना असह्य झाला. त्यांनाच इतकी भीती वाटत होती, की काय करावं हे सुचत नव्हतं,
"मिच्च! आता ते मी कसं काय सांगू शकणार? मलाच भीती आहे, की त्याचा मोटिव्ह काय असेल!"
"त्याला चंद्राची आणि पृथ्वीची टक्कर तर करायची नसेल ना?"
"आय डोन्ट नो..."
मेसेज...
"या गोलोयडेन्..."
"म्हणजे?"
"माहित नाही. ग्रहाकडून आलेल्या साऊंड वेव्हजना डिकोड केल्यानंतर हे शब्द मिळालेत." आन म्हणाला.
"हे सेंटरला पाठव. बघू त्यांना काय कळतंय का?"
"हो! त्याच कामात आहे."
"आन..." सुखविंदरची आनला घाबरलेली हाक.
आननं स्क्रीनवरून नजर काढून सुखविंदरकडं पाहिलं,
"हं!"
"तू अजूनही शोअर आहेस बाहेर जाण्यासाठी?"
"मेसेजेसचं काय होतं बघू. नाही तर जावंच लागेल..." आननं आपला निर्णय सुनावला.
डिकोड...
"तो मेसेज रशियन सेंटरला पाठवा. ते सांगू शकतील याचा अर्थ."
"असं तुम्हाला कशावरून वाटतं पिल्लई सर?"
"सिम्पल. साऊंड वेव्हजचं रूपांतर शब्दात होत असेल, तर नक्कीच त्याचा काही तरी अर्थ असणार. तो पॅरासाइट रशियन ओरिजिन असल्यानं कदाचित त्यांनं रशियन लँग्वेज मध्ये काही मेसेज पाठवला असेल तर? त्याला तोंड नाही. साहजिकच तो साऊंड वेव्हजमधेच डायलॉग करणार. पाठवून तर बघा. उत्तर मिळालं, तर चांगलंच आहे."
"सर सांगतात तसं रशियन स्पेस सेंटरला मेसेज पाठवण्याची तयारी करा." चेअरमननी आपल्या ऑपरेटर्सना ऑर्डर दिली.
"सर आणखी एक संदेश आलाय..."
"बोला शिर्के!"
शिर्केनी वाचून दाखवले,
"या सुबुराईयेसेस्त्स वाशु प्लॅनियेतो इ येत्त बुजेत माया मिस्त्स!"
"कंफर्म इट्स रशियन! यू मे सेंड द मेसेज!" पिल्लई म्हणाले.
काहीवेळाने...
रशिया कडून मेसेजचं उत्तर आलं...
Massage 1 -
Я голоден
(YA goloden)
It's meaning - "I am hungry"
Massage 2 -
Я собираюсь съесть вашу планету И это будет моя месть!
(YA sobirayus' s"yest' vashu planetu I eto budet moya mest'!)
Meaning - "I'm going to eat our planet and this will be my revenge!"
Greetings from Russia,
You guys are only hope of our Planet. Your astronomers are already there. They should have to do something to stop 'Strela.01'. We will greatful to you, if you do that... Otherwise we Raussians will responsible for our demolition. And this would be a disgraceful for us. Please save us from that Dishonourable event... Here I'm not talking as a Russian President. But It's a humble request from your Friend...
Your faithfully,
Alexander Ivanov.
(अनुवाद:
रशिया कडून अभिवादन,
आपणच आपल्या ग्रहाची एकमेव आशा आहात. आपले खगोलशास्त्रज्ञ आधीच तेथे आहेत. 'स्त्रीला.०१'ला थांबविण्यासाठी आता त्यांनाच काही तरी करावे लागेल. आपण तसे केल्यास आम्ही आपले खूप आभारी राहू... नाहीतर आम्ही रशियन्स आपल्या विध्वंसासाठी जबाबदार ठरू. आणि हे आमच्यासाठी लज्जास्पद ठरेल. त्या लाजिरवण्या घटनेपासून आम्हाला वाचवा ... येथे मी एक रशियन राष्ट्रपती म्हणून बोलत नाही. तर आपल्या मित्राची ही एक विनम्र विनंती आहे...
आपला विश्वासू,
अलेक्झांडर इवानोव.)
"पहिल्या मेसेजचा अर्थ आहे, 'मला भूक लागली आहे!' आणि दुसऱ्या मेसेजचा अर्थ आहे, 'मी आपला ग्रह खाऊन टाकणार आहे आणि हा माझा बदला असेल!"
