मैत्र..पक्ष्यांचे ..!
मैत्री एक खुप नाजुक आणी तरल भावना ..
मैत्री कोणाशीही असे शकते माणसे ..पशु पक्षी बालके झाडे जंगल ..अगदी कोणाशीही
आज मात्र बोलायचेय तुमच्याशी पक्ष्याशी असलेल्या मैत्री बद्दल .
मुंबईत राहायला गेलो तेव्हा थोडे बावचळून गेलो
एकदम मोठे शहर आणी खुप जास्त आयुष्याचा स्पीड .!
दोन तीन दिवसांनी एक गंमत झाली सकाळी पोळ्या करून झाल्या आणी थोडी कणिक उरली
मग सहज म्हणुन ती खिडकीत ठेवली ..आणी अचानक एका कावळे बाबांचे आगमन झाले
कणिक पटकन चोचीत घेऊन कावळे बाबा गायब ,,
मला नवल च वाटले ..पोळीचे तुकडे किंवा शिजवलेले अन्न कावळे खातात हे पाहिले होते
पण कच्ची कणिक ..??
कावळा या पुर्वी कधी बारकाईने नव्हता पहिला ..
कधीतरी पितरांच्या पिंडाला शिवण्या साठी त्याच्या विनवण्या केलेल्या इतकेच माहित
सोसायटीच्या आवारात एक मोठे पिंपळाचे झाड होते .त्याच्या फांद्या आमच्या खिडक्यांना टेकल्या होत्या
त्यातल्या एका फांदीवर असे हा कावळा ...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोळ्या करताना सहज लक्ष गेले तर बहुधा कालची च कावळे बाबांची स्वारी
खिडकीच्या दांडीवर बसली होती
आणी अगदी मान वाकडी करून आत पाहणे चालले होते ..स्वारीचे
मग सहजपणे मी पण थोडी कणिक खिडकी बाहेर ठेवली .आणी एका सेकंदात ती गायब ..
पुन्हा थोड्या वेळाने स्वारी हजर ..मग परत थोडा कणकीचा गोळा ..
असे दोन तीन वेळा झाले ..मग मात्र कावळे बाबा ..गुल झाले !
आता मात्र रोज मला सवय व्हायला लागली त्याच्या सोबतीची .
दिवसभर पण बहुधा तोच कावळा समोर च्या झाडावर बसलेला असावा
कारण आमची खिडकी उघडली की आमच्या खिडकीत उडत यायची स्वारी !
आता मला एक छंद च लागला स्वयपाक खोलीत आले की खिडकी कडे पाहायची
आणी रोज सकाळी एक कणकीचा गोळा त्याला देण्या साठी थोडी जास्त कणिक भिजवणे
हे ही एक काम झाले ..
नवरा म्हणाला काही तरीच असते तुझे कावळ्याला कोणी कणिक घालते का ?
मी म्हणले असू दे रें मला बरे वाट्ते ..खुप !!!!
हळू हळू माझी आणी त्याची ओळख घट्ट होऊ लागली
मी त्याला दोस्त म्हणू लागले आता ..आणी
मला त्याच्या डोळ्यातले भाव समजू लागले ..आणी मी तो आला की त्याच्याशी गप्पा करू लागले
तो ही मी काही बोलू लागले की मान वाकडी करून पहायचा
आणी बोलणे संपून गेले की उडून जायचा ..
खरच दिवस भर घरी एकट्या असलेल्या मला त्याची सोबत आवडू लागली
एकदा माझ्या नवऱ्याने ऐकले मला त्याच्या शी बोलताना ..
आणी तो माझ्या जवळ येवून पाहू लागला मी कोणाशी बोलते आहे .,ते ..
लगेच कावळा भुर्र उडून गेला ..
नवरा म्हणाला अग माझे ठीक आहे पण दुसऱ्या कोणी हे पाहिले ना तर वेडी म्हणतील तुला
मी म्हणाले ..असू दे रें छंद आहे माझा तो ..
नंतर पाच सहा महिन्यांनी मला नव्या पाहुण्या ची चाहूल लागली
ही बातमी पण आमच्या दोस्ताला मी आनंदाने सांगितली
त्या दिवशी आमच्या दोस्ताने खिडकी कडून झाडाकडे चांगल्या चार गिरक्या मारल्या
खुप आनंद झाला असावा त्याला असे मला वाटले ..
यानंतर तीन चार महिन्याच्या काळात माझी अवस्था खुप वाईट झाली
तब्येत खुप खालावली माझी अगदी बेड रेस्ट सांगितली डॉक्टरांनी.
तशात घरचे कोणीच आमच्या कडे राहण्या सारखे नव्हते ..
मग बाई लावली स्वयपाकाची आणी कामचलावू कामे मी करू लागले
बाईला सुचना देऊन ठेवली होती रोज एक कणकीचा गोळा खिडकीत ठेवायचा ..
