मी पुणेकर !!!
Disclaimer: लेखाच्या नावावरुन उगाच कोणी चहाटळ वाचक, लेखकाचा अथवा लेखाचा संबंध सुरेखा पुणेकरांशी जोडुन तशी काही अपेक्षा ठेवेल तर पदरी घोर निराशा पडेल.
१० वर्ष लोटली मला पुण्यात येऊन. काही गोष्टी जशा आपल्याला उगाचच आवडत नसतात तसं माझं पुण्याच्या बाबतीत होतं. म्हणजे मी अगदी,“जगात कुठेही जाईन पण पुण्यात नाही येणार” वगैरे राणा भीमदेवी गर्जना करायचो. पण माझ्या आणि पुण्याच्या कम(?)नशिबाने, नेमका नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यातच येऊन टपकलो. तरी सुरुवातीच्या काळात मी कटाक्षाने स्वतःला “ठाणेकर” म्हणवुन घ्यायचो. अगदी कोणी मला “काय पुणेकर?” असं विचारलं कि मी छद्मीपणे, “ती शिवी मी अजुन स्वतःला लावुन घेतलेली नाही” वगैरे सांगायला देखील कमी करायचो नाही.
पण जसे जसे दिवस जायला लागले तसं मला माझ्या ह्या धडपडीतला फोलपणा लक्षात यायला लागला. मधली काही वर्ष तर मला “मुहाजिर” झाल्याची भावना व्हायची. ठाण्यातले लोक मला पुणेकर म्हणायचे आणि इथले लोक ठाणेकर (उपरा – असा अर्थ घेतला तरी चालेल). identity crisis च म्हणा ना.
मग शेवटी मी ठरवलं, कि हे काय खरं नाय बुवा. पाण्यात राहुन माशांशी आणि पुण्यात राहुन पुणेकरांशी वैर करण्यात काही शहाणपण नाही. आणि मग हळुच मी स्वतःची “पुणेकर” अशी ओळख करून द्यायला सुरुवात केली.
पण गेल्या १० वर्षात मी इथले खास पुणेरी असे जे अनुभव घेतलेयत ना, विचारू नका.
स्थळ: कुमठेकर रस्ता, चितळे बंधूंच्या दुकानाच्या अलीकडचा कोपरा.
पुण्यात येऊन जेमतेम महिना दीड महिना झाला असेल. आमच्या सौ ना तुळशीबागेत जायचं होतं. माझी इच्छा नव्हतीच. पण..... असो. स्कूटर वरुन दोघे कुमठेकर रस्त्याच्या टोका पर्यंत पोचलो आणि वर उल्लेखलेल्या कोपऱ्यावर रांगेत दुचाकी लावलेल्या दिसल्या. तितक्यात एका माणसाने त्याची स्कूटर काढली आणि मी घाई घाईने ती जागा पटकावली. समोरच्या दुकानातल्या काकांनी माझ्याकडे एक खट्याळ कटाक्ष टाकल्याचा मला भास झाला पण मी दुर्लक्ष केलं. तासा दीड तासाने तुळशीबाग पालथी घालुन परत आलो आणि पाहतो तर मी जिकडे माझी स्कूटर लावली होती तो कोपरा रिकामा. जवळ जाऊन पाहिलं तर त्या जागी रस्त्यावर खडुने “F. K.” असं लिहिलं होतं. मी त्या कटाक्ष वाल्या दुकानदार काका ना विचारलं “इथल्या गाड्या कुठे गेल्या सांगता का जरा?”
काका “खाली लिहिलेलं वाचा कि.”
मी “अहो F. K. लिहिलंय तिकडे”
काका, “फरासखाना पोलीस चौकी. इथे पार्किंग नाही. पिवळा पट्टा दिसला नाही का?”
मी, “मला माहित नव्हतं. पण तुम्हाला माहित होतं तर गाडी लावतानाच का नाही सांगितलत?”
काका, “तुम्ही कुठे विचारलंत?”
आत्ता मला मघाच्या त्या खट्याळ कटाक्षाचा उलगडा झाला. मी निरुत्तर. तुळशीबागेवर आणि त्या काकांवर चीड चीड करत (बायकोवर नाही,हिम्मत नव्हती आणि आजही नाही) F. K. ला जाऊन दंड भरून स्कूटर घेऊन घरी आलो. पण त्या दिवसापासुन तुळशीबागेविषयी मनात जी अढी बसलीये ती आजतागायत.