"रशियन गव्हर्नमेंटची विनंती आहे. आपण या प्रकरणात काही तरी करावं. अशी त्यांनी याचनाच केली आहे." शिर्केनी आलेल्या मेसेजचा संक्षेप ऐकवला.
एव्हाना पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही चेअरमन यांच्या केबिन मध्ये येऊन बसले होते.
"अमेरिका त्या ग्रहावर अणुबॉम्ब टाकण्याच्या विचारात आहे. तशी तयारीही त्यांनी चालू केली आहे. यूकेचा पण त्यांना पाठिंबा आहे. यूएन कडून तशी परवानगीही काढण्यात आली आहे." पंतप्रधानांनी त्यांना माहीत असलेली माहिती सांगून टाकली.
"तरी बरंय. ही भयानक बातमी अजून जगभरातील सामान्य लोकांपासून आणि मीडियापासून लपून आहे. याबद्दल काहीही रिपोर्टिंग न करण्याचे आदेशच जगभरातील सर्व मीडियाला त्या त्या गवर्नमेंट्स कडून देण्यात आले आहेत. हा एक स्पेस एक्सपेरिमेन्ट आहे आणि तो उपग्रह मानवनिर्मित आहे आणि याचा काही दुष्परिणाम होणार नाही अशी अफवा नासा कडून पसरवण्यात आली आहे. नाही तर काय अराजकता माजली असती याची कल्पनाच न केलेली बरी. चंद्र रोजच्या जागेवर दिसत नाही आणि त्या सोबत नवीन काही तरी दिसतंय हे काही दिवसांपासून लोकांच्या लक्षात आलंय, पण ही एवढी गंभीर समस्या असेल हे अजून तरी कोणाच्या लक्षात आलेलं नाही ते बरंय. नाही तर पृथ्वी संपेल या भीतीनेच आतापर्यंत हजारो लोकांनी आत्महत्या केल्या असत्या... गोंधळ गडबड उडाली असती..." राष्ट्रपतींनी नाराजीच्या सुरात त्यातल्या त्यात चांगली बाब बोलून दाखवली...
"काय मूर्ख आहेत! तो ग्रह अणुबॉम्बने उडवला, तर आपल्याला सुद्धा धोका आहे हे या लोकांच्या लक्षात कसे येत नाही! यूएननी तर सर्व देशांना ऑर्डरच दिलीये, की आपापले सर्व मिसाईल्स तयार ठेवावेत आणि एकाचवेळी ते त्या ग्रहाच्या दिशेने लाँच करावेत..." पंतप्रधानांसोबत आलेल्या परराष्ट्रमंत्रीनी माहिती पुरवली.
"पण एवढ्या दूर जाण्यासाठीची मारकशक्ती प्रत्येकाची असेल?" त्यांच्या सोबतच्या रक्षामंत्रीनी प्रश्न केला.
"नसणारच. म्हणूनच तर भीती आहे, की त्या मिसाईल्स भरकटतील आणि पृथ्वीवरच परत येऊन आदळतील. या लोकांचा हा निर्णय त्या ग्रहापेक्षाही घातक आहे..." राष्ट्रपती म्हणाले.
"या रशियन्सनी काय घोळ घालून ठेवलाय काही कळत नाही... चूक त्यांची आणि जबाबदारी आपल्यावर सोपवून रिकामे झालेत! त्या सायंटिस्ट्स संदर्भातही त्यांनी काही माहिती दिली नाही, ज्यांनी तो पॅरासाइट बनवलाय. आणि अपेक्षा करताहेत आपण काही उपाय करावा याची." पंतप्रधानांनी आपला वैताग व्यक्त केला.
"सॉरी सर मध्ये बोलतोय." पिल्लई बोलले,
"पण तसे ते सांगूही शकणार नाहीत. कारण त्या प्रोजेक्ट मध्ये इन्क्लुड सगळ्या सायंटिस्ट्सना आधीच ठार मारलंय. प्रोजेक्ट संदर्भातील सर्व फाईल्स आणि एनालायझिंग रिपोर्ट्सही त्याचवेळी नष्ट केली गेली आहेत. त्यांच्याकडून पुन्हा असा काही जीव तयार होऊ नये म्हणून हे सगळं करण्यात आलं होतं. आत्ता त्यांच्याकडे काहीच क्लू नाही यासंदर्भात. त्यांच्या स्पेस प्रोग्रॅममध्ये इन्क्लुड असलेल्या आपल्या सायंटिस्ट्सनाही मारण्याचा रशियन गव्हर्नमेंटचा आग्रह होता त्यावेळी, पण आपल्या त्यावेळच्या पंतप्रधानांनी त्याला विरोध केला म्हणून त्या सायंटिस्ट्सचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना सोडून देण्यात आलं."