तीला बिचारीला त्यातले लॉजिक नाही समजले ..पण मी सांगते म्हणुन ती तसे करायची
आता स्वयपाक घराची खिडकी फार वेळ उघडी राहायची नाही
आणी माझ्या दोस्ताने पण आपला मुक्काम माझ्या बेडरूम च्या खिडकी समोरील झाडावर हलवला होता
तसे तर खुप कावळे होते त्या झाडावर पण मला माझा दोस्त अचूक ओळखू येत असे
अगदी बेड वर मी झोपले तरी तो मला दिसेल अशा फांदीवर बसत असे
माझे हे वाढते “कावळा वेड “पाहून माझा नवरा अगदी चकित होत असे
पण त्या कठीण अवस्थेत माझे मन रमते आहे हेच त्याच्या साठी खुप होते ..
खरच त्या दिवसात मला दोस्ताची इतकी सोबत झाली
मधून मधून मी गप्पा माराव्या म्हणुन तो स्वताच माझ्या जवळच्या खिडकी पाशी येत असे
आणी एके दिवशी गंमत झाली आपल्या सोबत आपल्या प्रियेला घेऊन
आमचा दोस्त माझ्या खिडकी पाशी आला ..
एक बारीक चणीची कावळी होती त्याच्या बरोबर ..
दोस्ताने काव काव करीत मला तिची ओळख करून दिली
आणी मग दोघेही समोरच्या झाडावर पळाले ...
आता माझी अवस्था आणखीन बिकट झाली होती
जसजसे दिवस भरत होते तसे हालचाली वर आणखी मर्यादा येऊ लागल्या होत्या
मग फक्त रेडिओ ऐकत पडून राहणे इतकेच करायची वेळ आली
दोस्त पण कित्येक तास मग माझ्या बरोबर खिडकीत रेडिओ ऐकत बसे ..
सोसायटी मधील बायका कधी माझ्या तब्येतीची विचारपूस करायला आल्या की म्हणत
कीती कावळे ओरडतात तुमच्या खिडकी जवळ बंद करून टाका ती..
मी फक्त हसले ..त्यांना काय माहीत कीती मोठी सोबत होती माझी ती ..!!
आता माझा मुंबईतला मुक्काम हलवावा लागणार होता
बाळंत पणा साठी पुण्यास जायचे होते
आई येऊन राहिली होती मला घेऊन जाण्या साठी ..
तीला पण ओळख करून दिली दोस्ताची ..
नवल वाटले तीला पण म्हणाली ..अग ऋणानुबंध असतात हे ..त्यामुळे च घडते असे
तु पोटात होतीस माझ्या तेव्हा मला माझ्या गोठ्यातल्या गाईची सोबत वाटे
तिच्या कडे जाऊन बोलले की मला बरे वाटे ..माझी सोबत होती ती तेव्हा ..
आईचे बोलणे ऐकून मला बरे वाटले ..चला माझ्या सारखीच अनुभूती आहे तिची पण ..
दोस्ताचा निरोप घेऊन मी सकाळी पुण्यास गेले ..
त्यानंतर दोन महिने खुप गडबडीचे होते घरचे लोक नातेवाईक मैत्रिणी यांनी मला घेरून टाकले होते
तरी पण मला एक दोन दिवसा आड दोस्ताची आठवण येई
एकदा नवरा आला होता मुंबई हुन मला म्हणाला
तुमच्या दोस्तांनी बहुधा उपोषण सुरु केलेय हल्ली कणिक खात नाहीत नेहेमीसारखी ..
ऐकून मला गलबलून आले ..समजले मला त्याला माझी आठवण येतेय ..
आणखी पंधरा दिवसात मी एका गोड कन्येला जन्म दिला
मग सर्व जण त्या नव्या पाहुण्याच्या आगमनात गर्क होऊन गेलो
तीन महिने कापरा सारखे संपले ..आता मुंबईला परत जायचे होते
आई आली होती बरोबर मला पोचवायला मुंबईला ..
छोटीला घेऊन घरात पाउल ठेवले आणी आधी जाऊन बेडरूम ची खिडकी उघडली
बराच वेळ काहीच चाहूल नव्हती .
मन थोडे अस्वस्थ झाले ..कुठे गेला असेल ..हा दोस्त ?
एक दोन दिवस काहीच चाहूल लागली नाही ..मनात रुख रुख राहिली .
तशात स्वयपाक वाली बाई पण म्हणली .ताई त्यो कावळा लई दिवस न्हाय आला
म्हून मी बी कणिक न्हाय ठेवत आता ..
दोन तीन दिवसांनी अचानक बेडरूमच्या खिडकी जवळ फडफड ऐकू आली
दार उघडून पाहिले तर काय आमचा दोस्त हजर झाला होता
काव काव करून त्याने नुसते डोक्य वर घेतले घर सारे ...
पाळण्यात पहुडलेली छोटी पण बारीक नजर करून इकडे तिकडे पाहू लागली होती
मग एकदा माझ्या हाताने दोस्ताला कणकेचा गोळा घातला तेव्हा कुठे बर वाटले मला
आता माझ्या बरोबर छोटी ची पण “सोबत “बनला दोस्त ..