असंच एकदा डेक्कन जिमखान्यावर अप्पाची खिचडी खायला गेलो. हि अप्पाची खिचडी मिळ्ण्याच ठिकाण म्हणजे पुण्यातली अजुन एक जगप्रसिद्ध जागा. बरोबर ऑफिस मधला मित्र होता. साधारण सकाळची ११.४५ ची वेळ असेल. आम्ही दोघ आत बसुन खात होतो तेवढ्यात २ तरुण आत शिरायला लागले. गल्ल्यावरच्या माणसाने (श्री त्याचं नाव) एखाद्या कुत्र्याला हाकलाव तसं त्या दोघांना, “चला चला चला, बाहेर चला.”
त्यातला एक तरुण, “अरे श्री काय झालं?”
श्री, “हि काय वेळ झाली यायची? हवंच असेल तर पावणे बारा ते १२ बाहेर उभं राहुन खायचं. १२ नंतर ते पण मिळणार नाही.”
बर ते दोघे पण षंढ निघाले. आनंदाने बाहेर उभं राहुन खाल्लं आणि गेले. मी मनातल्या मनात माझ्या कस्टमरशी ह्याच्या १०% तरी रुबाबात बोलु शकेन का? ह्याचा विचार करत खाली मान घालुन निमुट पुढ्यातली खिचडी संपवली आणि बाहेर पडलो. १२ च्या आत.
एकदा मी आणि बायको कर्वे रोड वरच्या एका ड्रेस मटेरीअल च्या दुकानात शिरलो. हिच चालु झालं, हे दाखवा, ते दाखवा. दुकानातल्या माणसाने शांतपणे सांगितलं, “तुम्ही खरच घेणार असाल तर मटेरीअल खाली काढुन उलगडुन दाखवतो. नाहीतर इथूनच पहा.” आम्ही हतबुद्ध. वरुन दुकानाच्या बाहेर आल्यावर हि मला म्हणते, “त्याने माझा इतका अपमान केला तरी तु काहीच बोलला नाहीस”. आता मी हिला कसा काय सांगु, कि मला तर त्या माणसामध्ये “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही” असं बाणेदार उत्तर देणारे लोकमान्य दिसले होते.
साधारण दीड ते दोन वर्षापुर्वीची गोष्ट असेल. अप्पा बळवंत चौकापाशी, तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बरोब्बर समोर एक “अमृततुल्य” आहे. मी एकटाच होतो. म्हंटल चहा प्यावा. म्हणुन त्याच्याकडे जाऊन चहा मागितला. तेवढ्यात माझं समोरच्या दरपत्रका कडे लक्ष गेलं. कटिंग ५ रु. त्याने माझ्या हातात चहाचा कप दिला होता पण आम्ही हिट विकेट वर आउट. काहीही गरज नसतांना मी मोठ्या साळसूद पणे त्या माणसाला सांगितलं, “माझ्याकडे १०० ची नोट आहे बर का. सुट्टे ५ रु नाहीत”. एवढं बोलुन मी चहाचा कप ओठाजवळ आणणार पण फक्त माझा हातच वर आला. त्या चहावाल्याने शिताफीने माझ्या हातातुन कप काढुन घेतला होता. मी दिग्मूढ होऊन त्याच्याकडे पहात राहिलो. मला म्हणे, “सुट्टे घेऊन या आणि मग चहा प्या”. मी त्याच्याशी वाद घालायचा निष्फळ प्रयत्न केला पण तो कसला ऐकतोय. शेवटी त्या अमृततुल्य वाल्याच्या खुन्नस वर त्याच्याच दुकानाबाहेर असलेल्या शेंगदाणे वाल्याकडून १० रु चे शेंगदाणे घेतले, तीच १०० ची नोट देऊन. तिथेच उभं राहुन खाल्ले आणि कागद चुरगाळून त्याच्याच कचऱ्याच्या डब्यात टाकुन निघालो. अपमानाचा बदला, सोडतो कि काय.
हे आणि असे अजुनही काही अनुभव आहेत. हे असे अनुभव आले कि मला पु. लं. च्या विधानाची प्रचीती येते, “पुण्यातल्या दुकानातील सर्वात उपेक्षित वस्तु कोणती असेल तर ती म्हणजे गिऱ्हाईक”.
पण हे असं सगळं जरी असलं तरी आता मी ह्या शहराच्या प्रेमात पडलोय. माझ्यासारख्या आळशी माणसाला तर हे आदर्श ठिकाण आहे. पुर्वी ७.४२, ८.३१ वगैरे अशा वेळा दाखवणाऱ्या माझ्या घड्याळात आताशा ७ नंतर ७.३० आणि त्या नंतर थेट ८ च वाजलेले दिसतात.
ह्या गेल्या १० वर्षात मी पुणेकरांचे ३ प्रकार पाहिलेत. पुणेकर, अस्सल पुणेकर आणि अट्टल पुणेकर. पुणेकर तर आता मी झालोय. पुढच्या २ पायऱ्या पार करायला फार मोठी तपश्चर्या लागते म्हणे. ते येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. पाहुयात.