"मग आपण काहीच करू शकणार नाही का?" पंतप्रधान अधिकच वैतागले.
"एक चान्स घेऊ शकतो...!"
"बोला पिल्लई!" पंतप्रधान उत्तेजित झाले.
"मला बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट असल्यानं आपले व रशियन्सचे जॉइंट ऑपरेशन चालू होते, तेव्हा मी त्या पॅरासाइटची संपूर्ण केस स्टडी केली होती. त्यात मला कळलं होतं, की रशियन सायंटिस्ट्सनी दुसऱ्या कोणत्याही नोर्मल पॅरासाइटशी त्याचा कॉन्टॅक्ट होऊ दिला नव्हता. इव्हन एखादा सायंटिस्ट जर आजारी असेल, तर त्याला प्रोजेक्ट मधून डिस्क्वालिफाय केलं जायचं!"
पण तुम्ही तर म्हणाला होता, की त्याने इतर पॅरासाइट्सना खाऊन टाकले होते..." चेअरमननी शंका व्यक्त केली.
"हो पण ते नॉर्मल नव्हते. त्याने खाल्लेले पॅरासाइट त्याच्या सोबतच आर्टिफिशली तयार केलेले होते!"
"तुम्हाला यातून नक्की काय सांगायचंय? या माहितीचा आपल्याला नक्की काय उपयोग होईल?" राष्ट्रपतींनी पिल्लईना प्रश्न केला.
"आपण त्या पॅरासाइटमध्ये कोणत्याही प्रकारे एखादा दुसरा पॅरासाइट म्हणजे बॅक्टेरिया किंवा एखादा व्हायरस इंजेक्ट करू शकलो, तर कदाचित काही होऊ शकेल."
"आर यू शोअर डॉक्टर पिल्लई?" राष्ट्रपतींनी विचारले.
"डोन्ट नो सर. बट चान्स तर घ्यावाच लागेल. ज्या अर्थी ते 'स्त्रीला'चा इतर कोणत्याही नॉर्मल पॅरासाइटशी कॉन्टॅक्ट होऊ देत नव्हते, त्या अर्थी त्यामागे नक्कीच काही तरी कारण असणार!"
"बट आऊटर स्पेस मध्ये कोणताही पॅरासाइट ऑर व्हायरस कसा जिवंत राहील. म्हणूनच तर आज पर्यंत इतर कोणताच पॅरासाइट 'स्त्रीला'च्या संपर्कात आला नाही..." चेअरमननी पुन्हा शंका व्यक्त केली.
"एक काम करा. उद्भवलेला धोका अस्ट्रोनोट्सना सांगू नका. ते हबकून जातील. फक्त त्यांना हा उपाय सांगा."
"पण ते तरी स्पेसमध्ये व्हायरस कोठून शोधून काढतील? आणि समजा तुम्ही म्हणताय तसं 'स्त्रीला'चा व्हायरसशी संपर्क आला, तरी आपण हे विसरून चालणार नाही, की 'स्त्रीला' कोणत्याही परिस्थितीला अडॅप्ट करू शकतो." चेअरमननी परत आपली शंका बोलून दाखवी.
"हो. पण त्यासाठी त्याला काही काळ जावा लागेल. या दरम्यान जर व्हायरस त्याचं काम करू शकला तर? आपण पॉसीबीलिटी लक्षात घ्यावीच लागेल. वी हॅव टू टेक द चान्स! आपलं शरीरही चेंज अडॅप्ट करायला वेळ घेतच ना आणि काही काळ आजारीही पडतं. बदलाची सवय होईपर्यंत. हो ना? गप्प बसण्यापेक्षा काही कृती केलेली बरी नाही का?"
"आणि सगळं बिनसलं तर? तुम्ही म्हणताय तसं झालं नाही तर?" रक्षामंत्री अजूनही शंकीत होते.
"अशीही पृथ्वी संपणारच आहे. मग वाचवण्याचा एक प्रयत्न का करू नये?" पिल्लईंनी त्यांच्या मनात आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
"बट इज इट वेरी नेसेसरी टू हेल्प रशियन्स? त्यांनी तर आता आपल्या शत्रू राष्ट्रांशी अलायन्स स्थापित केलेत... देन व्हाय शुड वी?" शिर्के यांनी रशियन राष्ट्रपतींचा मेसेज कळल्यानंतर त्यांच्या मनात घर करून बसलेली त्यांची खदखद समोरच्या मोठ्या माणसांची तमा न बाळगता खूप वेळानंतर आत्ता बोलून दाखवली.