कसे समजायचे कोण जाणे पण ती झोपली असता अगदी शांत असायचा
पण ती जागी झाली आणी हात पाय उडवून खेळू लागली की याचा आवाज भरात यायचा .
तीला पण आता दोस्ताचे येणे जाणे समजू लागले ..तीही टक लावून खिडकी कडे पाहायची
तो खिडकीतून उडून झाडा कडे गेला ..की मस्त हसायची
आणी एक दिवस तो भयंकर प्रसंग घडला
छोटी पाळण्यात शांत झोपली होती मी घरच्या कामात गर्क होते
आणी काय झाले कोण जाणे अचानक काव काव गलका सुरु झाला
आणी छोटी पण मोठ्मोठ्याने रडू लागली ..
धावत जाऊन बेडरूम मध्ये पाहिले तर काय ..
झाडाची एक फांदी जी खिडकी जवळ टेकली होती
तिथून एक छोटा साप आत शिरू पाहत होता .
आणी तो आत जाऊ नये म्हणुन दोस्त जोरात ओरडून त्याला टोची मारत होता
टोच मारली की साप त्याच्या वर फुस्स ..करीत होता
पुन्हा दोस्त ओरडून टोच मारीत होता
आणी त्याची काव काव ऐकून छोटी मोठ्याने रडत होती ..
मी ताबडतोब छोटीला उचलले आणी बाहेर जाऊन वाचमन ला बोलावले
थोड्याच वेळात वाचमन ने त्याला उचलून पिंजऱ्यात कोंडले
व पिंजरा घेऊन तो जंगलात सोडायला निघून गेला .
सोसायटी तील लोकांना हा प्रकार पाहून “अचंबा ,,वाटला ..
आणी अचानक हा कावळा कसे येथे आला असे सर्वाना वाटले
पण मला समजले ..दोस्त लक्ष ठेवून होता छोटी वर आणी जेव्हा हा साप आत शिरू लागला
तेव्हा दोस्ताने त्याला अडवायचा यथा शक्ती प्रयत्न केला होता ..
त्या दिवशी त्याचे आभार मानताना ..माझा कंठ दाटून आला
आणी तो पण वेड्या वाक्य माना करून मी बोललेले ऐकत होता ..
यानंतर काही दिवसात नवऱ्याची बदली दुसऱ्या मोठ्या शहरात झाली
काही दिवसात निघायचे होते ..दोस्ताला सोडून जायला मन घेत नव्हते ,,
पण ताटातूट तर होणार हे नक्की झाले होते ..
त्या काही दिवसात मी दोस्ताशी भरपूर गप्पा मारल्या आम्ही दोघांनी खुप गाणी ऐकली
छोटी बरोबर पण खुप खेळला दोस्त..!!
का कोण जाणे त्याला पण बोलता येत असते तर बरे झाले असते असे वाटत होते
आणी एक दिवस सारे समान आवरायला सुरवात झाली ..
दोन वर्षे साठवलेला पसारा कामगार येवून आवरू लागले ..
आणी मग खरेच दोस्ताच्या लक्षात सारा प्रकार आला ..
त्या दिवस भर त्याने काही खाल्ले नाही माझ्या कडे पाहिले पण नाही ..
फक्त खिडकी ते झाड एवढ्या फेऱ्या मारत बसला ..
सकाळी उठून घर बंद करण्या पुर्वी दोस्ताला कणिक द्यावी म्हणुन पहिले
पण आता तो गायब ...होता ...कुठेच नव्हता ...
काळजात गलबल झाली ...पाय दारा बाहेर पडेना ..
पण जाणे भाग च होते ना
खाली आल्या वर गाडीत बसण्या पुर्वी पाहिले पण आता झाडावर ही नव्हता माझा दोस्त
आणी गाडी निघाली ..आता मात्र पंखाची फडफड ऐकू आली .
दोस्त गाडीच्या काचे जवळ येवून निरोप घेत होता आमचा ..
छोटी पण खिदळत हसत होती ....थोडे अंतर तो गाडी बरोबर उडत होता ..
नंतर मात्र आमची खरोखर “जुदाई “....झाली ..
आज इतकी वर्षे झाली पण दोस्ताची आठवण कायम आहे ..
आता मुलगी पण सासरी गेली आहे ..पण कावळा पाहिला की दोस्त हमखास आठवतो
कोणते रेशमी बंध आमच्यात होते कोण जाणे ...!
आज या नव्या शहरात आले तिथे जवळ एक मिठाई चे दुकान आहे
खुप प्रकारचे पदार्थ तिथे तयार होतात
रोज सकाळी तिथला मालक एका कट्ट्यावर उरले सुरले पदार्थ व्यवस्थित पसरून ठेवतो
आणी अनेक कावळे येवून काव काव करीत त्याचा फडशा पाडत असतात
रोज हे पाहताना दोस्त आठवतोच ..कदाचित त्या घोळक्यात तो असेल की काय असे वाट्ते