"शिर्के!" जवळच उभ्या शिर्के यांना गप्प करण्यासाठी चेअरमननी हळू आवाजातच त्यांना दटावले.
त्यावर रक्षामंत्रीनीं हात वर करून चेअरमनना थांबवले,
"तुमचा कन्सर्न कळतोय मिस्टर..." रक्षामंत्री म्हणाले.
"चंद्रप्रकाश शिर्के सर." शिर्केनी आपले नांव सांगितले.
"हा शिर्के. आम्हाला समजतंय तुम्ही असं का म्हणताय. तुमची देशभक्ती वाखाणण्याजोगी आणि प्रशंसनीय आहे, पण आता प्रश्न फक्त आपल्या देशापुरता सीमित नाही, तर संपूर्ण जगाचा आहे. आणि त्या जगात आपला भारत देश पण येतो हे आपण विसरून चालणार नाही. आणि आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपली संस्कृती संपूर्ण जगाला एका कुटूंबाच्या सूत्रात बांधते. असं असताना हा त्यांचा प्रॉब्लेम, हा माझा प्रॉब्लेम असं आपण कसं म्हणू शकतो? व्यक्तिगत आपल्यांत कितीही कलह असोत, पण जेव्हा प्रश्न संपूर्ण जगाचा येतो, तेव्हा आपण सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. नाही का?" रक्षामंत्रीच्या या बोलण्याने शिर्के ओशाळल्यागत झाले. संरक्षण खात्यासाठी रक्षामंत्री का योग्य आहेत याची प्रचिती त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिली होती.
"सॉरी सर!" शिर्केनी माफी मागितली.
"नो निड फॉर दॅट!"
"मी मेसेज पाठवण्याच्या कामाला लागतो." शिर्के यांनी कामाची जबाबदारी घेतली आणि ते चेअरमनच्या केबिन मधून बाहेर पडले.
बिट्रेयल...
"काय झालं आन? तू इतका काळजीत का?"
पण सुखविंदरच्या प्रश्नाचं उत्तर आननं दिलं नाही.
"आपल्याला बाहेर जावं लागणाराय का?"
आन परत काहीच बोलला नाही.
"बोल काही तरी!" आनची शांतता सहन न होऊन सुखविंदर किंचाळला.
"तू बरोबर होतास..." आन हताशपणे एवढंच म्हणाला आणि त्यानं आपला स्पेससुट चढवला. आन सुखविंदरच्या दिशेनं चालून आला.
"हे... हे तू काय करतोय?" सुखविंदर आणखीनच घाबरला.
स्पेस सेंटरवरून आलेल्या कमांड नुसार स्पेस शटलमधून स्पेस कॅप्सूल अलग होऊन 'स्त्रीला' वरून अवकाशाच्या दिशेनं झेपावू लागलं. कोणालाच कल्पना नव्हती, की 'स्त्रीला' काय करेल म्हणून व्हायरस इंजेक्शनचे काम पूर्ण झाल्यावर दोघांना परत बोलावून घेण्याचा सर्वांचा निर्णय झाला होता. त्यानुसार तयारी चालू झाली होती. आनने आधीच व्हायरस संदर्भात सेंटरला माहिती कळवली होती. सुखविंदर फिव्हरच्या व्हायरसने इन्फेक्टेड होता.
आणि आनने आपल्याला काय करायचंय याचा पक्का निर्णयही घेऊन टाकला होता... सुखविंदरच्या मात्र काही लक्षात येत नव्हतं...
आनने त्याला गच्च पकडलं. सुखविंदरने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत आनशी झटापट केली...
दोघांमध्ये हतापाई झाली... झीरो ग्रॅव्हीटी मध्ये भांडत असल्यानं दोघांना जास्त इजा तर झाली नाही, पण दोघे थकून मात्र गेले. तशात आनने स्पेससुट घातला असल्याने त्याला हालचाल करण्यात जास्तच बाधा येऊ लागली...
पण आनला नक्की काय करायचं आहे...?
आन स्वतःला सावरत असतानाच सुखविंदरनेही आपला स्पेससुट चढवला आणि आनकडं चालून आला.
दरम्यान आननं स्पेस कॅप्सूलचा दरवाजा उघडला होता.
सुखविंदरने आनला मागून धक्का दिला. आननं स्वतःला सावरलं आणि सुखविंदरच्या पोटात लाथ मारून त्याला न्यूक्लियसच्या दिशेनं फेकून दिलं...
'मला माफ कर मित्रा, पण हा माझा स्वार्थ नाही... आपल्या सगळ्यांचं, आपल्या लोकांचं हित आहे यात... मला माहित आहे; तुला मारून मी सुद्धा इथून सुरक्षित सुटू शकणार नाही... मीही इथंच मरणार आहे...'
सुखविंदरला न्यूक्लियसच्या दिशेनं जाताना पाहून आन मनातल्या मनात पुटपुटला. कॅप्सूलही उंची गाठत होतं आणि आनला 'स्त्रीला'चं संपूर्ण दर्शन होत होतं...
काही वेळाने कॅप्सूलच्या खिडकीतून पाहत असताना आनला 'स्त्रीला' मध्ये विशिष्ठ अशी हालचाल जाणवली... आणि त्याच्या भीतीमध्ये असंख्य पटीने वाढ झाली…
ब्लास्ट!!!
स्पेस कॅप्सूल...
आनच्या डोळ्यांतून आलेलं पाणी गुरुत्वाकर्षण नसल्याने त्याच्या समोर तरंगू लागलं. तो 'स्त्रीला'ला खंड खंड होताना पाहत होता आणि त्याला आपलं भविष्य त्या विस्फोटाच्या आकाशात दिसत होतं...
त्याच प्रकाशात आनचं कॅप्सूलही नाहीसं झालं...
हवाई ऑब्सर्वेटरी...
"शिनिगामी हॅस ब्लास्टेड..." अमेरिकेच्या हवाई बेटावर स्थित ऑब्सर्वेटरी मधून 'स्त्रीला'वर नजर ठेवून असलेला एक जॅपनीज एस्ट्रॉनॉमर ओरडला. पण त्याच्या ओरडण्यात आनंद कसला तो नव्हता... होती ती फक्त भयंकर भीती...
अंतराळात...
'स्त्रीला.01' चा स्फोट झाल्यानं आता असंख्य 'स्त्रेल्की' पृथ्वीच्या रोखाने घुटमळत होते...
पण जास्त काळ तेही आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवू शकले नाहीत. फिव्हरच्या व्हायरसशी संपर्क आला असल्याने ते सर्वही काही वेळातच जळून नष्ट झाले...
आणि पृथ्वी अशा विचित्र संकटातून मुक्त झाली... 'स्त्रीला'चा ग्रॅव्हीटेशनल व मॅग्नेटिक फोर्स नष्ट झाल्यानं चंद्रानंही आपली जागा परत घेतली. हवाई मधल्या त्या जॅपनीज एस्ट्रॉनॉमरची भीती अनाठायी ठरली होती!
इकडे पृथ्वीवर...
सर्व एस्ट्रोनोमर्स, स्पेश स्टेशन्स व ज्या ज्या लोकांना या संकटाबद्दल माहीत होतं. ते सर्व जल्लोष साजरा करत होते आणि ज्यांना या संभाव्य धोक्याबद्दल माहीतही नव्हतं, ज्यांच्या काही गावीही नव्हतं, त्यांचं जीवन नेहमी प्रमाणे चालतं तसं चालू होतं; आहे.
या सगळ्यात ते दोन हिरोज ज्यांनी आपले प्राण देऊन सर्वांची रक्षा केली, त्यांच्या त्यागाबद्दल कोणासह कळू न देता स्पेस प्रोग्रॅम मध्ये चूक झाली आणि त्यांचे प्राण गेले असे सामान्यांना त्यांच्याबद्दल सांगण्यात आले...
आणि ते गरजेचंही होतं; सामान्यांनी त्यांचं आयुष्य निर्धोक जगण्यासाठी...
आन आणि सुखविंदर दोघांनाही मारणोपरांत त्यांच्या 'निओ चंद्रयान'च्या उड्डाणासाठी अशोक चक्राने सम्मानित करण्यात आलं; पण त्यांच्या मुख्य कार्याला मात्र वैश्विक शांतता टिकवून ठेवण्याच्या नांवाखाली सर्वांपासून लपवूनच ठेवलं गेलं...
अनोळखी शब्द:
१) निओ - नवीन (प्राचीन ग्रीक शब्द 'निओस'
पासून निर्माण झालेला व संस्कृत
मधील 'नव' या शब्दाशी साधर्म्य
ठेवणार शब्द)
२) स्त्रीला - 'बाण' या शब्दासाठी रशियन शब्द
२) स्त्रेल्की - 'स्त्रीला'चे अनेक वचन
३) शिनिगामी - 'मृत्यूदेवते'ला जपानी शब्द
(गॉड ऑफ डेथ)